‘साऱ्याजणी’च्या अक्षरवाटांची दिशा

०८ ऑगस्ट २०२२

‘मिळून साऱ्याजणी’ २०१९ वर्षारंभ अंक प्रकाशनाच्या कार्यक्रमात संस्थापक-संपादक श्रीमती विद्या बाळ यांनी ‘तत्त्व म्हणून मी यापुढे वार्षिक कार्यक्रमात मंचावर बसणार नाही’, असे जाहीरपणे सांगितले होते. २०२० या वर्षी त्या खरोखरच नाहीत, याची मनात रुखरुख आहे.

‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाचा १९८९ ते २०१९ या तीन दशकांतील अंतरंगाचा ‘साऱ्याजणीच्या अक्षरवाटा’ (विद्या बाळ अध्यासन प्रकल्प अहवाल– एक झलक) हा संक्षिप्त दस्तऐवज हातात आल्यानं या लेखाला एक निमित्त मिळालं. या मासिकाने गेल्या तीन दशकात सामाजिक, राजकीय, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जे योगदान दिले, त्याचा व्यापक आवाका या अभ्यासातून समजतो. प्रस्तुत लेखासाठी या दस्तऐवजाचा आधार घेतला आहे. सर्व अभ्यासकांचे मनापासून आभार.

पत्रकार आणि संपादक या दोन्ही कामाची भक्कम शिदोरी, व्यक्तिगत पातळीवरील संघर्षाच्या अनुभवाची किनार, संघटना-चळवळ-एकजूट याने परिवर्तनाला बळ आणि वेग येतो याची खूणगाठ मनाशी बांधून, आणि ग्रामीण वास्तवाचा काही अंशी अभ्यास करून पूर्ण तयारीनिशी श्रीमती विद्या बाळ आणि त्यांच्या गटाने १५ ऑगस्ट १९८९ला ‘मिळून साऱ्याजणी’चा पहिला अंक वाचकांच्या हाती दिला. त्यांनी म्हटल्याप्रमाणे, चळवळीशी नातं ठेवत, अनुभवांच्या आणि त्यातील भावना-विचारांच्या देवघेवीचे दुवे जोडणारी, आपली अशी एक जागा म्हणजे हे मासिक. वाचक-लेखक आणि संपादक यांमध्ये समपातळीवरील संवाद ठेवण्याचे संपादकीय धोरण होते. २००९ मध्ये मासिकाच्या विसाव्या वर्षी विद्याताईंनी संपादकपदाची जबाबदारी डॉ. गीताली वि. मं. यांच्याकडे सुपूर्द केली. ही गोष्ट त्यांच्या दूरदृष्टीचं द्योतक आहे. माणसं जोडणं आणि संवाद साधणं हा श्रीमती विद्या बाळ यांच्या व्यक्तित्वाचा गाभा होता. मासिक चालवण्यात सातत्य आणि दर्जा हे दोन्ही सांभाळत, समान ध्येय-धोरणं असणारी इतर पूरक संस्थात्मक कामं कशी करावीत याचा एक वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. डॉ. गीताली आणि त्यांच्या गटाने आपल्या कल्पकतेने त्यात भर घालत गेल्या दहा वर्षांपासून ही सारी धुरा समर्थपणे सांभाळली आहे.

मि.सा.ने स्त्री-पुरुष समतेचा विचार-आचार हा कुटुंब आणि समाजात रुजविण्यासाठी आपल्या वाचकांना बोलते होण्याचे आर्जव, आवाहन केले. म. फुले, सावित्रीबाई फुले, आगरकर, आंबेडकर आणि अशा इतर अनेकांच्या विचारांचा आणि कार्याचा धांडोळा घेत परिवर्तनाच्या विविध चळवळींची ओळख वाचकांना जाणीवपूर्वक करून दिली. आपल्याला सर्वांनाच खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगायचं असेल, तर आपल्या विचारात, घरात आणि सर्व समाजात परिवर्तन घडवून आणावे लागेल, हे भान तयार करण्याचा पयत्न केला. हे काम गेली तीन दशकं सातत्यानं करणं, ही गोष्ट लक्षणीय आहे. ‘स्वतःशी नव्याने संवाद सुरू करणारं मासिक’ ते ‘स्त्री-पुरुष यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक’ ते ‘ती’, ‘ते’ आणि ‘तो’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी... मासिक नव्हे चळवळ – असा मासिकाचा परीघ विस्तारत गेला. नुसते मासिक नव्हे, तर चळवळ असे म्हणताना कोणत्या प्रकारची चळवळ असा प्रश्न साहाजिकच मनात उमटतो. संवाद साधताना मुख्यत्वे मध्यमवर्गीय सुशिक्षित वाचक मि.सा.च्या डोळ्यासमोर होते. ज्या स्त्रिया कार्यकर्त्या नसल्या तरी ज्यांनी चळवळीकडे पूर्ण पाठ फिरवलेली नाही, अशा स्त्री-पुरुषांसाठी सरधोपट मांडणीच्या पलीकडे जात बुद्धीला आणि विचाराला चालना देणारे लिखाण देण्यास सुरुवात केली. वाचकांनी अंतर्मुख व्हावे, स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा संवेदनशीलतेने विचार करावा. स्त्री म्हणून जिथे जिथे भेदभावाचा अनुभव येतो, त्याबद्दल प्रश्न करावा. कुटुंबातील व्यक्तिगत खाजगी नातेसंबंध, त्यातील दुय्यमत्वाचे ताणेबाणे, संघर्ष, एकटेपण याबद्दल मोकळेपणाने बोलावे. समाजात समता स्थापित करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांची माहिती करून घ्यावी. अशा कामाशी जोडून घेता येते का, ते पाहावे. सर्व ललित कलांमधील दर्जेदार गोष्टींची ओळख करून घ्यावी, आस्वाद घ्यावा, अभिरुचीसंपन्न व्हावे. थोडक्यात, आत्मभान वाढवत समाजभान निर्माण करावे. चांगला माणूस व्हावे. ही बदलाची प्रक्रिया सावकाशपणे पण सातत्याने होत राहावी. अशा मार्गाने तयार झालेल्या ‘कारवां’तून व्यक्ती आणि व्यवस्था या दोन्हीमध्ये बदल होणे, ही एक ‘चळवळ’ आहे.

कोणत्याही महत्त्वाच्या बदलाच्या प्रक्रियेत समाजातील सुशिक्षित मध्यमवर्गाने जागल्याची भूमिका घेतलेली आढळते. त्या स्तराने समाजात सद्‍सद्‍विवेकबुद्धी जागृत ठेवण्याचे काम केलेलं दिसतं. मि.सा.ने मुख्यत्वे अशा स्तरातील वाचकांशी संवाद साधला आहे.

‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाने परिवर्तनासाठी अवलंबलेल्या या मार्गाचा आढावा घेताना या काळात म्हणजे १९८९ ते २०१९ या तीन दशकांत झालेल्या सामाजिक घडामोडींचा संदर्भ नजरेखालून घालणे उचित वाटते. कोणतीही परिवर्तनाची कृती अशा तात्कालिक व्यापक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर घडते, आकार घेते आणि विस्तारते.

संयुक्त राष्ट्राने १९७५ हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि १९७५-१९८५ हे आंतरराष्ट्रीय महिला दशक जाहीर केल्यावर जगभरातील अनेक राष्ट्रांत स्त्रियांच्या दर्जाबद्दल वास्तव जाणण्याचे प्रयत्न सुरू झाले. भारत सरकारने ‘समानतेकडे वाटचाल’ हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध केला. त्यातून आरोग्य, पोषण, रोजगार, शिक्षण अशा अनेक मापदंडावर स्त्रियांचा दर्जा खूप खालचा राहिला आहे, हे वास्तव समोर आले. १९७५-१९८५ या दशकात स्त्रीवादी चळवळ आणि स्त्रीअभ्यास याला नवनवीन वाटा सापडल्या. अनेक बाजूने स्त्रीप्रश्नांवर समाजाचे लक्ष वेधले गेले. स्त्रियांच्या जीवनाचे अनेक पदर वास्तवाच्या भिंगातून मांडले गेले, तपासले गेले. समाजात व्यापक पातळीवर स्त्रियांच्या दुय्यम स्थानाबद्दल जाणीव जागृती झाली. ‘बोलत्या व्हा’मधून नव्याने गवसलेल्या भगिनीभावातून अनेक शहरात ‘स्त्रियांसाठी अवकाश’ स्वरूपात संघटना तयार झाल्या. त्यात लोकशाहीवादी, उदारमतवादी, डाव्या, समाजवादी, स्वायत्त स्त्रीवादी अशा विविध विचारधारांच्या संघटना होत्या. दिल्लीत सहेली, बंगलोरमध्ये विमोचना, मुंबईत नारी केंद्र ही त्यातील काही ठळक उदाहरणे. पुण्यातील नारी समता मंच ही या साखळीतील एक कडी. श्रीमती विद्या बाळ नारी समता मंचच्या संस्थापक सदस्य होत्या. आत्तापर्यंत ‘खाजगी’ समजलेल्या व्यक्तिगत आयुष्यातील दुःख, वेदना, त्रास, हिंसा, दुय्यमत्व याबद्दल स्त्रिया ‘बोलत्या’ झाल्या. अनेकींना मोकळा श्वास घेता आला. त्यांना स्वतःचा अवकाश अशा वाटेने सापडला. विस्कळीत आयुष्य नव्याने उभारण्याची उमेद निर्माण झाली.

स्त्रियांसाठी तयार होत असणाऱ्या या अवकाशाचे, ऊर्जेचे १९८५ नंतरच्या वळणावर काय झाले याचा आढावा घेताना, या तीन दशकांतील घडामोडींचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल.

लोकशाहीवादी समतावादी पुरोगामी स्त्री-चळवळीला विरोध करण्यासाठी स्त्रियांना संघटित करणे १९८५ नंतरच्या काळात एका बाजूला स्त्रियांच्या प्रश्नावर जागृती होत असताना, दुसऱ्या बाजूला विरोधाचा रेटा तयार झाला. समतावादी स्त्री-चळवळीला विरोध करण्यासाठी स्त्रियांना संघटित करण्यात आले. त्याचा पहिला जाहीर आविष्कार १९८५ मधील शहा बानो प्रकरणात दिसला. या प्रकरणाला अनेक विवाद्य बाजू असल्या तरीही ‘Sisterhood is powerful’ या स्त्रीवादी विचाराला शह देत भारतीय समाजात हिंदू स्त्रिया आणि मुस्लीम स्त्रिया अशी उभी फूट पडली. तसेच, स्त्रियांचे हक्क हे संविधानातील तरतुदींशी नव्हे, तर धर्म या ओळखीशी जोडले गेले. तोच विचार रूपकंवर सती प्रकरण (१९८७) आणि भंवरीदेवी (१९९२) प्रकरणामध्ये समाजमनात अधिक पक्का होत गेला. सतीचे समर्थन करणे आणि बलात्कारींचा जाहीर सत्कार करणे, यांमध्ये हिंदुत्ववादी स्त्रिया सहभागी झाल्या. बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्यानंतर देशात झालेल्या १९९२ मधील आणि रेल्वेच्या डब्याला लागलेल्या किंवा लावलेल्या आगीत कारसेवक मृत्यू पावल्याने, २००२ या वर्षी झालेल्या गुजराथमधील; या दोन्ही वेळी झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीत हिंसा करण्यात स्त्रियांचा सहभाग हा त्यातील पुढचा टप्पा आहे. स्त्रीमुक्ती संकल्पनेला व्यवहारात आव्हान देणारी प्रतिगामी स्त्रीशक्ती पद्धतशीरपणे उभी केली. त्याचे १९९२ मधील रूप हे साध्वी ऋतंबरा आणि उमा भारती यांनी बाबरी मशीद पाडण्यासाठी पुरुषत्वाला आव्हान देणाऱ्या प्रक्षोभक भाषणांतून पुढे आले. गुजराथेत २००२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्या श्रीमती माया कोडनानी यांनी दंगलखोरांना आवाहन करत जाळपोळ, खून, लूट करण्यासाठी केलेल्या मदतीतून पुढे आले. या जमातवादी नेतृत्वाच्या पाठबळावर सामान्य हिंदू स्त्रिया आणि पुरुष बाबरी मशीद उद्ध्वस्त करत त्याच ठिकाणी विटा घेऊन राम मंदिर म्हणजेच हिंदुराष्ट्र निर्माणाच्या ‘लोक चळवळीत’ आणि मुस्लीम नागरिकांवर हिंसा करण्यात सहभागी झाले. पुरोगामी स्त्रीवादी चळवळीला होणारा विरोध जात-धर्म-सांस्कृतिक राष्ट्रवाद या स्वरूपात एकवटत गेला.

जात-धर्म-सांस्कृतिक राष्ट्रवाद

१९९२ मध्ये ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे हा निव्वळ योगायोग वाटत नाही. ही सामूहिक कृती एकाच वेळी दलित आणि मुस्लीम नागरिक या दोन्हीच्या विरोधी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया बळकट करणारी होती. त्याला नैतिक पाठबळ देण्यात सुशिक्षित मध्यमवर्गीय पुरुषांबरोबर स्त्रियांचाही सहभाग राहिला आहे.

संसदीय राजकारणात हिंदुत्ववादी विचारसरणीचा भारतीय जनता पक्ष २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत बहुसंखेने विजयी झाला. राजसत्ता हळूहळू पक्षकेंद्री ते व्यक्तीकेंद्री होत गेली. केवळ हिंदूधर्मीय नागरिक भारतात संख्येने जास्त आहेत, म्हणून हा देश ‘हिंदूराष्ट्र’ आहे या संविधानविरोधी धारणेतून सत्ताधारी पक्षाच्या विविध कारवायांचे दुष्परिणाम आपल्या समोर आहेत. हिंदूधर्मांध राष्ट्रवादी पक्ष सत्ताधारी असल्याने मुस्लीमधर्मीय नागरिकांचे नागरिकत्व ‘संशयित’ होऊ शकते, ही गोष्ट नागरिक कायद्यातील दुरुस्तीने अधोरेखित केली आहे. CAA, NPR, NRC या नागरिकांची मोजणी करण्याच्या पद्धतीचा दुराग्रह, या गोष्टीला विरोध करणाऱ्यांना UAPA सारख्या कायद्याखाली अटक करून तुरुंगात टाकणे आणि नागरिकत्वाची नोंदणी करताना ‘संशयित’ असा शिक्का लागलेल्या नागरिकांना बंदिस्त करण्यासाठी मोठ्या शहरात छावण्या बांधणे, आसामसारख्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करता न आल्यामुळे नागरिकत्व सिद्ध न करू शकलेल्यांना अशा छावण्यात टाकणे या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत.

मंडल आयोग

१९९० साली मंडल आयोग आला. भारतीय समाजात जात वास्तवाची घुसळण झाली. समाजातील एक मोठा स्तर लिहिता, बोलता झाला. याच काळात बहुजनवाद संसदीय राजकारणाचा भाग बनला. एका बाजूला नव्याने जागृत झालेला हा इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) स्तर सत्ता स्पर्धेत ‘वंचित, कष्टकरी, परिघावरील बहुजनांचे’ प्रतिनिधित्व करत सत्तेत वाटा मागत होता. तर दुसर्या( बाजूला ‘हिंदूराष्ट्र’ निर्माणाच्या लोकशाहीविरोधी अरिष्ट आघाडीत ओढला गेला.

दलित, बहुजन, मुस्लीम, आदिवासी, ‘इतर’लिंगी, सेक्स वर्कर इत्यादी स्तरातील स्त्रियांच्या वेगळ्या प्रश्नाची मांडणी करण्याचे स्त्रीवादी प्रयत्न होत राहिले. जोडीने लोकशाही संविधानवादी ‘बहुजनवाद’ मांडणीचे तुरळक प्रयत्नही होत राहिले. मात्र, ते संसदीय राजकारणात प्रभावी होऊ शकले नाहीत.

जागतिकीकरण आणि उपभोगवाद

१९९०च्या सुरुवातीला भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. भारतातील मध्यमवर्ग ही एक मोठी बाजारपेठ म्हणून भांडवली अर्थकारणाने हेरली होती. त्यामध्ये स्त्रिया उपभोगवादी होण्याची प्रक्रिया वेगाने होत गेली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारतीय मॉडेल निवडून आल्या (सुश्मिता आणि ऐश्वर्या). सर्व आर्थिक स्तरातील स्त्रिया सौंदर्यप्रसाधनाच्या ग्राहक होत गेल्या. १९८०च्या दशकात स्त्रीवादी चळवळीने सौंदर्यस्पर्धेला विरोध नोंदवला होता. तरी १९९० च्या दशकात मुंबईत एस.एन.डी.टी.च्या आवारात सौंदर्य स्पर्धेचे आयोजन झाले होते. जात-धर्माशी निगडीत सणांचा बाजारपेठेने भरपूर वापर केला. बाजारपेठेच्या मुख्य ग्राहक स्त्रिया राहिल्या. रूढी, परंपरेचे आणि बाजारपेठीय सौंदर्यप्रसाधनांचे ‘बुरखे’ जागृत झालेल्या स्त्री जाणिवांवर आपसूक चढले. जात-धर्म-हिंदुधर्मांध राष्ट्रवादाने स्त्रियांना महाभोंडला, नवरात्रीत विविध रंगाच्या साड्या परिधान करणे, संस्कार-भारती रांगोळ्या काढणे, अथर्वशीर्षाचा सामूहिक घोष करणे, फेटे घालून फटफटीवरून ‘हिंदू नूतन वर्ष मिरवणुकी’त सामील होणे, या प्रकारच्या कार्यक्रमात तथाकथित ‘हिंदू संस्कृतीचे जतन’ या नावाखाली गुंतवले.

जगण्यासाठी अपार कष्ट करणारा विस्थापित, असंघटित, शोषित, कष्टकरी, कामगार वर्ग आणि उपभोगवादी चंगळवादी मध्यमवर्ग अशा दोन भागात स्त्रियांची, किंवा समाजाची विभागणी झाली.

विनाशकारी विकासाच्या प्रारूपाला विरोध

२९ सप्टेंबर १९८९ रोजी मध्यप्रदेशातील हरसूद या गावी ६०,००० शेतमजूर, शेतकरी, आदिवासी आणि नागरी संघटनाचे प्रतिनिधी यांची विनाशकारी विकासाच्या प्रारूपाला विरोध करण्यासाठी मोठी परिषद झाली. सरदार सरोवरला विरोध करणारे नर्मदा बचाव आंदोलन सातत्याने हा प्रश्न घेऊन आजही काम करत आहे. आदिवासींच्या जगण्याच्या आधारावर हल्ला करत, ते नष्ट करत होणाऱ्या विकास प्रकल्पांना अनेक ठिकाणी विरोध होत राहिला आहे.

पर्यावरण, हवामान बदल, प्रदूषण यावर माध्यमातून माहिती मिळत राहिली. हवामान बदलाचे प्रत्यक्ष तडाखे बसत असूनही प्रत्यक्ष जीवनात चंगळवादी राहणीमानाला नाकारणे जमताना दिसत नाही.

असंघटित कामगार आणि स्वयंरोजगार

१९८९ मध्ये ‘श्रमशक्ती’ हा अहवाल प्रसिद्ध झाला. प्रथमच या क्षेत्रातील स्त्रियांची स्थिती तपशीलात चर्चेत आली. डॉ. इला भट यांनी स्थापन केलेल्या SEWA (self Employed Women’s Association) ही संस्था असंघटित क्षेत्रातील स्त्रियांना संघटीत करण्याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. असे प्रयत्न अनेक ठिकाणी होत आहेत. २०२० मार्चपासून सुरु झालेल्या COVID १९ या महासाथीने स्थलांतर कराव्या लागलेल्या असंघटीत कामगारांची दृष्ये समोर येतात. त्यावेळी कोणतीही सरकारी यंत्रणा त्यांच्या मदतीला आली नाही. परंतु असंघटित कामगारांना किमान सोयी मिळाव्यात म्हणून काम करणाऱ्या संघटनांनी या कठीण काळात मदत जमा केली.

स्त्री-चळवळीचे मुद्दे व्यवस्थेचा भाग होणे

कुटुंब न्यायालय, राज्य-राष्ट्र महिला आयोग, राज्य-राष्ट्र महिला धोरण, कुटुंब सल्ला केंद्र, पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कौटुंबिक हिंसा प्रतिबंध करणारी केंद्रे, महिला विकास कार्यक्रम (women development program), पंचायत राज, बचत गट इत्यादी व्यवस्था चळवळीच्या मागण्यांमुळे तयार झाल्या. पण स्त्रियांसाठी असणाऱ्या या व्यवस्था कितीतरी वेळा स्त्रियांना उपकारक होताना दिसत नाहीत. यामधे भंवरीदेवी हे प्रकरण जात-धर्म-सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि महिला विकास धोरण यांमधील तफावत प्रखरपणे पुढे आणते.

राजसत्तेने स्त्रियांवर केलेली हिंसा

शर्मिला इरोम, जम्मू-काश्मीर तसेच नॉर्थइस्टमधील नागरिक आणि सोनी सोरी यांसारखे आदिवासींचे हक्क मागणारे नेतृत्व उदयाला येणे इत्यादि याची प्रखर उदाहरणे आहेत. विकासाचे विशिष्ट प्रारूप स्वीकारल्यामुळे न्याय्य हक्कांची आंदोलने नष्ट करण्यासाठी केलेली ही हिंसा आहे. याची मोठी किंमत स्त्रियांना द्यावी लागते. या विरुद्ध दाद मागण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना सरकार UAPA सारख्या कायद्याखाली तुरुंगात टाकते.

तो-ती-ते आणि विशेष क्षमता असणारे स्तर

‘इतर’लिंगी ओळख असणारे स्तर; तसेच, विशेष क्षमता असणारे स्तर यांच्या जगण्याच्या वास्तवाचे कथन आणि शोषण, अन्याय याचे निराकरण या अंगाने चळवळीचे परीघ वाढले.

स्त्रिया, प्रजजन आणि आरोग्य

या विषयांवर न्याय मागण्यासाठी स्त्रीवादी चळवळीने वेळोवेळी आंदोलन केले आहे. गर्भलिंगनिदान आणि निवड यामुळे घटणारे स्त्रियांचे प्रमाण या समस्येवर स्त्रीचळवळीने सातत्याने काम केले. पाळीच्या संदर्भातील गैरसमजुती, मुलगाच हवा ही मानसिकता, पुरुषांसाठीची कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया सोपी असूनही कुटुंबाकडून स्त्रियांवरच ती लादली जाणं यांतून सुशिक्षित मध्यमवर्गही फारसा प्रबुद्ध झालेला नसण्याचे लक्षण ठळकपणे दिसते.

अभिजात आणि बाजारपेठी कला

वरील सर्व घटितं, यासारखी इतरही अनेक घटितं यांच्या भोवती लोकप्रिय दूरदर्शन मालिका, चित्रपट, साहित्य, नाटकं, संगीत, चित्र इत्यादींची निर्मिती झाली. त्यांचाही आढावा घ्यायला हवा. विसाव्या शतकातील शेवटचे दशक आणि २१व्या शतकातील दोन दशके असा हा काळ आहे. याकडे पाहताना वरील घटितं लक्षात येतात. ही यादी परिपूर्ण अर्थातच नाही. यामधे इतर अनेक मुद्दे जोडावे लागतील. या उतार-चढावात स्त्रीवादी (लोकशाहीवादी, मानवाधिकार, समाजवादी, डावी, स्वायत्त...) चळवळ नेटाने विचार आणि कृती करत राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आपण मि. सा.ने हाताळलेल्या विषयांकडे वळूया. त्यामध्ये विनाशकारी विकासाला विरोध करणाऱ्या जनचळवळीचा आढावा अनेक प्रकारे घेतला आहे. नर्मदा बचाव आंदोलनाचा विषय तपशीलात मांडला आहे. ज्यामध्ये समता, न्याय आहे आणि पर्यावरणाचा विनाश नाही, तोच खरा विकास असा स्पष्ट संदेश मि.सा.मधून वाचकापर्यंत पोहोचतो. श्रमशक्ती अहवाल, असंघटित कामगार, आदिवासींचे जमिनीचे हक्क, उपभोगवाद, जागतिकीकरण, ‘इतर’लिंगी ओळख, विशेष क्षमता असणारा स्तर आणि त्यांचे प्रश्न, विविध ललित कला या आणि अशा कितीतरी विषयावर लिखाण झाले आहे. विषयांच्या हाताळणीचा पोत समाजात चांगुलपणा, उदारमतवाद, आस्था, माणुसकी, संवाद यांसारखी मूल्ये रुजविण्यासाठी बिया पेरण्याचे जे काम सातत्याने करावे लागते त्या प्रकारचा आहे. त्यातून विविध पातळीवर अनेक समृद्ध जाणिवा निर्माण होण्याची शक्यता नक्कीच वाढते.
विविध विषयांवर ‘माहिती देणे’ असे आवर्जून केलेले दिसते. पण माहितीची चिकित्सा करणं हा भाग निसटतो की काय असं काही वेळा वाटतं. वस्तुनिष्ठतेने माहिती देण्याच्या भूमिकेतून राष्ट्र सेवा समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांची ओळख करून दिली आहे. ती माहिती देताना परिवर्तनाच्या धारणांमधील वेगळेपणा, फरक याची मांडणी केली जात नाही. थोडेसे तपशीलात सांगायचे झाल्यास ते असे- कोणतेही समाजोपयोगी काम ‘गरीब बिच्चारे/बिच्चारी माणसं’ असं समजून करण्यामागे एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. त्याच वंचित माणसांकडे त्यांचे न्याय्य हक्क डावलले गेल्याने त्यांची आज अशी अवस्था झाली आहे, असे समजून व्यवस्था बदलण्याच्या अंगाने प्रतिबंधाचे काम करणे या मागे पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन असतो. या दोन्हीमधील फरक लक्षात आणून दिला जात नाही. केवळ दयाबुद्धीतून वंचितांचे हक्क डावलणाऱ्या व्यवस्थेबद्दल सखोल जाणीव तयार होत नाही. भेदभाव आणि तफावत तयार करणाऱ्या व्यवस्थेतील सत्तासंबंध बदलल्याशिवाय वंचितता कमी होणार नाही, जाणार नाही. राष्ट्र सेविका समितीच्या धारणा स्त्रियांच्या दुय्यम स्थानाबद्दल कुटुंब आणि समाज यातील सत्तासंबंधाना प्रश्न विचारत नाहीत. उलट, सत्तासंबंध तसेच ठेवत स्त्रियांनी राष्ट्रीय काम म्हणून बलवान प्रजा तयार करणं, कसं जरुरी आहे, हे त्यांच्या मांडणीतून बिंबवले जाते. चिकित्सक विश्लेषण न करता नुसतीच माहिती देण्याचे हे धोरण चांगले माणूस घडण्यासाठी जी जाणीव जागृती करायची आहे त्याला कसे उपकारक ठरणार? मि.सा.च्या वाटचालीतील असे संदिग्ध बिंदू न्याहाळताना, मासिकाचे वाचक आर.एस.एस, जनसंघ अशा उजव्या विचारसरणीच्या जवळचे असल्याने त्यांना सामावून घेण्याचे धोरण ठेवावे लागते की काय अशी शंका येते. वाचकांना जोडून ठेवण्याच्या या भूमिकेमुळे मि.सा. मासिकातून १९९२ आणि २००२ या वर्षात झालेल्या हिंदू-मुस्लीम दंगलीबद्दलचे अहवाल, चर्चा, अनुभव, मुलाखती, कथा, कविता फारशा प्रसिद्ध झालेल्या दिसत नाहीत. समाजातील १३-१४ टक्के मुस्लीम नागरिकांच्याबद्दल हिंदूंच्या मनात हेटाळणी, अनास्था, गैरसमज, संशय, असुरक्षितता, भय, तिरस्कार, द्वेष, वैर आणि हिंसा असेल तर चांगला माणूस घडण्याची प्रक्रिया किती अवघड होईल याची नोंद घ्यायला हवी. व्यक्ती, कुटुंब, समाज, देश आणि विश्व यामध्ये लोकशाही नांदली, तर चांगला माणूस होण्याची वाट सुकर होणार आहे. आपल्या देशातील मुस्लीम नागरिकांच्या बाबतीत असा द्वेष जर मनामनात भरला असेल, तर लोकशाही तगू शकणार नाही. त्यामुळेच मनातील हे वैर काढून टाकण्याची प्रक्रिया घडायला हवी. ती अनुभवांवर आधारित लिखाणातून घडू शकते. १९९२च्या दंगलीत मे. पु. रेगे यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये ‘आवेज, तू कोठे आहेस’ या शीर्षकाखाली एक पत्र लिहिलं होतं. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल सामानाचे ‘आवेज’ नावाचं बांद्र्यातील दुकान दंगलखोरांनी जाळून खाक केलं होतं. त्याकडे पाहून श्री. रेगे यांच्या मनात त्या दुकानमालकाबद्दल ज्या भावना आल्या, त्या त्यांनी या पत्रातून व्यक्त केल्या होत्या. त्या काळात आम्ही बांद्र्यातच राहत असल्याने जवळच्या मुस्लीमबहुल वस्तीत श्री. आवेज यांचा शोध घेतला. आमच्या भेटीमुळे श्री. आवेज आणि कुटुंबीयांना खूप बरं वाटलं. श्री. आवेज म्हणाले होते, “रेगे साहब आंखे मुंदकर भी बहुत दूरका देख सकते है. खत पढकर मैं उनसे मिलकर आया. सुकून मिला.” त्याच काळात २६ जानेवारी १९९३ या दिवशी बाबा आमटे बांद्र्यातील बेहरामपाडा या मुस्लीम बहुल वस्तीत झेंडावंदन करायला मुख्य पाहुणे म्हणून आले होते. कलानगरमधील ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि साहित्यिक दामू केंकरे यांच्या पुढाकाराने सद्‍सद्‍विवेकबुद्धी जागी असणाऱ्या काही व्यक्तींनी यामध्ये पुढाकार घेतला होता. ‘भारत जोडो–भारत जोडो–नफरत छोडो–भारत जोडो’ या घोषणांनी वातावरण भारून गेलं होतं. त्या काळात दिग्दर्शक श्रीमती मधुश्री दत्ता यांनी ‘I live in Behrampada’ हा माहिती पट तयार केला होता. या अस्वस्थ काळाचे वृतांकन करणाऱ्यात श्रीमती तिस्ता सेटलवाड यांचे नाव पुढे आले. त्यांनी शाळेतील ५ वी पासूनच्या मुलां-मुलींसाठी ‘खोज’ नावाचा प्रकल्प सुरू केला. भारत हा विविधतेने पूर्ण असा देश आहे. आपण विविधतेचा उत्सव करायला शिकले पाहिजे. हा संदेश लहानपणीच दिला, तर मुलामुलींमध्ये मोठेपणी माणूसपण सहज फुलेल आणि बहरेल या हेतूने हा प्रकल्प आजतागायत शाळांमधून सुरू आहे. श्रीमती तिस्ता सेटलवाड यासारख्या इतर अनेक संस्था आणि व्यक्तींचे अशा प्रकारचे कार्य आजही त्याच नेटाने चालू आहे. माणुसकीच्या वाटा सुकर आणि रुंद करणारे, असे अनेक अनुभव मि.सा.च्या वाचकांना साद घालू शकले असते. एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. मासिकात मुस्लीम व्यक्ती, संस्था यांची माहिती देणारे लिखाण आहे. मुस्लीम समाजाची सकारात्मक बाजू मांडली आहे. मात्र, त्यातून वाचकांना स्वतःच्या मनाची मशागत करून त्यातील इस्लाम धर्म आणि मुस्लीम नागरिक यांच्यासंबंधी असलेले गैरसमज, पूर्वग्रह, तिरस्कार, वैर, द्वेष आणि हिंसा यासारख्या नकारात्मक भावनांचा निचरा करण्याचा अवसर मिळतो, असं वाटत नाही. सर्वसाधारण व्यवहारात गाडी दुरुस्त करणारा, गाडी चालक, दिवसभर लागणारा मदतनीस मुस्लीम चालतो. त्याच्याबरोबर व्यवहार करताना वरील नकारात्मक भावना आड येत नाहीत. परंतु इस्लाम धर्म आणि मुस्लीम नागरिक असा विचार करताना मात्र सर्व पूर्वग्रह आड येतात. ते दूर होण्याची प्रक्रिया मि.सा. मधील लेख वाचतानाही घडत नाही. ‘असेल असे उदाहरण एखादे. मलाही माहीत आहे, माझ्या गावातला कासार चांगला आहे. पण त्यांनी हिंदूंची देवळं लुटली, आपल्या स्त्रियांवर बलात्कार केले, ते किती अस्वच्छ असतात, आपल्यासाठी पवित्र असलेली गाय मारून खातात, ते किती मागासलेले आहेत, त्यांच्या स्त्रियांना बुरख्यात ठेवतात, आपले कायदे पाळत नाहीत, त्यांची संख्या एवढी वाढतीय की काही दशकात हा हिंदूंचा देश राहणारच नाही, खूप लाड केले जातात त्यांचे, ते नेहमी काळा बाजार करतात, अवैध धंदे करतात, शस्त्र बाळगतात, पाकिस्तानशी संबंधित असतात, वास्तविक हा त्यांचा देश नाही, त्यांनी पाकिस्तान घेतला आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे, त्यांच्या धर्मग्रंथातच हिंसा सांगितली आहे, ते त्यामुळे हिंसक आणि दहशतवादी असतात, ते देशद्रोही असतात इ.इ.’ हे विचारचक्र भेदले जात नाही. परिवर्तनाची जी पद्धत मि. सा.ने निवडली आहे, त्यात माणसाच्या मनाची मशागत सावकाशीने करत, त्याच्या दृष्टिकोनात बदल घडवत एकूणच माणुसकीने आचारविचार करण्याची शक्यता निर्माण करायची, अशी आहे. त्यामध्ये इस्लाम धर्म आणि मुस्लीम नागरिकांच्याबद्दल निर्वैर मन बनविण्याच्या वाटेवर आवश्यक असणारे संदर्भ बिंदू तयार होताना आढळत नाही. आपल्या वाचकांना अप्रिय असलेले संदर्भ बिंदू टाळलेले इष्ट या विचाराचे अनामिक दडपण त्यासाठी कारणीभूत असेल का, असा प्रश्न मनात तयार होतो.
मोठ्या संख्येने आज सुशिक्षित मध्यमवर्ग ‘हिंदूराष्ट्र’ बांधणीच्या मार्गाचा प्रमुख समर्थक आहे. धर्म-जात संकल्पनांवर आधारित राष्ट्रवाद हा कोणत्याही धर्मातील, जातीतील स्त्री-पुरुषांचा ‘जगण्याचा अवकाश’ संकुचित करतो, हा विचार सुशिक्षित मध्यमवर्गाला पटत नाही. हे वास्तव मि.सा.ने अंगिकारलेल्या संवाद पद्धतीचे परीक्षण करण्याची निकड अधोरेखित करते. वास्तवाला थेटपणे भिडायचे असेल तर नवीन संदर्भबिंदू तयार करावे लागतील आणि जुने संदर्भबिंदू नव्याने मांडावे लागतील.

इस्लाम धर्म आणि मुस्लीम समाजाबद्दल आपलं मन निर्वैर करण्यासाठी खालील सूत्र विचारार्थ सुचवावंसं वाटतं. इतर सर्व धर्म विचारांप्रमाणे इस्लाम धर्म विचारातही :

  • नीतीने, नेकीने, माणुसकीने वागण्यासाठी आधार आहेत

  • ललित कला, स्थापत्य आणि इतर अनेक ज्ञानशाखांमधील ज्ञान निर्मितीचे स्रोत आहेत

  • धर्मविद्या (theology) या अंगाने विस्तार आहे

  • युद्ध-हिंसा (केवळ बुद्ध धर्म विचारात युद्ध-हिंसा याचे समर्थन करणारे विचार नाहीत, ही गोष्ट नोंदवायला पाहिजे) तसेच शांती या दोन्हीसाठी संदर्भ आहेत

  • धर्माच्या संस्थात्मक व्यवस्था आहेत ज्या उपकारक आणि अपकारक अशी दोन्ही कामे करतात.

इस्लाम धर्म विचारांच्या आधाराने आठव्या शतकात अब्बासी खिलापतीत ‘ज्ञानालय’- House of Wisdom- मधून पूर्व आणि पश्चिम भूप्रदेशामधील लॅटिन, ग्रीक, संस्कृत इत्यादी प्राचीन भाषांमधील ग्रंथ जतन केले गेले आणि त्याची अरबीतून भाषांतरे केली. अखंड मानवी समाजाला विविध ज्ञानशाखांचा अभ्यास आणि विस्तार करण्यासाठी या कृतीतून मोलाचा आधार मिळाला आहे.

इतर सर्व धर्मीयांप्रमाणे इस्लाम धर्मीयांमध्ये रूढी परंपरावादी, कर्मठ, अतिरेकी, हिंसक, उदार, सुधारणावादी, शांतताप्रिय, मानवतावादी अशा सर्व प्रकारची माणसे आहेत. त्यामध्ये विविध भाषा, प्रांत, जाती, सांस्कृतिक पैलू आहेत. अमूक एक धर्माचा, जातीचा माणूस म्हणजे तो अमूक प्रकारचाच असणार, ठरावीक पद्धतीनेच वागणार अशा पूर्वग्रहदूषित साचेबद्ध विचाराला कोणत्याही ज्ञानशाखेतील पुरावाधिष्ठीत अभ्यासाचा आधार नाही. हे एवढ्या विस्ताराने इथे नमूद करण्याचं महत्त्वाचे कारण म्हणजे जगभरच इस्लाम धर्म आणि मुस्लीम समाजाचं राक्षसीकरण सातत्याने केलं जातं आहे. आपल्या न कळत आपण अशा प्रचाराच्या प्रभावाखाली येऊ शकतो. असे होऊ नये म्हणून आपल्याला अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे.

आपल्या विचारांचे सूत्र वरीलप्रमाणे ठेवल्यास, आपल्याला इस्लाम धर्म आणि मुस्लीम नागरिक यांच्या संदर्भात आपले मन निर्वैर करायला मदत होईल. माणसामाणसात भिंत उभी करणारी ‘आपण’ आणि ‘ते’ अशी विभागणी दूर करून नवीन संदर्भबिंदू तयार करता येतील.

‘साऱ्याजणीच्या अक्षरवाटा’ हा मिळून साऱ्याजणी या मासिकाचा १९८९ ते २०१९ या तीन दशकांतील दस्तऐवज आणि प्रत्यक्ष काम याचा लेखाजोखा हा संवादाचे आणखी नवे नवे पूल बांधण्यासाठी ऊर्जा निर्माण करेल, अशी आशा करते.

अरुणा बुरटे

aruna.burte@gmail.com