निर्भेळ वाचनानंद देणारी स्मरणयात्रा!

१२ फेब्रुवारी २०२६

उंच गिरीशिखरांच्या चढाईनंतर आपली दृष्टी वळते ती पायथ्याच्या दिशेला... खालचा आरंभीचा परिसर न्याहाळणे ही सहजच घडणारी क्रिया! आयुष्याच्या प्रवासातही एका विशिष्ट टप्प्यावर थबकून आतापावेतो केलेली मार्गक्रमणा, त्यातले चढउतार, खाचखळगे आणि कडू-गोड आठवणींची उजळणी शब्दांत उतरविणे - हा असाच एक स्वानंदी अध्याय, डॉ. अच्युत वन लिखित 'माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा' हा आत्मपर ग्रंथ अशाच स्वयंप्रेरित, स्वानंदी जातकुळीतील ...

एका निष्णात नामवंत वैद्यकीय चिकित्सक व पर्यटनप्रेमी ह्या भूमिकेतून तब्बल वीस पुस्तकांचे लेखन केलेल्या डॉ. बन यांनी, आपल्या षष्ठाब्दीच्या वळणावर, कोरोना महामारीच्या टाळेबंदीची संधी साधून, आपला जीवनप्रवास स्वैर पद्धतीने ग्रंथबद्ध केला आहे. साचेबद्ध आत्मकथनाचा हेतू नसण्याचे ते प्रारंभीच नमूद करतात. 'होटाळा' या लहानशा खेड्यातील 'गोसावी' कुटुंबात, दहा अपत्यांमद्ये सहाव्या क्रमांकावरील जन्म आणि दत्त संप्रदायाचा वारसा असूनही, अच्युत असे झालेले नामकरण - इथपासून या स्वैर स्मरणयात्रेचा आरंभ होतो. पोथीपुराणाचे वाचन, भजन करणारे वडील आणि काटकसरीने राबत घरगाडा ओढणारी आई अशी बालपणीची जडणघडण ही शिक्षणाचे बीज अंकुरित करून त्यासाठी संघर्षाची मनोभूमिका तयार करणारी ठरली. छोट्या खेड्यापासून, तालुका, जिल्हा स्तरावरून औरंगाबाद-मुंबईच्या उच्च वैद्यकीय शिक्षणापर्यंतचा गाठलेला खडतर वाटेचा पल्ला हा या स्मरणयात्रेचा मुख्य गाभा. तो विलक्षण अशा प्रसंगांनी भारलेला आणि म्हणूनच प्रेरणादायी असा आहे!...

शिक्षणासाठी गाव सोडताना मायबापापासून होणारी ताटातूट, यावेळी आईने मोठ्या मायेने हातावर ठेवलेले चार आणे आणि पुढे स्कॉलरशिप प्राप्त झाल्यावर बापाच्या हाती सुपूर्द केलेले २५० रू. यासारखे प्रसंग भावविभोर करून जातात. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश, त्यापूर्वीच्या अकरावीच्या महत्वाच्या वर्षी वडिलांचा कर्करोगाने झालेला मूत्यू, वसतिगृहातील जीवन, महाविद्यालयीन काळातील देशांतर्गत पर्यटन, तिथला मित्रपरिवार अशी नागमोडी वळणे स्मरणयात्रेत आहेत. स्वबळावर डॉक्टर होण्याची परिपूर्ती आणि सुसज्ज वैद्यकीय शुश्रूषालय उभे करण्याची जिद्द व परिश्रम यांची मनोज्ञ कहाणी पुढच्या टप्प्यात येते. या कहाणीमध्ये विविध नातेसंबंधांचे धागे गुंफलेले आहेत. नऊ भावंडे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, काहींचा लाभलेला अल्पसा आधार तर इतरांसाठी उचलावी लागलेली जबाबदारी यांचा उहापोह त्यात आहे. एकूणच, कर्तव्यकठोरता आणि जबाबदारी निभावण्याची वृत्ती अनेक प्रसंगांमधून डोकावते.

नात्यांची नाजूक रेशीमगाठ जिच्याशी बांधली, त्या आपल्या सहचारिणी डॉ. वर्षा यांचेबद्दलची आदरयुक्त -प्रेमभावना भरभरून व्यक्त झाली आहे. स्मरणयात्रेतील हे गुलाबी पर्व म्हणजे वैवाहिक सहजीवनाचा मनोरम वस्तुपाठ होय! दोघांमध्ये सजातीय आणि वैद्यकीय पदवी एवढेच काय ते साम्य, बाकी कौटुंबिक व आर्थिक पार्श्वभूमी, प्रांतीय चालीरीती आणि स्वभावधर्म यातील लक्षणीय अशी तफावत, आपल्या शिस्तशीर परंतु समंजस वर्तनाने सांधून घेणाऱ्या पत्नीस मोठे श्रेय देण्याचा प्रांजळपणा उल्लेखनीय होय!... सहजीवनाचा हा समांतर, समजूतदार प्रवास, आपल्या दोन्ही हुशार पुत्रांबद्दलची कौतुकमिश्रित अभिमानाची छटा आणि आपल्या सासूबाईंबद्दलची आपुलकी उजागर करणारे स्वतंत्र प्रकरण - यातून दिसतो नातेबंधांचा जिव्हाळा आणि जपणूक!

सामाजिक आणि संस्थात्मक उपक्रमातील सक्रिय सहभाग, आई-वडिलांच्या स्मरणार्थ दिले जाणारे पुरस्कार आणि काही विषयांवरील मतप्रदर्शन करणारी टिपणे अशा बहुविध आयामांनी संपन्न अशी ही स्मरणयात्रा लेखकाबद्दलचा आदर वृद्धिंगत करणारी आणि निर्भेळ वाचनानंद देणारी अशीच आहे!

पुस्तकाचे नाव : माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा लेखक : डॉ. अच्युत बन प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे पृष्ठसंख्या : ३१४ मूल्य : रू. ४५०/-