अ वाइफ्स कन्फेशन
माझ्या जीवनातली सर्वात सुंदर आठवण सांग असं तू मला म्हणालास; पण मित्रा, मी खूप वयोवृद्ध आहे. मला नातेवाईक, मुलंबाळं, सगेसोयरे नाहीत. त्यामुळे तुझ्याजवळ कबुलीजबाब द्यायला मी मोकळी आहे. मात्र, मला एक वचन दे. माझं नाव तू कोणासमोर उघड करणार नाहीस. माझ्यावर खूप जणांनी प्रेम केलं, हे तू जाणतोसच. मी माझ्यावरही अनेकदा प्रेम केलं. मी रूपवती होते. आज माझं सौंदर्य लयाला गेलं असलं, तरी मी आजही तसं म्हणू शकते. हवा जशी शरीराला आवश्यक असते तसं प्रेमाशिवाय जगणं शरीराला अशक्य होतं. काळजी घ्यायला कोणी नसण्यापेक्षा मी मरण पत्करलं असतं. स्त्रिया अनेकदा मनाच्या सर्व शक्तीनिशी प्रेमाचं नाटक करतात. असं अनेकदा घडतं व जेव्हा घडतं तेव्हा ते फार हिंसक असतं. माझ्या बाबतीत एकदा असं घडलं की त्यामुळं माझे सर्वच व्यवहार थंडावत आहेत व मला काहीच करता येणार नाही असं मला वाटलं. पण आग जशी नैसर्गिकरीत्या इंधनाअभावी थंड होत जाते, तशी मीही हळूहळू सावरले.
आज मी तुला माझं पहिलं धाडसी कृत्य सांगणार आहे. मी त्यात अगदी निरपराध होते. मात्र त्यात अन्य लोक गुंतलेले होते. पेकमधील त्या औषधवाल्यानं घेतलेल्या भयानक सूडाच्या घटनेतील धक्कादायक नाटकाची मला आठवण होते. मी त्यात प्रेक्षकाची भूमिका बजावत होते. काही वर्षापूर्वी एका प्राचीन ब्रेटन कुटुंबातील माणसाशी माझा विवाह झाला. माझं त्याच्यावर अजिबात प्रेम नव्हतं. मला वाटतं खऱ्या प्रेमाला स्वातंत्र्य व त्याचवेळी अडसरही असावा लागतो. कायद्यानं मान्यता दिलेलं पण लादलेलं आणि धर्मगुरूंनी आशीर्वाद दिलेल्या प्रेमाला खरं प्रेम म्हणता येईल का? कायदेशीर चुंबन कधीच चोरट्या चुंबनाइतकं छान नसतं. माझा नवरा चांगला उंचापुरा, धिप्पाड होता. तो वागण्याबोलण्यात सभ्य वाटत असे. त्याचं वर्तन सुसंस्कृत माणसासारखं होतं. मात्र त्याच्याकडं फारशी बुद्धिमत्ता नव्हती. तो स्पष्टवक्ता होता. त्याच्या मनातील विचार त्याला त्याच्या आईवडलांकडून मिळाले होते व त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून आयते मिळाले होते असा त्यानं समज करून घेतला होता. कोणत्याही विषयावर तो आपली कोती मते मांडत असे. एखाद्या गोष्टीकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं असा विचार त्याच्या डोक्यात कधीच येत नसे. तो बिनदिक्कतपणे मनात येईल ते बोलून टाकत असे. आपलं डोकं त्यानं कायम बंद करून ठेवलं असल्यानं कोणत्याच वेगळ्या कल्पना त्याच्या डोक्यात येत नसत वा शिरत नसत. घराच्या उघड्या खिडकीतून ताजी हवा श्वासावाटे घेतल्यावर उत्साह वाटतो तसंच नवे विचार वा कल्पना यामुळं माणसाचं मन प्रगल्भ होतं.
आम्ही राहत होतो, तो वाडा त्या प्रदेशाच्या मध्यभागी असणाऱ्या मोकळ्या भागात होता. ती खिन्न वास्तू प्रचंड वृक्षांनी वेढलेली होती. त्या झाडावरील शेवाळाचे थर वृद्ध माणसाच्या पांढऱ्या दाढीसारखे दिसत असत. ते जंगल हा-हा नावानं ओळखल्या जाणाऱ्या खोल खंदकांनी वेढलेलं होतं. त्याच्या दुसऱ्या टोकाला मूरलँडजवळ आमची तळी होती. ती वेली व तरंगत्या गवतानं भरलेली असत. ह्या दोन्हीच्या मध्ये असलेल्या झऱ्याच्या काठावर माझ्या नवऱ्यानं जंगली बदकांच्या शिकारीसाठी एक छोटीशी झोपडी बांधली होती. नेहमीच्या नोकरांखेरीज आमच्याकडं एक मूर्ख रखवालदार होता. त्यानं आपलं जीवन माझ्या नवऱ्याला वाहिलं होतं. शिवाय मी पाच वर्षांपूर्वी माझ्याबरोबर स्पेनहून आणलेली पार्क्विस्टा नावाची मोलकरीण होती. तिची माझ्याशी खूपच जवळीक होती. ती माझी मैत्रीणच झाली होती. ती एक अनाथ मुलगी होती. तिचा काळसर रंग व काळेभोर डोळे यामुळं ती जिप्सी म्हणून सहज गणली गेली असती. तिचे दाट केस नेहमी तिच्या कपाळाभोवती रुंजी घालत असत.
शरद ऋतूची सुरुवात होती. आम्ही कधी शेजारच्या इस्टेटीवर तर कधी आमच्या इस्टेटीवर खूप शिकार केली. तेव्हा बॅरन डी.सी. हा तरूण आमच्या घरी वारंवार यायचा. नंतर अचानक तो यायचा बंद झाला. मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, तेव्हापासून माझ्या नवऱ्याचं माझ्याशी वागणं बदललं होतं.
तो आत्ममग्न व अबोल झाला. तो माझं चुंबन घेत नसे. मीच एकटं राहण्यासाठी वेगळ्या खोलीच्या मागणीचा आग्रह धरला होता. तरीही, अनेकदा रात्रीच्या वेळी माझ्या दाराजवळ मला पावलांचा आवज ऐकू येत असे. काही वेळानं तो आवाज दूर जात असे. माझी खोली तळमजल्यावर असल्यानं घराभोवती गस्त घालणाऱ्याची सावलीदेखील मी खिडकीतून पाहिली व ऐकली होती. त्याबाबत मी नवऱ्याला सांगितलंही होतं. माझ्याकडं तीव्रतेनं कटाक्ष टाकून तो म्हणाला, काही नाही तो रखवालदार आहे.
एका संध्याकाळी रात्रीच्या भोजनानंतर नवरा अतिशय आनंदी दिसत होता. चेष्टेखोरपणं तो मला म्हणाला, “बंदुकीच्या सहवासात तीन तास घालवायला तुला आवडतील का? रोज संध्याकाळी माझ्या कोंबड्या खायला येणाऱ्या कोल्ह्यावर बंदूक झाडायची आहे.” मी चकित झाले. मी थोडी टाळाटाळ करत होते; पण तो माझ्याकडं एकटक रोखून पाहत होता. अखेरीस मी म्हटले, "मी नक्कीच येईन." मी पुरुषाप्रमाणे लांडगा व जंगली अस्वलाची शिकार केली आहे." त्यामुळं शिकार मोहिमेत त्यानं मला सामील करून घ्यावं हे अगदी स्वाभाविक होतं.
अचानक माझ्या नवऱ्याच्या चेहेऱ्यावर भित्रेपणाची झाक दिसू लागली. नंतर संपूर्ण संध्याकाळभर तो अस्वस्थ होता. सारखी चुळबुळ करत होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यानं मला तू तयार आहेस का असं पुन्हा अचानक विचारलं. मी उठले, तो माझी बंदूक आणत होता.
"आपण बंदुकीत नेहमीच्या गोळ्या भरणार आहोत की हरणाला मारायला वापरतात त्या भरणार आहोत?" त्याला थोडं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला "फक्त हरणासाठी वापरतो त्या. त्या पुरेशा आहेत. तू उगाच काळजी करू नकोस. "मी? मी कशाला काळजी करू? कोल्ह्याला मारताना काळजी कशाला बाळगायची?"
काही सेकंदांनंतर तो म्हणाला तू कदाचित शांतपणं प्रार्थनाही करशील.
नंतर न बोलता आम्ही बागेच्या दिशेनं चालू लागलो. बाकी घरदार झोपी गेलं होतं. पूर्ण चंद्रमा जुन्या निराश इमारतींवर प्रकाश पसरत होता. इमारतींची छपरे व टेहळणीचे बुरूजही प्रकाशात चमकत होते. ती दुःखी शांतता कोणत्याच आवाजानं भंग पावत नव्हती. ना वाऱ्याचा आवाज, ना बेचकांचं डराँव डराँव, सारं कसं अगदी शांत होतं. उद्यानातल्या झाडांखाली तेव्हा ताजेपणाची एक शिरशिरी व त्याचबरोबर गळून पडलेल्या पानांचा सुगंधही मला जाणवला. माझा नवरा मात्र त्याबद्दल काही बोलला नाही. परंतु तो ऐकत होता. झाडांखालच्या सावलीतील सुगंध त्यालाही जाणवत होता. पण तो शिकारीच्या भावनेनं पूर्णत: पछाडला होता.
आम्ही लगेचच तळ्याकाठी पोचलो. तेथील वेलींच्या फुलांचे गुच्छ स्तब्ध होते. वाऱ्याची एखादी झुळूकही येत नव्हती. मात्र पाण्यात किंचित हालचाल होत होती. कधी पृष्ठभाग कशानं तरी ढवळू निघे व पाण्यात लहानमोठे प्रकाशाचे तरंग हळूहळू वर्तुळाकार मोठे होत जात होते. तेजस्वी सुरकुत्यांप्रमाणे ते दिसत.
आम्ही ज्या झोपडीत सावजाची वाट पाहत दबा धरून थांबणार होतो त्या झोपडीपाशी पोचलो. माझ्या नवऱ्यानं प्रथम मला झोपडीत प्रवेश करण्यास सांगितलं. नंतर सावकाश त्यानं बंदुकीत भार भरला. त्या कोरड्या पावडरच्या तडतड आवाजाचा माझ्यावर विलक्षण परिणाम झाला. मी थरथर कापू लागले. ते पाहून तो म्हणाला, "ही चाचणीच तुला घाबरवणारी वाटत असली तर तू घरी निघून जा."
हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले व म्हटले, "अजिबात नाही. मी काही न करता परत जाण्यासाठी इथं आले नाही. तू मात्र आज सकाळपासून वेगळाच दिसतोयस."
तो काहीतरी पुटपुटला. "जशी तुझी इच्छा" असं म्हणून तो थांबला. नंतर काही वेळ आम्ही दोघं स्तब्ध बसून राहिलो. अर्ध्या तासानंतरही काहीच घडले नाही. त्या शरदाच्या रात्रीतील ती जीवघेणी शांतता कशानंही भंग पावली नाही. तेव्हा मी म्हटलं तो ह्याच मार्गानं जाईल याची तुला पक्की खात्री वाटते का?"
मी जणू त्याला हार पत्करायला लावली असं वाटून डोळे मिचकावत माझ्या कानाजवळ येऊन तो म्हणाला "मला पक्की खात्री आहे. ह्यात चूक होणार नाही."
पुन्हा एकदा सर्वत्र स्तब्धता पसरली. इतक्यात माझ्या नवऱ्यानं माझा हात दाबला व तो कुजबुजल्यासारखं म्हणाला, "त्या झाडाखाली तुला तो दिसतो आहे का?" मी पाहिलं पण माझ्या नजरेस काहीच पडत नव्हतं. माझ्या नवऱ्यानं सावकाश आपली बंदूक उचलली पण त्याचे डोळे मात्र माझ्यावरच रोखलेले होते.
मीही गोळी झाडण्याच्या बेतात होते. इतक्यात आमच्यापासून तीस एक पावलांवर वेगानं हालचाल करत एक व्यक्ती वाकून पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेली दिसली. त्याला पाहून माझी मतीच गुंग झाली व मी जोरात किंचाळले. मी वळून बघण्यापूर्वीच माझ्या डोळ्यांवर प्रकाशझोत आला व बंदुकीचा कानठळ्या बसवणारा आवाज मी ऐकला. गोळी लागलेला लांडगा जमिनीवर कोसळावा; तशी ती व्यक्ती घरंगळत जमिनीवर कोसळली.
माझ्या अंगावर शहारे आले. नंतर रागावलेल्या माझ्या नवऱ्याच्या हाताची जबरदस्त पकड माझ्या गळ्यावर पडली व मी जमिनीवर फेकली गेले.त्याच्या दणकट हातातून मी सुटले व गवतावर पडले. मला हातानं पकडून तो मला धावतधावत त्या मृत शरीराकडे घेऊन गेला व त्यानं मला रागारागानं त्या मृत शरीरावर फेकून दिलं. जणू त्याला माझा कपाळमोक्षच करायचा होता. तो मला ठार मारणार होता. आता आपलं आयुष्य संपलं असं मला वाटत असतानाच काय घडतंय ते कळायच्या आत अचानक कोणीतरी झेप घालून त्याला खाली पडलं. मी एकदम उठले तेव्हा मला माझी मोलकरीण पार्क्विस्टा त्याच्यावर वाघाप्रमाणं चवताळून तुटून पडलेली दिसली. तिनं माझ्या नवऱ्याच्या दाढीमिशा ओरबाडल्या व त्याचा चेहराही ओरबाडून काढला.
नंतर अचानक काहीतरी विचार डोक्यात येऊन ती उठली व तिनं ते प्रेत दोन्ही हातांनी कवटाळलं. त्याचे मृत ओठ आपल्या ओठानं विलग करून, ती त्या मृत शरीरात प्राण शोधण्याची धडपड आपल्या चुंबनांनी करू लागली.
माझा नवरा सावकाश उठला. त्याची चूक त्याच्या लक्षात आली होती. त्यानं माझ्याकडं एक कटाक्ष टाकला व माझ्या पायाशी वाकून तो म्हणाला, "मला क्षमा कर, प्रियतमे. मी तुझ्यावर संशय घेऊन त्या मुलीच्या प्रियकराला ठार केलं. माझ्या रखवालदारानं मला फसवलं. मी मात्र मृत पुरुष व जिवंत बाई यांच्यातली ती विलक्षण चुंबनं पाहत होते. तिचे हुंदके, वेदनादायी प्रेम हताश होऊन पाहत होते.
(ही कथा गाय द मोपासाँ याच्या 'कलेक्टेड शॉर्ट स्टोरीज' या किंडलवर डाऊनलोड करून (२०१८) घेतलेल्या पुस्तकातून घेतली आहे.)
मूळ फ्रेंच कथा : गाय द मोपासाँ
मराठी अनुवाद : वासंती फडके
phadkevasanti4236@yahoo.co.in