अल्फा मेल
.png)
माध्यमांतर:
बिपिनचंद्र चौगुले यांनी ‘अल्फा मेल’ या संकल्पनेवर आपला सखोल विचार मांडला आहे. भारतामध्ये लिंगभावसमानतेसाठीचा प्रवास सोपा नव्हता. १९७४ मध्ये ‘Towards Equality’ अहवाल आल्यानंतर महिलांविषयीच्या धोरणांमध्ये आणि चर्चेत मोठा टप्पा गाठला गेला. पुढे २०२४ मध्ये या अहवालाला ५० वर्षे पूर्ण झाली आणि आज २०२५ मध्ये आपण मागे वळून पाहतो आहोत. या पन्नास वर्षांच्या वाटचालीत काही सकारात्मक बदल झाले, शिक्षण, रोजगार, कायदे आणि राजकीय सहभाग यात महिलांची उपस्थिती वाढली. पण तरीही प्रत्यक्षात अजूनही असमानता, वेतनातील तफावत, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण आणि लैंगिक भेदभावाचे अनेक प्रश्न कायम आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर लिंगभावसमानता ही केवळ धोरणं किंवा चर्चेपुरती मर्यादित न राहता दैनंदिन व्यवहारात आणि विचारांमध्ये उतरली पाहिजे, हीच खरी वेळेची गरज आहे. बालचित्रवाणीचे माजी निर्माते-दिग्दर्शक आणि सध्या स्त्रीविषयक समस्यांवर आधारित लघुपट, वेब रेडिओ यांचे निर्माते तसंच असोसिएशन ऑफ लेफ्टहँडर्स या नावीन्यपूर्ण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष बिपिनचंद्र चौगुले यांचा हा लेख वाचून आपल्या मनात काय विचार आले हे समजून घ्यायला आम्हाला आवडेल. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)
अलीकडेच करिश्मा मेहता नावाच्या पॉडकास्टरचं एक इन्स्टाग्राम रील पाहात होतो, तिने नुकतीच रतन टाटांची मुलाखत तिच्या पेजसाठी घेतली होती. त्याबद्दल बोलतांना ती इंग्लिशमध्ये म्हणते, ‘रतन टाटांकडून मी एक महत्त्वाची गोष्ट शिकले, ती म्हणजे ‘अल्फा मेल’ या संज्ञेची खरी व्याख्या काय आहे? ‘अल्फा मेल’ या शब्दांचा जो अर्थ आपल्याला शब्दकोशात मिळतो तो खरा नाही, रतन टाटांचं व्यक्तित्व म्हणजेच ती व्याख्या आहे. ती अशी होईल - ‘मृदु, सभ्य, सहृदय पण त्यासोबतच हे जग अजून चांगलं करण्यासाठी लागेल ते करण्याची तयारी असलेला एक अविरत कार्यरत आणि कर्तव्यकठोर, आग्रही पुरुषोत्तम म्हणजे अल्फा मेल.’
मला करिश्माचं हे वाक्य खूप भावलं कारण ‘अल्फा मेल’ हे शब्द माहिती असोत वा नसोत, आपल्याकडे ‘खऱ्या’(!) पुरुषाची व्याख्याच मुळी प्राणीजगतातून घेतलेली आहे. ‘अल्फा मेल’ म्हणजे ‘प्रथम नर’, म्हणजेच कळपाचा नेता, जो अहंकार, जरब, राकटपणा, दुराग्रह, भावनारहित कठोरपणा यांचं मूर्तिमंत प्रतीक असणारा आणि इतरांवर बेबंद हुकुमत गाजवण्याची क्षमता असणारा एक पुल्लिंगी प्राणी. आपण हरीण, लांडगे, सिंह अशा प्राण्यांमध्ये पाहतो की वरकरणी तरी त्यांचा प्रमुख हा अशा व्याख्येमध्ये चपखल बसतो. तिथे कदाचित त्याची गरजही असेल, पण आपण सोयीस्कररीत्या हे पाहात नाही की तोच प्रमुख आपल्या कळपाची प्रचंड काळजी घेतो, प्रसंगी त्यांच्यासाठी लढतो, जखमी होतो आणि प्राणही गमावतो. आपण स्वतःला अन्य प्राण्यांपेक्षा वेगळं मानतो, प्रगत भाषा, वस्त्रप्रावरण उपयोजन, यंत्र तंत्र व कृत्रिम साहित्य निर्मिती, अन्न शिजवून खाणं हे ते वेगळेपण आहेच, पण संस्कृती आणि संस्कार व सोबतच सर्वात महत्त्वाची म्हणजे सजग, सारासार विचारशक्ती, या सर्वांमुळे आपण स्वतःला प्रचंड श्रेष्ठ, उत्क्रांत व पृथ्वीचा स्वयंघोषित स्वामी मानतो. एखाद्या गुन्ह्याला आपण सहज पाशवी म्हणतो. पण पशू कधीच गुन्हा करत नाहीत, माणूस करतो. पशू पूर्णपणे नैसर्गिक नियमांनी व अंतःप्रेरणेनुसार जगतात, माणूस स्वयंप्रेरणेने वागतो, तरीही तो निर्घृण आणि अश्लाघ्य वर्तन करतो, ही एक प्रचंड मोठी विटंबना मानवी अस्तित्वामध्ये आहे. आपल्याकडे अधूनमधून माध्यमांमध्ये स्त्रीयांवरील अत्याचारांच्या बातम्या उसळी घेतात. एखाद्या ठिकाणी घडलेला असा दुर्दैवी प्रसंग काही अंतस्थ हेतूने कायम चर्चेत ठेवला जातो, ताटातल्या मुख्य पक्वान्नासारखा. त्यासोबत अन्य ठिकाणच्या अशाच 2-4 बातम्या तोंडी लावणं म्हणून पुढे येतात. मग आपणही ढेकर देत म्हणतो, की ‘अरे हे काय चाललंय जगात? अचानक का हे घडतंय? समाजाची नैतिक पातळी किती खालावली आहे’, वगैरे. आणि पुढे म्हणतो की शासनाने यावर काहीतरी करायला पाहिजे. पण खरंतर अशा घटना अधूनमधून घडत नसतात. त्या दररोज घडत असतात. प्रत्येक क्षणी जगाच्या पाठीवर एक तरी स्त्री पुरुषी वासनेची, अहंकाराची, अत्याचाराची बळी पडत असते. फक्त जोपर्यंत त्यामध्ये माध्यमांना काहीतरी चविष्ट, वेगळं सापडत नाही, तोपर्यंत ते त्याकडे दुर्लक्ष करतात.

गेली 39 वर्षे मी इलेक्ट्रॉनिक माध्यमात लेखन, दिग्दर्शन करतोय. त्यातली 28 वर्षे बालचित्रवाणीमध्ये मुलांसाठी, मुलांसोबत आणि मुलांबद्दल काम केलं. त्यावेळी काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. माझ्या मते या सामाजिक बिघाडाच्या मुळाशी आपल्या कुटुंबरचनेत आणि समाजरचनेत झालेले आणि न झालेले काही मुख्य बदल आहेत. विसाव्या शतकाच्या मध्यापासून मुली शिक्षितच नाही तर उच्चशिक्षित होऊ लागल्या, नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडल्या, प्रवास करू लागल्या. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या, तरीही बहुसंख्य मुली लग्न व त्यासाठी परक्या, अनोळखी घरी राहणं, पारंपरिक घरकाम, मुलं प्रसवणं याही जबाबदाऱ्या नेटानं निभावत होत्या. या सोबतच विभक्त कुटुंबरचनेमुळे त्या एकट्या पडल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून स्त्री अधिक मोकळी झाली, पुरुषांसोबत बरोबरीने वागू, बोलू लागली. महत्त्वाचे निर्णय घेऊ लागली. तिच्या राहणीमानात, वेशभूषेत आमूलाग्र बदल घडला.
मुलगे वाढवताना मात्र त्याला अनुरूप फारसा बदल झालेला दिसत नाही. त्यांना अजूनही ‘अल्फा मेल’ होण्याचंच बाळकडू दिलं जातं. माझ्याबद्दल सांगायचं तर आम्ही तिघे भाऊच, बहीण नाही. माझ्या लहानपणी (55 वर्षांपूर्वी) आई व वडील दोघेही शासनात मोठ्या पदांवर अधिकारी होते, त्यामुळे घरी नोकरांची रेलचेल होती. आम्ही सुरुवातीला खूप लाडात आणि सुरक्षेत वाढलो. स्वतःची आन्हीकं, शाळा, अभ्यास आणि खेळणं सोडून कसलेही काम करावे लागत नव्हते. शाळेत नेण्या-आणण्यासाठी अनेक वर्षं नोकर होते. शाळेतही कधी शिक्षा होत नसे. सामूहिक शिक्षेतही वगळलं जायचं. आईला ह्या सगळ्याचे आमच्या मानसिकतेवर तसेच व्यक्तिमत्वावर गैरपरिणाम होऊ शकतील असे वाटले असावे. म्हणून तिने आम्हाला घरातली बरीच कामं करायला लावायला सुरुवात केली. अनेक खाद्यपदार्थ करायलाही शिकवले. अगदी चपाती, भाकरीसुद्धा. स्वतःपुरतं स्वावलंबी जगता आलं पाहिजे, कोणतेही काम स्त्रीचे म्हणून कमीपणाचे असे मुलांना वाटू नये हा तिचा कटाक्ष असणार. सांगण्याचं कारण हे की आजदेखील बहुतांश मुलग्यांना अभ्यासाची (तीही असलीच तर) सोडून कोणतीही सक्ती नसते, पूर्ण स्वैर वागायला मुभा असते. वाटेल तसे पैसे खर्चायला मिळतात. कित्येकदा दंगेखोर (हिंसक प्रवृत्तीच्या) बालकांचं कौतुकही होतं. हे नक्कीच घातक आहे.
आज स्त्रीविषयक गुन्ह्यांचे प्रमाण धोक्याची पातळी ओलांडून वर गेले आहे. पण कुठल्याही गुन्ह्याचे मूळ असते ते माणसाच्या मनात. त्यामुळे गुन्हा घडण्यापूर्वीच रोखायचा असेल तर मानसिकतेत बदल घडवून आणला पाहिजे. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मन कोवळे असेल. त्यासाठी ‘अँबी क्रिएशन्स’ ह्या माझ्या माध्यम-निर्मिती संस्थेतर्फे माझ्या सहकारी माध्यमतज्ज्ञ डॉ. वेदवती जोगी ह्यांच्यासोबत 2018 पासून Media for HER हा उपक्रम आम्ही राबवला आहे. माध्यम ‘तिच्यासाठी’... ‘तिच्या सक्षमीकरणासाठी’! ह्या उपक्रमामागचा उद्देश आहे - 1) लहान वयातच मुलग्याचा ‘स्त्री विषयक’ दृष्टिकोन बदलणे आणि 2) मुलीचा ‘स्वतःकडे पाहायचा’ दृष्टिकोन बदलणे, तिला आत्मसन्मानाची जाणीव देणे. Media for HER च्या अंतर्गत आम्ही ‘भन्नाट शाळा’ हा वेब रेडिओ प्रकल्प आणि ‘असामान्या’ हा लघुचित्रपट प्रकल्प राबावत आहोत.
‘भन्नाट शाळा’ प्रकल्प (वेब रेडिओ माध्यम) -
2 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट— शासनाच्या ‘महिला व बालकल्याण आयुक्तालया’च्या मदतीने राज्यातील बालसुधारगृहांमधल्या मुलांसाठी ‘भन्नाट शाळा’ हा वेब रेडिओ प्रकल्प सुरु केला. यात गुन्हा करणारी आणि गुन्ह्यांना बळी पडणारी मुलेमुली असे दोन्हीही गट सामील होते. अंदाजे 3 ते 4 हजार मुलांपर्यंत आम्ही पोचत होतो.
भन्नाट शाळेचे वेगळेपण हेच की रेडिओच्या द्वारे पौगंडावस्थेतील मुलांना त्यांचे मन मोकळे करण्याची, त्यांच्या मनातील शंका, उत्सुकता, भीती आणि अनेक भावनांना वाट करून देण्याची संधी मिळते. मुलांच्या सहभागातून कार्यक्रम निर्मिती केली जाते. कार्यक्रमाचा विषय ठरवणे, त्यासाठी आवश्यक मजकूर जमवणे, पटकथा तयार करणे, कार्यक्रम सादर करणे ह्या सर्व निर्मिती प्रक्रियेत मुलांना सहभागी करून घेतले जाते.

मुलांचा स्त्रीकडे पाहायचा दृष्टिकोन बदलायचा तर सर्वप्रथम मुलांना घरातील स्त्री नात्यांचे तसेच कुटुंबसौख्याचे महत्त्व पटवणे सर्वात जरूरी होते. ह्या सोबतच मानसिक कोंडमारा, कौटुंबिक समस्या, सुविधांचा अभाव, प्रतिकूल परिस्थिती आदी कारणांमुळे सुप्तपणे निर्माण होऊ शकणाऱ्या नैराश्य, नकारात्मकता, विविध प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती, शारीरिक व लैंगिक हिंसेला बळी पडण्याची शक्यता आदी विषयांवर साधकबाधक चर्चा घडवल्या गेल्या व योग्य वर्तनबदलास उत्तेजन दिले. गुन्हा घडण्याचे महत्त्वाचे कारण व्यसनाधीनता ठरू शकते. म्हणूनच त्याला आळा घालण्यासाठी उपाय योजना, समाजात वावरताना मार्गात येणाऱ्या धोक्यांची जाणीव करून देणे, शिक्षणविषयक तसेच पुढे आयुष्यात स्थिर होण्यासाठी मार्गदर्शन हे सर्व भन्नाट शाळेतून केले. प्रकल्पाची परिणामकारकता व यशस्विता सांख्यिकी पद्धतीने मोजणे अवघड आहे. परंतु, मुलांनी पाठवलेल्या कार्यक्रमातून दिसणारी त्यांची कल्पकता, सृजनशीलता, संवादकौशल्यात वाढ, आजूबाजूच्या महत्वाच्या घटनांचे त्यांच्या कार्यक्रमात उमटलेले पडसाद ह्यांवरून परिणामकारकता व यशस्विता जाणवते.
‘भन्नाट शाळा’ करताना हेही प्रकर्षाने जाणवले की पौगंडावस्थेतल्या मुलग्यांना मैत्रिणी व अन्य समवयस्क मुलींबद्दल वाटणारं आकर्षण मुख्यतः फक्त शारीर असतं. मात्र एखाद्या मुलीमध्ये भावनिक गुंतवणूक करायला, तिच्या भावभावना समजून घ्यायला मन प्रशिक्षित व संस्कारित नसतं. तिच्याकडे एक प्राप्त करण्याची, मिरवण्याची व भोगण्याची वस्तू म्हणून पाहिलं जातं. याबाबत त्या मुलांशी थेट संवाद झाले, त्यातून अनेक मुद्दे समोर आले. 1) बहुसंख्य मुलामुलींसाठी पौगंडावस्था ही अत्यंत ताण देणारी व गोंधळाची अवस्था असते. याच काळात व्यक्ति दिशाहीन व पथभ्रष्ट होण्याची अतीव शक्यता असते. 2) पौगंडावस्थेतील मुलांच्या विशेष गरजांसाठी शिक्षणप्रणालीत व समाजरचनेत काहीच विशेष व्यवस्था नाही. 3) आपल्या परीक्षा केंद्रित शैक्षणिक रचनेत पुस्तकी शिक्षण आणि अतिरेकी स्पर्धा याशिवाय अन्य काहीही नाही. 4) मूल्यशिक्षण, मूल्यवर्धन या गोंडस नावाखाली फक्त तोंडाला पानं पुसली जातात. त्यातून किती वर्तनबदल खरंच घडतो याचे काटेकोर मूल्यमापन करण्याची गरज व योजना दिसत नाही. त्यात संवेदनशील विषय अभावानेच आढळतात. 5) दृक्श्राव्य माध्यमांचा वापर करण्याची इच्छा व सोय नाही, त्यासाठी सकस व परिणामकारक आशय निर्माण केला गेला नाही. 6) शाळेच्या आवाराबाहेर व घराच्या भिंतींबाहेर मुलंमुली काय करतात याच्याशी शिक्षकांना वा पालकांना देणंघेणं नसतं. मुलींच्या बाबतीत कदाचित काही पालक थोडे सावध असतील, पण मुलग्यांच्या बाबतीत असं अभावानंच आढळतं. 7) आपल्या कुटुंबव्यवस्थेमध्ये पालक-पाल्य मुक्त चर्चा अशा कार्यक्रमाला अजिबात वाव नसतो. शहरी पालकांना मुलांसाठी फारसा वेळच नसतो आणि ग्रामीण पालकांना कदाचित अशा समस्यांची जाणीव नसते. मग मोकळ्या संवादाअभावी मुलांची घुसमट होते. 8) त्यामुळे मित्रमंडळी अधिक जवळची वाटतात. त्यातले कुणी बहकवले तर गोष्टी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मग त्यात एखादा गुन्हा करणे असो किंवा गुन्ह्याला बळी पडणे असो, दोन्ही शक्यता निर्माण होतात, विशेषतः मुली अशा कारणांनीच बळी पडतात. 9) समाजमाध्यमं व आंतरजालाच्या स्वैर उपलब्धतेमुळे नको ते व्हिडिओ पाहून अनेक चुकीच्या व घातक इच्छा व समजुती तयार होतात. 10) शारीरिक बदल, भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण या मन विचलित करणाऱ्या घडामोडींशी झुंजत अभ्यास, शैक्षणिक आव्हाने, स्पर्धा व आर्थिक अडथळे यातून कळत-नकळत गुन्हेगारी प्रवृत्ती आकाराला येते. 11) जे सरळ मार्गाने मिळत नाही, ते अन्य मार्गाने मिळवण्याची प्रेरणा होते, मग ते कॉपी करून परीक्षा देणं असो, छोट्यामोठ्या वस्तूंची चोरी करणं असो, की शारीरिक वासनापूर्तीसाठी अन्य व्यक्तीला फशी पाडणं असो. हे सर्व एकाच मानसिकतेतून निर्माण होतात. 12) मुलांमधले संप्रेरकीय बदल काहीवेळा अतीव क्रोध, हिंसक वृत्ती व त्यातून संबंधित गुन्हे करण्यास प्रवृत्त करतात. 13) मादकद्रव्य सेवनाचे व्यसन लागू शकते. 14) या सर्वांमुळे एखाद्याची पेन्सिल चोरणे आणि एखाद्याचा गळा चिरणे यात काही फरक आहे, हेही जाणवण्याचं भान राहात नाही.
आमच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आलेल्या अनुभवातून आम्ही दुसऱ्या वर्षी तो सर्व मुलांसाठी खुला केला. 2021 मध्ये सामुदायिक रेडिओ, खाजगी रेडीओ वाहिन्या, पुणे महानगरपालिका द्वारे ‘भन्नाट-शाळा’ अंदाजे 5 ते 6 लाख मुलांपर्यंत पोचली असावी. त्यातून अधिक चांगला प्रतिसाद मिळाला. खूप अंतस्थ गोष्टी जाणवल्या. आणि आता 2024 ह्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक शाळांमधील लाखो मुलांसाठी भन्नाट शाळा हा प्रकल्प राबवला जात आहे. आमचा दुसरा प्रकल्प म्हणजे ‘असामान्या’ ज्यात लघुचित्रपट माध्यमाचा वापर केलाय.
चित्रपट हे सर्वात लोकप्रिय आणि जनमानसावर खूप परिणाम करू शकणारे माध्यम! त्याचा वापर स्त्रीचा ‘स्वतःकडे पाहायचा’ दृष्टिकोन बदलणे, तिला आत्मसन्मानाची जाणीव देणे ह्यासाठी करायचा प्रयत्न केला आहे. त्याकरता जरुरी आहे ते अशा सामान्य स्त्रीचे उदाहरण समाजासमोर ठेवायची, ज्या स्त्रीने काहीतरी असामान्य पाउल उचलून संकटावर मात केली आहे. जिचे उदाहरण इतर स्त्रियांसाठी खूप प्रेरणादायी ठरेल. अशा स्त्रियांच्या सत्यकथांवर आधारित लघुचित्रपटांची निर्मिती आम्ही करत आहोत.
आमचा पहिला लघुचित्रपट आहे एका 15 वर्षीय बलात्कारीत मुलीच्या सत्यघटनेने प्रेरित तिच्या एकाकी संघर्षांविषयी ‘दिवली नाही विझता कामा...!’ त्यात अशा मुलीच्या पालकांची हतबलता, सामाजिक दबाव, पोलिसांची उदासीनता व त्याविरुद्ध पीडितेचा संघर्ष यांचे चित्रण आहे. एक पुरुष म्हणून मला कळकळीने वाटे की जेव्हा पुरुषाकडून स्त्रियांवर लैगिक अत्याचार होतो तेव्हा तो निव्वळ तिच्या शरीराला झालेली दुखापत नसते तर तिच्या आत्म्यावर झालेला आघात असतो. हा एकच गुन्हा असा आहे कि ज्यात गुन्हेगार उजळ माथ्याने हिंडतो आणि पीडिताच स्वतःचे तोंड झाकून घेते, स्वतःला कलंकित मानते.
ह्या गुन्ह्याला तेव्हाच आळा बसेल जेव्हा गुन्हेगाराला जबरदस्त शिक्षा होईल, गुन्हेगाराला तेव्हाच शिक्षा होईल जेव्हा पीडित स्त्री धिटाईने पुढे होऊन गुन्हा दाखल करेल, आणि पीडिता तेव्हाच धिटाई दाखवू शकेल जेव्हा तिची स्वतःकडे पाहायची दृष्टी बदलेल. ती स्वतःला कलंकित मानणार नाही. एक दिवस वृत्तपत्रात आलेली बातमी वाचली. एक 15 वर्षांची कोवळी पोर. तिच्यावर अत्याचार करणाऱ्यांविरोधात तिने पोलिसात दाखल केलेली तक्रार तिने मागे घ्यावी म्हणून गुन्हेगार तिच्या आई-वडिलांना लाच देतात. पैशाच्या लोभाने आई-वडील मुलीवर तक्रार मागे घ्यावी म्हणून दबाव आणू लागतात. अवघ्या 15 वर्षाच्या मुलीने आई-वडिलांच्या कपाटातून ते लाच म्हणून मिळालेले पैसे घेतले, ते पोलीस चौकीमध्ये नेऊन दिले आणि ठणकावून सांगितले की गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.’
मला ही कथा अतिशय भावली. असे जाणवले की ‘माझा आत्मसन्मान ही विकत घेण्याची गोष्ट नाही’ हेच ही मुलगी जगाला ओरडून सांगत आहे. हा विचार जगापुढे आलाच पाहिजे. असे वाटून आम्ही लघुचित्रपट बनवला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यूट्यूबद्वारे आजवर दीड लाखाहून अधिक माणसांपर्यंत हा लघुचित्रपट पोचवला आहे. ह्या लघुचित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेत आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला सक्षमीकरणावरील सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून निवड केली गेली आहे. ‘असामान्या’ मालिकेतला दुसरा लघुचित्रपट - ‘तर्पण’!
मृत्यूनंतर मुलाच्या हातून अग्नी मिळाला तरच मोक्षप्राप्ती होते, मुलाने तर्पण दिले की खऱ्या अर्थाने पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळते, शांती लाभते. हजारो वर्षांच्या ह्या समजुतींनी कल्पनेपलीकडे किती अक्राळविक्राळ रूप धारण केलेय हे दाखवणाऱ्या सत्यघटनेवर आधारित ही कथा. ‘मुलगाच हवा’ या हव्यासापोटी मुलीच जन्माला घालते म्हणून आपल्या पत्नीचा जाळून निर्घृण खून करणाऱ्या नवऱ्याची व त्याला आरोपी करून शिक्षा देववणाऱ्या त्याच्याच दोन किशोरवयीन मुलींबद्दलची बातमी वाचून मन थरारून उठले. असे वाटले जणू, एक प्रकारे आईच्या तळमळणाऱ्या आत्म्याला शांती देण्यासाठी दोन्ही मुलीनी अशा तऱ्हेने न्याय मिळवून देऊन खऱ्या अर्थाने ‘तर्पण’ दिले. मुलगी काय करू शकते ह्याचे दर्शन घडवणारा हा लघुचित्रपट यूट्यूबद्वारे आजवर साधारण 15,000 पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचला आहे.

गेल्या 7-8 महिन्यांमध्ये आम्ही ह्या लघुचित्रपटाचे वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयातून प्रदर्शन करून तरुण संस्कारक्षम वयातील 10,000 च्यावर मुलामुलींना बोलते करून चर्चा घडवून आणली आहे. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यातल्या मोजक्या अशा आहेत :
- ‘बाईने स्वतःवर असा अन्याय होऊ देणे ही फार मोठी चूक आहे.’
- ‘जे पोरीचा गर्भ आहे असे सांगतात त्या डॉक्टरचे लायसन्स काढले पाहिजे’
- ‘हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये करून भारतभर दाखवायला हवा आणि मुली आईसाठी काय करू शकतात हे दाखवायला हवे. म्हणजे मग कोणी म्हणणार नाही की ‘मुलगी नको’.
- 8 वी मधल्या राजाने लिहिले होते - ‘मी ह्यापुढे माझ्या बहिणीला कधी मारणार नाही, शिव्या देणार नाही, आईला घरकामात मदत करीन.’
- तर 10 वीतल्या विक्रमने लिहिले होते की, ‘माझ्या घरात शिळे अन्न आई आणि बहीण खातात. आणि ताजे पुरुषांना वाढतात. ह्यापुढे मी असे नाही होऊ देणार, शिळे अन्न घरातील पुरुषांनी पण वाटून घेतले पाहिजे.’
- ‘रोज रात्री नवरा दारू पिऊन येतो आणि बायकोवर हात टाकतो. ती मार खात रहाते. कारण आपण मुलीला उलटून मारायला तर शिकवत नाहीच, पण मारणारा हात धरायलासुद्धा तिला हिम्मत देत नाही. असं का केलं जातं?’
- ‘स्त्री जोपर्यंत स्वतःला कमी समजते, तोपर्यंत जगही तिला कमीच समजणार, स्वतःवरचा विश्वास हीच तिची ताकद असते हे तिला कळतच नाही’
- ‘आई हवी, बहीण हवी, बायको हवी मग मुलगीच का नको?’
- ‘सासरी जाणाऱ्या मुलीला सांगितले जाते की नवऱ्याशी आणि सासरच्यांशी नीट वाग, मग मुलाला का कोणी उपदेश करत नाही की तूही बायकोला नीट वागव?’
- 9 वीतल्या सुवर्णाला वाटले की‘पुरुषाला जन्म देते ती स्त्रीच, कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे कोण असते? तीही स्त्रीच. मग मुलगी जन्माला येते तेव्हा आम्ही असे का म्हणत नाही की ‘एक नवी आशा आली’ ’
- 9 वीतल्या प्रणालीने जाहीर केले की, ‘मला ही फिल्म बघून एवढी प्रेरणा मिळाली आहे की मी शिक्षण झाले कीमुलीचा गर्भ वाचविण्यासाठीच काम करणार. बायकांना सांगणार की आता रडायचं नाही, लढायचं!’
- ह्यात एक अतिशय लक्ष वेधून घेणारे विधान होते. ‘400 वर्षांपूर्वी जिजाऊच्या आईवडिलांनी तिला जन्माला येऊ दिले म्हणून तर आपला शिवबा जन्माला आला ना? स्त्रीचा गर्भ म्हणून काढून टाकला असता तर?’ माझे मन तर अतिशय थक्क झालेच पण खुद्द त्यांच्या शिक्षकांनीही मान्य केले की आमची मुले इतका विचार करू शकतात ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती.
- शेवटी 17 वर्षांच्या अनीसची प्रतिक्रिया त्याच्याच शब्दांत, ‘पिच्चर बेष्ट होता, पण सवाल हा आहे, की ‘मुलगा हवा’ म्हणत आपल्या पोराला टोचणाऱ्या कोण होत्या? त्याची आई आणि बहीण, म्हंजे दोन बाया! आपल्या पोरीला आसरा न देता मरू देणारी कोण होती? तिची आई - म्हणजे पुन्हा बाईच. नवऱ्याचा मार खात वर ‘त्याला सोडून कसे राहायचे?’ असे म्हणत मरणारी कोण होती? - बाईच! आणि हातात हात घालून कोर्टात जाऊन भांडून आईला न्याय कोणी मिळवून दिला? - तिच्या दोन पोरींनी. त्या पण बायाच! म्हंजे बायांनीच ठरवायला पायजे की स्वतःच, स्वतःचं शत्रू बनायचं की दोस्त?’
Media for HER मुळे सिद्ध झालं की विचारप्रवृत्त केलं की मुलं किती विविधप्रकारे खोलवर विचार करू शकतात! आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये ‘शिकवण्याला’ महत्त्व आहे पण मुलांना विचारप्रवृत्त करून व्यक्त होण्याची संधी सहसा दिलीच जात नाही. समाजपरिवर्तन करायचे तर 'Catch Them Young' ... म्हणजे ह्याच वयोगटाला विचारप्रवृत्त करायला हवे.
‘पुरुष म्हणजे काय’, ‘पौरुषत्वाचा खरा अर्थ काय’ हयाबद्दल पौगंडावस्थेतील मुलामुलींवर सखोल काम करणे आवश्यक आहे. लैंगिक व अन्य गुन्ह्यांबाबत निव्वळ उपचारात्मक उपाय करण्यापेक्षा गुन्हा घडूच नये ह्यासाठी ‘प्रतिबंधात्मक’ उपाय केले पाहिजेत. त्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, राजकीय, कायदेशीर सर्व पातळ्यांवर विचार, नियोजन व अंमलबजावणी करणे अतिशय जरूरी आहे. एक माध्यमतज्ज्ञ म्हणून मला मनापासून वाटते की, ‘अल्फा मेल’ची योग्य व्याख्या समाजात रुजवण्यासाठी, रेडिओ, टीव्ही, फिल्मसारखी माध्यमे योग्य प्रकारे वापर केल्यास, मोलाची मदत करू शकतील.