मै धरा की धूल हूं?

महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीच्या त्यागाचा आणि संघर्षाचा गौरव करताना आपण तिच्या आत्मसन्मानाचा आणि समानतेचा विचार कधी करणार? ‘वाढत्या घटस्फोटांना जबाबदार कोण?’ या प्रश्नातून सुरू झालेली ही चर्चा स्त्री-पुरुष समानता, बदलत्या नात्यांची गरज आणि जुन्या सामाजिक चौकटींवर नेमकं बोट ठेवते. ‘मी धरा की धूल आहे’ या मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा हा लेख जुलेखा विकास शुक्ल यांनी लिहिला आहे.

आठ मार्च जागतिक महिला दिन. दरवर्षी या दिवशी महिला आपल्या शौर्याचा, संघर्षाचा आणि त्यागाचा गौरव मोठ्या उत्साहात साजरा करतात.सोशल मीडियावर स्त्रीच्या सहनशीलतेच्या, सोशीकपणाच्या आणि कुटुंबासाठी केलेल्या अथक त्यागाच्या कथा, पोस्ट्स आणि छायाचित्रांचा अक्षरशः पूर येतो. प्रत्येक स्त्री अभिमानाने आपल्या आयुष्यातील कष्ट, संघर्ष आणि समर्पणाची कहाणी मांडतांना दिसते. जसा महिला दिन आहे, तसाच पुरुष दिनही असतो. पण तो साजरा करण्याची किंवा त्याबद्दल बोलण्याची गरज पुरुषांना कधी भासत नाही. कोणा पुरुषाला साजरा करतांना मी काही पाहिला नाही आणि आम्ही स्त्रिया मात्र हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हा दिवस साजरा करण्याऐवजी स्त्रिया आपल्या आत्मसन्मानाच्या आणि अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरे का शोधत नाही?

‘तीनशे पासष्ठ दिवसांपैकी फक्त एकच दिवस माझ्यासाठी का?’ तिच्या मनात अस्वस्थ करणारा हा प्रश्न का डोकावत नाही? ती करत असलेल्या त्यागाचं मोल तिला नेहमीच का मिळत नाही? तिच्याकडे फक्त समर्पित,सहिष्णु आणि सोशीक या चौकटीतूनच का पाहिलं जातं? कदाचित स्त्री इतकी वर्षे याच चौकटीत राहिल्यामुळे तिने याच चौकटीला आपलं वास्तव मानून टाकलं आहे. पण आता, जेव्हा ती स्वतःच्या आत्मसन्मानाचा आणि अस्तित्वाचा शोध घेऊ लागली आहे, तेव्हा या प्रश्नांची उत्तरं शोधणं अपरिहार्य ठरतं. कदाचित याच टप्प्यावर, ती एक नवा दृष्टिकोन स्वीकारण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. जिथे ‘महिला दिन’ हा केवळ एक दिवस राहणार नाही, तर तिच्या स्वाभिमानाचा, समानतेचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा अखंड उत्सव बनेल.

हे सगळे प्रश्न मनात सतत घोळत असतांनाच, एके दिवशी मला एका संस्थेकडून महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे आमंत्रण आले. विषय होता, ‘घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणास जबाबदार कोण?’ किंवा ‘आधुनिक काळात घटस्फोटांचे प्रमाण इतके का वाढत आहे?’ विषय वाचताच माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली. एका बाजूला स्त्रीच्या स्वातंत्र्याबद्दल, तिच्या बदलत्या भूमिकेबद्दल मी विचार करत होते आणि दुसऱ्या बाजूला समाजात वाढत चाललेले घटस्फोटाचे प्रमाण, स्त्रीच्या बदलत्या भूमिका आणि वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणाचा संबंध आहे का? हा प्रश्नही नकळत मनात डोकावून गेला. या प्रश्नांनी माझं मन अधिकच अस्वस्थ झालं, पण त्याचवेळी कुतूहलही प्रचंड वाढवलं. उत्तरांच्या शोधात असलेल्या माझ्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक वेगळीच संधी वाटत होती.

सभागृहात प्रवेश करताना माझ्या मनात एकच भावना होती, कदाचित इथे मला माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील किंवा कदाचित अजून नवे प्रश्न निर्माण होतील. कार्यक्रम लवकरच सुरू झाला. सभागृहात एक औपचारिक गंभीरता पसरली. प्रास्ताविकासाठी आयोजक उभे राहिले. त्यांनी आपल्या भाषणात वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली. हे अपेक्षितच होतं. पण पुढच्याच क्षणी त्यांनी अतिशय ठामपणे या वाढत्या घटस्फोटांसाठी केवळ स्त्रियांनाच जबाबदार ठरवलं. क्षणभर माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. इतक्या गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील विषयाला इतक्या एकांगी पद्धतीने मांडणं, हेच मला खटकून गेलं. पण त्याहूनही अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सभागृहात उपस्थित असलेल्या काही स्त्रियांनी त्यांच्या या विधानाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं! ज्या स्त्रिया या सगळ्या वास्तवाचा भाग आहेत, ज्या नात्यांच्या गुंतागुंतीचा अनुभव घेतात, त्याच इतक्या सहजपणे स्वतःवर ठेवलेला आरोप स्वीकारत आहेत, हे पाहून माझ्या अस्मितेला धक्का बसला.

थोड्याच वेळात पुढील सत्राची घोषणा झाली. कार्यक्रमासाठी दोन मान्यवर वक्ते आमंत्रित केले गेले होते. एक होत्या पुण्याच्या प्रतिष्ठित, उच्चशिक्षित आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शकुंतलाताई जोशी, तर दुसरे होते मुंबईहून आलेले नावाजलेले उद्योगपती मोहन पंडित. विषय घटस्फोटासारखा संवेदनशील आणि बहुआयामी असल्यामुळे, स्त्री आणि पुरुषदोन्ही बाजूंनी मते मांडली जाणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी दोन भिन्न लिंगांचे वक्ते बोलवण्याचं शहाणपण आयोजकांनी दाखवल्याचं पाहून आनंद झाला. किमान आता तरी दोघांच्या विचारांतून या विषयावर संतुलित, सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चा ऐकायला मिळेल.आणि कदाचित, माझ्या मनात घोळणाऱ्या प्रश्नांना एखादी दिशा मिळेल, या अपेक्षांसह मी पुढील भाषण ऐकण्यासाठी उत्सुक झाले.

सुरुवात पुण्याच्या शकुंतलाताई जोशी यांच्या भाषणाने झाली. त्यांनी अत्यंत ठाम, आत्मविश्वासपूर्ण आणि कुठेही न ढळणाऱ्या आवाजात आपले विचार मांडायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, ‘आज समाज बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, स्त्रीच्या भूमिका बदलल्या आहेत आणि त्याचबरोबर विवाहसंस्थाही बदलली आहे. पण या बदलांचा परिणाम असा झाला आहे की, संसार टिकण्याऐवजी तुटू लागले आहेत. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. आणि यासाठी स्त्रीच जबाबदार आहे हेच खर कारण आहे.’ त्यांचा हा युक्तिवाद ऐकून मी अक्षरशः थक्क झाले.

यानंतर त्यांनी भूतकाळाचं चित्र उभं केलं, पूर्वीच्या काळी मुलींची लग्ने ही लहान वयातच होत. त्यामुळे त्या सासरच्या वातावरणात सहज मिसळून जायच्या. सासरच्यांनी जसं वागवलं, तसं त्या निर्विकारपणे स्वीकारायच्या. एकदा माहेरचा उंबरठा ओलांडला की संपली माहेरच्यांची जबाबदारी, अशीच प्रथा होती तेव्हा. मुलीच्या संसारात हस्तक्षेप करणं तर दूरच, पण तिच्याकडे पुन्हा वळून पाहण्याचीही पद्धत नव्हती. लग्नाच्या वेळी आई मुलीला शिकवायची, ‘सासर हेच तुझं खरं घर, नवरा म्हणजे देव आणि सासरच्या इच्छेनुसारच आयुष्य जगायचं,’ या शिकवणीसोबतच तिच्या मनात सहनशीलता, समायोजन आणि तडजोड यांचेच संस्कार घट्ट रुजवले जायचे. त्यामुळे खाली मान घालून मिळालं ते आयुष्य स्वीकारणं, हेच तिचं कर्तव्य मानलं जायचं. संसार टिकवण्यासाठी ती स्वतःच्या भावना, इच्छा आणि मतं बाजूला ठेवून कोणतीही तडजोड करायला तयार असायची. घरात स्वर्ग निर्माण करायची.” त्यांच्या प्रत्येक वाक्यागणिक माझ्या मनात अस्वस्थतेची एक नवी लाट उठत होती.

‘संसार वाचवण्यासाठी सहन करावंच लागतं’, ही मानसिकता तिच्यात इतकी खोलवर रुजवली गेली होती की, सगळ्यांशी जुळवून घेणं, सगळ्यांची मर्जी राखणं हाच तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला होता. हीच तिच्याकडून अपेक्षा असायची आणि तीही या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देत असे. स्त्रियांनी स्वतःचं मत मांडणं किंवा स्वतःसाठी उभं राहणं हा प्रश्नच तेव्हा उद्भवत नसे. तिचे सर्व निर्णय लहानपणी वडील, मग भाऊ आणि लग्नानंतर नवरा घ्यायचा त्यामुळे ती सुखी आणि निश्चिंत आयुष्य जगायची.” मला सकाळीच रेडिओवर ऐकलेलं एक गाणं आठवलं. “तुम गगन के चंद्रमा हो, मैं धरा की धूल हूं”

या ओळींनी मला क्षणभर विचार करायला भाग पाडलं. हे गाणं स्त्रीच्या एक विशेष प्रकारच्या मानसिकतेचे प्रतिक आहे. तिला 'धरा की धूल' म्हणजेच एक निरर्थक, हिणव दुर्बल अस्तित्व म्हणून दाखवलं आहे. क्षणभर मनात आलं, पण या गाण्यातील नायिकेने स्वत:ला ‘धरा की धूल’ असं का बरं म्हणावं? म्हणजेच स्वत:ला क्षुल्लक, नगण्य का समजावं? ती असंही म्हणू शकली असती की बाबा रे, तू आणि मी समोरासमोर एकाच धरेवर उभे आहोत, दोघेही समान आहोत. मी धरा की धूलही नाही आणि तू गगन का चंद्रमा ही नाहीस. पण नाही. ती तसं म्हणूच शकत नाही. कारण तिला तसं म्हणायला शिकवलंच नव्हतं. तिच्या मनावर सतत हेच बिंबवलं गेलं की, तू धरा की धूल आहेस… कारण तू मुलगी आहेस. आणि तो गगन का चंद्रमा आहे… कारण तो मुलगा आहे.

हाच विचार नकळत संस्कारांच्या रूपाने तिच्या मनात इतका खोलवर रुजतो, की ती स्वतःच स्वतःला कमी लेखायला शिकते. तिचं अस्तित्व, तिची किंमत, तिचा आवाजसगळं कुठेतरी दुय्यम ठरतं. थोडक्यात काय तर शकुंतलाताईं, समस्त उच्चशिक्षित आणि स्वत:ची काहीतरी मते असण्यार्‍या आजकालच्या प्रगत महिलेला म्हणत होत्या की तुम्ही स्वत:ला नेहमीसाठी धरा की धूलच समजा.

थोडा विराम घेत त्या वर्तमानाकडे वळतपुढे म्हणाल्या, “पण आज परिस्थिती बदलली आहे आणि याचं मूळ कारण म्हणजे आजच्या मुलींचं शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन. आजकालच्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत. मोठ्या पदांवर काम करत आहेत, स्वतः पैसे कमवत आहेत. आणि या सगळ्यामुळे त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला आहे.” त्यांचा हा तर्क मला अजिबात पटत नव्हता. उलट, त्यांच्या प्रत्येक विधानाने माझ्या मनात नवे प्रश्न जन्म घेत होते. त्या पुढे म्हणाल्या, “त्यांच्या या गर्विष्ठपणामुळे त्या आपल्या नवर्‍याशी व सासरच्या लोकांशी जुळवून घेऊ शकत नाहीत.” थोडं थांबून त्यांनी आपली नजर सभागृहात फिरवली व अधिक जोमाने पुढे म्हणाल्या, “शिक्षण आणि करियरच्या या गडबडीत मुलींची लग्नं उशिरा होतात. त्यामुळे ती कडक काटकी काही वाकायला तयार होत नाही. त्यात भर म्हणजे तिचं उच्च शिक्षण आणि नोकरी. त्यामुळे या आजकालच्या मुलींना स्वयंपाक करणं, घर सांभाळणं या गोष्टी जमतच नाहीत.”

त्यांचे शब्द ऐकतांना मला धक्का बसत होता. ही स्वतः महिला असून, स्वत: उच्चशिक्षित असूनही या महिलेचा हा दृष्टिकोन इतका एकांगी आणि संकुचित कसा असू शकतो, यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं. त्यांच्या बोलण्यात असा एक ठामपणा होता की, जणू या चौकटीबाहेर विचार करणं हेच चुकीचं आहे.

“शिवाय मुलीला जराही काही त्रास झाला की माहेरचे तिच्या मदतीला धावून येतात आणि तिच्या संसारात ढवळाढवळ करतात. त्यामुळे मुली लहानशा गोष्टीचाही कहर करतात, राईचा पहाड बनवतात. सासू सासर्‍याचा अपमान करतात आणि नवर्‍याशी वाद घालतात. कोणाचं काहीच ऐकत नाहीत. सासरच्यांबरोबर जुळवून घेत नाहीत. मग होतो घटस्फोट आणि शेवटी नातं तुटतं.” आणि त्या क्षणी मला जाणवलं, व्यासपीठावर उभ्या असलेल्या त्या वक्त्या जणू हाच संदेश देत होत्या. शब्द वेगळे होते, पण आशय तोच, स्वतःला कमी समजा, वाका, सहन करा कारण संसार टिकवण्याची जबाबदारी तुमचीच आहे.

“माझ्या मते, आज वाढत्या घटस्फोटांचं मूळ कारण फक्त आजकालच्या मुलींचे बेताल वागणं,बंडखोर वृत्ती आणि तडजोड करण्यास नकार! संसार हा दोघांचा असला तरी संसार टिकवण्याची जबाबदारी स्त्रियांचीच असते. स्त्री ही त्यागाची मूर्ती आहे. म्हणून तिने त्याग करून आपला संसार वाचवायचा प्रयत्न करायला हवा.” थोडक्यात काय तर शकुंतलाताईं, समस्त उच्चशिक्षित आणि स्वत:ची काहीतरी मते असण्यार्‍या आजकालच्या प्रगत महिलेला म्हणत होत्या की तुम्ही स्वत:ला नेहमीसाठी धरा की धूलच समजा. त्याआवाजात ठामपणा आणत बोलल्या, “स्त्रीने स्वतःच्या अधिकारांबरोबरच जबाबदाऱ्यांचाही विचार करायला हवा. फक्त हक्क सांगून संसार टिकत नाही, स्त्री जरथोडा संयम, समजूतदारपणा आणि सहनशीलता ठेवेल तर संसार अधिक टिकाऊ आणि आनंदी होऊ शकतो. अन्यथा, आजघडीला वाढणाऱ्या घटस्फोटांचे प्रमाण कमी होणार नाही. म्हणूनच, स्त्रियांनो विचार करा. स्वातंत्र्य आणि जबाबदारी यामध्ये समतोल साधा तरच समाजातील विवाहसंस्था टिकेल!”

शकुंतलाताईंचं भाषण संपलं. पण माझ्या मनात विचारांचा प्रचंड कल्लोळ उठला होता.एक स्त्री, तीही सुशिक्षित, अनुभवी असून इतक्या ठामपणे फक्त स्त्रियांनाच दोष देत होती. त्या क्षणी मला जाणवलं, हा केवळ एक विचार नव्हता तर अनेक वर्षांच्या सामाजिक संस्कारांचे खोलवर रुजलेले प्रतिबिंब होता. खरंच जर स्त्रिया शिकल्या, स्वावलंबी झाल्या म्हणून संसार तुटत असतील, तर आधी टिकणारे संसार नेमके कसे होते? की आता त्या अन्याय, अपमान आणि दडपशाही सहन करायला तयार नाहीत म्हणून नात्यांचं खरं स्वरूप समोर येत आहे? आता बाई असून ह्या असे बोलतात तर हा पुरुष वक्ता अजून काय बाईची बाजू घेणार? असा विचार करत मी पुढच्या वक्त्याचं भाषण ऐकू लागले.

पंडित सर बोलायला उठले. काही क्षण ते निःशब्द उभे राहिले. त्यांनी सभागृहातून नजर फिरवली आणि ते पहिलेच वाक्य ठामपणे बोलले, “या ताईंच्या कोणत्याही मताशी मी सहमत नाही!” मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. सगळे श्रोते थक्क झाले. सभागृहात शांतता पसरली. ते पुढे काय बोलतात हे सगळे उत्सुकतेने ऐकू लागले. त्यांनी दिर्घ श्वास घेतला, डोळे मिटून थोडा विचार केला आणि नंतर गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली, “या ताईंच्या मते, त्या काळातील लहान वयात होणारी लग्नं हीच योग्य होती. स्त्रीने आयुष्यभर सहनशील, समायोजन आणि तडजोड यांच्याच चौकटीत राहून जगावं. नवऱ्याचं आणि सासरच्यांचं निःशब्दपणे ऐकावं, मनाविरुद्ध असलं तरीही मान खाली घालून सगळं स्वीकारावं आणि लग्नानंतर माहेरच्यांनी मुलीच्या संसारात अजिबात हस्तक्षेप करू नये, हेही त्यांना योग्यच वाटतं.पण अशा लग्नांतून निष्पन्न काय व्हायचं? “पूर्वी संसार टिकायचे, हे खरं. पण ते टिकायचे कशामुळे? प्रेमामुळे, समजुतीमुळे की फक्त स्त्रीच्या निःशब्द सहनशीलतेमुळे? जर एखादं नातं फक्त एकाच व्यक्तीच्या तडजोडींवर उभं असेल, तर ते खरंच ‘टिकलेलं’ म्हणायचं का? ते खरोखर समजुतीवर उभं होतं, की एका बाजूच्या निःशब्द सहनशीलतेवर? स्त्रीच्या इच्छांना, भावनांना, मतांना जागाच नसलेली ही विवाह संस्था, तिलाच आपण ‘टिकलेला संसार’ म्हणायचो का?” त्यांचे मुद्दे मला पटत होते.

“तर या बालवयात सासरी आलेल्या मुली दिवसरात्र राबत रहायच्या. त्यांच्या आयुष्याला कुठलाही मोबदला नव्हता, कुठलाही सन्मान नव्हता. त्या जणू बिनपगारी काम करणाऱ्या गुलामच होत्या. स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार त्यांना नव्हता, आपल्या इच्छा-आकांक्षा व्यक्त करण्याची मोकळीकही नव्हती. मिळेल तसं आयुष्य जगायचं आणि जर कोणी एखाद्या मुलीने सगळ्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्या कोवळ्या मुली अग्नीच्या हवाली केल्या जायच्या. “स्त्रीला स्वत:चं असं हक्काचं घरच नसतं. माहेर भावाचं आणि सासर नवर्‍याचं. लग्नानंतर तर माहेरी अजिबात स्थान उरत नाही. तिच्या मनावर अशी शिकवण कोरली जातेकी ‘‘नवरी बनून माहेरातून जा आणि तिरडीवरूनच सासरातून बाहेर पड,’ अशीच तिची जणू नियती ठरवली गेली आहे. म्हणूनच त्याकाळी नवर्‍याच्या मृत्यूनंतर तिला सती जाणं याशिवाय पर्यायच नव्हता.

“माझ्या मते, पूर्वीची ही विवाहपद्धती मुळातच अन्यायकारक होती. त्या काळात स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं, तिच्या भावनांना आणि इच्छांना किंमत आहेहेच समाज मान्य करायला तयार नव्हता. तिचं संपूर्ण आयुष्य रांधा, वाढा आणि उष्टी काढा यातच संपून जायचं. आठवा आपल्या आजीला, आईला. काय आठवतं? मी स्वत: माझ्या आईला घरासाठी अहोरात्र कष्ट करताना पाहिलं आहे. तिचा त्याग, तिचं निःशब्द झगडणं, तिच दु:ख हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडलं. कारण त्या काळात, स्त्रीला ‘माणूस’ म्हणून मान देणारी घरं फारच कमी होती. “आपण ‘संसार टिकवणं’ आणि ‘संसार जगणं’ यामध्ये गोंधळ करून बसलो आहोत. जर एखादं नातं टिकवण्यासाठी सतत एकाच व्यक्तीला वाकावं लागत असेल, तर ते नातं खरंच जगण्यासारखं राहतं का?

“खरं नातं तेच, जिथे पुरुष आणि स्त्री एकमेकांना समानतेने स्वीकारतात, समजून घेतात, आणि परस्पर संमतीने आयुष्याचा मार्ग ठरवतात. अशा नात्यांमध्येच खरा संवाद असतो, आदर असतो, विश्वास असतो आणि म्हणूनच ती नाती अधिक मजबूत आणि टिकाऊ ठरतात. आणि तेव्हाच घटस्फोटांसारख्या समस्या कमी होण्याची शक्यता निर्माण होते.” मला उठून टाळ्यावाजवाव्या असं वाटलं. पण सगळं सभागृह शांत बसलं होतं. जणू त्या शब्दांनी प्रत्येकाला अंतर्मुख केलं होतं. “पण आजच्या स्त्रियांकडे पाहिलं, तर एक वेगळंच चित्र समोर येतं. त्या आता केवळ जगत नाहीत, तर स्वतःच्या कर्तृत्वाने उंच भरारी घेत आहेत. जमिनीवर उभं राहून त्यांनी आकाशाला गवसणी घातली आहे. शिक्षण, नोकरी, उद्योग, कलाप्रत्येक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय प्रगती केली आहे. आणि तरीही ना त्या गर्विष्ठ झालेल्या आहेत, ना त्या उर्मट बनल्या आहेत. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे त्यांच्यात एक ठाम आत्मविश्वास जागा झाला आहे, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि स्वतःसाठी उभं राहण्याचा. हा आत्मविश्वासच त्यांना समाजाने घालून दिलेल्या निरर्थक बंधनांना झुगारून देण्याचं धाडस देतो. त्या आता स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि त्या निर्णयांच्या परिणामांना निधड्या छातीने सामोऱ्या जातात. त्या स्वतःवर अन्याय होऊ देत नाहीत, आपला स्वाभिमान जपतात आणि कोणालाही आपला अपमान करण्याची संधी देत नाहीत. परंतु त्यांच्या याच ठामपणाला या ताई ‘बेताल वागणं’ किंवा ‘बंडखोर वृत्ती’ समजल्या असाव्या.

“पण जर एखादी स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहून, कोणाच्याही आधाराशिवाय आपलं आयुष्य सन्मानाने जगत असेल, तर यात चुकीचं काय आहे? उलट, हाच तिच्या खऱ्या सशक्तीकरणाचा जिवंत पुरावा आहे. “आजच्या स्त्रीच्या आयुष्याचा उद्देश केवळ घरकामापुरता राहिलेला नाही. शिक्षण, करिअर आणि समाजातील योगदान या सर्व स्तरांवर तिने स्वतःची विशिष्ठ ओळख निर्माण केली आहे. तरीही, या सगळ्या प्रवासात तिने विवाहसंस्थेचा मान आणि तिची मूल्ये जपलेली आहेत. ती अनेक भूमिका एकाच वेळी समर्थपणे पार पाडते. ती घर सांभाळते, करिअर घडवते आणि कुटुंबातील नातेसंबंध जपते. आधुनिकतेकडे वाटचाल करतानाही नात्यांचं महत्त्व ती विसरलेली नाही. या सगळ्यांमध्ये संतुलन साधण्याची तिची क्षमता आणि जिद्द उल्लेखनीय आहे. “आपला समाज सतीच्या प्रथेपासून मुक्त झाला खरा, मात्र तो स्त्रीला बरोबरीचा दर्जा नाही देऊ शकला. मुलींना उच्च शिक्षण दिले गेले पण तिच्यात आत्मविश्वास जागा केला गेलाच नाही. तिला कायम संस्कृतीच्या नावाखाली तर कधी ‘खानदान की इज्जत’ चा दाखला देत बंधनात जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

“वर्षानुवर्षे स्त्रीला ‘अबला’ म्हणूनच घडवलं गेलं आहे. ही केवळ सामाजिक समज नाही, तर तिच्या मनावर सातत्याने बिंबवलेली एक खोलवरची मानसिकता आहे. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या या विचारांनी तिच्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनालाच मर्यादा घातल्या आहेत. “आणि यात आपल्या माध्यमांचाही मोठा वाटा आहे. मालिका असो, सिनेमा असो किंवा गाणी कथानक कितीही आधुनिक आणि प्रगत भासलं तरी त्यामागचा संदेश अनेकदा तोच असतो. स्त्री कितीही सक्षम, सुशिक्षित किंवा स्वावलंबी दाखवली गेली, तरी शेवटी नातं टिकवण्यासाठी झुकण्याची, माघार घेण्याची अपेक्षा तिच्याकडूनच केली जाते. “घर कितीही प्रगत असो, विचार कितीही आधुनिक असोत, जुळवून घेण्याची जबाबदारी मात्र स्त्रीवरच येते. जणू तिची महानता तिच्या सहनशीलतेत आणि त्यागातच मोजली जाते. आणि हीच गोष्ट पुन्हा पुन्हा तिच्या मनावर ठसवली जाते, इतकी की तीच तिचं वास्तव बनून जाते.

“आता क्षणभर डोळे मिटा आणि या गाण्याच्या ओळी मनात आणा, ‘तुम गगन के चंद्रमा हो… मैं धरा की धूल हूं….’” हे शब्द कानावर पडताचमी अक्षरशः दचकले. आश्चर्याने माझं मन स्तब्ध झालं. शकुंतलाताईंचं भाषण ऐकत असतांना, अगदी ह्याच ओळी माझ्या मनात उमटल्या होत्या आणि आता त्या कुणाच्या तरी शब्दांतून समोर येत होत्या! त्या क्षणी नकळत माझं त्या वक्त्याशी एक वेगळंच वैचारिक नातं जोडलं गेलं. "आजच्या स्त्रियांना धरा की धूल समजण्याची आवश्यकता नाही. त्या आता धरा की धूल राहिलेल्या नाहीत. तिने स्वतःला त्या चौकटीतून बाहेर काढलं आहे. ती आता उंच आकाशात झेप घेत आहे, जिथे तिला स्वातंत्र्य, हक्क आणि स्वाभिमानाने जगता येतं. ती आता कुणाच्या छायेत राहणारी नाही, तर स्वतःच्या प्रकाशाने लखलखणारी आहे. जणू आकाशातला चंद्रच. आजची सुशिक्षित, स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण स्त्री आपल्या स्वप्नांना, इच्छांना आणि अस्तित्वाला प्राधान्य देत आहे. ती ‘मी धरा की धूल आहे’ या संकुचित भावनेत स्वतःला कोंडून ठेवत नाही, तर स्वतःच्या अभिव्यक्तीचा, स्व-ओळखीचा मार्ग धैर्याने स्वीकारते.

म्हणूनच आज तिच्यासाठी आपण ही गाणी म्हणू शकतो, ‘आज मैं ऊपर, ज़माना है नीचे…’ किंवा ‘आज मैं आज़ाद हूँ, दुनिया के चमन में…’ होय… हीच आहे आजच्या स्त्रीची खरी ओळख.” त्यांचे शब्द सभागृहात गरजले आणि सर्वा श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या शब्दांनी स्त्रीला एक नवा अर्थ दिला. माझं मन भरून आलं. “आजच्या महिलांनी तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून स्वतःचं अस्तित्व अधिक सक्षम केलेलं आहेच. मग एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आम्हा पुरुषांचं काय? आम्ही बदललो आहोत का?
“सुशिक्षीत पत्नीसोबत संसार करण्यासाठी आम्ही स्वतःला खऱ्या अर्थाने तयार केलं आहे का? कारण बदल जर एकतर्फी असेल, तर नातं समतोल राहू शकत नाही. संसार हा दोघांचा असतो म्हणूनच बदलही दोघांनी स्वीकारणं तितकंच आवश्यक आहे. पत्नीला केवळ ‘घर सांभाळणारी व्यक्ती’ म्हणून नव्हे, तर एक समपातळीची साथी म्हणून पाहणं ही मानसिकता आपण स्वीकारली आहे का? बरोबरीचा दर्जा हा केवळ शब्दांत नसून, तो वागण्यात आणि विचारांतही दिसायला हवा.

“आजकालच्या पिढीतील पुरुषांना सुशिक्षीत मुलींशी लग्न करायचं असतं. आताची पिढी हाय स्टेटसमधे राहणे पसंत करते. मोठ्या शहरात पॉश लोकॅलिटीत फ्लॅट घ्यायचा, गाडी पाहिजेच, मुलांचं मोठ्ठ्या शाळांमधून शिक्षण व्हायलाच हवं. परदेश दौरा, शॉपिंग झालंच पाहिजे. हा सगळाखर्च एकटा नवरा उचलू शकत नाही. मग त्याला मदतीला हवी असते कमावती बायको. याला आजकालची मुलं डबल इंजिन म्हणतात. मग अशा त्याच्यासारख्या सर्वतोपरी समान दर्जाच्या असलेल्या दुसर्‍या इंजिनाने नुसत्या डब्याची भूमिका कशी वठवावी? आणि का?” त्यांची डबल इंजिनची कल्पना भन्नाट होती. सर्व श्रोत्यांनी टाळ्या वाजवून सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. “आजकालच्या मुलांना बायकोने कमावलेले पैसे तर हवेच आहेत, पण त्याचबरोबर तिची तीच प्रतिमा हवीय जी पूर्वीच्या काळातील अशिक्षित महिलेची होती. हे कसं शक्य होणार? हे पुरूष अशा बायकोमध्ये आपली आईच बघतात. तिने नोकरी सांभाळतांना घरच्यांसाठी रांधावे, वाढावे व उष्टी काढावी ही अपेक्षा करतात. एखाद्या गृहिणीसारखं घर सांभाळावं, येणारे जाणारे, पै पाहुणे यांचा पाहुणचार करावा, जेवण वाढायला उभं रहावं, मुलांना सांभाळावं. सगळं सगळं तिनेच करावं. हे जरा चुकीचंच वागणं नाही का?

“आता तुम्ही म्हणाल मग काय पुरूषांनी घरकाम करावं का? भांडी घासावी, मुलं सांभाळावी. ही सगळी बायकी कामं आहेत. इथे आमचा पुरुषार्थ आडवा येतो. कारण लहानपणी आई आपल्या मुलाला या प्रकारची कोणतीही कामे शिकवत नाही पण आता वेळ आलीय. आयांनी मुलींप्रमाणेच मुलांनाही घरकामं शिकवली पाहिजेत. आताच्या बदललेल्या, स्मार्ट झालेल्या, संसारासाठी आर्थिक सहकार्य करणार्‍या बायकोला मदत करायलाच हवी. अगदी संसाराच्या दोन चाकांप्रमाणे.” त्यांचं बोलणे ऐकतांना मला असं वाटलं की, हे बोलण्याचं धाडस केवळ पुरुषालाच दाखवता येईल. “हो. दोन चाकं म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांनी. जेव्हा ते एकमेकांना समानतेने, समजुतीने आणि परस्पर संमतीने स्वीकारतात, तेव्हाच नातं अधिक मजबूत आणि टिकाऊ बनतं. अशा नात्यांमध्येच खरा संवाद, आदर आणि विश्वास निर्माण होतो आणि तेव्हाच घटस्फोटांसारख्या समस्याही कमी होण्याची शक्यता वाढते. घटस्फोटांचं वाढतं प्रमाण हे फक्त स्त्रियांच्या बदलामुळे नाही, तर पुरुषांनी बदल स्वीकारण्यात केलेल्या उशिरामुळेही झालेलं आहे असं नाही तुम्हाला वाटत?” प्रत्येक मुद्द्यानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारून, त्यांचे मत विचारून त्यांना विचार करायला लावायची त्यांची पद्धत मजेदार होती.

“पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट स्त्रियांनीही लक्षात ठेवायला हवी, स्वतःची प्रगती करत असताना, पुरुषांचा ‘व्यक्ती’ म्हणून आदर करणं, मोठ्यांचा सन्मान राखणं आणि नात्यांची ऊब जपणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण समानता म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणं नाहीतर परस्पर सन्मान, समजूत आणि सहप्रवास आहे. आणि हीच खरी महिला दिनाची ओळख आहे. महिला दिन हा केवळ उत्सव नाही—तो परिवर्तनाची सुरुवात आहे.” कार्यक्रम संपत आला. प्रत्येक जण आपापल्या विचारांत हरवला होता. कुणीच काही बोलत नव्हतं, जणू ऐकलेले शब्द, मांडलेले विचार याचा अर्थ लावत होते. मीही माझं चित्त एकवटून त्या सगळ्या चर्चेचा मागोवा घेत होते. आजच्या चर्चेने मनाला अनेक प्रश्न विचारायला लावले. अनेक पूर्वग्रह बदलले आणि एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली, महिलांचा आदर आणि सन्मान हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसावा. तो प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक नात्यात दिसायला हवा.


जुलेखा विकास शुक्ल संपर्क : निवांत, हनुमान वाडी, चाळीसगाव, 424101 मो.9273348322 shuklazulekha@gmail.com