अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीवाद
अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्रीवाद सांगण्यापूर्वी मला सुरुवातीस स्त्रीवादी संकल्पना स्पष्ट करावीशी वाटते. स्त्रीवाद ही एक परिवर्तनवादी सम्यक राजकीय जाणीव आहे. स्त्रीला स्वतःच्या शक्तीचे आलेले भान; समाजाच्या प्रगतीत असलेला सहभाग; स्वातंत्र्य, मानवतावाद व समता या मूल्यांची झालेली ओळख म्हणजे स्त्रीवाद. अन्याय, अत्याचार, दडपशाही व शोषण या सर्वांतून मुक्त होण्यासाठी उचललेले कृतिशील पाऊल म्हणजे ‘स्त्रीवाद’. लोकशाही कुटुंबव्यवस्था तयार करण्यासाठी तशीच शिक्षणव्यवस्था निर्माण करणे व अर्थकारणातही खाजगीकरण-उदारीकरण या ऐवजी सामाजिकीकरणावर भर देणे म्हणजे ‘स्त्रीवाद’. लोकशाही विकेंद्रीकरण हे तत्त्व राबविण्याचा व तसे संस्कार करण्याचा अविरत प्रयत्न स्त्रीवादात अभिप्रेत आहे.१९६०-७० हे दशक युनोने ‘स्त्रीदशक’ म्हणून जाहीर केल्यापासून आणि शैक्षणिक जगतात जेव्हा स्त्री प्रश्नांचा अभ्यास सुरू झाला तेव्हा स्त्रीवाद ही संकल्पना पुढे आली. याच काळात बेटी फ्रीडन व सीमाँतबुआंचे लिखाण भारतात वाचले जाऊ लागले. सुरुवातीस ही पाश्चात्त्य संकल्पना आहे, असे मानले जात असे. पण महाराष्ट्रात संत काळापासून आपल्याला ही आधुनिकता सापडते. महाराष्ट्रातील पहिला शास्त्रशुद्ध स्त्रीमुक्तीचा विचार महात्मा फुले यांच्या विचारात साहित्यात व कृतीमध्ये प्रकट झाला. म्हणूनच म्हटले जाते,
पहिले नमन करू जोतिबाला
ज्याने स्त्रीमुक्तीला जन्म दिला
जोतिबांचाच प्रभाव असलेल्या ताराबाई शिंदे व त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या मुक्ता साळवे या बहुजन समाजातील स्त्रियांनी एकोणिसाव्या शतकात त्यांच्या बुद्धिनिष्ठ आकृतीबंधातून स्त्रीवाद प्रभावीपणे मांडला आहे. उच्चवर्णीय स्त्रियांचे जगणे व दलीत स्त्रियांचे जगणे यातील फरक दाखवून मुक्ता साळवे यांनी जी राजकीय भूमिका घेतली आहे, त्यावरून सर्व स्त्रियांचं दुःख एकाच साच्यात मोजमाप करणे चुकीचे आहे, हे अधोरेखित केले गेले. आधुनिक भारतातील स्त्रीवादाची सुरुवातच या दोघींच्या विचारातून होते. स्त्रीवाद हा बहुकेंद्रीय आहे. वंचितांची वेदना केंद्रस्थानी आणण्याचा आग्रह धरणारा आहे. हिंसेला व युद्धाला नकार देणारा आहे.
आपल्याकडे स्त्रीप्रश्नांची अडचण अशी होते की, स्त्रियांचा त्यागाचे समर्पणमय स्वरूप वारंवार सांगत समाजमनातल्या स्त्रीच्या अपराधी भावनेला कायम केले जाते. स्त्रियांना त्यातून बाहेर पडण्याची मुभाही नाकारली जाते. राजकारणाच्या उदात्तीकरणातून स्त्रियांच्या त्यागाचा, समर्पणाचा समाजकार्यातील सहभागासाठी उपयोग केला जातो. यातून कृतिशील समाज निर्माण होण्याऐवजी एक प्रकारची नवी सरंजामी व्यवस्था निर्माण होते. पुरुषसत्तेला जग जसे हवे आहे किंवा दिसते आहे, त्यापेक्षा जग खूप वेगळे आहे, हे स्त्रीवादाने मांडले. स्त्रीवादाने स्त्रीचा आवाज व तिच्या वेदनेचे वास्तव प्रथम उघड केले. इतिहास म्हणजे ‘His Story’ मग ती ‘Her story’ का होऊ शकत नाही? असा प्रश्न स्त्रीवाद विचारतो.
साहित्याचा अभ्यास हा सामाजिक कागदपत्रं म्हणून केला पाहिजे. तो समाजमनाचा दस्तऐवज असतो. त्या त्या काळच्या समाजाचे प्रतिबिंब साहित्यात दिसते. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सामाजिक इतिहासाचा अभ्यास म्हणून त्या कलाकृतीकडे पाहायला हवे. याच दृष्टिकोनातून अण्णाभाऊंच्या साहित्यातला स्त्रीवाद मी लिहीत आहे. खरेतर स्त्रीवाद ही संकल्पना ८०-९० च्या दशकातील. त्यातील तत्त्वं, विचार अण्णाभाऊंच्या साहित्यकृतीला (प्रातिनिधिक स्वरूपातील) मी लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापूर्वी मराठी वाड्मयातील स्त्रीवादाच्या परंपरेचा थोडासा मागोवा घेणार आहे. ही परंपरा चक्रधर स्वामींची शिष्य महदंबा, पुढे संत मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई यांच्यापर्यंत पोचते. एकोणिसाव्या शतकात ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे यांच्या नंतर पंडिता रमाबाई, काशीताई कानिटकर, गिरजा केळकर, रमाबाई रानडे या स्त्रियांनी त्यांच्या लिखाणातून व कृतीतून स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, विधवांच्या समस्या, केशवपन या समस्या मांडल्या. १८३७ मध्ये मराठीतील पहिली कादंबरी ‘चंद्रप्रभावर्णन’ लिहिण्याचा मानही साळूबाई तांबवेकर या स्त्रीकडेच जातो.
एकोणिसाव्या शतकात स्त्री समस्येला वाहिलेली पहिली सामाजिक कादंबरी ‘यमुना पर्यटन’ ही बाबा पद्मनजी यांनी लिहिली. अनेक पुरुष लेखकांनीही या काळात स्त्री प्रश्नांचा आपल्या साहित्यातून वेध घेतला. विशेषतः ह. ना. आपटेंनी मराठी कादंबरीला स्त्री प्रश्नाकडे वळविले. वा. म. जोशी, ग. त्र्यं. माडखोलकर, वि. वि. बोकील यांनीही स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधून स्त्रियांचे आंतरिक विश्व उलगडण्याचा प्रयत्न केला.
अण्णाभाऊंच्या समकालीन असलेल्या विभावरी शिरूरकर यांनी स्त्रीचं दुःख साहित्यातून परिणामकारकरीत्या मांडलं. आणि स्त्रीवादी विचारांची नवी वाट निर्माण केली स्त्रीला आपल्या दास्याची, दैन्याची जाणीव यातून झाली. आपल्या अस्तित्वाविषयी ती विचार करू लागली. कळ्यांचे नि:श्वास, हिंदोळ्यावर, बळी, शबरी यांसारख्या कादंबऱ्यांतून विभावरीताईंनी स्त्रीसमस्यांचे अत्यंत सखोलपणे प्रकटीकरण केलेले आहे.
विभावरीताई यांच्या समकालीन असणार्या अण्णाभाऊंच्या साहित्याचा विचार करता असे दिसते की, अण्णाभाऊंनी स्वीकारलेला समाजविचार आणि अंगिकारलेली जीवनदृष्टी ही मार्क्सवादी आहे. मार्क्सने इतिहासाचा अर्थ लावण्याचे मानव मुक्ती लढ्याकडे डोळसपणे बघण्याची आणि प्रबळ वर्ग जाणिवांच्या संघटित धुरीणत्वाच्या परिवर्तनलढ्यात अग्रेसर राहण्याची एक सम्यक दृष्टी माणसांना दिली. अण्णाभाऊंच्या सर्व लिखाणात ‘आहे रे’ वर्ग आणि ‘नाही रे’ वर्ग यांचा संघर्ष दिसतो. अण्णाभाऊंनी कथा, कादंबरी व वाङ्मयक्षेत्रात पुनरागमन केले, तेच उपेक्षित, वंचित, शोषित समाज घटकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी. अण्णाभाऊंच्या ३५ कादंबऱ्यांपैकी १६ कादंबऱ्या ह्या नायिकाप्रधान आहेत. गावकुसाबाहेरील व आतील स्त्रीजीवनाचा संघर्ष, समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या प्रत्येक स्त्रीप्रधान कादंबरीतून स्त्रियांचे विविध प्रश्न त्यांनी रेखाटले आहेत. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहेत. त्या रडत नाही, तर लढतात. आलेल्या प्रत्येक संकटातून मार्ग काढतात. स्त्रीवादाचा एक विशेष गुण म्हणजे 'आत्मनिर्भरता'. ती त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसते. मग ती चित्रा असो वैजयंता वा दुर्गा. त्या रणमर्दानी, धाडसी व शीलसंपन्न आहेत. त्याचबरोबर त्या कुटुंबवत्सल, पुरोगामी विचाराच्या, स्वाभिमानाने जगणाऱ्या, स्वतः जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या कथा कादंबरीतील नायिकांमध्ये दिसतात. माणूस म्हणून आपल्या नायिकांचे चित्रण ते करतात.
आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची, अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की, परिस्थितीला शरण जाऊन लेकराबाळांसह आपले जीवन संपविण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी ६०-७० च्या दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली. ती स्त्रीजातीला अभिमानास्पदच आहे. या कालखंडात नुकतेच भारतात स्त्रीवादाचे पडसाद उमटू लागले होते. स्त्रीवादावर उलटसुलट चर्चा नुकतीच सुरू झाली होती. ह्याचा कळत- नकळत संस्कार अण्णांच्या साहित्यात उमटलेला दिसतो.
अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहेत. तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. स्वत्व जपतात. शीलरक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. अन्याय व करमणुकी विरुद्ध बंड करतात. त्यांच्या काही नायिका पाटील, इनामदार यांच्या कन्या आहेत. काही मांग, रामोश्याच्या मुली आहेत. दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे. काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत. त्या करारी व बाणेदार आहेत. स्त्रीवादाचे म्हणूनच अनेक विशेष त्यांच्यात दिसतात. त्यांच्या नायिका गुलामगिरीची बंधने झुगारून देणाऱ्या, स्वातंत्र्य व्यक्तिमत्त्वाच्या अनिष्ट रूढी-परंपरांना नाकारणाऱ्या आहेत. नकाराचे सामर्थ्य हा स्त्रीवादाचा विशेष त्यांच्यात दिसतो. अण्णाभाऊंना स्त्रियांवर अन्याय होणे मान्य नाही. अन्यायाचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य स्त्रियांनी स्वतःत एकवटले पाहिजे, असे अण्णाभाऊंना वाटते. आपल्या स्त्रीपात्रांचा त्यांनी नेहमीच आदर केला आहे.
१९५१ मध्ये त्यांची 'चित्रा' ही पहिली स्त्रीप्रधान कादंबरी आली. या कादंबरीत त्यांनी मुंबईतील वेश्याव्यवसायाचे चित्रण केले आहेत. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा या व्यवसायात ढकलतो व नंतर तिची लहान बहीण चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने, परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते, पण सोना चित्राची मोठी बहीण चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये, म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्यसंपन्न आयुष्याची निवड करते. शहरातील वाढते औद्योगिकीकरण, नि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक-सामाजिक विषमता. त्यातून निर्माण झालेले स्त्रीप्रश्न, वेश्या जीवनाची दाहकता, स्त्रियांच्या वेदना, पुरुषांच्या वासनेच्या आगीत त्यांचे होरपळणे, नैतिक मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, हे या कादंबरीत ते प्रभावीपणे मांडतात. मराठीमध्ये वेश्यांच्या जीवनावर काही मोजक्या कादंबऱ्या यापूर्वी लिहिल्या गेल्या तरी अण्णाभाऊंची चित्रा कादंबरी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणारी म्हणून लक्षात राहते. वेश्या ही एक स्त्री आहे माणूस म्हणून तिचे दुःख, भावना समजून घेतल्या पाहिजेत व तिलाही यातून मुक्ती मिळविण्याचा अधिकार आहे, हेच अण्णांना यातून दाखवायचे आहे.
'वारणेच्या खोऱ्यात' या कादंबरीला पुढे त्यांनी मंगला हे नाव दिले. १९४२ च्या आंदोलनात मंगला आपल्या देशभक्त पतीला साथ देते. इंग्रजी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पतिच्या बरोबरीने खांद्यावर बंदूक ठेवून लढते. स्त्री ही केवळ उपभोगाचे साधन नाही ती पुरुषाची अर्धांगिनी आहे. कणखरपणे पती समवेत आलेल्या प्रसंगाला ती न डगमगता तोंड देते ही स्त्रीपुरुष समानता या कादंबरीत ते रेखाटतात. तमाशा कलावंतांच्या जीवनावरील ‘वैजयंता’ ही १९५९ च्या प्रसिद्ध झालेली त्यांची आणखी एक नायिकाप्रधान कादंबरी. यामध्ये तमाशातील स्त्रियांचे होणारे भावनिक लैंगिक शोषण ते रेखाटतात. एका विशिष्ट परिस्थितीत मन मारून वैजयंता तमाशात प्रवेश करते; पण तमाशातही ती आपल्या जीवनाची तत्त्वं कसोशीने पाळते. थिएटर मालक चंदुलाल तिला पब्लिकशी अधिक मोकळेपणाने वागलं पाहिजे असं सुचवतो. तेव्हा ती उसळून निर्धाराने उत्तर देते,“मी सरळ तमाशा करेन नि सरळ जाईन. दुसरं मला मान्य नाही. तमाशा म्हणजे माझ्या नग्न देहाचे प्रदर्शन नव्हे!” चंदुलाल तिला म्हणतो, लोक फक्त गाणी व नाच पाहण्यासाठी येत नाहीत. तेव्हा वैजयंता चेहरा लालेलाल करून म्हणते, आणि मी ही इथं कसबीण म्हणून येत नाही. तमाशात कसूर झाली तर जनतेने मला फाशी द्यावी; पण तुम्हीच लोकांच्या नावावर हे वाह्यात वर्तन माझ्यावर लादताहात. अण्णाभाऊंच्या मनातले हे स्वाभिमानी, आत्मतेजाने झळाळणारे, डोळे दिपवून टाकणारे, चित्र वैजयंताच्या रूपाने दिसते. प्रतिकूल परिस्थितीतही स्वत्व जपण्याचा वैजयंताचा निर्धार म्हणजे स्त्रियांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा अण्णाभाऊंनी केलेला उच्चकोटीचा आविष्कार आहे. स्त्रियांबाबत येऊ घातलेल्या नव्या स्त्रीवादाची जाणीव वैजयंताच्या रूपाने अण्णा दाखवितात. 'आमच्या शरीरावर आमचा अधिकार' हे स्त्रीवादाचे सूत्र यातच अण्णाभाऊ चित्रित करतात.
'वैजयंता'नंतर एक लढाऊ कामगार स्त्रीचे दर्शन घडवणारी ‘चंदन’ ही कादंबरी महत्त्वाची आहे. मुंबई शहरातील झोपडपट्टीचे, व्यसन, वासना, गरिबी, अगतिकता यांनी भरलेले जीवनदर्शन ते यामध्ये यथार्थपणे मांडतात. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतच्या मदतीने ती यात यशस्वी होते. एका कामगार स्त्रीच्या शौर्याची कहाणी ते यात दाखवितात. कामगार जगतात अण्णाभाऊंनी पाहिलेली लढाऊ स्त्री चंदनच्या रूपाने ते जशीच्या तशी चित्रित करतात. स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून पाहता स्त्रीला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, समान कामाला समान वेतन व माणूस म्हणून स्त्रीचा विचार या सर्व गोष्टी त्यात दिसतात.
त्यांची पुढची कादंबरी ‘चिखलातील कमळ’. यातून ते मुरळी प्रथेवर प्रकाश टाकतात. देवाच्या नावाने मुली सोडण्याची स्त्रियांबाबतची एक घातक रूढी मुरळी व देवदासी प्रथेतून आजही महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या सौदत्ती, गडहिंग्लज, निपाणी, कारवार या भागात दिसते. अशा प्रथांचा हेतू वरच्या जातीतील पुरुषांना राजरोसपणे शूद्र स्त्रिया पुरवणे हाच होता. देवाचे लग्न लावण्याच्या गोंडस आवरणाखाली मूळ हेतू झाकला जात होता. या प्रथेविरुद्ध महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ केली होती. बाबासाहेबांच्या विचारांचा फार मोठा पगडा अण्णाभाऊंवर होता. म्हणूनच आपल्या कादंबरीत मुरळी प्रथेतून स्त्रियांचे होणारे लैंगिक शोषण ते दाखवितात. या प्रथेचा धिक्कार करतात व या प्रथेतून बाहेर पडण्याचे बळ नायिका सीताला ते देतात.
प्रसिद्ध स्त्रीवादी विचारवंत कुमकुम संगारा म्हणतात, ‘भारतीय स्त्रियांची निवड ही पुरुषप्रधानता नियंत्रित करते.’ ‘आवडी’ या कादंबरीतून हीच पुरुषप्रधानता ते अधोरेखित करतात. घरंदाजपणाच्या नावाखाली सरंजामशाही वृत्तीचा भाऊ आपल्या सुंदर तरुण बहिणीचे लग्न फेफरे येणाऱ्या पाटलाच्या मुलाशी करून तिचे जीवन उद्ध्वस्त करतो. फसवणूक झालेली आवडी रडत व कुढत न बसता नशिबाला दोष न देता स्वतंत्रपणे निर्णय घेऊन खालच्या जातीतील धनाजी रामोशाच्या घरात आश्रयाला जाते. यामुळे घराण्याची प्रतिष्ठा लयास गेली. म्हणून आवडीचा भाऊ नागोजी बहीण सारजाच्या मदतीने आवडीचा खून करतो. सध्या एकविसाव्या शतकात समाजात सर्रास पाहायला मिळणाऱ्या ऑनर किलिंगचा सामाजिक प्रश्न अण्णाभाऊ साठच्या दशकात मांडतात. घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आंतरजातीय विवाहाला विरोध व खून तसेच जाती-जातीतील विषमता या समाजाच्या कळीच्या प्रश्नावर अण्णाभाऊ नेमकेपणाने बोट ठेवतात. यातील आवडी ही घराण्याच्या खोट्या प्रतिष्ठेचा धिक्कार करते व भावाने केलेली अन्याय, उपेक्षा सहन करीत नाही. अशा रीतीने अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून स्त्रीवादाचा जो विचार जातीव्यवस्थेचा अंत झाल्याशिवाय समानता येणार नाही व अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवितात.
अण्णाभाऊंची ‘रत्ना’ कादंबरी एका सैनिकाच्या पत्नीची व्यथा मांडणारी कर्मकहाणी आहे. यशवंत ह्या सैनिकाचा मित्र तोही सैनिकच. हा विनायक नावाचा मित्र यशवंतची बायको रत्ना त्याच्या घरी नवऱ्यास पत्र लिहिण्यास आलेली असताना, तिच्यावर बलात्कार करतो. ती त्यापासून गरोदर राहते. त्यामुळे सासू-सासरे तिला घरातून बाहेर काढतात. अशा परिस्थितीत माहेरचे लोकही तिच्याशी तुटकपणे वागतात. गरोदर रत्नाला तिचे आई-वडील गावकुसाबाहेर एका महारणीकडे ठेवतात. पुढे तिला मुलगा होतो. त्यानंतर यशवंत सीमेवरून परत येताच त्याला सर्व हकीकत कळते. त्याचा पश्चात्तापदग्ध मित्र यशवंतला आपल्या हातून चूक झाल्याचे कबूल करतो व यशवंत रत्नाचा स्वीकार करतो. बलात्कारित विवाहितेची समस्या अण्णाभाऊ रत्नात मांडतात. व देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या जवानांच्या पत्नीचे जीवन खेड्यापाड्यात किती असुरक्षित असते, याचे वास्तव दर्शन रत्नातून घडते. तसेच ब्राह्मणी धर्माने स्त्रियांबाबत मांडलेल्या योनीशुचितेच्या तत्त्वाला छेद देणारा विचार नकळतपणे रत्नाच्या नवऱ्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ दाखवितात. मला तर यशवंताचे हे रूप देवादिकांच्या पेक्षाही मोठे वाटते, जे प्रत्यक्ष रामाला जमले नाही. त्यानेही लोकापवाद महत्त्वाचा मानून सीतेला वनात धाडले म्हणूनच जात्यावरच्या ओव्यातून बहुजन समाजातील स्त्री म्हणते,
राम म्हणू नये राम नाही सीतेच्या तोलाचा
हिरकणी सीताबाई राम हलक्या दिलाचा
अब्राह्मणी स्त्रीवादाचा हुंकार मला अण्णाभाऊंच्या नायिकाप्रधान कादंबरीत जागोजागी दिसतो. अण्णाभाऊंचा स्त्रीवाद हा पुरुष प्रस्थापनेला विरोध करणारा आहे. मराठी साहित्याचा प्रीतीप्रधानता वा प्रीती भावना हा आवडीचा विषय अण्णाभाऊही त्याला अपवाद नाही. त्यांच्या प्रेम-शृंगार कथांमध्ये अलगुज, रानगंगा, संघर्ष, अहंकार, रूप, आघात, गुलाम, मयूरा व मूर्ती या कादंबऱ्यांचा स्थूलमानाने उल्लेख करावा लागेल. अलगुज ही त्यांची गाजलेली कादंबरी. तिच्या तीन आवृत्त्या निघाल्या. घरंदाज शेतकरी गणू मोहिते. त्याची कन्या रंगू आणि त्यांचा घरगडी बापू खारवते यांची ही प्रेमकथा. प्रेमामध्ये जात, पैसा, उच्च-नीचता याबाबत कोणताही भेद न मानणारी अलगुजची नायिका रंगू अनेक अडचणी पार करून बापूंशी एकनिष्ठ राहते. व प्रेमविवाहात यशस्वी होते. वर्ण , वर्ग व स्त्रीदास्याला विरोध हे स्त्रीवादाचे विशेष त्यांच्या अनेक प्रीतीकथांतून दिसतात.
‘माकडीचा माळ’ ही १९६३ साली मॅजेस्टिकने प्रकाशित केलेली कादंबरी अण्णाभाऊंच्या सर्वोत्कृष्ट पहिल्या पाच कादंबऱ्यांपैकी होय. तीपण नायिकाप्रधान आहे. गावाच्या बाहेर पाल ठोकून राहणारे फिरत्या जमातीच्या तांड्यांचे हे मराठी कादंबरीतील पहिले जीवनदर्शन आहे. डवरी, डोंबारी, दरवेशी, माकडवाले, साप गारुडीवाले, तुरेवाले, भानामतीवाले, गोसावी, फासेपारधी, नंदीवाले, शिकलगार अशा अनेक फिरत्या जमातींच्या जगण्याच्या कथा-व्यथा, त्यांच्या रीतीभाती, वेगवेगळे धर्म व त्याही अवस्थेत त्यांनी स्वीकारलेली नैतिकता ते ह्यातून दाखवितात. उघड्या जीवन व्यवहारातील यंकु व दुर्गाची अव्वल दर्जाची प्रीती दुर्गाच्या रूपाने या कादंबरीत उफाळलेला घनघोर संघर्ष अण्णाभाऊ चित्रित करतात. माकडीचा माळ मधील दुर्गा भटके आयुष्य जगतानाही वासनांध लोकांशी करारीपणाने वागून निर्भयपणे चोख उत्तर देते. स्त्री कोणत्याही जाती-धर्माची असो आदिवासी भटक्या-विमुक्त जातीची वा उच्चवर्णीय तिला समाजातील पुरुषसत्ताक पद्धतीशी, वासनांध वृत्तीशी दोन हात करावेच लागतात. उच्चवर्णीय स्त्रियांपेक्षा पददलित स्त्रियांची दुःखं, समस्या, प्रश्न तर अधिकच गडद. स्त्री आणि दलित असे दुहेरी शोषण त्यांचे होते. मुक्ता साळवे यांच्या विचाराचा धागा व राजकीय भूमिका येथे अण्णाभाऊंच्या विचारात स्पष्टपणे जाणवते.
'फुलपाखरू'मधील रोहिणी, दिलीप व ग्यान यांच्या भूलथापांना फसून वेश्याव्यवसायात ढकलली जाते. परंतु योग्य संधी मिळतात त्या वातावरणातून बाहेर पडून संसारी जीवन जगण्यास सुरुवात करते. अण्णाभाऊंच्या नायिका या रूढ व चाकोरीबद्ध जीवनातील वाटत नाही, तर पोटासाठी संघर्ष विद्रोह करणाऱ्या आहेत. यासाठी संकट ओढवून घेणाऱ्या व प्रसंगी प्राणही देणाऱ्या आहेत. नायिकांना पोटासाठी काहीही काम करावे लागले तरी त्या शीलसंपन्नता जोपासतात. तळागाळातल्या उपेक्षित स्त्रियांना त्यांनी नायिका केले व त्यांचे शोषित जीवन साहित्यातून उलगडले. आपल्या कादंबऱ्यांतील जीवनाला त्यांनी वास्तवाची पकड दिली. सामान्य माणसाचे मन व अभिरुची ओळखून लेखन केले, म्हणूनच त्यांच्या नायिकांनी सामान्य माणसांच्या मनावर अधिराज्य केले. मग ती दुर्गा, आवडी असो वा चंदन किंवा रत्ना.
डॉक्टर प्रमोद गारोडे म्हणतात, त्याप्रमाणे शेतकरी व गिरणी कामगारांची दुःख पाहिलेल्या भोगलेल्या अण्णाभाऊंना साम्यवादी विचार आपलासा वाटत होता. दलित शोषितांना पीडितांना माणूस म्हणून ताठ मानेने जगायला शिकवणारे हे समतेचे तत्त्वज्ञान अण्णाभाऊंनी आपल्या कादंबरीतील स्त्रियांच्या वागण्या-बोलण्यातून मांडले. स्त्रीवादाचे हेच मूलतत्त्व आहे. म्हणूनच त्यांच्या साहित्यात स्त्रीवाद दिसतो. अण्णाभाऊंनी स्त्रियांचा नेहमी आदर केला, म्हणूनच तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करताना त्यातील स्त्रियांचे अश्लील हावभाव, स्त्रियांवरील अश्लील विनोद, स्त्रियांची इज्जत न राखणारे गणगौळण त्यांनी बदलली. तमाशातील स्त्रीलाही प्रतिष्ठा मिळवून दिली. आपल्या कादंबरीतून त्यांनी स्त्रीचे वर्णन करताना त्यात तिला निर्वस्त्र किंवा स्त्रीचे भडक उत्तान चित्रण त्यांच्या कादंबरीतून त्यांनी कधीच केले नाही. स्त्री-पुरुषांच्या उदात्त आदर्शवादी प्रीतीकडेच अण्णाभाऊंची वृत्ती आकर्षित होते. अण्णाभाऊंचे शब्द अंगार होऊन फुलतात ते नायिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच !
वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत अण्णाभाऊ लिहितात की, "ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचे जीवन तितक्याच प्रामाणिकपणे व निष्ठेने मी चित्रित करणार आहे"
सक्षमीकरण! सक्षमीकरण म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून अण्णाभाऊंच्या नायिकाच आहेत, असे मला वाटते. स्त्रीवादी विचारवंत विद्युत भागवत म्हणतात, अब्राह्मणी राजकारणात असलेली पुरुषसत्ता अनेकदा स्त्रियांवर सामाजिक आणि लैंगिक क्षेत्रात नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात दिसते. या प्रयत्नाला शह द्यायचा असेल, तर मोठ्या प्रमाणात आत्मविश्वासाने बहुजन कष्टकरी स्त्रिया उभ्या राहिल्या पाहिजेत. यासाठी अब्राह्मणी स्त्रीवादी लेखन परंपरेला उजाळा दिला पाहिजे. अण्णाभाऊंच्या नायिकाप्रधान कादंबऱ्यांतून हाच स्त्रीवादी दृष्टिकोन दिसतो.
महात्मा फुले आपल्या स्त्रीवादी विचारसरणीत म्हणतात, इतिहासात आर्थिक शोषण मग ते वर्गीय असो नाहीतर जातिव्यवस्थापक, ते कशाप्रकारे होत आले याचा शोध घेऊन त्याची मांडणी केली पाहिजे. तशीच पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेतून होणाऱ्या शोषणाचा शोध घेणारी मांडणी असली पाहिजे. शोषणविरहित, शासनविरहीत समाज हा पुरुषप्रधानतेचा व पितृसत्ताकतेचा अंत केल्याशिवाय येऊ शकत नाही, अशी महत्त्वाची मांडणी जी फुल्यांनी केली, तिच्याशी मिळता-जुळता असणारा विचार मार्क्सवादी अण्णाभाऊंच्या साहित्यात दिसतो. डॉ. आंबेडकर म्हणतात, स्त्रियांना असणारा सन्मानाचा दर्जा हा मनूपूर्व कालखंडात होता. आंबेडकरांच्या विचारांच्या प्रभावातून हाच सन्मानाचा दर्जा अण्णाभाऊही आपल्या साहित्यातल्या स्त्रीवर्गाला देतात. बाबासाहेब म्हणतात, जातीव्यवस्था टिकविण्याकरिता जातीतच लग्न व विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारला गेला. पण अण्णांच्या नायिका ह्या मर्यादांचे उल्लंघन करून एक प्रकारे स्त्रीवादी विचारचाच पुरस्कार करतात. मग ती आवडी असो वा चंदन.
अण्णाभाऊंच्या सर्व साहित्यात मला कॉम्रेड शरद पाटील यांची मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद ही माफुआ विचारसरणी पाहायला मिळते. अण्णाभाऊंनी साहित्य हे इतिहास म्हणून मांडले. म्हणूनच स्टॅलिन इतिहासाचे जे पाच टप्पे मानतो. आदिम, गुलामी, सरंजामशाही, भांडवलशाही, समाजवाद हे सर्व अण्णाभाऊंच्या कथा- कादंबऱ्यात पहावयास मिळते. त्यांच्या साहित्यात सरंजामशाही दिसते, शहरीकरणातून औद्योगिकीकरणातून भांडवलशाही येते व शेवटी नायिका संघर्षावर मात करून त्यांना हवी असलेली समानता मिळवतात. यावरून समाजवादाची (वर्ग, जात, स्त्री दास्यांत) निर्मिती करतात. हा अब्राह्मणी स्त्रीवाद त्यांच्या साहित्यात जागोजागी दिसतो.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक बापूराव गुरव म्हणतात की, अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री दर्शन गंभीर आणि भारतीय जीवनातून उभ्या राहिलेल्या जीवन विषयक तत्त्वज्ञानाला गौरवास्पद असेच आहे. ते पुढे म्हणतात, "या देशात कोणीही स्त्रीचा जन्म घेऊ नये. घेतला तर सुंदर असू नये. सुंदर असेल तर तरुण असू नये. तरुण असेल तर दरिद्री असू नये आणि दरिद्री असेल तर उपेक्षित अस्पृश्य असू नये. आणि हे सारे असेल तर किमान माकडीचा माळ या कादंबरीतील नायिकेसारखे उघड्यावर अब्रूचे रक्षण करीत भटकण्याचे दुर्दैव तरी तिच्या नशिबी येऊ नये.
ज्या अण्णाभाऊंना 'साहित्यरत्न' असे म्हटले जाते त्यांची त्याकाळात उपेक्षाच झाली. आपल्या चाकोरीबाहेरच्या लेखकाला उपेक्षेने, उपहासाने मारायचे, अपमानीत करायचे. मराठी समीक्षकांना ही कला चांगली जमून गेलीय. त्यांना प्रस्थापितांनी नाकारले, पण वाचकांनी त्यांचे साहित्य डोक्यावर घेतले. ते सातासमुद्रापलीकडे गेले. त्यांची परदेशी भाषेत भाषांतरं झाली. देश, काळाच्या, धर्म, जात, पंथाच्या सीमा त्यांनी ओलांडल्या; पण समीक्षकांना त्यांचे नाव, गाव माहिती असू नये हे क्लेशदायक वाटते. त्यांचे साहित्य प्रचारकी एकसुरी मानले गेले. त्यांचे साहित्य हे साहित्यच नाही. ते उथळ, पुनरुक्त, भडक आहे अशी टीकाही त्यांच्यावर केली गेली. अण्णाभाऊंच्या उपेक्षेचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची राजकीय विचारधारा - डावी विचारसरणी जी इथल्या मातीत कधी रूजलीच नाही म्हणून त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. ते कोणत्याच लेखकाच्या गटात, कटात व मठात सामील झाले नाहीत. हेही आणखी एक कारण सांगता येईल. पण आता मात्र नव्या समीक्षकांना अण्णाभाऊंच्या साहित्यात वेगळेपण जाणवत आहे. दलित साहित्याला समृद्ध वारसा अण्णाभाऊंच्या साहित्याने मिळवून दिला. हे आता मान्य होत आहे. शेवटी अण्णाभाऊंच्या शब्दात लिहावेसे वाटते की,
आगळीक नाही आमची
हे रचलंय तुमचं सरण!
जुलमाचे सांगा कारण
मग खुशाल द्यावे मरण
अशा तऱ्हेने अन्यायाला न घाबरणाऱ्या दलित माणसाची; जीवन व व्यवस्थेशी चाललेली झुंज चितारणाऱ्या अण्णाभाऊंनी लेखणीला हत्यार बनविले. शब्दांना शस्त्राचे रूप दिले. स्त्री-पुरुष समानतेचा आपल्या साहित्यातून सतत आग्रह धरला. अशा अण्णाभाऊ साठे ह्या साहित्यरत्नाला माझा त्रिवार सलाम!
संदर्भ सूची :
१) डॉ. भोसले एस. एस. , अण्णाभाऊ साठे प्रातिनिधिक कथा.
२) प्रा. गुरव बाबुराव, अण्णाभाऊ साठे समाजविचार आणि साहित्यविवेचन.
३) डॉ. कोरडे बजरंग, भारतीय साहित्याचे निर्माते अण्णाभाऊ साठे.
४) पिंगळे वि. दा., लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
५) डॉ. हातागळे उज्ज्वला, अण्णाभाऊ साठे लिखित स्त्रीसंघर्ष गाथा.
६) तुपे उत्तम बंडू / जाधव संपत, लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठे समग्र वाड्मय खंड - २.
७) डॉ. साळुंके आ. ह. : हृदयातून हृदयाकडे.
प्रा. डॉ. अरुणा मोरे
दौंड, जि . पुणे.
arunamore1957@gmail.com