अॅन फ्रँक आणि समांतर वेदनेच्या कहाण्या
लाल पांढर्या चौकटीची एक छोटी डायरी ही विसाव्या शतकातील एक ऐतिहासीक दस्तावेज बनली.
सगळ्याच गोष्टींचं ‘रेकॉर्ड’ ठेवणार्या जर्मनीत मानवी इतिहासात घडलेल्या सर्वात मोठ्या आणि अत्यंत क्रूर वंशहत्येचा दस्तावेज लिहिला गेला, ज्यात सलग १२ वर्षं २२ देशातील ज्यू नष्ट करण्यासाठी रीतसर यंत्रणा उभी केली गेली. यातील चार वर्षं त्यांना मारून टाकण्यात आलं. त्यात ही डायरी मानवी आशावाद, चांगुलपणा आणि करुणा यांचं प्रतीक बनली.
ती लिहिली होती एका किशोरवयीन मुलीनं. अॅन फ्रँक तिचं नाव.
‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’ हे जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेलं पुस्तक. त्यावर आलेली कितीतरी नाटकं, माहितीपट, फिल्म्स. या सगळ्यातून वारंवार हे सगळं पुन्हा घडू नये असा एकच समान संदेश दिलेला असतो. ह्याच मांदियाळीत अलीकडे आणखी एक माहितीपट आला आहे तो म्हणजे ‘अॅन फ्रँक – पॅरलल स्टोरीज’.
'अॅन फ्रँक – पॅरलल स्टोरीज’ हा २०१९ सालचा माहितीपट नेटफिल्क्सवर प्रदर्शित झाला आहे. या माहितीपटाचा कालावधी १ तास ३२ मिनिटे इतका आहे. ऑस्कर विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री हेलन मिरेन यांनी या महितीपटात काम केलं आहे. इटालियन पत्रकार सबीना फिडेली आणि अॅना मिगोटो यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. अॅन फ्रँकच्या वाट्याला केवळ १६ वर्षांचं जीवन आलं. ती वाचली असती तर आज ९० वर्षांची असली असती. माहितीपटात आपण तिच्याएवढ्याच वयात छळ छावणीत गेलेल्या परंतु वाचलेल्या पाच बायकांना भेटतो.
माहितीपटात कतरिना नावाची एक किशोरवयीन मुलगी अॅन फ्रँकच्या शोधात बर्गन बेल्सनचं डॉक्युमेंटेशन सेंटर, शोहा मेमोरियल- पॅरीस, होलोकॉस्ट मेमोरियल सेंटर इथे जाते. सोबतच हेलेन मिरेन अॅन फ्रँकच्या त्या सीक्रेट रूममध्ये बसून तिच्या डायरीची काही पानं वाचत राहते. याला समांतर असं अरियाना (Arianna Szörenyi), सारा ( Sarah Lichtsztejn-Montard, ) हेल्गा वाइस (Helga Weiss), जुळ्या समजल्या म्हणून वाचलेल्या दोन बहिणी अँड्रा आणि तातियाना (Andra and Tatiana Bucci) अशा पाच बायकांचं जीवन आपण पाहतो. असं या माहितीपटाचं स्वरूप आहे.
अॅन आणि किटी
एका ज्यू कुटुंबात १२ जून १९२९ रोजी, फ्रँकफुट जर्मनी येथे अॅन फ्रँक जन्माला आली. १९३३ साली हिटलरनं सत्ता मिळवली आणि आधुनिक काळातील एक अतिशय क्रूर, विधिनिषेधशून्य आणि वंशभेदाच्या विषारी तत्वज्ञानावर आधारित अशी कार्यक्षम हुकूमशाही जर्मनीमध्ये स्थापन केली. अॅन फ्रँक विसाव्या शतकातील मानवी क्रूरतेची हकनाक बळी ठरली. एक नाही दोन नाही, तर ६० लाख ज्यू! यात तान्ह्या बाळांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांचा समावेश होता. १२ जून १९४२ ला म्हणजेच १३ व्या वाढदिवसाला अॅनला ती डायरी तिच्या वडिलांनी भेटवस्तू म्हणून दिली. त्या डायरीला तिने नावही दिलं – ‘किटी’. अॅन फ्रँक १३ वर्षांची होती जेंव्हा जीव वाचवण्यासाठी फ्रँक कुटुंबाला दोन वर्ष ‘सीक्रेट अॅनेक्स’ मध्ये रहावं लागलं. या दोन वर्षात तिने डायरी लिहिली. ही किटीच त्या एकांतवासातली तिची जिवाभावाची मैत्रीण बनली. १५ जुलै १९४४ च्या डायरीतल्या नोंदीत अॅन फ्रँक लिहिते, “सगळं किती दु:खद आहे. तरीही मी जेंव्हा इथून दिसणार्या त्या टीचभर आकाशाकडे पाहते तेंव्हा वाटतं हे बदलेल. काहीतरी चांगलं होईल. ही क्रूरता थांबेल. शांतता येईल. परंतु तोपर्यंत मी माझे आदर्श जपून ठेवले पाहिजेत असा एक दिवस येईल जेंव्हा मला त्यांची प्रचिती येईल.” परंतु ४ ऑगस्ट १९४४ रोजी त्यांना अटक केली गेली आणि त्यांची पाठवणी छळ छावणीत केली गेली. सुरूवातीला ह्या कुटुंबाला पूर्व हॉलंडमधल्या वेस्टर बोर्कच्या कॅम्पमध्ये पाठवलं गेलं. ते पोचले तेव्हा तिथे आधीच जवळपास १ लाख ज्यूज होते. तिथून नंतर आऊश्वित्झ. मग दोन बहिणी अॅन आणि तिची बहिणी मार्गो बर्गन बेल्सनच्या छळछावणीत ‘टायफस’ या संसर्गजन्य रोगाने मरण पावल्या. कॉमन ग्रेव्ह्जमध्ये त्यांना पुरलं गेलं. त्या तिथेच असतील कुठेतरी जिथे २३ हजार २०० ज्यूंचे सापळे झालेले मृतदेह पुरले गेले. त्यांची आई एडिथ भूकबळी ठरली. ज्यू लोकांचा केला गेलेला छळ आपल्या कल्पनेपलीकडचा आहे. केवळ त्यांचे वडील ऑटो फ्रँक वाचले. आपल्या कुटुंबावर प्रेम करणारे हे वडील नंतर कसे जगले असतील हा विचार करूनही पोटात गोळा येतो. आज अॅन फ्रँकचे जे फोटो आपण पाहतो त्यातील तिचे प्रसन्न हसरे डोळे, तिच्या निरागस हसण्यातला तजेला आपण विसरू शकत नाही.
वाचलेल्यांना स्मृतीचा शाप
जे ज्यू त्या मृत्यूच्या हिंसक तांडवातून वाचले त्यांच्यासाठी पुढचं जगण सोपं नव्हतं. त्यांची मुलं, त्यांची नातवंडं, त्याच्याही पुढच्या पिढीपर्यंत सगळ्या दु:खद आठवणी झिरपत गेल्या आहेत. मुख्य म्हणजे सुरूवातीला लाज, भीती म्हणून ते लपवलं गेलं. पण त्यानंतर ते बाहेर येणं अपरिहार्य होतं कारण ‘छळ छावण्या’ ही काल्पनिका नव्हती तर ते एक सत्य होतं. जवळपास १५ वर्षांनी मौन सुटलं. ११ एप्रिल १९६१ रोजी जेरूसलेमं येथे ट्रायल सुरू झाल्या. १११ लोकांच्या साक्षी घेतल्या गेल्या आणि हिटलरने घडवलेला ‘वंशसंहार’ जगासमोर आला.
अरियाना (Arianna Szörenyi) चार छळ छावण्यांमधून वाचल्या हे वाचूनही छातीत धडकी भरते. त्या आज ९० वर्षांच्या वर्षाच्या आहेत, पण आजही त्यांच्या कानात छळ छावणीच्या लोखंडी गेटचे आवाज येतात, डोळ्यांसमोर न संपणार्या रांगा त्यांना दिसत राहतात. अरियाना यांची मुलगी सारा सांगते, “लहानपणी आई मला म्हणायची, जगात तू एकटी पडली आहेस, तुझं कोणीही नाही असं समजून काम कर.” त्यांच्या नातवानं, अरियानाचा, म्हणजे आपल्या आजीचा छळ छावणीत दिलेला हातावरचा नंबर स्वत:च्या हातावर गोंदवून घेतला आहे. दु:खाचा एक ‘फिजिकल कनेक्ट’ तयार झाला आहे.
सारा (Sarah Lichtsztejn-Montard) सांगतात, “आम्हांला म्हणत असत की तुम्ही ज्यू लोक या दाराने आत याल आणि गॅस चेंबरच्या चिमणीतून बाहेर जाल.” कॅम्पमध्ये असताना दिवसभर काय करणार? लहान होत्या त्या. त्यांच्या वयाच्या इतर मुली डोक्यातला उवा काढायच्या आणि त्यांची स्पर्धा लावायच्या. अजून कोणता खेळ खेळणार? हे ऐकून अंगावर काटा येतो.
जसं अॅन फ्रँकनं डायरी लिहिली तसं हेल्गा वाइस (Helga Weiss) यांनी चित्र काढलं. एक लहान मुलगा आणि मुलगी स्नो मॅन बनवत आहेत असं ते चित्र. तेच पहिलं आणि शेवटचं चित्र कारण नंतर त्या कॅम्पमध्ये होत्या.
तुम्ही कॅम्पच्या बाहेर येऊ शकत नाही. तुमच्यातला काही एक भाग कॅम्पमध्येच राहतो.
*ते रिकामं ‘सीक्रेट हाऊस’
अॅमस्टरडॅममधलं फ्रँक कुटुंबीय, आणखी एक कुटुंब आणि एक डॉक्टर लपले होते ते ‘सीक्रेट हाऊस’ आजही जसंच्या तसं ठेवलं गेलं आहे. १९४४ साली अॅन खोली सोडून गेली होती तेव्हा होती तशीच तिची खोली आहे. ‘बायकाच कशा बायकांच्या वैरी असतात’ हे वाक्य आपल्याकडे येता-जाता वापरलं जातं. या माहितीपटाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं की अॅन फ्रँकची डायरी ‘मिप’ ह्या सहृदय बाईने सांभाळून ठेवली म्हणून जग ती वाचू शकलं. ऑटो फ्रँक यांच्या सहकारी असणार्या मिप यांनीच आपला जीव धोक्यात घालून ह्या ज्यू कुटुंबाला लपवून ठेवलं. एका १३-१४ वर्षाचा मुलीनं लिहिलेल्या डायरीला एरवी कुणी महत्त्व दिलं नसतं; पण मिपने तसं केलं नाही हे आवर्जून लक्षात घेण्यासारखं आहे.
भवतालाचं भान
अॅन फ्रँकची डायरी वाचल्यावर आणि हा माहितीपट बघत असताना लक्षात येतं की त्या किशोरवयीन मुलीला तिच्या ‘राजकीय परिस्थितीबद्दल सजगता’ होती. ‘सजगता’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे, ‘माहिती’ नाही. माहिती खूप जणांना असते. आजकाल सोशल मीडियावर लोक राजकीय परिस्थितीबद्दल फक्त चेकाळलेले, आक्रस्ताळलेले असतात. ‘सजगता’, ‘भान’ काही अपवाद सोडता किती लोकांना असतं हा एक प्रश्नच आहे.
ब्रिटिश फौजा जर्मनीमधील कॅम्प मोकळे करण्यासाठी आल्यावर त्या कॅम्पच्या जवळ राहणार्या जर्मन लोकांना ते कॅम्पमध्ये घेऊन गेले आणि त्यांना ज्यूंचे झालेले हाल दाखवले. आपण डोळे बंद केले, शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खूपसून बसलो म्हणून जगातली क्रूरता आणि हिंसा थांबते थोडीच? ही क्रूरता, इतकी हिंसा येते कुठून एखाद्या माणसात? हा जसा मोठा प्रश्न आहे तसाच त्याला तोंड देणारी सहनशक्तीदेखील माणसात कुठून येते? हाही एक प्रश्नच आहे.
माहितीपटात एके ठिकाणी म्हटलं गेलं आहे की होलोकोंस्टच्या इतिहासातून घेण्याचा महत्वाचा नैतिक धडा म्हणजे जीवनात असे क्षण येतात जेंव्हा लोक ‘निवड’ करतात. ‘एकमेकांना मदत करण्याची’ निवड, ‘सहअस्तित्वाची’ निवड आणि काही लोक कशाचीच निवड करत नाही. ही निष्क्रीयता, ही सत्याची, मानवतेची भूमिका ठामपणे न घेता तटस्थ राहण्याची वृत्ती यातूनच तर त्या हिंसेला खत-पाणी मिळत राहतं. आजची परिस्थिती पाहता आपण या इतिहासातून काहीही धडा घेतलेला नाही हे दिसतं. द्वेषबुध्दी, तिरस्कार, वर्ण, जात, धर्म यांचा विखारी अहंकार यातून आजही युद्धं घडत आहेत. दोन-चार वर्षांच्या लहान मुलामुलींनासुद्धा गॅस चेंबरमध्ये मारलं गेलं होतं आणि आजही इतक्याच वर्षांची कितीतरी मुलं-मुली, महिला विस्थापित होऊन मरणप्राय जीवन जगत आहेत. लॉकडाउनच्या काळात श्रमिकांचे चाललेले लोंढे आत्ता आत्ता आपण पाहिले आहेत. माहितीपटात माइकल नावाचे इतिहासतज्ञ म्हणतात, “When you destroy children you destroy infinite possibilities.” आणि तरीही हा तिरस्कार, द्वेषबुध्दी संपत नाहीये. अशा वेळी अॅन फ्रँक म्हणते तसं सगळे आदर्श, सगळी जीवनमूल्यं अर्थहीन वाटू लागतात, हे सगळ ‘प्रॅक्टिकल’ नाहीये असं वाटू लागतं. पण तरीही माणसाच्या हृदयातल्या चांगुलपणावर श्रद्धा ठेवणं हे एकच उत्तर ती देते.
अॅन फ्रँक जाऊन ७० हून अधिक वर्षं तरी ती लाल-पांढर्या चौकटीची डायरी आजही जगभरातल्या माणसांना आशावाद देते आहे.
तिच्या डायरीच्या आतल्या कव्हरवर एक वाक्य आहे, “Be kind and have courage.”
कोरोनाकाळाच्या आणि प्रेमापेक्षा द्वेष झपाट्याने पसरत जाणाऱ्या आजच्या काळाच्या पार्श्वभूमीवर तुम्हा-आम्हां सगळ्यांना ह्या वाक्याची ऑक्सीजनइतकीच गरज आहे.
माधवी वागेश्वरी
madhavi.wageshwari@gmail.com