अर्णवची डायरी
माध्यमांतर
अर्णवच्या डायरीतून उलगडणारी ही कथा एका तरुणाच्या अंतर्मनात चाललेल्या संघर्षाची, एकटेपणाची आणि न बोलता राहिलेल्या वेदनेची कहाणी आहे. समाज, कुटुंब, नातेसंबंध आणि लैंगिक ओळख यांच्यात अडकलेल्या अर्णवच्या भावना डायरीच्या पानोपानांतून हळुवार पण अस्वस्थ करणाऱ्या पद्धतीने समोर येतात. ही कथा केवळ आत्महत्येपुरती मर्यादित राहत नाही, तर ‘क्लोजर’, स्वीकार, संवाद आणि प्रेम न मिळाल्याची खोल जखम आपल्यासमोर ठेवते. संवेदनशील लेखक संदेश कुडतरकर या लेखनातून समलैंगिक अनुभव, दडपलेली ओळख आणि समाजाच्या नजरेपासून लपवून जगण्याची किंमत किती भयावह असू शकते, हे अत्यंत प्रामाणिकपणे मांडतात. हा लेख वाचकाला अस्वस्थ करत, विचार करायला लावणारा आहे.
(पुरुष उवाच दिवाळी 2024 मधून साभार.)
अर्णवने आत्महत्या केली, तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी मला बोलावून त्याची ही डायरी मला दिली. बिल्डिंगच्या गच्चीवरून त्याने खाली उडी मारली होती. तो वाचण्याची काहीच शक्यता नव्हती. त्याच्या बेडरूममध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने लिहिलं होतं, ‘आयुष्यात काही एक्साईट करणारं उरलं नाहीये. त्यामुळे केवळ जगत राहणं मला मान्य नाही. म्हणून आत्महत्या करतोय. माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये. माझ्या कपाटात असलेली डायरी सुनीलला देऊन टाकावी, त्यातील कोणताही मजकूर न वाचता. हीच माझी अंतिम इच्छा आहे.’ अर्णवच्या आईवडिलांचे अश्रू थांबत नव्हते. मी त्यांचं जमेल तितकं सांत्वन करून घरी आलो. रात्री डायरी वाचायला घेतली. सुरुवातीची बरीच पानं कविता, चित्रपटांची समीक्षणं, मध्येच काढलेली फुलांची नक्षी, टू-डू लिस्ट आणि त्यातल्या पूर्ण झालेल्या गोष्टींवर मारलेली काट, या सगळ्यांनी भरलेली होती. नंतर सापडला तो मजकूर खाली दिला आहे. कदाचित हेच सगळं शेअर करायचं होतं त्याला माझ्यासोबत...
त्यादिवशी कसा कंट्रोल सुटला, माहीत नाही. रात्रीच्या जेवणानंतर चालण्यासाठी म्हणून जवळच्याच बागेत गेलो होतो. तिथे जॉगिंग ट्रॅक आहे. नशीब जोरावर असेल, तर फार देखणे चेहरे नजरेस पडतात. त्या रात्री असाच एक चेहरा दिसला. काळ्या स्लीव्हलेस टीशर्टमधून त्याचे गोरे दंड खुणावत होते. मी संमोहित झाल्यासारखा त्याच्यामागून चालू लागलो. अधूनमधून त्याच्या नकळत त्याचे फोटोज काढू लागलो. तो बागेतून बाहेर पडला. रस्ता क्रॉस करून चालू लागला. मी त्याला समांतर अलीकडच्याच रस्त्यावर चालू लागलो. नंतर तो वळला, तसा मीही वळलो. आधी थोडं अंतर ठेवून चालत होतो, नंतर भीड चेपली. त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. तो अचानक थांबला. मी आजूबाजूला पाहू लागलो. थोड्या वेळाने वाटलं, नको पाठलाग करायला. म्हणून विरुद्ध दिशेला चालू लागलो. एका ठिकाणी थांबलो. आता तो येऊ लागला माझ्याजवळ. अगदी जवळ आल्यावर गरजला, ‘व्हॉट्स युअर प्रॉब्लेम?’ मीही बावचळून म्हटलं, ‘आय वॉज नॉट फॉलोईंग यू.’ त्याने रागाने एक कटाक्ष टाकला. मी तुझा चेहरा पाहिला आहे, असं म्हणाला. माझी पाचावर धारण बसली होती. जवळच्या मित्रांना हा किस्सा सांगितला. त्यांनी असं पुन्हा न करण्याचा शहाणपणाचा सल्ला दिला.
कांचीपुरमची मंदिरं पाहायला गेलो होतो, तेव्हा सकाळीच एकंबरेस्वरार मंदिरात ध्यानस्थ बसलेलं एक मानवी शिल्प दिसलं. मस्क्युलर होता तो. नामस्मरणात मग्न होता. एकंबरेस्वरार मंदिर शिवाचं. प्रत्यक्ष ध्यानस्थ शंकरच समोर बसल्यासारखं वाटलं. पाय निघत नव्हता तिथून. तिथेच गाभाऱ्यात थोडा वेळ घोटाळलो आणि त्याला मनसोक्त डोळ्यांत साठवून मनावर दगड ठेवून निघालो. चेन्नईत इतरत्र फिरतानाही जागोजागी नाक्यावर इतके देखणे पुरुष नजरेस पडत की, ‘कुंदन, तुझ्या लुंगीत हात घालू काय?’ असं विचारावंसं वाटे. पाँडिचेरीला पौर्णिमेच्या दुधाळ चांदण्यात व्हाईट टाऊनमध्ये फिरताना एका आईस्क्रीम पार्लरपाशी देखण्या तरुण मुलांचा एक घोळका दिसला. तिथेही थोडा वेळ रेंगाळलो.
तो अंगावर तुटून पडतो, तेव्हा आभाळ ठेंगणं होतं. स्वर्ग दोन बोटं उरल्यासारखा वाटतो. त्या तासाभरात त्याचं शरीर किती ओरबाडून घेऊ आणि किती नको, असं होतं. तो माझ्यात सामावू पाहतो. त्रास सहन करत मी त्या सुखद अनुभूतीसाठी त्याला ते करू देतो. तोही कदाचित या खेळात नवखा असावा. नीट जमत नाहीसं पाहून तो माझ्यापासून विलग होतो. मी त्याच्या देहाचा गंध श्वासांत भरून घेतो आणि हजार तर्हांनी त्याच्या देहाचं चुंबन घेतो. तो रिता झाला की मलाही मदत करतो परमोच्च बिंदू गाठायला. मी त्याला त्याच्या सर्व्हिसचे पैसे ट्रान्सफर करून निघतो. अक्षरशः तरंगतच घरी जातो आणि देहात उमलणाऱ्या असंख्य मुग्ध लाटांच्या गोड धुंदीत निद्रेच्या अधीन होतो.
सायकॅस्ट्रिस्टच्या गोळ्या चालू झाल्यापासून काही फीलच होत नाहीये. कसला आनंद नाही. कसलं दुःख नाही. सतत डोळ्यांवर एक धुंदी असते. कशाला काही अर्थ नाही, असं वाटू लागलंय. मुलांकडे पाहूनही आताशा मनात कसलेच तरंग उमटत नाहीत. पूर्वी जे असं तुटून पडावंसं वाटायचं, तसंही काही वाटत नाही. त्यादिवशी घरी एकटा असताना पॉर्न बघत होतो. पण या गोळ्यांचाच परिणाम असावा बहुधा, हात दुखायला लागला, तरी काहीच झालं नाही. अलीकडे एक नवीन सवय लागलीय. मेटा एआयवर किंवा इतर अॅप्सवर ‘शर्टलेस देसी मेन’ वगैरे प्रॉम्प्टस देऊन फोटोज जनरेट करतो आणि ते पाहून भूक भागवतोय. पण हे काही आताचं नाही खरं तर. ग्रीकांचा इतिहास होता, त्या इतिहासाच्या पुस्तकात थाळीफेक करणारा एक जवळजवळ पूर्ण नग्न खेळाडू होता. छिन्नी हातोडीने घडवलेल्या घाटदार शिल्पासारखा देह असलेला. तिथे पहिली ठिणगी पडली असावी या आकर्षणाची. फोनमध्ये मीडिया आणि फोटोज नव्हते, तेव्हा मी स्वतःच अशी स्केचेस काढून त्यांच्याकडे पाहून स्वतःला चेतवत असे. नंतर ते खोडूनही टाकत असे. एकदोनदा हा प्रकार आईने पकडला तेव्हा त्या कागदाचा चोळामोळा करून आईच्या लक्षात येण्यापूर्वीच फेकून दिला होता.
पहाटे साखरझोपेत पाहिलेली स्वप्नं खरी होतात, असं म्हणतात. तसं असेल तर कठीण आहे. आज सकाळी पडलेलं स्वप्न कसलं विचित्र होतं! एका निमुळत्या गल्लीतून चाललो आहे. तिथे एक दुमजली घर आहे. वरच्या मजल्यावर एक अतिशय देखणा पुरुष आहे. आमची नजरानजर होते. मी पार पुढे जाईपर्यंत तो पाहत राहतो माझ्याकडे. मीही मागे वळून त्याच्याकडे पाहत राहतो. थोडं पुढे गेल्यावर एका वळणावर एक मस्क्युलर उघडा पुरुष मल्लखांब करताना दिसतो. मी लपूनछपून त्याच्याकडे पाहू लागतो. त्या स्वप्नात मग मी तसाच पुढे जातो आणि एका निर्जन ठिकाणी कुणी नाही, असं पाहून निर्वस्त्र होऊ लागतो. तेवढ्यात एक पुरुष मला रागे भरत तिथे येतो आणि निघून जायला सांगतो. मी कसेबसे कपडे सावरत तिथून काढता पाय घेतो आणि मला जाग येते.
आईबाबांना वाटतं मी गे झालो ते पेपरमधले लेख वगैरे वाचून, पण शाळेतून आल्यावर समोरच्या घरात राहणाऱ्या मिलिंदचा काटक गोरा देह साद घालत असे, हे त्यांना कसं सांगणार? सांगूनही त्यांना कळणार आहे का त्यातलं काही? मला स्वतःला तरी कुठे काही कळत होतं? चित्रपटांमधली आयटम साँग्ज लागायची टीव्हीवर तेव्हा मी नायिकांच्या मागे नाचणाऱ्या पुरुषांकडेच पाहत असे. एकदा एका निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला गेलो होतो, तेव्हा त्या तरुणांच्या ग्रुपमधल्या एका गोऱ्या घाऱ्या डोळ्यांच्या मुलाचं नाव घरी येताना जप केल्यासारखं घेत होतो, यातून त्यांना काहीच बोध झाला नसेल? की कळूनही दुर्लक्ष करत असतील? इंटरनेट घरी आलं, तेव्हा गे पॉर्न पाहताना आईने कित्येक वेळा रंगेहाथ पकडलं होतं. तरीही तिला त्याचा अर्थ कळला नसेल?
तिथे हल्ली जावंसं वाटत नाही. तिथला दुर्गंध सहन होत नाही, हे तर झालंच. पण तिकडे त्यादिवशी तो दिसला होता. खूप वर्षांपूर्वी त्याच्यासोबत चॅट करायचो. फोनवरही बोललो होतो बहुतेक. पण त्यादिवशी दारूचे पेग रिचवून झाले होते, त्यामुळे असेल कदाचित, पण त्याचं नाव आठवलं नाही पटकन. चेहरा मात्र ओळखीचा वाटला. कुठे राहतोस, विचारलं. त्याने उत्तर देणं टाळलं. दुसऱ्या दिवशी नाव आठवलं, तेव्हा त्याला मेसेज केला. पण त्याने ओळख दाखवली नाही. वाईट वाटलं. लोक बोलणं बंद करतात, घोस्ट करतात, पण क्लोजर देत नाहीत. मीही नाही दिलंय बऱ्याचदा. पण ज्यांना दिलं नाही, त्यांना तरी ते हवं होतं का? क्लोजर न मिळालेल्या व्यक्ती ज्यांना त्याची खरीच गरज वाटते, त्या घुटमळतील, पुनःपुन्हा बोलण्याच्या निमित्ताने काहीतरी कारण काढून इनबॉक्समध्ये येतील, पण असं वागणार नाहीत. पाहून न ओळखल्यासारखं करणार नाहीत. तसंही तिथे हल्ली गर्दुल्ल्यांचा अड्डा असतो. मी गेलो तर फक्त करमणूक म्हणून जातो. कधीकधी गर्दी असते, कधी अगदीच सुनसान. एकदा लाईव्ह पॉर्न बघायला मिळालेलं. अशा कु्रजिंग स्पॉटवर सगळं परस्पर संमतीने होत असल्यामुळे काही चूक वाटत नाही मला त्यात. पण अशा लोकांचा गैरफायदा घ्यायला येणाऱ्या लोकांचा प्रचंड राग येतो. यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे पोलिसांनी.
माझ्या आयुष्यात प्रेम म्हणजे चेष्टाच होऊन बसलीय. जी व्यक्ती आवडते, ती दूर जाणार, हे ठरलेलंच. मिलिंद वयाने मोठा होता. त्याला असं काही कन्फेस करण्याचा प्रश्नच नव्हता. आसपासच्या लोकांना कळलं असतं तर नाचक्की झालीच असती, मिलिंदनेही मार दिला असता, तो वेगळाच. कॉलेजमधल्या मुलांपैकीही कुणाला काही सांगण्याचं धैर्य झालं नाही. नंतर त्या दोघांनी ब्लॅकमेल केल्यानंतर तर मी पूर्ण कोषात गेलो. तरीही एक पलिता आत अंधारातही धगधगत राहिलाच. सुनीलच्या आकर्षणाचा. इतका कसा हा मुलगा बावळट, हे मात्र आजवर कळलेलं नाही. इतक्यांदा त्याच्या घरी काही ना काही कारणं सांगून पडीक असायचो. तो माझ्यासमोर शर्ट काढायचा, तेव्हा रोखून त्याच्याकडे पाहायचो, तरीही त्याचं लक्ष नसायचं. तो सोबत असला की सगळ्या जगाचा विसर पडायचा. पण त्यादिवशी त्याच्या साखरपुड्याबद्दल कळलं आणि वाटलं, संपलं सगळं... आता कुणाचीच वाट पाहायला नको. आता कशालाच काही अर्थ नाही...
हे सगळं वाचलं आणि मला काय बोलावं, तेच सुचेना. अर्णवने एकदा तोंड उघडून सांगितलं असतं ना, की मी त्याला आवडतो, तर सगळ्या जगाविरुद्ध लढलो असतो त्याच्यासाठी. पण आता काय उपयोग? आईबाबांना किती वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं की मला लग्न नाही करायचं, पण ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे मीही अर्णवसारखाच गे आहे आणि दबावाखाली येऊन हे लग्न करतोय, हे कुणाला सांगू मी? आणि कोण विश्वास ठेवेल माझ्यावर? अर्णवने ही डायरी मला का द्यायला सांगितली असेल? त्याच्यासोबतच मीही उडी मारली असती, तर सगळेच प्रश्न सुटले असते. अर्णवची डायरी आता मला सुखाने मरूही देणार नाही. आता फक्त आयुष्य ओढायचं. अर्णव डायरी तरी लिहून गेला, मला कुठे क्लोजर मिळणार?