अथिया

लहान मुलांच्या भावविश्वाला समजून घेणारं, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारं आणि सहज, सोप्या भाषेत आनंद देणारं बालसाहित्य लिहिणं हे नेहमीच आव्हानात्मक मानलं जातं. डॉ. मीरा सुंदरराज यांच्या ‘अथिया’ या बालकविता संग्रहाबद्दल चिन्मयी चिटणीस यांनी लिहिलेल्या या लेखात बालमनातील निरागसता, निसर्गाशी असलेली मैत्री आणि मुलांच्या भावविश्वाचं सुंदर चित्रण यांचा वेध घेण्यात आला आहे. ‘छकुली’, ‘मनाची बाग’, ‘मळा’, ‘काळजी’ यांसारख्या कवितांमधून बालसुलभ भावना, खेळकरपणा आणि संवेदनशीलता सहजपणे उलगडत जाते; तर आकर्षक चित्रांमुळे संग्रहाचा आनंद अधिक खुलतो. बालकवितेतील साधेपणा, आशयाची निरागसता आणि मुलांना आपलंसं वाटणारं शब्दविश्व यांची ओळख करून देणारा हा लेख ‘अथिया’ या संग्रहाकडे वाचकांना आपुलकीने पाहायला लावतो.

बालकविता, बालसाहित्य, हा नेहमीच लेखनाचा कस लागणारा साहित्यप्रकार आहे. लहान मुलांच्या मनाला भिडणारे शब्द, आशयदान मांडणी हा त्यातला महत्वाचा घटक आहे.अगदी आत्ताच वाचनात आलेला एक असाच बालकविता संग्रह 'अथिया'! नावावरून एक कुतुहल याबद्दल निर्माण झाले. अथिया शब्दाचा अर्थ 'गणपतीने दिलेला प्रसाद, उपहार' असा सुंदर अर्थ आहे, हेच संग्रहाचे शीर्षक आहे.

एकूण पन्नास बालकवितांचा वाचनानंद यामध्ये आपण घेतो. बाल मनाला भिडणारी अशी सोपी भाषा या सर्वच कवितांमध्ये आहे. बाल कवितेला शब्द रचने सोबतच महत्वाची असतात त्या-त्या कवितेला साजेशी मोठी आकर्षक चित्र. या अथिया संग्रहात सुद्धा ती अगदी अग्रक्रमान आपले लक्ष वेधून घेतातच शिवाय मोजकी आणि समर्पक चित्र संग्रहाचा कवितेची शोभा वाढवतात. असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

एकूणच कविता छोट्या-सोप्या भाषेत आहेत. यांची शीर्षकेही 'छकुली', 'माझी नदी', 'पावसात मज्जा', 'मनाची बाग' अशी लक्षवेधक आहेत. मनाची बाग या कवितेत कवयित्री लिहीतात, "खारुताई झाडावर चढते सरसर, स्पर्धेत हरते माझी भिरभिरी नजर"..

वाह! असा उद्गार या ओळी वाचून आपसूकच येतो. त्यानंतरच्या 'मळा' या कवितेतील ओळी पहा - "आमच्या मळ्यात विहीर आहे, विहिरीचं पाणी मधूर आहे, आम्ही मुलं मनसोक्त हुंदडतो, पाखरा-पक्ष्यांशी खेळत राहतो"

सहजपणे हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि मळा दाखवते.. 'भुताच्या गोष्टी', 'माझे बाबा', 'काळजी' अशा मोजक्या कवितांबद्दल इथे सांगता येईल.

काळजी या कवितेत- शाळेबद्दल काळजी व्यक्त केली आहे. शाळा संपल्यानंतर अंधारात शाळा एकटी राहते याचं चित्रण यामध्ये येतं आणि हा निरागस भाव आपल्यालाही मनोमन आवडून जातो. अथिया संग्रहाला डॉ. किर्ती मुळीक ज्या स्वतः उत्तम कथा लेखिका असणाऱ्या साहित्यिका यांची छान प्रस्तावना लाभली आहे. या संग्रहाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे प्रख्यात चित्रकार पुंडलीक वझे यांच्या कुंचल्यातून साकार झाली आहेत. आत्ताच्या सर्व छोट्या दोस्तांसाठी 'अथिया' हा संग्रह अगदी मनोरंजनात्मक ठेवा आहे.

'संवेदना' प्रकाशनाची निर्मीती असलेला हा संग्रह आपल्याही संग्रही नक्कीच असावा. कवयित्री डॉ.मीरा सुंदरराज यांच्या बालकवितांचा हा ठेवा, त्यांच्या अनुभावातून शब्दबद्ध झालेला आहे. या सुरेख बाल कविता आपल्याला सुखावून जातात हे नक्की!

** बाल कवितासंग्रह : अथिया कवयित्री : डॉ. मीरा सुंदरराज संवेदना प्रकाशन, पुणे