अवलियांचा कुंभमेळा

०८ ऑगस्ट २०२०

कुंभमेळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो डोक्यावर जटा वाढवलेल्या, अंगाला राख फासलेला, उग्र, हातात त्रिशूळ वगैरे घेतलेल्या, चित्रविचित्र हावभाव करणाऱ्या, गंगेत स्नानासाठी धावणाऱ्या नग्न साधूंचा समूह. पण दरवर्षी एक असाही कुंभमेळा भरतो, जिथे वरवर सर्वसामान्यांसारखेच दिसणारे पण रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं करणारे अवलिये ज्ञानगंगेत डुंबण्यासाठी धाव घेतात!

कल्पना करा की, जगभरातून जमलेल्या साताठशे लोकांसोबत तुम्ही क्रूझने जगप्रवासाला निघाला आहात. अचानक तुमची क्रूझ भरकटते आणि एखाद्या निर्जन बेटाच्या किनाऱ्याला लागते. सुटकेच्या प्रयत्नात असतानाच तुम्हाला कळतं की ह्या बेटावर तुम्ही सुरक्षित आहात, अन्नधान्य भरपूर आहे, इथून पुढचा प्रवासही सुरु होणार आहे पण पाच दिवसानंतरच. सुदैवाने क्रूझवर विविध वाद्यं, खेळांचं साहित्य, संगीत, स्टेशनरी, रंग इ. इ. सर्व काही आहे. आता तुम्ही आणि तुमचे सहप्रवासी ह्या बेटावरच - पुढचे ५ दिवस.

हळूहळू काही प्रवाशांची ओळख होते. ते कुठून आलेत, काय करताहेत वगैरे प्रश्नोत्तरे होतात. तोपर्यंत क्रूझचा अनुभवी कॅप्टन आणि त्यांची तरुण टीम मात्र एकदम उत्साहात हे दिवस साजरे करायचं ठरवतात. काही नियम ठरवले जातात. समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूलभूत तत्त्वं स्वीकारली जातात. स्त्रियांना, मुलांना, पुरुषांना आणि बेटावरच्या निसर्गालाही एक सुरक्षित अवकाश (सेफ स्पेस) निर्माण करायचं ठरतं. कुणीही कुणावरही जबरदस्ती काहीही लादायचं नाही. एकमेकांचा, एकमेकांच्या भावनांचा, अनुभवांचा आदर करायचं ठरतं. जातपात, लिंग, वर्ग, वय इ. भेद दूर पिटाळले जातात. कुणीही कुणाचीही वेष, भाषा, रंग, अनुभव, शिक्षण इ कशावरूनही अवहेलना करणार नाही अशी एक नॉन-जजमेंटल स्पेस तयार होते.

सगळ्यांच्या सोयीसाठी फक्त जेवणाच्या वेळा, सकाळच्या सामूहिक खेळाच्या किंवा एकत्र जमण्याच्या वेळा इ. ठरवल्या जातात; पण त्यातही वैयक्तिक स्वातंत्र्य महत्त्वाचं. एखाद्याला खायचं असेल त्याने खावं, गायचं असेल त्याने गावं, नाचायचं असेल त्याने नाचावं, वाचायचं असेल त्याने वाचावं, शिकायचं असेल त्याने शिकावं आणि शिकवायचं असेल त्याने शिकवावं. कशाचीच सक्ती नाही. आणि अवतीभवतीची माणसं जगभरातून आलेली, रसरसून आयुष्य जगलेली, नेहमीच्या चाकोरीबद्ध जगण्याला लाथाडून वेगळ्या वाटा चोखाळणारी, नवनवे प्रयोग करणारी, संपत्तीच्या हव्यासापेक्षा मानवतेला मानणारी, सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध पेटून उठलेली, व्यवस्थेतल्या उणिवांवर आपापल्या पद्धतीने उत्तरं शोधणारी, आपल्याकडचं कित्येक वर्षांचं संचित मुक्तहस्ते उधळणारी...

कल्पना करा, ह्या अशा वातावरणातले ५ दिवस तुम्हाला किती समृद्ध करतील? तुमच्या विचारांना, जगण्याला कशी दिशा देतील? अगदी असाच अनुभव गेली १८ वर्षं LSuC (Learning Societies unConference) सर्वांना देतंय.

ह्या LSuC च्या जन्माची कहाणीही तेवढीच रोचक. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अमेरिकेत वाढलेल्या मनीष जैनला (सर्वजण त्यांना प्रेमाने मनीषभैय्या म्हणतात) वॉल स्ट्रीटवर इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करत असतानाच सर्वांना भुलवणाऱ्या अमेरिकन ड्रीममधला फोलपणा जाणवला. मग वेगवेगळ्या वाटा धुंडाळत तो यूएन, युनेस्को, यूएस एड वगैरे करत करत हार्वर्ड युनिव्हर्सिटीत गेला. हळूहळू त्याला मोठमोठे उद्योगपती, अजस्त्र कंपन्या, सरकारं, सैन्यदलं, मोठमोठ्या एनजीओज, शिक्षणसंस्था हे सगळे कसे हातात हात घालून राज्यकर्ती व्यवस्था उभी करतात हे कळलं. श्रीमंत अधिक श्रीमंत होऊन गरीब अधिकाधिक गरीब कसे होत जातात हे कळलं आणि मग धडपड सुरू झाली ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची. त्यासाठी मनीषभैय्या त्याच्या आजीच्या घरी म्हणजे उदयपूरला परत आला. तिथे कळलं की त्यांच्या अशिक्षित आजीला पर्यावरणाची हानी न करता, अवतीभवतीच्या समाजाशी एकरूप होऊन, आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्याचं, हार्वर्डसारख्या शैक्षणिक संस्थांपेक्षा कितीतरी अधिक ज्ञान आहे!

मग मनीषभैय्या, लहानपणापासूनच भारतीय प्रशासकीय सेवेतले गुणदोष जवळून पाहिलेली विधी, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले पाकिस्तानातील आसिफ रिझवी अशी काही मंडळी एकत्र जमली आणि त्यांनी १९९८ मध्ये उदयपूरला 'शिक्षांतर'ची स्थापना केली. त्यातच महात्मा गांधींचं 'हिंद स्वराज' हे पुस्तक ह्या तरुणांच्या हातात आलं आणि 'स्वराज' म्हणजे नक्की काय व ते कसं प्रत्यक्षात आणायचं ह्यावर मंथन सुरू झालं. अगदी नकळत्या वयापासून मुलांना ह्या यंत्रणेचा भाग बनवणारी कारखानदारी पद्धतीची शिक्षणव्यवस्था मुक्त विचारांना आणि सृजनतेला घातक आहे हे त्यांच्या लक्षात आलं. अशा शिक्षणाच्या एकाधिकारशाहीला पर्यायी स्वशिक्षणाच्या विविध मार्गांचा शोध घेतला गेला व कोणत्याही प्रकारच्या स्कूलिंगच्या विरुद्ध उभी ठाकलेली एक लर्निंग सोसायटी जन्माला आली. नवनवे प्रयोग सुरू झाले. समविचारी लोकांना एका व्यासपीठावर आणणारी पहिली लर्निंग सोसायटीची अनकॉन्फरन्स २००२ साली उदयपूरला भरली तेंव्हा मुख्यतः भारतातले व काही भारताबाहेरून आलेले असे साठ जण एकत्र जमले होते. यंदा ती संख्या जवळपास आठशेपर्यंत गेली होती.

यंदाचं LSuC राजस्थानातील सरदारशहर येथील 'गांधी विद्या मंदिर'च्या अवाढव्य कॅम्पसमध्ये पार पडलं. नेहमीप्रमाणेच हा एक जिवंत आणि रसरशीत अनुभव होता. खरं तर कोरोनाच्या आकस्मिक आगमनामुळे ह्यावेळी LSuC रद्द होते की काय अशी भीती वाटत होती व तशी नोटीसही जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजकांना दिली होती; परंतु सर्वांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची समजूत काढल्यानंतर परवानगी मिळाली आणि पहिल्याच दिवशी बघता बघता असा काही माहोल तयार झाला की 'करोना'चं रूपांतर 'करुणा' मध्ये केंव्हा झालं कळलंच नाही.

LSuC चं सगळ्यांत महत्वाचं तत्त्व म्हणजे 'स्वराज'. स्वराज म्हणजे स्वातंत्र्य आणि जबाबदारी. इतर कुणाचं नाही तर स्वतःचं राज्य. स्वतःशी संबंधित गोष्टी - म्हणजे काय खावं, कधी खावं, काय करावं किंवा करू नये, केंव्हा झोपावं, केंव्हा गावं ,केंव्हा नाचावं हे सगळं तर स्वतः ठरवायचंच पण जेंव्हा समाजाशी संबंधित असेल तेंव्हाही आपणच समाजाचा भाग बनून ठरवायचं. LSuC चे आयोजक आणि सहभागी ह्यातला फरक तसाही कळत नाहीच. त्याचं कारण मुळात तो असूच नये आणि प्रत्येकानेच 'स्वराज' अनुभवावं म्हणूनच चाललेला हा सगळा खटाटोप. तिथली सगळी व्यवस्था पाहणे, जेवण वाढणं, स्वच्छता, टापटीप, सर्वांसाठी सुरक्षित अवकाश निर्माण करणं, आपल्या स्वतःच्या सामाजिक वर्तनाची जबाबदारी स्वतः घेणं, तिथे चालू असलेल्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेणं हेही आपलं आपणच करायचं आणि मनापासून करा यचं असेल तेंव्हाच करायचं, फार 'लोड' घ्यायचा नाही. झेपेल तेवढं व आवडेल तेवढं व ते ते करायचं.

शिक्षांतर आंदोलनाचं आणि स्वराज युनिव्हर्सिटीचं वैशिष्ट्य असं आहे की  इथे एखादी गोष्ट समजवण्यासाठी शक्यतो व्याख्यान दिलं जात नाही. जे काही शिकायचं ते प्रत्यक्ष जगण्यातून, अनुभवातून. साचेबद्ध यंत्रणेतून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे सहजपणे जमणं कठीण असतं आणि यंत्रणेच्या जोखडातून मुक्त होण्याचा प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळ्या टप्प्यावर असतो. मग 'स्वराज' चा व्यापक अर्थ हळूहळू उकलावा म्हणून काही खेळ, गोष्टी, चर्चा, उपक्रम घेतले जातात. छोट्याछोट्या गोष्टी व उदाहरणांमधून स्वराजची संकल्पना उलगडत जाते तेंव्हा कळतही नाही की आपण काहीतरी भव्य दिव्य अनुभवत आहोत.

अशीच आणखी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे गिफ्ट इकॉनॉमी किंवा गिफ्ट कल्चर. हा शिक्षांतरने भांडवलशाहीला दिलेला पर्याय. म्हणजे कोणत्याही गोष्टीची पैशामध्ये ठराविक किंमत नाही. समजा कोणी एखादी वस्तू किंवा सेवा आपल्याला पुरवली तर ते त्या व्यक्तीने आपल्याला दिलेलं गिफ्ट. मग आपणही आपल्या क्षमतेनुसार आणि मनापासून आवडेल असं गिफ्ट त्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या कुणाला द्यायचं. आपलं गिफ्ट दुसरी एखादी वस्तू, सेवा किंवा पैसे असू शकतात. म्हणजे एरवी फक्त आर्थिक व्यवहारापुरता असलेला संबंध मैत्रीच्या धाग्याने बांधला जाईल. जेव्हा आपल्या आजूबाजूचे आपल्या वर्तुळातले बरेच लोक अशा पद्धतीने काम करतील तेव्हा सर्वांच्याच गरजा पूर्ण होतील हा विश्वास म्हणजे गिफ्ट कल्चरचा पाया. मान्य की मोठ्या स्तरावर हे राबवणं कठीण होऊ शकतं पण स्थानिक छोट्या वर्तुळात गिफ्ट कल्चरमुळे पैशावरचं अवलंबित्व कमी होईल व त्यामुळे पैशाच्या मागे धावणंही कमी होऊन जाईल आणि मग आपसूकच 'जगणं' सुरू होईल! आपल्या खेड्यापाड्यांमध्ये हे सगळं हजारो वर्षांपासून चालत आलेलं आहे. फक्त नजीकच्या काळात भांडवलदारीच्या प्रभावामुळे आपण विसरून गेलोय.

'दर्या दिल दुकान' हे आणखी एक अनुभवावं असं प्रकरण. आपल्या नकळत आपण अनेक वस्तूंचा संग्रह करत असतो. कधीकधी तर नुसता मोठेपणा मिळवण्यासाठी. कालांतराने त्या आपल्याकडे आहेत हेही आपण विसरून जातो आणि नवनवीन वस्तू, उपकरणं, गॅजेट्स घेत राहतो. हाच हव्यास भोगवादावर आधारित भांडवलशाही मजबूत करतो. 'दर्या दिल दुकान'मध्ये आपल्याकडच्या प्रत्येक वस्तूबद्दल विचार करायचा. आपल्याकडची वस्तू आपण विनाकारण घेऊन ठेवलीय आणि आपल्यापेक्षा दुसऱ्या कुणाला तरी ती जास्त उपयोगी पडू शकत असेल तर अशी वस्तू आपण 'दर्या दिल दुकाना'त ठेवायची. तसंच तिथे असलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू आपल्या खरोखरच उपयोगाच्या असतील तर ती किंवा त्या वस्तू घ्यायच्याही. ह्या वस्तूंमध्ये काहीही असू शकतं - कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सायकल, फोन काहीही. एकही रुपयाचा व्यवहार नाही. फक्त मनाची दर्यादिली!

LSuC च्या पाच दिवसांत रुटीन आणि कंपल्सरी काहीही नसलं तरी प्रत्येक दिवशी साधारण १० वाजेपर्यंत नाश्ता झाला की एक ओपनिंग सर्कल घेण्यात येतं ज्यात वेगवेगळी समूह नृत्यं किंवा सामूहिक खेळ घेतले जातात. मग छोटे छोटे ग्रुप्स बनवून काही हलक्याफुलक्या किंवा खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जेणेकरून जे नवखे आहेत ते सर्वांमध्ये हळूहळू मिसळतील आणि नकळत सर्वांमध्ये संघभावना निर्माण होईल. तसंही वातावरण एवढं मोकळं असतं की इथे पाय ठेवल्यापासून आपण आपल्या जवळच्या लोकांमध्ये आलोय असं वाटायला लागतं. खेळत, नाचत, गात किंवा गप्पा ठोकत असलेल्या कुठल्याही ग्रुपमध्ये आपण नकळत मिसळून जातो. जवळजवळ दिवसभर मैदानात कोण ना कोण खेळत असतंच. मग ते फ्रीस्बि असो, व्हॉलीबॉल असो, किंवा फुटबॉल. काहीजण स्केटिंग करत असतात तर काही वेव्हबोर्डिंग. काहीजण नुसतेच झाडाखाली पुस्तक वाचताना दिसतात तर काही चक्क झोपलेले.

त्यानंतर ११ ते १.३०, ३ ते ४.३० व ५ ते ६.३० हे ओएसटीसाठी. ओएसटी म्हणजे ओपन सेक्रेड ट्रेजर्स. ह्यामागची कल्पना अशी आहे की प्रत्येकाकडे शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी काही ना काही असतंच. तेव्हा ज्याला कुणाला एखादा विषय समजवायचाय तो विषय आणि ठिकाण इ. LSuC च्या मुख्य कॅनव्हास वर चिकटवायचं आणि मग त्या ठरलेल्या वेळी त्या ठिकाणी 'झाडासारखं' उभं राहायचं. मग ज्याला तो विषय समजून घ्यायचाय त्यांनी ठरलेल्या वेळी तिथे जायचं. समजा एखाद्या सेशनला तुम्ही गेलात आणि तुम्हाला ते नाही पटलं किंवा दुसरं काही करावसं वाटलं तर इतरांना डिस्टर्ब न करता 'मधमाशी'सारखं उठायचं आणि दुसरीकडे जायचं. असे कितीही सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता. एकही करायचं नसेल तर 'फुलपाखरासारखं' इकडेतिकडे भटकायला किंवा कुणाशी गप्पा मारायला मोकळे. कुठलीही जागा सेशन घ्यायला वर्ज्य नाही. एखाद्या झाडाखाली, पुतळ्याच्या बाजूला, टेंट एरिया, स्टेज, हॉलमधला एखादा कोपरा, मैदान कुठेही तुम्ही जमू शकता. एखादं मेडिटेशन किंवा नाच किंवा इतर काही घ्यायचं असेल तर ऑडिटोरियम किंवा वर्गही उपलब्ध असतात. एखाद्या लहान मुलापासून वयोवृद्ध आजोबांपर्यंत कुणीही ओएसटी घेऊ शकतो. कोणत्या वेळी घ्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणजे दिवसाच्या २४ तासात कधीही कुठलंही सेशन असू शकतं.

ह्यावर्षी मी अटेंड केलेल्या एका सेशनमध्ये सर्वांचे डोळे कापडी पट्टीने बांधले आणि आधी एका मोठ्या हॉलमध्ये व नंतर एका रूममध्ये सर्वांना नेलं गेलं. काहीही बोलायला मनाई होती. मग मधूनमधून विविध ठिकाणांहून पैंजण, ड्रम, ढोल, टाळ्या, बासरी एवढंच नव्हे तर किंचाळयांचे आवाजही येत राहिले. मधेच सुगंध यायचा, चेहऱ्यावर पाण्याचा स्प्रे मारला जायचा असं काहीही व्हायचं. आवाज रात्री साडेबारा वाजता सुरू झाले ते रात्री अडीच-तीन वाजेपर्यंत. सेशन चालू असतानाच अटेंड करणारे अनेक जणच नव्हे तर चक्क सेशन घेणाराही झोपून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सेशन घेणाऱ्याला विचारलं तर म्हणे हीच तर कल्पना होती की विविध आवाज आणि अनुभव डोळे बंद करून घेत रहायचे, दृष्टी सोडून बाकी चारही ज्ञानेंद्रियांवर लक्ष केंद्रित करायचं आणि ध्यान करत करतच झोपून जायचं!

एका संध्याकाळी UnTalent Show असतो ज्यात कुणीही काहीही सादर करू शकतो. गाणी, खेळ, विनोद, सर्कस, कसरत काहीही. ह्यावर्षी एका तीन चार वर्षाच्या मुलाने 'मेरे सपनोंकी रानी' अशा काही स्टाइलने गायलं की सगळ्यांची हसून हसून पोटं दुखली. एका संध्याकाळी 'LSuC मेला' असतो ज्यात टॅटू, खाण्याचे पदार्थ, कार्टून, खेळणी, हस्तकलेच्या वस्तू असं काही विकून पहायचं असेल, खेळ घ्यायचे असतील, फेस पेंटिंग करायचं असेल, स्वतःचे काही प्रॉडक्ट्स दाखवायचे असतील किंवा एखादी नवी संकल्पना आजमावून पहायची असेल तर ते करू  शकतो.

कुणाच्या गप्पा कुठे रंगतील त्याचा काहीच नेम नाही. जेवणाचं ताट हातात घेऊन किंवा मैदानात, स्टेजवर, एखाद्या झाडाखाली, कुठल्यातरी कोपऱ्यात किंवा तंबूत. चहाची टपरी आणि रात्रभर चालू असलेली शेकोटी तर सगळ्यांची हक्काची जागा. कधी कोण कुठलं स्वतःच्या जगण्यातून आलेलं वाक्य असं सहज सांगेल आणि आपल्याला हलवून सोडेल सांगता येणार नाही. माणसं सतत एकमेकांशी बोलत असतात. कहाण्या तर प्रत्येकाच्या अशा की अशी माणसं असतात कुठे असा प्रश्न पडावा. कुणी न्यूयॉर्कमधलं फॅशन डिझायनिंग सोडून जग भटकत असतं किंवा कुणी एकही रुपया, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स न घेता गावागावांतून प्रवास करत असतं. कुणी दिल्लीतल्या झोपडीत राहून फिल्म्स बनवत असतं तर कुणी खादीचे कपडे शिवत असतं. कुणी हजारो वर्षांपूर्वीचे औषधोपचार शोधत आयुष्य वेचलेलं असतं तर कुणी एखाद्या नृत्यप्रकारासाठी झोकून दिलेलं असतं. कुणी मुलगी वयाच्या १७-१८ व्या वर्षापासून जगभरातल्या विविध देशातले पारंपरिक मसाज शिकत फिरत असते तर कुणी LGBTQ च्या हक्कांसाठी व्यवस्थेशी भांडत असतं. मनीष नावापासूनच 'फ्री मॅन' असलेला स्पर्धाविरहित खेळ शिकवत भारतभर फिरत असतो आणि तेही निव्वळ गिफ्ट कल्चरने. सायनमधल्या एखाद्याने चारजण जमवून फक्त कबीराचे दोहे गाणारा बँड बनवलेला असतो. एखादा धनवंत असो वा फकीर, लेखक असो वा डॉक्टर, पत्रकार असो वा शेतकरी, सैन्याधिकारी असो वा राजकारणी, उद्योजक असो वा समाजसेवक - इथे सगळे सारखे. आपापल्या पदव्या, पदं, पदकं सगळं काही सोडून आलेले. मानव ही एकमेव ओळख सांगणारे आणि मानवता हा एकमेव धर्म मानणारे.

जेंव्हा अशा वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या एवढ्या मोठ्या समूहात असतो तेंव्हा शिकणं फक्त काही ठराविक वेळात आणि पद्धतीने होणं शक्यच नसतं. ते सतत होत असतं, गप्पांमधून, गाण्यांमधून, खेळांमधून. बरं कोणावर कशाचा कसा परिणाम होईल हे सांगणं कठीण आहे. वुड आर्टिस्ट असलेल्या आणि आधीच सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरचा जॉब सोडलेल्या वीरेनला जेंव्हा LSuC बद्दल विचारलं तेंव्हा त्याने एका वाक्यात सांगितलं. 'LSuC ने माझं आयुष्य सोडून फार काही बदललं नाही'! एमबीए करत असलेल्या गौरीला हा तिच्या आयुष्यातला 'क्रेझीएस्ट' अनुभव वाटला तर मुलीचं अनस्कूलिंग करणाऱ्या श्रद्धाला ही अशी जागा वाटली जिथे तुम्ही स्वतःला आणि स्वत:मधल्या सर्वोत्तमाला ओळखू शकता. साठी पार केलेल्या सुनीताचा पहिलाच अनुभव त्यांना माहेरी आल्यासारखा वाटला. समवयस्क तर सोडाच पण तीनचार दशकं कमी वयाच्या अनेकांशी झालेली मैत्री त्यांना आयुष्यभर जपून ठेवावी अशी वाटते. ऑडिओलॉस्ट आणि स्पीच थेरपिस्ट असलेल्या रसिकाने LSuC चं सारच 'थ्री इडियट' च्या रँचोच्या भाषेत सांगितलं, 'चारों तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो'!

इथला माहोल इतका खरा, इतका मोकळा असतो, की गडगडाटी हास्याचे फवारे ज्या सहजतेने उडतात त्याच सहजतेने गालांवर किंवा दाढ्यांवर अश्रूही ओघळत असतात आणि कुणालाच त्याचं काहीही वाटत नाही. स्त्री असो वा पुरुष, मूल असो वा वृद्ध प्रत्येकजण आतून आपल्यासारखाच आहे हे अद्वैत नकळत उमगतं. स्त्री-पुरुष मोकळ्या मनाने आणि दोन्ही हात पसरून एकमेकांना जादूची झप्पी देतात तेंव्हा त्यात वासनेचा लवलेश नसतो आणि त्याच वेळी कुणी आवडलं तर त्याला किंवा तिला तसं स्पष्ट सांगणं आणि त्या भावनांचा हसून स्वीकार करणंही सहज घडत असतं.

एरवी सगळ्या रुढी-परंपरांना आणि प्रथांना धक्के देणाऱ्या ह्या वातावरणात शेवटच्या दिवशी एक विधी मात्र आवर्जून केला जातो आणि तो म्हणजे appreciation circle. ह्यात एका सर्कलमध्ये खुर्च्यांवर काही जणांना बसवून त्यांचे डोळे रुमालाने बांधले जातात आणि मंद संगीताची सुरावट वाजवली जाते. त्यानंतर इतरांनी मागून त्यांच्या कानात हळूच त्यांच्यातलं काय आवडलं ते सांगायचं. आळीपाळीने आपल्याला ज्यांच्याबद्दल जे काही सांगायचंय ते सांगायचं. आधी बसलेल्यांचं झालं की त्यांची जागा दुसरे घेतात. आपण सगळे appreciation साठी, प्रेमाच्या काही शब्दांसाठी किती आसुसलेले असतो हे ह्यात कळतं. ही फक्त दहा मिनिटे आपल्याला दहा हत्तीचं बळ देऊन जातात. कितीतरी जण तृप्ततेने आणि कृतज्ञतेने ढसाढसा रडतात. हे असं भरलेलं मन घेऊन आपापल्या वाटेला लागतात ते नवी स्वप्नं, नवा विश्वास घेऊन. ह्या LSUC मधून घेतलेलं कृतीत आणायचा निश्चय करून पुन्हा नवीन अनुभव, यशापयश गाठीशी बांधायला व पुढच्या LSUC त सर्वांसोबत वाटायला...

समीर अधिकारी

sameer@adhikari.co.in