बदलत्या काळातील स्त्री-पुरुष संबंध

भारतात स्त्री-पुरुष नातं म्हणजे पती-पत्नीचं नातं असंच रूढार्थानं समजलं जातं. त्याअर्थी ह्या नात्याला दिलेलं ते सामान्य नामच म्हणायचं! आणि पती-पत्नीचं नातं म्हणजे निरोगी, सुदृढ पुरुष-स्त्री नातं असं विधान करणं धाडसाचंच होईल! किंबहुना बहुतांशी लग्नात वैवाहिक नातं आणि स्त्री-पुरुष निकोप नातं यांची फारकतच होताना दिसते. स्त्री-पुरुष नात्याला अशा पद्धतीने पती-पत्नी नात्यात बद्ध केल्यामुळे आणि त्याला एक सामान्य नातं करून टाकल्यामुळे, विविध प्रकारच्या निकोप स्त्री-पुरुष नात्यांकडे एक समाज म्हणून आपण आजही बघू शकलेलो नाही. स्त्री-पुरुष नात्यात एक निकोप मैत्र असू शकतं, सख्य असू शकतं, हे आजही आपण समजून घेऊ शकलेलो नाही. त्यामुळे ह्या नात्याला एक तर प्रेमसंबंध/अफेअर (प्रेम'प्रकरण’ म्हणून त्याची आणखी अवनती करायची) नाहीतर वैवाहिक नातं यात अडकवून टाकायचं! थोडक्यात कुठल्या तरी समाजमान्य चौकटीत! प्रेम ‘प्रकरण’ही चौकटीत बसणारं हवंच - म्हणजे जातपात, शिक्षण, पैसा, प्रतिष्ठा इ.च्या चौकटी आणि पुढे जाऊन त्याचा शेवट एकमेकांशी लग्न करण्यात झाला की सुटकेचा नि:श्वास!

आता तुम्ही म्हणाल, काळ बदललाय की! हल्ली बर्‍याचशा तरुण मुलामुलींची सर्रास ‘अफेअर्स’ आणि ‘ब्रेक-अप्स’ होत असतात; चौथी-पाचवीपासून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असतात. खरं तर आपल्या वैचारिकदृष्ट्या ‘उपर्‍या’ आणि दिखाऊ समाजात ‘बोल्ड’ झालेल्या मुलामुलींनी ह्याबाबतीतला ‘चॉईस’ ठेवला आहे का पालकांना? ते प्रयत्न करून बघतातच. पण मुलं आता त्यांच्यापेक्षा हुशार झाली आहेत. ‘दडपशाही’ला जुमेनाशी झाली आहेत. म्हणजे मुलं करतात ते बरोबर वा चूक ह्याबद्दल आपण बोलत नाही, तर जे घडतंय ते स्वीकारण्याशिवाय त्यांनी पालकांपुढे फार काही पर्याय ठेवलेला नाही. भिन्नलिंगी नैसर्गिक आकर्षण वाटण्याचं वय कमी-कमी होत चाललं आहे. एकीकडे ह्या आकर्षणाच्या शास्त्रीय आणि परिपूर्ण माहितीचा अभाव, तर दुसरीकडे अनेकविध समाजमाध्यमांतून सहजी उपलब्ध होणार्‍या आणि अयोग्य पद्धतीने भावना चाळवणार्‍या माहितीची विविधता. त्यामुळे सगळीच ‘बे घडी गंमत’ होऊन बसली आहे!

लहान वयामुळे परिपक्वतेचा अभाव आणि वास्तवातील परिपक्व स्त्री-पुरुष नात्याच्या अनुभवाचा, एक्सपोझरचा तर त्याहून अभाव. त्यामुळे निकोप स्त्री-पुरुष नातं आकळण्याचा प्रवास लहान वयातच खुंटतो. वाढत्या वयाबरोबर ‘स्व’ समजण्याच्या आणि ‘पीअर प्रेशर’ हाताळण्याच्या ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार, क्वचित उपजत परिपक्वतेनुसार, वेगवेगळे प्रयोग होत राहतात; पण क्वचितच ह्या नैसर्गिक आकर्षणाला निकोप स्त्री-पुरुष नातं उमजण्याची वैयक्तिक प्रगल्भता लाभते. तरुण मुलामुलींना असे निकोप स्त्री-पुरुष संबंध समजण्याकडे नेणारी वाट दाखवण्यात, किंबहुना मुळात ती निर्माण करण्यात, आपला समाज अपयशी ठरला आहे. त्यामुळे ‘करून करून भागले आणि देवपूजेला लागले’ ह्या उक्तीनुसार आपल्याकडील बहुतेक तरुण मंडळी प्रेम, अफेअर वगैर होऊन शेवटी बहुतेकदा विवाहमंडळातून स्थळ पसंती होऊन, ‘संसाराला’ लागतात! जोपर्यंत आपल्या विवाह आणि कुटुंबसंस्थेची आपण झाडाझडती घेत नाही, कालौघात पडझड झालेल्या ह्या संस्थेच्या इमारतीचे पुननिर्माण (आजच्या शब्दांत ‘री-डेव्हलपमेंट’) करत नाही, त्यात समता, उदारता, सहिष्णुता ही स्त्री-पुरुष नातेसंबंधातील महत्त्वाची मूल्यं रुजवत नाही, असं काही न रुजवण्यात आपल्याला काही गैर वाटत नाही, तोपर्यंत नुसत्या राहत्या घरांचीच फक्त ‘री-डेव्हलपमेंट’ होत राहील. अधिक मोठ्या, सजवलेल्या, आधुनिक, दिखाऊ ‘फ्लॅट्स’मध्ये राहायला लागल्यामुळे स्त्री-पुरुष नातं सुधारणार नाही. त्यासाठी आपण आपलं मन उदार, मोकळं, विशाल, आधुनिक विचारांचं आणि पारदर्शक केव्हा बनवणार, हा प्रश्न आहे. परंतु ‘स्थळ’ निवडताना मुलंमुलीही घरातील माणसांऐवजी ही घरंच बघतात आणि नंतर मात्र बदलत्या काळातील समानतेच्या नात्याची अपेक्षा करतात! हे कसं शक्य आहे? मग अपेक्षाभंगाची वाट मतभेद, भांडणं, फारकत अशी जात राहते आणि मूळ प्रश्न अनुत्तरितच राहतो. वर उलट घटस्फोटांच्या वाढत्या संख्येबद्दल ओरड होत राहते. त्यासाठी बहुतेकदा ‘हल्ली’च्या मुलींना दोष दिला जातो. मात्र दोषारोपाने कुठलेच प्रश्न सुटत नसतात.

काळ बदलला म्हणजे नेमकं काय झालं? काळ पुढे-पुढे जात राहिला, जो जात राहणारच असतो. आम्ही बदललो म्हणजे काय झालं? तर वरवरचे, दिखाऊ असे सारे बदल आम्ही केले. कपड्यांपासून ते, ते कपडे मॉलमध्ये खरेदी करेपर्यंत. कारण आता आमच्या हातात पैसे आले. ते तसे यावे, हाच गेली तीस-एक वर्षं शिक्षणाचा उद्देश बनला. परंतु आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यानुरूप होणार्‍या वर्तनाची, म्हणजेच एक ‘माणूस’ म्हणून स्वत:ची ओळख कशी करून घ्यायची हे शिक्षण कुठेच दिलं जात नाही. तसंच, आपल्या भावना ओळखण, त्यांचं नियमन करणं हेही क्वचितच शिकवलं जातं. ज्या नात्यांवर त्या भावना थेट परिणाम करतात त्या नात्यांचं व्यवस्थापन मग कसं जमणार? तसंच आजच्या काळात अत्यावश्यक बनलेलं, दोघांनी मिळून करायचं गृहव्यवस्थापन आणि त्यासाठी करायचं स्त्री-पुरुष पारंपरिक भूमिकांचं वैचारिक आधुनिकीकरण, ह्यातलंही काही आपण शिकलो नाही. किंबहुना आजही काही अपवाद वगळता, बहुतांशी विवाहेच्छू मुलं आणि त्यांच्या पालकांना त्याची जाणीवही नाही. हा सगळा अनुल्लेखाने मारायचा विषय! शिवाय सशक्त स्त्री-पुरुष नात्याच्या ताकदीबद्दल, सौंदर्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या पालकांचं मुलांच्या लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेवर वर्चस्व!! ह्याचं एक महत्त्वाचं कारण पारंपरिक, मळलेले रस्तेच चालत राहण्याची वृत्ती हे जसं आहे, तसंच स्त्री-पुरुष ह्या नैसर्गिक नात्याला असलेल्या शास्त्रीय पायाबद्दलचे अज्ञानही. त्याच्या बरोबरीने, जगण्याच्या सर्वच क्षेत्रात सरासरी असण्याची, स्यूडो सामाजिक सुरक्षिततेच्या आकर्षणापायी प्रवाहपतित होण्याची मानसिकता. सरासरीचा कौल हाच सकारात्मक असतो; काहीही वेगळे, निराळे ते नकारात्मकच असणार, अशा झापड लावलेल्या मानसिकतेमुळे आपलं वेगळेपण शोधून, स्वीकारून ते व्यक्त करण्याची सतत भीती, धास्ती.... यापायी वाटणारी चिंता, येणारा ताण! मग क्षेत्र कोणतंही असो. शिक्षण कितीही असो. आपण वेगळा, स्वत:चा स्वतंत्र विचार करणार कसा? त्या वेगळ्या विचारांचा मागोवा कृतीशील बनून जगण्यात घेणार कसा? प्रयोगशील, सर्जनशील, निर्मितीक्षम बनण्यासाठी आपण धडपडणार कधी? अंधानुकरणात धन्यता मानणार्‍या अशा आपल्या सामाजिक व्यवस्थेत स्त्री-पुरुष नातं हे पार आवळलं नि कोंडलं गेलेलं आहे!

खरं तर पृथ्वीतलावरचा मानव हा एकमेव प्राणी नाती निर्माण करतो. उत्क्रांतीमध्ये विकसित झालेल्या मेंदूमुळे (pre-frontal cortex) त्याला विचारक्षम बनण्याचं वरदान लाभलं. त्याचा उपयोग करूनच त्याने आजवरची एवढी भौतिक प्रगती साधली. परंतु त्यामुळे तो शांत, निवांत, समाधानी झाला का? ही प्रगती आपल्या समाजाने अभ्यासासाठी, त्यांचा शास्त्रीय पाया समजून घेण्यासाठी किती वापरली? खरं तर महर्षी वात्स्यायन, राजवाडे, भागवत ह्याच समाजात निर्माण झाले व त्यांनी ह्या क्षेत्रात डोंगराएवढं काम केलं. परंतु आजही आपल्या समाजात मानसशास्त्र आणि स्त्री-पुरुषांमधील नातं हा विषय इतका उपेक्षित आहे की, माणूस म्हणजे जणू नुसतं शरीर! पण ह्या शरीरात एक मनसुद्धा असतं आणि शरीरावर बरे-वाईट परिणाम करणार्‍या त्या मनात काय काय घडत असतं - शरीरशास्त्र, मानसशास्त्र, वंशशास्त्र, मेंदू ह्या सर्व पातळ्यांवर... ह्याचं ज्ञान आपण करून घेत नाही. सामाजिक प्राणी असलेल्या माणसाचा मेंदू हा स्त्री-पुरुष साहचर्यासाठी (कम्पॅनियनशिप, लग्न नव्हे) आरेखित आहे. अशा साहचर्यात अनेक संप्रेरकं स्रवतात जी माणसाला, पर्यायाने स्त्री-पुरुष नात्याला शरीर, मन व विचाराने सुदृढ ठेवतात. ह्याची कोणतीच जाणीव आपल्याला नसते. ‘सिर सलामत तो पगडी पचास’ ही म्हणही मग आपण फक्त शारीरिक आरोग्यासाठी वापरतो. आपल्या मानसिक-भावनिक आरोग्यासाठी नाही. त्यातही स्त्री-पुरुष नात्यामध्ये तर सार्‍याच भावना अव्यक्त! अगदी नवरा-बायकोच्या नात्यातसुद्धा! कारण त्या मोकळेपणाने व्यक्त करण्याची चोरी वाटते. त्यामुळे आपल्या विवाहसंस्थेतील स्त्री-पुरुष नातं हे संसार करणं आणि प्रजोत्पादन ह्या साच्यात अडकलं....अडकवलं गेलं. सारा प्रणय पुस्तक आणि सिनेमा ह्यातच. नव्याची नवलाई फक्त हनीमून काळात. नैसर्गिक साहचर्याच्या गरजेची, त्यामागच्या शास्त्रीय कारणांचीच जिथे जाणीव नाही, तिथे वैवाहिक नात्यातील असं साहचर्य निर्माण करणार्‍या भावनिक, वैचारिक, लैंगिक शेअरिंगची, देवाणघेवाणीची कुठे जाणीव असणार? त्यामुळे अनेक अतृप्त मनं आणि वंचित शरीरं तयार होतात. ह्या नैसर्गिक ऊर्मींना कसं आणि किती काळ दाबून ठेवणार? त्याचे परिणाम सगळीकडे उमटत राहतात. अशा वंचित स्त्री-पुरुषांची, नवरा-बायकोंची नाती रोगट होत जातात. मग माणसं समाधान शोधण्याचे, ह्या नैसर्गिक भावनिक-वैचारिक-लैंगिक गरजा पूर्ण करण्याचे वेगवेगळे मार्ग, पर्याय शोधायला लागतात. हे पर्याय सशक्त असतील तर माणसं विचारी, परिपक्व निर्णय घेतात. परंतु इतकी परिपक्वता, वैचारिक आणि भावनिक ठामपणा, काहीसं धाडस, किती जणांमध्ये असतं? त्यातून स्त्री-पुरुष संबंध म्हणजे लपवण्याचा, व्यक्त न होण्याचा विषय. मग ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार माणसं जे पर्याय शोधतात ते नेहमीच सशक्त असतातच असं नाही. मग ते विवाहबाह्य नातं (संबंध नव्हे!) असो वा घटस्फोटाचा स्वीकारलेला पर्याय. हे निर्णयही सुखावह ठरतातच असे नाही. त्यामुळे एकूणात स्त्री-पुरुष संबंध हे भरकटलेले, दिशाहीन आणि आनंदापेक्षा असमाधान देणारेच जास्त राहतात. त्यात मोबाइल ह्या यंत्राने ते अत्यंत उथळ आणि बेजबाबदार बनवायला आयता हात लावला आहे.

खूप वर्षांपूर्वी ‘साथ-साथ’च्या एका सभेत विद्याताई म्हणाल्या होत्या, "प्रत्येक नवर्‍याला एक हक्काची, चांगली मैत्रीण असेल आणि बायकोला असाच एखादा भावनाशील मित्र असेल तर पतीपत्नीचं वैवाहिक नातं सशक्त राहील; कारण पन्नास-एक वर्षांच्या ‘24 बाय 7’ ह्या ‘टू क्लोज फॉर कम्फर्ट’ ह्या नात्यात आपल्या भावनिक-वैचारिक गरजा नवरा वा बायको या एकाच व्यक्तीकडून पूर्ण होतील, हे संभवतच नाही." मग अपेक्षापूर्तीचा आग्रह-अट्टाहास किंवा अपेक्षाभंगाचं दु:ख-वेदना त्या पती-पत्नी नात्याला काळवंडून टाकतात. तरीही ते नातं छान असल्याचं सगळ्यांना भासवण्यासाठी वेळोवेळी जे मुखवटे घालावे लागतात, त्याचा वेगळाच ताण दोघांवर येतो. पुन्हा ते ताण मग एकमेकांवर राग, चिडचिड, आरोप - प्रत्यारोप, भांडण या रूपाने व्यक्त होत राहतात (manifestation). ह्या सगळ्यामध्ये मग स्त्री-पुरुष नात्यातील तरलता, संवेदनशीलता अक्षरश: करपून किंवा वितळून जाते. प्रत्येक भांडणनाट्यानंतर मागे राहणाऱ्या ओरखाड्यांमुळे नातं कोरडं होत जातं. ‘बाहेर पडायचं नाही, म्हणून आत राहायचं’, अशा विचारांची, स्वत:ची फसगत करत राहणारी शेकडो जोडपी आजूबाजूला बघायला मिळतात. समुपदेशकांना भेटून गेलेली जोडपी लग्नात नटूनथटून मिरवताना दिसतात, तेव्हा हसावं की रडावं कळेना होतं. ह्या फसव्या, दिखाऊ, खोट्या जगाचं प्रकटीकरण मग समाजाच्या बदलत्या चित्रात पाहायला मिळतं! दिवसागणिक वाढत जाणारी घटस्फोटांची संख्या (कुटुंब न्यायालयाची आकडेवारी बघावी), ह्या केसेसमध्ये पन्नाशी-साठीनंतर (म्हणजे संसाराची जबाबदारी-मुलाबाळांची लग्न वगैरे पार पडल्यानंतर) घटस्फोटासाठी अर्ज केलेल्यांची वाढती संख्या आणि खूप प्रमाणात वाढलेली विवाहबाह्य नाती ह्यातही त्याची प्रचिती दिसते. अनेकांच्या म्हणण्याप्रमाणे तर दिसतंय त्यापेक्षा बरंच काही दडलंय; आज जर अशी उद्घोषणा झाली की, ‘घटस्फोटांचं स्वागत आहे. निर्जीव झालेल्या नात्यांमध्ये राहण्याची सक्ती नको,’ तर मोठ्या प्रमाणावर जोडपी लग्नातून बाहेर पडतील! हे बर्‍याच प्रमाणात खरंही आहे. पूर्वीच्या अनेक पिढ्यांनी जी घुसमट सहन केली, सोसलं, तसं येणार्‍या पिढ्या करत राहतील, ही शक्यता कमी कमी होत जाणार. तरीही विद्याताई जे सुचवत होत्या, त्याचा स्वीकार किती जोडपी मोकळेपणाने करतील? काही वर्षांपूर्वी सुरेश खरे यांनी विद्याताईंच्या ह्याच विचाराची सत्यता पटवून देणारं, ‘संकेत मीलनाचा’ नावाचं एक अतिशय सयुक्तिक विषयावरचं नाटक लिहिलं होतं. विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस त्यात काम करायचे. दोघं एकेकाळचे एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण. लग्न दुसर्‍या कुणाबरोबर होतं. सरधोपट संसारात ते सुखी नाहीत असं नाही; पण तरीही मनाच्या एका कप्प्यातल्या गोष्टी त्यांना आपल्या जोडीदारापेक्षा एकमेकांना सांगाव्याशा वाटतात. हा किंवा ही आपल्या ह्या विचार-भावनांना अधिक योग्यपणे समजून घेईल, असं त्यांना वाटतं. त्या ओढीने ते वर्षातून एक-दोन वेळा एकमेकांना भेटत राहतात. नवरा-बायको आणि मित्र-मैत्रीण ही दोन नाती समांतरपणे आणि समतोलपणे जगणार्‍या ह्या जोडप्याचं एकूणच जीवन सुरेश खरे यांनी अतिशय मनोज्ञतेने आणि तितक्याच संवेदनशीलतेने दाखवलं होतं. हे वास्तववादी नाटक ज्या अर्थी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारलं, त्याअर्थी अनेकांना ते आपल्या जवळचं वाटलं असणार; इतकंच नाही तर आपल्याला असा एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण हवी, असंही तेव्हा अनेकांना वाटून गेलं असणार. हुरहूरही लागली असणार. ह्या नात्याला कुठेही विवाहबाह्य नात्याचं लेबल लावलं गेलं नव्हतं हे विशेष. ते बघतानाही तसं वाटलं नव्हतं! हे त्या नाटककाराचं यशच म्हणायचं.

मग आज इतक्या वर्षांनंतरही अशा सुदृढ मैत्रीकडे आपण मोकळेपणाने का बघू शकत नाही? अपुरेपणाने भरलेला असतो तो संसार, असं म्हणतात! म्हणजे वैवाहिक नातं परिपूर्ण नसतं, हे आपण मान्य करतो. मग एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक नात्यातील अपुरेपण, उणिवा अगदी सहजपणे, म्हणजे दोन माणसांचे भावनिक, वैचारिक बंध अगदी सहजपणेच जुळल्यामुळे, जर भरून निघणार असतील तर सहजी जुळलेल्या ह्या मैत्रीला आक्षेप का असावा? खरं तर स्त्री-पुरुषांमधील नैसर्गिक वैविध्यामुळे अनेकदा ते एकमेकांना पूरक बनत असतात. त्यातही त्यांच्या आवडीनिवडी समान असतील, त्यांच्या गप्पांमधून वा ट्रेकिंग, सहली, नाटक, कला, वाचन ह्यासारख्या संयुक्त उपक्रमांमधून विचारांचा आणि भावनांचा सशक्त परिपोष होत असेल, तर केवळ ती भिन्नलिंगी मैत्री आहे, म्हणून त्याला आक्षेप घेऊन आपण त्या नात्यातील सौंदर्य कुरूप करून टाकतो!

खरं तर प्रत्येकाला एक का, अनेक मित्र-मैत्रिणी असाव्यात. वेगवेगळ्या विषयांचे ग्रुप्स असावेत. त्या त्या ग्रुप्समध्ये होणार्‍या त्या त्या विषयांच्या गप्पांमुळे माणसं त्या त्या विषयात विचारांनी समृद्ध होत जातात. स्त्री-पुरुषांच्या विचार करण्याच्या पद्धतीमधील फरकामुळे, त्या त्या विषयांचे अनेक नवे आयाम दृग्गोचर होतात. स्वत:ची आणि मैत्रीची वाढ हातात हात घालून होत राहते. एकलिंगी ग्रुप्स असतील तर हे वैविध्य अनुभवता येत नाही. उदाहरणार्थ, फक्त मैत्रिणींचा ग्रुप असेल आणि विशेषत: जिथे नवनवीन उपक्रम करत राहण्याची उत्सुकता नसेल, तर त्यात एक साचेबद्धता येत राहते. अनेकदा घर, नवरा, मुलं, पाककृती आणि आपल्या व इतरांच्या कुटुंबातील घडामोडी ह्यामध्येच गप्पा फिरत राहतात. त्यात रस नसणार्‍यांना कंटाळवाण्या होत जातात. बायकांच्या भिशी ग्रुपचा विनोद सर्वश्रुत आहे. बायको लवकर घरी आल्यामुळे नवर्‍याने आश्चर्य वाटून विचारलं, ‘आज एवढ्या लवकर संपलं तुमचं गेट-टुगेदर?’ त्यावर बायको म्हणाली, ‘हो ना. आज सगळ्याच जणी हजर होत्या ना!’ (मतितार्थ - अनुपस्थित मेंबरबद्दल गॉसिप करायला वावच मिळाला नाही.)

आजही हे चित्र काही फार बदललेलं नाही. मी एका एमएनसीमध्ये काम करते. कंपनी आपल्या कर्मचार्‍यांच्या बाबतीत उदारमतवादी आहे. नोकरी देताना, तसंच पुढच्या बढत्यांमध्ये स्त्री-पुरुषांना समान संधी देण्याचा त्यांचा मनापासून प्रयत्न असतो. परंतु निवडीच्या वेळी ५०-५० टक्के असं असणारं हे प्रमाण, उच्च श्रेणीच्या बढत्या होताना दोन टक्क्यापर्यंत घसरतं. आज कंपनीच्या शंभर उच्च कर्मचार्‍यांमध्ये जेमतेम एकदोन स्त्रिया आहेत! इतक्या प्रगतीशील विचारांच्या कंपनीत काम करणार्‍या स्त्रियांची मानसिकता मी लिफ्टमध्ये अनेकदा अनुभवली आहे. सोबत पुरुष असतात ते विविध विषयांवर बोलत असतात. बहुतेक स्त्रिया मात्र सासू, मूल, कामाच्या बायका, सण-वार-उपास अशा गप्पांमध्ये रममाण असतात. नवरात्रीमध्ये नऊ रंगांचे कपडे घालून नटण्याचं व्रत अनेकजणी उत्साहाने पाळतात आणि त्याबद्दलच्या चर्चेतही रमलेल्या असतात. अशा कंपनीमध्ये स्त्री-पुरुष अत्यंत खुलेपणाने एकमेकांमध्ये मिसळता येण्याच्या संधीचा किती स्त्रिया फायदा करून घेतात? अनेकदा ह्या खुलेपणातून अफेअर्स करण्याची संधीच, विशेषत: नव्याने रूजू झालेले तरुण-तरुणी घेत राहतात; परंतु ह्यातले फारच थोडे जण (तुलनेने) पुढे जाऊन परस्परांशी लग्न करतात.

ह्याचं कारण परत एकदा आपल्या विवाहसंस्थेकडे निर्देश करतं. आपल्याकडे ‘बॉयफ्रेंड मटेरियल’ आणि ‘हजबंड मटेरियल’ तसंच, ‘गर्लफ्रेंड मटेरियल’ आणि ‘वाईफ मटेरियल’ ह्यांची सरळ सरळ विभागणी आहे. त्या निवडीचे निकष वर्षानुवर्ष ठाकून-ठोकून मनावर बिंबवले गेलेले आहेत (कंडिशनिंग). स्मिता तळवलकर यांच्या ‘सातच्या आत घरात’ ह्या जवळजवळ २५-३० वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटात हे नेमकेपणानं दाखवलं होतं. आजही परिस्थिती तशीच आहे. किंबहुना अनेक घरांमधून (विशेषत: बिगर महाराष्ट्रीय) मुलांना सांगितलं गेलेलं असतं किंवा अध्याहृत असतं की, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जी काही मजा मारायची ती मारून घ्या. लग्न मात्र आमच्या निकषात बसणार्‍या जोडीदाराशी करायचं. हे निकष इतके सर्वश्रुत आहेत की त्यावर इथे शब्द खर्ची घालण्यात काहीच मतलब नाही. 'सातच्या आत घरात' सिनेमातला तो प्रियकर तिला म्हणतो, ‘तुझं आत्ताचं हे रूप, व्यक्तिमत्त्व आवडून मी तुझ्या प्रेमात पडलो असलो, तरी लग्नानंतर तू फक्त माझी बायको राहणार नाहीस. आमच्या घरची सून होणार आहेत. त्यामुळे असं केस मोकळे सोडणं, मोटारसायकलवर दोन बाजूला पाय टाकून बसणं, मॉडर्न कपडे घालणं, मित्रांशी मोकळेपणानं बोलणं हे चालणार नाही.’

आजही आपण वरून कितीही आधुनिकतेचा आव आणत असलो, तरी आपल्या मुलीचा संवेदनशील मित्र, कवीमनाचा, निर्व्यसनी, विविध कलांमध्ये पारंगत असलेला, समाजसेवेची आवड असणारा, मदतीस तत्पर असलेला, उदारमतवादी विचारांचा वगैरे असला तरी जातीबाहेरचा, अजून स्वतःचं स्वतंत्र घर नसलेला, अमुक आकडी पगारासह ‘एस्टॅब्लिसश’ नसलेला, कौटुंबिक जबाबदार्‍या असलेला असला, तर जावई म्हणून आपल्याला तो नुसताच पसंत नसतो असं नाही तर ‘स्थळ’ म्हणूनही त्याला आपला विरोध असतो. त्यामुळे मुलं-मुली कितीही कुणाच्या प्रेमाबिमात पडली, तरी त्यांच्या मनात ही फारकत स्पष्ट असते. आणि लग्नाच्या निर्णयात ती प्रतिबिंबित होते. न झाली तर लग्नानंतर डोक्यात फिट्ट केलेल्या त्या अपेक्षा बरोबर समोर यायला लागतात नि एकेकाळी मित्रांमध्ये भाव खाऊन घेतलेली ‘गर्लफ्रेंड’ आता लवकरात लवकर ‘गृहकृत्यदक्ष पत्नी’ बनून तिने आपल्या घरात - कुटुंबात ‘अ‍ॅडजस्ट’ व्हावं, ह्या अपेक्षा सुरू होतात. मुलींना त्या जाचक वाटणं स्वाभाविक असलं, तरी त्यांनाही शांत स्वभावाची, समतोल विचार आणि नियंत्रित भावनांची, कमी बोलणारी, ‘स्मार्ट’ न दिसणारी किंवा न वागणारी मुलं ही बावळट, उमळी, ‘पुरुष’ म्हणून ‘प्रो-अ‍ॅक्टिव्ह’ नसलेली अशीच वाटलेली असतात. नाकारलेपण हे पुरुषांच्या वाट्याला येत नाही, हा आपला गैरसमज आहे. अशा ह्या सगळ्या वातावरणात आपण कुठल्या सशक्त स्त्री-पुरुष संबंधांबद्दल बोलतोय? ना ते आपल्याला प्रेमात पडलेल्यांमध्ये दिसतात, ना विवाह केलेल्यांमध्ये! विवाह नि कुटुंबसंस्थेने सर्व प्रकारच्या असमानतेची आणि ठरीव भूमिकांची ही बीजं इतकी खोलवर रुजवलेली आहेत की, एकमेकांचे तसेच इतरांचेही छान मित्र-मैत्रीण, सखा-सखी असलेली, समाधानाने जगणारी जोडपी क्वचितच बघायला मिळतात. ह्या अत्यंत ‘कंडिशन्ड’ मानसिकतेतून बाहेर यायचं तर स्वओळख, स्त्री-पुरुष नात्याचा अभ्यास (ज्यासाठी अनेक उत्तमोत्तम इंग्रजी आणि थोडी मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत), आपल्या अपेक्षांचा विवेकी शोध, स्पष्टता आणि त्याबद्दलचा ठामपणा, विवाहपूर्व मार्गदर्शन अशा अनेक गोष्टी घडणं गरजेचं आहे. परंतु इतक्या मुळाशी जाण्याची आणि पदवी, नोकरी व्यतिरिक्त काही मिळवायचं आहे, म्हणून अभ्यासाची आस असलेली पिढी आपण आजही निर्माण केलेली नाही. त्यामुळे स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक नात्यात आजही क्वचितच काही बदल झाले आहेत. बहुतांशी ती सरधोपट मार्गानेच जातात. त्यातही पुढची दु:खाची बाब अशी की, लग्न नीट सांभाळून, तरी  ते मनाप्रमाणे फुलत नाहीये हे लक्षात येऊन, स्त्री-पुरुष नात्याच्या कक्षा वैवाहिक नात्याबाहेर विस्ताराव्याशा वाटल्या तर विवाहातील जोडीदाराची स्वामित्व भावना (पझेसिव्हनेस), तसंच असुरक्षिततेची भावना, अनेकदा अशा स्त्री-पुरुष मैत्रीवर संशयाचं कीटकनाशक फवारायला लागते आणि मग तेही नातं आक्रसून, कोमेजून जातं.

खरं तर स्त्री-पुरुष नात्यांमध्ये व्यक्तिनिहाय किती विविधता असू शकते! हे नातं कुठल्याही ठरीव भूमिका आणि त्यासोबत येणार्‍या चाकोरीबद्ध वर्तनाच्या अपेक्षा ह्यात अडकत नसल्याने, स्त्री-पुरुष एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलतात-वागतात. अपेक्षांच्या चाकोरीत त्यांना इथे कुणी ‘जज’ करण्याचे ताणही नसतात. त्यामुळे त्यात एक उत्स्फूर्तता असते. मोकळेपणा असतो. ‘अति परिचयात अवज्ञा’ ही मर्यादा (की धोका?) नसल्याने नवताही असते. थोड्या भेटीमध्ये, थोड्या वेळामध्ये बरंच ‘एक्सप्लोर’ करायचं असतं. त्यामुळे वृत्ती आपोआपच ‘शोधक’ बनते. शोधक वृत्तीत केव्हाही नाविन्य टिपण्याकडे कल असतो. तसंच एकमेकांसोबत थोडाच वेळ मिळणार असतो, तेव्हा मनुष्याचा सहज कल हा आपल्यातील दोष दाखवायचे टाळून, गुण समोर आणण्याचा असतो. समोरच्या व्यक्तीचं संवादकौशल्य चांगलं असेल, तर तो कमी बोलणार्‍या व्यक्तीचे सुप्त गुणही हेरून, हळूहळू त्या गुणांना बाहेर आणू शकतो. हे त्या व्यक्तीसाठी आत्मविश्वास वाढवणारं असतं. आपल्याला कुणीतरी अचूक ओळखतं आहे, समजून घेतं आहे ही दिलासा देणारी गोष्ट मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी खूप उत्तेजन देणारी असते. ह्यातून अनेक विषय आयुष्यात नव्याने  येतात. अनेक छंद निर्माण होतात आणि पुढे त्यांचं वेडही लागतं. अनेक सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमात आपला सहभाग वाढतो. दोन माणसांचा मैत्रीचा परीघ विस्तारून नवनवे मित्र-मैत्रिणी त्यात सामील होतात. नवनवे अनुभव आपल्याला समृद्ध करायला लागतात. नवनव्या गोष्टी शिकण्याची, करून पाहण्याची ओढ लागते. स्त्री-पुरुष मैत्रीचं बीज असं अकुंरायला लागतं आणि त्याचा विस्तार वाढता अवकाश कवेत घ्यायला लागतो. ‘माणूस’ म्हणून आपली वाढ होते. जे कधीच केलं, पाहिलं, अनुभवलं नव्हतं ते आयुष्यात येणं किती रोमांचकारी असतं! स्त्री-पुरुष मैत्रीच्या नात्याची ही केवढी विलक्षण भेट!

‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या चित्रपटात अत्यंत पारंपरिक पठडीत आयुष्य जगणार्‍या मिसेस अय्यरच्या जीवनात एका अनपेक्षित धक्के देणार्‍या प्रवासाच्या योगाने, एक वल्ली समोर येते. अत्यंत मोकळ्या मनाचा, कोणत्याही साचेबद्ध जगण्याचं ओझं मनावर नसलेल्या, जगभर फिरणार्‍या फोटोग्राफरचा सहवास तिला केवळ चोवीस तास लाभतो. पण त्या थोडक्या सहवासाने ती इतकी थरारून जाते! तिच्या अत्यंत संकुचित विचार आणि मर्यादाशील वर्तनाच्या चौकटीला ते सारे धक्केच असतात खरं तर. परंतु तरीही त्याच्याबरोबर जगलेल्या विस्मयकारी क्षणांच्या अनुभूतीने ती तिच्याही नकळत त्याच्याकडे ओढली जाते! हे नातं दोघांसाठीही त्या प्रवासाबरोबरच संपणारं असतं. पण तिच्या चाकोरीबद्ध जगण्याला एक नवीन आयाम देऊनच! त्याच्या जागी एखादी स्त्री असती तर हे घडतं? त्यामुळे इतकं निसर्गसुलभ नि नैसर्गिकदृष्ट्या सुंदरसुद्धा, भिन्नलिंगी नर-मादी आकर्षण आपण नाकारू शकत नाही. तसंच बदल हाच स्थायीभाव असलेल्या निसर्गात हे नातं आपण केवळ पती-पत्नी नात्यानं पन्नास-एक वर्षांसाठी बांधूनही ठेवू शकत नाही.

मानव हा अत्यंत सर्जनशील आहे. नवनिर्मितीचा त्याचा ध्यास, निसर्गाने देणगी दिलेली त्याची पंचेद्रिय पूर्ण करत असतात. स्त्री-पुरुष नात्यातही ध्वनी (संगीत), वास (सुगंध), दृष्टी (रूपरंग), जीभ (शब्द) आणि काया (स्पर्श) ह्या पाचही गोष्टी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक वैविध्यात समानतेचा सुंदर धागा गुंफून, माणसांची नाती ह्या पाचही जाणिवांतून, विशेषत: स्पर्शाच्या अबोल भाषेतून, उन्नत, उदात्त होत असतात. सुखदु:खाच्या प्रसंगात मित्रमैत्रिणीने खांद्यावर ठेवलेला आश्वासक हात, त्याची-तिची पाठीवर पडलेली कौतुकाची थाप, ‘मी आहे’ हा नजरेतून व्यक्त झालेला दिलासा किंवा आधार, शब्दांतून बोलकं होणारं मन, तर न बोलताही खूप काही बोलून जाणारे आणि अव्यक्त असूनही कानांना ऐकू येणारे शब्द-सूर...हे सारं स्त्री-पुरुष नात्याला बंधाकडून अनुबंधाकडे नेत असतात. अशा नात्यात अनेकदा लैंगिक आस, ओढ निर्माण होऊ शकते; परंतु दर वेळी ती अभिलाषा होऊन ते एकमेकांना लैंगिक नात्यात गुंतवतातच असं नाही. असं सख्याचं - सखा-सखीचं - अतिशय तरल आणि संयत नातं दिग्दर्शक महेश भट्ट ह्यांनी आपल्या ‘अर्थ’ या चित्रपटात अतिशय सहजपणे तरी परिणामकारकपणे दाखवलं होतं. दोघेही माणूस म्हणून परिपक्व असतील आणि दुसर्‍याचं मन जाणण्याची सहसंवेदना असेल, तर नातं किती प्रगल्भ पातळीवर जातं हे पाहणं स्पर्शून जाणारं होतं. हे सख्याचं नातं पतीपत्नी नात्यात विसर्जित होऊन जावं, अशी नायकाची मनोमन इच्छा असते; परंतु मला माझ्या एकटं राहून जगण्याला ‘अर्थ’ देणारा उद्देश सापडला आहे, तुझ्या सहकार्य, आधार नि मदतीबद्दल मी मनोमन कृतज्ञही आहे; पण आपण छान मित्र-मैत्रीण म्हणून राहू.... वैवाहिक नात्याचा दाहक अनुभव घेतलेल्या नायिकेला मैत्रीतील आधार-आनंद हवासा वाटतोय; पण अपेक्षांना आणि अपेक्षाभंगाच्या दु:खांना जन्म देणारी पतीपत्नी नात्याची बांधिलकी मात्र आता नको वाटते आहे.

तर गुलजार यांच्या ‘आँधी’ सिनेमातील एके काळी आपल्या पत्नीच्या राजकीय क्षेत्रातील व्यग्रतेमुळे चिडलेला, तिला रोखणारा नायक, केवळ गृहिणी असण्याच्या पलीकडे असलेला तिच्या क्षमतांचा मोठा आवाका आणि परीघ समजल्यावर, अत्यंत प्रगल्भतेने, विश्वासाने आणि खूप सार्‍या शुभेच्छांसह तिला हाती घेतलेलं काम तडीस न्यायला सागंतो. तिचं हेलिकॉप्टर वर उडतं तेव्हा जमिनीवर उभं राहून तिला 'अच्छा' करताना, त्याचं समर्पण, विरहाच्या वेदनेने डबडबलेले त्याचे डोळे, त्याच्या प्रगल्भ मनाचा मोठेपणा, तोही एका स्त्रीसाठी पुरुषाने दाखवलेला... बघून आपले डोळे झरू लागतात. तर गुलजारजींच्या ‘मौसम’ आणि ‘परिचय’ चित्रपटात वडील-मुलगी नात्याचे अंतरंग, स्त्री-पुरुष नात्याला किती वेगळा आयाम देतात.

खूप मोठी सामाजिक कामे उभी करणार्‍या किंवा कलेच्या क्षेत्रात मोठा पल्ला गाठलेल्या पतीपत्नीच्या अनेक जोड्या महाराष्ट्राच्या ओळखीच्या आहेत. स्त्री-पुरुष नात्यात दोघांच्या कर्तृत्वाची, गुणावगुणांची वैशिष्ट्यं परस्परपूरक होतात, तेव्हा ते वैवाहिक नातं एका उन्नत पातळीवर जातं. परंतु अशी उदाहरणं फार विरळा. ज्यामानाने काळ पुढे सरकला आणि जीवनमान प्रचंड प्रमाणावर बदललं, त्यामानाने विविध प्रकारच्या स्त्री-पुरुष नात्याकडे खुल्या, उदार आणि स्वीकारार्ह मनाने बघण्याइतका भारतीय समाज अजूनही प्रगल्भ झालेला नाही. कुठेही एक स्त्री आणि एक पुरुष बोलत आहेत, चेष्टा-मस्करी चालू आहे, हसत एकमेकांना टाळी देत आहेत किंवा त्यांच्यामध्ये काही तरी गंभीर चर्चा चालू आहे, हे बघितलं की, आपल्या माना शंकेनी त्यांच्याकडे वळतातच. नवरा-बायको सोडून इतर पुरुष-स्त्री यांनी एकमेकांबरोबर नित्यनेमे केलेले उपक्रम लोकांच्या भुवया उंचावतातच! अशा वेळी त्या दोघा नवरा-बायकोचं वैवाहिक नातं विश्वासाचं, समाधानाचं असेल तर निदान जोडीदार तरी शंकित होत नाही. आश्वस्त असतो. परंतु बहुतांशी जोडप्यांमध्ये ह्यावर बंधनं घालण्याचे प्रयत्न तर होतातच, शिवाय सतत धुसफूस चालू राहते. भांडणांमध्ये ‘जा तिच्या-त्याच्या बरोबरच जाऊन राहा... आवडतेच-आवडतोच नाही तरी तुला तो/ती!’, इथंपर्यंत वाग्बाण सुटत राहतात. कुठल्याच नात्याला न्याय देता येत नाही. ह्या कोंडमार्‍यात माणसं घुसमटत, कुढत राहतात. ह्या सगळ्या मानसिक ताणांचा शारीरिक आरोग्यावरही परिणाम होत राहतो. नाती विस्कटत, तुटत, सुटत जातात. नात्यांचे बंध विसविशीत होत विरत जातात. संसार सुरू राहतात, पण स्त्री-पुरुष नात्यातील मुग्धता, नवीनता, व्याकुळता, सर्जनशीलता, भावोत्कटता सारं... सारं मृतवत् होतं. ते नातंही निर्जीव बनून जातं. साहचर्य संपून केवळ चार भिंतीतली सोबत उरते. सहवासाची असोशी संपून संसाराच्या जबाबदार्‍या आणि कर्तव्य निभावण्यापुरती साथ उरते.

स्त्री-पुरुष नातं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आकळण्यासाठी, त्यातील वैविध्यपूर्ण सौंदर्य आणि त्यातून होणारे लाभ समजण्यासाठी, एकत्र शिक्षण (को-एज्युकेशन) देणार्‍या मुलांमुलींच्या शाळा, ह्या नात्यांची सुजाण जपणूक करणारे प्रगल्भ शिक्षक, घरातील सर्व स्त्री-पुरुषांचे एकमेकांशी सुदृढ संबंध, कोणत्याही भेदभावाविना मुलांची समानतेच्या तत्त्वाने होणारी वाढ किंवा जडणघडण, स्वत:ची ओळख आणि वेगळेपणाची विवेकी जाणीव करून देणारं विचारी, समतोल पालकत्व....ह्यामध्ये स्त्री-पुरुषांमधील निकोप मानवी नात्यांचा पक्का पाया तयार होत असतो. सगळ्या पारंपरिक निकषांना ओलांडून केलेली शास्त्रीय आणि विचारी-विवेकी जोडीदार निवड, ह्या मूळच्या पक्क्या पायावर तितकेच बळकट मजलेही चढवायला सुरुवात करते. ह्या सर्व काळात स्त्री-पुरुषांच्या नात्यांच्या संबंधांतील उत्तमोत्तम कलाकृतींचा घेतलेला आस्वाद मुलांना संवेदनशील, सहृदयी बनवतो. नात्यातील तरलता, भावनिक-वैचारिक साहचर्यातून निर्माण होणारे आणि हळूहळू दृढ होत जाणारे भावबंध (बाँडिंग) मुलांना उमजत जातात. मेंदूच्या पातळीवर ह्या भावबंधांना अमोल महत्त्व आहे. मानव ह्या सामाजिक प्राण्याच्या ‘सुरक्षितता’ आणि ‘स्थैर्या’च्या मूलभूत भावनिक गरजा ह्यातून पूर्ण होतात. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा सकारात्मक पद्धतीने उपयोजित होते. तो शरीर-मनाने शांत, निवांत, समाधानी राहतो. त्याचं समाधानी मन नात्यांना आनंदी बनवतं. स्त्री-पुरुष नातेसंबंध माणसाने त्यासाठी तर निर्माण केले ना? आज तरी त्याला आधुनिक आणि शास्त्रीय विचारांच्या आणि समतोल, सकारात्मक भावनांच्या आधारे समजून घ्यायला सुरुवात करूया. ह्यातूनच नव्या, निरोगी समाजाची जडणघडण व्हायला मदत होईल.

वंदना सुधीर कुलकर्णी

vankulk57@gmail.com