बोरीबाभळी : ग्रामीण स्त्रीच्या वेदनांचा दस्तावेज

‘बोरीबाभळी उगाच जगती चंदन माथी कुठार’ - ‘बोरीबाभळी’ हे शीर्षक वाचल्याबरोबर ग. दि. माडगूळकर यांच्या या ओळी आठवतात. ज्यांची कुठलीही निगा राखली जात नाही, ज्या कुठेही रानावनात रस्त्याच्या कडेला उगवतात, वाढतात आणि मोठया होऊन तशाच ऊन, वारा, धूळ-माती खात जगत राहतात अशा बोरीबाभळी. ना त्यांना देखणे रूप, ना कुठला सुवास, ना त्या कोणा पांथस्थाला सावली देऊ शकत. रावसाहेब रंगनाथ बोराडे लिखित ‘बोरीबाभळी’ या कथासंग्रहात अशाच ग्रामीण स्त्रियांच्या कथा संग्रहित केलेल्या आहेत; ज्यांचे जीवन उपेक्षित आहे आणि पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीत पिचून गेले आहे. डॉ. तारा भवाळकर यांनी या कथा संपादित केल्या आहेत. ‘मळणी’ ‘नातीगोती’ ‘बोळवण’ आणि ‘कणसं आणि कडबा’ इत्यादी कथासंग्रहांमधील या निवडक कथा आहेत.
एकोणीसशे पन्नासच्या सरत्या दशकात आणि साठोत्तरी कालखंडात ग्रामीण कथेला बहर आला होता. व्यंकटेश माडगूळकर, श्री.म. माटे, द. मा.मिरासदार, उद्धव शेळके आणि शंकर पाटील हे लेखक आपापल्या प्रदेशांतील अनुभवविश्व आणि बोलीभाषा घेऊन पुढे आले. याच काळात रा. रं. बोराडे यांनी मराठवाड्यातील जनजीवनाचे दर्शन त्यांच्या कथांमधून घडवले. रा. रं. बोराडे यांची पहिली कथा ‘वसुली’ ही १९५७ साली प्रसिद्ध झाली; तर त्यांचा पहिला कथासंग्रह ‘पेरणी’ हा पाच वर्षानंतर प्रकाशित झाला. ‘ताळमेळ’ (१९६६), ‘मळणी’ (१९६७), ‘नातीगोती' (१९७५), ‘वाळवण’ (१९७६), ‘बोळवण’ (१९७६) या संग्रहामध्ये त्यांच्या कथा संग्रहित झाल्या आहेत. सत्तरच्या दशकानंतरचा काळ त्यांच्या लेखनाच्या बहराचा काळ मानता येईल. ‘माळरान’ (१९७६ ), ‘फजितवाडा’ (१९७६),‘राखण’ (१९७८), ‘वानवळा’ (१९७९) आणि ‘हलकावे’ (१९९०) हे संग्रह १९७५ -१९९७६ ते १९९० या काळात प्रकाशित झाले. ‘कडबा आणि कणसं’ (१९९४ ) मधील कथा ग्रामीण जीवनातील परिवर्तनाचे परिणाम चित्रित करतात. ‘पाचोळा’ (१९७९), ‘चारा-पाणी’ (१९९०), ‘सावट’ (१९८७), ‘रहाटपाळणा’ (1996) आणि ‘इथं होतं एक गाव’ (२०००) या त्यांच्या कादंबर्‍या आहेत.

गरिबी, सासरचा जाच, पतीचे वर्चस्व, रूढी-परंपरांचा काच यांमुळे ग्रामीण स्त्रीला किती दु:ख सोसावे लागते ते ‘बोरीबाभळी’ या संग्रहातील कथांमधून अधोरेखित होते. तरुण, वृद्ध, विवाहित, अविवाहित, परित्यक्ता आणि विधवा अशा सर्व वयातील व स्तरांतील स्त्रियांवरील अन्याय बोराडे सहानुभूतीने रेखाटतात.

गरिबी ही ग्रामीण जनतेच्या पाचवीलाच पुजलेली असते. पावसावर अवलंबून असलेल्या शेतात कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. तर कधी अवकाळी येणारा पाऊस उभ्या पिकाची नासाडी करतो. ‘पाझर’, ‘गाठोडं’, ‘आटापिटा’, ‘बोळवण’, या कथांमध्ये गरिबीमुळे गांजलेल्या आणि त्यातून सुटण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या स्त्रियांची दुर्दशा प्रत्ययास येते. पुरूषसत्ताक कुटुंबपदधतीत पतीच्या वर्चस्वाखाली राहावे लागले तरी तो कुटुंबाचा आधार व पोशिंदा असतो. वैधव्याची कुऱ्हाड डोक्यावर कोसळलेल्या स्त्रीला स्वत:साठी आणि आपल्या मुलांसाठी कसं संघर्ष करावा लागतो, हे ‘आटापिटा’ आणि ‘पाझर’ या कथांतून अधोरेखित होते. ‘पाझर’ या कथेतील यशोदा नवऱ्यामागे कष्ट करून तीन मुलांचे पालनपोषण करते. पावसाची तीन नक्षत्रे कोरडी गेल्यावर शेतीच्या छोटयाशा तुकड्यात कष्टाने पीक घेणारी ती हवालदिल होते. बरी परिस्थिती असलेल्या माहेराकडे ती आशेने बघते पण गरिबी, धान्याची टंचाई आणि कर्त्यासवरत्या मुलाचा निर्णय यामुळे ते तिला फारशी मदत करू शकत नाहीत. आईवडिलांची अगतिकता पाहून यशोदाच्या डोळ्यांना पाझर फुटतो. दारिद्र्यामुळे रक्ताच्या नात्यातही अंतर पडते, दुरावा येतो, या रखरखीत वास्तवाची प्रतीती या कथेमधून येते. दिराच्या आश्रयाने राहणाऱ्या तिला शेतात वाटा असूनही मुलाच्या शिक्षणासाठी कसा आटापिटा करावा लागतो हे ‘आटापिटा’ या कथेचे आशयसूत्र आहे. सासर-माहेर दोन्हींकडून ती आधारापासून वंचित राहते. व्यवहारी जगाच्या दाहक वास्तवाची चरचरीत जाणीव या कथेतून कलात्मकतेने मुखरित होते.

गावांमध्ये प्रचलित असलेल्या रूढी-परंपरा, जावई आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वरचष्मा यामुळे मुलगी आणि तिच्या माहेरचे लोक त्रासून जातात. नाईलाजाने रूढीस शरण जावे लागणाऱ्या जनाई आणि लिंबाजीराव यांच्या कुटुंबाची घालमेल ‘गाठोडं’ या कथेतून प्रत्ययाला येते. रुग्णशय्येवर असलेल्या जनाईला भेटायला तिच्या नवविवाहित मुलीबरोबरजावईही येतो, या एका घटनेतून ही कथा फुलत जाते. जनाईच्या औषधपाण्यासाठी ठेवलेले पैसे जावयाला आहेर करण्यासाठी खर्च करण्याची वेळ लिंबाजीरावावर येते. नाहीतर लेकीला जाळभाज होण्याची भीती त्यांच्या मनात असते. शेतात मोलमजुरी करून निर्वाह करणाऱ्या स्त्री-पुरुषांना वृद्धावस्थेतही मजुरी करावीच लागते. कारण त्यांच्यासाठी कोणतीही पेन्शनची सोय नसते. एकीकडे काम करण्याची निकड तर दुसरीकडे वृद्धत्वामुळे काम मिळण्याची मारामार असल्याने काम मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती, उपाय शोधणे हे बयनाबाई या वृद्धेचे भागधेय ‘बोळवण’ या कथेतून प्रकटते. त्यावर शोधलेला उपाय, त्याचे परिणाम, दारिद्र्य, नैतिकता आणि रूढी-परंपरा अशा सर्वच बाजूंनी बयनाबाईच्या जीवनाची होणारी कोंडी अंतर्मुख करणारी आहे.

मोठ्या शहरांपेक्षा लहान गावात सामाजिक सुधारणा आणि प्रागतिक विचार मंदगतीने पोचतात. समाजातील जुनाट आणि बुरसटलेले विचार, पुरुषप्रधान मानसिकता यामुळे स्त्रियांच्या जीवनाच्या होणाऱ्या परवडीचे अस्वस्थ करणारे चित्र ‘पंचनामा’, ‘मुखवटा’ व ‘नथणी’ या कथांमधून बोराडेंनी रेखाटले आहे. विधवा व परित्यक्ता स्त्री म्हणजे गावातील लोकांच्या करमणुकीचे साधन ठरते. निराधार असल्याने तिला आपल्या शीलाचे रक्षण करताना खूप संघर्ष करावा लागतो. अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीचे पुरुषी वृत्ती व यंत्रणा निर्दयपणे लचके तोडतात आणि तिला आत्महत्येला भाग पाडले जाते. ‘पंचनामा’ या कथेत हे ग्रामीण वास्तव ठळक होते. नवरा घरदार सोडून परागंदा झाला व साधू-संन्यासी होऊन परत आला की त्याचा उदोउदो केला जातो. मात्र विवाहित असूनही एकाकीपणे जीवन जगणाऱ्या त्याच्या बायकोचा विचार कोणीच करीत नाही. संन्याशाचा मुखवटा घालून बायकोकडून हवे ते सुख मिळवणाऱ्या नवऱ्याच्या वासनेचा ती बळी ठरते. त्याची लंपट वृत्ती व तिची अगतिकता, तिच्या वेदना, तिच्या मनाची तडफड व दुःख बोराडे यांनी सहानुभूतीने रंगवलंय. स्त्री ही मुलगी, बहीण, पत्नी, आई आणि सून या नात्याने जशी पुरुषसत्ताक व्यवस्थेचा बळी ठरते; तशीच एखाद्या पुरुषाची रखेल म्हणून राहण्याची वेळ आल्यावरही तिच्यावर अन्याय होत राहतो. ‘दिमाख’ या कथेतील स्वत: निर्णय घेणाऱ्या राधाला तिला जपणारा सलीम भेटतो; मात्र ‘नथनी’ कथेतील सलमाला विश्वासरावाच्या इशार्‍याप्रमाणे व इच्छेप्रमाणे वागावे लागते; व त्यामुळे आई बनण्याची तिची इच्छा अपुरीच राहते. नव्या घोडीलाही ‘नथणी’ घातली जाते, तिने पिल्लांना जन्म देऊ नये, आई होऊ नये म्हणून! जनावर असो की स्त्री, पुरुषाच्या लेखी सगळे सारखेच या धगधगीत वास्तवाची जाणीव येथे होते.

‘धाक’ या कथेतील शेवंताचे भाग्य वडीलधाऱे कुटुंबीय व सासू-सासरे यांच्या मर्जीनुसार ठरते. शेवंताचे सासूशी भांडण होते आणि सासू-सासरे तिला न नांदवता माहेरी पाठवायचे ठरवतात. शेवंताचा नवरा बळीराम काही बोलू शकत नाही. सासू वागवेल, सांगेल त्याप्रमाणे वागण्याचे कबूल करूनसुद्धा तिला माहेरी जावे लागते. ‘मुकी बिचारी कुणी हाका’ अशी तिची स्थिती होते. वडील माणसांच्या ‘अहं’ मध्ये शेवंताचा संसार विस्कटतो. मुलीचे लग्न होऊन ती सासरी गेली की आई-वडिलांचा तिच्यावर काही हक्क राहात नाही. सासरच्यांच्या मर्जीनुसारच तिला माहेरी जाता येतं हे ‘चुंबळ' या कथेतून अधोरेखित होतं. पाऊसपाणी नसताना सुनेला माहेरी पाठवायला तयार असणारे लिंबाजीराव पाऊस पडल्यावर मात्र पाठवत नाहीत. ही अल्पाक्षरी कथा मोठा आशय कवेत घेते. संवादांमधून लिंबाजीरावांचे वर्चस्व, माहेरी जाण्यासाठी पुतळाची घालमेल आणि तिच्या वडिलांची अगतिकता बोराडे समर्थपणे चित्रित करतात.

जेव्हा प्रवासाची विपुल साधने नव्हती तेव्हा मुलामुलींसाठी स्थळ पाहताना जास्त दूर जावे लागू नये आणि माहितीतील जावई व सून मिळावी या हेतूने मराठवाड्यात आणि इतर काही प्रदेशांत सुरू झालेली साटेलोटे प्रथा ग्रामीण भागात अजूनही सुरू आहे. तसेच ज्या घरातील मुलगी सून म्हणून आणली आहे त्याच घरातील तरुणाशी मुलीचे लग्न केले तर मुलीला त्रास होणार नाही असाही विचार त्यामागे असावा. आत्तेभावाशी किंवा मामेभावाशी लग्न करण्याची पद्धतही मराठवाड्यात आहे. ज्या घरातील मुलगी सून म्हणून आणली त्याच घरातील तरुणाशी मुलीचे लग्न केल्यावर उद्भवणारी परिस्थिती ‘धुणं' या कथेत प्रत्ययाला येते. सुनेशी प्रेमाने वागणाऱ्या आत्याबाई मुलीला सासूने मारल्याचे कळताच तो राग सुनेवर काढतात. मुलीची व सुनेची होणारी कुचंबणा या छोट्या कथेत बोराडे यांनी सुनेच्या भूमिकेतून चित्रित केली आहे. साटेलोटे प्रथेचा बळी ठरलेली रुक्मिणी ‘बोचकं’ या कथेत दिसते. सासरच्या माणसांच्या आणि नवर्‍याच्या मर्जीनुसार जिचे नशीब ठरते अशी स्त्री गावागावांतून असते. नवऱ्याला नांदवायची नाही म्हणून पुतळाला गड्यासोबत माहेरी पाठवल्यामुळे तिचे वडील संतापतात आणि ज्या मेहुण्याने हे लग्न जमवले त्याला सुनेला माहेरी पाठवायला सांगतात; जी पुतळाची नणंद आहे. स्त्रीच्या मनाचा विचार कोणी करत नाही. एखादं ‘बोचकं’ इकडून तिकडे पाठवावं त्याप्रमाणे सुनेला माहेरी पाठवले जाते. स्त्रिया या परिस्थितीचा स्वीकार करताना या कथांमध्ये दिसतात. गुजाबायचा नवरा वर्षापूर्वी घरातून निघून जातो; शोध घेऊनही सापडत नाही. त्याच्यावाचून होणाऱ्या तिच्या अवस्थेचे चित्रण ‘खेळ’ या कथेत केले आहे. एका शाळकरी मुलाच्या निवेदनातून ही कथा साकार होते. अशा एकाकी स्त्रीची होणारी कुचंबणा बोराडेंनी संवेदनशीलतेने रेखाटली आहे. कधीकधी विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नवरा हा ‘असून अडचण नसून खोळंबा’ ही म्हण सार्थ ठरविणारा असतो. ‘तोल’ या कथेतील तिची अगतिकता बोराडे यांनी मोजक्या शब्दात कथन केली आहे. आळशी, काही कामधंदा न करणारा नवरा असल्याने तिची कोंडी होते आणि गावातील टगे, गुंड तिला आपलीच मालमत्ता समजून लगट करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तिला जीव द्यावासा वाटतो. स्त्रीच्या दुःखाच्या विविध रूपांवर बोराडे यांनी या कथांमधून प्रकाश टाकला आहे.

‘हरिणी’ आणि ‘थिटा’ या या संग्रहातील कथा वेगळ्या आहेत. स्त्रियांना राजकारणात राखीव जागा मिळाल्या, एखादे अधिकाराचे पद भूषवण्याची संधी लाभली तरी घरीदारी सर्व सत्ता पुरुषाच्या हातात असते व त्याच्या तंत्रानेच तिला चालावे लागते. पुरुष स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पत्नीकडून पूर्ण करू बघतो व बावरलेल्या हरिणीसारखी तिची अवस्था होते. याचे मार्मिक चित्र ‘हरिणी’ या कथेत रंगवले आहे. स्त्रीला कसे गृहीत धरले जाते याचे दर्शन ‘थिटा’ या कथेत होते. या कथेतील इंद्रजीत दुसरे लग्न करण्यापूर्वी स्वतःचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करून घेतो. हेतू हा की स्वत:चे मूल झाल्यावर सावत्र मुलाला आईने जाच करू नये. पण सुस्वभावी व सालस सुमन त्याच्या मुलावर जिवापाड प्रेम करते व तोच थिटा ठरतो. त्याची पत्नी सुमन मात्र आई होण्यापासून वंचित राहते.

या संग्रहातील कथांमधील कथाशय साध्या साध्या घटनांमधून विस्तारला जातो. एखादी प्रमुख घटना, काही दुय्यम घटना आणि छोटेमोठे प्रसंग यांतून त्यांची कथा साकार होते. अनेकदा पावसाचे येणे वा न येणे हीच मुख्य घटना ठरते. ग्रामीण जनतेचे जीवन, त्यांची सुखदु:खे पावसावरच अवलंबून असल्याचे प्रत्यंतर या कथांमधून येते.

स्त्रीच्या पुरुषाशी असलेल्या नात्याच्या प्रभावामुळे स्त्रीचे जीवन सुखी वा दु:खी होते हे बव्हंशी कथांमधून ठळक होते. हर्ष-खेद, राग-लोभ, मोह-माया, ममता, द्वेष इत्यादी भाव-भावनांनी व षड्रिपुंनी ग्रासलेल्या माणसांकडून घडणाऱ्या बऱ्या-वाईट कृतींतून फुलणाऱ्या या कथा मनात घर करून राहतात.

व्यक्तिरेखा

या कथांमधील बहुतांशी स्त्री व्यक्तिरेखा सोंशिक व सहनशील आहेत. शिकलेल्या नसल्या तरी त्यांच्यात एक उपजत शहाणपण असल्याचे जाणवते. उदा. बयनाबाय, शेवंता. क्वचित त्या विरोध करतात. उदा. सलमा, राधा इत्यादी. पुरूष व्यक्तिरेखांपैकी वयस्कर, वृद्ध पुरूष बव्हंशी समंजस, मिळतेजुळते घेतात, तर तरुण मात्र मनाला हवे तसे वागतात. उदा. मानाजी, पंढरी, दामाजी इ. लहान मुले एक-दोन कथांमध्येच दिसतात.

निवेदन

संग्रहातील बहुतांशी कथांसाठी कथाबाह्य निवेदनाचे उपयोजन केलेले आहे. तर ‘धुणं’, ‘खेळ’ या कथा कथांतर्गत निवेदनातून आकार घेतात. कथाबाह्य निवेदक पात्रांच्या मनातील भावभावना व्यक्त करतो. उदा. ‘यशोदाला वाटलं की, आता आदपडद्यानं बोलण्यात काही अर्थ नाही. ही माणसं आपल्या जिवाभावाची आहेत, अडीअडचणीला आपलेपणान्ं धावून येणारी आहेत, तेव्हा यांना आपण का आलो हे स्पष्ट सांगायला हरकत नाही, असा विचार करून यशोदा म्हणाली.’ (पाझर). ‘खेळ’ या कथेचं निवेदन कथांतर्गत निवेदक करतो. ‘असा राग आला मला मायचा. मला रानात जायची लई हाऊस. रोटी खायला तरी माय रानात बोलविल वाटलं; पर माय मला कवाच रोटी खायला रानात बोलवित न्हाई.’ (खेळ).

बोराडे यांनी निवेदनातून नेमक्या आशयाची अभिव्यक्ती ताकदीने केली आहे. कथेच्या प्रारंभीच्या चार-दोन ओळींपासूनच कथा मनाची पकड घेते; उदा. ‘चुंबळ’ या कथेची सुरुवात - “यंदा पावसानं भलतंच ओढून धरलं होतं. आडदरा सरून धाकटा पूक सरत आला तरी अजून पावसाचा पत्ता नव्हता. शेतातली कामं संपली होती आणि करायला कामं नसल्यामुळे लोक निकामी बसून होते. कणगीतले दाणे काढून शेतवाले आलेला दिवस ढकलत होते.पण रोजगार करून पोट भरणाऱ्यांना दिवस फार कठीण जात होते.” (बोरीबाभळी, पृ.३९)

परिणामकारक शेवट करण्याचे बोराडेंचे कौशल्य सर्वच कथांच्या निवेदनातून प्रत्ययास येते. उदा. ‘बोचकं’ या कथेचा शेवट.” एखादं बोचकं टाकावं त्याप्रमाणं रुक्मिणी गाडीत बसली. डबडबलेल्या डोळ्यांनी काशीबाई तिच्याकडं पाहात राहिल्या. नामदेवराव मनातल्या मनात धुमसत राहिले. जनाबाईंची अगोदरच हलणारी मान आता अधिकच वेगानं हलू लागली आणि आपल्या अपमानाचं उट्टं काढल्याचा आनंद बळीनानांच्या डोळ्यांतून ओसंडू लागला...” (उनि. पृ.११८)

भाषाशैली

कथांचे निवेदन बोराडे यांनी प्रमाण भाषेत केलेले आहे तर संवाद बोलीभाषेत लिहिले आहेत. बोलीभाषेतील शब्द आणि तपशील यामुळे मराठवाड्यातील वातावरण हुबेहूब उभे राहते. बोलीभाषेचा गोडवा, ठसका आणि हेल सौंदर्यात्मक अनुभव देतात. उदा. ‘ही गया बी लई बाजींदी हाय.’ ‘मंग कापसातनं सरकी काढीत बसल्यावानी सारं सांगत बसंल.’ (पृ.६४) ही ग्रामीण प्रतिमा सहज येते.‘ ‘त्या मुडद्याचा काई नेम सांगवत न्हाई’ असा रोखठोकपणा ती कधीकधी धारण करते.

कथांची शीर्षकं कथाशयास अनुरूप आहेत. उदा. वडिलांसोबत माहेरी जायची आस लागलेली ‘चुंबळ’ कथेतील पुतळा चुंबळ शोधायच्या निमित्ताने घरात घुटमळत राहते. कारण एकदा शेतात गेल्यावर माहेरी जायची संधी हुकणार असते. पण सासऱ्यांनी ‘नाही’ म्हटल्यावर तिला चुंबळ सापडते. हा मनोज्ञ व हृदयस्पर्शी आशय मुखरित करणाऱ्या कथेचे ‘चुंबळ’ हे शीर्षक सार्थ आहे.

मुखपृष्ठ

राजा बडसल यांचे मुखपृष्ठ संग्रहास साजेसे आहे. कोरड्या, भेगाळलेल्या भूमीच्या पार्श्वभूमीवर दोन विवाहित स्त्रिया उभ्या आहेत. कोणतेही वैशिष्ट्य नसलेला भावहीन चेहरा, त्यावर मोठे लाल कुंकू, गळ्यात काळे मणी आणि ठिगळं लावलेले ब्लाऊज ठळकपणे नजरेत भरतात. संग्रहातील कथांना समर्पक अशा या मुखपृष्ठ रेखाटनातून बडसल यांचे कौशल्य दिसून येते.

संपादक डॉ. तारा भवाळकर यांनी या संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना अभ्यासपूर्ण व विवेचक आहे. त्यांनी या प्रस्तावनेत मौखिक साहित्य, लोककथा, इंग्रजपूर्व व इंग्रजोत्तर काळ, स्वातंत्र्योत्तर काळ असा काळाच्या विस्तृत पटावरील साहित्याचा आढावा घेतला आहे. इंग्रजपूर्व काळातील समाजजीवन, ग्रामीण जीवन, शिक्षण, उपजीविकेची साधने याबद्दलची माहिती यातून मिळते.

संग्रहाची दुसरी आवृत्ती दोनच वर्षांनी प्रकाशित झाली. यावरून या संग्रहाने लोकप्रियता मिळवली असल्याचे दिसते. संग्रहातील कथा वाचकाच्या मनात दीर्घ काळ रेंगाळत राहतात, हे बोराडे यांच्या लेखनाचे सामर्थ्य आहे.
.
रंजना वांबुरकर
ranjana.wamburkar52@gmail.com