चूल ते मूल : माझं गरजेपुरतं जगणं
गरजेपुरतं जगायला लागल्यावर कशी मजा येत गेली, हे नीट सविस्तर सांगायलाच हा लेख लिहायला घेतला आहे. लिहिता लिहिता मी उपदेशांचे डोस पाजणार नाही, असं ठरवलेलं आहे. तरीसुद्धा मधूनच मी प्रवचनकार निसर्गयोगी बाबामहाराजांच्या भूमिकेत शिरू शकतो. हे बाबामहाराज निसर्गाचा भक्तिमार्ग अनुसरणारे आहेत. त्यामुळे ते उपदेशाचे डोस मी पाजत नसून ‘तो’ पाजत आहे नि ते आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहेत.
माझा जन्म पुण्यातला. वाढलो पुण्यात. अर्धवट शिकलोही पुण्यात नि नोकर्या सोडल्या त्याही पुण्यात. हे असं अर्धवट जगणं माझ्या आयुष्याचा भागच झाल्यासारखं होतं. माझा स्वभावच तसा झाला होता. कारण शाळा ते नोकरी (घरच्या मध्यमवर्गीय संस्कारांसह) सगळंच्या सगळं कृत्रिम होतं. चार वर्षांपूर्वी कोकणातल्या घरी राहायला आलो. शहरातून खेडेगावात येऊन राहणं, म्हणजे एकदम आवाजाच्या दुनियेतून शांततेच्या पोकळीत येऊन पडण्यासारखं, धांदलीच्या आयुष्यातून रिकामपणाकडे येण्यासारखं आहे. याच रिकामपणाला माणूस जाम भितो. आधुनिक शहरी माणूस तर खूपच. ‘रिकामं मन, शैतानाचं घर’, ही म्हण सर्वांनाच माहीत आहेच. शहरात आपलं जगणं कसं अगदी काट्याशी जोडलेलं असतं. तर गावाकडे आल्यावर घड्याळाचे काटेच पुढे सरकत नाहीत, असं वाटतं. काटे सरकत असतात, आपण रुतलेले असतो. ह्यापूर्वी कधी थांबून बघितलेलं नसतं. कारण एका जागी थांबल्यावर भलतंसलतं काही मनात आलं तर त्याला सामोरं कसं जायचं, ते स्वीकारायचं कसं, या प्रश्नांपुढे आपण बहुतेक सर्व जण शरणागत झालेलो असतो. हे टाळण्यासाठी आपण काय काय करत राहतो, हे एका शब्दात सांगणं म्हणजे : गदारोळ.
तर मी माझ्या स्वतंत्र अशा गदारोळात वयाची सव्वीस वर्षं घालवली. ती अगदीच वाया गेली असं म्हणणार नाही. कारण ह्या सगळ्या वर्षांत जे जे काही वाईटसाईट, चांगलंचुंगलं हातून घडलं त्याचा फायदा नंतर लेखक म्हणून झाला. मला स्वतःचं भान यायला सव्वीस वर्षं लागली. प्राण्यापक्ष्यांच्या पिल्लांना जन्मत:च निसर्गाचं व्यवस्थित भान असतं. म्हणजे विचार करा, आपली माणसाची; समाजाची जगण्याची पितृसत्ताक पद्धत, नि त्यावर उभारलेली व्यवस्था किती सडलेली आहे. त्याची मुळं इतकी खोलवर गेली आहेत की, त्यातून कुणीही सुटत नाही. म्हणूनच भानात येण्यासाठी या समाजपद्धतीला; लहानपणी केलेल्या संस्कारांनाच फाट्यावर मारावं लागतं, नि त्यासाठी स्वतःलाच हातपाय मारावे लागतात. २०११मध्ये मी जर सायकल घेऊन घराबाहेर पडलो नसतो, तर त्याच घर-संसार-नोकरी-स्पर्धेच्या जुनाट दुष्टचक्रात अडकलो असतो. रवींद्रनाथांच्या ‘जोदी तोर डाक शुने केऊ ना आशे तोबे एकला चोलो रे..’ या ओळींनी मला ते पारंपरिक दुष्टचक्र भेदण्याची शक्ती दिली होती. मी एकटाच निघालो. नवीन आयुष्याच्या रोमँटिक कल्पनेच्या शोधात. इथं एक मान्य केलं पाहिजे की, मी प्रिव्हिलेज्ड आहे. वर्षानुवर्षं माझ्या पूर्वजांनी संपत्ती ओरपली आहे. जेव्हा माझे वाडवडील म्हणतात, आम्ही किती गरिबीत दिवस काढले, वार लावून जेवलो, खस्ता खाऊन हे घर उभारलं. तू ज्या पैशांवर मजा करतोयेस ते आमच्या कष्टाचे पैसे आहेत. तेव्हा माझ्या मनात येतं, वरच्या वर्गातल्या खोत-जमीनदार लोकांकडे चाळीस-चाळीस एकर जमिनी आल्या कुठून? या जमिनी कोणाच्या होत्या? निसर्गाच्या की आदिवासींच्या? भिक्षुकी करून स्वतःचं पोट भरण्यासाठी इतरांच्या कल्याणाकरता त्यांच्या ‘माथी’ रूद्राभिषेक, सत्यनारायण वगैरे मारणं किंवा प्रत्येक गोष्टीला धार्मिक विधीचं अधिष्ठान देणं, योनीशुचिता विधी वगैरे करण्याचा अधिकार आला कुठून? नि तरीही हे जर स्वतःला गरीब समजत असतील तर तथाकथित खालच्या वर्गातल्या लोकांची हालत काय असेल? माझ्या पूर्वजांची चतुरी-लबाडी नि ढोंग लक्षात यायला लागलं. कुठल्यातरी वेद-ग्रंथांना अपौरुषेय करून, त्यांना प्रमाण मानून वर्गव्यवस्था उभारून स्वताच्या जातीला पवित्र करून घेतलं, स्वताची सोय करून नि इतरांचं भयंकर शोषण करून तुंबड्या भरल्या. त्या विषवल्लीला आलेलं एक फळ म्हणजे मी. माझ्या हे जेव्हा सव्वीसाव्या वर्षी लक्षात आलं तेव्हा मी हादरलो होतो. पण हे बाहेर कुठे बोलायची सोय नव्हती. पितृसत्ताक पद्धतीत असं काही विचारायची परवानगी नसते. उलट हे ग्रंथ, ही व्यवस्था, ही पुराणपद्धत त्यांच्या ताब्यात सापडणार्या प्रत्येक माणसाला नि प्राणीपक्ष्यांनासुद्धा लाचार करते. मासेखाऊ मांजरीला शाकाहारी बनवते. हत्ती-घोडे-उंट अशा बिचार्या प्राण्यांना स्वताच्या स्वार्थासाठी बंदिवान करते, रासायनिक खतांचा मारा करून पिकाला नासवते. झाडांवर कटर चालवते. मोठठाल्या यंत्रांनी पाण्यासाठी पाताळ खोदते. पोरांना नेहमीच संस्काराच्या नावाखाली धाकात ठेवते. या पद्धतीत ‘व्यक्ती’ क्षुद्र असते; समूहाला महत्त्व असतं. मेंढपाळ जसा एकाही मेंढराला वाट चुकून देत नाही, नि मेंढरंही डोळ्याला झापड लावून त्याच्यामागे जात राहतात. तसंच एखाद्या व्यक्तीनं वेगळा विचार, वेगळी वाट पकडलेली समूहाला खपत नाही. विरोधी बोललं की, अपराधी ठरवलं जातं. व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं तर अराजक माजेल, यावर सर्वांचा ठाम विश्वास असतो. या विचाराच्या खोलात गेलं की, कळतं : जर एखादा वेगळी वाट पकडून यशस्वी झाला तर, आपण बुळे ठरू असं समूहातील बहुसंख्य लोकांच्या मनात असतं. अशा या व्यवस्थेत मनात गिल्ट घेऊन; अपमानित होऊन उरलेलं आयुष्य मुकाटपणे स्वतःला कुरतडत काढणारे ‘बहुसंख्याक’ सापडतील. या गिल्टमधून सुटण्यासाठी मी स्वतःला बजावत राहिलो, ज्या पैशांवर तू मजा करतोयेस ती वाडवडलांनी जमा केलेली पुण्याई ही त्यांनी कोणाला तरी ओरबाडूनच मिळवलेली आहे. तुझे वाडवडील फार काही ग्रेट नव्हते. काही बाबतीत तर मूर्खच होते. तेव्हा तू तुझ्या वाडवडलांना थोडं ओरबाडलंस तर काही फरक पडत नाही. फक्त एकच अट : तू तुझ्या गरजेपुरतंच घ्यायचंस. इंस्टिंक्ट्सवर भरवसा ठेवून समाधानी राहायचंस. जर जास्त ओरबाडलंस तर ज्यांच्याकडे काहीच नाही अशांना द्यायचं. असं हे ‘रॉबिन हूड’ तत्त्वज्ञान स्वतात मुरवून, मी तावूनसुलाखून कचाट्यातून निसटलो. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. काट्य़ानं काटा काढतात, तसा संस्काराचा काटा काढायचा असेल तर निर्लज्जपणे कोडगं व्हावं लागतं.
२०११च्या दिवाळीत ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, जेव्हा सर्व जण घरी राहून लक्ष्मीदेवीची पूजा करण्याच्या प्रथेत मग्न होते; तेव्हा मी सरकारी बाबूंशी डोकेफोड करून सायकल रेल्वेत चढवत होतो. पुण्याहून अहमदाबादला धडकलो नि तिथून २३ दिवस सायकल चालवत जम्मूला. तिथे तो प्रवास संपला; पण जगणं सुरू झालं. या रस्त्यावरच्या प्रवासानं मला खरंखुरं जगणं म्हणजे काय ते सांगितलं. फक्त पाच हजार रुपयात अख्खा प्रवास पार पडला होता. वाटेत बर्याच जणांनी गप्पा मारल्या, खायला दिलं, राहायला दिलं होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, जगण्यासाठी पैसा हवा; पण पैशासाठी जगायचं नाही. म्हणजे मग मी आपोआप गळेकापू स्पर्धेतून बाद झालो. तसा आधीच झालो होतो. पण आता कारणं समजल्याने ऑफिशिअली रिटायर्ड झालो. सव्वीसाव्या वर्षी वडिलोपार्जित पेन्शनर बनलो. हो... खरंच! सायकल प्रवास करून आल्यावर मी घरी बसून होतो. करायला काही नव्हतं. नोकरी मी आता कधीच करणार नव्हतो. डोक्यात उलटसुलट विचार येतच होते. प्रवासाहून आलो तरी लगेच काही बोधिसत्त्व नव्हतो झालो. शहरात येताच कृत्रिम आयुष्य उपभोगण्याची इच्छा वाढली. संध्याकाळी दारू प्यायची होती. मरेस्तोवर सेक्स करायचा होता. कफल्लक अवस्थेत पोरगी पण पटणारी नव्हती नि बाटलीही मिळणार नव्हती. अशा निराश अवस्थेत एकदम आठवण आली ती गावाकडच्या घराची. तर गावात येऊन राहायचा माझा हेतू असा उदात्त वगैरे नव्हता. एकदा गावात राहायला लागल्यावर नि दिलीपतात्या कुलकर्णी यांना भेटल्यावर, त्यांची पुस्तकं वाचल्यावर बदलत गेला.
माझ्या आईकडच्यांनी त्यांच्या हौसेखातर कोकणात चिपळूण जवळ कापरे नावाच्या गावात प्लॉट विकत घेऊन घर बांधलं होतं. तिथं शिमगा नि मे महिन्याच्या सुट्टीशिवाय (तेही तीन-चार दिवस) कोणीच जायचं नाही. उर्वरित सर्व महिने हे घर बंद असायचं. थोडंसं पडीक. मग मी ठरवलं की, एवीतेवी शहरात टाइमपास करतोच तो तिथे राहून करू. हे माझ्या मनात आलं कसं? या प्रश्नाच्या उत्तरासाठी परत मागे जावं लागेल. जम्मूपर्यंत सायकलिंग करण्याआधी मी कोकणाच्या तीन-चार सायकलवार्या केल्या होत्या. त्यावेळी एकदा मी ताम्हिणी घाट उतरून दापोलीजवळ कुडावळे या गावात राहणार्या दिलीप कुलकर्णी यांच्याकडे गेलो होतो. ते आधी पुण्यात टेल्कोमध्ये कामाला होते. त्यांनी मात्र ठरवून; पर्यावरणरक्षणाचा मंत्र घेऊन ध्येयाने गावाकडे जाऊन राहायला सुरुवात केली होती. नुस्त नाही तर त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, निसर्गस्नेही जीवनशैली स्वीकारून. Refuse, Reuse नि Recycle हे 3R या जीवनशैलीची प्रमुख तत्त्वं. यातलं Refuse हे सर्वात पहिलं नि महत्त्वाचं. अनावश्यक गोष्टींना पूर्ण नकार. फॅशनेबल कपडेलत्ते : नकार. जंक फूड : नकार. विजेवर आधारित वस्तू : नकार. काही गोष्टी परत परत वापरता येतात. उदा. कपडे, काचेच्या बाटल्या, पाटकोरे कागद. हे Reuse करणं. आणि प्लॅस्टिक, दोन्ही बाजू वापरलेले कागद हे Recycle करणं. रिसायकल करण्यासाठी वीजेवरील तंत्रज्ञान लागत असल्यानं खरं तर ते निसर्गस्नेही नाही. म्हणूनच रिसायकलिंगपर्यंत गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत, असं आमचे तात्या सांगतात. त्यांच्या कुडावळ्याच्या घरात केवळ तीन साधे बल्ब (एलीडी नाही. एलीडीत पारा धातू असतो. त्यानं होणारं प्रदूषण भयंकर असतं.) आणि रेडिओ एवढीच उपकरणं आहेत. पुण्यात असलेल्या म्हातार्या आईशी संपर्क ठेवायला म्हणून आत्ता आत्ता त्यांनी मोबाइल विकत घेतला. घरात चुलीवर जेवण बनवलं जातं. चुलीतून धूर होतो. तरी, जमिनीखालचा वायू मिळवण्यापासून ते घरोघरी गॅसची टाकी पोहोचेपर्यंत सर्वात जास्त प्रदूषण होतं; जे डोळ्यांना दिसत नाही. गाडी अर्थातच नाही. इलेक्ट्रिक पण नाही. पाणीवापर मर्यादित राहावा म्हणून त्यांचा संडास बाहेर परसाकडं आहे नि चराचा आहे. त्यात विष्ठेवर माती टाकायची असते. कुठलाही प्राणी माती उकरून; विष्ठा टाकून परत मातीनं त्याला झाकून घेत असतो. निसर्गात विष्ठेचा संबंध पाण्याशी कधीच येत नाही. तो केवळ मानवी व्यवस्थेत येतो. नद्यांना माता म्हणून तिच्यातच सगळी घाण सोडणं, ही अस्सल मानवी ‘ढोंगी’ व्यवस्था. हे असं सगळं अनुभवल्याने, तात्यांकडे बर्याच वेळा राह्यल्याने मला वेळीच काही गोष्टी समजल्या नि हळूहळू जाणीवेत जाऊन बसल्या. तात्यांसारख्या निसर्गयोगी महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानं मग इतर कोणा बाबाबुवांकडे जायचा ‘योग’च आला नाही.
मी कोकणातल्या गावात जायचं ठरवलं तरी, प्रश्न काही संपणारे नव्हते. मुख्य प्रश्न पैशाचा. जरी वाडवडलांना ओरबाडायचं असलं, तरी आमचे वाडवडील असे तसे काय पैसे लाभून देणारे नव्हते. त्यामुळे काही करून आर्थिक सोय करणं भाग होतं. खूप नाही, तरी थोडेफार पैसे गरजेचे होते. दिलीपतात्यांनी टेल्कोत नोकरी करून बरेच पैसे सेव्ह केलेले होते. शिवाय त्यांची व्याख्यानं, शिबिरं यातूनही त्यांची सोय होत होती. माझ्याकडे काहीही नव्हतं. तोच एक जॅकपॉट लागला. मधल्या काळात रिकामचोटपणा करून कंटाळल्यावर किंवा दुसर्या शब्दात सायकलप्रवास रवंथ करून झाल्यावर मी त्यावर लिहायला घेतलं. एका लेखापुरतं लिहायचं ठरवलं होतं. पण लिहिता लिहिता त्याचं पुस्तकच तयार झालं. त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. नि पन्नास हजार रुपयेही. हा खरंच जॅकपॉट होता. सरकारी पुरस्कार मिळवताना केलं जाणारं गटातटाचं (माझ्या दृष्टीनं- अनावश्यक) राजकारण नि वशिलेबाजी आत्ता समजायला लागलीये. तेव्हा काही माहीत नव्हतं. आणि एकही वशिला न लावता तो पुरस्कार मिळाला होता. आता मात्र सरकारी पुरस्कार घेताना दहा वेळा विचार करायचा, असं मनाशी पक्क केलं आहे. अर्थातच, माझ्यासारख्या फेसबुकावर लोकप्रिय नसणार्या, अ-प्रसिद्ध अशा लेखकाला कादंबरीसाठी पुरस्कार मिळणं हे अशक्य कोटीतलंच आहे. तर तेव्हा ते पन्नास हजार रुपये घेऊन मी कोकणात आलो. आठवडा मस्त गेला. मजा बघा, पैसे जवळ असूनही आठवड्यानंतर तिथं राहणं नको वाटू लागलं. तात्यांप्रमाणे राहायला जमत नव्हतं. मन सैरभैर झालं. शहरात परत जावंसं वाटू लागलं. कारण करायला काहीच नव्हतं. हाताला काम नव्हतं. गावात ओळख नव्हती. दिवसभर नुसता झोपा काढायचो. या सगळ्याचा शहरी आधुनिक माणसाला सात दिवसात कंटाळा येणारच. सध्या तर कंटाळा यायचा कालावधी सात दिवसांवरून सात मिनटांवर आलाय. दर सात मिनटांनी काहीतरी नवीन असतं आपल्याला. तर माझा वैताग वाढला, चिडचिड सुरू झाली. जवळच्या चिपळूणला जायचं प्रमाण वाढलं. एकाड एक दिवस मी एस्टीतून चिपळूणला जाऊ लागलो. यातच एक दिवस माझ्या सख्ख्या मावशीकडून गाय राखण्याचा प्रस्ताव आला. एक छान जर्सी गाय विकत घ्यायची. तिचं दूध विकून पैसे कमवायचे. नि तिच्या देखभालीत वेळ काढायचा, असा हा प्रस्ताव मला एकदम आवडला. मी मावशीच्या गावी राहायला गेलो. त्या जॅकपॉटचा पैसा कामी आला. त्यातले तीस हजार रुपये खर्चून गाय घेतली. तिच्यासाठी पेंढा खरेदी केला. आता वर्षभर काही चिंता नव्हती. पण कसलं काय एका महिन्यातच प्रश्नांचे डोंगर उभे राहिले. एक तर जर्सी गाय हा प्रकार निसर्गाविरुद्ध; खास मानवी सोयीसाठी आहे. माणसाची हाव वाढल्यानं त्याला भरपूर दूध हवंय. गावठी गायी फार तर एक-दीड लीटर दूध देतात. तेवढ्यानं भागायचं कसं : त्याच्या वाढलेल्या पोटाचं. म्हणून मग जास्त दूध देणार्या विदेशी जर्सी गायीची जनुकं लसीद्वारे आपल्या गायीत सोडायची. तिला गोठ्यात बांधून ठेवायचं. नाजूक प्रकृती असल्यानं पंखे लावून गारवा राहील असं बघायचं. तिला बैलाशी जुगू द्यायचं नाही. ताणावर आली की, इंजेक्शन द्यायचं. हीचं हंबरणं ऐकून एखादा उंडगा बैल बाहेरून डुरकत म्हणजेच साद घालत येतो. त्याला पिटाळायचं. दोन प्रेमी युगुलांना भेटून द्यायचं नाही. हे इथंच संपत नाही. गाय व्यायल्यावर पाडा झाला तर त्याला शून्य किंमत असते. कारण आता नांगर कमी झालेत. त्याला त्याच्या आईपासून दूर ठेवायचं. दहा-बारा लिटर जे काही दूध सगळं आपण घ्यायचं. पाडी झाली तर मात्र तिची निगा राखायची. भविष्यातली लक्षुमी ना ती! आणि घरी येऊन घरच्या लक्ष्मीला शिव्या द्यायच्या. तिला मारायचं. घरच्या लक्षुमीच्या पोटातल्या लक्षुमीला संपवायचं. असं आपल्यातल्या माणसाचं बिंग फुटल्यावर मी अस्वस्थ झालो. मावशीशीसुद्धा मतभेद व्हायला लागले. ती प्रचंड धार्मिक. देवदेव, जपजाप्य जोरात करणारी. हिंदुत्ववादी संस्कारात वाढलेली. ते संस्कार अधिकारानं दुसर्यांवर थोपवू पाहणारी. घरच्यांनाही मी ते माझ्यावर थोपवू दिले नाहीत. तिथं मावशीचं काय चालणार? तेव्हा २०१४च्या निवडणुका पार पडत होत्या. मोदीभक्तीच्या वार्याला प्रचंड वेग चढला होता. मावशी रोज रात्री डिबेट्स बघायची. त्यावरून माझ्याशी बोलायला गेली की, मी विरुद्ध मत मांडायचो. मग वादविवाद. हळूहळू ते जास्तच वाढले. ज्याचा मला वैताग आला. पाच महिन्यातच गाय विकून मोकळा झालो.
परत सैरभैरपणा चिकटला. डोक्यात नुसते प्रश्नांचे भुंगे. कसं जगायचं? काय करायचं? काय खायचं? मग परत एकदा तात्यांकडे गेलो. तिथे राहिलो. पण त्यांच्याकडे कायमचं कसं राहता येईल. मग परत पुण्यात काही दिवस घालवले. त्या रिकाम्या दिवसात डोक्यातलं सगळं परत कागदावर उतरवलं. नि त्याची झाली कादंबरी. पहिलीवहिली कादंबरी. अहाहा! आता परत मोकळं वाटू लागलं. परत एकदा कोकणात जायचं ठरवलं. पण आता मध्यममार्ग डोक्यात होता. म्हणजे वीजेवरचं तंत्रज्ञान वापरायचं. पण अगदी गरजेपुरतं. नवीन वस्तू विकत घ्यायची नाही. ‘सेकंड हँड इकॉनॉमी’ची कास धरली. म्हणजे लॅप्टॉप, मोबाइल सेकंड हँड विकत घेतले. गाडी अजिबात घ्यायची नाही. (अगदीच गरज पडली तर पुण्यात मी भावाची चालवतो.) कोकणातलं घर स्लॅबचं आहे. भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता केवळ शहरी स्टाइलनं बांधलेलं. कोकणात पश्चिम दिशेला मोठी खिडकी असायला हवी. नाहीतर वारा खेळता राहत नाही. या घराची पश्चिम बाजू पॅकबंद आहे. एकच खिडकी आहे. तीही अरूंद आहे. वर पत्र्याची शेड. यामुळे उन्हाळ्यात भयंकर गरम होतं. मग दुपारी थोडा पंखा लावावा लागतो. रात्री मात्र गच्चीत झोपतो. थोडक्यात, एक कळलं की, काही सवयी घालवून अत्यंत बेसिक लेव्हलवर, गरजा कमीतकमी ठेवून (Minimalism) जगायचा प्रयत्न करायचा.
हळूहळू चांगला जम बसला. एकाड एक दिवसांनी चिपळूणला जाणं आता दहा-बारा दिवसांवर आलं. जेवण स्वत:चं स्वत: करायला लागल्यावर बायकांचा त्रास कळला. नाश्ता, दुपारचं साग्रसंगीत जेवण, संध्याकाळचं खाणं, व रात्रीचं जेवण, धुणीभांडी करण्यात ज्यांचा अख्खा दिवस जातो, त्यांना काय वैताग येत असेल, त्यांची जीवन जगायची इच्छाच नष्ट होत असेल, हे चांगलंच जाणवलं. किंवा हे आता त्यांच्या इतकं अंगवळणी पडलंय, किंवा कामाची विभागणी अशीच असल्यानं काही बायकांना काहीच वाटत नाही. शिवाय हे सगळं करून कामालाही जायचं. शहरात आता कामकरणी ठेवल्या जातात. पण गावाकडे सगळंच बायकांना करावं लागतं. बाप्ये शेतात राबून कष्ट करत असले तरी, बायका घरकाम, दळण-कांडण नि शेतीकाम करून त्यांच्यापेक्षा जास्त राबतात, हे मी पाहिलेलं आहे. मासिक पाळीच्या वेळी मात्र त्यांना उंबरठ्याबाहेर ठेवलं जातं. माझ्या मते त्यांना तेवढीच विश्रांती मिळते. पण समाज याकडे आदराने बघत नाही. वाळीत टाकल्यासारखं तिला बाहेर ठेवलं जातं. यावर मी एक बडबडगीतही केलं होतं -
पहाटे पहाटे उठे… बाई
अंग कितीही
दुखलेखुपले तरीही
चूल पेटवून रांधणं
पोरांना शाळेत धाडणं
गाईगुरांचं चारापाणी बघणं
शेतावर जाऊन कष्टकरी होई... बाई
संध्याकाळी घरला येऊन
केरवारा उरकून
धुणंभांडी, स्वैपाक करून
न चुके रात्री न्हवर्यासंगं निजणं
असं चूल ते मूल, व्हाया शेतीचं
जगणं राबणं इतरांसाठीचं
पहाटे पहाटे उठून
परत चक्र सुरू... बाईचं
(या बडबडगीतात शेतीच्या जागी ऑफिस हा शब्द शहरी व्यवस्थेत लागू होईल.)
=================================================================================
तर सुरुवातीला मी उत्साहाने नाश्ता नि दोन्ही जेवणं बनवायचो. नाश्ता झाला की तासाभरात दुपारी काय करायचं? ह्याचे विचार सुरू व्हायचे. दुपारचं जेवण करून थोडी डुलकी काढली की, रात्री काय खायचं? ह्याचे विचार सुरू व्हायचे. तिन्ही वेळची भांडी घासायची. अख्खा दिवस यातच जायला लागला. कसलं वाचन नि कसलं लिखाण नि कसला छंद. आता यावर काही संस्कारी म्हणतीलही, हे सर्व सांभाळूनच आम्ही वाढलो. वाढलो म्हणजे ते वयानं वाढणं असतं. माणूस म्हणून नाही. तेव्हा ह्या त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं!
असं तिन्ही त्रिकाळ जेवण बनवण्यात नि त्याच्याच चिंतेत वेळ जायला लागल्यावर मी तिन्ही त्रिकाळ खायची सवय मोडून फक्त दोनच वेळा तोही डाळ-भात करून खायचा, असं ठरवलं. हे अंगी मुरवणं सोपं नव्हतं. सकाळी आठ-साडे आठ वाजता पोट भुकेनं वेडपिसं व्हायचं. मग पोटाला शांत करण्यासाठी आपण काहीतरी सटरफटर खात राहतो. आणि तीच सवय लागते. यावर उपाय म्हणून असं भुकेनं तडफडायला झालं की, घराच्या बाहेर पडून फेरी मारून यायला लागलो. तेवढंच लक्ष दुसरीकडे वळायचं. पोटाला समजावून सांगायचो, ‘तुझे लाड आत्ता नाही. तुला आत्ता दिलं तर सारखाच मागशील. तेवढा वेळ काय माझ्याकडे नाही. तेव्हा दुपारी बारानंतर तुला खायला घालणार.’ पोट कसंबसं बारा वाजेपर्यंत तग धरायचं. बारा वाजल्यावर मात्र भरपूर जेवायचो. मग संध्याकाळी फेरी मारायला खाली शेताडीत जाऊन आल्यावर लगेच जेवायचं. हळूहळू या रूटीनची सवय झाली. दिवसातून दोनच वेळा खाऊ लागलो. हेच ते अलीकडे दिक्षित डाएटचं आलेलं फॅड. मला वाटतं, आपल्या शरीराला असं समजावलं की, त्याला कळतं. प्रयोग करूनच मी हे सांगतोय. सकाळी सहाला उठायचंय, असं मेंदूनी एकदा का ‘मनावर’ घेतलं की, तो शरीराला सहा वाजता उठवणारच. हे सगळंय ना, ते धकाधकीच्या आयुष्यात नाही समजत. यासाठी थोडं थांबायला लागतं. स्वताच्या शरीराच्या आत डोकावून बघावं लागतं. विचारबिचार करत राहावे लागतात. यातून आत्मकेंद्रीपणा वाढण्याची भीती आहे. पण माणूस म्हणून आपल्या मिळालेल्या शक्तीनिशी नीट विचार केला तर आपण स्वताबरोबरच दुसर्यांकडेही नीट बघायला लागतो. त्यांनाही समजून घ्यायला लागतो. आपल्यात सामावून घ्यायला लागतो. मग लक्षात येतं, कुठलाही ‘माणूस’ इथून तिथून सारखाच आहे. पुरुष नि बाई हे फक्त शारीरिकदृष्ट्या भेद आहेत.
आता एखादी गोष्ट केली, की काहीतरी साईडइफेक्ट होणारच. म्हणजे मी असा इकडे गावात येऊन राहायला लागलो. आणि एकटा पडलो. शहरात असलेल्या मित्रांशी संपर्क कमी झाला. म्हणजे तसाही माझा मित्रपरिवार फार नव्हताच. कॉलेजपास्न माझ्यातली बंडखोरी वर यायला लागल्यावर मी एकटाच तर पडलो होतो. पहिल्यांदा वाईट वाटायचं. रडायचो. नंतर त्याची सवय झाली. हळूहळू तर एकटंच मस्त वाटू लागलं. गरज असेल तेव्हा मित्रांच्यात जायचं, असं समाजाच्या दृष्टीने स्वार्थी वागायला लागलो. मी निगरगट्ट असल्यानं मला याचं काही वाटायचंही नाही. मला आधी लग्न करायची इच्छा होती. कसंय, मोठं झाल्यावर लग्न-पोरंबाळ-संसार करणं अपरिहार्य असतं, असं लहानपणीच नकळत बिंबवलेलं असतं. (गावाकडे संसारात शेती कसणं अंतर्भूत असतं किंवा असायचं.) त्यामुळे मला कॉलेजात असेपर्यंत लग्न करायचं होतं. तो ‘कंडिशनिंग’चा भाग होता. मैत्रिणी असल्यामुळेही तसं वाटत असेल. तरीही ग्रॅज्युएट होईपर्यंत एकही पोरगी पटली नव्हती. प्रयत्न भरपूर झाले होते. पोरी खर्या हुशार! त्यांना बरोबर कळलं होतं की, हा एक नंबर उंडगा आहे. ह्याच्याकडून संसार वगैरे काय होणार नाही. ग्रॅज्युएशन नंतर मैत्रिणींशी काहीच संपर्क उरला नाही. आणि नंतर माझं सगळं वेगळंच होत गेलं. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे अर्धवट सोडलं. नोकर्या अर्धवट सोडल्या. त्याच काळात बहुतेक मनात एकटं राहायचं विचार चालू झाला असेल. पण नैसर्गिक ऊर्मी थोडीच शांत बसणारे. अनेक पोरींच्या मागे लागलो. पण ‘हातच हलवत’ राहिलो. त्याकाळात मास्टर्बेशन हाच एक पर्याय होता, शरीराला शांत करायला. पण मास्टर्बेशनला अर्थातच समाजात घाणेरड्या नजरेने बघितलं जातं. मलाही सुरुवातीला ओंगळवाणं काहीतरी करतोय असं वाटत होतं. कारण कंडिशनिंगचा परिणाम. मला आठवतंय, दहावीत असताना एकदा मास्टर्बेट करताना आईनं बघितलं होतं. तिच्या मते तिनं मला ‘पकडलं’ होतं. असं घाणेरडं परत वागलास तर बघ, असं तिनं धमकावलं होतं. अनेक दिवस ती बोलत नव्हती. तिच्या धमकावणीला भीक न घालता मी मास्टर्बेट करत राहिलो. पण लपूनछपून. भारतीय समाजातलं हे आणखी एक दुखणं. दारू पिणं, सेक्स या गोष्टी मनमोकळ्या केल्या जात नाहीत. त्यावर एक प्रकारचा दबाव असतो. त्यावर बोलणं टाळलं जातं. हा दबाव, त्यातून आलेलं फ्रस्ट्रेशन ज्वालामुखीचं रूप घेतं. मास्टर्बेशन स्वताच्या स्पेसमध्ये करण्यात काही चूक नाही, हे समजायला अनेक वर्षं जावी लागली. उलट मास्टर्बेशन ताण नष्ट करणारंच (स्ट्रेस बस्टर) आहे. म्हणून समाजासाठीही ते चांगलंच आहे. कारण त्यातून मी समोरच्या मुलीला दुखावत नाही. यात माझा एक असा इगो असतो तो समाधान पावतो. इगोचे दोन अर्थ डिक्शनरीत आहेत : १. आपल्या असण्याची जाणीव. २. अहंकार. पहिला अर्थ म्हणजेच सर्व्हायव्हल. मास्टर्बेशननं तुमचं अस्तित्व अबाधित राहतं. दुसरा अर्थ तुमच्यात सतत उसळी मारत असेल तर तुम्ही वेडवाकडं वागू शकता. मास्टर्बेशनकडे जर नीट बघितलं तर समाधानी होऊ शकता, असं मला जाणवलं. अर्थात, हे सगळं स्वताच्या स्पेसमध्ये. इथं परत ‘स्वताची स्पेस’ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकांना ती मिळत नाही. तिथे त्यांचा सेक्सधारी शेषनाग फणा काढून डोलायला लागतो.
अशा प्रकारे नैसर्गिक ऊर्मीला शांत करायचं शिकलो, तरी आवडत्या व्यक्तीबरोबर सेक्स ही गोष्ट वेगळीच आहे. त्या व्यक्तीशी तादाम्य पावून, अलगदपणे एकमेकांना उलगडत मोकळं होत जाण्यात जो ड्रामा असतो, त्या अनुभवाला पारखं झालो. समोरच्या व्यक्तीला नशेसारखं खोल प्रेम द्यायला अजूनही मी आसुसलो आहे. मला हे कितीही करावं वाटलं, तरी तसा जोडीदार मिळणं म्हणजे एक दिव्य घटना आहे. तपश्चर्या करावी लागत असेल यासाठी. मी सर्वात लहान असल्याने माझ्या सर्व बहीण-भावांची, मित्रांची लग्न झालेली पाहिली. लग्नानंतर मातृभक्तांना बदललेलं पाहिलं. तसा तो थोडा बदल गरजेचाही वाटला. पण दोघांचं एकमेकांत भान हरवून गेलंय, अशा रिलेशनशिप्स मी खूप कमी बघितल्या. एकदा लग्न झालं की, टोकाचं घडत गेलेलंच बघितलं. दोघांच्याही स्वातंत्र्यांचा संकोच होत असलेला पाहत आलोय. लग्न नावाची व्यवस्था ही कृत्रिम असल्यामुळे असं होतंय, या निष्कर्षावर मी आता आलोय. या कृत्रिम व्यवस्थेचं कर्मकांडात रूपांतर झाल्यावर घटस्फोट, विवाहबाह्य संबंध असे साईडइफेक्टस आलेच. माणूस जसा उत्क्रांत होतोय तसा तो आक्रमक होतोय. (नि त्यामुळेच आणखी संकुचित होतोय की काय?) त्याच्या मेंदूतल्या रसायनांची घुसळण वाढतीये. या सगळ्यात जेव्हा भावभावनांचा कोंडमारा होऊ लागतो तशी तर आणखीनच वाट लागते. लग्नव्यवस्थेचे फायदे कोणालाच मिळेनासे झाले. लग्न ह्या व्यवस्थेमुळे दोघंही सात जन्म, प्रत्येक जन्मातल्या वर्षाचे बारा महिने; चोवीस तास एकमेकांना बांधील झाले, मालकी हक्क प्रस्थापित झाले, ही सर्वात दुर्दैवी गोष्ट घडली. जेव्हा माझ्या लक्षात आलं की, लग्न केलं तर मला एखादी नोकरी आजन्म करावी लागेल, मरेस्तोवर चढाओढीनं पैसे कमवावे लागतील. हे सर्व मला तर करावं लागेलच, नि बायकोलाही करावं लागेल. तेव्हा मी हादरून गेलो. काही झालं तरी मला हे करायचं नव्हतं. लग्नाच्या सध्याच्या बाजारीकरणात कुठल्याही संस्थेत, मॅट्रिमोनी साईट्सवर मला माझी खोटी प्रोफाइल टाकायची नव्हती. घरच्यांचं प्रेशर वाढत होतं. म्हणून मी नोकरीच न करायचं ठरवलं. तरीही घरचे लोक लग्नाच्या मागे लागलेले पाहून मी हबकलोच. ‘पोरानं लग्न केलं’, केवळ या सामाजिक स्थितीवर त्यांना टीकमार्क करायची होती. माझे विचार वेगळे आहेत, माझ्या कल्पना वेगळ्या आहेत, तशीच मला माझी होणारी जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे याविषयी त्यांना देणंघेणं नव्हतं. नवरा-बायको ही कल्पनाच माझ्या डोक्यात गेली. मला जसं राहायचंय तसं मी राहणार, नि तिला जसं राहायचंय तशी ती राहणार. आमच्या दोघांचं एकच घर असेल असं नाही. तिनं कुठंही राहावं. आणि आठवड्यातून दोन दिवस एकत्र घालवावे. कधी फिरायला-सायकलिंगला जावं, कधी तिच्या घरी किंवा माझ्या घरी पडून राहावं. भांडावं-तंटावं. पण तेवढ्यापुरतंच. अगदीच मुक्त नाही; पण सूक्ष्मशा दोरीनं एकमेकांना बांधलेलं असावं, अशा फँटसीत रमणारा माणूस असल्यामुळे मी एकटाच राहिलोय. सध्याचे सर्व स्तरावरचे निकराचे प्रश्न नि चढाओढ बघता मला स्वतःला एकटं असणं जास्त फायदेशीर वाटतंय. मला गर्भाशय नसल्याने मी तसा निवांत राहू शकतो, हे मला चांगलंच माहितीये.
तर असा माझा एकांतवास फळतफुलत गेला. कोणाशीच बोलू नये, कोणालाच भेटू नये, असं जे आधी वाटायचं ते लोक म्हणजे नातेवाईक हे कळून चुकलं. त्याऐवजी समोरच्याकडून कसल्याही अपेक्षा न ठेवता किंवा कमीत कमी देवाणघेवाणावर आधारलेलं नातं ठेवायचं असं ठरवलं. माणसाच्या वाढलेल्या मानसिक गरजा शेअर करण्यासाठी व्यक्ती आजूबाजूला असायलाच हव्यात, असं वाटतं. ज्यांच्याशी कधीही, वाटेल तेव्हा, बोलता आलं पाहिजे. पण ते दिवस आता राहिले नाहीयेत. आपल्या सर्वांचा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ‘गदारोळ’ एवढा प्रचंड वाढलाय की, एकमेकांशी भेटण्या-बोलण्यातसुद्धा सोय बघितली जाते. अर्थातच, ह्याला काही अपवाद आहेतच. नि त्यातले काही अपवाद माझ्यासोबत आहेत, हे माझं नशीब समजतो. मग मी असं ठरवलं की, मानसिक गरजाच वाढवायच्या नाहीत. जेव्हा निराश वाटेल तेव्हा कोणालाच फोन करायचा नाही. आपण स्वतःच स्वतःशी डील करायचं. जेव्हा खूप आनंद होईल, तेव्हाही फोन, फेबु न वापरता, त्याची बातमी न करता स्वतःतच रिचवायचं. एकटा राहताना मरतानाही मी एकटाच असणारे. तेव्हा होणार्या वेदनाही एकट्यानंच पचवायच्या आहेत. एकदा मेलो की माझ्या शरीराला कोल्ह्याकुत्र्यांनी खाल्लं तर मला बरंच वाटेल. हे बोलायला सोपं असलं तरी स्वीकारणं खूप अवघड आहे. पण ठरवलंच तर करता येतं. मला या पातळीवर यायला दहा वर्षं झगडावं लागलंय. खरं तर, माणूस तसा पूर्ण एकटा राहू शकत नाही. किंवा कोणा एखाद्याला जमलं म्हणून सगळ्यांनाच जमू शकत नाही. माणूसनामक रसायन वेगळंच आहे. तो अजिबात स्वावलंबी वगैरे नाही. माणूस परस्परावलंबी आहे. पण सध्या त्याचा अतिरेक झालेला दिसतो. धर्म, आर्थिक व्यवस्था, कला-साहित्य, राजकारण सगळंच सोशल मीडिया मार्फत ‘कडेलोट पॉईंट’ला जाऊन पोहोचल्यासारखं वाटतंय. आणि तो कडेलोट पॉईंट कोरोनाच्या रूपात आलाच आहे. बर्याच पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलेलंही होतं की, २०२० सालापासून विनाशाची प्रक्रिया वेगवान होईल. खरं तर आधी ते २०५० सालापासून होईल असं म्हणत होते. पण गेल्या दहा वर्षांतच वेग प्रचंड वाढला. ही विनाशप्रक्रिया वेगवान व्हायला एक प्रमुख कारण : मधमाश्यांचं नाहीसं होणं, हेही आहे, हे कोणाला सांगूनही पटणार नाही. ‘वाघ वाचवा’ या लोकप्रिय मोहिमेत मश्गुल असणार्यांना मधमाशांची पोळीच्या पोळी हिसकावून काढली गेलेली दिसलीही नसतील. मधमाशांची आवडती मोहरलेली झाडं आंबा, जांभळीसारखी झाडं कमी झालेली कळलीही नसतील. जी काही आंब्याची झाडं आहेत त्यावर फवारणी करून, ती विषारी बनली आहेत. बरं, दुसरीकडे ‘वाघ वाचवा मोहीम’ही नुसती घोषणांपुरतीच मर्यादित राहिली.
=================================================================================
मी परत माझ्याकडे वळतो. खाण्याचं व्यवस्थित बसल्यावर मग मला जरा वेळ मिळू लागला. डोक्यात परत भराभरा काय काय जमू लागलं. शहरात आपण यांव करायचो, त्यांव करायचो. दिवसभर कसे भरकटलेले असायचो. या माझ्या ‘शहरी गदारोळा’वर मग एक कादंबरीच लिहून टाकली. गावात निवांत बसून शहरावर लिखाण करायला वेगळीच मजा आली. लिहिताना प्रत्येक क्षणी शहर नि गावातला फरक जाणवू लागला. शहरातल्यांना वाटतं की, गावकरी कसे साधेभोळे असतात. पण गावात एक महिना राहिल्यावर कळतं, हे लोक साधेभोळे नाहीत तर चांगलेच डांबरट आहेत. गावातलं सामाजिक वातावरण कसं कोंडलेलं असतं, हे जाणवलं. प्रत्येकाचं दुसर्यावर लक्ष असतं. हा काय करतो, ह्यानं पिशवीत काय आणलंय, हा आज इकडे का आलाय, तो त्याला काय बोलला. हे स्वताच्या समाजातल्या माणसावर ‘आपला’ म्हणून जसं चालू असतं, तसंच दुसर्या समाजातल्या माणसावर ‘परका’ म्हणून चालू असतं. त्यामुळे मनातून सगळेच अस्वस्थ असतात. जातीजातीचं, वाडीवाडीचं बाह्य राजकारण जसं असतं, तसंच जातीअंतर्गत, वाडीअंतर्गत एवढंच काय कुटुंबांतर्गतही बर्याच भानगडी असतात. मी वरच्या जातीतला; वाडवडलांचं ओरबाडून, शहरातल्या गर्दीला वैतागून गावाकडे आलो. तर इथले शूद्र ठरवले गेलेले लोक ह्या वडिलोपार्जित मोरल पोलिसिंगला कंटाळून शहराकडे पळाले. मला नको ती गर्दी, असं वाटलं. तर शूद्रांना नको तो गावाचा जाच, असं वाटलं. शहरातल्या गर्दीत ते मजबुरीनं राहतात. पडेल ती कामं करतात. त्यांचं शोषण अजूनही संपलेलं नाही. उलट ते इतकं अंगवळणी पडलंय. कारण व्यवस्थाच तशी बनवलेली आहे, की ‘बहुसंख्याक’ ते शोषण आहे हे मान्यही करत नाहीत. उलट रोजगार वाढला म्हणून गौरवीकरण करतील. या शोषणात सर्वात खाली स्त्रियांना नेऊन ठेवलंय. या व्यवस्थेत तरुण मुलींवर भयंकर बंधनं असतात. घारीसारखं लक्ष असतं प्रत्येकाचं. तरीही काही पोरंपोरी नैसर्गिक ऊर्मीच्या हाकेला ओ देऊन आंतरजातीय लग्न करतात तेव्हा मला भारी वाटतं. असं लग्न करणं अजूनही वाटतं तेवढं सोपं नाहीये. ह्यावर वेगळाच लेख लिहिता येऊ शकेल. लेख कशाला कादंबरीच.
हळूहळू मी जेवण करण्यात तरबेज झालो. पडवीत खरंच तीन दगडांवरची चूल उभारली. त्यावर सकाळचा चहा नि दुपारचा भात करायचा. धगीवर शिजलेला भात हा चवीला नि आरोग्यालाही बेस्ट. रोज मूगडाळ घालून खिचडी करण्याचा कंटाळा आला. एक दिवस गावातल्या एका म्हातारीशी ओळख झाली. तिच्या आधार कार्डाचं काम मी करून दिलं. तिला आधार कार्ड काढायचं होतं पण कोणीच मदत करत नव्हतं. लिहितावाचता येत नसल्याने काय करावं तिला कळत नव्हतं. ह्या आधार कार्ड मिळवण्याचीही एक वेगळीच गोष्ट होईल. तर त्या म्हातारीनं मला वाटण कसं करायचं ते सांगितलं. घरातली सुक्या खोबर्याची वाटी देऊन शुभेच्छा दिल्या. म्हातारीनं सांगितल्यानुसार, खोबरं भाजून, मिरची, लसूण टाकून वाटण बनवलं. मग अंडी आणून मस्तपैकी करी केली. मग मला वाटण बनवायचा चस्काच लागला. मग चवळी, मूग, कडवे वाल आणले. ते फुगत घालून उसळी बनवायला शिकलो. ह्या कडव्या वालांची सालपटं काढण्यात कसा वेळ जातो, नि भूक लागली असल्यानं किती वैताग येतो, हे अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. गावात आठवड्यात तीन वार नॉनव्हेज खाण्यासाठी राखलेले आहेत. त्यादिवशी खाडीवरून खारविणी मच्छी घेऊन येतात. पूर्वी मच्छी मी विकत घेऊन दुसर्याच्या पाया पडून, थोडे पैसे देऊन, बनवून द्यायला सांगायचो. आता मच्छी साफ करण्यापासून त्याला मसाला लावून तळण्यापर्यंत किंवा कालवणही करण्यापर्यंत मजल मारली. कुठल्याही चविष्ट जेवणामागे वाटणाचा हात आहे. वाटण जमलं की रस्सा जमलाच. पूर्वी हात न फिरवल्यानं तांदूळ, डाळी, तिखट सारखं खराब व्हायचं. मग ते मी सरळ टाकून द्यायचो. आता ते अधूनमधून उन्हात वाळवायला शिकलो. दूधाचं विवक्षित वेळेला विरजण घालून दही, नि दह्याचं ताक करायलाही येतंय. ताक हा मध्यम मार्ग आहे. लोणी, तूपाची गरज नाही. थोडक्यात, मी आता एक ‘सुगरण सखू’ झालोय.
हे व्याप सांभाळत, डोक्यातलंही लिहून काढतं, स्वतःला मोकळं करत आणखी एका मुलीला जन्म दिला. म्हणजेच कादंबरी प्रकाशित झाली, तेव्हा खर्या अर्थानं कष्टकरी सखूबाईशी जोडल्यासारखं वाटलं. खरंतर तिच्याएवढी मी मेहनत केली नाहीये. तिच्यासारखं अख्ख्या घराला सांभाळलं नाहीये. तिला पिरीएड्सच्या वेळी होणारा त्रास अनुभवला नाहीये. मला कितीही वाटलं तरी हा एवढा एक अनुभव मला घेणं अशक्यच आहे. जाहिरातीत दाखवतात तसं ‘स्टे फ्री’ नॅपकीन, पॅड वापरून निवांत राहता येत नाही. कुठलीही बाई, हे त्रास अंगभर सहन करून, घरचं सगळं करून, पावसाळ्यात लावणी करते. दिवाळीत जेव्हा शेतातून भाताच्या लोंब्या जमिनीला टेकायला लागतात, नि तेव्हाच तिचा गर्भ अंकुरतो तेव्हा तिला काय वाटत असेल? या तिच्या भावनेशी मी जोडून घेऊ शकतो. माणूस म्हणून माझ्यात नि सखूत भेद नाहीत.
=================================================================================
मी सतत लिहित बसत नाही. बरेच जण मला सांगतात, रोज काहीतरी लिहित जा वगैरे. मला ते जमत नाही. घेतलेले अनुभव रवंथ करून, त्यावर कल्पनांचे साज चढवून जेव्हा ते माझ्याशी गळ्याशी येतील तेव्हाच मी लिहायला बसेन. तोवर नाही. मग एखादी कादंबरी जन्माला घातल्यावर परत नव-नवीन अनुभवांशी समागम सुरू होतो. या दृष्टीने मी भाग्यवानच खरा. शाळेत असं जगण्याशी भिडायला शिकवलं जात नाही. नवनवीन अनुभव, नवीन विचार, नवीन प्रश्न या सगळ्याशी कुठल्याही सत्तादार्यांचं नि त्यांनी बनवलेल्या व्यवस्थेचं वाकडं असतं. शाळेत तर एकदम चाकोरीबद्ध असतं. जे पाठ करून पास होता येतं. एखाद्याला किंवा एखादीला झाडं-पशुपक्षी, शेती-भाती, शिवण-टिपण, नदी-नाले यांच्याविषयी असणारं ज्ञान अवांतर समजलं जातं. त्यामुळे आपोआपच (पद्धतशीरपणे) आदिवासी-ग्रामीण भागातली मुलंमुली बाजूला पडतात. शहरी मुलांना ग्रामीण आयुष्य जगायचे धडे दिले जात नाहीत. सर्वत्र शहरी पद्धत प्रमाण ठेवली जाते. गांधींजींच्या अनेक विसरलेल्या मंत्रांपैकी एक ‘खेड्याकडे चला’ हाही आहे.
कादंबरी लिहून झाल्यावर मला लिहायचा कंटाळा आला, नि वाचायलाही बोअर झालं. तसा मी गावात फिरू लागलो. जवळपास सगळ्यांना माझ्याबद्दल कुतूहल होतं. हा बामन शहरातून इथं कशाला मरायला आलाय? इथं करतो काय हा? असे प्रश्न होते. काहींच्या मनात संशय होता की, हा तडीपार असावा. मला गावातले जवळ राहणारे काही ठरावीकच जण माहीत होते. मग मी आणखी काहींशी ओळख वाढवली. त्यातून मला कामाला बोलवायला लागले. म्हणजे झालं असं की, आधी एकानं बोलावलं. हा कुळवाडी होता. रोंघ्या त्याचं नाव. त्याचं कूळ आमच्या घराजवळ राहणार्या खोतासाठी पिढ्यानपिढ्या खपत होतं. आता ते सगळं संपलं असलं तरी हा रोंघ्या सवयीने अजूनही त्या खोताकडे जातो. जाताना माझ्या घरावरून जातो. त्यामुळे गप्पा मारता मारता त्याची नि माझी चांगली घसमट झाली होती. त्याच्या दुसर्या एका मालकाला गोबरगॅससाठी खड्डे मारायचे होते. या कामासाठी एक माणूस कमी पडत होता. म्हणून त्यानं मला विचारलं. मी हो म्हणालो. मग दोन दिवस ते खड्डे मारायचं काम केलं. सायकलिंग केल्यामुळे तशी कष्टाची सवय होती. पण हे मजुरीवर काम करणं वेगळं. कारण इथे पैसे लावले असल्यामुळे मालक क्षणभरही बसून देत नाही. घमेल्यात माती भरून बाजूला टाकणं हे माझं काम. टिकाव घेऊन खोदणं, माझ्याच्यानं झालं नाही. सर्व शक्ती लावून माझा टिकाव एखादा इंचच रुतायचा. आणि रोंघ्याचा सहा-सात इंच. तेव्हा मी नुसती माती भरून बाजूला टाकत राहिलो. हे काम तसं रस्त्यालगत चाललं होतं. जाणार्यायेणार्याचं लक्ष हमखास आमच्याकडे जायचं. तेव्हा गावच्या सर्व नजरांना तोंड देताना मला कसंतरी व्हायचं. बामन कुळवाड्याबरोबर काम करतोय हे गावभर झालं. कशाला हे काम करतोय, असंही वाटलं. पण तो रोंघ्या माझा गुरू ठरला. त्यानं मला थेट विचारलं, ‘काय बामना, लाज वाटतीव?’ मी काहीच बोललो नाही. तो मला म्हणाला, ‘तुला दोन पैसं कमवायचंत ना, मग दुसरा काय म्हनतोय त्याच्याकडं दुर्लक्ष कर. आपन आपल्या शब्दाला ठाम राहायचं. बोलनारे गेले बा झवीत.’ मग मला एकदम उत्साह आला. मी अमुक अमुक काम केलं हे अख्ख्या गावात झालं. पण मी दुर्लक्ष केलं. मग त्यानं माझ्याकडून अनेक कामं करवून घेतली. पेंढे भरणं, लाकडं भरणं वगैरे. हळूहळू सगळ्यांच्याच हे सवयीचं झालं. आता मला कोणीही कामाला बोलावतं. शेतीसुद्धा खरं तर नैसर्गिक नाही. जंगलं सपाट करून माणसानं शेती कसायला सुरुवात केली. काहींच्या मते सर्व कृत्रिम व्यवस्थांचा उगम शेतीपास्न झाला. ही जाणीव झाल्यावर काय करू काय नको असं झालं. तरीसुद्धा मी उन्हाळ्यापासून बुद्धवाडीतल्या बारक्याबाबांच्या शेतावर भाजवणीचं काम केलं, चोंढ्याला बांध घातले. पाऊस सुरू झाल्यावर लावणी केली. त्याबदल्यात मजुरी नि थोडे तांदूळ कमावले. हे काम अजिबात सोपं नव्हतं. खाली वाकून, ओणवं बसून, उचलून शरीराचे आटे ढिले व्हायची वेळ आली. एकच क्रिया सारखी सारखी करावी लागते. म्हणजे बांधावर माती टाकायची असेल तर, एकानं फावड्यानं माती घमेल्यात भरायची, नि दुसर्यानं ते घमेलं डोक्यावर घेऊन बांधावर माती टाकायची. ह्यात एकच क्रिया दिवसभर चालू राहते. अशा वेळी वैताग येतो. एकच क्रिया करण्याची माणसाला अजिबात सवय नसते. लावणीत ढोपरभर चिखलातून खाली वाकून आवण काढणं, ते लावणं कठीण असतं. उन्हाळ्यात सूर्य अक्षरश: आग ओकत असतो. उन्हाच्या तडाख्यानं चक्कर येईल की काय असं वाटत होतं. घरातली थंडगार खोली आठवायला लागते. तहानेनं घसा कोरडा पडल्यावर कोल्ड्रिंकची गार बाटली हवीशी वाटू लागते. हेच ते माझं प्रिव्हिलेज्ड असणं. कारण शेतकरी मनात पावसाची प्रार्थना करत असतो. तो कधी पडेल? हव्या त्या वेळी तेवढाच पडेल ना? पीक नीट येईल का? हे विचार असतात. रात्री पायाची आग आग होत होती. हातात एक कूस गेलं होतं, तेही जाचत होतं. इतकं काम केल्यावर सात तास इतकी गाढ झोप आलीये की, बस्स. असं कष्टाचं काम चार-चार दिवस सलग करणं एक दिव्यच असतं. तळहात नि तळपाय घट्ट व्हायला लागतात.
आता उलटसुलट विचारांची मला देणगी असल्याने मला असंही वाटतं की, हे सर्व मी वरच्या जातीचा असल्यानं करू शकलो. असं कुणाकडेही जाणं, बोलणं, खाणं? इतकं प्रिव्हिलेज वरच्या जातीतल्यांनाच असू शकतं. हवेत उंच जाऊन भिंग लावून गावाकडे नीट बघितलं तर असं दिसतं की, प्रत्येक समाजाचे कप्पे आहेत. इतर समाजाशी वरवरचे व्यवहारापुरते संबंध आहेत. काही वेळा ते ढोंगी झालेलेही दिसतात. असे संबंध एका घावासरशी तुटून पडू शकतात. एखादा कुळवाडी बुद्धाकडे कामाला जाईल, त्याच्याकडचा भात घेईल; पण जेवायला मात्र स्वताच्या घरात येईल. बुद्ध समाज मुस्लिमांना बेकार समजतील. एक समाज दुसर्या समाजाला शिव्याच देईल. ‘स्त्री किंवा मुलगी’ यांच्यावर फोकस केला तर, झाडून सर्वच समाजांमध्ये पितृसत्ताक पद्धत कार्यरत असल्याचं दिसतं. बर्याचदा बायकाही या व्यवस्थेचा अर्क प्यायल्यानं त्याला शरण गेलेल्या असतात. महात्मा फुल्यांपासून बाबासाहेबांपर्यंत अथक असं काम करूनसुद्धा झाडून सगळेच समाज आपापल्या प्रथापरंपरांची तटबंदी उभारून बंदिस्त झालेले दिसतील. जातिव्यवस्थेची अशी खोलवर गेलेली जटील मुळं उखडायला ‘आंतरजातीय लग्न’ हा चांगला उपाय आहे म्हणतात. तसाच आणखी एक उपाय म्हणजे तथाकथित खालच्या जातीच्या लोकांकडे कामाला जाणं. भंगार जमा करणं, हॉटेलात तेही बारमध्ये वेटरची नोकरी करणं, हातगाडीचा धंदा, दूध-पेपर घरपोच पोहोचवणं इ. कामं केली पाहिजेत. मग लक्षात येईल प्रिव्हिलेज्ड असणं म्हणजे काय असतं ते? त्यांच्याशी त्यांच्या बोलीभाषेतच (तथाकथित अशुद्ध भाषा) बोलणं; त्यांच्यासोबत जेवण करणं; ते जे खातील ते खाणं. त्यांच्यासारखी चपाती डाव्या हातात धरून खाणं, नि ताटातच हात धुणं. त्यांच्या घरी पाय लांब करून झोपणं. भेदाभेदाची पाळंमुळं ही इतक्या क्षुल्लक गोष्टींपर्यंत पसरली आहेत. त्यामुळे ती उखडायलाही तितकंच खोल जावं लागेल. या सवयी अंगी बाणल्याशिवाय ते शक्य नाही.
शारीरिक कष्टाचं काम केलं की, त्रास न होता हलकं वाटतं. मानसिक आयुष्य चांगलं ठेवायचं असेल, तर शारीरिक कष्टालाही पर्याय नाही. बुद्धी धारदार करायची असेल, तर उलटसुलट विचारांना पर्याय नाही. दोन्हीही जमलं पाहिजे. इथंच बुद्धानं सांगितलेला ‘मध्यम मार्ग’ कामी येतो. या मध्यम मार्गावर विचार करूनच, फक्त विचार नाही कृती करून इथपर्यंत आलोय. दिलीपतात्यांची निसर्गस्नेही जीवनशैली काय किंवा बुद्धानं सांगितलेला ‘अष्टांगमार्ग’ पूर्णत: स्वीकारणं अवघड आहे. तसा ढोंगीपणा माझ्यातही भिनलाय. मी नैतिकतेचा विडा उचललेला नाही. म्हणून काही सवयी, गोष्टी सोडता येत नाहीत. म्हणजे थोडे पैसे हवेत म्हणून थोडं काम. इथलं स्थानिक शारीरिक काम करायचं, तसंच पुण्यातून येणारी टाइपिंग, प्रूफ रिडींग ही बैठी कामंही करायची. त्यासाठी लॅपटॉप वापरायचा. रोज एखादा तास फिल्म बघायची. मी रोज दीड जीबी डेटा मिळणारा रिचार्ज करत नाही. महिन्याला दीड जीबी मिळेल एवढंच बघतो. कामाच्या काही ई-मेल्स नि फेबुवर जाऊन पंधरा मिनिटं नुस्त लोकांचं काय चाललंय बघायला हे पुरतं. फेबुवर गंभीरपणे काहीही लिहायचं नाही ठरवलंय. त्यावर टंगळमंगळच करायची. लोकांचं काय चाललंय हे बघण्यात मला लेखक म्हणून जाम इंट्रेस्ट आहे. त्यामुळे फेबुवरचा टाइमपास खरं तर फायद्याचा ठरतो. नि आपण जे मिनिमल जगतोय ते किती बरोबर आहे हेही सतत डोक्यात पक्कं होत राहतं. गदारोळात सहभागी न होता; त्याची कधीकधी मजाही घ्यायची असते. एखाद दोन शिव्याही घालायच्या. आयभैनीवरनं शिव्या देताना माझ्या डोक्यात असतं ते म्हणजे राग व्यक्त करून मोकळं होणं.
खाण्यापिण्यातही बदल केलेत. साखरे ऐवजी गूळ वापरतोय. गूळ महाग असल्यानं आपोआपच त्याचा वापर कमी झालाय. मटण-मच्छी खातो. पण कधीतरीच. ठरवून आठवड्याला तीन वेळा नाही. ब्रॉयलर चिकन पूर्णपणे बंद केलंय. गाईचं दूध मी घेतो; पण ती गावठी आहे असं बघून. मी आणि माझी ती ‘बयो’ गाय एकाच गावात असल्याने कधी कधी कोवळा पाला, फळांच्या साली, काजूची बोंडं, फणसाच्या कुयर्या, असं गोळा करून तिला खायला देतो. उन्हाळ्याच्या दिवसात फणस, पपई, करवंद अशी फळं आणून त्यावर दिवस घालवतो. पोकळा, हिरवा माठ, मेथी अशी दारची पालेभाजी परसात वाढवली आहे. दारू प्यायल्यावरही माझ्यातला आस्वादक माणूस जिवंत राहील याची दक्षता घेऊन रात्री दोन पॅक मारतो. मोठमोठ्या ब्रँडची दारू पिऊन वेगळं काही होत नाही. म्हणजे अडीच लाखाचं घड्य़ाळही मरणाची वेळच दाखवतं. माझ्या एकट्याच्या सेक्शुअल लाइफबद्दलचं ‘गॉसिपिंग’ आधी केलंच आहे. मास्टर्बेशन रोज रोज करण्याची इच्छा असायची. पॉर्न अडिक्ट होईन असं वाटत होतं. हळूहळू थंडावत गेलो. तरी पूर्ण नाहीच. महिन्याभरानं पुण्याला जाऊन वाडवडलांची भेट घेतो. मित्र-मैत्रिणींना भेटतो. कामासाठीही भेटीगाठी होतात. हे सगळं करताना एक कायम डोक्यात ठेवतो की, आपण निसर्गाला लुबाडतोय. आपण माणसामाणसाला धर्म, वंश, जातीत विभागून जगण्याची वाट लावली आहे. हे एकदा स्वताशी मान्य केलं की, मगच त्यावर पुढे काहीतरी उत्तर शोधून काढायची प्रेरणा मिळत राहते.
हळूहळू माझ्या आत ताणून बांधलेल्या शिरान् शिरा मोकळ्या होत गेल्या. माझे सगळे समज-गैरसमज धडाधड बदलत गेले. बुद्धानं कधीच सांगून ठेवलेलं आर्यसत्य जाणवलं. पृथ्वीवर कुठल्याही माणसांच्या प्रदेशात जा... बर्फात, किंवा वाळवंटात जिथे तिथे समस्या आ वासून उभ्या आहेत. इच्छा आहेत. त्यामुळे दु:ख आहेच. त्यातून सुटका करायची असेल तर, दु:खाचा स्वीकार करणं! परिवर्तनप्रिय बुद्धाचा स्वीकार करणं! एवढा एकच अवघड मार्ग आहे.
=================================================================================
अशा प्रकारे शेवट करायचा झाला तर एवढंच सांगेन की, प्रत्येक माणसाची वैचारिक प्रक्रिया वेगळी असते. ज्यांना त्यांच्यावर केलेलं ‘कंडिशनिंग’ मोडता येतं, ते स्वतंत्रपणे विचार करू शकतात. स्वतंत्र विचार ही पहिली पायरी झाली. त्यापुढची पायरी म्हणजे स्वताची चिकित्सा. ह्या चिकित्सेमुळे आपण निसर्गाचा एक भाग आहोत याची जाणीव होते. जे आपण विसरून गेलो आहोत. उत्क्रांतीच्या झपाट्यात बुद्धीचा नीट वापर करून निसर्गाशी जोडून राहण्याऐवजी माणसानं आपण कोणीतरी सर्वश्रेष्ठ जमात आहोत, कुणीतरी फार मोठे इंटलेक्च्युअल आहोत, अशी तर्ककर्कश्श व ‘थोर’ भूमिका घेतली. निसर्गाचीच संसाधनं लुबाडून स्वतःची काहीतरी वेगळी व्यवस्था निर्माण करणं, ह्या व्यवस्थेच्या अंतर्गत ठरावीक जातींना श्रेष्ठ ठरवून इतर जातींचं शोषण करणं, अशी ही थोर भूमिका भयंकर दुटप्पी नि निसर्गापासून दुरावलेली आहे. निसर्गाला वचकून राहणार्या, सूर्य, चंद्र, अग्नि यांना देव समजून त्यांना आदर देणार्या ‘शमन’ माणसाचा औद्योगिकीकरणानंतर कायापालट झाला. प्रत्येक व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटू लागले. प्रत्येकाची कॉलर ताठ झाली. प्रत्येकाचे नसते उद्योग जोरात वाढले. तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मात्र कशालाच धरबंध राहिला नाही. निसर्गाशीच तो खेळू लागला. वातावरणाला भोकं पाडू लागला. जंगलं, पर्वत, नदीनाले चहूबाजूनं ओरबाडू लागला. कधीतरी हे सर्व लयास जाणारं होतं. त्याची सुरुवात आता झाली आहे. कोरोनानामक इवल्याशा विषाणूनं माणसाच्या प्रत्येक व्यवस्थेला वेठीस धरलंय. जसा माणूस गाईगुरं-प्राणीपक्ष्यांना बांधून ठेवत आला, त्या माणसालाच एका ‘सूक्ष्म’ विषाणूनं घरात कोंडलंय, हे बघून मी कुठेतरी सुखावतो. पण त्याचवेळी ज्यांचा दोष नाही आणि जे बर्याच वेळा गरजा भागवत जगत आलेत, अशा गरीब माणसांच्या डोक्यावर पाय देऊन राजकारणी नि श्रीमंतच जगत राहतील असा विचार येऊन खिन्न होतो. काही जण अजूनही स्वताच्या प्रतिष्ठेला जपत, प्रसिद्धीचं गाजर न सोडता मायाजालात ऑनलाईन शो, कवितावाचन, मुलाखती देण्यात दंग आहेत, हे पाहून त्यांना साष्टांग दंडवतही घालतो.
मी खूपच आशावादी नाही नि अगदीच निराशावादीही नाही. दुसर्यानं बदलावं, अशी अपेक्षा ठेवून स्वतःत बदल न करण्याचा ढोंगीपणाही करत नाही. मी बदललो तर जग बदलेल असा अतिरिक्त आशावादही बाळगत नाही. किंवा आता कसं होणार? अशी व्यर्थ चिंताही करत नाही. नियतीबियती किंवा प्रारब्धबिरब्ध मानून त्यावरही सोडून देत नाही. जितकी तीव्र आशा; जितका नियतीवर विश्वास; तितका निराशेचा झटका अधिक! मग तू नक्की करतोस तरी काय? तू माणूसच आहेस ना? हो.. मी माणूसच आहे नि मी जगतोय फक्त, भविष्य नि भूताचा फार विचार न करता. अति विचार करून काहीही फायदा नसतो, हे कळलंय. उलट शरीराला त्रास होतो. बुद्धाच्या सांगण्य़ाप्रमाणे काही करा दु:ख असणारच, हे सत्य स्वतात जिरवून, वर्तमानकाळाला उराशी धरून- आज, आत्ता, या क्षणी मला जे करता येतंय ते मी करतोय.
खलिल जिब्राननं त्याच्या एका कवितेत म्हटलंय, नदीला जेव्हा समुद्र दिसायला लागतो, तेव्हा तिला भीती वाटते. ती मागे वळून बघते. तिला परत मागे जावंसं वाटतं. पण ती आता अशा अवस्थेत असते की, मागे जाणं शक्य नसतं. आणि पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो. समुद्राला जाऊन मिळणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व नष्ट करणं नसतं. तर नविन अस्तित्व मिळवणं म्हणजेच समुद्र होऊन जाणं असतं.
गरजेपुरता जगत जगत मी खूप पुढे आलोय. नाहीतरी सगळं कधीतरी संपणारच आहे. निसर्गाला बहुधा हेच हवंय : परिवर्तन! माणसापासून मुक्ती! गरजेपुरतं चांगलं जगून आपल्यालाही निसर्गाचं होऊन जायचंय, हे स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाहीये.
हृषीकेश पाळंदे
hrishpalande@gmail.com
लेखकाची प्रकाशित पुस्तकं :
दोन चाकं आणि मी (प्रवासचिंतन) – प्रफुल्लता प्रकाशन, पुणे.
बयो (कादंबरी) – प्रफुल्लता प्रकाशन, पुणे.
भरकटेश्वर (कादंबरी) - शब्द पब्लिकेशन्स, बोरिवली.
झुरांगलिंग (कादंबरी) – रोहन प्रकाशन, पुणे.