हा ‘पैसा’ नावाचा इतिहास आहे
मानवी इतिहासाच्या संदर्भांत राजकीय, आर्थिक, सामाजिक, मानसिक या जगण्याच्या विविध बाजू एकमेकींवर सतत प्रभाव टाकत असतात. समूहजीवनावर विशेष ताकदीचा प्रभाव टाकणाऱ्या व्यवस्था म्हणून राजकीय आणि आर्थिक या दोन्ही व्यवस्थांचं गतिशास्त्र समजून घेताना समूहव्यवस्था, राष्ट्र, चलन, व्यापार यांचा संकल्पनात्मक इतिहास समजून घेण्यापासून प्रारंभ करावा घ्यावा लागतो आणि हा शोध आपल्याला ‘घटना’, ‘घटनेमागील कारणं’ आणि ‘घटनेचे परिणाम’ या मुख्य बिंदूंपाशी नेतो. ही साखळी अर्थातच गुंतागुंतीची आहे आणि या साखळीचा क्रम समजून घेणं आपल्या ‘ऐतिहासिक आकलना’त भर घालणारं आहे. औद्योगिक क्रांतीनंतरच्या जागतिक अर्थकारणाची पाळेमुळे आपल्यासमोर आणत, चलन आणि व्यापार या संदर्भाने विविध देशांमधील आंतरसंबंध तपासत एकविसाव्या शतकातील अर्थव्यवस्थेचं चित्र स्पष्ट करणारी आनंद मोरे यांची ही अभ्यासपूर्ण, आर्थिक गुंतागुंत सुलभतेने उलगडत जाणारी लेखमालिका याच जातकुळीतील आहे.