जमातवादी दंगली आणि भारतीय पोलीस
भारताच्या वर्तमानावर सातत्याने आघात करणारा भारताच्या इतिहासातील एक पैलू म्हणजे हिंदू-मुस्लिम जमातवाद. स्वातंत्र्यलढ्यात देशाला ग्रासून टाकणाऱ्या या मुद्द्याने स्वातंत्र्योत्तर काळात वारंवार आपलं डोकं वर काढलेलं आहे. आज तर धार्मिक ध्रुवीकरणाच्या पायावर उभं राहिलेलं सामाजिक-राजकीय ध्रुवीकरण शिगेला पोचल्याचं दिसतं आहे. या अस्वस्थ वर्तमानात जगत असताना जमातवादी दंगलींमधील पोलिसांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारं विभूती नारायण राय यांचं विजय दर्प यांनी अनुवादित केलेलं पुस्तक आपल्याला एक अंतर्दृष्टी देतं.
बहुसंख्य भारतीय पोलिस दंगलीच्या वेळी गणवेषाच्या आतली आपली 'हिंदू' ही ओळख विसरू शकत नाहीत आणि त्याचे पडसाद त्यांच्या कार्यपद्धतीवर पडतात हे या पुस्तकातून स्पष्ट होतं. हिंदू आणि मुस्लिम जमातवादाकडे आपल्याला काळजीपूर्वक पाहावं लागतं आणि या भावनिक मुद्द्यामागे कार्यरत असणाऱ्या ऐतिहासिक मानसिक घडणीला समजून घ्यावं लागतं हे खरं आहे. पण राज्यसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून पोलिस निष्पक्ष राहत नाहीत हे उद्विग्न करणारं आहे. १७१३ साली अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या ज्ञात दंगलीपासून १९९२-९३ च्या मुंबई दंगलीपर्यंत काही महत्त्वाच्या टप्प्यांवर पुस्तकात भाष्य करण्यात आलं आहे. केवळ आकडेवारी न देता पुस्तकात दंगलींमागचे मानसशास्त्र आणि समाजशास्त्र उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 'जमातवादी दंगली रस्त्यावर होण्याअगोदर भावनिक आणि बौद्धिक स्तरावर असतात' हे एका प्रकरणातील विधान पुरेसं बोलकं आहे. दंगलीत पहिला दगड कुणी फेकला यावरून दोषी कोण हे ठरवलं जात असलं तरी हातात दगड घेण्यापर्यंतची प्रक्रिया पाहिली तर समाजात आधीपासूनच असलेला ताण आणि दंगलीला उद्युक्त करणारी कृत्ये हे खरे दोषी असतात हे पुस्तकात विविध उदाहरणांनी स्पष्ट केलं आहे.
जमातवादी दंगली आणि भारतीय पोलीस विभूती नारायण राय अनुवाद : विजय दर्प लोकवाङ्मय गृह पृष्ठे : १४० किंमत : २२५ रु.