कोविड-१९, जागतिक वातावरण बदल आणि भविष्याची वाट
कोविड-१९ च्या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी काल अशक्यप्राय वाटणारे निर्णय आज घ्यावे लागले, आणि उघड्या डोळ्यांनी सारे जग आर्थिक मंदीला सामोरं गेलं. या पार्श्वभूमीवर पर्यावरणवादी गटांमध्ये दोन प्रश्नांवर विचार होतो आहे. (१) या जागतिक संकटाला तोंड देण्यासाठी टोकाचे व धाडसी निर्णय घेण्याची हिंमत जगभरातील शासनांनी दाखवली, तशीच जागतिक वातावरण बदलाच्या संकटाला तोंड देण्याची हिंमत दाखवली जाईल का? (२) कोविड-१९ च्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांमध्ये जागतिक वातावरण बदलाबाबतच्या उपाययोजना दुर्लक्षित होतील का?
कोविड-१९ रोग मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांमुळे – म्हणजेच बव्हंशी सधन सुखवस्तू माणसांद्वारे - जगभर पसरला. दाट लोकवस्ती, आरोग्याचे इतर प्रश्न असलेल्या कमी उत्पन्न गटातील वस्त्यांमध्ये संसर्ग टाळणे अशक्य होते. त्यामुळे अशा समूहांमध्ये त्याचा प्रसार झपाट्याने होतो व मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. संसर्गाचा वेग कमी करण्यासाठीच्या जालीम उपाययोजनांमुळेही हाच हातावर पोट असलेला वर्ग भरडला गेला. म्हणजे संकटाचे जनक सधन लोक, पण संकटाचा सर्वाधिक फटका गरिबांना बसला आहे.
जागतिक वातावरण बदलाचेही असेच आहे. याला कारणीभूत आहे खनिज इंधनांचा वारेमाप वापर. जगभरातील सधन सर्वात जास्त ऊर्जा वापरतात. म्हणजेच समस्या सधन लोकांनी निर्माण केली आहे. पण वातावरण बदलाच्या विविध परिणामांचा (उदा. महासागरांची वाढती पातळी, बदलत्या स्थानिक हवामानामुळे शेतीतली वाढती अनिश्चितता, नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ, इ.,) फटका जगभरातील गरिबांना सर्वात जास्त बसतो आहे.
कोविड-१९ ची जागतिक साथ हे एकजिनसी संकट आहे. एकमेकांमध्ये शारिरीक अंतर बाळगणे, कमालीची स्वच्छता राखणे आणि कोविड-१९ ची लागण झालेले रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना अलग करणे, याच सूत्रांवर आधारित उपाययोजना सर्वत्र राबवल्या जात आहेत. साथीची सुरूवात एका देशातून झाली, त्यामुळे लोकांना शिव्याशाप द्यायलाही एक स्पष्ट लक्ष्य मिळालेले आहे! लस निर्माण झाली आणि खूप लोकांना संसर्ग होऊन सामूहिक प्रतिकारशक्तीही वाढली, की या संकटाची तीव्रता कमी होईल.
जागतिक वातावरण बदलाला जगभरातील शहरी, सधन वर्गाची जीवनशैली जबाबदार आहे. ही समस्या गेल्या शतकाभरापासूनच्या मानवी व्यवहारांचा परिपाक आहे. तिचे परिणाम अनेक आहेत, आणि त्यातील काही कोविड-१९ च्या साथीप्रमाणेच तत्कालिक असले, तरी बरेचसे दीर्घकालीन व हळूहळू उलगडणारे आहेत. त्यामुळे यावरील उपाययोजनाही बहुआयामी आणि गुंतागुंतीच्या आहेत. १९९० पूर्वीच्या वातावरण बदलाची जबाबदारी औद्योगीकरणात आघाडी घेणाऱ्या देशांची आहे, पण १९९० नंतर या समस्येत चीन, भारत, ब्राझील, दक्षिण अफ्रिका यांचा वाटा चढत्या श्रेणीने वाढतो आहे. त्यामुळे दोषारोप कोणी कोणावर करायचा, हा प्रश्नच आहे.
कोविड-१९ ची आज असलेली साथ उद्या जाईल, पण अशा जागतिक साथी यापुढे येत राहतील. जैवविविधतेवर आपण घातलेला घाला आणि जागतिक वातावरण बदलामुळे बदलणारी स्थानिक हवामानचक्रे यांच्या एकत्रित परिणामांचा हा परिपाक आहे. कुपोषणामुळे गरीब व अनारोग्यपूर्ण जीवनशैलीमुळे सधन अशा दोन्ही वर्गांमध्ये अंगभूत रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे. त्यामुळे जुन्या व नव्या रोगांच्या स्थानिक आणि जागतिक साथी वारंवार येणार आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत राहणार असं दिसतं. त्यामुळे तत्कालिक टोकाच्या उपाययोजनांचे भीषण आर्थिक परिणाम पुन्हापुन्हा होणे टाळायचे असेल, तर या समस्येच्या मुळावर घाव घालणारे प्रतिबंधात्मक उपाय करायला हवेत. म्हणजेच जैवविविधतेचा ऱ्हास आणि जागतिक वातावरण बदल या दोन्ही समस्यांची उकल करणे आवश्यक आहे. त्यासाठी नैसर्गिक संसाधनांवरचा ताण कमी करणे, हाच महत्त्वाचा पर्याय आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार व व्यायाम, प्रदूषणमुक्त भवताल, मानसिक ताणतणावांपासून मुक्ती आवश्यक आहे. म्हणजेच सुविधा व संधींची समानता व सामाजिक न्याय हेही या उपायांचा भाग असायला हवेत.
सध्या भारत सरकारद्वारे कोविड-१९ च्या आर्थिक संकटावर मात करण्याच्या ज्या उपाययोजना जाहीर झाल्या आहेत, आणि प्रत्यक्ष ज्या प्रकारचे निर्णय होताना दिसत आहेत, त्यावरून केवळ तत्कालिक आर्थिक परिणाम झपाट्याने उलटवणे, इतकीच प्राथमिकता दिसते. समस्येच्या मुळांवर घाव घालण्याची ऊर्मी यात कोठेही दिसत नाही. पण त्याचबरोबर लोकांच्या पातळीवर मात्र बऱ्याच नव्या जाणिवा जाग्या झालेल्या दिसतात. शहरांमध्ये हवा, पाणी शुद्ध झालेले दिसते आहे. आपल्या परिसंस्थांमध्ये कावळे आणि कबुतरे यांच्याखेरीज इतरही जीवसृष्टी आहे, हे शहरी नागरिकांना अचानक उमगले आहे. बऱ्याच कामाच्याही गोष्टी प्रवास व दगदग टाळून होऊ शकतात, असा साक्षात्कार झाला आहे. आपल्या नेमक्या गरजा कोणत्या आणि चैनी कोणत्या, याचीही जाणीव या वर्गात वाढलेली दिसते. अन्नधान्य उत्पादक व पुरवठादार, कचरा व्यवस्थापक, वैद्यकीय कर्मचारी, इ. ना आपले स्वतःचे समाजातले खरे स्थान काय, हे कळले आहे. त्यांचा आत्मसन्मान आणि त्यांना समाजात मिळणारा आदरही वाढला आहे.
शहरांची आर्थिक कोंडी करावी लागल्यावर सर्वात जास्त फटका बसला तो रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजूरांना. एरवी डोळ्यासमोर असून अदृश्य असणाऱ्या कामगारांचे तांडे जेव्हा रस्त्यावर आले, तेव्हा त्यांच्या हृदयद्रावक हालअपेष्टाही विविध माध्यमांनी शहरी सधनांपर्यंत पोहचवल्या. यामुळेही बरेच लोक आतून हलले व हादरले आहेत. या मजुरांची ससेहोलपट टाळण्याची क्षमता असलेली व्यापक यंत्रणा असूनही सरकारी व्यवस्थांची असंवेदनशीलता व जडत्व आपल्याला दिसलं. त्याचवेळी सामाजिक संस्था व संघटनांनी कितीही धावून धावून प्रयत्न केले तरी ते अपुरे आहेत, हेही आपण पाहिले.
या साऱ्यामुळे वातावरण बदलाच्या संकटावरील उपायांना कळत-नकळत पाठिंबा वाढतो आहे. उधळपट्टीची जीवनशैली बदलायला हवी, हा विचार रुजतो आहे. गरिबांचा आक्रोश शासनयंत्रणांना आणि उद्योगधंद्यांना हलवत नाही, पण शहरी सधन वर्ग आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून उद्योगधंद्यांना बदलायला भाग पाडतो, आणि मग सरकारी धोरणं बदलण्याचा मार्गही मोकळा होतो. ह्या प्रक्रियेची किंचितशी सुरूवात होते आहे.
अर्थव्यवस्थेलाच सर्वेसर्वा मानणाऱ्यांचा आवाज मोठा होण्यापूर्वी हे बीज रुजून फोफावायला हवं. त्यासाठी सामाजिक व पर्यावरणीय कार्यकर्त्यांना बदलावं लागेल. शहरी लोकांना, उद्योगांना, शासनयंत्रणांना अपराधीपणाची भावना देण्यापेक्षा सकारात्मक बदलांचे मार्ग प्रभावी जाहिरात करून दाखवले पाहिजेत. पर्यावरणासाठी मतपेढीचे राजकारण करण्याचीही लवचिकता ठेवावी लागेल. मानवी इतिहासाला वेगळे वळण देण्याच्या संधीचं दार किलकिलं झालं आहे, ते बंद होऊ न देता जोर लावून आणखी उघडायला हवं.
प्रियदर्शिनी कर्वे
pkarve@samuchit.com
(भौतिकशास्त्रातील डॉक्टरेट मिळवलेल्या प्रियदर्शिनी कर्वे गेल्या वीस वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाशी संबंधित अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत. त्यांचे शोधनिबंध विविध नामांकित जर्नल्समधून प्रकाशित झाले आहेत. २००५ मध्ये त्यांनी 'समुचित एन्व्हायरो टेक' ही दैनंदिन वापरासाठी पर्यावरणीस्नेही उपकरणे निर्माण करणारी सामाजिक संस्था सुरू केली. जागतिक वातावरण बदल, नूतनीकरणक्षम ऊर्जा यावर काम करणाऱ्या विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांशी त्या जोडलेल्या आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.)