डांची (सांडणी)
पी. सिंकदर या लहान गावात बाकर या जाट मुसलमानाला आपल्या सामानाकडे लोभी नजरेने बघत असलेलं पाहून झाडाच्या सावलीमध्ये आराम करत असलेला नंदू चौधरी आपल्या मोठ्या आणि भेदक आवाजात ओरडला, “ए, ए काय करतो आहेस रे तिकडे?” हे म्हणत असताना त्याचा सहा फूट लांबीचा देह जो झाडाच्या सावलीमध्ये आराम करत पहुडला होता, तो खडबडून जागा झाला. त्याची छाती फुलून आली आणि बटणं तुटली असल्यामुळे, जाड्या-भरड्या खादीच्या कुर्त्यामधून त्याचा विशाल देह आणि मजबूत दंड बाहेर डोकावू लागले. बाकर थोडा जवळ आला. धुळीने भरलेली त्याची छोटीशी-काटेदार असलेली दाढी, भरगच्च मिशांच्या मध्ये, फसलेल्या त्याच्या दोन डोळ्यांमध्ये एका क्षणासाठी चमक आली आणि जरा हसून तो म्हणाला, “सांडणी बघत होतो. चौधरी. किती सुंदर आणि तरुण आहे ही, बघून डोळे तृप्त होतात अगदी”.
आपल्या मालाची स्तुती ऐकून नंदू चौधरीची काळजी काही प्रमाणात कमी झाली. प्रसन्न होऊन तो म्हणाला, “कोणती सांडणी?”
“तीच उजव्या बाजूने चौथी”, बाकर इशारा करत म्हणाला.
एका मोठ्या ओक वृक्षाच्या सावलीमध्ये आठ- दहा उंट बांधले गेले होते. त्यांच्या मध्येच ती तरुण, सुंदर सांडणी स्वत:ची लांब, सुंदर, सुडौल मान अधिकच उंच करुन, पानांनी गर्द भरलेल्या झाडांत तोंड घालून पाने खाण्यात मग्न होती.
पशू बाजारामध्ये जिथपर्यंत दूरवर नजर जात असे तिथपर्यंत मोठमोठ्या बेडौल म्हशी, सुंदर नागोरी शिंगं असलेले बैल आणि गाईंच्या शिवाय दुसरे काही दिसून येत नसे. गाढवे पण होतीच, पण अगदीच नगण्य. मोठ्या प्रमाणात उंटच दिसत असत. बहावल नगरातील वाळवंटात होणाऱ्या पशूंच्या बाजारात उंटांच अधिक्य असणं सुद्धा नैसर्गिकच होतं म्हणा! उंट वाळवंटातील प्राणी आहे. या वाळूने व्याप्त असलेल्या परिसरामध्ये दैनंदिन जीजीवनात शेतीची कामे, सामानाची ने-आण यासारखी कामे उंटाकडून करवून घेतली जातात. पूर्वीच्या काळी १०-१० रुपयांना गाय तर १५-१५ रुपयांना बैल मिळत असत. त्या काळात सुद्धा चांगला, तगडा, उंच बैल ५० रुपयांच्या आत हाती लागत नसे. आणि आता जेव्हा या प्रदेशात थोडी समृद्धी आली आहे, पाण्याची एवढी चणचण जाणवत नाही, अशा काळात उंटाचे महत्त्व कमी झालेले नाही तर उलट वाढलेच आहे. सवारी घेऊन जाणारे उंट २०० ते ३०० रुपयांपर्यंत मिळतात तर ओझी उचलण्याच्या कामी येणारे उंट १००-८० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत नाहीत.
थोडा अधिक जवळ जाऊन बाकर म्हणाला, “खरं सांगतो चौधरी हिच्यासारखी सुंदर सांडणी मी संपुर्ण बाजारात बघितली नाहीये". आनंदाने नंदूची छाती फुलून आली आणि तो म्हणाला, “माझ्या मुलीसारखी वाढवली आहे हिला. लाडाने खाऊ-पिऊ घातलं आहे”.
हळुवार आवाजात बाकरने पुन्हा विचारलं, “विकशील का?”
नंदू म्हणाला, “इकडे विकण्यासाठीच तर आणली आहे ना...”
“तर मग सांग कितीला देशील?”
नंदूने डोक्यापासून पायापर्यंत बाकरला एकदा न्याहाळले आणि हसून म्हणाला, “तुला हवी आहे का तुझ्या धन्यासाठी विचारतो आहेस?”
“मला हवीये”, आवाजात ठाम निश्चय दाखवत बाकर म्हणाला.
नंदूने नाराजीने मान नकारार्थी हलवली आणि मनात म्हणाला, ‘या नोकराची एवढी मजल, की अशी सुंदर सांडणी विकत घेईल? आणि मग मोठ्याने म्हणाला, “तु कशासाठी घेतो आहेस?”
बाकरच्या खिशामध्ये पडलेल्या १५० रुपयांच्या नोटा जशाच्या तशा बाहेर पडण्यासाठी व्याकूळ झाल्या होत्या. थोड्याश्या उत्साहानेच तो म्हणाला, “तुला काय करायचं आहे त्याच्याशी? कोणीही घेऊ देत... तुला तुझी किंमत मिळ्याल्याशी कारण. तू किंमत सांग.”.
नंदू त्याच्या जीर्ण झालेल्या कपड्यांकडे, त्याच्या गुडघ्यावर उठलेल्या डागांकडे आणि गुडघ्यापर्यंत वर आलेल्या जीर्ण लुंगीकडे आणि जन्माच्या वेळेपेक्षा जास्त जुन्या वाटणाऱ्या चपलांकडे पाहून त्याला टाळण्याच्या विचाराने म्हणाला, “अरे जा रे जा! तू १०-२० रुपये घेऊन आला असशील. हा माल १६० रुपयांपेक्षा कमी नाहीये."
एका क्षणासाठी चिंता करुन थकलेल्या बाकरच्या चेहऱ्यावर सुखाची लकेर झळकून गेली, त्याला ही भीती होती की चौधरी कदाचित अशी रक्कम सांगेल की जी त्याच्या कुवतीच्या बाहेरची असेल. पण स्वत:च्याच तोंडाने जेव्हा त्याने १६० रुपये सांगितले तेव्हा बाकरच्या खुशीला पारावार उरला नाही. १५० रुपये तर त्याच्याकडे होतेच. जर यावरही चौधरी तयार झाला नाही तर १०-२० रुपयांची उधारी करायला तो तयार होता. भाव वगैरे करायला तर त्याला काही जमत नसे. झटकन त्याने १५० च्या नोटा काढल्या आणि नंदूच्या पुढे फेकल्या आणि म्हणाला, “मोजून बघ, याहून अधिक माझ्याकडे नाहीत. यापुढे तुझी मर्जी!”
नंदूने अविश्वासपूर्ण मनाने नोटा मोजायला सुरुवात केली, परंतु रक्कम मोजता मोजताच त्याचे डोळे चमकत होते. त्याने तर बाकरला टाळण्यासाठी १६० रुपये सांगितले होते. बाजारामध्ये चांगल्या-चांगल्या सांडण्या १५० रुपयापर्यंत मिळतात आणि या सांडणीचे कोणी १४० रुपये देईल अशीदेखील त्याची अपेक्षा नव्हती. लगेचच तो मनातले लोभी भाव लपवत, जणू काही आपण बाकरवर उपकारच करत आहोत अशा आवेशात म्हणाला, “सांडणी तर माझी २०० ची आहे, पण तू भला माणूस दिसतो आहेस, म्हणून जाऊ दे!” आणि हे म्हणत म्हणतच त्याने सांडणीची दोरी बाकरच्या हातात दिली.
एका क्षणासाठी त्या कठोर माणसाचं मन भरुन आलं, ती सांडणी त्याच्या घरीच जन्माला आली होती आणि मोठी झाली होती. आज तिचं लालन-पालन करुन दुसऱ्याच्या हातात देताना त्याची अवस्था आपल्या मुलीला सासरी धाडणाऱ्या बापासारखी झाली होती. जराशा कापऱ्या आवाजात, नेहमीच्या खर्जेदार स्वरात थोडासा मऊपणा आणत तो म्हणाला, “या सांडणीला मी मोठ्या लाडाने वाढवले आहे. तूही तिची अशीच काळजी घे हो!” अगदी तशाच पद्धतीने जसं एखाद्या मुलीचे वडील आपल्या जावयाला सांगत असतात - माझी मुलगी खुप लाडात वाढली आहे, तिला अजिबात कष्ट देऊ नकोस.
मनोमन आनंदाचे पंख लावून उडणारा बाकर म्हणाला, “तुम्ही जरासुद्धा काळजी करु नका. मी तिला माझ्या जिवापलिकडे जपेन”. धोतराच्या ओच्यामध्ये काळजीपुर्वक नोटा ठेवत, सुकलेल्या गळ्याला थोडासा ओलावा देण्यासाठी पाण्याच्या मठातून मातीच्या प्यालात पाणी भरलं. बाजारामध्ये चहूबाजूंनी धूळ उडत होती. शहरामधल्या पशू बाजारांमध्येसुद्धा जिथे २०० एक पाण्याचे नळ असतात, पूर्ण दिवस जिथे पाण्याचा शिडकाव केला जातो, तिथेसुद्धा धूळ कमी होत नाही. मग वाळवंटातील बाजारात तर धुळीचं निर्विवाद साम्राज्य असणार होतंच.उसाच्या मालकांच्या उघड्या उसांवर, हलवायाच्या मिठाईवर, चटक-मटक पदार्थ विकणाऱ्यांच्या दही-वड्यांवर सगळ्या जागी धुळीचाच पूर्ण अधिकार होता.
माठात पाणी भरुन ठेवण्यासाठी पिण्याचे पाणी मोठ्या टाकीच्या आकाराच्या भांड्यामधून कॅनलमधून आणले जायचे, पण इथे येता येता ते पाणी चिखलासारखे खराब होऊन जायचे. नंदूचा विचार होता एकदा ते पाणी निवळलं की तो ते पाणी पिईल. पण त्याचा घसा कमालीचा कोरडा पडला होता. एकाच घोटात पेल्यातील पाणी संपवून त्याने बाकरलासुद्धा पाणी प्यायला सांगितले. बाकर आला होता तेव्हा त्याला कमालीची तहान लागली होती, पण आता त्याला पाणी पिण्यासाठी वेळच कुठे होता? त्याची रात्र होण्याच्या आधीच गावात पोचण्याची इच्छा होती. सांडणीची दोरी पकडून जणू काही पशू-बाजारात उठलेल्या धुळीला चिरत तो चालू लागला.
बाकरच्या मनात खूप पुर्वीपासून एक सुंदर आणि तरुण सांडणी विकत घेण्याची इच्छा होती. त्याची जात खालच्या स्तरातील होती. त्याचे पुर्वज कुंभाराचे काम करत असत. परंतु त्याच्या वडिलांनी हे परंपरागत काम सोडून देऊन मोलमजुरी करण्यास सुरुवात केली. वडिलांच्या नंतर बाकरसुद्धा मोलमजुरी करुनच आपला उदरनिर्वाह करत होता.कामापासून मात्र तो सतत लांब पळायचा. आणि का नाही पळणार? त्याची बायको दुप्पट करुन काम करुन त्याच्या कामाचा भार हलका करण्यास आणि त्याला आराम पुरवण्यास हजर होती. कुटुंब मोठं नव्हतं. एक तो, त्याची बायको आणि लहान मुलगी. मग कशाला कोण अधिक कामं करुन स्वत:च्या जिवाला कष्ट देईल? पण हाय रे क्रुर विधाता, ज्याने अनवधानाने त्याला सुखाच्या झोपेतून उठवलं आणि आपलं उत्तरदायित्व पार पाडण्यास भाग पाडलं.
पाच वर्षं झाली. त्याला आराम देणारी त्याची प्रिय बायको तिच्या लहान मुलीला सोडून वैकुंठवासी झाली. मरते वेळी, स्वत: मनातील सारी करुणा, आपल्या निस्तेज आणि खोल गेलेल्या डोळ्यात आणून ती बाकरला म्हणाली, “माझी रझिया आता तुमच्या हवाली आहे. तिला कष्ट देऊ नका." या एका वाक्याने बाकरचे संपूर्ण आयुष्य पालटले. तो दिवस-रात्र काम करत असे जेणेकरुन त्याच्या पत्नीची शेवटची निशाणी - त्याच्या गुडियाला दररोज नवीन, सुंदर गोष्टी आणून देऊ शकेल. जेव्हा कधी तो बाजारातून परत येत असे तेव्हा रझिया त्याच्या पायांना वेटोळं घालून बसे आणि स्वत:चे टपोरे डोळे त्याच्या धुळीने माखलेल्या चेहऱ्यावर रोखत त्याला विचारत असे, “अब्बा, माझ्यासाठी काय आणलं आहे?” बाकर तिला आपल्या खांद्यावर उचलून घेत असे आणि कधी मिठाई, कधी खेळणी यांनी तिची झोळी भरुन टाकत असे.
रझिया जेव्हा चार वर्षांची झाली तेव्हा एकदा उंचबळून आपल्या बाबांना म्हणाली, “अब्बा, मला एक सांडणी घेऊन द्या ना”. साधीभोळी निरागस मुलगी. तिला काय माहीत होतं की आपण एका संपत्ती नसलेल्या कामगाराची मुलगी आहोत ज्याच्यासाठी सांडणी घेणे तर दूरचीच गोष्ट पण त्याचा विचार करणेसुद्धा पाप आहे. कोरडा हसून बाकर तेव्हा तिला म्हणाला होता, “रझिया तू तर स्वत:च सांडणी आहेस." त्याने रझियाच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं टाळलं तर होतं पण त्या दिवशी त्याने मनोमन ही प्रतिज्ञा केली होती की एक दिवस तो रझियासाठी एक सुंदर सांडणी विकत घेईल. तो लांब-लांबच्या गावात मजुरीसाठी जायचा. पीक कापणीच्या वेळी दिवसरात्र तो शेतात पिकं काढायचा. पेरणीच्या दिवसात नांगर चालवायचा. पिकं पेरायचा. जेव्हा काही काम नसेल तेव्हा ८-१० कोस चालत जाऊन काम शोधायचा. दिवसाला ८-१० आणे मिळवल्याशिवाय घरी परतायचा नाही.
जेव्हा अंगणात खेळणाऱ्या रझियाला तो बघत असे, तेव्हा काम करण्याचा त्याचा उत्साह अधिक वाढत असे. आज दीड वर्षांच्या अथक मेहनतीनंतर तो त्याच्या मनातील, त्या जपून ठेवलेल्या इच्छा पूर्ण करु शकला होता. संध्याकाळची वेळ होती. पश्चिमेच्या बाजूने बुडत जाणारे सूर्यकिरण, पृथ्वीला सोन्याचे अंतिम दान करत होते. वाऱ्याचा थंड स्पर्श जाणवत होता आणि दूर शेतात टिटवीचा आवाजा घुमत होता. स्वप्नातून जागा झाल्याप्रमाणे बाकरने पश्चिम बाजूला अस्त होत चाललेल्या भास्कराला बघितलं आणि समोरच्या रस्त्यावर त्याची नजर स्थिर केली. त्याचं गाव अजूनही लांबच होतं. त्याने मागे बघून संथ गतीने येणाऱ्या सांडणीला चुचकारलं आणि अधिक वेगाने चालायला लागला. या विचाराने की आपण झोपण्याआधी रझिया झोपायला नको. मशीरमलची वेस दिसू लागली. इथून त्याचं गाव जवळ होतं. बाकरचा वेग मंदावला आणि सोबतच कल्पनेची देवी त्याच्या नजरेसमोर आपल्या रंगीबेरंगी कुंचल्यांनी चित्र साकारु लागली. बाकरने बघितलं, घरात पोचताच लहान रझिया प्रेमाने नाचत येऊन त्याला बिलगली आणि सांडणीला बघून तिच्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये आश्चर्य आणि उत्साह ओसंडून वाहत होता.
तो त्याच्या कल्पनेच्या जगात रमत वेशीजवळून जातच होता आणि त्याच्या डोक्यात असा काही विचार आला की तो थांबला आणि त्याने मशीरमल गावात प्रवेश केला. मशीरमल फार काही मोठं गाव नव्हतं. बाजारात जाण्यापूर्वी त्याने इथे सांडणीवर बसण्यासाठीचा पाळणा तयार केला होता. त्याचा विचार होता की जर रझियाने सांडणीवर बसण्याचा हट्ट केला तर तो, तो हट्ट कसा टाळू शकेल. या विचाराने तो परत वळला होता. त्याने नानकला एक-दोन आवाज दिले. आतून त्याच्या बायकोने उत्तर दिले, “ते घरात नाही आहेत". बाकरचं मन दु:खी झालं. आता काय करायचं, हा प्रश्न त्याला पडला. थोडा विचार करुन त्याने पुन्हा विचारलं, “मी सांडणीवर बसण्याचा पाळणा बनवायला दिला होता. तो तयार आहे की नाही?” आतून उत्तर आलं, “मला माहिती नाही”.
बाकरचा अर्धा आनंद संपून गेला. पाळण्याशिवाय सांडणीला घेऊन जाऊन काय करायचं? नानक असता तर दुसरा कोणतातरी पाळणा घेऊन गेला असता. त्याने विचार केला की मशीरमल सावकाराच्या घरी जाऊया. त्याच्या घरी इतके उंट असतात. कोणता ना कोणता जुना पाळणा त्यांच्याकडे असेलच. आत्ता जुन्या पाळण्यानेच काम चालवून घेऊया. तोपर्यंत नानक नवीन पाळणा तयार करेलच. हा विचार करुन तो मशीरमल सावकारच्या घराकडे निघाला. आपल्या तरुणपणी मशीरमल साहेबानी पुरेसं धन मिळवलं होतं. जेव्हा कॅनॉल बांधण्यात आला तेव्हा त्यांनी आपल्या पद आणि प्रभावाच्या बळावर कित्येक एकर जमीन कवडीमोलाने आपल्या ताब्यात घेतली होती. आता नोकरी संपल्यानंतर ते इथेच येऊन राहिले होते. नोकर-चाकर होते. कमाई खूप होती. मजेमध्ये आपलं आयुष्य व्यतीत करत होते.
आपल्या घराच्या तख्तपोशावर बसून ते हुक्का पीत होते, डोक्यावर पांढरी पगडी, पांढरा कुर्ता, पांढरं जॅकेट आणि कमरेवर दुधाळ रंगाची लुंगी. धुळीने भरलेल्या बाकरला सांडणीची रस्सी पकडून येताना बघून त्यांनी विचारलं, “काय बाकर कुठून आलास? ही सांडणी कोणाची?”
“माझीच आहे मालक. आत्ताच बाजारातून घेऊन आलो आहे." .
“केवढ्याची घेतलीस?”
बाकरला वाटलं १६० म्हणावेत पण त्याच्या विचारानुसार इतकी सुंदर सांडणी २०० पेक्षा कमी नव्हती. पण त्याचं मन तयार झालं नाही. तो म्हणाला, “हुजूर १६० रुपये मागत तर होता; पण मी १५० मध्ये घेऊन आलो” .
मशीरमलने एकवार सांडणीला न्हाहाळलं. ते स्वत: अनेक दिवसांपासून अशी सुंदर सांडणी स्वत:साठी घेण्याची इच्छा करत होते. त्यांच्याकडे सांडणी तर होती पण गेल्या वर्षी तिला सिमक झाला होता, नीळ वगैरे देऊन तिचा आजार तर बरा झाला होता; पण आता तिच्या चालण्यात पूर्वीसारखी लचक आणि डौल राहिला नव्हता. ही सांडणी त्यांच्या नजरेस भरली. काय सुंदर आणि सुडौल शरीरयष्टी होती. काय पांढरा-पिवळसर, भुरा भुरा रंग. सुंदर लांब-सडक मान... आहाहा! ते म्हणाले, “चल माझ्याकडून १६० रुपये घे. आम्हाला अशा सांडणीची गरज होतीच. १० तुझ्या मेहनतीचे”.
बाकर फिकट हसत म्हणाला, “हुजूर अजून माझी इच्छा पूर्णसुद्धा झाली नाहीये” .
मशीरमल उठून सांडणीच्या अंगावरुन हात फिरवायला लागले, “वाह, काय मस्त जानवर आहे." मोठ्याने म्हणाले, "चल ५ रुपये अजून घे!”
आणि त्यांनी हाक मारायला सुरुवात केली, “नुरे नुरे”
नोकर म्हशींकरता चारा काढत होता. तसाच धावत बाहेर आला. “ही सांडणी आत बांधून टाक. १६५ रुपयांना पडली. कशी आहे?” तेव्हा मशीरमलने ओच्यामधल्या ६० रुपयांच्या नोटा काढून बाकरला दिल्या आणि हसत म्हणाले,“आत्ताच एक ग्राहक देऊन गेला. कदाचित तुझ्या नशिबाचे असतील. आत्ता हे ठेव. बाकीचे एक-दोन महिन्यात पोचवतो. कदाचित तुझ्या नशिबाने त्या आधीच मिळतील तुला”. आणि मग कोणात्याही उत्तराची अपेक्षा न करता ते घराकडे चालू लागले. नोकर परत चारा कापू लागला. लांबूनच त्यांनी आवाज दिला, “म्हशींचा चारा राहू दे, आधी सांडणीसाठी चारा आणि पाणी टाक. उपाशी आहे असं वाटतयं बिचारी” आणि मग जवळ जाऊन तिच्या मानेवरुन हात फिरवू लागले.
कृष्णपक्षातली चंद्र अजून आकाशात उगवला नव्हता. चारही बाजूला अंधार पसरला होता. आकाशात संधीप्रकाश पसरला होता. डोक्यावर एक-दोन तारे चमकत होते आणि दूरवर बाभूळ आणि ओकाची झाडे मोठ्या मोठ्या काळ्या शाईच्या धब्ब्यांप्रमाणे दिसत होती. फोगच्या झाडीत स्वत: घराच्या वेशीबाहेर बसलेला बाकर त्या क्षीण प्रकाशात बघत होता, जो जाड्या-भरड्या गवतातून विरळ-विरळ होतं त्याच्या घरातील अंगणांपर्यंत पोचत होता. त्याला माहिती होतं रझिया जागी असेल, त्याची वाट बघत असेल. पण तो वाट बघत होता की कधी दिवा विझेल, रझिया झोपेल आणि तो चोरट्या पावल्यांनी स्वत:च्या घरात प्रवेश करेल.
लेखक: उपेंद्रनाथ अश्क
अनुवाद : मेघना अभ्यंकर