बदलाची शिल्पकार : डॉ. तरू जिंदल
‘हॉं, ये मुमकिन है’ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. डॉ. तरू जिंदल यांचं हे आत्मकथनात्मक पुस्तक आहे. ही आहे एक सत्यकथा - खरं म्हणजे एक विजयगाथा. हा आहे डॉ. तरू जिंदल यांचा प्रेरणादायी प्रवास. सर्वसामान्य माणसांबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यांचं दर्शन या पुस्तकातून घडतं. एका तरुण स्त्री डॉक्टरच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक प्रवासाचा हा आलेख. या काळात दैनंदिन घडामोडी आणि विचारांमधून ती काय शिकत गेली, हे तर आपल्याला समजतंच आणि आपल्यालाही नवी प्रेरणा मिळते.
डॉ. तरू जिंदल मुंबईतील प्रतिष्ठित अशा लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज व सायन हॉस्पिटलमधून गायनॅकॉलॉजी विषयात एम.एस. झाली - डिस्टिंक्शनसहित. जेवढी बुद्धिमान, तेवढीच ध्येयवादीही. समाजासाठी आपण काही योगदान द्यायला हवं, या विचाराने प्रेरित झालेल्या तरूच्या मनात आलं की आपल्याला जर समाजासाठी काही करायचं असेल तर ते केव्हा? पंचविशीत की ५५-६० नंतर? साधारणत: प्रत्येकाला वाटत असतं की आधी ‘सेटल’ होऊ या. म्हणजे काय, तर शिक्षण झालं की नोकरी, लग्नं, मुलं-बाळं, व्यवसाय...आणि सरतेशेवटी समाजकार्य. पण तरूला मात्र मनापासून असं वाटत होतं की, तरुण वयात उमेद आणि ऊर्जा आहे, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही आपण कणखर आहोत, तेव्हाच समाजकार्यात / सेवेत हिरीरीने पुढे झाले पाहिजे. तिचा पती आणि अनेक वर्षांपासूनचा मित्र डॉ. धरव याच्याकडूनही तिला पाठिंबा मिळालेला होता. त्यानंतर ‘केअर इंडिया’ संस्थेच्य ‘अनन्या’ प्रकल्पांतर्गत डॉ. तरू जिंदलची बिहारमधील मोतिहारी जिल्हा रुग्णालयात तीन महिन्यांसाठी नियुक्ती झाली. तेथील डॉक्टरांना सिझेरियन शस्त्रक्रियेची अधिक चांगली तंत्र शिकवणं आणि त्यांना आत्मविश्वास वाटेपर्यंत साहाय्य करणं, असं डॉ. तरूच्या कामाचं स्वरूप होतं. अधिकृत असा हा विशिष्ट आदेश असला तरी, खरं म्हणजे अधिक व्यापक हेतू असा होता की अशा प्रकारच्या सरकारी रुग्णालयांच्या प्रसूती केंद्रांमधील व्यवस्थेत नक्की कशामुळे आणि काय अडचणी येत आहेत, हे पाहणं आणि मग त्यानुसार तिथे प्रसूतीसाठी किंवा कुटुंबनियोजनासाठी येणार्या स्त्रियांना पुरविल्या जाणार्या सेवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणं.
हा प्रकल्प ‘केअर इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने सुरू केला होता. बिल अँण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या मदतीने त्यांनी २०११ मध्ये बिहारच्या आठ जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांतर्गत काम सुरू केलं होतं. मात्र देशाच्या इतर भागातून येऊन तिथे किमान काही महिने प्रशिक्षक म्हणून राहायला तयार असणारे चांगले डॉक्टर्स मिळणं हे त्यांच्यापुढचं मोठं आव्हान होतं. याचं कारण म्हणजे लोकांच्या मनातली बिहारबद्दलची प्रतिमा! ‘डॉक्टर्स फॉर यू’ या संस्थेने तिथे वेगवेगळ्या डॉक्टर्सना नेऊन चांगलं काम केलेलं होतं. या संस्थेनेच डॉ. तरूची बिहारमध्ये नियुक्ती केली होती. तेव्हा तिचं वय होतं फक्त तीस वर्षं!
पहिल्याच दिवशी मोतिहारी जिल्हा रुग्णालयात गेल्यावर डॉ. तरूच्या लक्षात आलं की, आतून पाहता हे रुग्णालय म्हणजे चाहीर बाजूंची डास आणि त्यांच्या अळ्यांनी भरलेली उघडी गटारे असलेला एक भला मोठा चौकान होता. मार्गिकांमध्ये पान थुंकल्याचे डाग, फेकलेलं शिळं अन्न, केळ्याच्या साली, बिस्किटाच्या पुड्यांची पाकिटं हे सगळं पडलेलं! पुढे गेल्यावर प्रसूतीकक्षात साठलेली पाण्याची थारोळी, शेजारी पसरलेला बायोमेडिकल कचर्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, प्रसूतीकक्षाच्या आत बसलेली कुत्रा, त्यातच पेशंटच्या नातेवाईक स्त्रियांची ये-जा... एका झाडूवालीला एका स्त्रीची प्रसूती करताना आणि त्यानंतर जमतील तसे वेडेवाकडे टाके घालताना पाहून डॉ. तरूला चांगलाच धक्का बसला. चार भिंतीच्या त्या खोलीत चार गंजक्या खाटा, एक गळकं बेसिन, दोन आर्टरी फोरसेप्स, एक कात्री आणि एक सुईचा होल्डर इतकीच उपकरणं उपलब्ध होती. या खोलीला कोणत्या अर्थाने प्रसूतीकक्ष म्हणता आलं असतं? नवजात अर्भकांच्या विभागातील परिस्थिती वेगळी नव्हती. इन्फन्ट वॉर्मर्स काम करीत नव्हते, जन्माच्या वेळी बाळांना ऑक्सिजन कमी पडला तर, ताबडतोब उपचार करण्याची साधनंही बिघडलेलीच होती. उपकरणं निर्जंतुक करण्यासाठी लागणारे ऑटोक्लेव्ह, बॉयलर धूळ खात पडलेले होते. जी काही मोजकी उपकरणं उपलब्ध होती, ती साध्या नळाच्या पाण्यानं धुऊन पुन्हा पुन्हा वापरली जात होती. ड्यूटीवरची नर्स डॉ. तरूला प्रसूतीकक्षातून वॉर्ड्समध्ये फेरी मारायला घेऊन गेली, तेव्हा तरूला एकावर एक धक्के बसत होते. त्यातूनच तरूला कळलं की, ‘डॉक्टर्स इथे येत नाहीत. सगळं काही आम्हीच सांभाळतो. जास्त धोका असलेली केस असली तर आम्ही त्यांना बोलावतो... कुछ नहीं होता...किसको पडी है?...’
'म्हणजे डॉक्टर्स, जे इथे येतच नाहीत, त्यांना प्रशिक्षण द्यायला मी इथे आलेली आहे.’ या वास्तवाची जाणीव तरूला झाली. ‘अकार्यक्षम आरोग्यसेवा’ हे शब्द फारच अपुरे पडतील, इतकी ती परिस्थिती धोकादायक होती. मुंबई आणि मोतिहारी या दोन जगांमधला विरोधाभास प्रचंड आणि अंगावर येणारा होता. पहिल्याच दिवशी डॉ. तरूला जाणवलं की, ते जिल्हा रुग्णालय, तिथे बाळंत व्हायला आलेल्या आया आणि त्यांची बाळं... सगळेच ‘अनाथ’ होते. डॉक्टर का आलेले नाहीत? गंभीर परिस्थितीत तातडीची सेवा अपेक्षित असताना परिचारिकेला महत्त्वाची साधनसामुग्री का सापडत नाही, असे प्रश्नही रुग्णांचे नातेवाईक विचारत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव नाही. त्यांची काळजी घ्यायला आणि काही झाल्यास जबाबदारी घ्यायला कोणीही नव्हतं. ऑपरेशन थिएटरची अवस्थाही प्रसूतीकक्षासारखीच होती. ओटीमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश असल्याचं दिसत होतं. तेही पायातल्या चपला-बुटांसह. ‘चलता है, कुछ नहीं होता’, हेच उत्तर सगळीकडे मिळत होतं. ओटीजवळ एक कर्मचारी होता, त्याला ‘ओटीबाबू’ म्हणतात, असं तरूला कळलं. तो मात्र काम करण्यास उत्सुक दिसला. हे सगळं आटोपून तरू हॉस्पिटल मॅनेजर (एच.एम.) विजय झा यांना भेटायला गेली. पान खाऊन रंगलेलं तोंड, चेहर्यावर भरपूर आत्मविश्वास आणि फालतूपणा खपवून न घेण्याची वृत्ती डॉ. तरूच्या ताबडतोब लक्षात आली. तरू त्यांच्यासमोरअसताना पाच मिनिटांत दहा पेशंट्सच्या नातेवाईकांकडे त्यांनी लक्ष पुरवलं होतं म्हणजे त्यांना वाटेला लावलं होतं. बोलण्याची पद्धत ही अशी –
‘अरे, कुत्ता काटनेकी सूई नहीं है’
‘जिससे फोन करवाना है, करवाईये, हम किसीस नहीं डरते...’
जरा अधिक खोलात जाऊन चौकशी केल्यावर डॉ. तरूच्या लक्षात आलं की इथे प्रसूतीसाठी येणार्या स्त्रियांची नोंदही केली जात नव्हती. गंभीर किंवा धोकादायक परिस्थिती उद्भवली तर त्या बाईला सरळ खासगी रुग्णालयात पाठवून द्यायचं. व्यवस्थित प्रसूती झाली, तरच पेपर्स बनवायचे. इथे प्रत्येक तासागणिक नवी कहाणी घडत होती, हे तरूच्या लवकरच लक्षात आलं... ‘आणि प्रसूतीदरम्यान होणारा मातांच्या मृत्यूचा दर कमी करण्याचा भारत जोमाने प्रयत्न करत होता! डॉ. तरूच्या लक्षात आलं की, डॉक्टरांची कमतरता किंवा त्यांच्याकडे आवश्यक कौशल्य नसणं हे इथले प्रश्न नव्हतेच. तर सगळ्या व्यवस्थेला शिस्त लावायला एखाद्या कठोर व्यक्तीची गरज होती. अधिक चांगल्या सोयी-सुविधा आणि आरोग्यसेवा मिळणं हा रुग्णांचा हक्क होता. परंतु त्यांना त्याची जाणीव नव्हती. इथल्या त्रुटींवर लक्ष केंद्रित करून इथे येणार्या आयांच्या बाजूने उभा राहील, अशा खमक्या नेतृत्त्वाची इथे गरज होती. आपण फारच लहान, हतबल आहोत, इथे आपण काय करणार आहोत? असं डॉ. तरूला वाटायला लागलं. ह्या निराश मन:स्थितीतून बाहेर येण्यासाठी तिला मदत झाली तिच्या पतीची - डॉ. धरवची. तसंच ‘डॉक्टर्स फॉर यू’चे तत्कालीन अध्यक्ष डॉ. रविकांत सिंह आणि डॉ. नभोजित रॉय यांची. तरूने पुन्हा शांत मनाने विचार केला. मी स्वत:च्या इच्छेने इथे आले आहे, निराश होऊन परत माघारी जाणं योग्य नाही, असं तिने स्वत:ला बजावलं. रुग्णालयाच्या सद्यस्थितीत जर बदल व्हायला हवा असेल, तर इथल्या कर्मचार्यांनाही त्यात सहभागी होणं गरजेचं होतं. त्यासाठी प्रथम त्यांना समजून घेणं गरजेचं होतं. कर्मचार्यांसाठी स्वच्छतागृहांचा आभाव होता. सुरळीत वीजपुरवठा नसणं, महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा, प्रसूतीकक्षात येणार्या नातेवाईकांच्या संख्येवर कोणाचंही नियंत्रण नसणं, अशा गोष्टींमुळे हे कर्मचारी थकले होते, वैतागले होते आणि अखेरीस बेफिकीर झाले होते.
या अशा पार्श्वभूमीवर डॉ. तरूने मोतिहारी जिल्हा रुग्णालयासंदर्भात पुढील तीन महिन्यात काय करता येईल. याची योजना त्यार केली. त्यासाठी पहिलं पाऊल म्हणून सगळ्या डॉक्टर्स व कर्मचार्यांची एक अधिकृत बैठक घेतली. डॉक्टरांनी जबाबदार्या झटकल्यामुळेच प्रसूतीविभागाची इतकी दयनीय अवस्था झाली असली, तरी पहिल्याच भेटीत तो विषय केंद्रस्थानी घेण्याचं तिने टाळलं. उलट स्वत:कडे लहानपण घेऊन, ‘तुम्ही इतक्या कठीण परिस्थितीत इथे काम करताय, आणि वेळात वेळ काढून या बैठकीला आलात’, असं म्हणून त्यांचे आभार मानले. ‘मी फक्त तुम्हाला वैद्यकशास्त्रातली काही नवीन तंत्रं शिकवायला आले आहे.’ असं सांगून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा केली.
त्यानंतर उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची, साधनांची यादीच तरूने रुग्णालय व्यवस्थापक विजय झा यांच्यासमोर ठेवली. बी. पी. मशीन, स्टेथास्कोप्स, डझनावारी मास्क्स, टोप्या, शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांनी वापरायचे कपडे, स्क्रब्ज, उपकरणं निर्जंतुक करण्यासाठी ऑटो क्लेव्ह, बॉयलर्स इत्यादी सर्व सामान कोठारात मिळालं. किती तरी उपकरणं नवी कोरी होती - त्यांचा कधी वापरच केला गेला नव्हता. प्रत्येक वापरानंतर उपकरणं निर्जंतुक करणं आवश्यक आहे, हे तरूने परिचारिकांना शिकवलं. प्रसूतीकक्षातले ऑक्सिजन सिलिंडर्स भरलेले आहेत ना हे बघायला त्या-त्या पाळीच्या परिचारिकांना भाग पाडलं. प्रसूतीकक्ष नियमित स्वच्छ होऊ लागला. ‘जननी सुरक्षा योजने’ अंतर्गत सरकारी रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांना सरकारकडून १४००/- रुपये मिळतात. पूर्वी त्यापैकी बरेचसे पैसे औषधं आणण्यासाठी लोकांना खर्च करावे लागत. आता प्रसूतीकक्षात नियमित औषधांचा पुरवठा होऊ लागला.
त्यानंतर डॉ. तरूने ऑपरेशन थिएटर साफ करण्यासाठी चक्क श्रमदानाची कल्पना मांडली आणि स्वत: हातात झाडू घेऊन ती अंमलातही आणली. दिल्लीहून रुग्णालय व्यवस्थापनात एमबीए करून आलेली गीतिका श्रीवास्तव तोपर्यंत या रुग्णालयात रूजू झाली होती. स्वभावाने अतिशय उत्साही असलेली गीतिका लवकरच तरूची मैत्रीण झाली. या दोघींच्याही हातात झाडू बघितल्यावर रुग्णालयातील सगळेच कर्मचारी प्रभावित झाले आणि कामाला लागले. ओटीबाबू तर स्वत:च्या खर्चाने पांढर्या ऑईल पेंटचा डबा घेऊन आला आणि ओटीमधली गंजलेली टेबलं त्याने रंगवून टाकली. एक डॉक्टर स्वत: साफसफाई करतोय या गोष्टीकडे लोक सहजासहजी दुर्लक्ष करू शकत नव्हते. त्यामुळे हळूहळू इतरही कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. ओटीमध्ये वापण्यासाठी स्लीपर्स आल्या, बूट घालून ओटीमध्ये जाण्यावर बंदी आली. सुरुवातीला कुणी फारसं लक्ष दिलं नाही, पण हळूहळू सर्वांनी ते स्वीकारलं.
हे सगळं करत असताना डॉ. तरूच्या लक्षात येत गेलं की सत्याला अनेक बाजू असतात. बदल घडवून आणायचा असेल, तर आपणही लवचीक असलं पाहिजे. आपण डॉक्टर्सबद्दल हवे तेवढे कठोर होत नाही - होऊ शकत नाही - आणि लहान गावांमध्ये आरोग्यदूत म्हणून काम करणार्या ‘आशा सेविकां’बद्दल मात्र कठोर होतो हे बरोबर आहे का? त्यांचीही बाजू समजून घ्यायला हवी. तरू प्रत्येक ठिकाणी स्वत:ला तपासून बघते हे मोठं कौतुकाचं वाटतं. काही प्रसूतींनंतर निर्माण झालेली अवघड परिस्थिती डॉ. तरूने कार्यक्षमतेने हाताळली. त्या - त्या मातेचा जीव तर वाचलाच, पण परिचारिकांचा जीवही भांड्यात पडला. इतकंच नाही, तर मुंबईहून इथे आलेल्या या निष्णात डॉक्टरकडून आपण काही कौशल्यं शिकायला हवीत, याची जाणीव त्यांना झाली.
तरूच्या लक्षात आलं की आता प्रशिक्षण देण्याची वेळ आली आहे. त्यांच्या गरजांनुसार, समजण्याच्या पातळीनुसार सर्वांत जास्त उपयुक्त ठरतील अशा गोष्टींचं प्रशिक्षण डॉ. तरूने त्यांना दिलं. अगदी हात स्वच्छ कसे धुवावेत. ग्लोव्हज घालण्याचं महत्त्व, उपकरणं निर्जंतुक कशी करायची, जन्मल्यानंतर न रडणार्या बाळांचा श्वासोच्छ्वास चालू करण्यासाठी अँब्यू बॅग कशी वापरायची, प्रसूतीनंतरता रक्तस्त्राव कसा आटोक्यात आणायचा हे सगळं तिनं परिचारिकांना शिकवलं आणि त्यांनीही ते मनापासून शिकून घेतलं. ‘मॅडन, आम्हाला यापूर्वी कोणीच हे शिकवलं नव्हतं. तुमचे खूप खूप आभार’ असं त्यांनी तरूला आवर्जून सांगितलं.
मोतिहारी जिल्हा रुग्णालयात आल्यापासून डॉ. तरूच्या लक्षात एक गोष्ट आली होती ती अशी की या रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया होतच नाहीत. सर्वसाधारणपणे ९० % प्रसूती नॉर्मल आणि १०% सिझेरियन असे प्रमाण दिसून येते. इथे सिझेरियन्स न होण्याचं कारण काय असावं? पहिली गोष्ट म्हणजे प्रसूती अवघड आहे, असं दिसलं की खेड्यातून आलेल्या महिलेला तिच्याबरोबर आलेली आशा सेविका घाईघाईने खासगी दवाखान्यात घेऊन जात असे. दुसरं म्हणजे लोकांचा येथील व्यवस्थेवर विश्वासच नव्हता. महत्त्वाचं म्हणजे रुग्णालयात पॅथॉलॉजी लॅब नसल्याने पेशंटच्या रक्ताच्या चाचण्या होत नसत आणि त्या झाल्याशिवाय सिझेरियन करायला लेडी डॉक्टर तयार नसे. रुग्णालयाच्या शेजारच्या इमारतीत एकमेव रक्तपेढी होती. पण तिथे रक्ताचा फारस कमी साठा असल्याने कोणा नातेवाईकाने रक्तदान केल्याशिवाय रक्त मिळायचं नाही. बायकांचं वजन फारच कमी असल्याने आणि त्यांचं हिमोग्लोबिनही कमी असल्यामूळे त्यांचं रक्त घेता यायचं नाही - त्या रक्तदानाला सरळ अपात्रच ठरायच्या. पुरुष रक्तदानाला साफ नकार द्यायचे किंवा एखाद-दुसरा तयार झालाच, तर ती गरोदर बाई त्याला रक्त देऊ द्यायची नाही. का? तर म्हणे घरातला कर्ता पुरुष रक्त दिल्याने कमजोर होईल! शस्त्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र मिळालं नाही की तिच्याबरोबर आलेली आशा सेविका तिला घेऊन खासगी दवाखान्यात निघून जायची. हे सगळे अडथळे पार करून एकदा एका अडलेल्या गरोदर स्त्रीच्या सिझेरियनची तयारी डॉ. तरूने केली आणि लेडी डॉक्टरला बोलावलं. ती तासाभराने उगवली आणि आल्या-आल्या पेशंटच्या नातेवाईकांवर खेकसली - ‘साईन करो! मॉं और बच्चा दोनों मर गये तो डॉक्टर की कोई जिम्मेदारी नहीं है ।’ है ऐकून तरू थक्क झाली. हे गरीब लोक डॉक्टरला देव मानत असताना तोच पहिल्या वाक्यात मृत्यूबद्दल बोलायला लागला तर कोण नातेवाईक शस्त्रक्रियेला परवानगी देतील? आणखी एक महत्त्वाची गोष्ट तरूच्या लक्षात आली की इथल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करता येत नव्हती असं नाही तर त्यांनी ती इथे करायची नव्हती. ती आपल्या खासगी दवाखान्यात करण्यात त्यांना रस होता. हे असं का? याचा विचार करताना तरूला तीन उपाय सुचले - १) डॉक्टरांनी हजेरी आणि त्यांच्या कामाची गुणवत्ता याबाबत सिव्हिल सर्जन, रुग्णालयाचा सुपरिटेंडंट यांनी कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. २) सरकारी डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसवर मर्यादा आणली पाहिजे. त्यांच्या कामाचं ऑडिट झालं पाहिजे. सर्वांत महत्त्वाचा तिसरा उपाय - सरकारी रुग्णालयातल कामाचं पर्यावरण अधिक चांगलं राखणं - त्या दृष्टीने डॉक्टरांना बसायला चांगली खोली, त्यांच्यासाठी चांगलं स्वच्छतागृह ह्या गरजेच्या गोष्टी होत्या. तरूची नेमणूक तीन महिन्यांसाठी होती आणि त्या कालावधीतली तिची ही निरीक्षणे होती.
तीन महिने संपत आले असताना डॉ. तरूची मोतिहारीचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट श्री. जितेंद्र श्रीवास्तव आणि त्यांचा प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी यांच्याशी भेट झाली. जिल्हा रुग्णालयाबद्दलची डॉ. तरूची मतं थेट तिच्याकडूनच ऐकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. जवळपास तीन महिने भरपूर कष्ट करून बदलाचे प्रयत्न केले असले, तरी अजून बराच पल्ला गाठायचा होता. म्हणून तरूनेही कोणताही आडपडदा न ठेवता जिल्हा रुग्णालयात जे काही चाललं होतं ते अजिबात चांगलं नाही, हे स्पष्टपणे सांगितलं. ते ऐकल्यावर डीएमने तरूला तिचं दोन आठवड्यानंतरचं मुंबईचं तिकीट कॅन्सल करायला सांगितलं. त्यामुळे मोतीहारीमधला तिचा मुक्काम आणखी वाढला. इतकंच नाही तर त्यांनी ताबडतोब जिल्हा रुग्णालयात जाण्याचं ठरवलं. तेही त्यांच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी, ‘केअर इंडिया’च्या टीमचे जिल्हा व्यवस्थापक सुनील गुप्ता व डॉ. तरू यांच्यासमवेत - रात्री साडेदहा वाजता. ही भेट इतकी अचानक होती की, तिथले सगळे लोक गडबडून गेले. रुग्णालयाचे डेप्युटी सुपरिटेंडंट आणि हॉस्पिटल मॅनेजर यांना त्यांच्या घरून बोलवावं लागलं. नंतर पूर्ण एक तास त्यांनी रुग्णालयाची जणू तपासणीच केली आणि तरूला सांगितलं की जिल्हा रुग्णालयासंबंधी तुमची निरीक्षणं आणि त्यावरच्या उपाययोजना याबद्दल ताबडतोब एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करा. ‘त्यानंतर मी बघतो’ असं खात्रीपूर्वक आश्वासनही दिलं. हे अर्थातच बर्याच कर्मचार्यांना आवडलं नाही. पण तरूला आजवर सहकार्याचा हात देणारे हॉस्पिटल मॅनेजर, ओटीबाबू, रंजू सिस्टर मात्र डीएम जितेंद्र श्रीवास्तव यांच्या भेटीने खूश झाले.
दुसर्या दिवशी सकाळीच एका स्त्रीच्या प्रसूतीनंतर चांगल्या वजनाचं, पुर्या दिवसांचं एक अव्यंग बाळे केवळ ‘हायपॉक्सिया’ (ऑक्सिजन कमी पडणं) या कारणामुळे गेलं. त्याला वेळेवर ऑक्सिजन मिळाला असता, तर ते वाचलं असतं. परिचारिकेच्या पाळी बदलण्याच्या वेळी ऑक्सिजन सिलिंडर भरलेला आहे ना, हे तपासलं असतं तर हे घडलं नसतं. पण प्रसूती कक्षाची सगळी जबाबदारी, कामाचा ताण परिचारिकांवरच येतो, लेडी डॉक्टर्स हजर राहातच नाहीत. हे डॉ. तरूने ठासून सांगितलं. त्यानंतर चांगल्या प्रकारे देखरेख करता यावी म्हणून परिचारिकांची खोली प्रसूतीकक्षाच्या जवळ हवी, रुग्ण रुग्णालयात दाखल होतानाच त्याची कागदपत्रं बनवायला हवीत, अधिक स्वच्छतागृहांची निकड, तसंच कर्मचार्यांकरता अधिक कडक सुरक्षाव्यवस्था, ओटीमध्ये कोणीही आत-बाहेर जाण्या-येण्यावर निर्बंध आणि महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी डॉक्टरने प्रसूतीविभागाच्या वॉर्डमध्ये फेरी घेतलीच पाहिजे, प्रसूतीकक्षात लेडी डॉक्टरची उपस्थिती असलीच पाहिजे अशा समस्या / उपाय डॉ. तरूने मांडले. यातील बर्याच सूचना लगेच मान्य झाल्या, काहींवर मात्र एकमत होऊ न शकल्याने संमत झाल्या नाहीत. रुग्णालयात होणाऱ्या प्रत्येक मृत्यूची कारणमीमांसा शोधण्यासाठी ‘डेथ ऑडिट’ व्हायला पाहिजे, असं तरूने सुचवलं. तेव्हा डीएमने तिलाच सर्व डॉक्टर्सना डेथ ऑडिटचं प्रशिक्षणद्यायचं काम करायला सांगितले.
यानंतर जिल्हा रुग्णालयात बर्याच सुधारणा झाल्या. स्वच्छता तर वाढलीच, पण पॅथॉलॉजी लॅब चोवीस तास सुरू राहू लागली. परिचारिका आपल्या कामाबद्दल अधिक दक्ष राहू लागल्या. डॉक्टरांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी त्यांच्या खोल्या सुधारण्यात आल्या. ‘केअर-इंडिया’च्या टीममधले लोक वारंवार हॉस्पिटल मॅनेजरना भेटून विविध योजनांची माहिती देऊ लागले. त्यातल्या बर्याच योजना तोपर्यंत उपयोगात आणल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे अनुदानं मिळू लागली. हॉस्पिटलचे मॅनेजर विजय झा यांनी हिंमत व निर्धार दाखवल्याने हे घडू शकलं, हे तरूने आवर्जून सांगितलं आहे. लेडी डॉक्टर्सकडून मात्र हवं तसं सहकार्य नव्हतंच!
त्यानंतर डीएमने तरूला जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यक्रेंद्रांना (पीएचसीज) भेटी देऊन तिथल्या त्रुटींची पाहणी करायला सांगितलं. बर्याच ठिकाणी तरूने जिल्हा रुग्णालयात पहिल्या दिवशी पाहिली तशीच परिस्थिती होती. डॉ. तरूने तिथल्या परिस्थितीचं मूल्यमापन केल्यानंतर सर्वांत वाईट परिस्थिती असलेल्या पाच पीएचसीजना डीएमने भेट दिली आणि जिल्ह्यातल्या सगळ्या पीएचसीजसाठी एकत्रच मोठ्या प्रमाणावर कौशल्य प्रशिक्षण द्यायला तरूला सांगितलं. ळूहळू तरूच्या कामाच्या कक्षा वाढतच चालल्या होत्या. होणार्या बदलांमुळे तिचा उत्साहही वाढला होता. डीएमच्या सांगण्यावरून तरूने आपलं मुंबईचं तिकीट दुसर्यांदा रद्द करून मुक्काम वाढवला. बिहारसारख्या मागास राज्यात झालेला थोडासा बदलही खूप मोठा परिणाम घडवून आणू शकतो, हे डीएमचं म्हणणं तिला पटलं होतं.
त्यानंतर डॉ. तरूने तिची साहाय्यक गीतिका श्रीवास्तवच्या मदतीने पीएचसीजमधील परिचारिकांचं प्रशिक्षण पार पाडलं. खेडेगावातल्या आरोग्य कर्मचार्यांना हात स्वच्छ कसे धुवायचे हे शिकवण्यापासून सुरुवात करावी लागली. त्यांच्या समजण्याच्या पातळीपासून आणि त्या-त्या ठिकाणच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक पातळीपासून (किंवा ती पातळी लक्षात घेऊन)प्रशिक्षणाची पद्धत बदलली तर त्याचा फायदा होतो, असं डॉ. तरूने म्हटलं आहे. या प्रशिक्षणामुळे आणि केअर-इंडियाच्या सततच्या देखभालीमुळे ही प्राथमिक आरोग्य केंद्रेही यशस्वीपणे काम करू लागली.
डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटसारखे कर्तव्यतत्पर अधिकारी आणि केअर इंडियाची सेवाभावी टीम यांचाभक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे आपलं बळ वाढलं हे खरं असं तरूच्या मनात आलं. आपल्या पूर्वग्रहांमुळे ‘सरकारी व्यवस्थेत काही चांगलं काम होणारच नाही’, असं आपण गृहीत धरतो का? त्यांच्याप्रमाणेच दिल्लीहून आलेल्या गीतिका श्रीवास्तवची तरूला खूप मदत झाली. अधूनमधून निराश होणाऱ्या तरूला ती प्रोत्साहन देत असे. सिस्टर रंजू सिन्हा, ओटीबाबू हे तर मोतिहारी जिल्हा रुग्णालयातील बदलासाठी पहिलं पाऊल उचलणारे लोक होते.
परतीच्या प्रवासात डॉ. तरूला जाणवलं की, रुग्णालयातील या बदलांपेक्षाही जास्त उलथापालथ तिच्या मनात झाली होती. ती खूप काही शिकली होती. पहिली गोष्ट म्हणजे कोणतंही ठिकाण, कोणताही माणूस बदलून खूप चांगला होऊ शकतो. दुसरं म्हणजे मी जेव्हा निर्मळ मनाने काही करण्याचा प्रयत्न करेन, तेव्हा लोक मला मदत करतीलच. हा अनुभव त्या अर्थाने ‘अर्थपूर्ण’ होता. तिला असं वाटलं की आपण आपल्या आयुष्यातले काही महिने / एखादं वर्ष जरी बिहार, छत्तीसगड, आसाम, ओरिसा अशा मागास राज्यांना दिलं तरी देश पुढे जायला मदत होईल आणि त्यासाठी सर्वांत चांगला काळ म्हणजे शिक्षण पूर्ण होऊन ‘सेटल’ होण्याच्या आधीचा! उतारवयात समाजकार्य करायला जाण्यापेक्षा उमेदीच्य वयात केलेलं जास्त चांगलं.
डॉ. तरूचं हे आत्मकथन वाचताना तिच्या स्वभावाचे अनेक पैलू लक्षात येतात. हे काम करताना तिला अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. पण ती कुठेही हेकेखोरपणा दाखवत नाही, आपला कमीपणा मान्य करून दुसर्याचा मोठेपणा ती स्वीकारते. ती बुद्धिमान तर आहेच, ध्येयवादीही आहे. ‘समाजाला द्यायचं योगदान हे माझ्या डॉक्टर म्हणून असलेल्या कामाचाच एक भाग आहे. माझी कौशल्यं वापरून आणि मनापासून काम करून मी लोकांच्या जीवनावर थेट आणि लगेच परिणाम करू शकत होते...नुसतं काम करण्यापेक्षा ते मनापासून केलं, तर एक वेगळीच पातळी गाठली जाते. रुग्णाच्या केवळ आजाराकडे न बघता, त्याच्या भावनांचीही कदर करणं महत्त्वाचं असतं. फक्त शरीरावर उपचार न करता, त्यांच्या मनावरही फुंकर घालणं तितकंच गरजेचं आहे.’ तरूचे हे विचार तिच्या विशाल मनाची ओळख करून देतात.
काही महिन्यांनंतर ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत देशातील जिल्हा पातळीवरील रुग्णालयांसाठी एक स्पर्धा जाहीर करण्यात आली. प्रत्येक राज्यातील जिल्हा रुग्णालयं या स्पर्धेत भाग घेऊ शकत होती. या स्पर्धेत मोतिहारी जिल्हा रुग्णालयाला बिहारमधील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून ‘कायाकल्प’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आणि डॉ. तरूला आरोग्यसेवेतील तिच्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल ‘गोल्डन (ग्लोबल) वुमन अचिव्हर अॅवॉर्ड - २०१९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
डॉ. तरूच्या कर्तृत्वाला जणू नजर लागली असावी. मेंदूच्या मोठ्या आजाराशी तिला सामना करावा लागला. त्यानंतर गॉयनॅकॉलॉजिस्ट म्हणून काम करणं तिला शक्य नव्हतं. त्यानंतर तिने स्तनपानाचं महत्त्व शिकवण्यासाठी त्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवलं असून ती ते निष्ठेने पार पाडत आहे.
हॉं, ये मुमकिन है : डॉ. तरू जिंदल
अनुवाद : रमा हर्डीकर - सखदेव
रोहन प्रकाशन
नंदिनी सातारकर
nandinisatarkar@gmail.com