भाग ७ : घनकचरा व्यवस्थापन
२१ व्या शतकात आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत असले तरीही संकटांच्या फटक्यांची तीव्रता कमी करणे आणि जगातील सर्व माणसांना चांगले आयुष्य जगण्याची समान संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे. मात्र त्यासाठी आपल्या जगण्यासाठी आणि तगण्यासाठी आवश्यक घटकांकडे आपण वैज्ञानिक तसेच सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ही गोष्ट सर्वाधिक अधोरेखित करणारा विषय म्हणजे घनकचरा व्यवस्थापन.
आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व घटकांशी घनकचरा व्यवस्थापनाचा संबंध आहे. जैविक कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही, तर रोगराई पसरते. अन्नपदार्थांचे उत्पादन ते सेवन या साखळीतील अकार्यक्षमतांमुळे मोठ्या प्रमाणावर जैविक कचरा तयार होतो आणि हाच जैविक कचरा अन्न व ऊर्जा सुरक्षा पुरवण्याच्या कामीही हातभार लावू शकतो. जलस्रोतांमध्ये टाकला जाणारा विविध प्रकारचा घनकचरा विशेषतः लोकवस्तीजवळील नद्या व तलावांमधील पाण्याच्या प्रदूषणासाठी मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे.
कचरा विविध प्रकारचा असतो, आणि त्याचे स्रोतही विविध आहेत. कचरा हाताळण्यासाठी वापरायच्या योग्य पध्दतींच्या आधारे त्याचे वर्गीकरण करणे हे कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जास्त व्यवहार्य आहे. यानुसार ढोबळ मानाने घनकचऱ्याचे तीन मुख्य प्रकार मानले जातात – जैविक किंवा ज्याचे नैसर्गिक विघटन होऊ शकते असा कचरा (भाजी मंडईचा कचरा, स्वयंपाकघरातील ओला कचरा, खाटीकखान्यातला कचरा, शेतातला व बागेतला काडीकचरा, लाकूडफाटा इ.), ज्याचे नैसर्गिक विघटन होऊ शकत नाही आणि काही तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया करावी लागते असा कचरा (कापड, काच, कागद, धातू, प्लॅस्टिक आणि यांची मिश्रणे), आणि धोकादायक कचरा (दवाखान्यांमधून निघणारा कचरा उदा. वापरलेले कापूस, बॅंडेज, इंजेक्शनच्या सुया इ. आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा, निकामी झालेले दिवे, ट्यूबलाइट्स, इ.). अर्थात या प्रत्येक प्रकारातही उपप्रकार आहेत, आणि त्या प्रत्येकाच्या व्यवस्थापनासाठी सर्वात आदर्श पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.
कचरा व्यवस्थापनातील गुंतागुंत आणि अडचणी याबद्दल नव्याने काही सांगावे अशी परिस्थिती नाही. घर, कारखाना, व्यवसाय, संस्था, कार्यालय, सार्वजनिक जागा, या सर्व ठिकाणी मुळात कचरा कमीत कमी निर्माण कसा होईल हे पहाणे आणि जो काही अपरिहार्यपणे निर्माण होणार आहे तो पहिल्यापासूनच वेगवेगळ्या प्रकारांनुसार वेगवेगळा ठेवणे ही चांगल्या कचरा व्यवस्थापनाची पहिली पायरी आहे, हे सगळ्यांना माहित आहे. पण हे एक क्षेत्र असे आहे, की जिथे उपाय माहिती असून आणि शक्य असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. सार्वजनिक ठिकाणी हे होत नाही, कारण माझे काय जाते, इथे काही समस्या निर्माण झाली तर मला थोडीच निस्तरावी लागणार आहे, माझे काम झाले आहे नंतर येणारे बघून घेतील, अशा मनोभूमिकेत बहुसंख्य लोक असतात. पण स्वतःच्या घरातही कचऱ्याचे वर्गीकरण करणे अगदी उच्चभ्रू वस्त्यांमध्येही टाळले जाताना दिसते, यामागचे एक महत्त्वाचे कारण पारंपरिक सामाजिक उतरंडीचा अजूनही आपल्या मानसिकतेवर असलेला पगडा हे आहे. आपल्या घरात मदतनीस म्हणून सेवा देणाऱ्या व्यक्तीने किंवा दारातून कचरा घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने किंवा संपूर्ण कचरा व्यवस्थापन यंत्रणेतील कोणीतरी आपल्या घरातला कचरा चिवडून तो वेगळा करावा यात आपल्याला काहीही गैर वाटत नसेल, तर आपण सामाजिक समानतेचे पाईक असल्याचा दावाही करू नये.
जैविक किंवा जीवाणूंद्वारे विघटन केला जाणारा कचरा हा खरं तर आपल्या आवारातून बाहेरही जायचे काही कारण नाही. सर्वसाधारणतः अशा कचऱ्यापासून खत बनवता येते हे सर्वांना माहित असते, आणि वाचकांपैकी बरेचजण स्वतः कंपोस्टिंग करतही असतील, किंवा त्यांच्या जैविक कचऱ्याचे कंपोस्टिंग करण्याच्या यंत्रणा त्यांनी त्यांच्या गृहसंकुलात, कामाच्या जागी वगैरे उभ्या करण्यासाठी हातभारही लावला असेल. पण कंपोस्टिंगशिवाय इतरही पर्याय आहेत.
शेतातील किंवा बागेतील काडीकचऱ्याचा कोळसा करता येऊ शकतो. लाकडाचा कोळसा किंवा लोणारी कोळसा आपल्या परिचयाचा असतो. कोळसा हे एक चांगले इंधन आहे. स्वयंपाकासाठी गॅस नव्हता तेव्हा भारतातील शहरी घरांचे स्वयंपाकाचे इंधन हा लोणारी कोळसा हेच होते. मात्र हा कोळसा तयार करण्याची पारंपरिक पद्धत अकार्यक्षम आहे, आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. काडीकचऱ्याचा कोळसा करण्यासाठी वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित भट्ट्यांच्या अनेक कार्यक्षम रचना विकसित केल्या गेलेल्या आहेत. यासाठी कोणतीही वृक्षतोड होत नाही. वनस्पतींच्या जीवनचक्रानुसार कचरा निर्माण होतच असतो, किंवा इतर कारणांसाठी केलेल्या वृक्षतोडीतून काही कचरा निर्माण झालेला असू शकतो. त्यामुळे या स्रोतापासून बनवलेला कोळसा नूतनक्षम इंधन आहे. मात्र या प्रकारे तयार केलेला कोळसा पावडरच्या स्वरूपात असतो. इंधन म्हणून वापरण्यासाठी त्यावर आणखी प्रक्रिया करून कांडी कोळसा बनवावा लागतो. या कोळसा पावडरचे इतरही अनेक उपयोग आहेत. उदा. ही कोळसा पावडर जशीच्या तशी मातीत घातली तर मातीची सुपीकता वाढते, असे जगभरातील संशोधनातून दिसून आले आहे.
अन्नपदार्थांचे उत्पादन ते सेवन या संपूर्ण साखळीत जो काही ओला किंवा हिरवा कचरा निर्माण होतो, त्यापासून बायोगॅस निर्मिती करता येऊ शकते. अगदी एका कुटंबाच्या स्वयंपाकघरातील कचऱ्यावरही त्या घरातील किमान चहापाणी करता येईल इतका बायोगॅस निश्चितपणे मिळू शकतो. व्यावसायिक स्वयंपाकघरांना स्वयंपाकाचा गॅस बाजारभावाने विकत घ्यावा लागतो, आणि अशा ठिकाणी खाद्यपदार्थांचा कचराही मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतो. अशा आस्थापनांमध्ये बायोगॅस निर्मिती करून त्याच स्वयंपाकघरात हा गॅस वापरणे, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारणे आहे. शिवाय या प्रक्रियेतून अतिशय चांगल्या दर्जाचे खतही निर्माण होते.
विविध जैविक प्रक्रियांचा वापर करून केले जाणारे कंपोस्टिंग, कोळसा निर्मिती, बायोगॅस निर्मिती, इ. अनेक पर्याय विकेंद्रित पद्धतीने जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आज उपलब्ध आहेत. त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुरूप सर्वात सोयीची व फायद्याची एक पद्धत किंवा काही पद्धतींचा समूह वापरून जैविक कचऱ्याचे तिथल्या तिथे व्यवस्थापन करणे, हेच सर्वांच्या फायद्याचे आहे. आपल्याच आवारात आपण बागेतल्या काडीकचऱ्याचा कोळसा आणि स्वयंपाकघरातील कचऱ्याचा बायोगॅस करत असलो, आणि आपल्या छतावर सौर ऊर्जानिर्मितीही होत असेल, तर पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर काही कराणांनी आपण आपल्या परिसरातच अडकून पडलो, तर थोडी फार तरी ऊर्जा आपल्याला मिळत राहील, आणि काही अंशी आपण आपल्या प्राथमिक गरजा भागवू शकू.
घनकचऱ्यातील एक सर्वात मोठा आणि सदैव चर्चेत असलेला घटक म्हणजे प्लॅस्टिक. काही अपवाद वगळता प्लॅस्टिकच्या बऱ्याच प्रकारांचा किमान दोन-तीन वेळा पुर्नवापर करणे शक्य असते. पण पुर्नवापर करता येणारे आणि न करता येणारे प्लॅस्टिक बरेचदा एकत्र आणि सहजी वेगळे न करता येणाऱ्या स्वरूपात वापरले जाते. वेष्टन (पॅकिंग) म्हणून तसेच एक वेळ वापरून (उदा. शीतपेये पिण्याची नळकांडी, सामानाच्या ने-आणीसाठीच्या पिशव्या) किंवा काही काळ वापरून (उदा. दात घासायचा ब्रश, खाऊचे डबे, इ.) फेकून देण्याच्या विविध वस्तूंमध्ये प्लॅस्टिकचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होतो, की त्यामुळे हा विविध प्रकारचा कचराही प्रचंड प्रमाणात तयार होत असतो. त्यामुळे प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या ही कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या तंत्रज्ञानाच्या अभावाची नाही, तर प्रत्येक प्रकारचा प्लॅस्टिक कचरा वेगळा काढून त्या त्या प्रक्रिया केंद्रापर्यंत कसा पोहचवायचा या व्यवस्थापनाच्या अभावाची समस्या आहे.
ही समस्या निर्माण होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शासकीय पातळीवर आणि उद्योगांमार्फतही केंद्रीकरणाचा हव्यास. मुळात कारखान्यात निर्माण होणाऱ्या बऱ्याच वस्तूंना प्लॅस्टिक वेष्टनांची गरज पडते, कारण त्यांची दूरवर वाहतूक करायची असते. कारखान्यापासून ग्राहकापर्यंतच्या प्रवासात वस्तू सुरक्षित रहाणे आवश्यक असते. कारखाना आणि ग्राहक जितके एकमेकांजवळ असतील, तितकी वेष्टनांची गरज कमी पडेल. बऱ्याच वस्तूंबाबत हे शक्य आहे. उदा. एखादे औषध तयार करण्यासाठी एकच मोठा कारखाना असणे समजू शकते, पण साबण स्थानिक पातळीवर लघुउद्योगांनाही तयार करणे शक्य असते. दुसरा भाग म्हणजे गावातला, शहरातला सर्व कचरा आधी गोळा करायचा आणि मग त्याची वर्गवारी व इतर व्यवस्थापन करायचे या केंद्रीभूत व्यवस्थेमुळेही कचऱ्याची समस्या गुंतागुंतीची होते. बऱ्याच मध्यमवर्गीय घरांमध्ये मराठी वर्तमानपत्र, इंग्रजी वर्तमानपत्र, आणि इतर कागदपत्रे, अशी वेगवेगळी रद्दी साठवून ती नियमितपणे रद्दीवाल्यांना विकली जाते, मग घरातच प्लॅस्टिक पुर्नवापर करण्याजोगे, पुर्नवापर न करता येणारे, आणि इतर पदार्थांपासून वेगळे न करता येणारे, अशा तीन प्रकारांत वेगळे करून साठवणे व योग्य त्या व्यवस्थापन यंत्रणेकडे सोपवणे हे का अवघड वाटते? एका घराच्या किंवा एका व्यवसायाच्या, एका संस्थेच्या, एका कार्यालयाच्या पातळीवर केवळ प्लॅस्टिकच नाही तर सर्वच कचऱ्याचे वर्गीकरण केले तर, त्याचा आवाका मुळात कमी असल्याने हे काम सोपे होईल. ज्याप्रमाणे रद्दीवाले पैसे देऊन रद्दी घेतात, त्याचप्रमाणे प्लॅस्टिकही योग्य त्या व्यवस्थापन यंत्रणेकडे पोहचवून चार पैसे मिळणार असतील, तर व्यक्तिगत पातळीवरील वर्गीकरण निश्चितच योग्य पद्धतीने केले जाईल. प्लॅस्टिकबरोबरच कापड, कागद, काच, धातू यांचेही वेगवेगळे वर्गीकरण मुळातच करून मग तो कचरा योग्य त्या प्रक्रिया यंत्रणेच्या ताब्यात दिला तर कचरा व्यवस्थापनाचे काम बरेचसे सोपे आणि सुटसुटीत होईल. या यंत्रणाही एका शहराच्या पातळीवर एक अशा केंद्रित पद्धतीने नाही, तर दर एक-दोन लाख लोकवस्तीमागे एक अशा काही सूत्रानुसार विकेंद्रित पद्धतीने उभ्या केल्या तर अधिकच चांगले.
धोकादायक कचरा ह्या प्रकाराबाबत सामान्यतः अजूनही खूप अज्ञान व गोंधळाची परिस्थिती आहे. यातील आरोग्यसेवेतील कचरा वैज्ञानिक पद्धतीने प्रदूषण होऊ न देता जाळून टाकणे हा एकमेव पर्याय आहे. दवाखाने, इस्पितळे, इ. मधून असा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे तुलनेने सोपे आहे. पण या प्रकारात मोडणारा काही कचरा हा घर, होस्टेल व हॉटेल, सार्वजनिक प्रसाधनगृहे, इ. ठिकाणीही तयार होत असतो. यामध्ये मुख्यतः वापरलेले डायपर्स, सॅनिटरी नॅपकिन्स, कंडोम्स, दाढीचे ब्लेड, डायबेटिक लोकांच्या इंजेक्शनच्या सुया इ. गोष्टींचा समावेश होतो. हा विविध ठिकाणी विखुरलेला वैद्यकीय कचरा गोळा करून तो कचरा जाळण्याच्या भट्टीपर्यंत पोहचवणे या यंत्रणेची सुरूवातही असा कचरा वेगळा व व्यवस्थित वेष्टनात गुंडाळून ठेऊन योग्य त्या निशाणीसह कचरा गोळा करणाऱ्यांना सूपुर्द करण्यापासून होते. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातूनही काही मौल्यवान पदार्थ वेगळे काढून पुनर्वापर करणे शक्य असते, पण त्यासाठीही अशी प्रक्रिया करणाऱ्यांपर्यंत हा कचरा पोहचवणे महत्त्वाचे आहे. या यंत्रणा आपल्याकडे अजून योग्य पद्धतीने कार्यरत नाहीत. थर्माकोल, गेलेल्या ट्यूबलाइट्स, इ. कचऱ्याच्या विल्हेवाटीची काहीच यंत्रणा नाही, आणि त्यामुळे असा कचरा गोळाही केला जात नाही, ही आणखी एक मोठी समस्या आहे. यावर खऱे तर युद्धपातळीवर काम व्हायला हवे आहे.
मी सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे कचरा व्यवस्थापनाचा विषय हा सामाजिक न्यायाचाही विषय आहे. पण या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेत अंतर्विरोध आहे. रस्ते व सार्वजनिक जागांची स्वच्छता, गटारांची स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, कचरा गोळा करणे, वाहतूक करणे, वर्गीकरण करणे, अशा साऱ्या कामांमध्ये सामाजिक न्यायाचे महत्त्व मानणाऱ्या प्रत्येकाने यांत्रिकीकरणाला पाठिंबा द्यायला हवा. ही कामे कोणालाही करावी लागू नये, हीच आपली भूमिका असायला हवी. आज या कामांवर अनेकांची रोजीरोटी अवलंबून आहे ही वस्तुस्थिती आहे, पण म्हणून या क्षेत्रात यांत्रिकीकरणाला विरोध करणे म्हणजे या माणसांनी हीच कामे करत रहावीत, आणि पुढेही ही कामे करण्यासाठी काही माणसांनी आपले आयुष्य धोक्यात घालत रहावे, असे म्हणण्यासारखे आहे. ही साखळी कुठेतरी तोडायला हवी. या कामगारांना रोजगाराच्या इतर अधिक सुरक्षित व सन्माननीय संधी कशा मिळवून देता येतील यावर लक्ष केंद्रित करावे आणि या क्षेत्राच्या यांत्रिकीरकणावर भर द्यावा, हेच सामाजिक न्यायाला धरून होईल.
प्रियदर्शिनी कर्वे
समुचित एन्व्हायरो टेक, पुणे
pkarve@samuchit.com