भाग ३ : गोल्ड स्टँडर्डच्या सुवर्णयुगाचा अस्त
१८७१ मध्ये एखाद्या देशाने गोल्ड स्टँडर्डमध्ये भाग घेतला म्हणजे आपोआप त्याच्या चलनाच्या एका एककाची किंमत इंग्लंड ठरवेल ती होत नव्हती. तर तुमच्या देशातील चलनाच्या एककाची किंमत त्यात सरकार किती सोने वापरेल किंवा त्याबदल्यात किती सोने द्यायला तयार होईल त्यावर ठरत होती. उदाहरणार्थ १८७१ मध्ये अमेरिकन सरकारने त्यांच्या एका डॉलरच्या नाण्यात १.५०९३ ग्रॅम सोने असेल किंवा एक डॉलरच्या नोटेच्या बदल्यात सरकार १.५०९३ ग्रॅम इतके सोने द्यायला बांधील असेल असे सांगितले होते. याउलट त्याच वेळी इंग्लंडने आपल्या स्टर्लिंगच्या एका नाण्यांत ७.३४५ ग्रॅम सोने असेल किंवा एक स्टर्लिंगच्या नोटेच्या बदल्यात ७.३४५ ग्रॅम सोने द्यायला सरकार बांधील असेल असे सांगितले होते.
याचा दुसरा फायदा असा होता की आपापल्या देशात चलनाचे आपापले एकक ठरवायला सरकारे मुक्त होती तरीही आंतरराष्ट्रीय बाजारात आपोआप सोने ही एकच गोष्ट चलन म्हणून सर्वमान्य होती. त्यामुळे १८७१ मध्ये एका ब्रिटिश स्टर्लिंगच्या बदल्यात ४.८६६५ अमेरिकन डॉलर्स हे गुणोत्तर वापरून ब्रिटन आणि अमेरिकेतला व्यापार करता येणं शक्य होतं. त्याचप्रमाणे १ स्टर्लिंग म्हणजे १२.११ डच गिल्डर्स, २५.२२ फ्रेंच फ्रँक, २०.४३ जर्मन मार्क अशी गुणोत्तरे वापरात आलेली होती.
१८७१ ते १९१४ पर्यंतचा काळ हा युरोप आणि अमेरिकेसाठी भरभराटीचा काळ होता. गोल्ड स्टँडर्डच्या अंगभूत गुणांमुळे इन्फ्लेशन (भाववाढ) होत नव्हती. सोन्याच्या किमतीत चढउतार झाले तर काही सट्टेबाज त्याला वापरून स्वतःचा फायदा करून घेत होते पण व्यापारासाठी हा काळ खरोखर सुवर्णकाळ होता असं म्हटलं तरी चालेल. पण पहिलं महायुद्ध सुरु झालं आणि महायुद्धाचा खर्च भागवण्यासाठी जास्त चलन छापणं आता सर्व मध्यवर्ती बँकांना आवश्यक झालं. आता मोठी पंचाईत झाली. गोल्ड स्टॅंडर्डचा मूलभूत नियम म्हणजे तुम्ही सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त चलन छापू शकत नाहीत. पण युद्धाचा खर्च भागवायचा तर आहे. मग काय करायचं?
सोपं उत्तर म्हणजे काही काळापुरतं चलनाची सोन्यात आणि सोन्याची चलनात बदली करण्याची मुभा बंद करून टाकायची. त्यामुळे आता सरकारने जासत चलन छापले तरी एकाच वेळी सगळे चलन सोन्यात बदलून घ्यायला कुणी येऊ शकणार नाही. आणि युद्ध संपले की आपण पराभूत देशाकडून सोने वसूल करून घेऊ. मग पुन्हा चलन आणि सोने यांची अदलाबदली करण्याची मुभा पूर्ववत करून देऊ.
ही शक्कल नामी आहे. पण यासाठी युद्ध अल्पकालीन असायला हवं. जगभरात सर्व सरकारांना सर्व युद्धे आपण लवकरात लवकर संपवू असंच वाटतं. त्याचप्रमाणे इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनीलाही वाटलं की हे युद्ध लवकर संपेल. पण तसं होण्याची काही चिन्ह दिसेनात. आता कर्ज काढण्यावाचून काही गत्यंतर नव्हतं. युद्धाची प्रत्यक्ष धग फ्रांसला पहिल्या क्षणांपासून लागत होती. त्यामुळे फ्रान्सने इंग्लंडकडून कर्ज काढलं. आणि मग इंग्लंडने अमेरिकेकडून कर्ज उचललं. आता जेव्हा युद्ध संपलं तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी कर्जवसुलीचा तगादा लावला. ते कर्ज फेडायचं तर इंग्लंडला ते फ्रान्सकडून वसूल करता आलं पाहिजे. म्हणजेच फ्रान्सला ते जर्मनीकडून वसूल करता आलं पाहिजे. त्यातून मग तयार झाल्या जर्मनीला नेस्तनाबूत करणाऱ्या तहाच्या अटी. जर्मनीकडून युद्धाची भरपाई म्हणून जे आणि जितकं मागितलं गेलं, ते इतकं प्रचंड होतं की इंग्लंडकडून तहाच्या अटी आणि शर्तींवर वाटाघाटी करण्यासाठी गेलेल्या जॉन मेनार्ड केन्सने वैतागून त्या समितीचा राजीनामा दिला. केन्सचं मत होतं की व्हर्सायच्या तहाने युरोपच्या पुनर्बांधणीचा पाया तयार करावा. त्याउलट तो तह युरोपची कबर खोदत होता. त्यामुळे वैतागलेल्या केन्सने मग इकोनॉमिक कॉन्सिक्वन्सेस ऑफ पीस (शांततेची आर्थिक किंमत) हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. पण केन्स काळाच्या पुढचा विचार करत होता असंच म्हणायला लागेल. त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि जर्मनीवर तह अक्षरशः लादला गेला. काही काळापुरता स्थगित केलेलं गोल्ड स्टॅंडर्ड पुन्हा सुरळीत करण्यात आलं. आणि त्याच्या भार जर्मन गरुडाच्या पंखावर टाकला गेला.
असे होऊनही युरोपियन देशांना आपली कर्जे अमेरिकेला परत करणे अशक्य होत गेले. त्यामुळे युरोपियन देशांच्या चलनाची किंमत कमी होत गेली. त्यांना अमेरिकेकडून आयात करणे अशक्य होत गेले. अमेरिकेन मालाला जागतिक बाजारपेठेत उठाव मिळेना कारण डेव्हिड ह्यूमने मांडलेले गोल्ड स्टॅंडर्डचे तत्त्व आता युरोपला खाली खेचू लागले होते. अमेरिकन मालाला उठाव मिळेना. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत मंदी आली. आणि त्यात १९२९ मध्ये शेअर बाजार कोसळला. आता जागतिक महामंदी सुरु झाली. गोल्ड स्टॅंडर्ड हे सुगीच्या काळात स्थैर्यासाठी उत्तम मानक असले तरी पडत्या काळासाठी कुचकामी आहे हे इंग्लंडला सर्वात आधी कळले. भाववाढ होऊ न देणारे गोल्ड स्टॅंडर्ड भाव पडला तर मात्र मदतीला येत नाही हे लक्षात येऊन १९३१ मध्ये इंग्लंडने गोल्ड स्टॅंडर्डपासून स्वतःला दूर केले. १९३३ मध्ये अमेरिकेनेही तोच कित्ता गिरवला. गोल्ड स्टॅंडर्डचे सुवर्णयुग संपले. आता तुमच्या चलनाच्या मागे सोन्याची हमी असण्याचे दिवस संपले होते. तात्पुरते डागडुजी करणारे स्टॅंडर्ड वापरात आणले गेले. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे शांतीचे, सुगीचे, स्थैर्याचे दिवस संपले होते. आता व्यापाऱ्यांच्या शिडात अनिश्चिततेचे वारे भरणार होते. १९३३ मध्ये अमेरिकेने गोल्ड स्टॅंडर्ड दूर केला आणि त्याचवेळी म्हणजे १९३३ मध्ये छोट्या मिशा असलेला, किरकोळ शरीरयष्टीचा एक माणूस जर्मनीच्या चॅन्सलरपदी बसला त्याचे नाव होते अॅडॉल्फ हिटलर.
आनंद मोरे
anandmore@outlook.com