स्त्री विमर्श: संकल्पना व स्वरूप.

स्त्री-विमर्शासारख्या शब्दाला अजूनही आपल्या मराठी वाचकांच्या मनात आपलेपणा लाभलेला नाही, पण या शब्दामागचं जग, त्याचे संघर्ष, इतिहासात अदृश्य राहिलेल्या असंख्य स्त्रियांचे आयुष्य, आणि समानतेसाठी झगडलेल्या पिढ्यांची तळमळ हे सगळं डॉ. रमा नवले यांच्या लेखणीतून इतकं सहज, साधं रूप घेऊन समोर येतं की हा विषय ‘अपरिचित’ राहातच नाही. हिंदी आणि मराठीत तेवढ्याच ताकदीने लिहिण्याचं अवघड कौशल्य असणाऱ्या नवले मॅडम स्त्री-पुरुष समानतेचा पाया नेमका कुठे ढासळतो, कुठे उभा राहतो, आणि कोणत्या ऐतिहासिक प्रवासातून आजचं वास्तव आपल्यापर्यंत आलं, याचा अतिशय सोपा, मुद्देसूद आणि मराठी घरंदाजपणाला जवळ जाणारा मागोवा घेतात. घरगुती सूक्ष्म स्वातंत्र्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्त्रीवादी चळवळीपर्यंतचा हा प्रवास वाचताना आपण स्वतःच्या जाणिवांनाच नव्याने तपासतो. समाजाच्या चौकटी, त्यातल्या विसंगती, आणि तरीही पुढे चालत राहणाऱ्या स्त्रियांची जिद्द, हे पुस्तक आपल्याला केवळ माहिती देत नाही, तर आपण कुठल्या वाटेवर उभे आहोत याचा पुन्हा एकदा विचार करायला लावते. म्हणूनच हे लिखाण स्त्री-पुरुष समानतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी केवळ ‘वाचन’ नव्हे, तर एक आवश्यक संवाद कसा ठरतो हे उलगडून दाखवलं आहे प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आणि संवेदनशील लेखिका डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी जरूर वाचा.

श्रीमती रमा नवले या हिंदीच्या प्राध्यापक. आयुष्यभर त्यांनी हिंदी साहित्याचा अभ्यास केला, हिंदीचं अध्ययन व अध्यापन केलं. हिंदीबद्दल त्यांना मनस्वी प्रेम आहे. हे पुस्तक त्यांनी आधी हिंदीत लिहिलं आणि मग मराठीत त्यांनीच अनुवादित केलं हे विशेष.

स्त्री विमर्श हा शब्द तसा मराठी वाचकांना एकदम परका वाटतो. हा शब्द मराठीत वापरला जातो, तरीही तो ओळखीचा वाटत नाही. परंतु सुजाण वाचकांनी या शब्दाशी न अडता हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे अभ्यासलं पाहिजे, इतकं महत्त्वाचं हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकामध्ये स्त्री पुरुष समानता आणि स्त्री स्वातंत्र्य या गोष्टींचा अगदी मुळातून अभ्यास करून अतिशय मुद्देसूद असं लेखन रमा नवले यांनी केलं आहे.

ज्या ज्या वाचकाला, ज्या ज्या व्यक्तीला स्त्री-पुरुष समानता नीटपणे समजून घ्यायची आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. अतिशय साध्या भाषेमध्ये, महत्त्वाचे मुद्दे मांडत आणि त्या मुद्द्यांना सोपं करत करत रमा नवले यांनी स्त्री पुरुष समानतेची सगळी संकल्पना आणि स्त्री स्वातंत्र्याचे बदलते टप्पे इथे मांडलेले आहेत. मूलभूत अभ्यास करून, वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या स्त्रियांनी जे काही मौलिक काम केलेलं आहे, त्याचा संगतवार आढावा त्यांनी ह्या पुस्तकात घेतलेला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर स्त्री स्वातंत्र्याचा इतिहास देखील आपल्याला समजतो, स्त्रियांच्या गुलामगिरीचा इतिहास समजतो. पुरुषप्रधान संस्कृतीचे झालेले परिणाम लक्षात येतात. आपल्या घरापासून ते जगातल्या विविध देशातील घरातील आणि घराबाहेरील वातावरणापर्यंत सगळी चित्रं आपल्या डोळ्यासमोर येतात.

हिंदी आणि मराठी भाषेमध्ये त्याच सहजतेने पुस्तक लिहिणे हे रमा नवले यांचे कौशल्य आहे, त्याबद्दल त्या अभिनंदनास पात्र आहेत. 'मिळून साऱ्याजणी' च्या गीताली यांनी या पुस्तकाला अतिशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना दिलेली आहे. या प्रस्तावनेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे फार व्यवस्थित पद्धतीने त्यांनी मांडलेले आहेत. मला आवडलेला मुद्दा म्हणजे इतिहासामध्ये स्त्री अदृश्य का? फक्त लढायांचाच इतिहास का? सत्ताधीशांची कारकिर्द आणि सत्ता बदलांचाच इतिहास का केवळ? त्या काळातल्या बायका नेमकं काय करत होत्या, याचा इतिहासामध्ये उल्लेख नाही. म्हणूनच ही प्रस्तावना फार महत्त्वपूर्ण झालेली आहे.

ही प्रस्तावना म्हणजे स्त्री स्वातंत्र्याबद्दल स्त्री पुरुष समानतेबद्दलची एक स्वतंत्र पुस्तिकाच झालेली आहे. रमा नवले यांनी जे मनोगत लिहिले आहे ते मनोगत सुद्धा इतकं साधं सरळ आहे, त्याच्यातून त्यांची तळमळ आपल्या लक्षामध्ये येते. स्वतः इतका अभ्यास करून त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, मात्र या कामात त्यांना थोडीफार मदत केलेल्या सगळ्याच लोकांचा त्यांनी कृतज्ञ उल्लेख केलेला आहे. मनोगत वाचतानाच लक्षात येतं की रमा नवले अतिशय अभ्यासू तर आहेतच, शिवाय फार विनम्र आहेत.

विधवा स्त्रियांच्या नावाच्या मागे गंगाभागीरथी असे लावण्याची प्रथा आणि त्याच्यातील कडवट विरोधाभास यावर त्या अचूकपणे बोट ठेवतात. एकीकडे गंगा आणि भागीरथी सारख्या पवित्र नद्यांचा उल्लेख करायचा पण त्याचबरोबर विधवा स्त्रीला मात्र तिच्या आयुष्यातल्या सगळ्या सुखांपासून, सगळ्या प्रतिष्ठेपासून वंचित ठेवायचं असं हे धोरण पूर्वीच्या काळी होतं आणि त्या काळातील सगळ्या स्त्रियांनी ते सगळं निमूटपणे सहन केलं. जर त्या गंगाभागीरथी आहेत म्हणजे त्या गंगाभागीरथी इतक्या पवित्र आहेत तर मग त्यांना सुखाने जगण्याचा अधिकार का नाही? त्यांना अप्रत्यक्षपणे अशुभ का समजायचं? या सगळ्या विरोधाभासावर त्या नेमकं बोट ठेवतात.

मृदुला गर्ग यांच्या हरी बिंदी ह्या लघुकथेचा त्यांनी उल्लेख केला आहे. ही लघुकथा मुळातच वाचण्यासारखीआहे. ही कथा आपल्याला नेमकेपणाने सांगते, की बाईला तिच्या आयुष्यातल्या किंवा तिच्या दैनंदिन जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील स्वातंत्र्य मिळत नाही आणि जर कधी ते स्वातंत्र्य तिला मिळालं, तर ती कशी हरखून जाते हे सांगणारी ही कथा, कमी शब्दांमध्ये खूप बोलते. स्त्री पुरुष समानतेची चळवळ जगभरात उभे राहण्याच्या पूर्वीच्या काळात बायकांचे जगणे पूर्णतः पुरुषांच्या मर्जीवर अवलंबून असायचे. लहानपणी माहेरी असताना वडिलांना आवडत नाही म्हणून अनेक गोष्टी त्यांना करता येत नसत. विवाह झाल्यानंतर नवऱ्याला आवडत नाही, म्हणून अनेक लहान लहान गोष्टींना देखील त्यांना तिलांजली द्यावी लागे. अगदी एखादा रंग नवऱ्याला आवडत नसेल तर त्या रंगाची साडी देखील त्या कधी नेसत नसत. किंवा नवऱ्याला आवडणारे पदार्थ सतत सतत रांधून त्या विसरूनच जायच्या की त्यांना कुठला पदार्थ आवडतो ते. स्वतःची जेवणाची, वस्त्र प्रावरणाची रंगांची, छंदांची सगळी आवडच त्या विसरून जायच्या, इतकं त्यांचं जगणं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये दबून पुसून गेलेलं होतं.

जगभरात १७-१८ व्या शतकापासून ज्या ज्या स्त्रियांनी स्त्री पुरुष समानतेसाठी काम केलं, त्या सगळ्यांची व्यवस्थित माहिती तक्त्यांमध्ये रमा नवले यांनी दिलेली आहे. हा तक्ता वाचल्यानंतर आपल्याला एकूणच स्त्री पुरुष समानतेच्या ह्या चळवळीचा किंवा स्त्री स्वातंत्र्यासाठी झगडा दिलेल्या सर्व स्त्रियांचा थोडक्यात परिचय होऊन जातो. स्त्री मुक्तीच्या आद्य प्रवर्तक सिमोन दि बोवूहा या फ्रेंच कार्यकर्त्या लेखिकेची भूमिका आणि तिने लिहिलेले १९४९ सालचे सर्व जगात गाजलेले पुस्तक 'दि सेकंड सेक्स' या पुस्तकातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा या पुस्तकात उल्लेख आहे. बेट्टी फ्रीडन म्हणजे १९६० ते १९८० या काळातील अमेरिकेतील महिलांच्या चळवळीचा प्रमुख चेहरा आणि स्त्रीवादी लेखिका. अमेरिकेतील स्त्रियांना मताधिकार मिळण्यासाठी यांची चळवळ कारणीभूत ठरली. बेटी फ्रीडन यांनी फार महत्त्वाचे असे हे काम केले. 'द फेमिनाइन मिस्टीक' हे १९६३ मधील त्यांचे पुस्तक फार महत्त्वाचे आहे.

आपल्या देशात एकोणिसाव्या शतकापासून राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई रुकैया सखावत हुसेन आणि महात्मा गांधीजी, बाबासाहेब आंबेडकर अशा सगळ्याच महान नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने स्त्री-पुरुष समतेच्या चळवळीला गती दिली. विसाव्या शतकामध्ये अनेक साहित्यकार पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि समाज माध्यमं यांची भूमिका चळवळीला पूरक आणि पोषक राहिली. हा सगळा पट लेखिका आपल्यासमोर ठेवतात.

महादेवी वर्मा यांच्या 'श्रृंखला की कडियां'या पुस्तकाचा उचित उल्लेख वारंवार येतो. मैत्रेयी पुष्पा यांच्या 'खुली खिडकियां' या पुस्तकाचाही संदर्भ या पुस्तकात येतो. स्त्रियांचा राजकारणातील प्रत्यक्ष सहभाग आणि त्याचा त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, त्यांची निर्णय क्षमता आणि पुरुषी समाजाला त्यांच्या निर्णय क्षमतेबद्दल असणारी साशंकता या सगळ्या मुद्द्यांवर छान विवेचन केले आहे. आज भारतामध्ये आरक्षणामुळे अनेक खेड्यापाड्यात निवडून आलेल्या अनेक पदावरच्या स्त्रिया नामधारी असतात. निर्णय त्यांनी घेतलेले नसतात. परंतु त्यांना कागदावर स्वाक्षरी द्यावी लागते. प्रत्यक्षात त्या ज्या कोणत्या पदावर असतात, त्या पदावरचे सगळे निर्णय त्यांचे पती घेतात असंही दिसून येतं. पण तरी देखील स्त्रियांचा राजकारणातला सक्रिय सहभाग, त्यांना असलेली आरक्षित पदं आणि हळूहळू चुकत चुकत का होईना, घाबरत का होईना परंतु विचार करत, निर्णय घेत, राजकारणात स्थिर होणारी बाई देखील आपल्याला आज दिसते. हे समाधान मोठं आहे. या सगळ्याचा छान इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे.

आजपर्यंतच्या स्त्रीचे कष्ट म्हणजेच घरातील सगळी कामं, आणि संततीचे पालन पोषण, वृद्धांची देखभाल या सर्व गोष्टींना अनुत्पादक समजले गेले, याबद्दलची तळमळ आणि खंत त्यांनी व्यक्त केली आहे. माझ्या मते स्त्री पुरुष समानतेचा आणि स्त्रीच्या माणूस म्हणून जगण्याचा पहिला उल्लेख महानुभाव पंथाच्या साहित्यात आढळतो. श्री चक्रधर स्वामी यांनी स्त्रियांना संन्यासाश्रम स्वीकारण्याचा अधिकार दिला. मठाधिकार दिले.

त्यांच्या काळात महदंबा ही मठाची अधिपती होती, जी मराठीतील आद्य कवयित्री आहे. चक्रधर स्वामींना एकदा एका शिष्येने विचारले होते, की आमच्यासारख्या बालविधवा स्त्रियांनी या आश्रमजीवनात कोणत्या प्रकारे जगावे, तर त्यांनी संदेश दिला होता की बाई, पुरुष होऊन असावे. स्त्रीची मनोभूमिका बदलण्याचा प्रयत्न कदाचित ते करत होते. मासिक पाळीचा विकल्प मानू नये, अशा स्पष्ट शब्दात त्या काळात चक्रधर स्वामींनी स्त्रियांना संदेश दिला होता. त्यांच्या काळातील समस्त स्त्रियांना प्रचंड आत्मविश्वास देण्याचे महान कर्म चक्रधर स्वामींनी केले होते.

आपल्या पत्नीला चक्रधरांचे प्रवचन ऐकण्यासाठी विरोध करणाऱ्या लोकांना ते खडसावत असत. धर्माचिया चाडा, येथ बाईयां का नसाव्या? तुमचे काई जीव आन त्यांच्या काई जिऊलिया?" हे अकराव्या शतकातील शब्द आहेत चक्रधर स्वामींचे.

पुढे जवळपास ५०० वर्षांनी समर्थ रामदास स्वामींनी जवळपास असेच शब्द स्त्रियांसाठी वापरले होते. "पुरुषांचा तो जीव आणि स्त्रियांचा ती जीवी ऐसी नको उठाठेवी" रामदासांच्याही मठामध्ये संत वेणाबाईंना मठाधिकार होते. त्यांचा अधिकार इतका मोठा होता की लोक त्यांना वेण्णा स्वामी असे म्हणायचे. मध्ययुगीन महाराष्ट्रात चक्रधर स्वामी आणि रामदास स्वामी या दोघांनी स्त्री-पुरुष समानतेबद्दल फार महत्त्वाचे काम केले होते, हे लक्षात येते. स्त्री विषयक ह्या त्यांच्या भूमिकेचा उल्लेख या पुस्तकात असायला हवा असे मला वाटते, अर्थातच लेखिकेचा विचार आणि त्यांची भूमिका वेगळी असू शकते.

साधारणतः १९४०-४५ च्या आसपास कुटुंब नियोजन हा शब्द देखील कोणाला माहित नव्हता. त्या काळामध्ये वारंवार बाळंतपणं होऊन अशक्त होणाऱ्या प्रत्येक घराघरातील बाईसाठी रघुनाथ कर्वे यांनी कुटुंब नियोजनाची साधने यांचा प्रचार आणि प्रसार केला. प्रचंड जनक्षोभाला त्यांनी तोंड दिले. त्यांच्यावर अनेक खटले दाखल केले गेले, तरीही रघुनाथ कर्वे यांनी आजन्म हे काम केले. त्याचाच परिणाम म्हणून आज घराघरातली बाई स्वतःला किती मुले असावीत आणि ती किती अंतराने व्हावीत याचे नियोजन करू शकते आणि सुदृढ व स्वस्थ राहू शकते. स्त्रीच्या आयुष्याच्या या एका वेगळ्या कलाटणीला जबाबदार असणारे रघुनाथ कर्वे यांचाही उल्लेख या पुस्तकामध्ये आवश्यक आहे असे माझे मत. पुढच्या आवृत्तीमध्ये या गोष्टींचा उल्लेख व्हावा अशी अपेक्षा.

स्त्री विमर्श हे पुस्तक आजच्या प्रत्येकच स्त्रीने आणि पुरुषांनी देखील वाचणे महत्त्वाचे आहे. आजवरचा संघर्ष चळवळीचे स्वरूप आणि थोर स्त्री- पुरुषांचे त्यातील योगदान हे समजून घेऊन आज मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा योग्य लाभ घेत, आपलं जीवन अधिक सुरक्षित सजग आणि सकस बनविणे हेच आजच्या पिढ्यांचे कर्तव्य आहे. पुरुष आणि स्त्री दोघांनाही समानता आणि विवेक यांच्या आधारावर जीवन व्यतीत करणे उमजले, तर जगण्यातले अर्धे प्रश्न सुटतील. आज आपल्याला उपलब्ध असणाऱ्या या मोकळ्या वाटांवर मार्गक्रमण करत स्त्रियांनी जगण्यावर आपापली मुद्रा कोरावी, यासाठी हा इतिहास अवगत असणे गरजेचे आहे. डॉ. रमा नवले यांचे हार्दिक अभिनंदन करून समस्त वाचकांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन करते.