युरोप ते शेती : स्वाती कर्वे यांचे लेखनविश्व
पुस्तक वाचल्यानंतर उमटणारे अनुभव आणि विचार हे त्या पुस्तकाच्या आशयाला नवी दिशा देतात. परीक्षण किंवा अभिप्रायातून केवळ पुस्तकाची माहिती मिळत नाही, तर लेखनाचा प्रवास, लेखिकेचा दृष्टिकोन आणि वाचकाला स्पर्शून जाणारे पैलूही उलगडत जातात. या लेखामध्ये स्वाती कर्वे यांच्या दोन वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांबद्दलचे अभिप्राय एकत्र सादर करण्यात येत आहेत, ज्यातून त्यांच्या लेखनातील वैविध्य आणि अनुभवांची खोली स्पष्टपणे समोर येते.
युरोप प्रवासवर्णनावर आधारित ‘मनमोहक युरोप’ या पुस्तकावरील अभिप्राय सुनील खरे (पुणे) यांनी लिहिला असून, त्यात प्रवासातील माहिती, इतिहास, निरीक्षणे आणि वाचकाच्या दृष्टीने पुस्तकाची उपयुक्तता यांचा सखोल आढावा घेतला आहे. तर शेती व फार्महाऊस जीवनावर आधारित ‘आमची शेती – आमचे सोबती’ या पुस्तकावरील अभिप्राय अश्विनी काशीकर यांनी लिहिला असून, शहरी जीवनातून ग्रामीण वास्तवाकडे वळताना येणारे अनुभव, अडचणी आणि त्या मागील प्रामाणिक भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली आहे. हे दोन्ही अभिप्राय वाचकांसाठी पुस्तकांकडे पाहण्याची एक समृद्ध दृष्टी देतात.
सविस्तर अभिप्राय
मनमोहक युरोप
स्वाती कर्वे यांचे युरोपचे पुस्तके त्यांचे स्वतःचे स्वतंत्र असे दुसरे पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी सहसा कंडक्टेड टूर्समधून दाखवल्या जाणाऱ्या नेहमीच्या ठिकाणांचे दर्शन घडवले आहे. असे असले तरी त्यापेक्षा अधिक तिथे त्या ठिकाणी फिरताना आणखी काय बघायला मिळालं असतं, हेही त्या सांगतात. त्यामध्ये त्याचा त्या त्या ठिकाणाचा इतिहास आहे. त्यांच्याविषयीची विशेष माहिती आहे.
ही माहिती त्यांनी ठीकठिकाणहून गोळा केली आहे. गाईड सांगतो ती माहिती तर असतेच, परंतु ती पुरेशी नसते. आजकाल गुगलभाऊंची बरीच मदत मिळते. परंतु ती पडताळून घ्यावी लागते. त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहून चालत नाही. छापून आलेल्या इतरांच्या लेखांमध्ये कधी कधी चुका असू शकतात. त्यामुळे संपूर्णतः अशी माहिती एका हाती मिळत नाही. गोळा करून, कन्फर्म करून घ्यावी लागते. ते कष्ट लेखिकेने घेतलेले दिसतात. यामध्ये सुरुवातीला व्हिसा मिळवण्यासाठी जी काही खटपट करावी लागली, त्याविषयीची सुरस माहिती आहे. ती वाचताना एकदा काम झाल्यानंतर त्या टेन्शनमधून सुटल्यानंतर लिहिली असल्यामुळे आपल्यालासुद्धा खूप रस घेऊन वाचता येते. यामध्ये माणसांचे वर्णन आहे, परंतु कंडक्टर टूरमधून गेल्यानंतर तुम्हाला स्थानिक माणसे भेटण्याची शक्यता खूपच कमी असते; तरी कुठे काय सावधानता बाळगायची, कुठे काय पाहून ठेवायचं, काय कुठे काय खरेदी करायचं किंवा करायचं नाही याविषयी त्यांनी जागोजागी सूचना देऊन ठेवल्या आहेत आणि त्या खूप वाचकाला उपयोगी पडणाऱ्या दिसतात. कारण युरोपला जाणाऱ्या टूर्सही सतत चालूच राहतील. अनेक लोक आपल्या प्रवासामध्ये प्राधान्याने युरोप ठेवतात. त्यादृष्टीने स्वाती कर्वे यांचे हे पुस्तक उपयुक्त ठरेल. बघून आलेल्या माणसांना पुनःदर्शनाचा आनंद मिळेल.
- सुनील खरे, पुणे
========================
आमची शेती – आमचे सोबती
शेतीवरची पुस्तकं बघायला गेली तर ती किफायतशीर शेती, कायदे, तंत्रज्ञान, तणनिर्मूलन, वृक्षरोपण, गोपालन... अशा विषयांवरची दिसते. स्वाती कर्वे यांच्या पुस्तकात जरी हे सर्व विषय आले असले तरी हे पुस्तक याहून फार वेगळ्या प्रकारचं असलेलं दिसतं. हौस म्हणून लवकर सेवानिवृत्त होऊन सो कॉल्ड फार्महाऊस म्हणतात तशी जागा घेऊन तेच फर्स्ट होम करणाऱ्या जोडप्याची ही कथा. जे कोणी अशी मनीषा बाळगत असतील त्या सर्वांना हे पुस्तक मुद्दाम वाचण्यासारखं आहे. गिरीश सहस्रबुध्दे यांचं मुखपृष्ठ अतिशय बोलकं आहे. त्यामध्ये या शेतात काय चालतं याची छान कल्पना येते. गाई, गुरंवासरं, श्वानमंडळी, तिथे उगवणारी पिकं, फुलं, फुलपाखरं, आजूबाजूला लागणारे वणवे यामध्ये दिसतात. गाईम्हशींमध्ये मन फार गुंतवून चालत नाही, जनावरं विकणारे व्यावसायिक लोक हे केवळ धंदेवाईकच कसे असतात, याबद्दलही स्वातीताई मोकळेपणाने लिहितात.
स्वातीताईंचे यजमान सुनील खरे हे जरी शेतीतले शिक्षण घेतलेले एम् एस्सी ॲग्रिकल्चर असले तरीसुद्धा काही गोष्टींसाठी शिक्षण आणखी घ्यावं लागतं, माहिती मिळवत रहावं लागतं, कशाला सबसिडी मिळणार आहे, ती कशी घेता येईल, याबद्दलची नोंद सतत घेत रहावी लागते. शेतीमध्ये कामाला माणसं मिळत नाहीत. अशा अनेक गोष्टी एकदा जागा घेतल्यानंतर तुम्हाला कळत जातात. सुनील ह्यांचा पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन अनुभव खूप दांडगा असल्यामुळे हे शक्य झाले. परंतु विशेषतः यांची जागा खूप एकांडी असल्यामुळे त्यासाठी काही विशेष गुण अंगी असणं आवश्यक असतं. रात्री-अपरात्री मदत लागली तर आजूबाजूला तुम्हाला कोणी मिळत नाही. त्या दृष्टीने हे जगणं अवघड आहे; याचा प्रत्यय या लिखाणातून येतो. इथे येऊन एकदा राहून बघितलं तर एखाद् दोन दिवसातच त्यांच्या मित्रमंडळींना किंवा भावंडांना पटतं की हे सोपं नाही. प्रत्यक्ष लेखन जरी स्वातीताईंचं असलं तरी सुनील यांचा त्यात बरोबरीने सहभाग आहे. शहरी वातावरणातून एकदम गावात राहायला जाणे नक्कीच सोपं नव्हतं ,पण आवड असल्यामुळे ह्या दांपत्याने ते सहज जमवलं.
- अश्विनी काशीकर