‘हसरे किनारे’ ते ‘पिंपळायन’ : माणूसपण शोधणाऱ्या कविता

निसर्ग, स्त्रीजीवन, सामाजिक विषमता, पर्यावरण, समता आणि मानवतावादी मूल्यांचा धागा एकत्र गुंफत कविता केवळ भावनांची अभिव्यक्ती न राहता विचारांची आणि परिवर्तनाची ताकद बनते, याचा प्रत्यय मिळून साऱ्याजणीच्या सांगली जिल्हा प्रतिनिधी डॉ. सोनिया कस्तुरे यांच्या ‘हसरे किनारे’ आणि ‘पिंपळायन’ या दोन काव्यसंग्रहांतून येतो. प्रा. सरिता माने-पाटील यांनी लिहिलेल्या या परीक्षणात ‘हसरे किनारे’ मधील निसर्गसंवेदना, स्त्रीच्या कष्टमय जगण्याचे चित्रण आणि संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा यांचा वेध घेतला आहे; तर ‘पिंपळायन’ मधून बुद्ध, फुले-सावित्री आणि समतेच्या विचारांचा वारसा कवितेतून कसा व्यक्त होतो, हे उलगडून दाखवले आहे. संवेदनशीलता, विवेक, सामाजिक बांधिलकी आणि आशावादी दृष्टिकोन यांचा संगम घडवणाऱ्या या दोन काव्यसंग्रहांची ओळख करून देणारा हा लेख वाचकांना कवितेकडे नव्या नजरेने पाहायला प्रवृत्त करतो.

जन्माला आलो म्हणून जगत राहायचं आणि मरण येईपर्यंत आजूबाजूचं जग निमूटपणे पाहत राहायचं, असं चाकोरीबद्ध जीवन या पृथ्वीवर अनेक जण जगत असतात. आपण भलं आणि आपलं छोटंसं, उबदार घरटं बरं, असं प्रमाणबद्ध, सुरळीत आणि आरामदायी जगणं सगळ्यांनाच जमत नाही. माणूस म्हणून जगताना पावलोपावली चिरडली जाणारी मानवी मूल्यं, माणुसकीची होणारी कुचेष्टा, अवहेलना, अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य, विषमता आणि भेदभाव हे सगळं जेव्हा असह्य वाटू लागतं, तेव्हाच दुसऱ्या बाजूला सृजनशील काहीतरी घडू लागतं.

चित्रकार चित्रातून व्यक्त होतो, शिल्पकार शिल्पातून, गीतकार-संगीतकार गाण्यातून, तर कलाकार अभिनयातून स्वतःला मांडत असतात. संवेदनशील मनाची माणसं अभिव्यक्तीसाठी वेगवेगळ्या कला प्रकारांचा आधार घेतात आणि साहित्य हा त्यातील एक सर्वांगसुंदर कला प्रकार आहे. कथा, कविता, कादंबरी, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन अशा विविध माध्यमांतून माणूस स्वतःला काय सांगायचं आहे, हे मांडू शकतो.

असं म्हणतात की, प्रार्थना केल्याने देव भेटत नाही; परंतु प्रार्थनेमुळे माणूस बदलतो आणि बदललेला माणूस परिस्थिती बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागतो. त्याच न्यायाने कवी आणि लेखक यांच्या लेखनामुळे वाचकांना एक विचारधारा मिळते आणि ती त्यांना नवा दृष्टिकोन देते. त्या दृष्टिकोनातून वाचक स्वतःकडे माणूस म्हणून पाहू लागतो आणि हळूहळू स्वतःत बदल घडवू लागतो. अशाच प्रकारचा सकारात्मक, प्रागतिक, विवेकवादी आणि मानवतावादी ‘माणूसनामा’ आपल्या शब्दांतून उभा केला आहे सांगलीच्या डॉ. सोनिया कस्तुरे यांनी.

डॉ. सोनिया कस्तुरे यांचे ‘हसरे किनारे’ आणि ‘पिंपळायन’ हे दोन काव्यसंग्रह नुकतेच लोकायत प्रकाशन, सातारा यांनी प्रकाशित केले आहेत. डॉ. आ.ह. साळुंखे (तात्या) आणि डॉ. तारा भवाळकर यांची प्रस्तावना, पुलकेशी साळुंखे यांचे मुखपृष्ठ, विकास धुळेकर यांचे मुद्रितशोधन आणि राकेश साळुंखे यांचे लोकायत प्रकाशन, हे संपूर्ण साहित्यिक आणि वैचारिक समिकरण अत्यंत सुंदररीत्या जुळून आले आहे.

प्रागतिक विचारसरणी, स्वतंत्र बुद्धी आणि स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. सोनिया कस्तुरे यांचे ‘हसरे किनारे’ आणि ‘पिंपळायन’ हे दोन्ही काव्यसंग्रह सामाजिक जाणीवा प्रगल्भ करणारे, सजगपणे जीवनाकडे पाहायला शिकवणारे आणि मानवतावादी मूल्ये जपण्यासाठी बळ देणारे आहेत.

🔹 हसरे किनारे 🔹

हा प्रामुख्याने निसर्गविषयक कवितांचा संग्रह असून त्यामध्ये काही प्रभावी व्यक्तिचित्रेही आहेत.

🔹 मी वड बोलतोय 🔹

या कवितेतून निसर्गाची झालेली अपरिमित हानी, पर्यावरणाचं ढासळलेलं संतुलन आणि विकासाच्या नावाखाली चाललेलं नैसर्गिक स्रोतांचं विद्रूपीकरण कवयित्रीने संवादरूपातून प्रभावीपणे मांडलं आहे.

“तुम्ही माणसं ग्रेट... तुमचा मेंदू मोठा! तुमच्या हातात बरंच काही... थोडा विवेकी विचार करा; तुम्ही जगा... मला जगवा...”

ही वडाची हाक म्हणजे निसर्गाचंच आर्जव वाटतं.

🔹 ऊसतोड सखी 🔹

या व्यक्तिचित्रणातील,

“वाळलेला देह तिचा चेहरा काळवंडलेला कडब्यासम शरीर नवजात चिकटलेला...”

या ओळी स्त्रीचे काबाडकष्ट, कर्तव्यनिष्ठा आणि कुटुंबसंस्था टिकवण्यासाठीचं तिचं समर्पित, हालाखीचं जीवन अधोरेखित करतात.

🔹 पाटी 🔹

या कवितेतील,

“काळ्याशार पाटीवर शांत पांढऱ्या पेन्सिलीने ‘ती’ आत्मभान गिरवत गेली सावित्री-जोतीच्या कष्टाने ‘ती’ जगणं सावरत गेली...”

या ओळी महिला सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत फुले दांपत्याच्या योगदानाची जाणीव करून देतात.

🔹 हसरे किनारे 🔹

या कवितेतील,

“ओंजळीत ठेव, हसरे किनारे... प्रवाहाविरुद्ध, असंख्य निखारे...”

या ओळी जणू संपूर्ण स्त्रीवर्गालाच सांगतात की संघर्ष, शोषण, दमण आणि काटेरी वाटा अजूनही संपलेल्या नाहीत. त्यामुळे ज्ञानाचा आणि जाणीवांचा दीप सतत तेवत ठेवण्याची गरज आहे.

डॉ. सोनिया यांचा दुसरा काव्यसंग्रह ‘पिंपळायन’ त्याच्या वेगळ्या नावासह लेखिकेच्या प्रागतिक, धाडसी आणि बुलंद सामाजिक जाणीवांचा परिचय करून देतो. त्यामुळे हा संग्रह वाचकांसमोर एक वेगळा दृष्टिकोन घेऊन उभा राहतो. ‘पांडुरंग’सह इतिहासातील सुधारणावादी व्यक्तिमत्त्वं, समता, बंधुता, एकता, लोकशाहीचे पुरस्कर्ते आणि पुरोगामी चळवळीतील विचारवंत ‘पिंपळायन’मध्ये कवितेचा विषय बनले आहेत.

आदरणीय आ.ह. तात्यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, पिंपळाकडे जाणं म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाने जाणं. लेखिका स्वतःसह वाचकांनाही दया, धर्म आणि शांतीच्या मार्गाचा पथिक होण्यासाठी प्रेरित करते. तथागत बुद्ध, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर महान व्यक्तींबद्दलची विचारपूर्वक कृतज्ञता ‘पिंपळायन’मध्ये उत्कटतेने व्यक्त झाली आहे.

मराठी काव्यरसिकांच्या वतीने ‘हसरे किनारे’ आणि ‘पिंपळायन’ या डॉ. सोनिया कस्तुरे लिखित दोन्ही काव्यसंग्रहांचे मनःपूर्वक स्वागत आणि लेखिकेच्या शब्दसाधनेला उदंड शुभेच्छा!

-- १. हसरे किनारे — पृष्ठसंख्या : ८८ २. पिंपळायन — पृष्ठसंख्या : १०२

कवयित्री : डॉ. सोनिया कस्तुरे, सांगली

प्रकाशक : लोकायत प्रकाशन, सातारा

किंमत : प्रत्येकी रु. २००/-