कोसबाडच्या टेकडीवरून
1923 साली, अवघ्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा बालविवाह झाला. विवाहाच्या दिवसानंतर अनुताईंना सासरचे किंवा पतीचे दर्शनही झाले नाही. कारण अजून पुढचे सोपस्कार बाकी होते, मात्र तेव्हढ्यातच वैधव्याची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळली. आपल्याला सासरचे व पतीचे दर्शनही झालेले नाही, तेंव्हा आपण सासरचे नाव का लावावे असा क्रांतिकारी विचार असणाऱ्या अनुताईंनी आपले माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चालू ठेवले. त्या इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी तत्कालीन सामाजिक चालीरीती व स्त्रीजातीवरील बंधने झुगारून आपले अध्ययन पुढे चालू ठेवले.
वयाच्या तेराव्या वर्षी बालविधवा झालेली एक मुलगी ध्येयवेडाने झपाटून आपल्या आयुष्यात किती अफाट अलौकिक कार्य करू शकते याचे प्रत्ययकारी पुस्तक म्हणून 'कोसबाडच्या टेकडीवरून' या पुस्तकाकडे पाहता येईल. अनुताई वाघ ह्यांची ओळख महाराष्ट्राला एक सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ म्हणून आहे. 'कोसबाडच्या टेकडीवरून' हे त्यांचे आत्मकथन. यात त्यांनी त्यांच्या जडणघडणीपासून ते फलश्रुतीपर्यंतची चित्रकथा हळुवारपणे उलगडली आहे.
आजच्या तारखेस 17 मार्च रोजी 1910 साली पुण्यात अनुताईंचा जन्म झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. तर आई यमुनाबाई सोनोरी येथील सरदार पानसे यांच्या घराण्यातील होत्या चांगल्या गुणाने मराठी सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी अध्यापकीय प्रशिक्षणाच्या परीक्षा दिल्या. 1929 मध्ये या परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पुढ्यात आव्हान होते ते नोकरी करण्याचे!
अनुताईंचे वय असेल जेमतेम 19-20 वर्षांचे! बालविधवा असतानाही माहेरचे आडनाव लावून शिक्षण पूर्ण करून पुढे नोकरी करणे म्हणजे त्या काळात एक अग्निदिव्यच होते! अनुताईंनी हे दिव्य पार पाडले. आपल्याला मिळेल त्या परगण्यात नोकरी करणे तेंव्हा क्रमप्राप्त होते. अनुताईंनी मनाचा ठाम निर्धार केलेला असल्याने नोकरीचे ठिकाण कळले तेंव्हा त्या हडबडून गेल्या नाहीत. त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना पाठिंबा दिला आणि अनुताई आपल्या शिक्षिकेच्या नोकरीवर रुजू होण्यासाठी नासिक विभागातल्या खेडयातल्या मातीत भूमिकन्या म्हणून रुजू झाल्या!
अनुताईंनी आपल्या नोकरीची सुरुवातीची तीन वर्षे अशा तऱ्हेने ग्रामीण भागात घालवली. 1933 मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी त्या प्राथमिक शिक्षिका म्हणून पुण्यातल्या हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या. हुजुरपागा शाळेत शिक्षिकेची नोकरी करतानाही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी रात्रशाळेत प्रवेश घेतला, आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करून 1937 मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. नोकरीची आधीची तीन वर्षे खेड्यात काम केल्याने त्यांना गावाकडच्या मातीची ओढ लागली होती, त्यांचे मन पुन्हा तिकडे काम करण्यासाठी उचल खाऊ लागले अन् पुन्हा एकदा ग्रामीण भागात सामाजिक व शैक्षणिक कार्यांत त्या मग्न झाल्या.
त्या काळात देशात सर्वत्र स्वातंत्र्य लढ्याचे जोरदार वारे वाहत होते.देशातील तरुण फळी तर या विचाराने भारलेली होती. महात्मा गांधींजींनी लोकांना स्वराज्याचे जे काही मौल्यवान मंत्र दिले होते त्यातीलच एक हाक होती ‘खेड्याकडे चला’ या अभियानाची! नुकतीच खेड्यात काही वर्षे राहून आलेल्या नि सामाजिक जाणिवांचे भान असणाऱ्या अनुताईंना गांधीजींच्या या आदेशाने गावाकडच्या मातीची आणखीनच भुरळ पाडली.
यातून प्रेरणा घेऊन 1945 साली त्या मुंबईमधील बोरिवली भागात भरलेल्या ग्रामसेविकांच्या प्रशिक्षण शिबिरात दाखल झाल्या. याच शिबिरात त्यांच्याप्रमाणेच भारलेल्या, बालशिक्षणाचा वसा घेतलेल्या ताराबाई मोडक यांच्याशी अनुताईंचा परिचय झाला. ताराबाई मोडक यांच्या भेटीने अनुताईंना जगण्याच्या नव्या प्रेरणा आणि बळ लाभले. त्यातून अनुताईंच्या सर्जनशील गुणांना चालना मिळाली. ताराबाईंपासून प्रेरणा घेऊन अनुताईंनी आपले ग्रामीण भागातील अध्यापनकार्य साकारायचे निश्चित केले आणि तसे करून दाखवले !
1945 मध्ये ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथील मुलांसाठी ग्राम बालशिक्षा केंद्र ही पूर्वप्राथमिक शाळा सुरू करण्यात आली होती. इथे अनुताई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. रुजू झालेल्या दिवसापासून सतत 47 वर्षे (1945 ते 1992) अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य केले. या दरम्यानच 1961 मध्ये मुंबईमधल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाची 'बीए'ची पदवी परीक्षा त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या
बोर्डी येथे ग्राम बालशिक्षा केंद्रात 1933- 1944 अशी अकरा वर्षे अध्यापनाचे कार्य त्यांनी नेटाने पार पाडले. त्या पुढच्या काळात त्यांनी आताच्या पालघर जिल्ह्यातील कोसबाड या आदिवासीबहुल भागातल्या नूतन बालशिक्षा केंद्र इथे 1945 पासून अध्यापनाचे कार्य हाती घेतले. बालवाडी सुरू केल्यावर जवळच्याच दलित वस्त्यामधून बहुसंख्येने येणारी परिस्थितीमुळे हतबल झालेली मुले अत्यंत अस्वच्छ असत. केसांच्या जटा झालेल्या, खरजेने भरलेली, उवांचा सुळसुळाट झालेला. मळकट फाटके कपडे. त्यांच्या आयांना, मुलांना स्वच्छ ठेवायला हवे ही जाणीवच नव्हती. तेल-साबू-सोडा यासाठी खर्च करण्याची त्यांची कुवतही नव्हती. त्यामुळे मुलांची स्वच्छता हा बालवाडीमधला पहिला कार्यक्रम म्हणून त्यांनी निश्चित केला. त्यासाठी वेण्या-फण्या, आंघोळी, कपडे धुणे वगैरे सर्व गोष्टींची सोय केली. एक-एक जोड कपडांचा दिला. अंग पुसायला रुमाल दिला. चुलीवर मोठ्या पातेल्यात पाणी तापवले जायचे. शिक्षक ते लहान बादल्यांत काढून देत असत. त्यात हवे तितके थंड पाणी मुले घालत. लाईफबॉय साबण आंघोळीसाठी दिला जाई. एकमेकांपुढे बसून पाठी धुतल्या जात. मोठ्या भावंडांनी लहान भावंडांना आंघोळ घालायची. आंघोळीची अशी एकच धमाल उडत असे. अनुताईंच्या वर्णनावरुन तिथली सामाजिक आर्थिक परिस्थिती किती बिकट असावी याचा अंदाज यावा. तब्बल अठ्ठावीस वर्षे अनुताईंनी कोसबाडच्या या टेकडीवजा गावात आपले आयुष्य वेचले. इथल्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपला देह झिजवला.
1973 मध्ये त्या कोसबाडच्या नूतन बालशिक्षा केंद्राच्या सरचिटणीस झाल्या. दोनेक वर्षभर ही जबाबदारी पार पाडल्यानंतर त्या राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून नियुक्त झाल्या. अखिल भारतीय पूर्वमाध्यमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. अनुताईंचा अनेक शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध आला; अशी अनेक पदे त्यांनी सांभाळली मात्र त्यांचे सारे लक्ष आपल्या कोसबाडच्या कर्मभूमीत असायचे! 'घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी' अशी त्यांची अवस्था असे. बैठका वा कामाच्या नियोजना निमित्त त्या कुठेही गेल्या तरी त्यांचे चित्त कोसबाडमध्येच मागे राही.
आपल्या विविध पदांच्या अनुभवाचा फायदा त्यांनी बोर्डी-कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढवण्यात केला. या परिसरात त्यांनी दहा पाळणघरे, अकरा बालवाड्या, चार पूर्वप्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षणवर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, कार्यानुभव प्रकल्प, उद्योगप्रशिक्षण, ठाण्यात स्त्रीशक्ती जागृती संस्था, रात्रशाळा, तीस प्रौढशिक्षण संस्था, कुरणशाळा, डहाणू इथे मूकबधिर संस्था, ग्रामीण आरोग्यकेंद्रे अशा अनेक संस्थांचे जाळे त्यांनी विणले! इथल्या लोकांच्या शिक्षणाच्या गरजा त्यांनी पूर्ण केल्या. आदिवासींना नुसते शिक्षित करून चालणार नाही तर त्यांना आपल्या पायावर उभे केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात घर करून राहू लागला. त्याला मूर्त स्वरूप देत या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला.
ताराबाई मोडक यांनी, ब्रिटिशांनी रूढ केलेल्या परकीय शैक्षणिक संकल्पनेला आव्हान दिले होते. त्यांच्या प्रयोगशीलतेला अनुताईंच्या निर्मितिक्षमतेची तेवढीच प्रभावी जोड मिळाली आणि त्याद्वारे आधी बोर्डी आणि नंतर कोसबाड ह्या बालशिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या. 1973 मध्ये ताराबाईंचे निधन झाले, आपल्याला प्रेरणा देणारी आपली सहयोगी आपला जीवनप्रवास पूर्ण करून अनंताच्या यात्रेस गेल्यावर अनुताई हळव्या झाल्या मात्र आपल्या ध्येयधोरणांना त्यांनी बळकटी दिली. कारण आपली ध्येये पूर्ण करणे हीच ताराबाईंना खरी श्रद्धांजली आहे याची पुरेशी जाणीव अनुताईंना होती. ताराबाईंच्या नंतर या संस्थांची पूर्ण धुरा अनुताईंनी अखेरपर्यंत आपल्या शिरावर यशस्वीपणे पेलली. या संस्थांचे त्यानी नुसते संवर्धन केले असे नव्हे तर त्यांचा विस्तारही केला.
मुलांचे शिक्षण म्हणजे त्यांचे खेळणे! आपण शाळेत जातो म्हणजे तिथले विद्यार्थीदशेतले जगणे आपल्याला शिक्षा वाटू नये यासाठी अभिनव शिक्षण पद्धतीचा अवलंब अनुताईंनी केला. रुक्ष पाठ्यक्रमातील शालेय शिक्षण आपण ‘शिकलो’ हे लक्षातही येऊ न देता मुलांना शिक्षित करावयाचे; खेळण्याच्या, बालगीतांच्या, गोष्टींच्या रूपात शैक्षणिक साधने तयार करावयाची, त्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा शोध घ्यावयाचा आणि स्वतः बनविलेले शिक्षणसाहित्य वापरून मुलांना हाताळायचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. परिणामतः त्यांच्या संस्थांत स्त्रिया, मूक-बधिर व अपंग यांच्या विकासाचे प्रकल्प कार्यान्वित झाले. पाच-पंचवीस गावांचा समूह एकत्र करून ‘ग्राममंगल प्रकल्पा’पर्यंत अनुताई अखेर पोहोचल्या. आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा गांधी, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेने स्त्रीजागृती आणि स्त्रियांचा उद्धार यांसाठी अनुताईंनी अविरतपणे कार्य केले.
अनुताईंनी केलेल्या कामाची चर्चा आदिवासी जगताबाहेरही होऊ लागली अन् शासनदरबारीही त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. अनेक सामाजिक संस्थानी त्यांच्याकडे आपला हात पुढे केला. त्यांचा गौरव केला. अनुताईंना त्यांच्या विधायक व भरीव कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाने 1972 मध्ये ‘आदर्श शिक्षिका’ व 1975 मध्ये ‘दलित मित्र’ हे सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.1978 मध्ये त्यांना फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. ‘आदर्श माता’, सावित्रीबाई फुले पुरस्कार, बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा आशा भोसले पुरस्कार व रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी त्यांना सन्मानित केले. 1985 मध्ये केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पना, पद्धती आणि प्रयोग यांची साद्यंत चर्चा स्फुटलेख व पुस्तकांद्वारे केलीय. त्यांच्या पुस्तकांपैकी बालवाडी कशी चालवावी, कुरणशाळा, विकासाच्या मार्गावर, शिक्षणमित्र माला, अजब सातभाई, आटपाट नगरात, सकस आहार गीते, टिल्लूची करामत, कोसबाडच्या टेकडीवरून, गुरुमाऊलीचा संदेश हे नाटक, सहजशिक्षण, दाभणेच्या जंगलात, विकासवाडी दर्शन इ. पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती, इ. भाषांत अनुवादही झाले असून काहींच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत. बालवाडीतील गोष्टी भाग 1 व 2, बालवाडीतील बडबडगीते, बालवाडीतील कृतिगीते, प्रबोधिका इ. पुस्तके आणि शिक्षक-पालक–प्रबोधनासाठी चालविलेल्या शिक्षणपत्रिका, स्त्रीजागृती करणारे सावित्री इ. मासिकांचे त्यांनी स्फुटलेखन केले. केसरी, छावा इ. नियकालिकांतून स्फुटलेखन केले. अनुताईंचे कार्य तरुण पिढीस, विशेषतः स्त्रियांसाठी, स्फूर्तिदायक व मार्गदर्शक आहे. 27 सप्टेंबर 1992 रोजी आपल्या कर्मभूमीत बोर्डी येथे त्यांचे अल्प आजाराने निधन झाले आणि आदिवासी शिक्षणासाठी अविरत तेवता असणारा हा नंदादीप निमाला.
अनुताईंच्या गौरवार्थ पु.ल. देशपांडे म्हणतात की,"वारल्यांना स्वत:विषयी वाटणार्या नगण्यपणाच्या गंडातून मुक्त करणे हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. गोदावरीबाईंनी (परुळेकर) वारल्यांतला आत्मविश्वास जागवला. अन्यायाविरुद्ध आपण पेटू शकतो, असे त्यांना वाटायला लावले- हे आवश्यकच होते. पण हे झाले भक्कन पेटणार्या भडक्यासारखे. भडका उडतो तसाच विझतोही चटकन. त्यासाठी विधायक प्रवृत्तीची, शांतपणाने, न कंटाळता ह्य शोषितांच्या लहानसहान अडचणी सोडवत त्यांच्यात जाऊन राहणार्या कार्यकर्त्यांची फौज लागते. गांधीजींनी अशी फार मोठी फौज निर्माण केली होती. अनुताई (वाघ) त्या फौजेतल्या अखेरच्या सैनिकांपकी. एक काम घेऊन सतत राबणार्या आणि स्वत:ला फक्त त्या कार्याचे साधन मानणार्या. कसल्याही वैयक्तिक गौरवाची अपेक्षा न करणार्या अनुताई वाघांविषयी माझ्या मनात फार मोठा आदर आहे. मनाला निराश करून टाकणार्या सभोवतालच्या परिस्थितीत अनुताईंसारख्या कार्यकर्त्यां अशी कुठली प्रेरणा मनात जिवंत ठेवून काम करीत राहतात ते मला कळत नाही. वास्तविक त्यांच्यापुढे मला तर आपण कस्पटासारखे आहोत, असे वाटते. "
ज्या देशात क्रांतिकारकांचा विसर लोकांना लवकरच पडतो तिथे समाजधुरीणांचे काय स्मरण केले जात असेल? उपेक्षित आणि वंचितांच्या कल्याणासाठी आपले सारे जीवन व्यतित करणारया लोकांची येणारया पिढीस किमान अक्षरओळख तरी असली पाहिजे. कणभर काम करून मणभराचा गाजावाजा करणाऱ्या आजच्या कोलाहलग्रस्त आणि द्वेषग्रस्त काळात अनुताई वाघांसारख्या स्त्रिया दंतकथा वाटल्यास नवल वाटून घेऊ नये! 'कोसबाडच्या टेकडीवरुन' हे पुस्तक वाचत असताना आपण आणि आताचा समाज किती कर्मदरिद्री आणि हतबल झाला आहे हे पानोपानी जाणवते. ओघवत्या शैलीतले हे पुस्तक केवळ अनुताईंचे जीवनकथन करते असे नव्हे तर आदिवासींच्या जीवनावर प्रकाश टाकते. हे पुस्तक तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे दार्शनिक आहे. अनुताई वाघांची ही यशोगाथा महिलांसाठीच नव्हे तर ध्येयहीन झालेल्या आजच्या सकल पिढीसाठी केवळ विचारधन आहे इतकीच याची अनुभूती नसून, जगण्याची उर्जा देणारी एक ध्येयासक्त अमृतवाहिनी आहे असे त्याचे वर्णन करता येईल!
ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील राजकीय चिलटांनी अनुताईंचा वारसा पुढे नेण्यात स्वारस्य दाखवले नाही हे बरेच झाले म्हणायचे कारण त्यांनी याचेही कुरण केले असते! असो.