गाब्रिएला मिस्त्राल : स्वत्वाचा शोध
"मी कविता लिहिते, कारण ती एक उफाळून येणारी प्रेरणा असते; ती आज्ञा पाळावीच लागते. नाहीतर ते म्हणजे गळ्यात दाटून येणारा झरा अडवणं होईल. जे अशक्यच असतं. वर्षानुवर्षे मी सेवा केली आहे त्या गीताची, जे अवतीर्ण होतं, जे गाडून टाकणं शक्य नसतं. मी जे अर्पण करते ते कोणाला मिळतं त्याला आता माझ्या दृष्टीने महत्त्व नाही. माझ्याहून श्रेष्ठ आणि खोल असं जे आहे, त्यापुढे लीन होऊनच मी स्वत:ला व्यक्त करते. मी केवळ एक माध्यम आहे." - गाब्रिएला मिस्त्राल
लॅटिन अमेरिकन साहित्याचा अभ्यास करताना ग्राबिएला मिस्त्राल या कवयित्रीची ओळख न झाली तरच नवल! खरं तर मी गद्य (prose) प्रकारात अभ्यास करायला सुरुवात केली होती, आणि तरीही ग्राबिएलाच्या कवितांची जादू म्हणा किंवा सामर्थ्य म्हणा, त्या रचनेपुढे लीनच झाले. तेव्हा ती म्हणते तसाच अनुभव मला आला. ‘त्या’ प्रेरणेच्या झऱ्याला बांध घालणं मलाही अशक्य झालं. तिच्या प्रतिभेच्या लखलखीत प्रकाशात संगीतातील आणि काव्यातील ‘उपज’ म्हणजे काय, यावर माझा पुन्हा नव्याने विचार सुरू झाला. न राहवून मी तिच्या काही कवितांचा अनुवाद केला, आणि तिच्याविषयी थोडं लिहायलाही उद्युक्त झाले.
नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या या पहिल्या लॅटिन अमेरिकन साहित्यिकेचा जन्म चिलीमधील बिकुन्या या गावी अतिशय सर्वसाधारण कुटुंबात झाला. लुसिला गोदोय अल्कागाया हे तिचं नाव. ती लहान असतानाच परिवाराचा त्याग करून वडील निघून गेले. आई व थोरल्या बहिणीने लुसिलाला घरीच शिकवलं. वयाच्या १५ व्या वर्षी ती शाळेत जाऊ लागली. लहान गावात घालवलेला हा काळ ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यास आणि पुढे जाऊन ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्यास तिला उद्युक्त करणारा ठरला. गाब्रिएला मिस्त्राल हे टोपणनाव तिच्या दोन आवडत्या साहित्यिकांना आदरांजली म्हणून तिने घेतले. त्यापैकी एक म्हणजे गाब्रिएल दि अनुनझिओ हा इटालियन लेखक, कवी आणि नाटककार आणि दुसरा १९०४ साली नोबेल पारितोषिक मिळवलेला फ्रेडेरिक मिस्त्राल, प्रोव्हेन्स या प्रदेशातील कवी आणि कादंबरीकार.
१९१४ मध्ये 'मृत्यूची सुनीतं' (Sonnets of death) या तिच्या कवितांनी तिला मोठे नाव आणि राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक मिळवून दिले. गावातल्याच रेल्वेमध्ये काम करणाऱ्या एका माणसाच्या प्रेमात पडून नंतर त्याच्या आत्महत्येचे दुःख पचवणाऱ्या गाब्रिएला या कवितांमध्ये जीवन, मृत्यू, प्रेम व प्रेमभंगाचं दुःख याबद्दलचे तिचे विचार व्यक्त करते. 'शोक' (Desolation) या १९२२ साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाने तिला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. यातील कवितांमधून तिने धर्म, मातृत्व, लहान मुलांवरचे प्रेम या विषयांना हात घातला. याच सुमारास गाब्रिएलाचा स्थानिक राजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात प्रवेश झाला. तिला मेक्सिकोच्या तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी देशाच्या ग्रामीण भागातील शाळा आणि ग्रंथालयं सुधारण्याच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठीही निमंत्रित केलं. यानंतर गाब्रिएलाने मागे वळून पाहिलंच नाही. तिच्या साहित्यिक आणि राजकीय कारकिर्दीचा आलेख उंचावतच गेला. पॅन अमेरिकन युनियन आणि संयुक्त राष्ट्र संघ यांच्या सांस्कृतिक विभागांमध्ये तिने काम केलं. त्याचबरोबर माद्रिद, लिसबोआ, रिओ दि जानेरो आणि लॉस अँजेलिस येथील चिली देशाच्या दूतावासांमध्येही तिने काम पाहिले. तिचे काव्यसंग्रहही प्रसिद्ध होतच होते. १९३८ मध्ये 'ताला' हा तिचा महत्त्वाकांक्षी काव्यसंग्रह प्रकाशित झाला. 'ताला' या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. 'तालार' या क्रियापदाचा अर्थ भुईसपाट करणे असा होतो; तर 'ताला' हा काठ्यांनी खेळला जाणारा लहान मुलांचा एक खेळही आहे. या संग्रहातील कवितांमध्ये ख्रिस्ती धर्मातील तसेच पारंपरिक लॅटिन अमेरिकन मिथकं प्रतिबिंबित होतात. त्याचप्रमाणे कवी आणि प्रतिभा, शरीर आणि आत्मा यातील द्वैत-अद्वैत, मानवी अस्तित्व याबद्दल बोलणाऱ्या कविताही यात आहेत. १९४० ते १९४५ हा पाच वर्षांचा काळ तिने ब्राझीलमध्ये व्यतीत केला. तिथे असतानाच १९४५ साली तिला नोबेल पारितोषिक जाहीर झालं. परंतु हा सर्वोच्च सन्मान मिळाल्याचा आनंद तिच्या परिवारातील एका धक्कादायक घटनेने झाकोळला गेला. ज्याच्यावर तिने पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं, त्या तिच्या भाच्याने आदल्याच वर्षी आत्महत्या केली होती. त्याचबरोबर जागतिक महायुद्धं, शीतयुद्धामुळे समाजजीवनावर झालेले भयानक परिणाम, बदललेली जीवनशैली या सगळ्याचं प्रतिबिंब 'लागार' (द्राक्षकुंड) या तिच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या शेवटच्या काव्यसंग्रहातील कवितांमध्ये दिसून येते. समजण्यास कठीण आणि इतर संग्रहाच्या तुलनेत कमी प्रसिद्धी पावलेल्या या काव्यसंग्रहात तिची प्रगल्भता आणि असामान्य प्रतिभा मात्र भरून राहिली आहे. गाब्रिएलाने १९४६ मध्ये लॉस अँजेलिसला, तर १९५३ मध्ये न्यूयॉर्कला स्थलांतर केलं. आयुष्याच्या अखेरपर्यंत ती शिक्षणक्षेत्रात काम करत राहिली. १९५७ मध्ये न्यूयॉर्कमध्येच वयाच्या ६७ व्या वर्षी तिचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला.
प्रेम, मृत्यू, दुःख याबरोबरच मातृभाषेचा अभिमान, मातीशी जोडलेली नाळ, स्त्रीवादी विचार, माता आणि मातृत्वाचा गौरव याही विषयांना तिने कवितांमधून आणि अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या निबंधांमधून हात घातला. तिच्या मृत्यूनंतर तिची पत्रे प्रसिद्ध केली गेली ज्यामुळे अभ्यासकांना तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर उलगडून पाहता आले. तरीही गाब्रिएलाच्या साहित्य आणि आयुष्यावरील टीकात्मक विश्लेषण हे एकांगी असल्याचा आरोपही केला जातो. अनेक अभ्यासकांनी गाब्रिएलाच्या गुंतागुंतीच्या व्यक्तित्वाला हात घालण्याऐवजी 'शिक्षिका', 'अमेरिकेच्या मातृत्वाची कवयित्री', 'दैवी गाब्रिएला' अशा ‘पदव्यां’मध्ये तिला बांधून टाकल्याचं दिसून येतं. 'पुरुषासारखं लिहिणारी कवयित्री' असाही तिचा उल्लेख सापडतो. तिचा बालपणीपासूनच प्रवास, शिक्षणाबद्दलची तिची आस्था, तिचं त्यातील कार्य याचबरोबर स्त्रीवादाविषयीच्या तिच्या कल्पना आणि नंतरच्या काळातील तिची समलैंगिकता याचा अभ्यास तिचा साहित्यिक प्रवास समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. स्त्री आणि पुरुष या पारंपरिक द्वैताच्या पलीकडली कामुकता, स्त्रीला केवळ भोग्य म्हणून पाहणाऱ्या पुरुषी दृष्टिकोनाच्या पलीकडे जाणारी जाणीव, तत्कालीन समाजाने ठरवून दिलेल्या 'स्त्रीयोग्य' वर्तनाच्या सीमा झुगारून त्यापलीकडे जाण्याची हिंमत हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्वाचे पैलू तिच्या काव्यात प्रतिबिंबित होतात. त्याचबरोबर तिच्या अनेक कविता- 'metapoetry'- म्हणजे कवितेतून कवितेबद्दल आणि कवीच्या सर्जनाबद्दल लिहिणं या श्रेणीत मोडतात. त्यातील दोन कविता मला खूप महत्त्वाच्या वाटल्या. इतक्या की, त्यांचं भाषांतर करणं मला भागच पडलं.
~
पहिली कविता आहे - 'झुळुकेची फुलं'. 'ताला' या संग्रहात 'वेडीच्या गोष्टी' या उपविभागातील ही दुसरी कविता. गाब्रिएलाने स्वतः या कवितेबद्दल असं लिहून ठेवलं आहे की, 'हा माझा कवितेबरोबरचा उत्कंठावर्धक प्रवास आहे'. या कवितेचा अनुवाद काही प्रमाणात स्वैर असला तरीही मूळ कवितेच्या आशयाशी प्रामाणिक राहून केलेला आहे.
मूळ कविता : La flor del aire (Airflower)
झुळुकेची फुलं
विधिलिखित होती तिची माझी भेट
हिरव्यागार माळरानाच्या मध्यावर
तिच्याशी बोलणाऱ्या, तिला पाहणाऱ्या
भेटणाऱ्या प्रत्येकाची ती सम्राज्ञी
मला म्हणाली, "जा तो पर्वत चढून
मी कधी माळरान सोडत नाही
माझ्यासाठी ये घेऊन
हिमासारखी शुभ्र, कठीण आणि नाजूक फुलं"
मी गेले चढून तो क्लेशदायी पर्वत
आणि शोधली ती फुलं जिथे ती उमलतात
खडकांच्या कपारीतून वर बघतात
अर्धोन्मिलित डोळ्यांनी
भरल्या ओंजळीने मी खाली आले
आणि माळरानी मध्यभागी तिला भेटले
आणि वेड्यासारखी तिच्यावर
शुभ्र फुलांचा वर्षाव करीत राहिले
पण ती धवलपुष्पा उद्गारली,
"जा पाहू पुन्हा आणि
आता फक्त रक्तवर्णी फुलंच आण
मी माळरान सोडून कशी जाणार..."
मी कडा चढून गेले हरिणांच्या बरोबर
आणि शोधू लागले खुळी लाल फुलं
रक्तवर्णी बहराची, रक्तवर्णी उमलणारी
आणि रक्तवर्णीच मिटणारी
खाली उतरून तिला वाहिली सारी
मोहरून गेले देण्याच्या आनंदानं
ती भासली हरिणाच्या रक्तानं
लाल माखलेल्या जलाशयासारखी
पण स्वतःच्याच धुंदीत ती
मला पाहून म्हणाली, "जा आणि आण
पिवळीधमक, पिवळीजर्द फुलं
आजवर मी माळरान कधीच नाही सोडलं"
मी सरळ चढून गेले पर्वत
आणि धुंडाळले फुलांचे ताटवे
सूर्यवर्णी, केशरपिवळी फुलं
नवजात तरी चिरायु फुलं
पुन्हा एकदा माळरानी मध्यभागी
तिच्याजवळ जाऊन, ओंजळ रिती केली
तिच्या अंगाखांद्यावर, नववधू
ती हळदपिवळ्या रंगात न्हाली
आणि तरी, सोनपिवळी
ती वेड्यागत उद्गारली, "जा,
माझ्या सेविके, नको आणू आता
लाल-पिवळी फुलं, शोध जा पारदर्शी,
जी मला प्रिय आहेत, आठवणींमध्ये
गेल्या जन्माच्या, पुनर्जन्माच्या
स्वप्नरंगी, अंतर-रंगी फुलं
माळरानाच्या सम्राज्ञीसाठी"
मी पर्वतशिखरावर जाऊन पोचले
मिट्ट काळोखाच्या राज्यात
प्रकाशाची किनारही नसलेल्या
अविनाशी कृष्णविवरात
फांद्यांवर उमलणारी किंवा कपारीत
जन्म घेणारी नव्हेत ती फुलं
हवेतूनच तोडून घेतली मी
ती हलक्या हाताने
चालता चालता खुडत गेले
आंधळ्या माळ्यासारखी.
वाऱ्यावरून तोडून घेत,
माळरानी झुळूक घेऊन गेले
पर्वत उतरून खाली आले
आणि तिला शोधू लागले
चालत पुढे जात होती ती
ना शुभ्रा, ना रक्ता, ना केशरी
डोळे मिटून ती जात राहिली,
स्वप्नवत, माळरानापासून दूर
आणि मी तिच्या मागे, मागे
हिरवाईतून, उंच वृक्षांमधून
हवेसारख्या हलक्या ओंजळी
भरभरून फुलं घेऊन
या वाऱ्यावरून, त्या वाऱ्यावरून,
अजून अजून खुडून घेत
ती पुढे, चेहरा नसलेली,
पाऊलखुणाही न सोडणारी
मी, पिंजलेल्या धुक्यातून
तिच्यामागे जात राहणारी
ओंजळभर फुलं, ना शुभ्र
ना लाल, तर पारदर्शी,
जात राहीन मी समर्पणाच्या सीमेपर्यंत
जिथे काळ विरघळून जाईल...
माळरानाची म्हणजेच सुप्त सर्जनप्रदेशाची ‘कविता’ ही सम्राज्ञी. कवयित्री विविध रंगांच्या फुलांनी या सम्राज्ञीला अलंकृत करते. पण तरीही ती सम्राज्ञी मात्र दर वेळी निराळी फुले आणण्यास तिला भाग पाडते. अखेर बिनरंगाची पारदर्शक फुले घेऊन कवयित्री तिच्या मागे चालत राहते. उंच डोंगरावरून, जणू शून्य शिखरावरून शोधून आणलेली ही फुले. चेहरा नसलेल्या त्या सम्राज्ञीच्या म्हणजेच कोणत्याही शब्दबंधनात न अडकलेल्या निखळ सृजनाच्या मागे चालत कवयित्रीचा प्रवास सुरू होतो. कवितेची सेवा करत कवितेतच विलीन होऊन जाण्याची तिची इच्छा शेवटच्या कडव्यात व्यक्त होते.
मूळ कविता: La otra (The other)
ती दुसरी
मारून टाकलं मी माझ्यातल्या एकीला
प्रेम नव्हतं माझं तिच्यावर
पर्वतावरच्या निवडुंगाचं
ज्वाळेचं फूल होती ती
कधीही न थंडावणारी
आग आणि रखरख होती ती
दगड तिच्या पायदळी
आभाळ पाठीमागे उरे
जाणार नाही कधी शोधायला
नितळ डोळ्यांचे पाण्याचे झरे
चेहऱ्यावरचे निखारे अन
उष्ण तिच्या श्वासांनी
जिथे पसरे अंग
तिथलं गवत जळून जाई
शब्द तिचे कडक कठीण
वाळून गेलेल्या राळेचे
चार हळुवार तुषार नाहीतर
उगाच अलगद उडायचे
पर्वतावरचं झाड, तिला
वाकायचं ठाऊक ना
तिच्या बाजूला मी मात्र
झुकावाकायची थांबेना
मरणदारी टाकलं मी तिला
तोडली तिची माया
भक्ष्याविना तडफडणारी
जणू ती वैनतेया
थांबली पंखांची फडफड
ती कळाहीन, वाकली, झुकली
तिची कोमट राख
माझ्या ओंजळीत सांडली
आक्रंदतात तिच्या बहिणी
तिच्यापायी अजूनही
ज्वालाग्राही लाल माती
लचके माझे तोडू पाही
समोर जाऊन मी म्हणाले त्यांना
जा दरीखोऱ्यात धुंडाळा
बनवा त्या लाल मातीचीच
अग्निझेपेची दुसरी वैनतेया
आणि नसेल होत तुमच्यानं
तर मग विसरून जा ना
मी केव्हाच मारलीये जिला
तिला तुम्हीही मारून टाका ना...
'लागार' या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत ही कविता येते. कवयित्रीला हे सुरुवातीलाच सुचवायचं असावं की, तिच्या आधीच्या कवितांपेक्षा या वेगळ्या धाटणीच्या, अजून प्रगल्भ जाणिवेच्या कविता आहेत. 'झुळुकेची फुलं' कवितेत ज्याप्रमाणे कवयित्री स्वतः एका पात्राच्या भूमिकेत दिसते तशी इथेही आहे. पण इथे समर्पण नसून लढा आहे, तिच्या आत असलेल्या तिच्या 'दुसऱ्या' स्वत्वाबरोबर. स्वतःमधल्या नको असलेल्या 'ती'चा कवयित्रीने नाश केला आहे. ती 'दुसरी' कशी होती, याबद्दल ती वाचकाला पुढील कडव्यांमधून सांगते. त्या वर्णनातून दोन अर्थ मला दिसून येतात. एक म्हणजे नवीन शोधण्याची इच्छा हरवलेली, शब्दांना अलगद वाकवून नवीन अर्थ निर्माण करण्याची क्षमता नसलेली, ओलाव्याचा अभाव असलेली अशी ‘ती’ कवयित्रीला अजिबात आवडत नव्हती. पण त्याचवेळी तिला 'वैनतेया' हे विशेषण लावून कवयित्री तिच्या व्यक्तिमत्त्वातील उमदेपणा आणि कल्पनेच्या उंच भराऱ्या घेण्याची ताकद अधोरेखित करते. त्यामुळे कदाचित सतत धगधगते शब्द वापरणारं, कवयित्रीच्या अंतरंगातील मार्दवता जणू शोषून घेणारं, मोडेन पण वाकणार नाही असं कवयित्रीचंच हे एक रूप असाही अर्थ यात अभिप्रेत असू शकतो. (स्पॅनिश भाषेत 'गरुड' हा शब्द स्त्रीलिंगी आहे. खरं तर मराठीतमध्ये गरुडाला समानार्थी- ‘वैनतेय’ हा पुल्लिंगी शब्द आहे; पण मूळ कवितेतील भाव तसाच ठेवण्यासाठी मी 'वैनतेया' असं रूपांतरण केलं आहे.) कवयित्री तिला स्वतःपासून दूर करून जणू तिला मृत्युदंड देते. पण ही मृत 'वैनतेया' कवयित्रीच्या अंतरंगातल्या इतर अनेकींपैकी एक होती. त्या 'इतर' सगळ्या जेव्हा त्यांच्यातल्या एकीच्या विनाशासाठी कवयित्रीला बोल लावू लागतात, तेव्हा सुरुवातीस कोणा विशिष्ट श्रोत्यांशी न बोलणारी कवयित्री या 'इतर अनेकींना' संबोधू लागते. कोणत्याही नवनिर्मितीसाठी आधी विनाशाची गरज असते, असं तर तिला सांगायचं नाहीये ना? आणि जरी 'माझं तिच्यावर प्रेम नव्हतं' असं कवयित्री सुरुवातीलाच म्हणत असली तरीही 'जमत असेल तर पुन्हा एकदा 'वैनतेया'च व्हा, असं ती का सांगत असावी? शेवटच्या कडव्यात मात्र तिचा दुर्दम्य आत्मविश्वास समोर येतो. तिला खात्री आहे की, जुन्याच्या विनाशाबरोबरच नव्याचं आगमन होणार आहे. आता तिच्या जुन्या स्वत्वाची तिला गरजच उरली नाहीये.
मिस्त्रालच्या या दोन्ही कवितांमध्ये एक कवयित्री आणि एक माणूस म्हणून तिचा स्वत्वाचा शोध दिसून येतो. आपणहून त्या मूलभूत सर्जनशक्तीला शरण जाणारी आणि नवीन सर्जनाच्या शोधात निर्दयीपणे स्वत्वाचा नाश करणारी अशी तिची दोन रुपं या कवितांमधून आपल्यासमोर येतात. ~
ग्राबिएलाच्या कविता हा माझ्यासाठी निखळ प्रतिभेचा निर्भीड असा आवाज आहे. तिच्या कवितेत अफाट वैविध्य आहे. तिचं ‘व्यक्त होणं’ हे अचानक कोसळणाऱ्या पावसासारखं उत्स्फूर्त आहे. एक स्त्री, एक कवयित्री, एक बंदिशकार आणि साहित्याची एक अभ्यासक अशा विविध भूमिकांमध्ये वावरताना गाब्रिएला मिस्त्राल माझ्यासाठी प्रेरणास्थानी असते आणि राहील. तिच्याच शब्दात सांगायचं तर, ‘मी केवळ माध्यम आहे’. भारतीय शास्त्रीय संगीतातील अद्वितीय प्रतिभेच्या कलावंतांनीही हेच म्हणून ठेवलं आहे. त्यामुळेच, कदाचित ‘बंदिश करणं’ आणि ‘बंदिश सुचणं’ यावर संगीतप्रेमी मित्रांबरोबर झालेल्या चर्चेनंतरच गाब्रिएलाची ‘Airflower’ ही कविता मी मराठीत आणली. आजच्या ‘online’ जमान्यात, जेव्हा सर्व काही सहजसाध्य आणि अतिजलद झालं आहे, तेव्हा एक क्षणभर थांबून ‘मी नक्की कशासाठी इथे आहे आणि मी काय करतेय’ हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. यासाठी नवनवीन काव्यशास्त्रविनोदाचा आस्वाद घेणं आणि त्यायोगानं स्वतःच्या कक्षा रुंदावणं हे नक्कीच मदत करतं. म्हणूनच साहित्याने देशांच्या सीमा ओलांडून ‘वैश्विक’ होऊन जाणं आवश्यक आहे. ‘तिकडून’ आलेलं साहित्य आपल्याला कधी आपल्याच श्रद्धा आणि मतांची पुनर्तपासणी करण्यास भाग पाडतं, तर कधी सातासमुद्रापलीकडच्या संस्कृतीला आपल्याशी जोडणारा एखादा दुवाही दाखवून देतं. आणि याच गोष्टी साहित्याचं भाषांतर करायलाही प्रोत्साहन देतात. अखेर आपण फक्त 'माध्यम'च असतो!
तनवी जगदाळे
tanjagdale@gmail.com
(लेखिका स्पॅनिश भाषेतील साहित्यामध्ये अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात डॉक्टरेट करत असून, भारतीय शास्त्रीय संगीताच्याही अभ्यासक आहेत.)