भाषेत दडलेला लिंगभाव

३१ जानेवारी २०२६

माध्यमांतर घरात, शाळेत किंवा रोजच्या गप्पांमध्ये आपण सहज बोलतो त्या वाक्यांतून लिंगभाव, सत्ता आणि जबाबदारी कशी नकळत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते, याचा हा लेख विचार करायला लावतो. अटकमटक या संस्थेचे संस्थापक आणि कुल्फी नियतकालिकाचे संपादक असलेले ऋषिकेश दाभोळकर पालकत्व, भाषा आणि लिंगभाव या मुद्द्यांकडे संवेदनशील नजरेने पाहतात. भाषा ही फक्त बोलण्याचं साधन नसून ती विचार घडवते आणि वर्तनालाही दिशा देते, हे ते रोजच्या वापरातील उदाहरणांतून सोप्या शब्दांत समजावून सांगतात. पालक म्हणून आणि समाजाचा भाग म्हणून आपण काय बोलतो, कसं बोलतो आणि त्यातून मुलांच्या मनात कोणते विचार रुजतात, याची जाणीव ठेवणं किती गरजेचं आहे, हे हा लेख ठळकपणे मांडतो. न्याय्य, समतावादी आणि ताणमुक्त समाज घडवायचा असेल, तर बदलाची सुरुवात भाषेतूनच करावी लागेल, असा महत्त्वाचा संदेश या लेखातून पुढे येतो. (पुरुष उवाच दिवाळी 2024 मधून साभार.)

मी स्वत:ला कितीही सजग वगैरे व्यक्ती म्हणवून घेत असलो, तरी अजूनही कितीतरी गोष्टी - विशेषत: लिंगभावात्मक - कळत नकळत बोलल्या जातात. पालक म्हणून या गोष्टी जेव्हा बोलतो तेव्हा तर त्या पुढल्या पिढीमध्ये झिरपत आहेत. वेळीच त्या सुधारणं श्रेयस्कर आहे. आपण बोलतो ती भाषा, त्यात वापरतो ती क्रियापदं, करतो त्या कृती, चित्रं अशा अनेक मार्गांनी आपण एक ठोस लिंगभाव प्रदर्शित करत असतो. भविष्यात न्याय्य समाज उभा व्हायचा असेल तर पुढल्या पिढीसमोर आपण कोणता विचार पोचवतो आहोत याचा विचार करणं अगत्याचं बनलं आहे.

आपण अनेक वाक्यं सरावाने बोलत असतो. ते बोलणं रूढ असतं. पण, एखादी प्रथा असो किंवा भाषा असो केवळ रूढ आहे म्हणून त्याचा थेट परिणाम समाजात असूनही तशीच भाषा वापरत राहावी का याबद्दल आपण आपल्यापुरता विचार करायला हवा. आणखी काही लिहिण्याआधी काही सर्रास बोलली जाणारी उद्धृतं देत आहे. अर्थात यातील अशी अनेक घरं आहेत जिथे अशा प्रकारचं बोलणं जाणीवपूर्वक टाळलं जातं. पण सध्या तरी रूढ/बहुसंख्य लोकं बोलतात ती वाक्यं घेतली आहेत.

  1. ‘झाला का स्वयंपाक बघ? जाम भूक लागली आहे.’
  2. ‘तिचं लग्न झालं का? कुणासोबत झालं? काका काकू अगदी खूश असतील नाही?’
  3. ‘काय सांगतोस काय? एकविसाव्या वर्षीच दुसरं मूल झालं तिला?’
  4. ‘बापरे! इतक्या लहान मुलीवर बलात्कार झाला? हल्ली महिलांवर होणारे अत्याचार वाढले आहेत.’

ही चारही उद्धृतं नीट बघू या. विशेषत: त्यातील क्रियापदं. ही चारही वाक्य, किंवा त्या वाक्यात वापरण्यात आलेले प्रयोग हे रूढ आहेत. त्यात व्याकरणदृष्ट्या चुकीचं काही नाही. पण, यात वापरण्यात आलेल्या प्रयोगात कर्त्याकडे त्या क्रियेचे थेट उत्तरदायित्त्व नाही. अशा वाक्यरचनांना, क्रियापदांच्या वापराला या लेखापुरतं पॅसिव्ह रचना म्हणणार आहे. स्वयंपाक झाला, लग्न झालं, मूल झालं, बलात्कार झाला या सगळ्यात काय झालं याला अधिक महत्त्व आहे. मात्र ते कोणी केलंय याला तितकं महत्त्व नाही. हीच भाषा वापरल्याने नक्की काय परिणाम संभवतो ते बघू.

स्वयंपाक आपोआप होत नाही, तो कुणाला तरी रांधावा लागतो हे सगळ्यांना माहीत असतं. बहुतेक घरांत स्वयंपाक करण्याचं काम स्त्रीचं असतं. जेव्हा आपण स्वयंपाक झाला म्हणतो, तेव्हा एका पातळीवर तो रांधणाऱ्या स्त्रीच्या कष्टांना आपण मुलांसामोर दुय्यम स्थान देत असतो. गंमत बघा अनेक घरांतील पुरुषांनी एखादा पदार्थ जरी रांधला, तर मात्र ‘बघितलं का, बाबांनी काय बनवलं आहे’ असं त्याचं नाव घेऊन, त्याला श्रेय देऊन कौतुक केलं जातं. अर्थात असं बोलणं आपल्या इतकं अंगवळणी पडलं आहे की यात असा काही अर्थ ध्वनित होऊ शकतो, हे आपल्या लक्षातही येत नाही.

आता अधिक अडचणीची पुढली दोन वाक्यं बघू या. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे लग्न झालं म्हणतो, तेव्हा पुन्हा एकदा त्या कृतीचे कर्ते त्या कृतीची जबाबदारी घेत नाहीत. लग्न होत नाही ते विचारपूर्वक करायचं असतं, केलं जातं हा विचार रुजवायचा असेल तर बोलताना सुयोग्य प्रयोग वापरणंच योग्य ठरावं. आणखी एक प्रयोग म्हणजे लग्न लावलं - तो तर याहून घातक. त्यात तर लग्न केलं नाही, झालं नाही तर ते लग्न करणाऱ्या व्यक्तींपेक्षा इतर कुणीतरी लावलं असा सरळ निर्देश असतो. लग्न हे केवळ दोन व्यक्तींच्या मर्जीने व्हावं. त्यात दोन्ही व्यक्तींची संमती असावी. त्यांनी एका कायदेशीर बंधनात आपखुषीने अडकावं असं आपण मानतो का? लग्न करणाऱ्या व्यक्तींच्या आईवडिलांची - किंबहुना इतर कोणत्याही व्यक्तीची - लग्नाच्या करारात काहीही जबाबदारी नाही हे नीट पोचेल अशी भाषा आपण वापरतो का?

जी गत लग्नाची तीच गत मूल होण्याची. ‘मूल झालं’ असं जेव्हा म्हणतो, तेव्हा जणू ते आपोआप होतं असा बोध काहीजण घेऊ शकतात. मुळात मूल जन्माला घालणं हा दोन व्यक्तींनी विचारपूर्वक घेतलेला केवळ निर्णयच नसतो, तर ती एक मोठी जबाबदारी असते - आणि ती दोघांचीही असते. हे सतत ध्वनित होण्यासाठी तिला मूल झालं यापेक्षा ‘त्या दोघांनी मुलाला जन्म दिला.’ हा प्रयोग त्यात अंतर्भूत जबाबदारीवर अधिक जोर देतो असं वाटतं.

अर्थात आतापर्यंत बोललो ती तीन उदाहरणे महत्त्वाची असली, तरी त्याचा कर्ता हा काही गुन्हा करत नसतो. पण चौथ्या वाक्याचं तसं नाही. बलात्कार होणं, महिलांवर अत्याचार होणं यातही अशाच जबाबदारी निश्चित न करणाऱ्या वाक्यरचनेमुळे आपण त्या कृतीच्या कर्त्याला - एका गुन्हेगाराला - दुय्यमस्थानी विराजमान करत असतो. जिच्यावर अत्याचार झाला तिला मात्र ठळक करत असतो. ‘स्त्रीवर बलात्कार झाला’ यापेक्षा ‘या या पुरुषाने बलात्कार केला’ असे म्हणणे अत्यंत आवश्यक आहे. ‘महिलांवर होणारे अत्याचार’ असं न म्हणता, ‘पुरुषांनी केलेले लैंगिक अत्याचार’ वाढले आहेत असं म्हणणं अधिक अगत्याचं आहे. असे गुन्हे केले की त्याची जबाबदारी फक्त आणि फक्त गुन्हेगार पुरुषांची असते, हे सतत बोलले जाण्याने मुलग्यांमध्ये अधिक जबाबदारीचे भान येऊ शकते. त्याचबरोबर मुलींमध्ये स्वत:ला दोषी समजण्याच्या प्रमाणात घट होऊ लागेल असं वाटतं. किती महिलांवर अत्याचार झाले याचे आकडे माध्यमात झळकतात. जणू महिला आणि त्यांची इज्जत ही कोणतीतरी वस्तू आहे जिची लूट मोजणं महत्त्वाचं आहे, असंच आपण ओरडून ओरडून सांगत असतो. त्याऐवजी किती पुरुष लैंगिक गुन्हेगार आहेत, ते गुन्हे का वाढत आहेत याबद्दल आपण बोलू लागलो तर योग्य तो संदेश पुढल्या पिढीला जाऊ शकतो.

आता आणखी काही वाक्यांचा गट बघू या. अ. ‘रात्री बाबा आले की बघ, त्यांनाच नाव सांगते तुझं!’ आ.‘अरे काय केलंस हे, तुझ्या बाबांना काय उत्तर देणार मी?’ इ. ‘काय हे तुझे कपडे, काय भाषा, काय रात्री बाहेर उंडारणं, चालतं का बाबांना तुझ्या तू असं राहिलेलं?’ ई. ‘कोणता बाप आपली मुलगी अशा मुलाच्या हाती देईल?’

पुरुषप्रधान संस्कृतीचं एक प्रमुख लक्षण म्हणजे यात कुटुंबात एक मुख्य नर लागतो. तो नर बहुतेकदा वयाने आणि शक्तीने (शारीरीकच शक्ती हवी असं नाही, ती आर्थिक ताकद, सामाजिक दर्जा अशा कोणत्याही प्रकारची ती असू शकते) त्या कुटुंबाचा पालनकर्ता असतो. ही व्यवस्था स्त्रियांना आणि पुरुषांनाही वेगवेगळ्या प्रकारे निकोप जीवन जगायला अडसर पैदा करत असते. ही व्यवस्था पुरुषांचं व्यक्तिस्वातंत्र्यही प्रभावित करत असतेच.

पहिली दोन वाक्यं (अ आणि आ) घरातील व्यक्तीच - अनेकदा तर खुद्द आयाच - आपल्या घरातल्या लहान मुलांना अनेकदा ऐकवत असतात. ही वाक्यं घरात ‘फायनल अ‍ॅथॉरिटी’ कोण आहे हेच बिंबवत असतात. घर कसं चालणार, घरात कोणत्या गोष्टी येणार, घरात कोणते नियम पाळले जावेत, कोणते नाही, कोणत्या नियमांना अपवाद करावा यांचे सर्वाधिकार घरातील एखाद्या पुरुषाकडे दिलेले असतात. घरात होणारे वाद, तक्रारी, प्रश्न या सगळ्यांचं निराकरण करणारं अंतिम न्यायासन या पुरुषाला दिलेलं असतं. अनेकदा हे स्थान मिळवण्यासाठी तुम्ही केवळ पुरुष असणं आवश्यक आणि पुरेसं असतं. घरातील स्त्रिया सुशिक्षित असल्या, कमावत्या असल्या, त्या पुरुषांपेक्षा अनेकार्थाने लायक असल्या तरी त्यांच्याकडे ही अ‍ॅथॉरिटी दिली जात नाही - अनेकदा त्याही घेत नाहीत.

अशी वाक्यं बोलली गेल्याने दोन मुख्य परिणाम होतात. एक म्हणजे पुरुषांची अ‍ॅथॉरिटी घरातल्या लहानांवर बिंबवली जाते, त्याचबरोबर घरातल्या स्त्रियांचं (विशेषत: आईचं) स्थान दुय्यम केलं जातं. दुसरं म्हणजे मोठं झाल्यावर मुलगा आणि बाबा यांच्यात सत्तास्थान ग्रहण करण्याच्या प्रक्रियेतील वाद अटळ ठरतात. दोन भावांमधील असो वा बापलेकामधील असो, ‘मेल इगो’ म्हणून ज्याला गोंजारलं जातं, त्याच्या मुळांशी बहुतेकदा आपल्या सत्तावर्तुळावर अर्थात ‘इलाक्यावर’ कब्जा करण्याचे संस्कार असतात. या सत्तावर्तुळात केवळ वस्तू येत नाहीत तर घरातल्या स्त्रिया आणि लहान मुलांनाही एखादी वस्तू असल्याप्रमाणे त्या पुरुषांच्या अधिकारक्षेत्रात धरलेलं असतं.

आता वर दिलेली नंतरची दोन (इ आणि ई) वाक्यं बघू या. ही वाक्यं आपण सर्रास ऐकत असतो - प्रसंगी बोलतही असू कदाचित. यात बोलणारी व्यक्ती अनेकदा कुटुंबाचा भाग नसते. समाजाचा त्रयस्थ घटक म्हणूनही आपण त्या कुटुंबातील एका पुरुषाला फायनल अ‍ॅथॉरिटी आहे हे गृहीत धरत असतो. ‘इ’ या वाक्यात मुलांनी कोणते कपडे घालायचे, कशी भाषा बोलायची, घराबाहेर कधी जायचं याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार घरातल्या त्या नराकडे असतात हेही सर्वमान्य गृहीतक. ‘ई’ या वाक्यात तर मुलीचे वस्तूकरण आहेच, पण त्याचबरोबर त्या वस्तूच्या विनिमयाचे अधिकार पुन्हा एकदा एका पुरुषाकडे आहेत जो दुसऱ्या एका पुरुषाला दिले जाण्याची भाषा आहे. अशी वाक्यं काय किंवा ‘कन्यादान’ काय स्त्रियांचं वस्तूकरण तर करतंच, त्याचबरोबर पुरुषांवर (एकट्यावर) ही जबाबदारी टाकून त्यांच्यावरही अन्यायच असतो.

आता शेवटच्या तीन वाक्यांचा गट पाहू या : उ. ‘नेहमी मोठ्यांचं ऐकावं, बाळा. घरातील मोठ्यांचा आदर करावा’ ऊ. ‘दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलू नकोस’ ऋ.. ‘किती शहाणा/णी आहे, सगळं ऐकते मोठ्यांचं’

यात कोणत्याही विवक्षित लिंगाकडे नाही एकूणच मोठ्या माणसांना अधिक अधिकार आहेत असं यात मुलांवर बिंबवलं जातंय. मुलांना ‘शहाणं’ म्हणवून घ्यायचं असेल तर ‘मोठ्यांचं सगळं ऐकणं’ ही अजब पूर्वअट सूचित केली जातेय. इथे लहान मुलांच्या केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच बंधनं घातली जात नाहीयेत तर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणूनही मुलांचा स्वीकार करायला समाज नकार दर्शवत असतो. भाषेत केवळ पुरुषप्रधानताच नाही तर लहान मुलांना स्वायत्त व्यक्ती म्हणून न बघणंही पदोपदी दडलेलं आहे. मग प्रश्न येतो असं नाही बोलायचं तर कसं? आपण जेव्हा ही वाक्य घराबाहेर बोलतो तेव्हा जाणीवपूर्वक त्या घरातील निर्णय घरातील सगळेजण घेताहेत असे गृहीत धरून बोलता येतील मात्र आपल्याच घरी ही वाक्यं बोलण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी केवळ बोलण्यात बदल करणे पुरेसे होणार नाही. भाषा ही विचार आणि वर्तन यांचं वर्णन करत असते.

घरातल्या तक्रारी असोत, प्रश्न असोत, घरात पाळायचे काही नियम तयार करणं असो वा आपली मतं मांडणं असो, घरात सर्वांना सारखा अधिकार असला पाहिजे. यासाठी ‘गृहसभा’ हा सर्वोत्तम उपाय आहे. घरात सर्वांनी मिळून ठरवलेल्या दिवशी आणि ठरवलेल्या वारंवारितेने ही सभा घेता येते. यात घरातील प्रत्येक सदस्य मग आई, बाबा असोत, आजी, आजोबा असोत किंवा मुलं असोत सगळ्यांना मोकळेपणानं बोलायला ही सभा एक अवकाश आणि व्यासपीठ उपलब्ध करून देते. इथे प्रत्येकाचं मत ऐकलं जातं, घरातील नियम ठरतात, ते मोडले गेल्यास होणारी शिक्षा ठरते, कामाचं नियोजन ठरतं आणि त्याची सर्वांना मान्य अशी वाटणीही होते. हे अर्थातच वेळखाऊ आहे. घरात जितकी डोकी अधिक - तितका निर्णय होण्यास वेळ लागेल हे खरंच आहे. पण हे सातत्याने केल्यास काही महिन्यांतच या गृहसभा अधिक सहज होत जातात. जसजशी अधिकार आणि जबाबदारी सर्वांकडे जातात तसतसा सगळ्यांच्या वागण्यात-बोलण्यात होणारा बदल आणि मुख्य म्हणजे सगळ्यांच्याच ताणात होणारी घट सुखावह असते.

या सगळ्या बोलण्याचा केवळ आपल्या कुटुंबावर किंवा मुलांवर परिणाम होतो असं समजणं अपुरं ठरेल. एकूण समाजावरच नाही तर राजकारणावर, हा देश कसा चालवला जावा यांच्या कल्पनांवर या सवयी परिणाम करत असतात. म्हणूनच जर ताणमुक्त, स्वस्थ समाज आपल्याला हवा असेल तर सतत कुणीतरी ‘हिरो’ शोधणाऱ्या समाजात काही बदल करणं आवश्यक आहे - कठीण असलं, तरीही! वर्तणुकीत बदल व्हायला वेळ लागेलही, पण भाषिक बदल जाणीवपूर्वक केले तर पुढल्या टप्प्यावर लोकांचं वर्तनही बदलू लागेल अशी आशा ठेवू या!