घराघरात, मनामनात नक्की आहे कोण?

अलीकडेच राजधानीतून आलेली बातमी : “आमच्या मुलांच्या वाट्याची लस परदेशात का पाठवली?” असं पोस्टर झळकवणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

मोठ्या पेपरच्या कुठल्यातरी छोट्या कोपर्‍यात आलेली ही बातमी वाचल्यावर नेहमीप्रमाणे अनेक प्रश्न पडायला सुरुवात झाली. प्रश्न जुनेच, नेहमीचेच - तेच तेच. नव्या प्रश्नांमुळे जुन्याजाणत्या विसरलेल्या प्रश्नांनाही जोर चढतो, नि त्याचं वादळ घोंघावत येतं. त्यातून पडझड होते; उत्तरं मिळण्याची तसूभरही शक्यता नसते. ह्या वादळाला नुसतं बघत बसण्याशिवाय पर्याय नसतो. ते निघून गेल्यावर मागे उरलेल्या एखाद दोन उत्तरांनी होतं तात्पुरतं समाधान. पुढचे प्रश्न दूर कुठेतरी तयार होत असतातच तेव्हा. छोट्याशा बातमीचं रूपांतर असं वादळात होऊ शकतं. तेव्हा आता पहिला प्रश्न : कारवाई करण्याएवढं त्या पोस्टरमध्ये विचारलेल्या प्रश्नात काय आहे? बरं, पोस्टर-फ्लेक्सचं मटेरियल हे पर्यावरणविरोधी आहे म्हणून कारवाई केली असेल अशीही शक्यता नाही. पर्यावरणविरोधी वागल्यावर करण्यात येणार्‍या शिक्षेचे कायदे झाडापासून बनवलेल्या कागदावरच शोभून दिसतात. बरं, पंतप्रधान मोदी स्वत: तर 'पर्यावरणस्नेही' असे कधी वागताना दिसत नाहीत. निदान टीव्हीवर तर नाहीच. परसबागेतल्या मोरांना खायला घालणे म्हणजे पर्यावरणप्रेम नाही. तुमच्या परसबागेत मोर येतात म्हणजेच खरं तर कायतरी पर्यावरणविरोधी घडलेलं किंवा घडत आहे. नाहीतर ते एखाद्या माणसाच्या हातचं कशाला खायला येतील? एवढं काय त्यांचं अडलंय? का त्यांना तिथं मुद्दामच आणलं गेलंय? असाही वेगळाच प्रश्न आहे.

सॉरी हां, हे असं मी एका प्रश्नातून दुसर्‍याच प्रश्नात घुसतोय. पण काये की, वादळ असंच येतं. 

तर, आरामशीर हिंदी पिच्चर स्टाईल येणारे पोलीस, इथं कसे लगेच येऊन धडकले? ह्या उपप्रश्नातूनही दुसरंच वादळ जन्म घेऊ शकतं. ही बातमी मुद्दाम बदनामी करण्यासाठी दिली आहे. डाव्यांनी पुरस्कृत केलेली आहे. अशीही थेट उप-उत्तरं द्यायला सुरुवात झालेली आहे. थेट उत्तरं देणारे हे लोक कोण असतील हा परत एक उपप्रश्न. खरं सांगायचं तर उत्तरं महत्त्वाची नाहीयेत. प्रश्नांचं वादळ महत्त्वाचंय. मला बातमी सोडून, महत्त्वाचे प्रश्न निर्माण करणार्‍या वादळाचा माग घ्यायचा आहे. नुसतं कंप्यूटरवर बसून, प्रोग्रॅमिंग करत, अंदाज बांधत, सॅटेलाईट फोटोवरून नाही; तर त्या वादळात घुसून. माझ्या मनात शिरलेल्या वादळातला सर्वात कळीचा प्रश्न असा की, मी जर एक माणूस आहे तर माणूस म्हणून मी कसा वागतोय? माझ्या सभोवती असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल पशुपक्षीप्राणीदगडधोंडेगवतवारा ह्यांच्याबद्दल माझ्या मनात वेळोवेळी काय येतं? मला वैताग आला असेल तर मी कसा वागतो? मी आनंदात असेन तर कसा वागतो? आता हे प्रश्न युगानुयुगे चालत आलेले; नि अनेक वादळांना जन्म दिलेले असे आहेत. आणि अजूनही त्याचं उत्तर खूपच कमी जणांना सापडलेलं आहे. ज्यांना सापडलं ती माणसं ‘बोधी’ होऊन गेली. पण माझ्यासह बाकीचे वादळात अजूनही अडकले आहेत.  आता वरच्या प्रश्नाला पुन्हा असंख्य फाटे फुटतील. तेव्हा ह्या लेखात ज्याच्यामुळे वादळ आलंय त्याच्या तळाशी असणार्‍या प्रश्नाच्या फाट्याकडे आलेलं बरं. तो उपप्रश्न असा : माझ्या मनातल्या एका कोपर्‍यात मी एकाधिकारी आहे का? तसा किंचित जरी असेन तर एकाधिकारशाही ही मला कोणावर गाजवावीशी वाटते? स्वत:वर की इतरांवर?

पोस्टर लावणार्‍यांवर जी अतिजलद कारवाई झाली, त्यामागे ह्या प्रश्नातून जे व्यक्तिसापेक्ष उत्तर निघेल तेच असेल असं वाटतं. मी जेव्हा माझ्या आत चाललेल्या वादळात घुसतो; तेव्हा मला जाणवतं की, हो... किचिंत का होईना मला मी एकाधिकारी असा वाटतो खरंच. मी लै शहाणा आहे. जगातलं सगळं ज्ञान मलाच आहे. मी सांगितलेलं सगळ्यांनी ऐकावं; मला अजिबात उलट प्रश्न विचारू नये; विचारले तरी मी उत्तर देईनच असं नाही; दिलं तरी त्यानुसार वागीनच असं नाही. मी माझ्या मर्जीनंच वागणार. हे सगळं माझ्यात आहे. अगदी जन्म झाल्या झाल्या काय; गर्भात असल्यापासूनच आहे. आता हे सगळं स्वत:पुरतं ठेवलं तर ठीकचे. स्वत:चा अधिकार स्वत:वर गाजवा की. नो प्रॉब्लेम. स्वत:च्या स्पेसमध्ये नंगे नाचा; काय पण करा... मरा. नाही नाही.. एक मिनिट. मरा नाही. मरण्यावर तुमचा अधिकार नाहीये हां. गुन्हा दाखल होऊ शकतो. कागदावरचा कायदा कडक आहे याबाबतीत. एखादं झाड तोडलं तर चालतंय; एखादा वाघ, साप, बेडूक मारला तर चालतो. इथं कागदावराचा कायदा कडक नाही. इथं देवाचा कायदा येतो. कर्मयोग, भोग इत्यादी. दुसर्‍या माणसाला तर नाहीच नि स्वत:लाही मारायचं नाही. माझ्या मरणावर माझा अधिकार नाही. का बरं? जाऊ दे, हा वेगळाच प्रश्न. त्याचं समाधान कधीतरी नंतर.

तर, स्वत:वर जितका काय अधिकार चालवायचा तो चालवावा. त्यालाच ‘स्वातंत्र्य’ असंही म्हणतात. पण गोंधळ तेव्हा होतो, जेव्हा ते स्वातंत्र्य स्वत:च्या स्पेसमधून उडी मारून समाजाच्या अंगणात घुसतं. समाजाचं स्वातंत्र्य वेगळं. ते टोकदार असतं. समाजाच्या अंगणात तुम्ही नागडे नाचायला लागलात की ते टोक बोचतं. तेव्हा मग, स्वातंत्र्य म्हणजे काय? व्यक्तिगत स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं असावं? देश स्वतंत्र झाला म्हणजे नक्की काय झालं? ते ‍नुसतं राजकीय स्वातंत्र्य आहे का? देशातले नागरिक स्वतंत्र आहेत का? असतील तर किती? कुठल्या वर्गाचे? वर्णाचे? लिंगाचे? असं प्रश्नस्वातंत्र्याचं वादळ अनेक वर्षं ते घोंघावतंच आहे, नि राहील. ते निर्माण झालं की, त्याला आपण दिल्लीच्या दिशेनं सरकवून मोकळे होतो. 

मला जो उपउपप्रश्न पडलाय तो असा : माझ्या मनाच्या कोपर्‍यात जर मला वाटतं की, माझं दुसर्‍यांनी ऐकावं. तर ते मी दुसर्‍यांवर थोपवतोय का? माझ्या मताचा आग्रह मी कितीदा नि कसा लावून धरतो? एकदा बोलून सोडून देतो की सतत तेच ऐकवून दाखवतो? ‘केलंच पाहिजेच तूच’ असं ‘च’ वर जोर देत कितीदा बोलतो? कोणाशी बोलतो? एखाद्या कुटुंबात बघायला गेलं तर नवरा बायकोशी बोलतो; काही ठिकाणी बायका नवर्‍याशी बोलतात. हे आपल्याला माहितीच आहे. पण अजूनही इतर अनेक जोड्या आहेत. आई शाळेतल्या मुलाशी बोलते. मुलगी असेल तर अजूनच जास्त बोलते. मुलगा असेल तर वडील जास्त उच्चरवात बोलतात. नोकरीवाला मुलगा आई-वडिलांशी बोलतो. मोठा भाऊ लहान भावाशी बोलतो. लहान भाऊ बहिणीशी असं बोलतो. ऑफिसातली मालक-नोकर ही जोडी तर आहेच. तेव्हा खरं तर असं अधिकारवाणीनं बोलणारे आणि न बोलणारे असे दोनच वर्ग पडतात माणसांत. हाच तो पुराण काळापासून चालत आलेला विषमभेद.ज्यावर माणसाच्या ‘खास’ व्यवस्था निर्माण झाल्या. माणूस भौतिकपणे विकसित झाला, नि व्यवस्थाही बेडकासारख्या तट्ट फुगल्या. शेतीचा शोध ही माणसाच्या विनाशाची पहिली पायरी आहे का? हा आणखी एक जालीम प्रश्न पडू शकतो. पण हा प्रश्न तेवढा जुना नाही. तसा नवीन आहे. शेतीचा शोध यापेक्षाही नांगराचा शोध ही विनाशाची पायरी आहे का? हा प्रश्न आहे. कारण मातृप्रधान शेती वेगळी होती असं म्हणतात. त्यात बैल नव्हते, नांगर नव्हते. बाया हातानं खणून शेती करायच्या. जुन्या लोकांची पाळंमुळं पुरुषप्रधान शेतीसंस्कृतीत घट्ट रोवली आहेत. त्यांना हा प्रश्न पडला नाही. जसं मिलेनियल्सना- औद्योगिक संस्कृतीनं माणसाला विनाशाच्या टोकाला पोचवलं का?- हा प्रश्न कधीच पडणार नाही. मुद्दा असा की, माणसाची प्रकृती आहे स्वतंत्र बाण्याची. भटकत असताना प्रकृतीशी तो एकरूप होता. शेतीनंतरही काही वर्षं संस्कृती-प्रकृती मैत्रिणी होत्या असं म्हणूया. पण हळूहळू व्यवस्था फुगायला लागल्या; तशी संस्कृती प्रकृतीला फाट्यावर मारायला लागली. म्हणजे रानात हगणारा माणूस संडास उभारून त्यात हगू लागला. (हे उदाहरण काहींना अगदीच असभ्य वाटेल. ग्राम्य वाटेल. पण फरक रोखठोकपणे स्पष्ट करणारं आहे. आणि तसंही निर्मल ग्रामपंचायतीत अजूनही रानात जाणारे लोक आहेत.) आता अगदी जुन्या काळच्या संस्कृत्या म्हणजे आपल्या मोहेंजादारो, हडप्पा व इतर काही - ह्या कशा होत्या? त्यात माणूस किती स्वतंत्र होता, असे प्रश्न पडले असतील तर लगेच इंटरनेटवर जाऊन वाचण्याची गरज नाही. मनात जाऊन उत्तरं शोधावी, असं लेखकाचं ‘आग्रही’ मत आहे. संस्कृतीनं प्रकृतीवर अधिकार गाजवायला सुरुवात केली, म्हणजेच एका माणसानं दुसर्‍यावर अधिकार गाजवण्याची सुरुवात केली का, असा प्रश्न पडतो आणि ह्या अधिकाराचे जीन्स आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे अगदी वैश्विक पातळीवर प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्‍यात आत्ता या क्षणी आहेत का? असतील आणि त्याला योग्य (की अयोग्य?) दिशा मिळाली; एकाधिकारशाही गाजवण्यासाठीच स्टेज तयार झालं तर तुम्ही काय कराल? जगात काहींना ते मिळालं त्यांनी काय काय डोंगराएवढे खड्डे खणून ठेवले, ते आपण जाणतोच. आणि काहींना मिळूनही त्यांनी अत्यंत विचारपूर्वक स्वत:ला दूर ठेवलं, हेही जाणतोच.

सध्याचा काळ असा आहे की, तसं फुलामाळांनी सजवलेल्या, भगव्या रंगात न्हालेल्या एकाधिकारशाहीच्या स्टेजची बहुसंख्यांना आवड निर्माण झालीये. ते हवंहवं वाटतंय. आपण सर्वांनी ते साकार होताना बघितलंही; गेल्या काही वर्षांत तर अनेकदा बघितलं. हे स्टेज आधीही होतं. अगदी भगव्या रंगाला प्रिय अशा पुराणकाळातही. जेव्हा माणसाला माझं माझं करायला त्याची स्वत:ची अशी जमीनजागा, घरदार, बायकोफायको मिळाली तेव्हापासून हे आहे, आणि त्यातून विकसलेले जीन्स अजून टोकदार होतायेत. हे जीन्स आता घराघरात आहेत. मनामनात आहेत. त्याचा अनेकदा थेट लौकिक साक्षात्कारही झाला आहे. कधी संघटित धर्मातून; त्यांच्या धार्मिक ग्रंथातून, मनुस्मृतीतून, कधी युद्धातून, कधी आणीबाणी लादून, कधी वाळीत टाकून, कधी वरवर कम्युनिझम स्वीकारून, कधी भांडवलशाही स्वीकारून, तर कधी जागतिकीकरणातून. जागतिकीकरणाच्या परिणामांमुळे फोफावलेल्या संकुचित देशीवादातून. ते अगदी सध्याच्या अतिप्रिय फेसबुकवर डिसलाईकचा पर्याय नसण्यापर्यंत. सोशल मीडिया हे सध्या चौथं जग असलं तरी मानवनिर्मितच असल्याने तिथंही ही प्रवृत्ती रुंजी घालत असणारच. फेसबुकचं उदाहरण घेऊ. तिथला व्यवहार ‘एकमेकां लाईकबदाम देऊ, अवघे धरू सुपंथ’ असाच तर चालतो. त्यामुळे एखादी पोस्ट आवडली नाही तर कानाडोळा करण्याशिवाय गत्यंतर नसतं. नाहीतर आपल्या पोस्टीला लाईक्स मिळत नाहीत. म्हणजे खरी डिजिटल क्रांती तेव्हाच होईल जेव्हा फेसबुकवर डिसलाईक येईल. आणि मानवजात तेव्हाच विकसित होईल, जेव्हा इतरांना डिसलाईक्स वाटूनही आपल्याला लाईक्स मिळतील. पण फेसबुकचा उद्देशही आता मैत्रीच्या पलीकडे गेलाय. त्यावरही एकच - भांडवली - अधिकार असल्याने ही क्रांती घडून येईल असं वाटत नाही. मला सांगायचं काय तर, एकाधिकारी जीन्स हे अनेक रूपात अस्तित्वात आहेत, नि हळूहळू विविध रूपं धारण करतायेत.   सगळ्या धर्मांत पारलौकिकतेचंच महत्त्व सांगितलं गेलं. ‘त्याला’ स्मरा. ‘त्याचं’ नाव घ्या. वगैरे. बुद्ध हा पहिलाच की तो थेट स्वताच्या मनाच्या आत पोचला. त्याने त्याची शक्ती आतमध्ये केंद्रित केली. आणि ह्याचं कारण त्यानं दोन वृद्ध माणसांना पाहिलं हे नाहीये; तर बाबासाहेबांनी लिहिलंय तसं, त्याच्या परित्यागामागे त्याच्या - शाक्य आणि शेजारच्या - कोलिय या दोन राज्यात रोहिणी नदीच्या पाण्यावरून झालेली भांडणं हे मूळ कारण होतं. त्याने सरळ स्वत:च्या मनावरच काम करायचं ठरवलं. पण परित्याग करताना त्याने यशोधरेवर अन्याय केला का? तिला सोडून चालता का झाला? का असा वागला तो? हे उपप्रश्न आहेतच. तरी बुद्ध हे प्रकरण कुठल्याही धर्मात न मावणारं आहे. पण झालं असं की बुद्धालाही धर्मात बंदिस्त करून टाकलं. ते सोपं आहे; कारण, तसं केलं की, घराघरात बुद्ध जन्मू शकत नाही. ते तसंही अशक्यच आहे. पण सत्ताधार्‍यांच्या दृष्टीने तसं होणं जास्त घातक आहे. कारण जर घरोघरी विचारी बाण्याची मुलं जन्मली आणि त्या प्रत्येकानं पोस्टर लावली. तर? तर त्यांना अटक करून आत टाकायला देशातले तुरुंग पुरणार नाहीत. तेव्हा त्यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे घराघरात तोच जन्मायला यायला हवा जो त्याचा बाप सांगेल ते निमूट ऐकेल. एकही प्रश्न विचारणार नाही. असा आदर्श पुत्रच हवा. आता असा एकमेव आदर्श पुत्र अख्ख्या भारतात कोण आहे ते सांगायची गरज नाही. सध्या तो मनामनात नसला, तरी घराघरांच्या दारांवर वर्गणी घेत उभा आहे. त्याचंच मंदिर बांधण्याकरता, आणि तेही ‘वहींच बनाऐंगे’ म्हणत! तेव्हा त्या बिचार्‍या पुत्राची निर्मितीही ह्या तोकडेपणातूनच झालीये की काय असाही प्रश्न पडतो. नि एवढीच कल्पना त्यामागे असेल तर धर्म कसा येड्यात काढू शकतो, हे उदाहरणासकट स्पष्ट दिसतंय. आता सगळेच बाप काही मुला आज्ञा देणारे, नि ऐकलं नाही की दांडकणारे असे असतात असं मुळीच नाहीये. तेव्हा वरच्या वाक्यातला जो बाप; त्याऐवजी तिथं खरं तर ‘व्यवस्था’ ही संकल्पना आहे. ती लावण्यामागे पुरुष आहेत हे सिद्ध आहे. अति जुन्या काळी पुरोहित-राजा ही जोडी सगळे निर्णय घ्यायची, त्याचं अगदी अलीकडचं रूप म्हणजे आपणच निवडून दिलेले गोंडस पोस्टरपुढारी. म्हणजे शेवटी आपणच मूर्ख की काय? ह्या मानवी व्यवस्थेत कोणतरी नियमबियम ठरवतं नि त्याप्रमाणे सर्वांनी आज्ञाधारकपणे वागायचं असतं. नाहीतर ती चालवता येणार नाही, असं सांगितलं जातं. कारण निसर्गासारखी ती एकात एक गुंतलेली, परस्परपूरक अशी नसते. म्हणजे वारा ढग वाहून आणातो तेव्हाच पाऊस पडतो. वार्‍याला तशी आज्ञाबिज्ञा कोणी देत नाही. उन्हानं जमीन तापली की हवा तिकडे वाहू लागते. ऊन कसं पडतं? सूर्य कसा निर्माण झाला? असे प्रश्न येतीलच. त्याबद्दल डोकं खाजवून उत्तरं मिळणारी नाहीत. आणि हे नियंत्यानं निर्माण केलं असंही नाही. माणसांची व्यवस्था मात्र अधिकारीवर्गानं उभारली ह्यात शंका नाहीये. ती कोणीतरी एकच चालवतो. मग हा जो चालवणारा नियंता असतो, तो नंतर डोक्यावर बसतो. तो म्हणेल तीच पूर्व दिशा, असं सगळ्यांनीच मानावं असं त्याला वाटत असतं. उत्तरेकडे बोट दाखवून जर तो पूर्व म्हणायला लागला, आणि कोणीतरी त्याला आक्षेप घेतला; प्रश्न विचारले; तर आज्ञा देणार्‍या नियंत्याची गोची होते. जी खरं तर नको व्हायला; पण तोही शेवटी माणूस; त्याचीही नियंता म्हणून स्व-प्रतिमा निर्माण झालेली असते. तो आरसा बघत नाही. तो त्याच्या मनात येईल तसं वागू शकतो, हे त्याच्या डोक्यात पक्क रुजलेलं असतं. मग नियंत्याचं तंत्र सुटलं; डोकं हललं की, अति जुन्या काळी थेट मारूनच टाकलं जायचं. ‘बळी तो कान पिळी’ ही म्हण तेव्हाच अस्तित्वात आली आणि जीन्समधून अनेक वर्षं झिरपत झिरपत प्रत्येक व्यक्तीच्या डीएनएमध्ये फिट्ट बसली. अगदी आत्ता ह्या काळातही ‘न ऐकण्यावरनं’ हाणामारीच्या घटना घडताना दिसतातच. पण ते आपल्यासारखे सामान्य लोक. राजकीय वर्तुळात ह्यापेक्षा यंत्रणांची चौकशी मागे लावून देणं, हा मार्ग व्यवस्थेच्या कक्षेतून जात असल्याने जगभरातले सत्ताधारी त्याचा वापर करताना दिसतात. 

इतकं सगळं लिहून वादळ फ़िरून शेवटी उगमापाशीच येतंय. मूळ प्रश्न असा की, सर्व देशवासीयांची जबाबदारी आपणहून, निवडणुक लढवून स्वेच्छेनं स्वीकारलेला; स्वताहून रुबाबात त्या उच्चपदी बसलेला; अच्छे दिनाचा कैवारी असलेली व्यक्तीही दुसर्‍यांचं ऐकून घेत नसेल, तर, तो दिल्लीत बसलेला ‘राजा’ हा त्याला मत दिलेल्या बहुसंख्य प्रजेचा आरसा आहे, हे खरंच म्हणायचं की काय?

तेव्हा डोळे उघडून नीट बघा. बातम्यांच्या खोलात जा. आरशात बघा. छाती फाडून आत कोण-काय-कसं दिसतंय ते बघा. काय म्हणालात? स्त्रियांना कशी फाडता येईल छाती? आलाच का एक ‘व्यवस्था’नुरूप उपप्रश्न! आरशासमोर स्त्री-पुरुष भेद होऊ शकत नाही. तो जे मनाचं काळंकरडं अंतरंग दाखवेल ना; ते बघण्याची ताकद हवी. आरशासमोर ध्यान लावूनही उपयोग नाही. झक्कत डोळे टक्क उघडून, रोखून बघण्याशिवाय पर्याय नाही.

काय आहे मनात चाललेलं? कोण दिसतंय आपल्या मनात? कोणाची प्रतिमा आहे? असे प्रश्न निर्माण करणारं काळंकरडं वादळ आरशाच्या मधोमध घोंघावताना दिसेल.

तसं घराघरात नि मनामनात शिरून खरोखरी वादळ निर्माण झालं, तर माझं कोणीतरी ऐकल्याचं समाधान मला मिळावं. जे मिळणार नाही हे माहितीये; कारण मी मनातल्या मनात जास्तच विचार करणारा माणूस आहे ना!

हृषीकेश पाळंदे
hrishpalande@gmail.com