भाग १ : औद्योगिक वसाहतवाद आणि 'सिल्व्हर स्टँडर्ड'कडून 'गोल्ड स्टँडर्ड'कडे
यंत्राशिवाय उत्पादन करणारा एक कारागीर नोकरीला ठेवला तर तो चांगलं काम करत असला तरी त्याने तयार केलेली पहिली वस्तू आणि दुसरी वस्तू यात तंतोतंत सारखेपणा आणण्यासाठी त्याला जास्त मेहनत करावी लागेल. त्याच्या कारागिरीचा कस लागेल आणि त्याचा वेग मंदावेल. त्याला द्यायचा मोबदला त्याने केलेल्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर आणि संख्येवर ठरेल. आणि तोही त्याने उत्पादन केल्यावर टप्प्याटप्प्याने द्यावा लागेल. म्हणजे भरपूर उत्पादन करण्याची क्षमता असलेल्या कुशल कारागिराने जर प्रत्यक्षात उत्पादन केलेच नाही तर त्याला पैसे द्यावे लागत नाहीत. आपण त्याला कामावरून काढूनही टाकू शकतो. कारागीर आपली कौशल्ये आपल्या वारसांना शिकवू शकतो. आपल्याला त्याचे वारस विकत घ्यावे लागत नाहीत. फार तर त्यांना नोकरीवर ठेवावं लागतं आणि काम केलं तरच पगार द्यावा लागतो. म्हणजे अतिकुशल कारागिरातही आपल्याला फार मोठी गुंतवणूक करायला लागत नाही.
याउलट यंत्रांच्या साहाय्याने केलेल्या उत्पादनात तंतोतंत सारखेपणा असतो. गुणवत्ता, आकार, रंगरूप सगळ्या बाबतीत तंतोतंत सारखेपणा. यंत्र थकत नाहीत. सतत काम करतात. चोवीस तास. अथक. अविरत. आणि जर व्यवस्थित राखलं तर त्याच्या सांत आयुष्यात न कुरकुरता. पण इथेच गडबड होते. यंत्राचं आयुष्य सांत असतं. आणि यंत्रांच्या पोटी यंत्र जन्माला येत नाहीत. ती विकत घ्यावी लागतात. त्यांची सगळी किंमत सुरवातीला भरावी लागते. यंत्राकडून तुम्ही किती काम करून घ्या किंवा घेऊ नका तरीही तुम्ही ती सगळी किंमत आधीच भरून झालेली असते. त्यामुळे यंत्र विकत घेऊन ते वापरले नाही तर तुम्ही गुंतवलेलं भांडवल बुडतं आणि तुमचं नुकसान होतं. परिणामी यंत्र वापरून उत्पादन करणाऱ्या उत्पादकाला गरज असते ती दोन गोष्टींची. कच्च्या मालाचा सातत्याने होणारा पुरवठा आणि तयार झालेल्या उत्पादनासाठी तयार बाजारपेठ.
औद्योगिकीकरण म्हणजे काय तर यंत्रांच्या सहाय्याने केलेलं उत्पादन. उत्पादनाचं जगातील पहिलं औद्योगिकीकरण इंग्लंडमध्ये झालं. आणि ते केवळ एका क्षेत्रात नव्हतं तर सार्वत्रिक होतं. त्यामुळे इंग्लंडमध्ये केवळ एखाद-दुसऱ्या उत्पादकाला त्याच्या कारखान्यासाठी कच्च्य्या मालाचा अविरत पुरवठा आणि पक्क्या मालाची कायमस्वरूपी बाजारपेठ नको होती, तर इंग्लंड नावाच्या देशाला आता कच्च्या मालाचा भस्म्या लागला होता आणि पक्क्या मालाची कायमस्वरूपी बाजारपेठ हवी होती.
यातून निर्माण झालेलं तत्वज्ञान म्हणजे वसाहतवाद. इंग्लंडअगोदर हजारो शतके आंतरराष्ट्रीय व्यापार चाललेला होता. पण इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वसाहतवाद सुरु झाला. वसाहती म्हणजे इंग्लंडसाठी स्वस्तात कच्चा माल पुरवणाऱ्या आणि महागात पक्का माल विकत घेणाऱ्या दासी होत्या. अन्य राज्यकर्त्यांसाठी तलवार हे संपत्ती मिळवण्याचे साधन होते. इंग्लंडसाठी संपत्ती त्यांचे उद्योजक तयार करत होते. त्यामुळे त्यांना तलवारीची गरज केवळ वसाहत स्थापन करताना लागत होती. त्यानंतर वसाहतीतून स्वस्तात कच्चा माल उचलून त्याचे पक्क्या मालात रूपांतर करून मग तो जगभरात आणि त्याच वसाहतीतसुद्धा विकून इंग्लंड श्रीमंत होत होते. वसाहती गरीब आणि इंग्लंड श्रीमंत होऊ लागले. इंग्लंड जगाच्या छातीवर औद्योगिक वसाहतवाद रोवत असण्याच्या आगेमागे दोन गोष्टी झाल्या. पहिली ही -
चीनने आपल्या वस्तुमालासाठी मोबदला म्हणून केवळ चांदी स्वीकारणार अशी अट अजून कडक केली. जगभरात अजूनही धातूची नाणी प्रचलित असताना, इंग्लंडचा आणि औद्योगिक क्रांतीचा उदय होण्यास अजून किमान सातशे वर्षे बाकी असताना, चीनने दहाव्या शतकात सॉंग सम्राटांच्या काळात छापील चलनी नोटा वापरून आपली अर्थव्यवस्था बलवान केलेली होती. पण चौदाव्या शतकात राज्यावर आलेल्या मिंग घराण्याच्या शासनाची तीनशे वर्षं संपत आलेली असताना चीनमध्ये खोट्या नोटांचा सुळसुळाट झाला होता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा छापील नोटांवरचा विश्वास उडाला होता. त्यावर उपाय म्हणून मिंग सम्राटांनी चांदीची नाणी वापरण्याचा हुकूम काढला. आता चीनचा भूगोल असा आहे की तिथे चांदी आणि सोन्याचे फार मोठे साठे सहजगत्या उपलब्ध नव्हते. म्हणून मग मिंग सम्राटांनी हुकून सोडला की चीनमधून कुठलीही गोष्ट आयात करायची झाल्यास आयातदाराने त्याची रक्कम केवळ चांदीच्या स्वरूपात भरायची.
यातून सुरु झाला चांदीचा प्रचंड मोठा ओघ. अख्ख्या जगभरातून चीनकडे चांदी भरभरून वाहू लागली. जपानने चीनला चांदी देऊन स्वतःच्या देशासाठी लागणारा कच्चा माल आयात करायला सुरवात केली. स्पेनने दक्षिण अमेरिकेत चांदीच्या खाणींचा शोध लावला. आणि तिथून चांदी आणून ती चीनला देऊन चिनी रेशीम, चहा आणि पोर्सेलीनच्या वस्तू अश्या पक्क्या मालाची आयात सुरु केली. मग स्पॅनिश व्यापारी हा माल जगभरात विकून त्याबदल्यात इतरांकडचा माल घेऊन आपली अर्थव्यवस्था गबर करू लागले.
म्हणजे जगाला हव्या असलेल्या वस्तू बनवल्या चीनने. त्या विकू तर केवळ चांदीच्या मोबदल्यात हेही ठरवलं चीनने. त्यामुळे चांदीला आपोआप महत्त्व प्राप्त झालं. मग स्पेन आणि इतर युरोपीय देशांनी जगभरात शोधमोहिमा राबवून, चांदीचे साठे शोधून काढले. त्या साठ्यांवर मालकी मिळवण्यासाठी तिथल्या मूळच्या रहिवाश्यांवर अनन्वित अत्याचार केले. एका अर्थाने जे चीनला हवे होते ते युरोपीय देशांनी दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतील रहिवाशांवर दरोडा घालून हिसकावून घेतले. आणि मग अश्या दरोड्यातून मिळवलेली चांदी वापरून त्यांनी चीनबरोबर जागतिक व्यापार सुरु केला. इंग्लंडही यात सामील झाला. फक्त इंग्लंडची स्थिती थोडी वेगळी होती. इंग्लंडला स्पेनप्रमाणे चांदीचे प्रचंड मोठमोठे साठे अमेरिकेत मिळाले नव्हते. त्यामुळे देशांतर्गत आणि विदेशी व्यापारात इंग्लंडने चांदी व सोने या दोघांचा वापर चलन म्हणून सुरु केला. आयातीसाठी पैसे द्यायचे चांदीच्या रूपाने आणि निर्यातीसाठी पैसे घ्यायचे ते सोन्याच्या रूपाने, अशी इंग्लंडची व्यवस्था होती. बाकीचा युरोप, अमेरिका, चीन आणि रशिया हे मात्र मोठ्या प्रमाणावर चांदीवर अवलंबून होते. चांदीची चांदी झाली होती म्हणा ना! फक्त त्यात लुटले गेले अमेरिकेतील मूळचे रहिवासी.
मग झाली फ्रेंच राज्यक्रांती. त्यात क्रांतिकारकांना मदत करण्यासाठी इंग्लंड पुढे सरसावले. त्यांना लढण्यासाठी पैसा (म्हणजे चांदी) पुरवली इंग्लंडने. नंतर इंग्लंड आणि नेपोलियनचे युद्ध सुरु झाले. त्यात नेपोलियनविरुद्ध लढण्यासाठी इंग्लंडने अन्य राष्ट्रांना पैसे (म्हणजे चांदी) पुरवली. इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी खर्च करून झाल्यामुळे इंग्लंडकडे चांदीचा तुटवडा होऊ पडला. त्यामुळे इंग्लंडमध्ये चांदीचे भाव वाढले. इतके वाढले की समजा चांदीच्या नाण्यावर लिहिलं आहे 'एक रुपयाचं नाणं' तर ते वितळवून त्याची चांदी विकली तर मिळेल दीड रुपया. त्यामुळे लोक आहेत ती चांदीची नाणीदेखील वितळवून चांदी विकू लागले. आता सरकारकडे चीनकडून केलेल्या आयतीसाठी पैसे द्यायला चांदी कमी पडू लागली.
मग इंग्लंडने चीनला गळ घातली की आम्ही तुमचा माल घेतो आणि त्याबदल्यात तुम्हाला चांदी द्यायच्या ऐवजी आमचा माल देतो. याला चिनी सम्राटाने स्पष्ट नकार दिला. 'आम्हांला जे आणि ज्या दर्जाचं हवं आहे ते तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळे तुमचा माल आम्हाला नको. जर आमचा माल हवा असेल तर आम्हांला चांदी द्या.' आता आली पंचाईत. चांदी आणावी कुठून? स्पेन चांदी देईल पण ती महाग पडेल. मग काय करावं?
त्यावेळी इंग्लंडच्या मदतीला धावून आली अफू. चिनी समाजात अफूचं सेवन निषिद्ध नव्हतं. आणि एकदा अफूचं व्यसन लागलं की ती व्यक्ती आपल्या व्यसनापायी कायदा मोडायला तयार होते. मग इंग्लंडने चीनजवळ असलेली आपली भारत नावाची वसाहत वापरली. भारतात अफू पिकवायची आणि चीनमध्ये बेकायदेशीरपणे विकायची. त्याबदल्यात चिनी अफू व्यापाऱ्यांकडून चांदी घ्यायची आणि तीच चांदी मग चीनला कायदेशीर व्यवहारांसाठी मोबदला म्हणून द्यायची आणि आपली आयातीची गरज भागवायची.
म्हणजे दक्षिण अमेरिकेतील चांदीच्या साठ्यांवर दरोडा घालून स्पेन श्रीमंत झाला. तर चीनला बेकायदेशीरपणे अफू विकून त्याच्या मोबदल्यात चांदी कमवून इंग्लंड श्रीमंत झाला. या चांदीचं त्यांनी केलं काय? तर ती चीनला देऊन चिनी कच्चा आणि पक्का माल आयात करून, त्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु केला आणि आपले देश खऱ्या अर्थाने श्रीमंत केले.
पण मग अफूच्या चोरट्या व्यापारामुळे चीन आणि इंग्लंडमध्ये युद्ध झाले. ज्यात दुर्दैवाने चीन हरला. तह झाला. हॉंगकॉंग नावाचे बेट इंग्लंडला मिळाले. मकाऊ पोर्तुगालला मिळाले आणि इंग्लंडची दादागिरी चीनवरही चालू झाली. आंतरराष्ट्रीय व्यापारातील चीनची सद्दी संपली. आता आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे युरोप, अमेरिका आणि जपान यांच्या मालकीचं कुरण झालं.
ज्याप्रमाणे एकेकाळी चीनने ठरवलं होतं की आमच्यासाठी पैसा म्हणजे चांदी त्याप्रमाणे इंग्लंडने १८२१ मध्ये ठरवलं की आमच्यासाठी पैसा म्हणजे सोनं. आता अफूच्या युद्धानंतर चीनची सद्दी संपल्यावर साधारणपणे १८७० च्या सुमारास जवळपास संपूर्ण जगाने स्वीकारलं की पैसा म्हणजे सोनं. जगातील सगळे व्यवहार सोन्याच्या मोबदल्यात होऊ लागले. जगाने सुवर्ण मानक (गोल्ड स्टॅंडर्ड) स्वीकारलं.
इंग्लंडचा डंका सातही समुद्रांवर वाजू लागला आणि १८७१ च्या सुमारास मग दुसरी गोष्ट झाली –
जर्मनी नावाचा देश जगाच्या पाठीवर अस्तित्वात आला. अफूच्या युद्धानंतर जग थोडे शांत होऊ लागले होते. जगाच्या कुठल्या भागात कुणाच्या वसाहती आहेत आणि कोण कुणाचे मांडलिक आहे हे जवळपास ठरत आले होते. वसाहतीचे मालक आणि वसाहती अशी जगाची विभागणी पक्की होत असताना. जर्मनीला आपला सूर सपडला आणि औद्योगिकीकरणाच्या लाटेवर स्वार झालेल्या जर्मनीला आता कच्च्या मालाचा कायमस्वरूपी पुरवठा आणि पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ यांची गरज भासू लागली. पण जगात आता वसाहती करण्यासाठी फार देश उरले नव्हते. त्यामुळे वसाहती मिळवण्यासाठी अन्य देशांच्या वसाहती हिसकावून घेणे हा एकच पर्याय जर्मनीकडे उरला होता. युरोपच्या क्षितिजावर युद्धाचे ढग दिसू लागले.
फक्त आता युद्ध होणार नव्हते तर महायुद्ध होणार होते. पहिले महायुद्ध. आणि त्यानंतर गोल्ड स्टँडर्डला धक्का बसणार होता.
आनंद मोरे
anandmore@outlook.com