भाग २ : 'स्टँडर्ड'ची संकल्पना
पहिल्या भागात जग सुवर्ण मानकांपर्यंत (गोल्ड स्टॅंडर्ड) कसे पोहोचले ते आपण थोडक्यात पहिले. आता सुवर्ण मानक किंवा गोल्ड स्टॅंडर्ड म्हणजे काय ते बघू.
१८७० च्या आधी जगात पैशाच्या बाबतीत तीन वेगवेगळी मानके (स्टँडर्ड्स) होती.
१) सिल्व्हर स्टॅंडर्ड : यात स्पेनचा बोलबाला होता आणि चीनच्या चांदीप्रेमामुळे याला प्रचंड महत्त्व आले होते. २) गोल्ड स्टॅंडर्ड : याकडे जगाची वाटचाल सुरु करण्यात ग्रेट ब्रिटनचा हात होता. ३) बायमेटल (दोन धातूंचे) स्टॅंडर्ड : यात देशाचे अधिकृत चलन सोने आणि चांदी या दोन्हीत तयार केले जात असे. जास्त मूल्याच्या नाण्यासाठी सोने आणि कमी मूल्याच्या नाण्यासाठी चांदी अशी ही व्यवस्था होती. ही व्यवस्था ब्रिटन आणि फ्रांसमध्ये होती. परिणामी त्यांच्या वसाहतींत होती. अमेरिकाही बायमेटल स्टॅंडर्डमध्ये काम करत होती पण तिची वाटचाल गोल्ड स्टॅंडर्डकडे होऊ लागली होती.
१८७१ मध्ये फ्रँको प्रशियन युद्ध प्रशियाने जिंकले आणि जर्मनी या नव्या देशाचा जन्म झाला. या नवजात देशाने आर्थिक बाबतीत इंग्लंडच्या व्यवस्थांचा अंगीकार करायचे ठरवले. नुकत्याच जिंकलेल्या युद्धात या नव्या देशाला फ्रांसकडून युद्धाची किंमत म्हणून मोठ्या प्रमाणात सोने मिळाले होते. ज्याची आर्थिक नीती अंगिकारायची तो इंग्लंड बायमेटल स्टॅंडर्ड वापरत असला तरी गोल्ड स्टँडर्डचा पुरस्कर्ता होता. इंग्लंडची सुबत्ता त्या गोल्ड स्टँडर्डचा परिणाम आहे असे एक सर्वमान्य मत होते आणि बायमेटल स्टॅंडर्डसाठी सोने आणि चांदीचे परस्परांतील गुणोत्तर काय असावे म्हणजे किती वजनाचे सोने आणि किती वजनाची चांदी यांची किंमत सारखी असेल याचे युरोपातील मानक फ्रांस ठरवत होता. आता पराभूत झालेल्या फ्रांसने मोठी भरपाई दिली असली तरी अजून बरीच भरपाई फ्रांसकडून टप्प्याटप्प्याने मिळणार होती. तोपर्यंत जर फ्रांसने सोने आणि चांदीच्या किमतीचे गुणोत्तर बदलून स्वतःला फायद्याचे असे केले असते तर पराभूत फ्रांस कमी भरपाई देऊन एक प्रकारे युद्धपश्चात विजयी झाला असता आणि विजयी जर्मनी कमी भरपाई मिळवून युद्ध पश्चात आर्थिक बाबतीत पराभूत झाला असता. त्यामुळे नवजात जर्मनीने सिल्व्हर आणि बायमेटल स्टॅंडर्ड नाकारून गोल्ड स्टॅंडर्ड स्वीकारायचे ठरवले आणि एकाएकी गोल्ड स्टँडर्डला मोठा समर्थक मिळाला. १८७१ पासून जगात गोल्ड स्टॅंडर्ड स्थिरावले.
गोल्ड स्टॅंडर्ड म्हणजे नक्की काय आणि ते कशा प्रकारे काम करते ते समजण्याआधी आधी आपण स्टॅंडर्ड ही संकल्पना समजून घेऊया.
औद्योगिक क्रांती होऊन युरोपने जगावर आपला ठसा उमटवण्याआधी जगावर आशियाचा बोलबाला होता. पण आशियाला जगावर राज्य करायची स्वप्नं पडत नव्हती. किंवा मग कदाचित आशियाला स्टँडर्ड्सची ताकद समजली नव्हती. स्पेनने छापलेले मेक्सिकन पेसो हे नाणे चीनमध्ये सर्रास वापरले जात होते. युरोपात नाविक क्रांती होण्याच्या वेळेस चिनी सम्राटांनी समुद्री संचाराला प्रतिबंध घालून एक प्रकारे स्वतःच्या पायावर धोंडा मरून घेतला होता. भारतातही त्या सुमारास धार्मिक मान्यतांच्या आधारावर समुद्रपर्यटनबंदी लागू झाली होती आणि नाविक क्रांतीच्या बळावर जागतिकीकरण करण्यास युरोपला रान मोकळे झाले. पण युरोप, विशेषतः इंग्लंड आणि फ्रांस आपल्या हातून होणाऱ्या जागतिकीकरणाबद्दल अधिक जागरूक होते. आपली भाषा, आपले शोध, आपले विचार, आपले कायदे, आपल्या व्यवस्था आणि आपले तत्वज्ञान जगाने स्वीकारावे (किंबहुना आपण ते तसे स्वीकारायला लावून जगाचा उद्धार करतो आहोत) अशी त्यांची धारणा होती. आपल्या व्यापाराला ज्या ज्या गोष्टी पूरक ठरतील त्या त्या गोष्टींचे शास्त्र बनवून ते टिकवायचे त्यांचे कौशल्य वादातीत होते आणि आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा, वजन मापे अंतर मोजण्याची मेट्रिक पद्धत, मानवी शरीराच्या वजन आणि उंचीचे मानक, रक्तात किती कोलेस्टेरॉल योग्य यासारख्या गोष्टींचा जन्म झाला. फ्रांसने तयार केलेली मेट्रिक पद्धत आणि लंडनजवळची रॉयल ऑब्झर्व्हेटरी असलेल्या ग्रीनविच शहरातून जाणारी आंतरराष्ट्रीय वेळरेषा जगाने स्वीकारली.
त्याचप्रमाणे चांदीच्या किंवा सोन्याच्या एका नाण्यात किती औंस चांदी असायला हवी याचे मानकही प्रत्येक देश ठरवत होता. इंग्लंड आणि फ्रांसमध्ये बायमेटल सिस्टीम असताना एका औंस सोन्याच्या बदल्यात किती औंस चांदी याचे गुणोत्तर हे दोन्ही देश ठरवत होते. त्यात मग इंग्लंडच्या राजाने सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनला आपल्या टांकसाळीत काम करायला बोलावले आणि सगळ्यात महत्वाचे काम दिले. ते म्हणजे इंग्लंडमध्ये सोने आणि चांदीचे गुणोत्तर ठरवून देणे. भौतिकशास्त्रात कमालीचा विद्वान असलेल्या न्यूटनने इथे मात्र थोडी गडबड केली. त्यांनी एका औंस सोन्याच्या तुलनेत चांदीचे जास्त औंस असे गुणोत्तर लावले. परिणामी, इंग्लंडमध्ये चांदी स्वस्त आणि जगभरात चांदी महाग अशी परिस्थिती झाली आणि ब्रिटिश व्यापाऱ्यांनी इंग्लंडमध्ये चांदी विकत घेऊन ती जगाच्या बाजारात विकून नफा कमावला. त्यामुळे इंग्लंडमध्ये नेपोलियनिक युद्धांच्या आधीसुद्धा चांदीचा तुटवडा निर्माण होऊन इंग्लंडची वाटचाल गोल्ड स्टॅंडर्डकडे होऊ लागली होती. या गडबडीमुळे जगभरात सोने आणि चांदीच्या किमतीचे स्टॅंडर्ड गुणोत्तर ठरवायचे काम आपोआप फ्रांसकडे आले. आणि फ्रांसने ते व्यवस्थित पारही पाडले. त्याला जर्मनीने कसा धक्का दिला ते आपण वर पाहिले.
गोल्ड स्टॅंडर्ड जगाने स्वीकारलं म्हणजे काय? तर सरकारने सांगितलं की आमच्या चलन छापण्यावर मर्यादा आहेत. आम्ही पाहिजे तेव्हा पाहिजे तितकं चलन छापणार नाही. जितक्या किमतीचं आमच्याकडे सोनं आहे तितक्याच मूल्याचं चलन आम्ही छापू. त्यामुळे कुणीही जर सरकारी चलन घेऊन सरकारने अधिकार दिलेल्या बँकेत जाऊन त्याच्या बदल्यात सोनं मागितलं तर ते देण्यास सरकार बांधील राहील. आता जर सरकारला जास्त चलन छापायचं असेल तर सरकारकडे जास्त सोनं आलं पाहिजे. आणि जर सोन्याचा साठा कमी झाला तर छापलेलं चलन सरकारला बाद करावं लागेल.
आंतरराष्ट्रीय व्यापाराला याचा फायदा कसा होईल? हे समजण्यासाठी मी डेव्हिड ह्यूम या तत्वचिंतकाने दिलेलं उदाहरण वापरतो -
समजा सर्व देशात सगळे व्यवहार सोन्याच्या नाण्याच्या रूपात होतात. निर्यात करणाऱ्या माणसाला त्याचा मोबदला सोन्याच्या नाण्याच्या रूपात मिळतो आणि आयात करणारा त्याचे मूल्य सोन्याच्या नाण्याच्या रूपात देतो. आता जर आपण भारत आणि चीन असे दोन देश घेतले आणि या दोन देशांची परस्परांतील आयात आणि निर्यात अगदी समान मूल्याची आहे असं मानलं तर या दोन देशांनी एकमेकांना सोने द्यायची गरज पडणार नाही. पण जर भारत या देशाची चीनला केली जाणारी निर्यात ही चीनकडून केलेल्या आयातीपेक्षा कमी असेल तर भारताचा चीनबरोबर असलेला बॅलन्स ऑफ ट्रेड निगेटिव्ह होईल. चीनसाठी भारत डेटर, म्हणजे देणेकरी होईल आणि भारतासाठी चीन क्रेडिटर, म्हणजे घेणेकरी होईल. आता जास्तीच्या आयातीसाठी भारताने चीनला आयात आणि निर्यातीच्या मूल्यातील फरकाइतके सोने द्यावे लागेल. यामुळे भारतातील सोन्याचा साठा कमी होईल आणि चीनमधील सोन्याचा साठा वाढेल आणि आता सोने म्हणजे पैसा हे आपण मान्य केलेले असल्याने भारतातील फिरता पैसा कमी होईल आणि चीनमधील फिरता पैसा वाढेल.
भारतातील फिरता पैसा कमी झाला म्हणजे भारतातील लोकांची क्रयशक्ती कमी होऊन भारतातील मागणी कमी होईल. मागणी कमी झाली की भारतात वस्तूंच्या किमती पडतील. याउलट चीनमधील फिरता पैसा वाढला की तिथल्या लोकांची क्रयशक्ती वाढून तिथे मागणी वाढेल. म्हणजे वस्तूंच्या किमती वाढतील. मग भारतीय आणि चिनी लोकांना चिनी वस्तू महाग आणि भारतीय वस्तू स्वस्त वाटू लागतील. मग चीन भारताकडून जास्त आयात करेल आणि भारत चीनकडून कमी आयात करेल. म्हणजे आता भारतासाठी बॅलन्स ऑफ ट्रेड पॉझिटिव्ह होईल. आता चीन भारताला सोने देईल. अशा तऱ्हेने जागतिक बाजारात स्थैर्य राहील.
ह्यूमचा हा सिद्धांत प्रत्यक्षात जसाच्या तसा आणणं कठीण असलं तरी इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिका या तत्कालीन विजयी आणि संपन्न देशांनी ज्याच्यामागे सोन्याचा साठा आहे असे चलन वापरणारी व्यवस्था उर्फ गोल्ड स्टॅंडर्ड वापरायला सुरवात केली. नंतर फ्रांसनेही यात सहभाग घेतला. त्यामुळे जागतिक आर्थिक व्यवहारात सुसूत्रता आली. आता त्यात कुठल्याही सम्राटाची मर्जी मध्ये लुडबूड करणार नव्हती. व्यापार असा का करायचा? या प्रश्नाला सैद्धांतिक उत्तर मिळाले होते. पण औद्योगिकीकरणात नव्याने पदार्पण केलेल्या जर्मनीला आता वसाहतींची भूक लागली होती. त्याची परिणती म्हणून जर्मनीच्या जन्मानंतर त्रेचाळीस वर्षांनी पहिले महायुद्ध सुरु झाले आणि गोल्ड स्टँडर्डला तडे जाऊ लागले.
आनंद मोरे
anandmore@outlook.com