ऐतिहासिक ग्रंथ : ' खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२'
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आणि आंबेडकरी चळवळीची मुळं खान्देशात किती खोलवर रुजली होती, याचा सविस्तर आणि दस्तऐवजीकरणासह मागोवा घेणारा ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ हा ग्रंथ वाचकांना इतिहासाच्या एका महत्त्वाच्या प्रवासात घेऊन जातो. प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी लिहिलेल्या या लेखात बाबासाहेबांचे खान्देशातील दौरे, बहिष्कृत हितकारणी सभेचं कार्य, समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, सत्यशोधक आणि जलसा चळवळीपासून बौद्ध चळवळीपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेतला आहे. खान्देशातील कार्यकर्त्यांनी आंबेडकरी विचार गावागावांत पोहोचवण्यासाठी केलेलं काम, समाजजागृतीचे प्रयत्न, शिक्षण, संघटन आणि परिवर्तनासाठी उभ्या राहिलेल्या चळवळींचा इतिहास या ग्रंथातून उलगडतो. दस्तऐवज, पत्रं, दौरे, सभा, चळवळी आणि कार्यकर्त्यांच्या योगदानातून उभा राहिलेला हा इतिहास आजच्या पिढीला, अभ्यासकांना आणि कार्यकर्त्यांना नक्कीच दिशा देणारा ठरतो, हे या लेखातून जाणवत राहतं.
‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’
आंबेडकर चळवळीचा इतिहास हा देदीप्यमान आणि मार्गदर्शक आहे. तो आजच्या पिढीला, तरुणांना, कार्यकर्त्यांना निश्चितच दिशादर्शक ठरावा म्हणूनच ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ हा दुसरा खंड प्रकाशित झाला आहे. एक नाविन्यपूर्ण ग्रंथ म्हणून ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ हा ग्रंथ प्रा. गौतम निकम, प्रा. डॉ. सतीश मस्के, प्रतापराव साळुंखे, डी.एस. घोडेस्वार, वैशाली निकम आदींनी विमलकिर्ती प्रकाशन, चाळीसगाव यांच्या माध्यमातून प्रकाशित केला आहे. हा ग्रंथ चळवळीतील कार्यकर्त्याला, लेखकाला, संशोधकाला दिशा देणारा, मार्गदर्शन करणारा ठरेल यात शंका नाही.
‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ यामध्ये पंधरा प्रकरणांची मांडणी करून खान्देशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा, आंबेडकरी चळवळीचा व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कार्याचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेडकरी विचार सर्वदूर पसरावा, पेरावा व त्यातून समाजजागृती घडावी, समाजात परिवर्तन व्हावे, चैतन्य निर्माण व्हावे म्हणूनच स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर खान्देशात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कोर्ट केस, अन्याय-अत्याचाराच्या कामाबाबत आले होते. त्या वेळी त्यांनी इथल्या कार्यकर्त्यांना, समाजाला मार्गदर्शन केले आहे. थोरगव्हाण ता. रावेर जि. जळगाव, चाळीसगाव, असोदा, धुळे, जळगाव, जामनेर, नेरी, शेंदुर्णी, बोदवड, वरणगाव, एदलाबाद, सावदा, यावल, भुसावळ, अमळनेर इत्यादी गावांना भेटी देऊन, वसतिगृहांना भेटी दिल्या. प्रचारसभा घेतल्या. न्यायालयात कोर्ट केस जिंकून न्याय मिळवून दिला. एवढेच नाही, तर रावेरच्या महारवाड्यात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांना शिकवा, स्वच्छ रहा, स्वच्छ कपडे घाला, गावकीची कामे करू नका, गुरे ओढू नका असा उपदेशही केला. या सर्व विषयांचा आढावा यामध्ये म्हणजे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खान्देशातील दौरे आणि दस्तऐवज’ या पहिल्या प्रकरणात घेतला आहे.
अस्पृश्य, कनिष्ठ वर्गाची जी हीन-दीन अवस्था आहे, मृतप्राय जिने जगणे त्यांच्या वाट्याला येत आहे, मध्यमवर्गातील ज्या काही चळवळी आहेत त्या त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत, त्यांच्यासाठी काहीच कार्य करत नाहीत, म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत असे की, अस्पृश्य वर्गाच्या हिताचे संरक्षण करणारी, त्यांच्यात जागृती आणि उन्नती करणारी, त्यांच्यात आलेल्या शिथिलतेपासून व औदासिन्यापासून त्यांची सोडवणूक करून त्यांच्यात चैतन्य आणि अन्यायाच्या चीडीचा संचार करणारी एखादी संस्था असावी. म्हणून त्यांनी २० जुलै १९२४ साली ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ स्थापन करून कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या बहिष्कृत हितकारणी सभेमार्फत खान्देशात विविध ठिकाणी वसतिगृह उघडून समाजाला प्रगतीचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर त्यांनी नंदुरबार, जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, धुळे अशा विविध ठिकाणी जी काही समाजजागृतीची विविध कार्ये केली, त्या विषयीची माहिती दुसऱ्या म्हणजेच ‘बहिष्कृत हितकारणी सभेचं खान्देशातील कार्य आणि दस्तऐवज’ या प्रकरणात दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजाचे दमन, शोषण, दास्य मोठ्या प्रमाणावर होत असे. या सर्वातून अस्पृश्य समाजाची मुक्ती व्हावी म्हणून लढण्यासाठी शूर, शिस्तबद्ध व निग्रही कार्यकर्त्यांची, लढवय्ये सैनिकांची गरज म्हणून त्यांनी ‘समता सैनिक दल’ ची स्थापना २० मार्च १९२७ रोजी केली. हिंदू समाजातील स्पृश्य बांधवांकडून अस्पृश्य मानलेल्या समाजबांधवांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, जुलूम, विषमता याला आळा बसण्याकरिता या दलाची स्थापना केल्याचे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. याच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्योद्धाराच्या चळवळीला यशस्वी करण्यासाठी धुळे (पश्चिम खान्देश) येथील कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने कार्य केले आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण चळवळ यशस्वी करण्यासाठी धुळ्याचे समता सैनिक दल, जयभीम व्यायामशाळा, मिल चाळ, बलभीम महात्मा गायकवाड संघ, समतावादी दलित मंडळ, प्राणयज्ञ दल अग्रेसर होते. धुळे आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. समता सैनिक दलाचे कॅप्टन व जयभीम व्यायामशाळेचे वस्ताद कॅप्टन भीमराव चांगदेव साळुंखे, अण्णासाहेब लळिंगकर, दादासाहेब गायकवाड या घटनांचे साक्षीदार आहेत, हे या खंडाच्या तिसऱ्या प्रकरणात मांडले आहे.
त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट १९३८ साली ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन केला. या पक्षाने पक्षाच्या घटना-कायद्यानुसार निवडणुकांत भाग घेण्यास सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत व्यापक दृष्टिकोन बाळगून सर्व मजुरांना, दलितांना, कष्टकऱ्यांना, शेतमजुरांना विकासाचा मार्ग दाखविणारा कार्यक्रम ठरविला होता. या पक्षाच्या माध्यमातून पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. याविषयीची माहिती या खंडात दिली आहे.
त्याचबरोबर १९ जुलै १९४२ साली ‘अखिल भारतीय दलित फेडरेशन’ स्थापन करण्यात आला. यामध्ये सार्वजनिक कल्याणाला महत्त्व दिले. ही एक राजकीय संस्था आहे. तिची तत्त्वे, पक्षाचे धोरण, पक्षाचा कार्यक्रम व विविध प्रश्नांचा आढावाही या खंडामध्ये घेतला आहे. याविषयीचीही सविस्तर माहिती प्रकरण पाच-सहा मध्ये दिली आहे.
अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाची उन्नती करण्यासाठी त्यांच्या हातात राजकीय सत्ता देण्यासाठी धडपड करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर स्पृश्य समाजाकडून होत असलेले अन्याय-अत्याचार धुडकावून लावणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य उत्तुंग आहे. म्हणून त्यांना नाशिक रोड येथील अस्पृश्य मानलेल्या वर्गातील नागरिकांनी १२ ऑक्टोबर १९५६ रोजी दिलेले मानपत्रही यामध्ये दिले आहे. हे मानपत्र मा. दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. त्याचबरोबर सन्माननीय श्री. एन. शिवराज, अध्यक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष यांनीही धुळे येथे भेट दिली. त्यांनाही दिलेले आय. जी. शहा यांचे पत्र यामध्ये दिले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या प्रत्येक चळवळीत, आंदोलनात जळगाव जिल्हा हा अग्रेसर राहिलेला आहे. ‘स्वतंत्र मजूर पक्ष’ स्थापन होण्याच्या अगोदरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने काहीजण लोकल बोर्ड, नगरपालिका व ग्रामपंचायत यामध्येही प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. त्यामुळे धनाजी बि-हाडे, दिवाण चव्हाण, शामराव जाधव, रायला निकम, नामदेव सोनवणे, के.एल. तायडे, के.आर. वानखेडे, देवचंद मेढे, काशिनाथ वाघमारे अशी बरीच मंडळी विविध चळवळींत सहभागी होती. दौलत गुलाजी जाधव निवडणुकीत विजयी झाले. याबाबतची माहिती जयसिंग वाघ यांनी लेखात दिली आहे.
आंबेडकरी चळवळीने सातत्याने समाजातील शोषित समूहाचा विचार केला. त्यामध्ये अस्पृश्य, आदिवासी, भटके-विमुक्त, इतर मागासवर्ग, स्त्रिया आदींचाही समावेश होतो. भिल्ल जमात सामाजिकदृष्ट्या मागास आहे. भिल्लांच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव आंबेडकरी चळवळ करत होती. याविषयी ‘जनता’ मुखपत्रात लिहूनही आले होते. दलित परिषदेत आदिवासींचा सहभाग होता. याविषयीची मांडणी डॉ. सुनिता सावरकर यांनीही या ग्रंथातील आपल्या लेखात मुद्देसूदपणे केली आहे.
खान्देशात सत्यशोधक चळवळ ही खेड्यापाड्यांत जाऊन पोहोचली होती. या सत्यशोधक समाजाचे २२ वे अधिवेशनही १९९१ साली बोराडी ता. शिरपूर जि. धुळे येथे भरले होते. या अधिवेशनाचे संयोजक व स्वागताध्यक्ष धुळे जिल्ह्याचे सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते व्यंकटराव रणधीर होते. ते फुले-शाहू-आंबेडकरी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असत. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार, तत्त्वज्ञान आणि चळवळीची धग आणि रग सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे कार्यही समाजप्रबोधनात्मक जलसा चळवळीने केले आहे. याच सत्यशोधकी व आंबेडकरी जलशांचे लोक खान्देशात पोहोचले होते. या खान्देशातील सत्यशोधक चळवळीविषयी व आंबेडकरी जलसा विषयाची माहिती डॉ. भगवान ठाकूर यांच्या लेखातून दिली आहे.
त्याचबरोबर खान्देशात कामगार चळवळ, स्त्री चळवळ, प्रशिकसारखी विद्यार्थी चळवळही आंबेडकरी विचाराने जोमाने काम करत होती. विषमता, अन्याय, अत्याचार आणि गुलामी नष्ट करण्याचा प्रयत्न करत होती. या विषयीची माहिती पुरुषोत्तम पारधी यांनी त्यांच्या लेखात दिली आहे.
अस्पृश्य समाजाची सुधारणा करावयाची असेल, त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवायचा असेल, तर वृत्तपत्राची गरज असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘जनता’, ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’, ‘प्रबुद्ध भारत’ इत्यादी वृत्तपत्रे काढून समाजजागृती केली आहे. स्वतःही अग्रलेख लिहून समाजाला दिशा दिली आहे. त्याचप्रमाणे खान्देशातही आंबेडकरी विचारधारेची काही वृत्तपत्रे चालवली जात असत. त्यातून आंबेडकरी विचार पसरविला जात असे. त्याचबरोबर खान्देशात ‘दलित भारत’ हे वृत्तपत्रही निघत असे. या अंकातील अग्रलेखाविषयीची भूमिका किशोर मेढे यांनी सविस्तरपणे सांगितली आहे. त्याचबरोबर इतर नियतकालिकांची यादीही यामध्ये जोडली आहे.
त्याचबरोबर खान्देशात आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाची साक्ष देणारे दस्तऐवज ‘विमलकिर्ती’ व ‘खानदेश चौफेर’ या नियतकालिकांचाही वाटा फार मोठा आहे. याविषयीची माहिती आपल्या लेखातून प्रा. डॉ. सतीश मस्के यांनी दिली आहे. खान्देशातील प्रकाशित आंबेडकरी निवडक साहित्याचीही यादी यामध्ये दिली आहे.
खान्देशातील अस्पृश्य जातींत मोठ्या संख्येने महार लोक होते. या जातीतील लोकांना अस्पृश्यतेची कामे करणे बंधनकारक केले होते. ते दूर करण्यासाठी आंबेडकरी चळवळीने केलेले कार्यही अत्यंत महत्त्वाचे आहे. महाड चवदार तळे व खान्देश, मंदिर प्रवेश सत्याग्रह, नाशिक मंदिर प्रवेश सत्याग्रह व खान्देश या संदर्भातील माहिती लेखक प्राचार्य डॉ. मी. ना. पाटील यांनी दिली आहे. खान्देशातील शैक्षणिक स्थिती, खान्देशातील अस्पृश्यांची शैक्षणिक स्थिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेचा खान्देशातील दलित समाजावर झालेला परिणाम याविषयीचा महत्त्वपूर्ण आढावाही प्राचार्य डॉ. मी. ना. पाटील यांनी घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ४ मे १९५५ रोजी ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ (भारतीय बौद्ध महासभा) ची शासनदरबारी विश्वस्त नोंद केली. या बौद्ध महासभेचे संस्थापक अध्यक्ष स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. भारतात बौद्ध धर्माचा प्रचार करणे, बौद्ध वंदनेसाठी विहार बांधणे, शाळा, महाविद्यालये स्थापन करणे, सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणे असे विविध उद्देश या भारतीय बौद्ध महासभेचे होते. याच बौद्ध महासभेचे कार्य खान्देशातील जळगाव येथे १९५६ पासून सुरू केले. भारतीय बौद्ध महासभेच्या विविध शाखा विविध ठिकाणी स्थापन करून जळगाव, धुळे व नंदुरबार येथेही जनजागृतीचे कार्य जोरदारपणे सुरू केले.
त्याचबरोबर भुसावळ येथे नववे महाराष्ट्र बौद्ध साहित्य संमेलन भरवले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. म. ना. वानखेडे हे होते. या संमेलनानंतर खान्देशामध्ये साहित्यनिर्मिती होऊ लागली. बौद्ध साहित्यही निर्माण होऊ लागले. त्याचबरोबर कविरत्न वामनदादा कर्डक यांचाही मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याविषयीचाही सविस्तर आढावा ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ मध्ये घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर दि. ३१ जुलै १९३७ रोजी कोर्टाच्या कामानिमित्त धुळे येथे आले होते. या कोर्ट केस विषयीची सविस्तर माहिती प्रकरण १० मध्ये देण्यात आली आहे. त्याचबरोबर इमारत फंडाबाबत दि. २२ नोव्हेंबर १९४० साली चिखलपाडा, फोरास रोड, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषणही यामध्ये देण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाची मुहूर्तमेढ रोवण्याचे नियोजन केले होते. त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जनतेला या पक्षात सामील होण्याबाबतचे खुले पत्रही या खंडात दिले आहे.
खान्देशात आंबेडकरी चळवळीचे, विचारांचे कार्य अगदी मनोभावे करणारे व ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-१’ च्या संपादक मंडळात असणारे प्रतापराव साळुंखे व डी.एस. घोडेस्वार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा आलेखही यामध्ये मांडला आहे.
शेवटी ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-१’ च्या प्रकाशनाविषयीची माहिती, वृत्तांत व फोटो दिले आहेत. नंतर देणगीदारांची यादी व ग्रंथसूचीही देण्यात आली आहे.
एकंदरीत ‘खान्देशातील आंबेडकरी चळवळ खंड-२’ हा ग्रंथ वाचकांना निश्चितच आंबेडकरी चळवळीचा इतिहास उलगडून दाखविणारा आहे. खान्देशात आंबेडकरी विचारांचे, कार्याचे जाळे कसे विणले गेले याबाबतची माहिती या ग्रंथात सांगितली आहे. त्यामुळे हा ग्रंथ चळवळीला, कार्यकर्त्याला, वाचकाला, संशोधकाला, तरुणांना निश्चितच दिशा देईल अशी आशा वाटते.
संपादक : प्रा. गौतम निकम, प्रा. डॉ. सतीश मस्के, प्रतापराव साळुंखे, डी.एस. घोडेस्वार, वैशाली निकम प्रकाशक : विमलकिर्ती प्रकाशन, चाळीसगाव पृष्ठसंख्या : ४९६ मूल्य : ८००/-
प्रा. डॉ. सतीश मस्के मराठी विभागप्रमुख, कर्म. आ. मा. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे मो. ९४२३३९७४८४