मी काळ रांधत ठेवलाय

२१ डिसेंबर २०२५

काही संग्रह हाती येण्याआधी त्याचे शीर्षकच आपल्याला त्याकडे आकर्षित करते, 'मी काळ रांधत ठेवलाय' हाच तो मुखपृष्ठही सुंदर झालेला संग्रह आहे. सन २०१२ रोजी संग्रह आल्यानंतर आता २०२५ पर्यंत थांबून, डॉ. नीलिमा गुंडी यांचा चौथा कविता संग्रह आता प्रकाशित झालेला आहे. 'काळाला नवा सर्जनशील आकार देता यावा लागतो हे काम सर्जनाशी निसर्गतःच जोडलेली स्त्री करू शकेल असा मला विश्वास वाटतो', आपल्या या संग्रहाच्या मनोगतात हे अत्यंत आश्वासक विधान डॉ. नीलिमा गुंडी करतात. या संग्रहामध्ये एकूण ७५ कविता समाविष्ट आहेत.

आपल्या बालकविता,अनुवाद इतर सर्व साहित्य विषयक आवडी सोबतच कविता लिखाणाचा वेगळा बाज या सर्व कवितांमध्ये दिसून येतो. त्यांना म.सा.प तर्फे सुनीताबाई गाडगीळ साहित्य स्मृती पुरस्कार (१९/०४/२०२३) प्रदान केला गेला, त्यावेळी त्यांनी केलेले भाषण या संग्रहात पूर्ण छापलेले आहे. ते वाचतानाच आपल्याला त्यांच्या साहित्य जाणीवा आणि प्रतिभेचा प्रत्यय येतो. भाषणात त्या म्हणतात "बाहेरची गुंतागुंत वाढली की आपला प्राणस्वर जपणे हे आव्हान असते आणि ते आव्हान कविता पेलू शकते अशी माझी धारणा आहे." काय सटीक विचार आहे पहा!

त्यांची इतकी गाढ श्रद्धा आपल्या कवितेवर आहे. पुढे त्या असेही म्हणतात "भाषाही कवितेसाठी केवळ साधन नसते तर आशयद्रव्यही असते". हा एक सुंदर संदेश त्या सर्व कवींसाठी सहज देऊन जातात. आता प्रत्यक्ष 'मी काळ रांधत ठेवलाय' यातील कवितांबद्दल बोलते. या कवितांमध्ये अनेक भावनांचे पदर दिसून येतात. कधी आई, कधी घरात वावरणारी स्त्री, कधी बायको या भूमिका आहेतच, पण कवयित्री म्हणून आपली आणि जगण्याची, मनातील लढाई या सर्व कवितांमधून आपल्यासमोर येत राहते.

त्या म्हणतात 'शब्दांच्या लाईफ जॅकेटमुळे मी सावरते ते काहूर, मनातल्या मनात उसळतो मग कवितेचा पूर..!' (जगण्याचे दोर घट्ट धरून). कवितेचा पूर आला तरी त्यांची तरण्याची तयारी आहे. स्वतःची वाट शोधताना पुन्हा कविताच सोबत करते तेव्हा ती व्यक्त होण्याची कला बघा. 'दुःखाचे घाव सोसल्यावरही कसा चढावा जगण्याचा दुर्गम घाट? पढिक पांडित्य ठरलं भुईसपाट! तेव्हा तिची तीनंच शोधली वाट..! (आश्वासन).

या संग्रहातील 'मोनालीसा', 'प्रश्नपंजरी' या विशेष उल्लेखनीय कविता मला वाटल्या. प्रश्नपंजरीमध्ये आपल्या आजीच्या आठवणीने भावूक झालेली कवयित्री दिसून येते. 'सारे टोचणारे प्रश्न सुईसारखे असेच दडवले होते का तिने? तिचा प्रत्येक धागा म्हणजे सुईने टोचलेल्या प्रश्नांचा वण.. तिची प्रत्येक गाठ म्हणजे मनातल्या मनात साचलेले तण..(प्रश्नपंजरी).

आजवर बायकांची सर्व भावना मनात ठेवत जगत राहण्याची सवय,आपल्या आजीतही कवयित्रीला इथे दिसली असावी का?'भाषेची लक्ष्मणरेषा' असे सुंदर शीर्षक असलेली एक कविता यामध्ये आहे. 'मी शब्दांच्या परिघात फिरत राहते गरगर अष्टौप्रहर... मला नाही ओलांडता येत भाषेची लक्ष्मणरेषा.. अशी एक छोटी कबुली व्यक्त होते.

'कवितेची कोवळी कोर', 'गुप्तधन', 'कवी', 'अनुवाद', 'स्फुरताना अक्षरे', अशा अनेक कविता आहेत ज्यातून एक वेगळा विचार आपल्याला वाचताना जाणवतो. विस्तार भयास्तव ते सविस्तर लिहिणे मी टाळते आहे. या पुढच्या ओळी बघा; 'शब्द नांदतात घरात, अगदी सांदी कोपऱ्यात, फडताळात, पोटमाळ्यात आणि स्वप्नांच्या राज्यात, कधी मिरवतात उघड्यावर हवेत, कधी येतात फुलासारखे कवेत'! शेवटी त्या लिहितात 'त्यांच्यावर असतो सतत नेणिवेचा नि:शब्द पहारा'..!

या संग्रहातल्या कविता खूप लांबलचक नाहीत, तरी आशयघन आहेत. त्यातले नवीन विचार आणि लिखाणाची वेगळी हातोटी तसेच स्त्री जाणीवेची प्रवाही शैली यातून आपल्याला वाचनानंद मिळतो. कातरवेळ कोणत्या कवीला भुलवत नाही? तसेच इथेही, 'अंधाराने गिळले सारे शब्द फुटेना मनी! असे अचानक अस्तित्वाचे पंख कापले कुणी? (कातरवेळी) या कवितेतला सवाल थेट आपल्याला भिडतो.

या संग्रहात 'मी काळ रांधत ठेवलाय' या शिर्षकाची कविता आहे, यातल्या या ओळी पहा, 'एकविसावे शतक केव्हाचे खोळंबलेय किती दूर -- तिथे क्षितिजावर -- आईला विचारतेय लेक, काय शिजतंय रटारटा ? आई म्हणते, "ऐक, मी काळ रांधत ठेवलाय बाळ, तुझ्याकरता!"

आपला साहित्याचा, कवितेचा वसा अलगद पुढच्या पिढीकडे जावा ही इच्छा साहजिक आहे, त्यामुळे आपल्या वागण्यातून तो विचार कसा पोहोचेल याचा विचार यामध्ये दिसतो. वानगी दाखल काही कवितांची शीर्षक इथे देते आहे. संग्रहतील सर्वच कविता वाचनीय आहेत, हे पुन्हा नमूद करते. 'द्रौपदी', 'रुई','स्वातंत्र्याची लहर', 'कंदील','अक्षरे','पाण्यावर तरंगणारी रांगोळी', 'नायगारा','मंतरलेले माझे श्वास', 'हाती हवीच लेखणी आता' 'तिची स्वप्ने' इत्यादी.

याआधी उद्रृत केलेल्या कवितांच्या ओळींमधून तुम्हाला संग्रहाची ओळख नक्कीच झाली असेल. याशिवाय काही सामाजिक जाणिवेच्या कविता म्हणून 'हिजाबाआड', 'रक्ताच्या थारोळ्यात','सावित्रीचा दृष्टान्त' या कवितांचा उल्लेख करणे ही मला महत्वाचे वाटते. यामध्ये त्या म्हणतात, गोष्टीतल्या सावित्रीच्या वाणीचे सरत नाही तेज, कालचक्राची गती उलटवणारे तिचे ते अवघड पेच! (सावित्रीचा दृष्टान्त).

शेवटाकडे येताना डॉ. नीलिमा गुंडी यांच्याच ओळींचा आधार घेऊन नव कवींनाही हा सृजन संदेश आहे,असे म्हटले तरी वावगे ठरू नये. "कविता करायला फक्त कागद शोधू नका, भाषेचा अखंड झरा कान देऊन ऐका..! (शब्दांना या बाहेरून)

कवितासंग्रह:: 'मी काळ रांधत ठेवलाय' कवयित्री :: डॉ. नीलिमा गुंडी स्नेहवर्धन प्रकाशन :: किंमत २००/-