इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद — भाग १

२१ जून २०२६

मिळून साऱ्याजणी ऑनलाइनच्या कार्यकारी संपादक दीक्षा दिंडे या अपंगत्व, सुलभता आणि समावेशन या विषयांवर काम करणाऱ्या EquiBridge Foundation च्या सह-संस्थापक आहेत. त्यांना जन्मतः सेरेब्रल पाल्सी हे अपंगत्व आहे. समाजातील विविध स्तरांवरील समावेशनाची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी, अपंग व्यक्तींचे अनुभव समजून घेण्यासाठी आणि समावेशक समाजाची संकल्पना अधिक व्यापकपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी EquiBridge Foundation चे सह-संस्थापक, त्यांचे जीवनसाथी आणि सहप्रवासी अमोल सुतार यांच्यासह ‘इन्क्लुजन यात्रा’ ही राज्यव्यापी संवादयात्रा केली. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये प्रवास करत या दोघांनी हजारो लोकांशी संवाद साधला आणि अपंगत्वाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पातळीवर कोणते काम सुरू आहे, त्यातील आव्हाने, संधी आणि वास्तव यांचा शोध घेतला.

या यात्रेदरम्यानचे अनुभव, भेटलेल्या व्यक्ती, प्रेरणादायी उपक्रम, समोर आलेली आव्हाने आणि समावेशनाचे विविध पैलू यांविषयी दीक्षा दिंडे त्यांच्या शब्दांत या लेखमालेतून लिहित आहेत.


दिवस पहिला : जेजुरी आणि पिंपरे खुर्द

८ सप्टेंबर २०२५ रोजी आमच्या ‘इन्क्लुजन यात्रा’ची सुरुवात झाली. अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर अखेर आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. यात्रेचा पहिला मुक्काम सासवड असणार होता. मात्र स्थानिक महाविद्यालयांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने काही दिवस आधीच आमचा मार्ग बदलला आणि आम्ही जेजुरीकडे वळलो. जेजुरीमध्ये सुरुवातीला दोन शाळांमध्ये सत्रे आयोजित करण्याचे ठरले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांमुळे त्यापैकी एका शाळेने ऐनवेळी परवानगी नाकारली. अशा वेळी जिजाऊ ज्ञानमंदिरचे अजयसिंह सावंत खास यांच्यामुळे दुसरे सत्र सुरळीत पार पडले.

या यात्रेदरम्यान मी प्रथमच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांशी स्टोरीटेलिंगच्या माध्यमातून अपंगत्व आणि समावेशन या विषयांवर संवाद साधत होते. मुलांना गोष्टींच्या माध्यमातून अपंगत्व समजावून सांगणे हे आव्हानात्मक काम होते. यासाठी आम्ही तुलिका पब्लिकेशन्सच्या समावेशकता आणि विविधतेवर आधारित पुस्तकांचा संदर्भ घेतला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे अधिक सोपे आणि प्रभावी झाले. प्रत्येक वयोगटाची समज, उत्सुकता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वेगळी असल्यामुळे गोष्टीतील पात्रांच्या भूमिका विद्यार्थ्यांनाच देण्यात आल्या. परिणामी संपूर्ण सत्र अधिक जिवंत, संवादात्मक आणि आनंददायी झाले. शाळेतील कोमल मॅडम आणि राजकुवर मॅडम यांचं यावेळी विशेष सहकार्य लाभलं.

दुसऱ्या सत्रासाठी आम्ही पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरे खुर्द येथे पोहोचलो. या शाळेत पाच अपंग विद्यार्थी शिकत होते. त्यामुळे गोष्टी सांगताना त्यांच्या अनुभवांशी संबंधित अनेक पैलू उलगडता आले. एका अपंग विद्यार्थिनीच्या पालकांशीही संवाद साधण्याची संधी मिळाली.

दिवसाखेरीस या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत झालेला संवाद विशेष लक्षात राहिला. समावेशन, सुलभता आणि अपंगत्व याबद्दल बोलताना आम्ही विद्यार्थ्यांना विचारलं, “मला एखाद्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर जायचं असेल आणि तिथे लिफ्ट नसेल, तर मी वर कशी जाईन?” यावर एका दुसरीच्या विद्यार्थ्याने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं, “लिफ्ट नसेल तर वरपर्यंत रॅम्प करू शकतो ना!”

त्याचबरोबर जिजाऊ ज्ञानमंदिरमधील एका मुलीने गोष्टीतील ‘डिप-डिप’ या पात्राचा संदर्भ घेत विचारलं, “डिप-डिप व्हीलचेअर चालवत असताना मध्ये पायरी आली तर ती काय करेल?” तर पिंपरे खुर्दमधील एका विद्यार्थिनीने गोष्टीतील अंध मुलाबद्दल कुतूहलाने विचारलं, “हा मुलगा अंध आहे, मग तो एकटा बाहेर कसा जाईल?”

या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांची उत्सुकता, निरीक्षणशक्ती आणि समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट दिसत होता. अनेकदा आम्ही त्यांना काही सांगण्यापेक्षा त्यांनीच आम्हाला विचार करायला लावणारे प्रश्न विचारले. त्यामुळे सत्र अधिक संवादात्मक झाले आणि चर्चेची दिशा विद्यार्थ्यांनीच ठरवली. पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला वाटणारी भीती आणि ताण या संवादांमुळे बऱ्याच प्रमाणात कमी झाला.


दिवस दुसरा : बारामती

यात्रेच्या तयारीदरम्यान एका कार्यक्रमात माझी मनीष सरांशी भेट झाली होती. ते बारामतीतील आर्किटेक्चर कॉलेजमध्ये अध्यापन करतात हे कळल्यावर मी त्यांना विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची कल्पना मांडली. युनिव्हर्सल डिझाईन आणि बॅरियर-फ्री वातावरण हा आर्किटेक्चरच्या शिक्षणातील महत्त्वाचा भाग असल्याने अशा विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आवश्यक वाटत होते. मनीष सरांनी तात्काळ सहमती दर्शवली आणि ९ सप्टेंबर रोजी सकाळचे पहिले सत्र विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे झाले. या सत्रात युनिव्हर्सल डिझाईनची संकल्पना, सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे डिझाईन, तसेच आर्किटेक्ट म्हणून समाजातील अडथळे कमी करण्यासाठी काय करता येऊ शकते यावर चर्चा झाली. यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

सत्र संपल्यानंतर एका ज्येष्ठ आर्किटेक्टनी त्यांचा अनुभव सांगितला. काही वर्षांपूर्वी त्यांनी एका अपंग जोडप्यासाठी घर डिझाईन केले होते. त्यांना वाटत होते की ते डिझाईन पूर्णपणे युनिव्हर्सल डिझाईनच्या तत्त्वांवर आधारित आहे. मात्र सत्रातील चर्चा आणि उदाहरणे ऐकल्यानंतर ते म्हणाले, “आत्तापर्यंत मला वाटत होतं की मी खूप चांगलं काम केलं आहे. पण आजचं सत्र ऐकल्यावर मला जाणवतंय की मी जे केलं ते कदाचित फक्त दहा टक्केच होतं. त्या घरात अजून अनेक सुधारणा करता आल्या असत्या आणि अजूनही करता येऊ शकतात. मी ज्याला परिपूर्ण समजत होतो, त्यात अजून बरंच काही करता आलं असतं.”

त्यांच्या या प्रामाणिक प्रतिक्रियेमुळे सत्राचा परिणाम किती खोलवर झाला होता, याची जाणीव झाली. सत्रानंतर मला स्वतःलाही वाटलं की हे माझ्या आयुष्यातील सर्वात समाधानकारक सत्रांपैकी एक होतं. कॉलेजच्या प्राचार्या राजश्री मॅडम, मनीष सर आणि रेवती मॅडम यांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झालं.

यानंतर आम्ही शारदानगरला पोहोचलो. येथे सातवी ते दहावीच्या तब्बल १४०० विद्यार्थ्यांसोबत संवाद झाला. एवढ्या मोठ्या समूहासमोर विद्यार्थ्यांच्या भाषेत आणि त्यांच्या अनुभवांशी जोडून बोलणं हे पुन्हा एकदा मोठं आव्हान होतं. संवाद अधिक जिवंत व्हावा म्हणून विद्यार्थ्यांनाच स्टेजवर बोलावून विविध प्रकारचे ‘ॲक्सेसिबिलिटी बॅरियर्स’ दाखवण्यात आले. नियोजित ४५ मिनिटांचा कार्यक्रम जवळपास दोन तास चालला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारले आणि चर्चेत सहभाग घेतला.

त्याच दिवशी शारदा कृषी वाहिनीच्या रेडिओवर ‘इंद्रधनुष्य’ या कार्यक्रमासाठीही मुलाखत प्रसारित झाली. दिवसाचा शेवट शारदानगरच्या मुलींच्या वसतिगृहात ८०० विद्यार्थिनींसोबत झालेल्या संवादाने झाला. आज दिवसभर इतकं काही घडलं की दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला हेही कळलं नाही...


दिवस तिसरा : फलटण

१० सप्टेंबरची सुरुवात एका छोट्याशा अडचणीने झाली. सकाळी बारामतीच्या गेस्ट हाऊसबाहेर आलो आणि लक्षात आलं की गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. स्टाफच्या मदतीने अमोलने स्टेपनी बसवली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. फलटणमधील नियोजित कार्यक्रम आधीच रद्द झाला होता. काही महाविद्यालयांशी संपर्क सुरू होता, पण परवानगी मिळण्यासाठी वेळ लागणार होता. त्यामुळे हा दिवस मोकळा राहण्याची शक्यता होती.

अशातच आमच्या पिया ताईंचा फोन आला. फलटणजवळील तडवळे गावातील जिल्हा परिषद शाळेत जाण्याचं त्यांनी सुचवलं. तिथे ताईंची नणंद शिक्षिका आहेत. आमच्याकडे वेळ होता आणि उत्सुकताही, त्यामुळे आम्ही लगेच होकार दिला.

तडवळेच्या शाळेत इयत्ता तिसरी ते सातवीचे विद्यार्थी आमची वाट पाहत होते. तुलिकाच्या ‘तंबीसोबत फेरफटका’ या गोष्टीच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. मागील दोन दिवसांत बऱ्यापैकी सराव झाल्यामुळे आता गोष्ट सांगताना मला अधिक आत्मविश्वास वाटत होता. विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद उत्स्फूर्त होता आणि त्यामुळे सत्र अधिक रंगत गेलं.

सत्रानंतर शिक्षकांशी गप्पा मारताना शाळेतील एका अपंग विद्यार्थिनीबद्दल माहिती मिळाली. शाळेत प्रवेश घेऊनही विविध अडथळ्यांमुळे ती नियमितपणे शाळेत येऊ शकत नव्हती. तिच्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी आम्ही तिच्या घरी गेलो. तिची भेट घेतल्यानंतर आणि कुटुंबीयांशी संवाद साधल्यानंतर लक्षात आलं की तिच्या अपंगत्वाचं योग्य निदानच झालेलं नव्हतं. अपंगत्वाचं अचूक निदान वेळेत झाल्यास आवश्यक हस्तक्षेप करणे अधिक सोपे होते आणि त्याचा व्यक्तीच्या विकासावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. तिच्या कुटुंबाशी काही वेळ संवाद साधून त्यांची परिस्थिती समजून घेतल्यानंतर आम्ही पुन्हा शाळेत परतलो.

यानंतर शिक्षकांसोबत लर्निंग डिसॅबिलिटी आणि शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विशेषतः शिक्षण व्यवस्थेतील काही धोरणांचा लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासावर कसा परिणाम होतो, याविषयी सविस्तर संवाद झाला. शिक्षकांनी त्यांच्या अनुभवांमधून अनेक उदाहरणे मांडली आणि या विषयाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज अधोरेखित केली.

यानंतर आम्ही पुन्हा फलटणला परतलो. तिथे लेखक दिलीप निंबाळकर सर, उर्मिला काकू आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट झाली. पुढे साताऱ्याला जायचं असल्यामुळे काही मिनिटांसाठीच थांबायचं ठरवलं होतं; पण गप्पा इतक्या रंगल्या की वेळ कसा गेला ते कळलंच नाही. पुढे ग्रामसेवक हिम्मतराव गायकवाड यांच्याशीही संवाद साधण्याची संधी मिळाली. या भेटींमधून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, एखाद्या व्यक्तीकडे अधिकार असणं महत्त्वाचं असतंच, पण त्या अधिकारांचा वापर बदल घडवण्यासाठी करण्याची इच्छाशक्ती त्याहून अधिक महत्त्वाची असते.

आता निघायला बराच उशीर झाला होता. त्यामुळे साताऱ्याकडे निघण्याऐवजी त्या रात्रीचा मुक्काम अमोलच्या मित्राकडेच फलटणला करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या दिवसाची दिशा ठरली होती; आता सकाळी लवकर साताऱ्याच्या दिशेने निघायचं होतं.

क्रमश:

  • दीक्षा : diksha.d.30@gmail.com