इन्क्लुजन यात्रा : एका प्रवासाची नोंद- भाग ३
इन्क्लुजन यात्रेचा पहिला आठवडा आता पूर्ण होत आला होता. प्रत्येक दिवसासोबत नवी माणसं भेटत होती, नवे अनुभव मिळत होते आणि समावेशनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक होत होती. या टप्प्यातील प्रवासाने केवळ समाजातील अडथळेच दाखवले नाहीत, तर वैयक्तिक पातळीवरही अनेक प्रश्नांशी सामना करायला लावला. लेखाच्या या भागात कागल आणि कोल्हापूरमधील अनुभव, अपंग स्त्रियांच्या आरोग्याविषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न, विद्यार्थ्यांशी झालेले संवाद आणि प्रवासात भेटलेल्या प्रेरणादायी व्यक्तींची नोंद दिक्षा दिंडे त्यांच्या शब्दात करत आहेत.
दिवस सातवा आणि आठवा : कागल, १४ व १५ सप्टेंबर २०२५
रविवार हा आमचा ठरलेला सुट्टीचा दिवस. या दिवशी स्ट्रिक्टली आरामच करायचा, असं आधीच ठरलं होतं. थोडी कोल्हापूरमधली कामं होती. त्याचबरोबर स्वप्निल, सुमेध आणि आम्ही दोघांनी मिळून कोल्हापूर फिरायचं ठरवलं. त्यामुळे निवांत सगळं आटोपल्यावर आम्ही आधी न्यू पॅलेस पाहायला गेलो. त्यानंतर कोल्हापूरची खाऊ गल्ली फिरून घरी परतायचं ठरलं.
पण माझ्या शरीराचा मात्र वेगळाच प्लॅन होता.
"आता माझी पाळी!" असं म्हणत मासिक पाळी सुरू झाली आणि त्यासोबत पोटदुखीचाही त्रास. त्यामुळे उरलेलं सगळं बाजूला ठेवून घरी जाऊन आराम करणं हाच पर्याय होता. माझ्या शरीराची हालचाल फार मर्यादित असल्यामुळे आणि पीसीओएसचा त्रास असल्यामुळे पाळी नेमकी कधी येईल, याचा काहीच अंदाज नसतो. यावेळीही ती अचानकच आली. त्यात सर्वात मोठं आव्हान ठरलं ते स्वच्छ आणि सुलभ स्वच्छतागृह शोधण्याचं. आम्ही सगळे मिळून योग्य स्वच्छतागृह शोधत होतो आणि त्यातच बराच वेळ गेला.
या प्रसंगाने पुन्हा एकदा जाणवलं की अपंग स्त्रिया आणि मुलींसाठी मासिक पाळी हा केवळ आरोग्याचा विषय नाही; तो सुलभता, स्वातंत्र्य, गोपनीयता आणि सन्मान यांच्याशीही तितकाच निगडित आहे.
माझ्यासोबत कुटुंबीय, मित्र आणि सहप्रवासी असल्यामुळे हा प्रसंग तुलनेने सुसह्य झाला. पण ज्यांच्यासोबत अशी आधारव्यवस्था नसते, त्यांचं काय? अपंगत्व नसलेल्या महिलांपेक्षा अपंगत्व असलेल्या महिलांना मासिक पाळीच्या काळात अनेक पातळ्यांवर अतिरिक्त अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक अपंगत्वामुळे स्वच्छतागृहापर्यंत पोहोचणं, पॅड बदलणं किंवा वैयक्तिक स्वच्छता राखणं कठीण जाऊ शकतं. बौद्धिक अक्षमतेमुळे मासिक पाळी समजून घेणं आणि तिचं व्यवस्थापन करणंही अनेक मुलींसाठी आव्हानात्मक ठरतं. दुर्दैवाने, अजूनही काही ठिकाणी बौद्धिक अक्षम मुलींच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या हिताचा पुरेसा विचार न करता गर्भाशय काढण्याच्या घटना समोर येतात. अशा घटना केवळ आरोग्य व्यवस्थेवरच नव्हे, तर आपल्या समाजाच्या दृष्टिकोनावरही गंभीर प्रश्न निर्माण करतात.
समाजात या विषयावर अजूनही उघडपणे चर्चा होताना फारशी दिसत नाही. महिला, त्यातही अपंग महिलांच्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या (sexual and reproductive health) गरजांकडे तर दूरदूरपर्यंत कोणी लक्ष देताना दिसत नाही. ग्रामीण आणि शहरी भागात स्वतंत्र, सुरक्षित आणि सुलभ स्वच्छतागृहांची, रॅम्पची आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे अनेक अपंग मुलींना मासिक पाळीच्या काळात शाळा चुकवावी लागते. आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्या सामाजिक व शैक्षणिक प्रवाहापासून आणखी दूर जातात. त्यामुळे अपंग स्त्रियांसाठी मासिक पाळी ही केवळ जैविक प्रक्रिया नसून आरोग्य, सुलभता, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याच्या हक्काशी जोडलेला महत्त्वाचा विषय आहे.
हा त्रास होत असतानाही दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजताचं सत्र रद्द करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही दूधगंगा शाळेत पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या शाळेची खास गोष्ट म्हणजे मुलांना "अपंगत्व म्हणजे काय?" हे फारसं समजावून सांगावंच लागलं नाही. शाळेच्या कॅम्पसमध्येच बौद्धिक अक्षम मुलांची शाळा असल्यामुळे इनक्लुजन त्यांच्यासाठी शिकायची गोष्ट नव्हती; ती त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग होती.
तिथल्या मुख्याध्यापकांनी आम्हाला साबीर नावाच्या मुलाबद्दल सांगितलं. सत्र संपल्यानंतर आम्ही त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलो. साबीरला बहुविकलांगता आहे. तो उत्तम चित्रं काढतो, युट्युबवर व्हिडिओ बनवतो आणि एकदम गोड मुलगा आहे. पण त्याहूनही जास्त प्रभावित केलं ते त्याच्या आईने. त्या उद्योजिका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत आणि साबीरला स्वतः घरी शिकवतात.
त्यांना एक गोष्ट अगदी पक्की माहीत आहे, इतर मुलांप्रमाणेच साबीरलाही त्याचे मूलभूत हक्क आहेत. आणि हेच भान इतर पालकांपर्यंत पोहोचावं म्हणून त्या सातत्याने अपंग मुलांच्या पालकांशी संवाद साधत असतात. "आपण मुलांना घराबाहेरच काढलं नाही, तर ती समाजाचा कधीच भाग होणार नाहीत," असं त्या वारंवार सांगतात.
साबीरसोबतही खूप गप्पा मारल्या. त्यानंतर नाश्ता करायला गेलो. तिथे यात्रेचं लेखन नियमितपणे वाचणारे आणि आमची यात्रा फॉलो करणारे काही वाचक भेटले. अशी अनपेक्षित भेट झाली की खूप छान वाटतं. आपण करत असलेलं काम लोकांपर्यंत पोहोचत आहे, याची ती एक जाणीव होती.
घरी परतून थोडा आराम केल्यानंतर, ठरल्याप्रमाणे संध्याकाळी कोल्हापूरमधील उमेद फाउंडेशनमध्ये मुलांशी संवाद साधत दिवसाची सांगता झाली.
दिवस नववा : कोल्हापूर, १६ सप्टेंबर २०२५
आज सकाळी रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेलो. कोल्हापूरमधला हा आमचा शेवटचा दिवस असल्यामुळे मनात एक वेगळीच उत्सुकता होती. मागचे काही दिवस सतत शाळा, महाविद्यालयं, संस्था आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी संवाद साधण्यात गेले होते. आजचा दिवसही तितकाच अनुभवांनी भरलेला असणार, याची जाणीव सकाळपासूनच होत होती.
यात्रेच्या चौथ्या दिवशी आमची गाडी वाठार स्टेशनजवळ बंद पडली होती. त्या वेळी मनीषा मॅडमनी त्यांची स्वतःची गाडी देऊन आम्हाला मोठी मदत केली. त्यामुळेच साताऱ्यातले पुढचे दोन दिवस आम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास पूर्ण करू शकलो. मॅडम नुकत्याच या कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या होत्या आणि त्यांच्यामुळेच या कॉलेजमध्ये येणं आम्हाला शक्य झालं.
कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया आणि इतर उपक्रम सुरू असल्यामुळे, "आज तुमच्या कार्यक्रमाला फक्त वीसच विद्यार्थी असतील," असं मॅडमनी थोड्या खेदाने सांगितलं. पण खरं सांगायचं तर ही संख्या ऐकून मला आनंदच झाला. विद्यार्थी संख्या जास्त असते तेव्हा आपण नक्कीच अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो; पण संवादात्मक उपक्रम घेणं थोडं अवघड होतं आणि विद्यार्थ्यांचा attention span देखील कमी असतो. उलट कमी विद्यार्थी असतील, तर संवाद अधिक मोकळेपणाने आणि सखोलपणे करता येतो.
अपंगत्व म्हणजे काय आणि ते आपल्या आयुष्यात कोणकोणत्या कारणांमुळे येऊ शकतं, याविषयी चर्चा करत असतानाच आजच्या सत्रात आम्ही आणखी एक महत्त्वाचा विषय हाताळला—आपल्या आजूबाजूला वाढणारा हिंसाचार आणि त्यातून निर्माण होणारं अपंगत्व. अपंगत्व हे केवळ जन्मतः किंवा अपघातामुळेच येत नाही, तर युद्ध, हिंसाचार, सामाजिक संघर्ष आणि मानवनिर्मित आपत्ती यांचाही त्यात मोठा वाटा असतो. विद्यार्थ्यांशी या विषयावर चर्चा करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे प्रश्न आणि विचार स्पष्ट दिसत होते.
जागतिक महायुद्धांची उदाहरणं, त्यातून झालेला नरसंहार आणि त्यानंतर उदयास आलेली अपंग हक्क चळवळ या संदर्भात काही ॲक्टिव्हिटीज घेत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. इतिहासात घडलेल्या घटनांचा आजच्या समाजाशी आणि आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे, यावर विद्यार्थ्यांनीही मनापासून सहभाग घेतला.
सत्राच्या शेवटी मिळालेला ईश्वर या विद्यार्थ्याचा फीडबॅक विशेष लक्षात राहिला.
ईश्वर या विद्यार्थ्याच्या हाताची उंची कमी आहे. त्यामुळे त्याला अनेकदा इतरांकडून चेष्टेला सामोरं जावं लागलं होतं. त्या अनुभवांमुळे त्याने स्वतःचं अपंगत्व कसं लपवता येईल, यावरच जास्त भर दिला होता. तो बोलायला उभा राहिला तेव्हा सुरुवातीला थोडा संकोचलेला वाटत होता. पण बोलायला सुरुवात केल्यावर त्याने मनातलं अगदी मोकळेपणाने व्यक्त केलं.
स्वत: बद्दल सांगत तो म्हणाला,
"तुम्ही आज आमच्या कॉलेजमध्ये आलात, त्यामुळे माझा दृष्टिकोन बदलला. मला वाटतं माझं भविष्य नक्की बदलेल. कारण तुम्ही फक्त माझ्याशीच बोललात असं नाही, तर माझ्या मित्र-मैत्रिणींनाही या चळवळीचे ally कसे होता येईल, हे सांगितलं. मला वाटतं, पुढे जाऊन हेच माझे सहकारी या चळवळीचे मोठे साथिदार असतील."
हा अभिप्राय ऐकून मन भरून आलं. अनेकदा आपण किती लोकांपर्यंत पोहोचलो यापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल घडला का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो. ईश्वरचं बोलणं ऐकताना त्या दिवसाचं उत्तर मला मिळाल्यासारखं वाटलं.
आपली एखादी छोटी कृती दुसऱ्याच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकते, हे विद्यार्थ्यांना सांगताना मी मनीषा मॅडमचंच उदाहरण दिलं. त्यांनी योग्य वेळी केलेल्या मदतीमुळेच साताऱ्यातील आमचं संपूर्ण नियोजन सुरळीत पार पडलं होतं. कृतज्ञतेची एक छोटीशी भावना म्हणून मी त्यांना नितीन थोरात दादांचं 'सूर्याची सावली' हे पुस्तक भेट दिलं.
त्यानंतर कॉलेजमध्ये भरपेट आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेतला.
सकाळच्या कार्यक्रमाला सरकारनामा येथे कार्यरत असलेले आमचे बंधू अस्लम दादाही आले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच एका खास व्यक्तीची अचानक भेट ठरली.
तिथून आम्ही न्यू पॅलेसमध्ये युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांची भेट घ्यायला गेलो.
राजेंना इन्क्लुजन यात्रेविषयी माहिती दिली आणि ऐतिहासिक वारसा स्थळांमधील अॅक्सेसिबिलिटीबाबत चर्चा केली. त्यावेळी त्यांनी न्यू पॅलेस संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर रॅम्प उभारण्याच्या नुकत्याच सूचना दिल्याचं सांगितलं. तसेच युवराज संभाजीराजे छत्रपती खासदार असताना कोल्हापूर परिसरातील गावांमध्ये PRA Tools वापरून झालेल्या कामांची माहितीही त्यांनी दिली. एकंदरीत ही भेट आमचं मनोबल वाढवणारी होती.
संध्याकाळी आम्ही अनेक वर्षांपासून भेट द्यायची इच्छा असलेल्या हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड या संस्थेत गेलो. ही भेट मैत्रीण कविता पाटीलमुळे शक्य झाली. फेसबुकवर अनेक वर्षं मैत्री असूनही आमच्या दोघींच्याही मोबिलिटीच्या अडचणींमुळे प्रत्यक्ष भेट कधी झाली नव्हती. या यात्रेमुळे ती शक्य झाली.
इथे आम्हाला हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड आणि समर्थ विद्यालयातील मुलांशी संवाद साधता आला. संस्थेतील समावेशक वातावरण, तसेच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेले सूक्ष्म पण महत्त्वाचे सुगम्यतेचे बदल जवळून पाहता आले. एखादी संस्था समावेशनाचा विचार प्रत्यक्ष कृतीत कसा उतरवू शकते, याचं हे एक उत्तम उदाहरण होतं. याच ठिकाणी वैशाली आणि प्रज्ञा या दोन नव्या मैत्रिणीही भेटल्या.
कवितेसोबत गप्पा मारताना आमची मैत्रीण सोनल पाटील हिची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. गेल्या वर्षी आम्ही तिला गमावलं. सोनलला फिरण्याची प्रचंड आवड होती. कुठेतरी ही यात्रा तिच्यासाठीच एक ट्रिब्यूट आहे, असं मला नेहमी वाटतं. सोनलसारख्या माझ्या असंख्य मित्र-मैत्रिणींना मुक्तपणे, कोणत्याही अडथळ्यांशिवाय फिरता यावं, यासाठीचा हा प्रवास आहे. प्रत्येक नव्या ठिकाणी पोहोचताना तिची आठवण नकळत सोबत असते आणि हा प्रवास का सुरू केला, याचं उत्तर पुन्हा एकदा मिळतं.
हेल्पर्समध्ये आणखी एक रंजक भेट झाली, ती म्हणजे अविनाश कुलकर्णी उर्फ अविनाश दादा.
काही आठवड्यांपूर्वी फेसबुकवर संगीता ताई त्यांच्या भावासाठी चांगल्या दर्जाच्या व्हीलचेअरच्या शोधात होत्या. त्या चर्चेतूनच मला अविनाश दादांचा संदर्भ मिळाला होता.
अविनाश दादा उत्तम छायाचित्रकार आहेत. कॉलेजमध्ये असताना झालेल्या अपघातामुळे ते अपंग झाले. त्यानंतर हेल्पर्समध्ये सामील होऊन आता ते तिथे स्किल डेव्हलपमेंट हेड म्हणून काम पाहतात. अपंगत्वामुळे माणसाची स्वप्नं बदलत नाहीत; बदलतो तो फक्त ती पूर्ण करण्याचा मार्ग. दादांकडून त्यांच्या व्हीलचेअर फोटोग्राफीवरील पुस्तक भेट म्हणून घेतलं आणि त्यांच्याकडून माझे काही सुंदर फोटोही काढून घेतले.
सकाळपासून सुरू झालेल्या या सगळ्या भेटी, गप्पा आणि अनुभव सोबत घेत आम्ही पुन्हा कागलला परतलो.
क्रमशः
- दिक्षा : diksha.d.30@gmail.com