जागृतीचा वसा घेतलेली प्रियांका
आपल्या समाजातील प्रत्येक स्त्री कधी ना कधीतरी लैंगिक अत्याचार, विनयभंग, छेडाछेडी, अश्लील टोमणे यांचा अनुभव घेतेच. आपल्यावर होत असलेल्या या अन्यायाविरूद्ध तिने कधी आवाज उठवू पाहिला, तर समाजात तिला डोळे मोठ्ठे करून गप्प केलं जातं. अनेकदा लैंगिक अत्याचार करणारे त्या मुलीचे नातेवाईकच असतात...कधी लाजेपोटी, कधी भीड बाळगून तर कधी मान-सन्मानाच्या फालतू कल्पना उराशी बाळगून मुलीचे आई-वडीलच तिला “विसरून जा, जाऊ देत होतं असं... आपण कोणा कोणाशी भांडत बसणार...” असं सांगून गप्प करतात. मुलीही गप्प बसतात आणि अख्खं आयुष्य त्या घडलेल्या कृत्याबद्दल स्वत: ला, स्वत:च्या नशिबाला दोष देत राहतात.
पण आपल्यावर झालेला अन्याय, ही आपली चूक नसून, विकृत विचार असणाऱ्या त्या माणसाची आहे. अशा माणसांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी किंवा किमान त्यांना ओळखून इतरांना सावध करण्यासाठी आपल्याला याबद्दल व्यक्त होणं, स्पष्ट बोलणं शिकावं लागेल आणि नुसतं शिकावं नाही, तर योग्य वयातच इतर मुलींना ते शिकवावं लागेल या विचाराने पेटून उठलेल्या मुंबईच्या प्रियांका कांबळे या मुलीने वयाच्या सतराव्या वर्षी समाजकार्यात उडी घेतली. स्वत:वर झालेल्या अत्याचारांमुळे स्वत:चं अस्तित्व विझू न देता, त्या मन झाकोळून टाकणाऱ्या आठवणींच्या राखेतूनच फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी तिचं काम तिने उभं केलं. लैंगिक शिक्षण, मासिक पाळी, संतती नियमन आणि सर्वांगीण शिक्षण या विषयात तिने काम सुरू केलं.
मूळची लातूरची असलेल्या प्रियांकाचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झालं. घरची परिस्थिती हलाखीचीच होती. अकरावीमध्ये शिकत असताना तिने एन.एस.एस जॉईन केलं आणि तिथूनच समाजकार्याची आवड तिला लागली. समाजासाठी आपणही काहीतरी ठोस काम करावं, या विचाराने साठे महाविद्यालयात बी.ए. करत असतानाच तिने ’पुकार’ या स्त्रियांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत नोकरी करायला सुरुवात केली. पुकारच्या माध्यमातून विविध शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे वर्ग, मासिक पाळीबद्दल माहिती देणे, त्या संदर्भातील असणारे समज-गैरसमज दूर करणे अशी कामे ती करू लागली. याच काळात काम करत असताना पाचवी-सहावीच्या मुलींचे पालक “ये आप हमारे बच्चों को क्या गंदा पढा रहे हो” अशी तक्रार घेऊन शाळेत दाखल झाले होते. मासिक पाळीसारख्या अत्यंत नैसर्गिक गोष्टींबद्दल बोलणे म्हणजे काहीतरी असभ्य, अश्लील आहे, असा विचार पालकांच्या मनात होता. तेव्हा त्यांची मनस्थिती समजून घेऊन तिने एक गप्पासत्र घेऊन त्यांना समजवलं की, या वयात मुलींना या गोष्टी माहिती असणं का गरजेचे आहे. स्पर्शाच्या निगडित कार्यशाळा घेताना, अनेकदा मुली निनावी चिठ्ठ्यांमधून त्यांच्यावर होत असणाऱ्या अत्याचाराची कबुली द्यायच्या. कित्येकदा हे अत्याचार करणारे त्यांच्या अती परिचयातले काका, मामा, दादा असायचे. मग, याच्यावर तोड कशी काढायची यासाठी काही पर्याय प्रियांका आपल्या लेक्चरमधून सुचवायची.
कॉलेज शिक्षण संपता संपता ’हेल्पिंग हॅंड्स’ या समाजसेवी संस्थेमध्ये ती सेक्रेटरी म्हणून रुजू झाली. इतर संस्थासारखी इथे एकमेकांतच चढाओढ नाही, कामाविषयी, लोकांविषयी इथल्या प्रत्येक माणसाला आस्था आहे, हे बघून संस्थेच्या कामात तिने स्वत:ला झोकून दिलं.
मासिक पाळी या विषयाला केंद्र बनवून आपण काम करायचं, असं तिने ठरवलं आणि ठाणे जिल्हातील अटगाव या गावाजवळील गरेलपाडा या गावात तिने काम करण्यास सुरुवात केली. तिथली वस्ती कशी आहे, लोक कसे आहेत हे समजून घेण्यासाठी, लोकांशी बोलायला सुरुवात केली. मग, सुरुवातीला बायकांसाठी मासिक पाळीविषयी जागृती निर्माण करणारी काही सत्रं तिने घेतली. आपल्या तिथल्या अनुभवाबद्दल ती सांगते, ‘तिथल्या बायका मासिक पाळीच्या दरम्यान केळ्याप्रमाणे दिसणाऱ्या एका झाडाच्या सालीत माती ठेऊन ते वापरतात. जेव्हा मी त्यांना पॅडबद्दल सांगतिले ते कसे लावायचे हे शिकवले, तेव्हा त्या अंडरपॅंटच घालत नाहीत, हे त्यांनी मला सांगितले. मुंबईसारख्या प्रगत शहरापासून काही किलोमीटर अंतरावरच राहणारी ही माणसं आणि तरीही इतकं अज्ञान बघून मी थक्क झाले होते.’
कधी समजावून, कधी शिकवून, कधीही थोडसं रागवूनही तिने गावातील महिलांना पॅड वापरायला तयार केले. मग लक्षात आलं की, पॅडची किंमत इतकी जास्त आहे की, त्यामुळे कित्येक महिलांचं महिन्याचं खर्चाचं गणित बिघडत होतं. कोरोनाच्या काळात कित्येक महिलांनी खर्च परवडत नाही म्हणून पॅड वापरणं सोडून दिलं. मग, या सगळ्या महिलांना दर महिन्याला पॅड पुरवण्याची जबाबदारी तिने स्वत:च्या खांद्यावर घेतली. आणि आज केवळ गरेलपाडाच नव्हे तर जवळपासच्या खरली, मुसईसारख्या तीन-चार गावातील महिलांना ती पॅड पुरवते आहे.
गावातील महिलांशी बोलताना तिच्या लक्षात आलं की, इकडे मूल होऊ न देण्यासाठी शस्त्रक्रिया करणं अनैसर्गिक मानलं जातं आणि त्यामुळे त्या गावातील एका मुलीला दहा वर्षात १३ मुलं झाली. “तेरा?” असा प्रश्न विचारताच ती म्हणाली, “नाही, हिशोब चुकत नाहीये, कधी जुळी तर कधी तिळी मुलं आणि यातली केवळ तीन मुलं जगली आहेत. त्या मुलीचा नवरा ऑपरेशनसाठी तयार होत नव्हता, म्हणून आम्ही डमी पोलीस आणून त्याला घाबरवलं आणि तिचं ऑपरेशन करून आणलं. नाहीतर, मुलं जन्माला घालता घालता तिचा जीव गेला असता’.
हेल्पिंग हॅंड्स’ ही संस्था गावात गेली ३-४ वर्ष काम करत आहे, तेव्हा लोकांच्या मानसिकतेमध्ये काही फरक पडला का याचं उत्तर देताना ती म्हणाली की, आधी मी एका बंद खोलीत बायकांचे सत्र घ्यायचे किंवा पॅड वाटायचे. मग एक दिवशी मी, गावातील चौकात असलेल्या चौथऱ्यावर बसून सर्वांसमोर कोणत्याही काळ्या पिशवीत न गुंडाळता पॅड वाटायला बसले आणि विशेष म्हणजे बायका ते घ्यायला आल्या. आणि त्यानंतर, सरळ चौकातच मासिक पाळी आणि संतती नियमनाविषयी भाषण केलं. पुरुष, मुलंमुली, म्हातारी माणसं, बायका सगळे ऐकत होते. सत्र झाल्यावर एक ८० वर्षांचे आजोबा माझ्या जवळ येऊन म्हणाले, ’बाळ, तू खूप छान बोललीस. आज मुलांना हे कळायला हवं तर उद्या ते आपल्या पोरी-बाळींना समजून घेऊ शकतील’.’
एक ८० वर्षांचे आजोबांनादेखील या विषयांवर बोलण्याचं महत्त्व कळतं, तेव्हा कुठेतरी जाणवत की हा बदल किती मुळापासून होतो आहे.
या कामाव्यतिरिक्त २०१८ पासून शाहपूरमधील कोठेकर आश्रमशाळेत प्रियांका आणि तिचे काही मित्र-मैत्रिणी नववी-दहावीच्या मुलांना शिकवायला जायचे. त्यांच्या प्रयत्नाने पहिल्या वर्षी शाळेच्या एका मुलाला ७०% टक्के मिळाले. आपण शिकवतोय त्याचा काहीतरी फायदा होतो आहे, हे बघून प्रियांकाच्या टिमला हुरूप आला. पण दुसऱ्या वर्षी मुलं शाळेतच यायला तयार होत नव्हती, कारण विचारलं तर ज्याला ७०% मिळाले होते तो मुलगा पुन्हा ऊसतोडीचेच काम करत होता. मग शिकूनही हेच करायच असेल तर शिकायचं कशाला? या मुलांच्या प्रश्नाला त्या वेळी प्रियांकाला उत्तर देता आलं नाही; पण यावर तोडगा काढायचा हा विचाराने ती प्रयत्नाला लागली. काही दिवसाने तिने शाळेत जाहीर केले की, ज्यांना ७०% वर मार्क मिळतील त्यांना नोकरी मिळेपर्यंतचा शिक्षणाचा खर्च संस्था करेल. तेव्हा तिच्या टीमला वाटलं होतं की, २-३ मुलं मिळवतील सत्तर टक्के आणि त्यांचा खर्च करू आपण, पण मुलांनी जिद्दीने अभ्यास केला आणि ७-८ मुलांना सत्तरच्या वर टक्के मिळाले. मग, या सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आणि ’दीपस्तंभ’ या प्रकल्पाची सुरुवात केली.
आता यातली काही मुलं डिप्लोमाचे शिक्षण घेत आहेत, काही मुलं इंजिनीअरींगचे तर काही मुली नर्सिंगचा कोर्स पूर्ण करून पुढील शिक्षण घेत आहेत.
दहाहून अधिक वर्ष प्रियांकाने स्त्रियांच्या विषयात केलेलं काम बघून तिला ’इंडियन ह्यूमन राईट्स कमिशन’कडून नॅशनल ह्यूमन राईट्स कमिशन फाऊंडेशनचा ’इंटरनॅशनल आयकॉन’ हा पुरस्कार मिळाला. वर्ल्ड ह्यूमन राईट्स प्रोटेक्शन फाऊंडेशनने तिचे काम बघून तिला ’सोशल वर्क इन मेन्स्ट्रुअल सायकल’ या विषयात ऑनररी पी.एचडी दिली. आणि या संस्थेचे राष्ट्रीय सदस्यत्व तिला बहाल केले.
इतकी वर्षं ह्यात मनापासून काम केल्यावर तिच्या सध्याच्या समाजव्यवस्थेकडून दोन अत्यंत साध्या अपेक्षा आहेत. त्यातली एक सरकारी पातळीवर आहे. ती म्हणजे, सॅनेटरी नॅपकीनसारख्या स्त्रियांसाठी जीवनावश्यक असलेल्या वस्तूवर जीएसटी आकारला जाऊ नये. उलट, कमीत कमी किमतीत ते जास्त महिलांपर्यंत कसे पोहचवता येईल याचा विचार केला जावा. आणि दुसरी समाजाकडून आहे. ती म्हणजे- इतर अनेक क्षेत्रात प्रगतीपथावर असणाऱ्या आपल्या समाजाने मासिक पाळीच्या अंधश्रद्धांमधून स्त्रियांना मुक्त करावं. प्रियांका आत्ता केवळ २५ वर्षांची आहे येत्या काही काळात तिला तिचे हे काम अधिकाधिक गाव-पाड्यांपर्यंत पोचवायचे आहे. आजवर मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या विषयाला बंद दाराआड कोंडून ठेवलं गेलं, पण या विषयावर मुक्तपणे बोलणारा, विचारविनिमय करणारा समाज मला घडवायचा आहे, असं ती आत्मविश्वासाने सांगते.
शब्दांकन : मेघना अभ्यंकर
meghanaabhyankar2698@gmail.com
प्रियांका कांबळेची मुलाखत 'स्वच्छंदी' या यूट्यूब चॅनलवर बघता येईल.