काळोखातील अग्निशिखा : कादंबिनी,रखमाबाई आणि हैमबती
जवळ जवळ दीड शतकापूर्वीच काळ. अनिष्ट रुढी परंपरांमध्ये जखडलेला आणि अंधारात चाचपडणारा समाज. स्त्रियांची स्थिती तर आणखीनच हलाखीची.शिक्षण नाही, घरातील कर्त्या पुरुषाच्या मर्जीवर चालणारं कठपुतळीसारखं जीवन. ज्ञानप्रकाशच काय नैसर्गिक सूर्यप्रकाश देखील काही जणींना अप्राप्य! या पार्श्वभूमीवर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. विद्येच्या प्रांगणात मुलींचे पहिले पाऊल पडले आणि आपल्या अस्तित्वाची त्यांना जाणीव होऊ लागली. अल्पावधीतच त्यांना उच्च शिक्षणाचे स्वप्न खुणावू लागले आणि सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी उंच भरारी घेतली. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक विदुषी आज प्रत्येक क्षेत्रात दिसतात. पण वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून खऱ्या अर्थाने ज्यांनी इतिहास घडवला त्या विदुषी म्हणजे डॉ. कादंबिनी गांगुली, डॉ. रखमाबाई राऊत आणि डॉ. हेमवती सेन. बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांचा सामना त्यांना करावा लागला. प्रखर संघर्ष करून आपले ध्येय तर त्यांनी पूर्ण केलेच, पण समाजाला नवी दिशा देण्याचे कामसुद्धा केले. विज्ञान शाखेमध्ये येऊ पाहणाऱ्या मुलींसाठी त्यांनी भक्कम पाया रचला. त्यांचा संघर्ष आणि यशाचा वेध घेण्यासाठी हा लेख प्रपंच !
डॉ. कादंबिनी गांगुली
पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून डॉ.आनंदीबाई जोशी ज्ञात आहेत. १८८६ मध्ये त्यांनी पेनसिल्व्हेनियामधून वैद्यकीय पदवी घेतली. पण दुर्दैवाने त्यांचे लवकर निधन झाल्याने त्यांना वैद्यकीय सेवा करता आली नाही. डॉ. एनी जगन्नाथन यांनी वैद्यकीय शास्त्रातील एक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि पुढील शिक्षणासाठी त्या इंग्लंडला रवाना झाल्या. तिथून परत आल्यानंतर १८९२ मध्ये मुंबई येथील कामा हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम सुरू केले. पण दुर्दैवाने त्यांचेही लवकरच निधन झाले. खरं तर आनंदीबाई, कादंबिनी आणि एनी जगन्नाथन समकालीन. १८८६ मध्ये कलकत्ता ऐथून कादंबिनी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि पुढे आयुष्यभर वैद्यकीय सेवा केली. वैद्यकीय शिक्षण घेऊन सेवा देणाऱ्या त्या केवळ भारतातीलच नव्हे, तर दक्षिण आशियातील पहिली महिला ठरल्या.
कादंबिनी यांचा जन्म १८ जुलै, १८६१ रोजी बिहार येथील भागलपूर येथे झाला. त्यांचे वडील ब्रजकिशोर बोस भागलपूर शाळेचे मुख्याध्यापक होते. तसेच ते ब्राह्मो समाजाचे सभासद होते. त्यांनी आणि त्यांचे सहकारी अभयचरण मलिक यांनी स्त्रीमुक्ती चळवळ सुरू केली आणि १८६३ मध्ये ‘भागलपूर महिला समिती’ स्थापन केली. कादंबिनी यांचे शालेय शिक्षण ‘बंग महिला विद्यालय’ येथे झाले. ‘बंग महिला विद्यालय’ची संकल्पना द्वारकानाथ गांगुली यांची. पुढे हे विद्यालय बेथून विद्यालयामध्ये सामील झाले.
द्वारकानाथ गांगुली हे स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते. शाळेत असतानाच द्वारकानाथ हे कादंबिनी यांचे शिक्षक मार्गदर्शक होते. त्यावेळी विद्यापीठांमध्ये मुलींना प्रवेश दिला जात नसे. कलकत्ता विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी कादंबिनी पात्र ठरल्या, तेव्हा विद्यापीठाने त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली नाही. ही परवानगी मिळवण्यासाठी द्वारकानाथ यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आणि कादंबिनी ही प्रवेश परीक्षा पास होणाऱ्या आणि पर्यायाने १८८२ मध्ये कलकत्ता विद्यापीठातून पदवी घेणाऱ्या पहिली महिला ठरल्या. त्यांना पुढे वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण ‘कलकत्ता मेडिकल कॉलेज चे दरवाजे मुलींसाठी खुले नव्हते. आताही त्यांच्या प्रवेशासाठी द्वारकानाथ यांनी लढा दिला. १८८४ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी ही पहिलीच मुलगी. त्यावेळी सरकारने त्यांना दरमहा रु. २०/- इतकी शिष्यवृत्ती मंजूर केली. दरम्यान १८८३ मध्ये कादंबिनी आणि द्वारकानाथ गांगुली विवाहबद्ध झाले. द्वारकानाथ कादंबिनी यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे. ते विधुर होते, तसेच त्यांना पहिली तीन मुले होती. सहाजिकच ब्राह्मो समाजातील लोकांना हे लग्न मान्य नव्हते. कॉलेजमधील प्राध्यापक कादंबिनीच्या प्रवेशावर नाराज होते. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना मातृत्व प्राप्त झाले. मुलाच्या जन्मावेळी त्या फक्त १३ दिवस गैरहजर होत्या. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले. द्वारकानाथांनी कादंबिनी यांना उच्च शिक्षणासाठी केवळ उत्तेजनच दिले नाही तर सक्रिय पाठिंबा दिला. स्त्री शिक्षणाला विरोध असणाऱ्या एका प्राध्यापकांचा तर कादंबिनीच्या प्रवेशावर इतका रोष होता की त्यांनी कादंबिनी यांना एका विषयात अनुत्तीर्ण केले आणि त्यामुळे कादंबिनी यांना एमबी (बॅचलर ऑफ मेडिसीन) ही पदवी मिळू शकली नाही. पण त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने कॉलेजच्या प्राचार्यांनी आपल्या अधिकारात त्यांना जी.एम.सी.बी. (ग्रॅज्युएट ऑफ मेडिकल कॉलेज ऑफ बेंगॉल) ही पदवी प्रदान केली आणि कादंबिनी यांचा वैद्यकीय सेवा करण्याचा मार्ग सुकर झाला.
कादंबिनीच्या यशाने फ्लोरेन्स नाईटेन्गल यांचे लक्ष वेधून घेतले. कलकत्ता येथील ‘लेडी डफरीन विमेन्स हॉस्पिटल’ येथे दरमहा रु. ३००/- (आजचे ४५०००/-रु.) पगारावर त्यांची नेमणूक झाली. पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की, इतर ब्रिटिश महिला डॉक्टर त्यांना दुय्यमत्वाची वागणूक देतात, कारण त्यांच्याकडे एमबी ही औपचारिक पदवी नव्हती. तीन वर्षांनंतरही त्यांच्यावर कोणतीही विशेष जबाबदारी दिली गेली नाही. मग त्यांनी खाजगी व्यवसाय सुरु केला. पण त्यांना फारसे यश लाभले नाही. सधन कुटुंबातील मुलीचे बाळंतपण करायला त्यांना बोलावले जाई. पण तेथे त्यांना सन्मानाने न वागवता एखाद्या दाईप्रमाणे वागवले जाई. बाळंतपण झाल्यानंतर ती खोली स्वच्छ करण्यासारखी कामे त्यांच्याकडून करून घेतली जात. कर्मठ समाजाने त्यांना खूप त्रास दिला. 'बंगवासी' या वृत्तपत्रातून एका पत्रकाराने कादंबिनी यांचा अप्रत्यक्षपणे 'वारांगना' असा उल्लेख केला. ही बाब द्वारकानाथ यांना खूपच खटकली. कादंबिनी यांच्या समर्थनासाठी नव्हे तर एकूणच स्त्रियांची गळचेपी करणाऱ्या सनातनी शक्तींना वेळीच आवर घालण्यासाठी त्यांनी कोर्टात खटला दाखल केला आणि त्या पत्रकारास रु. १००/- दंड आणि सहा महिने कारावासाची शिक्षा झाली.
कादंबिनी यांनी मग उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचे ठरवले. आताही द्वारकानाथ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. द्वारकानाथांचे प्रयत्न आणि ब्राह्मो समाजाचा पाठिंबा यांच्या जोरावर त्या २६ फेब्रुवारी १८९३ रोजी इंग्लंडला रवाना झाल्या. त्या काळात त्यांच्या मुलांची जबाबदारी त्यांच्या मोठ्या बहिणीने घेतली. स्कॉटिश कॉलेज, एडिंबरामध्ये त्यांनी एकाच वेळी तीन पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आणि लवकरच त्यांनी हे तीनही अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यावेळी यशस्वी झालेल्या १४ विद्यार्थ्यांमध्ये त्या एकमेव महिला होत्या. त्यांनी स्त्रीरोग आणि बालरोगशास्त्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले.
इंग्लंडहून परत आल्यानंतर डफरीन विमेन्स हॉस्पिटलमध्ये वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्याचबरोबर त्यांनी खाजगी व्यवसायसुद्धा सुरु केला आणि त्या यशस्वी झाल्या. लवकरच त्यांनी हॉस्पिटलमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला. १८९५ -१८९६ या काळात त्यांनी नेपाळच्या राणीवर यशस्वी उपचार केले आणि त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. एका मुलीच्या पोटामध्ये गाठ असल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. ती मुलगी उपचारांसाठी कादंबिनी यांच्याकडे आली, तेंव्हा त्यांनी ती गर्भवती असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आणि तिचे यशस्वीरित्या बाळंतपण केले.
वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाल्यापासूनच वार्षिक अधिवेशनात द्वारकानाथांनी स्री शिक्षणाचा प्रश्न लावून धरला होता. त्यांच्या प्रयत्नांचे फळ म्हणून १८८९ च्या मुंबई येथे भरलेल्या अधिवेशनास कादंबिनी यांच्यासह सहा महिला हजर होत्या आणि अधिवेशनाच्या शेवटी कादंबिनी यांनी आभार प्रदर्शन केले. १८९० मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या अधिवेशनात कादंबिनी यांनी इंग्रजीमधून प्रभावी भाषण केले. १९०६ मध्ये त्यांनी कलकत्ता येथे 'महिला परिषदे' चे आयोजन केले. ट्रान्सवाल, दक्षिण आफ्रिका येथील सत्याग्रहींच्या समर्थनार्थ त्यांनी १९०८ मध्ये कलकत्ता येथे सभा बोलावली आणि तिचे अध्यक्षपद भूषवले. महात्मा गांधींना अटक झाल्यानंतर त्यांनी 'ट्रान्सवाल इंडियन असोसिएशन' चे अध्यक्षपद भूषवले आणि सत्याग्रहींच्या मदतीसाठी निधी गोळा केला. तसेच, १९१४ मध्ये महात्मा गांधींनी कलकत्त्याला भेट दिली, तेंव्हा त्यांच्या सन्मानार्थ 'साधारण ब्रह्मो समाजा' ने भरवलेल्या सभेच्या त्या अध्यक्ष होत्या.
द्वारकनाथांनी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुरांच्या शोषणाचा जोरदार निषेध केला, तेंव्हा कादंबिनी यांनी द्वारकानाथ यांना समर्थन दिले. ओरिसा आणि बिहार येथील कोळसा खाणीत काम करणाऱ्या महिला कामगारांची स्थिती अभ्यासण्यासाठी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीतर्फे कादंबिनी यांनी कवयित्री कामिनी रॉय यांच्याबरोबर प्रत्यक्ष तेथे भेट देऊन कामगारांचे प्रश्न जाणून घेतले.
द्वारकानाथ आणि कादंबिनी यांचे सहजीवन एकमेकांविषयीचे प्रेम, आदर, संवेदना यांनी परिपूर्ण होते. या दांपत्याला आठ मुले. त्यापैकी ज्योतिर्मयी या स्वातंत्र्य सेनानी तर प्रभात चंद्रा पत्रकार. कादंबिनी विणकामातही कुशल होत्या. राजकीय व सामाजिक कार्यात व्यस्त असतानाही त्यांनी वैद्यकीय सेवेकडे दुर्लक्ष्य केले नाही. अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. अगदी त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ३ ऑक्टोबर १९२३ या दिवशी त्या नेहमीप्रमाणे दवाखान्यात गेल्या. एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे केली. त्या घरी आल्या तेव्हा फारच थकल्या होत्या आणि थोड्या वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच्या जीवनकथेवर आधारित 'प्रोथोमा कादंबिनी' आणि 'कादंबिनी' या बंगाली मालिका स्टार जलसां आणि झी बांगला या वाहिन्यांवर प्रसारि झाल्या.
डॉ. रखमाबाई राऊत
'वैवाहिक हक्क प्रत्यास्थापना' या गाजलेल्या खटल्यामुळे चर्चेत आलेले आणि पाठोपाठ इंग्लंडच्या राणीलाच पत्र लिहून भारतीय मुलींची कैफियत मांडणारे आणि काळाच्या फारच पुढचा विचार करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. रखमाबाई राऊत. स्वतःची स्वतंत्र ओळख शोधू पाहणाऱ्या आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणींसाठी मार्ग दाखवणारा एक दीपस्तंभ!
रखमाबाईंचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी मुंबई येथे एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. जनार्दन पांडुरंग आणि जयंतीबाई या दांपत्याचे हे कन्यारत्न. रखमाबाई केवळ दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्या सुतार समाज्यातून आल्या होत्या. या समाजात विधवा पुनर्विवाहाला मान्यता होती. जयंतीबाईंनी पतीच्या निधनानंतर सहा वर्षांनी व्यवसायाने डॉक्टर असलेल्या आणि आधुनिक विचारसरणीच्या डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी पुनर्विवाह केला. रखमाबाईंचा विवाह त्या वेळच्या प्रथेप्रमाणे वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन यांच्या नात्यातील १९ वर्षे वयाच्या दादाजी भिकाजी ठाकूर या युवकाशी झाला. दादाजींना रखमाबाई यांच्या वडिलांनी पुढे शिक्षण घेण्याची अट घालून घरजावई करून घेतले. खरं तर हे त्या वेळच्या समाजाच्या संकेताविरुद्ध होते. पण दादाजींना शिक्षणात फारसा रस नव्हता. लग्नानंतर लवकरच रखमाबाई वयात आल्या आणि प्रथेप्रमाणे गर्भादानाचा विधी करण्याचा घाट घातला गेला. पण स्वतः डॉक्टर असलेल्या त्यांच्या वडिलांनी रखमाबाईंच्या वयाचा विचार करता सहाजिकच या विधीला विरोध केला. या घटनेमुळे दादाजी नाराज झाले. मुळातच शिक्षणाची आवड नसलेले दादाजी आता शिक्षणाकडे पुर्ण दुर्लक्ष करू लागले. दरम्यानच्या काळात त्यांच्या आईचे निधन झाले आणि ते त्यांचे मामा श्री. नारायण धर्माजी यांच्याकडे राहू लागले. त्यातच ते कर्जबाजारी झाले. रखमाबाईंच्या पहिल्या वडिलांनी त्यांच्या आईच्या नावे काही पैसे ठेवले होते, ते पैसे वयात आल्यावर रखमाबाईंच्या नावावर झाले होते. ते पैसे आपल्याला मिळावेत या हेतूने दादाजींनी रखमाबाई ही आपली पत्नी असल्याने तिने आपल्याबरोबर राहण्यास यावे असा आग्रह धरला.
मधल्या काळात रखमाबाईंचे घरीच शिक्षण चालू होते. चर्चच्या ग्रंथालयातील पुस्तके त्या वापरत असत. त्यांचे वडील सुधारकी विचारांचे असल्याने युरोपियन लोकांबरोबरच विष्णुशास्त्री पंडित यांच्यासारख्या स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्ते असलेल्या विचारवंतांचा सहवास त्यांना लाभला. प्रार्थना समाज आणि आर्य महिला समाजाच्या साप्ताहिक सभांना त्या आपल्या आईबरोबर नियमितपणे हजर राहात असत. अशा परिस्थितीत रखमाबाईंनी दादाजींबरोबर रहावयास स्पष्ट नकार दिला. त्यांच्या वडिलांचा अर्थातच त्यांच्या निर्णयाला पाठिंबा होता. यामुळे दादाजी संतप्त झाले आणि त्यांनी कोर्टात वैवाहिक हक्काचा दावा दाखल केला. हाच तो 'वैवाहिक हक्क प्रत्यास्थापना' खटला. हा खटला 'दादाजी विरुद्ध रखमाबाई १८८५' या नावाने प्रसिद्ध आहे. ही कायदेशीर लढाई रखमाबाई जिंकल्या. या खटल्याबाबत समाजातील विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘हा हिंदू परंपरांचा अवमान आहे’, अशी ‘मराठा’ या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी टीकेची झोड उठवली. याच काळात रखमाबाईंनी ‘हिंदू लेडी’ या टोपण नावाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मधून ‘बालविवाहाचे दुष्परिणाम’ या विषयावर एक लेखमाला प्रसिद्ध केली. ही लेखमालासुद्धा लोकांच्या टीकेचे लक्ष्य बनली होती. पुढे हा खटला फेरसुनावणीसाठी आला आणि न्यायाधीशांनी हिंदू कायद्याचा आधार घेत ‘रखमाबाईंना पतीबरोबर राहण्याचा आदेश दिला.’ हा आदेश मानला नाही तर सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण रखमाबाईंनी तो धुडकावून लावला. त्यांनी बाणेदारपणे ‘आदेश पाळण्यापेक्षा मी तुरुंगवास पत्करीन’ असे उत्तर दिले. लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून ‘हा इंग्रजी शिक्षणाचा परिणाम आहे आणि हिंदुत्व धोक्यात आले आहे’ असे प्रतिपादन केले. या कोर्टबाजीला कंटाळून रखमाबाईंनी थेट इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाला पत्र लिहून आपली कैफियत मांडली. या पत्रातील भाषा रखमाबाईंची विद्वत्ता दर्शवते. भारतीय मुलींची व्यथा नेमक्या शब्दात त्यांनी मांडली आहे. ते वर्ष राणीच्या राज्यारोहणाचे ५० वे वर्ष होते. त्यानिमित्त शुभेच्छा देत असतानाच अनिष्ट प्रथांमुळे भारतीय मुलींचे जीवन दुःखी - कष्टमय झाले आहे, त्यातून त्यांची सुटका करावी, अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात. त्यासाठी हिंदू कायद्यांमध्ये छोटा बदल करण्याची मागणी त्यांनी केली. ‘मुलाचे वय २० वर्षे आणि मुलीचे १५ वर्षे वय हे लग्नासाठी योग्य मानावे आणि यापेक्षा लहान वयात झालेले लग्न अवैध ठरवावे’ अशी विनंती त्या करतात. या पत्राची दखल घेऊन राणीसाहेबांनी कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला. जुलै १८८८ मध्ये भिकाजींनी दोन हजार रुपये देण्याच्या बोलीवर आपला हट्ट सोडून दिला आणि हे लग्न संपुष्टात आले. या खटल्याने फक्त भारतातच नाही, तर इंग्लंडमध्येसुद्धा वादंग माजवले. याच्या प्रभावाने १८९१ मध्ये संमतीवयाच्या कायद्यामध्ये बदल होऊन दहा वर्षे हे संमती वय वाढून बारा वर्षे झाले. म्हणूनच हा खटला क्रांतिकारक म्हटला जातो.
रखमाबाईंना डॉक्टर व्हायचे होते. कामा हॉस्पिटलच्या डॉ. एडिथ पिशे यांनी रखमाबाईंना शिक्षणासाठी केवळ प्रोत्साहनच दिले नाही, तर त्यासाठी निधीसुद्धा जमवला. श्री. शिवाजीराव होळकर यांनी पाचशे रुपये देणगी दिली. मताधिकार कार्यकर्त्याइ व्हा मॅकलरेन आणि वॉल्टर मॅकलरेन, एडलेड मॅनिंग यांनी 'रखमाबाई संरक्षण समिती' ची स्थापना करुन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी निधी उभा केला. १८८९ मध्ये रखमाबाई वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला रवाना झाल्या. १८९४ मध्ये त्यांनी ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन' (एम. डी.) ही पदवी 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' मधून घेतली. ही पदवी घेणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला. इंग्लंडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा त्यांच्याशी जवळून संबंध आला. पुढे भारतात परतल्यावर पत्राद्वारे त्यांनी संपर्क ठेवला. यामध्ये प्रसिद्ध तत्त्वज्ञ व गणितज्ञ बर्ट्रांड रसेल तसेच कवी लॉर्ड टेनिसन यांचाही समावेश होता. इंग्लंडहून परतल्यानंतर मुंबई येथील कामा हॉस्पिटलमध्ये शल्यचिकित्सक म्हणून काही दिवस काम केल्यानंतर त्या १८९५ ला सुरतेला रवाना झाल्या आणि 'मोरारभाई वज्रभूषणदास हॉस्पिटल' या महिलांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. तिथे त्यांनी १९१७ पर्यंत काम केले. सुरतमध्ये वैद्यकीय सेवेबरोबरच स्त्रियांमध्ये जनजागृतीचे कामसुद्धा त्यांनी केले. सुरतमधील हॉस्पिटल आजसुद्धा डॉ. रखमाबाईंचे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. पुढे त्या राजकोटला आल्या आणि तिथे जनाना ( महिलांच्या) हॉस्पिटल मध्ये त्यांनी निवृत्तीपर्यंत काम केले. १८९६ मध्ये पसरलेली प्लेगची साथ आणि १९१७ मध्ये आलेल्या फ्लूच्या साथीमध्ये त्यांनी अहोरात्र काम केले आणि रुग्णांची सेवा केली. त्यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन सरकारने त्यांना ‘केसर - ए - हिंद’ ही पदवी देऊन गौरवले. दुसऱ्या महायुद्धातील जखमींवर त्यांनी उपचार केले म्हणून रेड क्रॉसतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
निवृत्तीनंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. ‘पडदा निर्मूलनाची गरज’ हे पत्रक त्यांनी प्रकाशित केले. या पत्रकातून त्यांनी तरुण विधवा स्त्रियांच्या हलाखीच्या परिस्थितीवर भाष्य केले, तसेच एकूणच समाजरचनेवर त्यांनी हल्ला चढवला. त्या म्हणतात, ‘तरुण विधवांना अनेक सुविधा नाकारून त्यांच्या दैनंदिन हालचालींवर मर्यादा घातल्याने समाजाप्रती काम करण्याची संधीच त्यांच्याकडून हिरावून घेतली जाते.’ अविवाहित राहून त्यांनी अविरत सेवा केली. निवृत्तीनंतरही त्या स्त्रियांसाठी काम करत राहिल्या. त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले आणि त्यातच २५ सप्टेंबर, १९५५ रोजी त्यांचे निधन झाले. त्या रखमाबाई राऊत या नावाने परिचित असल्या, तरी कोणत्याही कागदपत्रावरून त्यांनी वडील किंवा पतीचे आडनाव धारण केल्याचे दिसत नाही. त्या नेहमी ‘रखमाबाई’ अशीच स्वाक्षरी करत असत. वैद्यकीय परीक्षा परिषदेच्या नोंदणीपत्रांमध्ये सुद्धा त्यांची ‘डॉ. रखमाबाई’ अशीच नोंद आहे. लेखिका श्रीमती मोहिनी वर्दे यांनी रखमाबाईंच्या जीवनकथेवर आधारित ‘रखमाबाई: एक आर्त’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. तसेच ‘डॉ. रखमाबाई’ या मराठी चित्रपटाची निर्मिती डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केली आहे आणि त्याचे दिग्दर्शन श्री. अनंत महादेवन यांनी केले आहे. डॉ. रखमाबाई यांचे चरित्र आजच्या तरुणींना नेहमीच प्रेरणा देत राहील.
डॉ. हैमबती सेन
राखेतून उठून उंच भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत वैयक्तिक मूल्यांशी कुठलीही तडजोड न करता उच्च शिक्षण घेऊन समाजसेवेत अविरत व्यस्त असणारं तेजोमय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. हैमबती सेन!
हैमबती घोष यांचा जन्म १८६६ मध्ये पूर्व बंगालमधील खुलना जिल्ह्यात (आता बांगलादेशमध्ये) एका उच्चवर्णीय जमीनदार घराण्यात झाला. पहिलंच कन्यारत्न असल्याने त्या त्यांच्या वडिलांच्या अतिशय लाडक्या होत्या. त्यांचे वडील परंपरावादी होते. पण तरीही त्यांनी आपल्या लाडक्या लेकीच्या शिक्षणाच्या ओढीला खतपाणी घातले. तिला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले. लहानपणी मुलांचे कपडे घालून आपल्या चुलत भावंडांबरोबर अभ्यास करत असल्याची आठवण स्वतः हैमबतींनी आपल्या आत्मचरित्रात दिली आहे. पण त्यांच्या शिक्षणाला घरातील महिला वर्गाचा, विशेषत: त्यांच्या आई आणि आजीचा प्रखर विरोध होता आणि ते साहजिकच होते. कारण, मुलीचे शिक्षण त्या वेळेच्या कर्मठ समाजाला मानवणारे नव्हते. शिवाय जुन्या परंपरांचे जतन करण्याची जबाबदारी ही बाईचीच! त्या वेळच्या प्रथेप्रमाणे वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या आई आणि आजीने त्यांचे लग्न वयाच्या नवव्या वर्षीच करून दिले. मुलीचे लग्न करताना वर उच्चकुलीन असणे महत्त्वाचे मानले जात असे. हैमबतींचा नियोजित वर ४५ वर्षे वयाचा होता आणि हे त्याचे तिसरे लग्न होते. तसेच त्याला हैमबती यांच्या वयाच्या दोन मुली होत्या. पण या गोष्टी तेव्हा गौण मानल्या जात. बालिका - जरठ विवाह ही गोष्ट इतकी सामान्य होती की, त्यामध्ये कोणालाच काही विशेष वाटत नसे. हा वर मोठ्या खानदानी घराण्यातील होता आणि ब्रिटिश प्रशासनात उपदंडाधिकारी या पदावर कार्यरत होता. हाच मुद्दा इथे महत्त्वाचा ठरला. पण हैमबतींचा नवरा व्यसनाधीन तर होताच, पण चारित्र्यहीनसुद्धा होता. लग्न झाल्यानंतर या निरागस मुलीला जे भोगावे लागले, ते पाहून कुठल्याही संवेदनशील माणसाच्या मनात चीड निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. लग्नानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या पतीचे न्यूमोनिया व यकृताच्या आजाराने निधन झाले आणि ‘लग्न, प्रपंच’ हे काही कळण्यापूर्वीच म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी त्या विधवा झाल्या. केशवपनासारख्या रूढींना त्यांना सामोरे जावे लागले. वैधव्य आल्यानंतर कोणतेही साजशृंगार लेण्यास बंदी होती. पांढरी वस्त्रे परिधान करावी लागत. खाण्यापिण्यावरही बंधने असत. संस्कृती जपण्याच्या नावाखाली या रूढी - परंपरा पाळताना मुलीच्या वयाचा, मनाचा विचार केला जात नसे. हैमबतीसारख्या लहान मुलीचीसुद्धा गय केली जात नसे.
वैधव्य आल्यानंतर या सगळ्या अनुभवातून हैमबतींना जावे लागले. सुरुवातीला त्यांच्या सासूबाईंनीदेखील ‘माझ्या मुलाला खाणारी चेटकीण’ म्हणून त्यांचा छळ केला. सगळी सहानुभूती हैमबतींपेक्षा त्यांच्या व्यसनाधीन नवऱ्याला मिळत होती. प्रत्यक्ष त्यांच्या आईनेसुद्धा त्यांच्या या अवस्थेसाठी त्यांच्या शिक्षणाला दोषी धरले. पण त्यांच्या सासूबाई खरोखरच मायाळू होत्या. त्यांना या लहान मुलीची अवस्था पाहवली नाही आणि त्यांनी खाणे-पिणे, तसेच रंगीत कपडे, बांगड्या घालण्याची आणि केस वाढवण्याची मुभा दिली. त्यांच्या वडिलांनी आपल्या लेकीसाठी काही आर्थिक तरतूद करण्याचा विचार केला, पण त्यांचे अचानक निधन झाल्याने हैमबती पूर्णपणे निराधार झाल्या. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या सासुबाईंचे निधन झाले आणि सासरच्या घरी त्यांच्या त्रासाला पारावार राहिला नाही. त्यांच्या मोठ्या दिरांनी संपत्तीच्या वाट्यातून त्यांना बेदखल केले. मग त्यांना माहेरी येण्यावाचून पर्याय राहिला नाही. पण तिथेही त्यांचा त्रास कमी झाला नाही. आईच्या निधनानंतर त्यांच्या भावाने त्यांचे सगळे दागिने काढून घेतले. रोजच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळून, त्यांनी शेवटी उच्चवर्णीय विधवांचे आश्रयस्थान असलेल्या वाराणसी इथे जाण्याचा निर्णय घेतला. पण वाराणसीसुद्धा विधवांसाठी सुरक्षित ठिकाण नव्हतं. या स्त्रिया भीक मागून किंवा देवळात भजन गाऊन उदरनिर्वाह करत असत. उपासमार तर नेहमीचीच. बऱ्याचदा या मुली लैंगिक छळाला बळी पडत असत तर कधी उपासमारीला कंटाळून स्वतः गैरमार्गाने जात असत. हैमबती मात्र कुठल्याही दबावाला बळी पडल्या नाहीत. काही वेळा तर त्यांना सलग पाच-सहा दिवस उपवास करावा लागला. तिथेही त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले. लहानपणापासून त्यांच्या मनात शिक्षणाची ओढ होती, तिने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही आणि त्यांना एका मुलींच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. या सगळ्या परिस्थितीवर मात करून सन्मानाने जगायचे असेल तर शिक्षण घेतले पाहिजे, तेही उच्च शिक्षण, हे त्यांनी जाणले. उच्च शिक्षणाच्या ओढीने, त्या वाराणसीमधील शिक्षकाची नोकरी सोडून एका दूरच्या नातेवाईकाच्या मदतीने कलकत्त्याला परत आल्या.
राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेला ‘ब्राह्मो समाज’ मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा देणारा असल्याने, त्या ब्रह्मो समाजामध्ये सामील झाल्या. काही मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या आग्रहास्तव त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी ब्राह्मो समाजाचे कुंजबिहारी सेन यांच्याशी पुनर्विवाह केला. पण या विवाहातूनही त्यांना फारशी सुख लाभले नाही. कारण कुंजबिहारी काहीच काम करत नसत. त्यामुळे आर्थिक आणि प्रापंचिक अशा दोन्ही आघाड्या हैमबतींना सांभाळाव्या लागल्या. या दांपत्याला पाच मुले झाली - चार मुले व एक मुलगी. पण कुंजबिहारी यांनी मुलांचीसुद्धा जबाबदारी घेतली नाही. त्यावेळी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलींना सरकार महिना सात रुपये शिष्यवृत्ती देत असे. हैमबतींनी कलकत्ता येथील ‘कॅम्पबेल मेडिकल स्कूल’ येथे प्रवेश घेतला. कारण तेथील अभ्यासक्रम स्थानिक भाषेत शिकवला जात असे. हा अभ्यासक्रम सुरू असताना त्यांना मातृत्व प्राप्त झाले होते. घरची सर्व जबाबदारी सांभाळून त्यांनी VLMS (Vernacular Licentiate in Medicine and Surgery) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अंतिम परीक्षेत सर्वप्रथम येऊन त्या सुवर्णपदकाचा मानकरी ठरल्या. पण इथेही त्यांचे स्त्रीत्व आडवे आले. महाविद्यालयातील मुलांना हा अपमान वाटला आणि त्यांनी त्याविरुद्ध बंड केले, दगडफेकसुद्धा केली. कर्मठ समाजाने बंड करणाऱ्या मुलांना पाठिंबा दिला. एका स्थानिक वृत्तपत्राने तर ‘या मुलीला मारलं तर सगळाच प्रश्न निकालात निघेल, बायकांना डोक्यावर बसवणं ही मोठीच चूक ठरेल, अशा अर्थाचे पत्रच छापले. अखेर या सगळ्या दबावापुढे कॉलेज प्रशासन झुकले आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास हे पदक देण्यात आले. हैमबतींना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. VLMS ही पदवी औपचारिक वैद्यकीय पदवी MB च्या समकक्ष नसल्याने हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्यांना हॉस्पिटलमध्ये मदतनीस म्हणून नियुक्त केले जात असे.
वैद्यकीय पदवी मिळाल्यानंतर हैमबतींची हुगळी येथील ‘लेडी डफरीन विमेन्स हॉस्पिटल’ येथे दरमहा ५० रुपये वेतनावर नियुक्ती झाली. संपूर्ण आयुष्यभर पुरुषसत्ताक व्यवस्थेचे चटके सोसलेल्या आणि त्याविरुद्ध ठाम भूमिका घेणाऱ्या हैमबती एखाद्या पतिव्रते प्रमाणे आपला संपूर्ण पगार नवऱ्याच्या हातात देत असत.
१८९४ ते १९१० या काळात हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर त्यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. महिला डॉक्टरांना त्याकाळी खूपच मागणी होती. कारण बऱ्याच स्त्रिया आपल्याला होणारा त्रास मोकळेपणाने सांगू शकायच्या. तसेच या महिला डॉक्टर आपल्या पेशंटला होणाऱ्या त्रासाविषयी गुप्तता पाळत असत. त्यांची एक विधवा मैत्रीण पुनर्विवाहावेळी गर्भवती होती. हैमबतींनी वेळेआधीच तिची प्रसूती करून तिची सुटका केली. पुरुषप्रधान संस्कृती विरुद्ध बोलणारे एक परखड, बंडखोर व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. १९३२ मध्ये त्यांचे निधन झाले.
१९२० मध्ये त्यांनी बंगाली भाषेत आपले आत्मचरित्र लिहिले होते. त्यांच्या हस्ताक्षरातील हे बाड ८० वर्षे तसेच पडून राहिले. तपन रायचौधरी यांनी त्याचा इंग्लिशमध्ये अनुवाद करून हे आत्मचरित्र सन २००० मध्ये प्रकाशित केले. यामध्ये बालविवाह, विधुरांचा बालिकेशी होणारा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणाला विरोध या रूढी-परंपरांवर कडक शब्दात त्यांनी ताशेरे ओढले आहेत.
कादंबिनी, रखमाबाई आणि हैमबती यांना अतिशय तीव्र संघर्ष करावा लागला. खरं तर त्यांच्या संघर्षाचे वर्णन तीव्र किंवा प्रखर यासारख्या शब्दात करता येणार नाही, तो शब्दातीत आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी उच्च शिक्षण तर घेतलेच, पण वैद्यकीय सेवेबरोबरच स्त्री - शिक्षण आणि जनजागृतीचे कामही त्यांनी केले. समाजासाठी त्या अविरत काम करत राहिल्या. असे असूनसुद्धा सामान्य जनांना या नायिकांची ओळख नाही. या अर्थाने त्या काळोखातील लेकी आहेत. केवळ स्त्रीशिक्षणच नव्हे तर स्त्रियांच्या कर्तृत्वाचा वाटेवरील त्या आद्य वाटाड्या आहेत. त्याकाळी समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरोधात उभे राहून जो असीम संघर्ष आणि त्याग त्यांनी केला, त्याच्या जोरावरच आज आपण या ज्ञानसागराची गोडी चाखत आहोत. त्यांची जीवनकथा निरनिराळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवू पाहणाऱ्या आजच्या तरुणींना नेहमीच प्रेरणा देत राहील.
तेजस्विनी देसाई
tejaswinidesai1970@gmail.com
संदर्भ :
- ‘Women Scientists in India – Lives, Struggles, Achievements’ by Anjana Chattopadhyay, National Book Trust, India.
- Jovita Aranha (31 August 2017). "The Phenomenal Story of Kadambini: One of India's First Women Graduates & Doctors". Retrieved 22 November 2017.
- https://feminisminindia.com/2019/01/29/kadambini-ganguly-doctor/
- https://www.thebetterindia.com/113789/kadambini-ganguly-one-of-indias-first-women-graduates-doctors/
- Sen, B.K. (September 2014). "Kadambini Ganguly - An Illustrious Lady" (PDF). Science and Culture - Indian Science News Organization.
- https://oxford.universitypressscholarship.com/
- Royal Maratha Entertainment (3 March 2017), Doctor Rakhmabai | Official Teaser | Tannishtha Chatterjee, retrieved 23 November 2017
- Malabari, Behramji M. (1888). "Rukhmabai and Damayanti". In Giduma, Dayaram (ed.). The Life and Life-work of Behramji M. Malabari. Bombay: Education Society. pp. 132–134, 222–248 .
- Sen, Indrani (2012). "Resisting Patriarchy: Complexities and Conflicts in the Memoir of Haimabati Sen". Economic and Political Weekly. 47 (12): 55–62, quotes from pages 55 and 57. ISSN 0012-997
- Gender, Identity and Colonialism - A Reading of The Memoirs of Haimabati Sen by Anamika Chakraborty, IJELLH, Volume III Issue I March 2015- ISSN 2321-7065
- https://www.youtube.com/watch?v=Nee1s7w-hkw&t=896s