कमला : आमची रॉकस्टार

सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाबमधल्या खेड्यात १९४६ साली जन्मलेल्या कमला भसीन; स्वातंत्र्योत्तर भारतात पंजाबमध्ये १९६५ साली जन्मलेल्या शबनम वीरमाणी आणि आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात १९७६ साली जन्मलेल्या मोसमी परीयाल म्हणजेच आताच्या पार्वती बाउल. वय, अंतर व भाषा पाहता या तिघींचा एकमेकींशी संपर्क होण्याच्या शक्यताही कमी होती. तिथे या तिघी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झाल्या. गाणं हा या तिघींना जोडणारा समान धागा. स्वत:च्या कर्करोगाच्या असह्य दुखण्यातही या विद्वेषाच्या वातावरणात पार्वती आणि शबनम यांच्या प्रेमाची महती सांगणारा सांगीतिक कार्यक्रम व्हायलाच पाहिजे, असा कमला भसीन यांचा आग्रह होता. कमलाला नकार देणं हे कोणत्याही मैत्रिणीला अशक्य होतं. तीस वर्षं हातात हात घालून काम केलेल्या आणि कमलाच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या सोबत असलेल्या मनीषा गुप्ते यांनी मैत्रिणीला दिलेला शब्द पाळला आणि ९ डिसेंबर २०२१ रोजी एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन इथे हा कार्यक्रम पार पडला. मात्र, प्रत्यक्ष कमला भसीन नसल्याने त्यांच्या आठवणीत, त्यांना श्रद्धांजली देणारा झाला. कमलाजींचं सळसळतं व्यक्तिमत्त्व आताही जिथे असेल तिथेही आपला जलवा दाखवत असेल.

कमला भसीन हा चालता-बोलता पर्फोरमन्स होता. त्या जिथे उपस्थित असत तिथलं वातावरण हसण्या खिदळण्याने भारून गेलेलं असे. पितृसत्ता, विषमता, हिंसा याला त्या निकराने विरोध करत होत्या; पण त्या कधीच सुतकी गंभीर किंवा जडबंबाल नव्हत्या. या सर्व जटील प्रश्नाची अत्यंत सोप्या भाषेत मांडणी करायच्या आणि साधी, रोजच्या जीवनातली उदाहरण देऊन गैरसमज, आरोपांना सडेतोड उत्तर द्यायच्या. सोप्या शब्दात तेही कोपरखळ्या मारत. ‘पोळ्या लाटण्यासाठी गर्भाशय लागत नाही’, किंवा ‘बेटी दिल में भी जरुरी हैं’, ‘न कम न ज्यादा– चाहिये हमें आधा आधा’ या घोषणा ही काही त्याची उदाहरणं.

‘सत्यमेव जयते’सारख्या टीव्हीवरच्या कार्यक्रमात लिंग आणि लिंगभाव यातला फरक इतक्या कमी वेळात त्यांनी असा समाजवून सांगितला की, आमीर खानबरोबर प्रत्येक दर्शकालाही ताबडतोब कळला. स्त्रीवादाचं प्रशिक्षण त्याची गाणी, त्यांची पुस्तकं याशिवाय पूर्णच होत नाही. प्रसंग–घटनेनुसार त्यांना अत्यंत सुंदर गाणी सुचायची. कोणलाही सहजपणे गाता येतील, समजतील आणि स्फुरण देतील अशी ४५० गाणी त्यांनी स्त्री-चळवळीला दिली आणि तेवढ्याच समर्पक घोषणाही दिल्या.

‘तोड तोड के बंधनोंको देखो बहने आती है’ या त्यांच्या गाण्याचा ‘वो तो नया जमाना लायेगी’ या आशावादाने आणि कमलाच्या हसऱ्या आणि कार्यमग्न छबी बघत कमलाजींच्या आठवणीत सांगीतिक स्मरणांजलीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. गेल्या वर्षी नाशिकच्या हिंसाचार मुक्ती परिषदेत त्यांनी स्वत: सामील होऊन गायलेलं गाणं, केलेला विनोद याची चित्रफित पाहिल्यावर ओठावर हसू आणि त्याच वेळी आता या उत्साहाचा संसर्ग पुन्हा होणार नाही याची दुखरी जाणीव झाली. ती त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजक मासूम संस्थेच्या सह संस्थापक मनीषा गुप्ते, कमला भसीन यांची मैत्रीण खतीजा फारुकी यांच्या भाषणातून प्रतीत झाली. कमला भसीन सहसंस्थापक असलेल्या ‘जागोरी’ आणि ‘संगत’ संस्थेच्या श्रुती बात्रा या कार्यक्रमासाठी दिल्लीहून आलेल्या आल्या होत्या.

“कमला म्हणजे मूर्तिमंत असीम प्रेम, करुणा होती, ती सगळ्यांना सहज माफ करायची. प्रत्येकाकडून शिकायची. पॉलिटिक्स ऑफ लव्ह’ यावर पतियाळा आणि पुण्यात सांगीतिक कार्यक्रम करावेत अशी तिची इच्छा होती.” मनीषा गुप्ते यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. “प्रेमाची कवाडं बंद झाली की कुणाचेच आवाज कानी पडत नाहीत काहीच ऐकू येत नाही. आज जगाला सर्वात जास्त कशाची गरज आहे तर प्रेम आणि करुणेची! म्हणून हा कार्यक्रम...” अशी त्यांनी भावपूर्ण प्रस्तावना केली.

कमला का कुनबा

शबनम हाश्मी यांच्या अनहद संस्थेने तयार केलेली ‘कमला का कुनबा’ ही फिल्म यावेळी दाखवली. कमला या सहा भावंडामधलं चौथं अपत्य. वडील डॉक्टर. पाकिस्तानातल्या पंजाबमधल्या गावात आई एका लग्नाला गेली असता तिथे २४ एप्रिल १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला. ‘असा जन्म झाल्याने आयुष्यातले खूप निर्णय निश्चित करण्याचे संकेत दिले’ असं कमला म्हणतात. (फाळणीचा इतिहास आणि अनुभव याबद्दल त्यांनी पुढे स्त्रीवादी मांडणी केली; त्याबरोबर दक्षिण आशियाई महिला आणि स्त्रीवाद अशी त्यांनी देशांच्या सीमा ओलांडून एका सामाजिक, राजकीय, भौगोलिक ओळखीचे अनेक पदर उलगडून दाखवले आणि काम केलं.)

शाळेत कमला खेळात भाग घ्यायच्या विशेषत: व्हॉलीबॉल, सायकल चालवायच्या, इथवर ठीक होतं. पुढे, कॉलेजमध्ये असताना त्यांनी वडिलांसाठी फक्त मोटारसायकल विकत घेतली नाही तर ती चालवतच घेऊन आल्या. ठरवलं ते करून दाखवायचं आणि स्पष्ट बोलण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे वडीलही त्यांच्यासमोर बोलायला बिचकत, असं त्यांच्या बहीण बीना काक सांगतात. जबाबदारी घेण्याची उपजत ऊर्मी असल्याने त्यांनी कुटुंब आणि बाहेरच्या ‘कुनब्याचीही जबाबदारी घेतली. पहिल्यापासून त्या विचाराने ठाम आणि इतरांसाठी काम करण्यात पुढाकार घेत असत.

राजस्थानमध्ये एम.ए. केल्यावर जर्मनीत डेव्हलपमेंट सोशोलॉजी शिकल्या आणि तिथेच एक वर्ष शिकवलं. नंतर मायदेशी परत आल्या. ‘सेवा मंदिर’ इथे काम केलं. त्यानंतर ‘संयुक्त राष्ट्र’मध्ये त्यांनी २७ वर्ष काम केलं. याच कामाच्या निमित्ताने त्याचा देशोदेशीच्या लोकांशी आणि लोकांच्या प्रश्नाशी जोडल्या गेल्या, काही वर्षं त्यांनी बांग्लादेशमध्ये काम केलं. नंतर मोठ्या पगाराची नोकरी सोडून ‘जागोरी’ आणि ‘संगत’ या संस्था स्थापन केल्या आणि तेच काम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलं.

लिंगभाव, गरिबी, लोकशाही, शांतता, शाश्वत विकास, मानवी हक्काची भाषा बोलल्याशिवाय जगाच्या अर्ध्या लोकसंख्येला म्हणजेच महिलांना न्याय मिळणार नाही म्हणून ‘१००० पीस विमेन’ या संस्थेतर्फे जगभरात विधायक काम करणाऱ्या एक हजार महिलांच्या कामाची नोंद करून त्यांची नावं नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवण्याचा उपक्रम घेण्यात आला. विप्सा– विमेन इनिशिएटीव्ह फॉंर पीस इन साऊथ एशिया, महिला हिंसाचाराविरुद्ध जगभर जनजागृती करणाऱ्या ‘वन बिलियन रायझिंग’ कार्यक्रमाचं कमलाजींनी भारतात नेतृत्व केलं.

उबदार मिठी, हास्य, विनोद, गाणं यांनी समोरच्याला लगेचच आपलंस करणाऱ्या चैतन्यमूर्ती कमला यांनी वैयक्तिक आयुष्यात जिकिरीच्या आव्हानांचा सामना केला. त्यांच्या मुलाला वयाच्या सातव्या महिन्यात पोलियो लसीकरणाच्या वेळी मेंदू संसर्ग होऊन सेरेब्रल पाल्सी झाली. इतर सहकार्यांच्या मदतीने त्यांनी त्याची ४२ वर्ष सेवा केली. त्यांची हुशार आणि अत्यंत संवेदनशील मुलगी मितोने नैराश्यातून ऐन तारुण्यात आत्महत्या केली. तरी त्या खंबीर राहिल्या “माझ्या आयुष्यात हे काम आणि ही आग नसती, तर मला जगणं अशक्य होतं.” असं त्या मान्य करतात. “मी कधी १५ दिवसापेक्षा जास्त घरी राहिले नाही. या लोकांनी माझं घर, माझा मुलाला सांभाळलं” अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्याची काळजी घेणारे कुटुंबातले सदस्य यांच्याबद्दल कमला म्हणाल्या “मी खूप श्रीमंत आहे. हा सगळा पैसा ज्या गरिबांच्या नावावर मला मिळाला आहे, तो मी त्यांनाच देऊन जाणार आहे.”

शिक्षणक्षेत्र, माहिती अधिकार, मानव अधिकार, स्त्रीवादी कार्यकर्त्या, त्यांची बहीण, मैत्रीण, घरातले मदतनीस कमला भसीन यांच्या प्रेमाची साथ आणि सहवास लाभलेल्या सर्वांनी आपली कृतज्ञता या फिल्ममध्ये व्यक्त केली आहे. तर “चळवळीची ऊब मिळाली म्हणून मी गाणी लिहिली.” असं कमला सांगतात. ‘डॉक्टर काही म्हणत असले तरी माझा त्यांच्यावर विश्वास नाही’, असं कमला म्हणत असल्या तरी, “अभी तो मैं जवान हूं” म्हणणारं त्यांचं मन मात्र त्यांच्या शरीराची वेगळीच कहाणी सांगत होतं. कमला मैत्रिणींना बोलावून गायला, वेगवेगळे पदार्थ करायला लावून त्यांच्यात उत्साह भरण्याचा प्रयत्न करत होत्या. परंतु २५ सप्टेंबरला शरीर त्यांच्या ऊर्जेची बरोबरी करू शकलं नाही.

चिरस्मरणीय संगीतानुभव

आपली प्रिय मैत्रीण कमलाचं वर्णन करणारी आणि तिच्या आवडीची गाणी गात पार्वती बाउल आणि शबनम वीरमाणी यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या.

संपूर्ण जंगल वणव्यात जळत असताना एक छोटी पक्षीण, आपल्या प्रिय चंदनाच्या झाडावर आपण फळ खाल्ली, बागडलो त्या मैत्रिणीला कसं सोडू? जीवन किती वेळा मिळतं? असं म्हणून त्या मैत्रिणीला सोडून जायला तयार होत नाही. आपल्या पंखावर जेवढं पाणी आणता येईल त्याने वणवा विझवण्याचा ती प्रयत्न करते. काही हसतात, काही रागावतात त्याच वेळी ढगांत देव/बुद्ध/मैत्रिणी आकाशातून जात असतात. त्या पक्षिणीची धडपड पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं तोच पाऊस होतो आणि वणवा विझतो. कमला ही अशीच वेडी पक्षीण होती तिच्या ‘हेलीम्हारी किण सांग करा में स्नेह रे’ गाण्याने दोघींनी सुरुवात केली.

स्वत:च्या जीवनाहून मोठं ध्येय आणि त्या कामावर प्रेम असल्याने कमला जीवनातल्या आव्हानावर त्या मात करू शकल्या ‘प्रेम पाथारे जे शातारे’ (प्रेमसागरात जे पोहतात त्यांना मरणाची भीती नसते); कबे मिल्दा सी (परत कधी भेटायचं?); लाल फुलं फुलतील, जेव्हा शांतता होईल, आसवांचे मोती होतील तेव्हा भेटू ही प्रेमाची गाणी झाल्यावर पार्वती यांनी ‘शाधेर लाऊ बनाइले मोरे बैरागी’ (दुधी भोपळ्याने मला कसं वैरागी बनवलं) असं मजेदार गाणं सादर केलं. सामाजिक, राजकीय आणि नंतरच्या काळात आध्यात्मिक मुक्ततेची भाषा करणाऱ्या कमलासाठी- ‘रिध को नई मांगू, सिध को नई मांगू मुक्तीर मारग पावा’- हे गोरखनाथांचं भजन शबनम यांनी गायलं. पाच तारी तंबोरा आणि चिपळ्याच्या तालावर शबनम वीरमाणी यांच्या गहिऱ्या आवाजातली भजनं ही संथ पाण्यावर वाऱ्याच्या झुळकीमुळे तरंग उठावेत आणि त्या पाण्याचा मुलायम आणि गार हवेचा आल्हाददायक स्पर्श एका नंतर एका लयीत येत राहावा, असा अनुभव देतात.

त्यानंतर, पार्वती बाउल यांनी १००० वर्षापूर्वीचं भजन- ‘करुणा नावी सोनावरती’ - गायलं. पायात घुंगरू, घोट्यावर नेसलेली बंगाली साडी, कपाळावर वैष्णव टिळा, गळ्यात रुद्राक्ष आणि पांढऱ्या फुलांची गुडघ्यापर्यंत माळा, एका हातात एकतारा, कमरेला डुग्गी, डोक्यापासून पायापर्यंत पोचणाऱ्या जटा, हृदयाला हात घालणारा, टिपेला पोहोचणारा आवाज आणि चेहऱ्यावर मिश्कील भाव, यासह उड्या आणि गिरक्या घेत गाता गाता केलेलं नृत्य पाहणं हे प्रत्यक्ष पाहणं हा अनुभव मंत्रमुग्ध करणारा होता. ‘होगा एक छोटा या बडा घर मेरा’ ही कमला भसीन यांची कविता आणि ‘मन चलो निजे निकेतने’ (मना चल आता आपण आपल्या घरी जाऊ) या दोघींनी एकत्र गायलेल्या बंगाली भजनाने ती संध्याकाळ एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली. गंगा-यमुनाचा संगम झाला होता आणि कमला ही सुप्त सरस्वती त्या दोघींच्या मनात शांत वाहत होती.
संयोगिता ढमढेरे
mesanyogita@gmail.com

बॉक्स -१

स्त्रीवादी पुरुष सहभागासाठी जागतिक संमेलन २०१४

स्त्रीवाद म्हणजे पुरुषांचा विरोध नाही, तर पितृसत्तेमुळे पुरुषही प्रेम, आस्था, करुणा गमावतात याची कमला भसीन यांनी प्रभावी मांडणी केली आणि पुरुषांना स्त्रीवादी चळवळीत सामील करून घेण्याच्या ‘एंगेजिंग मेन’ या प्रयत्नात त्याचा सक्रीय सहभाग होता. २०१४ साली झालेल्या त्यांच्या ग्लोबल सिम्पोसियममध्ये कमला भसीन यांनी पार्वती बाउल आणि शबनम वीरमाणी यांचा एकत्र कार्यक्रम आयोजित केला होता. भारतातल्या भक्ती, सूफी, कबीर, बाउल पंथातले पुरुष संत ईश्वरासमोर समर्पण करताना स्त्री होतात. स्त्रीच्या भावना, तिची भाषाशैली, तिचा सजणं, तिची प्रियाला भेटण्याची आस, समर्पण वृती, विरह आणि महिलांची दिनचर्या यातून आपलं ईश्वरप्रेम व्यक्त करतात.

सत्य – ब्रह्म हे एकमेव निर्गुण पुरुष आहे. तो पुरुष व्हायचं असेल तर पुरुषाने आपल्या आतल्या स्त्रीचा आणि स्त्रीने आपल्या आतील पुरुषत्वाचा धांडोळा घेतला पाहिजे. स्त्रीची प्रेम देण्याची आणि करुणेची क्षमता मिळवली म्हणजेच साधकाने प्रकृती (पुरुष-प्रकृती) स्वभावच त्याला त्याच्या परमप्रिय परमेश्वराजवळ घेऊन जाऊ शकेल. हा शोध संपला की, स्त्री आणि पुरुष यांच्या पलीकडचा... मी कोण? हे शोधण्याचा प्रवास सुरू होतो, असं बाउल मानतात.

या संमेलनात, “आपण आपलं सत्तेवरचं प्रेम सोडून प्रेमाच्या शक्ती आचरणात आणू या. आपली करुणा, उत्कटता आणि साहस यांचा उत्सव करू आणि पितृसत्ता आणि सर्वच उतरंडींना आव्हान देऊ या. वर्चस्ववादी पुरुषत्वाच्या संकटाचा सामना करूया. जिथे वर्चस्व नसेल, हिंसा नसेल तिथे प्रेम, सुसंवाद आहे परस्परावलंबी सहजीवन असेल.” असं आवाहन केलं होतं.

बॉक्स – २

शबनम वीरमाणी

आज बंगलोर इथे ‘सृष्टी’ संस्थेत शिकवत आहेत. दृष्टी मिडिया आर्ट अँड ह्युमन राईट या संस्थेची त्यांनी १९९३ साली सहस्थापना केली.

शिक्षण आणि पेशाने पत्रकार असलेल्या शबनम यांनी रूपकुंवर सती प्रकरणाच्या प्रत्यक्ष भेटीवर लेख लिहिले होते. नंतर शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर विद्यार्थी असल्यापासून माहितीपट निर्मिती करत आहेत. अमेरिकेतल्या जीवनाशी जुळवून घेणाऱ्या भारतीय विद्यार्थिनीच्या स्वत:च्या अनुभवावर ‘हॅव अ नाईस डे’ या पहिला माहितीपट बनवला. त्यानंतर महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीवर ‘व्हेन विमेन युनाईट’ आणि महिला सामाजिक कार्यकार्त्यांवर ‘तू जिंदा हैं’ हे माहितीपट बनवले.

२००२ साली गुजरात दंगलीनंतर त्या कबीराच्या शोधात निघाल्या भारतातील वेगवेगळ्या प्रांतातला, भाषेतला कबीर, त्याची वेगवेगळी रूपं आणि हिंदू, दलित, शीख, मुस्लीम, बौद्ध धर्मातली त्यांनी घेतलेली तत्त्व आणि कबीराबद्दल अनेक धर्म आणि पंथात असलेल्या मान्यता, कबीराचा राम शोधायला निघाल्या. भारत आणि पाकीस्तानात लोकांना भेटून ४०० तासाचं चित्रिकरण जमा केलं, त्यातून चार माहितीपट तयार झाले. त्यांना प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आणि शबनम यांना जगण्याची नवी दिशा.

‘प्रोजेक्ट कबीर’ हाच त्याच्या जीवनाचाच प्रोजेक्ट झाला. त्याच्या हातातला कॅमेरागळून पडला आणि तंबोरा हातात घेऊन त्या भजन गायला लागल्या आणि कबीरमय झाल्या. आज त्या कबीराचे दोहे गाणाऱ्या अत्यंत लोकप्रिय गायकांपैकी एक आहेत. लिहिलेलं वाचणं हा एक बाह्य अनुभव आहे; पण आवाज हा प्रत्यक्ष मनाला जाऊन भिडतो, म्हणून कबीर, “सुनो” असं म्हणतो. शतकानुशतकं मौखिक परंपरेतूनच तो जनमानसात ठाण मांडून बसला आहे. प्रल्हाद पठानिया या गुरूंकडून शबनम यांनी दोहे गाण्याचे धडे घेतले. आपल्याला जे दान मिळालं आहे ते इतरांना दिल्याने वाढते या भावनेने त्या गाणं गात आहेत.

बॉक्स ३

पार्वती बाउल

लहानपणापासून नाच आणि गाण्याची आवड असलेल्या मोसमी परियालने लोकसंगीतात घरीच शिक्षण घेतलं. शालेय शिक्षणानंतर त्या शांतीनिकेतनमधल्या कलाभवनात चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी आल्या. पुढचं शिक्षण घेण्यासाठी दाखल झाल्या तिथे त्यांची ओळख बाउल संगीताशी झाली. धर्माच्या पलीकडे जाणारी एकनिष्ठेने सत्याच्या शोधात निघालेल्या मानवतावादी बाउल प्रथेने त्या प्रभावित झाल्या. रवींद्रनाथ यांचं लेखन आणि तत्त्वज्ञान यांचाही त्यांच्यावर खूप प्रभाव आहे. त्यामुळे औपचारिक शिक्षण अर्धवट सोडून प्रत्यक्ष बाउल गुरुकडून शिक्षण घेण्यासाठी त्या बाहेर पडल्या.

वयाच्या १७व्या वर्षी सनातन बाउल यांच्या शिष्या ‘पार्वती बाउल’ झाल्या आणि २२व्या वर्षापासून त्या आपली कला सादर करत आहेत. कथाकथन, संगीत आणि नृत्य यांच्या इतर लोकशैली आणि अन्य गुरूंकडूनही त्यांनी शिक्षण घेतलं. भारतीय आध्यात्मिक प्रथांचा अभ्यास करत करत त्या केरळला पोहोचल्या तिथेच कठपुतली प्रशिक्षक आणि सादरकर्ते, लोककला आणि नवकलांचे सादरकर्ते रवी नायर यांच्याशी विवाह केला. नेदुमानागाडूया गावात त्यांनी एकतारा बाउल संगीत कलरी हे गुरूकुल सुरू केलं आहे. देश-विदेशात फिरून बाउल संगीताचा प्रचार, प्रसार करणं, गैरसमज दूर करण्याचं त्या काम करतात चित्रकथा गीतं, नाटय, नृत्य आणि संगीत या सर्व कलाप्रकारांचा एकत्रित परिणाम साधणारं सादरीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु त्या गात असलेल्या गीताचा संपूर्ण अर्थ त्या समजावून सांगत नाहीत. ज्याला अर्थ समजण्याची आस आहे, त्यालाच त्याचा अर्थ कळावा अशी त्यांना शिकवण आहे. पूर्णपणे मौखिक परंपरा असलेल्या बाउल संगीताची लिखित नोंद ठेवण्यास पार्वती बाउल यांनी सुरुवात केली.

संयोगिता ढमढेरे, पुणे.
mesanyogita@gmail.com