कांगयात्सेच्या कन्या

२३ ऑक्टोबर २०२१

‘गिरिप्रेमी’ ह्या पुणेस्थित गिर्यारोहणात अग्रेसर संस्थेतर्फे लदाख भागातील कांगयात्से १-२ आणि गढवाल हिमालयातील गंगोत्री-१ या हिमशिखरांवर महिला संघांच्या मोहिमा ठरवण्यात आल्या. सर्वांना आपल्या कुवतीप्रमाणे संधी मिळावी म्हणून हिमालयातील या दोन्ही मोहिमा अशी योजना आखली गेली. या अति उंचीवरील खडतर मोहिमांसाठी महिला गिर्यारोहकांची निवड ही त्यांची गिरिप्रेमीच्या गुरुकुलातील उपस्थिती, सरावातील सातत्य, संघ भावना, शारीरिक-मानसिक तंदुरुस्ती व तांत्रिक सुसज्जता, वर्तन, जिद्द व चिकाटी, सहनशीलता, प्रसंगावधानक्षमता, तणावाखाली असताना निर्णय घेण्याची क्षमता आदि कठोर निकषांवर करण्यात आली होती.

कांगयात्से-१ (उंची- ६४९५ मीटर्स) व २ (उंची - ६२४३ मीटर्स) या दोन शिखरचढायांसाठी सहा महिला, तर गंगोत्री-१ शिखर मोहिमेसाठी चार महिला गिर्यारोहकांची टीम निवडण्यात आली होती. या मोहिमा अनुक्रमे जुलै-ऑगस्ट २०२१ व सप्टेंबर २०२१ या महिन्यांत झाल्या.

यातील कांगयात्से मोहिमेत सहभागी झालेली टीम अशी होती- प्रियांका चिंचोरकर (लीडर), स्मिता कारिवडेकर (डेप्यु-लीडर), अंजली कात्रे, स्नेहा गुडे, पद्मजा धनवी, सायली बुधकर आणि समीरण कोल्हे (प्रशिक्षक). साहाय्य : मिंग्मा शेर्पा आणि मिंग तेंबा शेर्पा (दार्जिलिंग), संजीव राय, सनी शर्मा व अर्जुन (गाईड, व्हाईट मॅजिक एजन्सी).

एखादा साहसी किंवा अद्भुत अनुभव घेतला की, तो सांगणं, त्याबद्दल व्यक्त होणं ही मानवाची सामाजिक प्रवृत्ती आहे. तेव्हा, ’या मोहिमेतले अनुभव लिहिणार का?’ अशी विचारणा केल्यावर सगळी टीम आनंदाने तयार झाली. एकत्र जमून खास बातचीत करण्याचा प्लॅन ठरला. पण काही कारणांनी तो बारगळला. पण लिहिण्याचा उत्साह प्रचंड दिसत होता. हिमालयात जाऊन अशी साहसी मोहीम करणं वेगळं आणि घरी परतल्यावर तेवढ्याच ओढीनं ते शब्दबद्ध करणं वेगळं. चढाई करताना एकेक पावलापावलावर कस लागतो, तसं लिहिताना एकेक शब्दाशी झुंजावं लागतं. असा एखादा विस्तृत लेख लिहिणं हेही पर्वत सर करण्यासारखंच असतं. पर्वताचं खरंखुरं शिखर सर करून आलेल्या ह्या टीमने मग प्रश्नोत्तरी रूपानं लिखाणाचं हे शिखर सर केलंच, यात नवल नाही! मोहीम कांगयात्सेच्या टीम मेंबर्सनी आपापल्या परीने शब्दबद्ध केलेल्या त्यांच्या कहाणीचं हे संकलन.

संपूर्णपणे महिलांची माऊंटेनियरिंग मोहीम म्हणजे नेमकं काय? या संघाची कल्पना का पुढे आली व मूर्त रूप कोणी दिलं?

प्रियांका चिंचोरकर : मी २००९ पासून ट्रेकिंग, माऊंटेनियरींगशी जोडले गेले. गिरिप्रेमीमध्ये आल्यावर मोहिमा अजूनच चांगल्या रीतीने पाहायला मिळाल्या. सुरुवातीच्या या काळात या गिर्यारोहणात मुली कमी दिसायच्या. व्यवसायानं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. त्या क्षेत्रातही मुली कमीच होत्या. असं का असावं? हा विचार मनाला अस्वस्थ करायचा. यातूनच एक वेगळं काहीतरी करावं असा विचार मनात चमकला. स्त्रियांची strength हीच की, स्त्री नेहमीच नवनिर्मिती करते. तेही सगळ्यांना बरोबर घेऊन. सुरुवातीला हा विचार बेसिक लेव्हलवर असला तरी एक नक्की जाणवलं की, फक्त मुलींचा संघ तयार करून हिमालयातील मोठी मोहीम करावी. ही मोहीम ठरवण्यापासून पार पडेपर्यंतचा कारभार पूर्णपणे मुली सांभाळतील. अशी एक मोहीम बहुधा गिरिप्रेमीच्या founder member उष:प्रभा पागे यांनी खूप वर्षांपूर्वी केली होती. पण गिरिप्रेमी संस्थेची म्हणून अशी एकही मोहीम निघाली नव्हती.

मग हळूहळू का होईना त्याच्या खोलात शिरायला सुरुवात झाली. २०१९ पासून बऱ्याच मुली गिरिप्रेमीत येऊ लागल्या. सगळ्यांचा एकत्र सराव झाल्यावर team build करता येईल असं वाटलं. त्यातून ही मोहीम ठरली.

अंजली कात्रे : २०१९पासून गिरिप्रेमी संस्थेतील मुलींनी एकत्र येऊन सरावाला सुरुवात केली होती. Artificial wall climbing, rock climbing वगैरे. महिला दिनाचं औचित्य साधून मार्च २०२०मध्ये सहा महिलांनी लोणावळ्याजवळचा तैलबैला कातळकड्यावर तीन बाजूंनी यशस्वी चढाई केली. ह्यातून पुढचं पाऊल म्हणून हिमालयात गिर्यारोहण करण्याची कल्पना आखली. पण लॉकडाऊनमुळे ह्या सगळ्याला ब्रेक बसला. पण गिरिप्रेमीनं online पद्धतीने गुरुकुल योजनेतून मुलींचा सराव चालू ठेवण्याची कल्पना लढवली. ह्यातूनच मुलींची टीम तयार झाली.

सदस्यांची निवड प्रक्रिया कशी झाली?

स्मिता कारिवडेकर : संघ निवडीची प्रक्रिया ही सरावादरम्यान सुरू झालीच होती. प्रशिक्षक समीरण कोल्हे सगळ्या सदस्यांचा परफॉर्मन्स नियमितपणे मॉनिटर करत होते. रनिंग, रॉक क्लाइंबिंग, लोड ट्रेनिंग, ट्रेकिंगसारख्या विविध अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये संघामधील सदस्य कसे परफॉर्म करताहेत याचे मूल्यमापन ते करत होते. महिन्यातून एकदा ठरावीक चाचण्याही घेतल्या जात होत्या. शिवाय, मोहिमेच्या एक महिना आधी प्रशिक्षकांनी काही विशेष चाचण्या घेतल्या ज्यामध्ये हाय इंटेन्सिटी रनिंग, रिकव्हरी टाइम, इत्यादी चा समावेश होता. संघातील सदस्यांचा हिमालय एक्सपिडिशनचा पूर्वानुभव, माऊंटेनियरिंग कोर्सेस इ. बाबीसुद्धा विचारात घेतल्या गेल्या. अंतिम संघ निवडीनुसार प्रियांका चिंचोरकर, मी आणि समीरण कोल्हे असे आम्ही तिघं कांगयात्से-१ शिखर सर करणार होतो, तर अंजली कात्रे, स्नेहा गुडे, पद्मजा धनवी आणि सायली बुधकर हे सदस्य कांगयात्से-२च्या संघामध्ये होते.

स्मिता, तू राज्यपातळीवर खेळली आहेस, मग गिर्यारोहणाकडे कशी वळलीस?

स्मिता कारिवडेकर : मला लहानपणापासून खेळाची खूप आवड होती. हॉकी, क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल, फुटबॉल असे अनेक खेळ मी शाळा आणि कॉलेजमध्ये नियमित खेळत होते. प्रोफेशनल हॉकी प्लेअर म्हणून मी सुमारे १० वर्षे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे आणि मेडल्सही जिंकली आहेत. पुढे MBA पूर्ण केल्यावर मला एका MNC मध्ये नोकरी मिळाली आणि व्यावसायिक जीवनाचा प्रवास सुरू झाला. पण त्यासोबतच फिटनेस आणि आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज चालू ठेवाव्या म्हणून मी ट्रेकिंगकडे वळले. सह्याद्री आणि हिमालयात रेग्युलर ट्रेकिंग सुरू केलं. निसर्ग आणि पर्वतांच्या सान्निध्यात खूप काही शिकायला मिळत होतं. आयुष्याकडे बघण्याचा आणि सामोरं जाण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला होता. पर्वतांचे अपार सौंदर्य आणि अविस्मरणीय अनुभव आयुष्याला एक वेगळा आकार आणि वळण देत होते.

सर्वच हिमालयन मोहिमांमध्ये माऊंटेनियरला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. आव्हानांना तोंड देण्यासाठी सतत कंफर्ट झोनमधून बाहेर पडून झगडावे लागते. शारीरिक आणि मानसिक ताकतीचा कस लागतो. माझा पर्वतांमधला अनुभव हा असाच काहीसा होता. त्यामुळे हळूहळू गिर्यारोहण ही माझी passion बनली. पुढे माउंटेनिअरिंग आणि रॉक क्लाइंबिंगचे कोर्सेस केले आणि हिमालय ट्रेक्स सोबतच एक्सपेडिशन करायला सुरुवात केली. माउंट स्तोक कांगरी, एव्हरेस्ट बेस कॅम्प यांसारखे प्रसिद्ध ट्रेक्स केले.

तुम्हा सर्वांना प्रशिक्षण कोणी व कसे दिले? प्रशिक्षणाचे टप्पे काय होते? सरावामध्ये कोणत्या अडचणी आल्या?

स्मिता कारिवडेकर : साधारणत: एक वर्षभर आमचा १५ मुलींचा संघ गुरुकुल पद्धतीने सराव करत होता. पण कोरोना लॉकडाऊनमुळे सराव घरीच करावा लागला. आमचे प्रशिक्षक समीरण कोल्हे, जे स्वतः एक अनुभवी गिर्यारोहक, प्रस्तरारोहक आणि सर्टिफाइड शारीरिक शिक्षण प्रशिक्षक आहेत, यांनी आमच्या काही फिटनेस टेस्ट्स घेतल्या, ज्या जागतिक पातळीवर स्टॅंडर्ड म्हणून फॉलो केल्या जातात. टेस्ट रिझल्टनुसार प्रत्येक सदस्याच्या फिटनेस लेव्हलप्रमाणे त्यांनी सर्वांसाठी कस्टमाइज्ड वर्कआऊट तयार केला. स्ट्रेंथ, स्टॅमिना, आहार, रेस्ट आणि रिकव्हरी या महत्वाच्या बाबींवर विशेष भर दिला. सरावात योग, प्राणायाम आणि ब्रह्मविद्येचाही समावेश होता. आठवड्यातून एकदा ऑनलाईन मीटिंगद्वारे एकत्र येऊन सरावाचा आढावा घेतला जात होता. कोणत्याही सदस्याला सरावा दरम्यान कोणती इजा होणार नाही याचीही दक्षता आम्ही घेतली. प्रशिक्षक प्रत्येक सदस्यावर काटेकोरपणे लक्ष देत होते आणि सरावाची इंटेन्सिटी आणि डिफिकल्टी लेव्हल टप्प्याटप्प्याने वाढवत होते. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर संघाने दर आठवड्यात २-३ वेळा डोंगरामध्ये जाऊन एकत्रपणे सराव केला. समीरण कोल्हे यांनी आम्हाला तांत्रिक चढाईसाठी गरजेचे असणारे क्लाइंबिंग टेक्निक्स शिकवले आणि त्याचा नियमित सरावही करून घेतला. त्यामध्ये टेक्निकल गेअर्स कसे वापरायचे, चढाई करताना सुरक्षितता कशी बाळगायची, रोप वर्क कसे करायचे, इत्यादी बाबींवर भर दिला. मोहिमेला निघायच्या आधी १५ दिवस सरावाची इंटेन्सिटी कमी करून आम्ही रिकव्हरी मोड सुरू केला होता, जेणेकरून मोहिमेसाठी सर्व सदस्य फिट अँड फ्रेश होऊन सज्ज होतील.

सह्याद्री आणि हिमालय ह्यांच्यातल्या altitudeमध्ये बराच फरक आहे. मग एकूणातच सराव कुठे व कसा पार पाडला? काय अडचणी आल्या त्यात?

स्नेहा गुडे : मला वाटतं, सह्याद्री हा प्रत्येक महाराष्ट्रीयासाठी आणि माऊंटेनियरसाठी सर्व काही आहे. आमच्या नियोजनानुसार सह्याद्रीत एकत्रितपणे काही सराव सत्रांची योजना केली होती; परंतु मार्च २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे सर्व काही थांबलं. मग, online गुरुकुलमध्ये सराव सुरू झाला. सकाळी 5:30 ला सर्वांनी उठायचे Group वर मेसेज करायचा व व्यायामाला सुरुवात करायची. काही व्यायाम असे होते, जे मी प्रथमच करत होते त्यामुळे ते समजणे कठीण होते. त्यानंतर काही महिन्यांनी आम्ही आमचे ट्रेक सुरू केले. मला रॉक क्लाइंबिंगच्या अभ्यासाची जास्त गरज होती. कारण त्याविषयी मला नेमकी माहिती नव्हती. हळूहळू मला ते जमू लागलं, त्यामुळे आत्मविश्वासही आला. मोहिमेची घोषणा झाल्यावर आम्ही सह्याद्रीतच पाठीवर वजन घेऊन लोडफेरीची प्रॅक्टिस सुरू केली आणि नेमकी कोरोनाची दुसरी लाट आली. परत एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आम्ही सर्व जण काळजीत होतो की, मोहिमेसाठी लोड फेरी सराव/ Endurance ट्रेक आवश्यक आहेत, पण आता ते शक्य नव्हते. याला पर्याय म्हणून समीरणदादाने काही नवीन व्यायाम व सोसायटीमध्ये वजन घेऊन जिना चढणे आणि उतरणे हा एक उपाय काढला. पण याला सोसायटीमधील काही लोकांनी परवानगी दिली नाही. कारण कोरोनाची दुसरी लाट पसरत होती. अशा सर्व परिस्थितीत हार न मानता सराव केला गेला.

संघ निवड झाल्यानंतर कांगयात्से का निवडले? शिखराची वैशिष्ट्ये काय सांगता येतील? ते किती अवघड होतं?

समीरण कोल्हे : गिरिप्रेमी संस्थेचे वरिष्ठ मार्गदर्शक- उमेश झिरपे यांच्या सल्ल्याने लेह-लदाख भागातील ही जोडशिखरं निवडण्यात आली होती. भौगोलिकदृष्ट्या कांगयात्सेची ही दोन्ही शिखरं एकाच महाकाय पर्वताचा भाग आहेत. आमच्या मोहिमेदरम्यान त्यांचा Base Camp एकच असल्यामुळे ते दोन्ही चढाई संघासाठी नियोजन सोयीचे होणार होते.

यातील KY2 हे शिखर तांत्रिकदृष्ट्या सोप्या श्रेणीतील होते, ज्यामुळे त्यावर नवोदित गिर्यारोहकांना सुरक्षित व यशस्वी चढाईसाठी अधिक वाव होता. असे असले तरी बेस कॅम्प ते शिखरमाथा ही सुमारे १२०० मीटरची सरळ उंची एकाच दिवशी पूर्ण करून सुखरूप खाली यायचं होतं. ५१०० मीटर उंचीपासून पुढे सलग १६-१८ तास अतिशय दमछाक करणारी चढाई-उतराई हे या शिखर चढाईचे प्रमुख आव्हान संघापुढे होतं. या मोसमात भारतभरातील अनेक संघ येथे या शिखरावर चढाईसाठी दाखल झाले होते. यातील सुमारे २५% गिर्यारोहकांनाच माथा गाठण्यात यश आलं होतं, हे ध्यानात घेतलं पाहिजे.

KY1 हे (६४९५ मी.) उंचीचे शिखर चढाईसाठी चांगलेच कठीण, भेदक होते. यासाठी उत्कृष्ट शारीरिक, मानसिक क्षमतेबरोबर उत्तम तांत्रिक चढाई तंत्राची आवश्यकता होती. म्हणूनच या चढाईसाठी तीन अनुभवी गिर्यारोहकांचा चमू निवडला गेला होता. सुरुवातीला खडी, सैल प्रस्तर चढाई आवश्यक सामग्रीसह Load ferry करून कॅम्प १ गाठावा लागणार होता. त्यानंतर कॅम्प २पर्यंतच्या चढाईत उत्तर-पूर्व धारेने खडतर चढाई करावी लागत होती. या धारेवरील सुट्या, अस्थिर, निसरड्या प्ररस्तरांमुळे त्यावरील मार्गक्रमण धोक्याचे बनले होते. या टप्प्यांवर सुरक्षा दोरचा विशेष उपयोग होता. त्यानंतर पुढील आरोहण टणक बर्फातून, पुन्हा एक मोठा सैल प्रस्तर टप्पा पूर्वेकडून दरीच्या बाजूने वळसा घालून चढल्यानंतर मग धारेवरून दरीच्या बाजूने भुसभुशीत हिमावरून आरोहण करून कॅम्प २ (उंची ६००० मी) गाठावा लागतो. इथून पुढील माथ्यापर्यंतची चढाई अतिशय खड्या व निसरड्या बर्फ भिंतीवरून होती. चढाईदरम्यान चूक होऊन तोल गेला तर थेट ‘Dzo Jongo’ शिखराच्या पश्चिम कड्याच्या तळाला समाधीच! बुटांना लावलेल्या पुढील बाजूच्या खिळ्यांचा (Crampons) शिताफीने वापर करीत अतिशय दमविणाऱ्या चढाईनंतर शिखराला गवसणी घालण्यात आम्हाला यश मिळाले!

या कांगयात्से शिखरांच्या चढाईचा इतिहास काही आहे का? मागील मोहिमांचे वृत्तान्त वाचले होते का? शिखर चढाई करताना काही प्राकृतिक बदल जाणवले का?

समीरण कोल्हे : चढाईचे प्राथमिक नियोजन मोहिमेला जाण्याआधीच केले गेले होते. मोहिमेचे शिखर निश्चित झाल्यानंतर आमच्या संघाने माऊंट कांगयात्से १ आणि २ च्या शिखर चढाईची प्राथमिक रूपरेषा बनवली. या शिखर मोहिमेसाठी अनुकूल असे हवामान (वेदर विंडो) कोणत्या महिन्यात असते, या पूर्वी कोणत्या वेदर विंडो मध्ये जास्तीत जास्त मोहीमा यशस्वी झाल्या आहेत, या वर्षीचा त्या कालावधीचा हवामान अंदाज कसा आहे इ. बाबींचा अभ्यास केला. प्रत्यक्षात शिखर चढाई वेळी जर प्रतिकूल हवामान असले तर काँटिन्जन्सी म्हणून एकूण योजने मध्ये काही अतिरिक्त दिवस जोडले. तसेच रेस्ट डेज आणि अक्लमटायझेशन डेज समाविष्ट केले. अशा प्रकारे मोहिमेचा कालावधी आणि तारखा निश्चित केल्या. त्या सोबतच मोहिमेच्या दैनिक आयटीनेरीची योजना आखली. त्यासाठी विविध व्यावसायिक गिर्यारोहण एजन्सीच्या माऊंट कांगयात्से १ आणि २ च्या आयटीनेरीचा अभ्यास केला. आधी यशस्वी झालेल्या इतर संघांच्या कांगयात्से मोहिमेचे व्हिडिओज आणि आर्टिकल्स पाहिले. इंडियन माऊंटनियरिंग फौंडेशनच्या वेबसाईट वर उपलब्ध असलेले पूर्वीच्या मोहिमांचे रिपोर्ट्स वाचले. गिरिप्रेमीचा एक साथी वरुण भागवत याने वर्षभरापूर्वीच कांगयात्से-२ हे शिखर चढले होते. त्याचे अनुभवकथन आम्ही वाचले होते. यावर पूर्णपणे अर्थातच विसंबून राहणे योग्य नव्हते. “Each experience and everyday is unique” या वाक्याचा आधार घेऊन आम्ही आमची वाटचाल सुरू केली होती, स्वानुभव सर्वात महत्त्वाचा मानून!

प्रत्यक्ष चढाई करताना हा प्रत्यय आलाच. एखाद्या धारेवरील अधिक धोके ओळखून मार्गात परिस्थिती नुसार बदल करावे लागत होतेच. Avalanche, snow fall, rock fall, तापमान इ. कारणांमुळे हिमालयात असे प्राकृतिक बदल होतात. म्हणूनच प्रत्येकाचा अनुभव आणि प्रत्येक क्षण वेगळा! पूर्वी झालेल्या मोहिमांचे अवशेष म्हणजे दोर, तंबू इ. कधी कधी आमच्या चढाई मार्गापासून दूरवर नजरेला पडत होते. यामुळेच केवळ मानवी अस्तित्वाची चाहूल लागत होती.

अशा मोहिमांचा खर्च खूप असतो. तेव्हा निधी, साधनसामग्री यांची योजना कशी पार पाडली ?

सायली बुधकर : मे २०२१मध्ये या मोहिमेची घोषणा झाली. त्याचवेळी करोनाच्या दुसर्‍या लाटेने भारतभर उसळी घेतली होती. माऊंटेनियरिंग मोहिमेचा खर्च हा सामाज्क दातृत्वाच्या बळावर पेलता येतो. पण, कोरोनाच्या कारणामुळे दानशूर व्यक्तींकडे जाणं योग्य वाटत नव्हतं. त्यामुले मोहिमेचा खर्च आमचा आम्ही करायचा असं ठरवलं. यात नातेवाईक, हितचिंतक व गिरिप्रेमी क्लबने आनंदाने हातभार लावला आणि यासाठी आम्ही त्यांचे ॠणी आहोत. मोहिमेसाठी रोप टेंट, स्लीपिंग बॅग आणि हार्डवेअर गिरिप्रेमीच्या स्टोअरमधून मिळाले. तर हेल्मेट, हार्नेस आमचे व्यक्तिगत होते. स्नोशूज लेहमधल्या एजन्सीने दिले. फर्स्ट एड व खाद्यपदार्थ सर्व सदस्यांनी जमा केले.

लेहची उंची समुद्रसपाटीहून ३००० मीटर आहे. मैदानी भागातून तिथं विमानानं काही वेळात पोचल्यामुळे पर्यटकांना ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्रास होतो. तुमचा काय अनुभव?

स्नेहा गुडे : आमचा प्रवास विमानाने- पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते लेह - असा झाला. दिल्लीहून लेहला दीड तासात पोचतो. विमानात असतानाच घोषणा अशी झाली की, “कृपया लेहमध्ये उतरल्यावर एक दिवस विश्रांती घ्या. प्रवास करू नका आणि कोणाला काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.” उतरल्यावर पार्किंगच्या इथंच मला उलटी झाली, डोकंही दुखत होतं. आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. त्या दिवशी भयंकर ऊन होतं. संध्याकाळी सायलीला त्रास व्हायला लागला. ती दुसऱ्या दिवशी ठीक होती; पण आम्हाला high altitude वरील आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागला होता. पण योग्य तेवढा आराम करून, Step by step उंची गाठत बेस कॅम्पला पोचेपर्यंत हळूहळू वातावरणाशी जुळवून घेता आलं.

बेस कॅम्पपर्यंत वाट कशी होती? लडाखी गावं, लोक कसे वाटले? लडाखी स्त्रियांशी बोलता आलं का?

सायली बुधकर : बेस कॅम्पपर्यंत जाण्यासाठी लेहपासून ५ दिवसाचा ट्रेक केला. २१ जुलैला आम्ही लेहजवळच्या स्क्यू या ३५०० मीटर उंचीवरील गावातून सुरुवात केली. २७ जुलैला ५००० मीटरवरील बेस कॅम्पला पोचलो. प्रत्येक पावलागणिक ऑक्सिजनची कमी जाणवत होती. साधं चालतानाही दम लागतो. तर चढताना श्वास फुलायचा. इथूनच मोहिमेतल्या आव्हानांना सुरुवात झाली. लदाख हा रूक्ष प्रदेश आहे. झाडंझुडपं फक्त दरीखोर्‍यातच दिसतात. लदाखचे प्राकृतिक सौंदर्य काही वेगळंच आहे. पिवळ्या, जांभळ्या रंगांचे डोंगरउतार व निळं स्वच्छ आकाश हे नेत्रसुखद वाटायचं. खडकाळ डोंगराच्या कुशीतील हिरवाई विलक्षण सुंदर वाटत होती. ट्रेकचा मार्ग दरीखोर्‍यातून वळसे घेत जात होता. क्वचित भेटणारे खळाळते झरे, रानफुलांच्या संगतीने मोहक वाटत. वाटेत वस्त्या, छोटी गावं लागली. घरं दगडी फरशांनी झाकलेली. वस्तीत शुकशुकाट जाणवायचा. कोरोनामुळे फार कोणी बाहेर पडत नव्हतं. थाचुंगत्से गावात मात्र एका होम स्टेमध्ये चहा देऊन एका काकूंनी आमचे छान स्वागत केले. ह्या दुरगम प्रदेशात मोजक्या शेजार्‍यांशिवाय असं नवीन कोण भेटत असेल तिला? ती अतिशय आनंदी दिसत होती. मेंढीच्या लोकरीपासून स्वेटर, कानटोपी, हातमोजे विणून ते विकण्याचा छोटा व्यवसाय होता तिचा. आम्हीही तिच्याकडून काय काय खरेदी करून निघालो.

अंजलीताई, तुम्ही ह्या टीममधील वयाने सर्वात मोठ्या किंवा खरं तर मनानं ’यंग’च म्हणायला पाहिजे. तुम्हाला स्त्री म्हणून काय जाणवलं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये?

अंजली कात्रे : स्त्री म्हणून स्वाभाविकपणे काही बंधनं येतात. मी स्वत:ला व स्वत:च्या क्षमतांना ओळखलं नव्हतं. माझा स्वत:वर पूर्ण विश्वास नव्हता. ह्या भावनेमुळे सदैव कोणाच्या तरी आधाराची, सोबतीची गरज वाटायची. पण जर स्वत:वर असलेला विश्वास हा आपल्या बोलण्यातून, कृतीतून दिसला तर मग एखादी स्त्री काहीही करू शकते. हा आत्मविश्वास डोंगरात जाणं सुरू झाल्यावर मला मिळाला. प्रामुख्याने मासिक पाळीच्या काळात थकवा, अशक्तपणा आल्यासारखा वाटतो; पण म्हणून त्याचा बाऊ करू नये असं मला वाटतं. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि कोणत्याही मुलीला ह्यातून सुटका नाही हे एकदा मान्य केलं की, त्याचा स्वीकार करणं सोपं होतं. आणि दैनंदिन जीवनात त्याचा अडथळा वाटत नाही. त्या दिवसात स्वतःकडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं इतकंच. ह्या मोहीम काळात बहुतेक सर्व मुलींची मासिक पाळी होऊन गेली. कोणालाही त्याचा त्रास झाला नाही. जेव्हा त्रास वाटला, तेव्हा त्या दिवशी थोडी विश्रांती घेतली इतकंच.

लहानपणापासून एक खंत होती. मी मुलगी असल्यामुळे मला नेव्ही, आर्मीमध्ये तर जाता आलं नाही. कारण शिक्षण जसं संपलं, लग्न आणि संसारात बुडाले. पण गिरिप्रेमी संस्थेच्या संपर्कात आल्यावर ही खंत गेली. डोंगरदर्‍या भटकणे, रॉक क्लाईबिंग, माऊंटेनियरींग करू लागले. हळूहळू प्रगती करू लागले. आपण शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा कुठेही कमी पडणार नाही, हे आम्हा सर्व जणींना या मोहिमेतून व्यवस्थित जाणवले आहे.

कुठल्याही मोहिमेत बेस कॅम्प हा कणा असतो, असं म्हणतात. तेव्हा त्याबद्दल सांगशील का? त्याचे नियोजन कसे होते, सुविधा काय, व्यावसायिक एजन्सीला काय काम दिलं होतं?

स्मिता कारिवडेकर : बेस कॅम्प हा शिखराच्या पायथ्याशी उभारला जातो. या कॅम्पला मोहिमेच्या पूर्ण कालावधीपर्यंत लागणारे रेशन, गिर्यारोहण इक्विपमेंट्स, बाकी सर्व साधनं साठवली जातात. मोहिमेचे दळणवळण बेस कॅम्प वरून सांभाळले जाते. या दृष्टीने मोहिमेचा आधारतळ त्याला म्हणता येईल.

माऊंट कांगयात्से १ आणि २चा बेस कॅम्प एकच आहे. आणि तो ५०४५ मीटर्स उंचीवर आहे. मोहिमेचे बेस कॅम्प नियोजन व्हाईट मॅजिक नावाच्या व्यावसायिक गिर्यारोहण संस्थेकडे सुपूर्त केले होते. बेस कॅम्प सेट अप करण्यासाठी लागणारे सगळे सामान घोडे आणि खेचरांच्या मदतीने बेस कॅम्पपर्यंत आणले होते. टीमचे, शेर्पांचे, गाईड्सचे आणि किचन स्टाफचे मुक्कामाचे टेंटस्‍, किचन, डायनिंग टेंट आणि टॉयलेट टेंटस्‍ बेस कॅम्पला उभारले होते. सुविधा छान होती. टीमच्या जेवणाची जबाबदारीसुद्धा व्हाईट मॅजिककडे होती. शिवाय मोहिमेचे शेर्पा- मिंग्मा व मिंग तेंबा आणि गाईड्ससुद्धा व्हाईट मॅजिकतर्फे मदतीला आले होते.

बेस कॅम्पवरून पर्वत शिखरं दिसतात का? चढाईचे नियोजन कोणी केले, कसे केले? हे नियोजन संघ एकत्रपणे चर्चा करून की शेर्पा, गाईड ठरवत होते?

स्मिता कारिवडेकर : बेस कॅम्पच्या दिशेने अप्रोच ट्रेक सुरू केल्यापासून तिसऱ्या दिवशी आम्हाला माऊंट कांगयात्से १ आणि २ या दोन्ही शिखरांचे प्रथम दर्शन मार्खा व्हॅलीमधून झाले. बेस कॅम्पला पोहोचल्यावर मात्र दोन्ही शिखरं स्पष्ट दिसायला लागली. बेस कॅम्पच्या मागच्या बाजूला माऊंट कांगयात्से-२ च्या शिखरमाथ्यापर्यंतचा रूट अगदी स्पष्ट दिसत होता. शिखर माथ्याच्या खाली असलेली रिज आणि पुढे माथ्यापर्यंतचा अप्रोच दिसत होता. बेस कॅम्पच्या डाव्या बाजूला कांगयात्से १चा इस्ट फेस आणि कॅम्प १ स्पष्ट दिसत होता. कॅम्प २च्या वरच्या रूटचाही अंदाज येत होता आणि शिखर माथ्यावरचा कॉर्निस स्पष्ट दिसत होता. शेर्पा आणि गाईड कडून आलेल्या सुचनेनुसार चर्चा करून, काही बदल करून मोहिमेची आयटीनेरी निश्चित केली. दर दिवशीच्या प्रत्यक्ष हवामानानुसार संघ आणि शेर्पा/गाईड्स यांच्यात चर्चा होऊन पुढच्या योजनेचे निर्णय आम्ही घेत होतो. साहाय्यक म्हणून असलेले हे शेर्पा व गाईड्स यांनी अनेकवेळा माऊंटेनियरींग मोहिमांमध्ये भाग घेतला होता. कांगयात्से-१ हे शिखर तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्यामुळे शिखर मार्गावर रोप फिक्स करून चढाई मार्ग खुला करावा लागणार होता. त्याची जबाबदारी मिंग्मा व मिंग तेंबा शेर्पांकडे होती. कारण, हवामानाची अनिश्चितता, आम्ही ठरवलेले नेमकेच मोहिमेचे दिवस याची मर्यादा आणि आमच्या तांत्रिक कौशल्यातील त्रुटी हेही होतं. शिखराच्या शेवटच्या टप्प्यात शेर्पांचं अनुकरण आम्ही सहज करत होतो. याचं कारण अर्थातच, पुण्यात असताना घटवून केलेला सराव.

प्रियांका, तू कांगयात्से १ व २ अशी दोन्ही शिखरं सर केलीस? तुझा कांगयात्से-१ शिखर सर करण्याचा अनुभव सांगशील?

प्रियांका चिंचोरकर : २५ जुलैला आम्ही सगळे बेस कॅम्पला पोचलो. २६ तारखेला रेस्ट घेतली. आणि मग २७ ला कांगयात्से-१च्या कॅम्प १ला लोडफेरीला गेलो होतो. जाताना थोडा पाऊस, थोडं धुकं होतं. हा कॅम्प १ पर्यंतचा रूट खूप छान आहे. कारण या भागात सर्वात जास्त फ्लोरा आहे. ५००० मीटर्सच्या आसपास असलेल्या या भागात सगळ्यात जास्ती फुलं आहेत. माझासाठी ही आवडीची गोष्ट कारण, त्रिशूळ मोहिमेपासून फुलांवर अभ्यास करायचा छंद लागला होता. हा फुलाफुलांचा टप्पा बर्‍यापैकी ग्रॅजुअल आहे, पुढे चढाईचा कोन वाढतो. मध्ये एक झरा लागला, मग एका ठिकाणी सपाटीनंतर दगडांच्या कपच्यांनी विखुरलेल्या टिपिकल लदाखी भागातून चढावं लागलं. इथून पुढचा रूट तसा दिसत नव्हता. आम्ही प्रेडिक्ट करून चाललो होतो की, एक-दोन तासात पोचू कॅम्प-१ला. चालायला लागल्यावर कळलं की, अँगल बराच वाढलाय, वेळ लागतोय. दमही लागत होता. पण पहिलाच दिवस असल्याने हळूहळू जात, उजवीकडे दिसणाऱ्या कांग्यत्से २ चा route पाहत, आजूबाजूला valley मध्ये दिसणारे हिरव्या निळ्या रंगाचे glacial lakes, ice fall सारखी formations असं विहंगम दृश्य एंजॉय करत कॅम्प-१ ला पोचलो. कॅम्प-२ तर जवळच दिसत होता. आम्ही कॅम्प १ ला टेंट लावले. शेर्पा-गाईड असले, तरी आम्हीही आमच्यापरीने सगळीच कामं करत होतो. इथे पोचल्यावर सायलीला थोडा त्रास व्हायला लागला. लगेच आम्ही खाली निघालो. बेस कॅम्पला तिचं दुखणं वाढलं. माऊंटेनियरिंग खेळात पर्वत आपल्याहून बलाढ्य आहे याची प्रचिती आली. हवामान बिघडल्यामुळे पुढचे २ दिवस आम्ही बेसकॅम्पलाच वाट बघत काढले. सतत २ दिवस बेसकॅम्पला गारांचा वर्षाव, पाऊस आणि धुकं होतं. बेसकॅम्पच्या आजूबाजूची शिखरं आणि दऱ्या ढगांमध्ये लुप्त झाल्या होत्या. दोन्ही शिखरंसुद्धा दिसेनाशी झाली होती. टपटपणारा स्नोफॉल बघत आम्ही टेंटमध्ये बसून राहिलो होतो. पण एक चांगली गोष्ट झाली सायलीची तब्येत या दोन दिवसाच्या रेस्टमध्ये सुधारली.

३१ जुलैला मी, स्मिता, समीरण व दोन्ही शेर्पा असे पुन्हा चढाई सुरू केली. त्या दिवशी कॅम्प-१ गाठला. यावेळेस मागच्यापेक्षा कमी वेळ लागला. १ ऑगस्टला कॅम्प-२ ला जाण्यासाठी आम्ही रकसॅक पाठीवर चढवल्या. टणक आईसवर खडकाळ तुकडे खाली ढकलत होते. पुढे एक स्नो वॉल उभी ठाकली. आम्ही बुटावर क्रॅम्पॉन चढवले. शेर्पांनी बांधलेले दोर कॅरेबिनरमधून ओवले. जुमार अडकवले आणि चढाई चालू केली. एका मागे एक हिमभिंती चढलो आणि चार तासांनी कॅम्प-२वर पोहोचलो. टेंट लावले आणि हिम वितळवण्यास स्टोव्हवर ठेवले. शेर्पा आणखी पुढे जाऊन दोर बांधून परत आले आणि आमच्या आराम करण्याची ऐशीतैशी झाली. कारण त्यांनी आज रात्रीच अखेरची चढाई करण्याचा आग्रह धरला. आम्ही एकत्र जमून चर्चा केली. प्रतिकूल हवामान तीव्र होईल ही शक्यता आणि ६००० मीटर उंचीवर अधिकची रात्र म्हणजे शक्तिपात ही अडचण ठरेल हे लक्षात घेतले. शेर्पांना होकार दिला. रात्री १ वाजेपर्यंत snowfall होत होता. साधारण १.३० च्या सुमारास तो कमी झाला. हेड टॉर्च लावून निघालो. कॅम्प १पासून शिखरापर्यंत ९०० मीटर लांबीचा पॉलिप्रोपेलिन रोप शेर्पांनी बांधला होता. इतका तीव्र चढ मी कधी अनुभवला नव्हता. कांगयात्से-१ शिखर सतत दूर आणि उंचावर वाटत होते. फिक्स लाईन एक मानसिक आधार होता एवढेच. प्रत्येक पाऊल शर्थीने वर उचलून ठेवावं लागत होतं. स्नो आणि आईसचे १५ ते २० टप्पे पार केले. एक खडकाळ टप्पा पार झाला. पहाटेचे पाच वाजून गेले होते. मला वाटलं आता शिखर जवळच असावं. पण अजूनही दोन तास टो किक करणं भाग आहे, असं संजीव रायने सांगितले. मिंग तेंबा शेर्पा सर्वात शेवटी होता. स्मिता, समीरण आणि मी काही अंतर ठेवून होतो. आता शिखर दिसून आले. कॉर्निस पण स्पष्ट दिसत होता. मिंग्मा शेर्पा दोर बांधत शिखरावर पोहोचला होता.

सूर्याचा प्रभाव जाणवायला लागला. पुढं जायचंच ह्या इराद्याने आम्ही जात राहिलो. आणि २ ऑगस्टला सकाळी १० वाजता कांगयात्से-१ शिखर यशस्वीपणे सर केलं. शिखरावरून नयनरम्य नजारा होता. थोडेसे ढग आणि निळ्या गर्द आभाळाच्या छताखाली एकामागोमाग एक वर आलेली शिखरंच शिखरं. ३६० डिग्रीत नजर फिरवताना माऊंट नून-कून, स्तोक गोलप , झो झोंगो ही शिखरं व्यवस्थित लक्षात आली. मी, स्मिता व समीरण खूपच भावूक झालो होतो. इतके दिवस डोक्यात जो ध्यास लागला होता तो पूर्णत्वाला पोचला. पुण्यात झिरपेमामांनाही फोन करून ही आनंदबातमी दिली. शिखरावर असताना कळलं की, कांगयात्से-२ टीम हो शिखराच्या अगदी जवळ आहे आणि थोड्याच वेळात शिखरमाथा गाठेल. आता तर आनंद द्विगुणित झाला. हा दिवस नेहमीच माझ्या आठवणीत राहील. अर्ध्या तासाने खाली जायला निघालो. उतरताना तीव्र उताराच्या जागी रॅपलिंग करावं लागलं. त्यामुळे तसं कॅम्प २ला पटकन्‍ आलो. मग दोन्ही कॅम्प गुंडाळून बेसला सुखरूप पोचलो. २-३ दिवसांनी सगळेच एकत्र जमले होते. त्यामुळे बेस कॅम्पवर आनंदाचं वातावरण पसरलं होतं. तिथे स्थापित केलेल्या छोट्याशा मंदिरात मी जाऊन बाप्पाचा पाया पडले. २-३ दिवसांपूर्वी एकतरी शिखर चढाई आता करू शकू का या अनिश्चितेच्या आणि आजच्या दिवसाच्या आनंदाचा मी विचार करत होते. Only change is constant, rest everything is impermanent याची परत नव्यानी जाणीव झाली. आपल्यालाही क्षणात आनंद, क्षणात दुःख, क्षणात राग, किती अस्थिर आहे मन! To be completely involved in an activity and still being completely detached from it mentally was what I was experiencing.

या बेस कॅम्पच्या आनंदात सामील असलेली पद्मजा नाही म्हणलं तरी थोडी नाराज होती. तिला एकटीलाच एक दिवस बेसला काढावा लागला होता. सगळ्यांचंच समीट झाल्यामुळे आता पद्मजाचंही व्हायला हवं, असं मला वाटलं. सगळ्यांनी मिळून चर्चा केल्यावर असं ठरलं की, कोणीतरी एकानंच पद्मजासोबत समीट अटेंप्ट करावा. एका दिवसाच्या रेस्टवर दुसरं ६२५० मीटर्सचं शिखर चढाई करता येण्याची माझी शारीरिक आणि मानसिक तयारी मला जाणवत होती. पद्मजाचंही शिखर summit व्हावं हे या माझ्या आत्मविश्वासा मागचं बळ होतं. माऊंटन्सची मला तशी नेहमीच साथ मिळाली आहे. अर्थात, सुरुवातीच्या दिवसात गंगोत्री-३ आणि त्रिशूल मोहिमांमध्ये मला स्वतःच शरीर altitude ला कशी साथ देतं, याचा चांगला अभ्यास करता आला. त्या मोहिमा अयशस्वी झाल्या तरी मला खूप काही शिकवून गेल्या. ह्या थोड्या फार अनुभवाचा फायदा मला कांगयात्सेला झाला. माझ्या मनानं उचल खाल्ली. शिवाय, लीडर म्हणूनही मी पद्मजाच्या मागे उभं राहायचं ठरवलं. मी, पद्मजा, व सनी गाईड कांगयात्से-२ कडे निघणार होतो. उर्वरीत टीम आमचे टेंट सोडून, बाकी सर्व गुंडाळून परतणार होती.

पद्मजा, तू एकटीने बेस कॅम्पला एक दिवस काढलास, शिवाय तुझे समीटचे दोन प्रयत्न अयशस्वी झाल्यावरही तू कांगयात्से-२च्या समीट कसं सर काय केलंस?

पद्मजा धनवी : कांगयात्से-२ची शिखर चढाई ही बेस कॅम्प ते डायरेक्ट शिखर माथा अशी आहे. बेसकॅम्पला पोचल्यानंतर एक दिवस रेस्ट घेतल्यानंतर पुढच्या दिवशी २७ ला रात्री आम्ही समीट अटेंप्ट केला. पण, ६००० मीटर्सच्या आसपास हवा खूपच खराब झाली. आणि शिखरमाथा जवळ असूनही मला परतावं लागलं. त्यानंतर २९ जुलैला रात्री संघाने पहिला समीट अटेंप्ट केला. पण प्रतिकूल हवामानामुळे तो पुन्हा अयशस्वी ठरला. १ ऑगस्टला हवामान चांगलं असेल असं कळलं. तेव्हा या दिवशी समीट अटेंप्ट करायचा ठरला. मी दमल्यामुळे रेस्ट करणार, नि सायली माझी इक्विपमेंटस्‍ घेऊन जाणार, असं ठरलं. १च्या रात्री सायली, अंजली, स्नेहा आणि सनी गाईड यांनी चढाई सुरू केली. आणि २ ऑगस्टला सकाळी ते शिखरावर पोचले. १ तारखेला बेस कॅम्पवर फक्त मी आणि गाईड कम कूक अर्जुन दोघंच उरलो होतो. मला असं वाटत होतं की, एक्सिपिडीशन लांबल्यामुळे हाच फायनल अटेंप्ट असणार. या विचाराने मी खूप अस्वस्थ झालेच. पर्वत प्रत्येकवेळी आपल्या मर्यादांना जोखत असतात. ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मी रात्रभर जागी होते. २ तारखेला दोन्ही शिखरं समीट झाल्याच्या बातम्या आल्या. एकीकडे मला आनंद होत होता, तर दुसरीकडे मला समीट करता न आल्याचं प्रचंड दु:ख. माझी ही पहिलीच हिमालय मोहीम होती. माझे २ अटेंप्ट वाया गेले होते. आणि आता इथं मी एकटी बसून होते. ह्यामुळे खूप निराश वाटत होतं. मी रडूनही घेतलं. कांगयात्से-१चा संघ बेस कॅम्पला परत आला. सर्वांनी एकत्र चर्चा केल्यानंतर असं ठरलं की, ४ ऑगस्टला प्रियांका, मी व गाईड सनीच्या मदतीने समीट अटेंप्ट करायचा. मला हुरूप आला. पाच-सहा दिवस इथं काढल्याने मी हवामानाला सरावलेही होते. तरी थोडी साशंकताही होती. रात्री १०वाजता आम्ही निघालो. सनी सर्वात पुढे, मग मी, मग प्रियांका असे रोप-अप झालो. आमच्याबरोबरच आणखी एक ग्रुप समीट अटेंप्ट करत होता. रात्री २ला आम्ही ग्लेशिअरवरून चढाई सुरू केली. ६० अंशांचा कोन असेल. इथे क्रिव्हासेसही होत्या. पहिल्या अटेंप्टच्या वेळी येताना मी इथं कमरेवढ्या भुसभुशीत हिमात रुतले होते. सनीने आईसअ‍ॅक्सने बाजूचं हिम खोदून मला बाहेर काढलं होतं. पहाटे ५.३०ला हवामान परत बिघडलं. एका ठिकाणी रोप संपल्यावर, पुढचा तीव्र चढ हा रोपशिवाय चढावा लागणार होता. ती चढाई खूपच दमवणारी होती. तरी कसंबसं ते चढून, पुढे धारेवरच्या घट्ट बर्फातून चालत निघालो. धारेच्या एका बाजूला खोल दरी होती. हे अंतर सावकाशपणे पार केल्यावर ५ तारखेला सकाळी १० वाजता समीटला पोचलो. शिखरावर पोचल्यावर मी अक्षरश: पर्वतापुढे नतमस्तक झाले. शिखरमाथ्यावर अर्धा तास घालवून आम्ही उतरायला सुरुवात केली. कारण हवा बिघडायला लागली होती. उतरताना काही अडचण आली नाही आणि आम्ही ३ वाजता बेसला पोचलोही.

आत्तापर्यंतच्या मोहिमेतल्या या गोष्टीत ’हवामान बिघडलं’ हे बर्‍याचदा ऐकलं. त्याविषयी सांगाल का?

समीरण कोल्हे :हिमालयातील मोहिमेत हवामान हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर असतो. या दोन्ही शिखर चढाईसाठी सुमारे १० दिवस आम्हाला ५००० मीटर्सच्या आसपास मुक्काम ठोकावा लागला होता. यातील अनेक दिवस प्रतिकूल (unfavourable) हवामानाचा सामना संघाला करावा लागला. दिवसात बहुतेक वेळा दाट धुकं, सोसाट्याचा वारा, गारांचा पाऊस, त्यानंतर अतिशय घसरणारं तापमान हे नित्याचंच झालं होतं. येथील एकूण वास्तव्यात साधारणपणे फक्त ३-४ दिवस ठीक वातावरण मिळालं. अशा वातावरण बदलाचा चढाईवरच नाही तर संघाच्या मानसिकतेवरही अनिष्ट परिणाम होऊ लागला होता. उत्तम हवामानाच्या प्रतीक्षेत अजून नक्की किती दिवस थांबावे लागेल? आपले summit होईल का? हे आव्हान आपल्याला झेपेल का?, असे अनेक विचार विशेषतः अननुभवी सदस्यांच्या मनात घोळत राहतात.

शिखर चढाई करताना बाहेरील तापमानचा विशेष फरक पडतो. अंतिम चढाई बहुदा रात्रीच सुरू होते. उतरलेल्या तापमानात हिमकण आकुंचन पावून चढाईसाठी बर्फ भिंतींवर योग्य घनतेचा फायदा होतो, बुटांचे खिळे सुरक्षितरीत्या बर्फात रुतण्यास मदत होते. याउलट, दिवसा तापमान वाढल्यानंतर तेच हिमकण प्रसरण पावतात. तीव्र उतारांवरील हिम भुसभुशीत होते.. माथ्यावरून उतरताना गिर्यारोहकाचे निम्मे-अधिक शरीर त्यात धसते. त्यातून आपली सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात देखील दुखापती, अपघात होऊ शकतात. KY-1ची यशस्वी चढाई मुख्यतः हवामान अनुकूल नसताना केली गेली, हे एक विशेष आहे. अर्थात, यात सोबत असणाऱ्या मिंग्मा व मिंग तेंबा या अनुभवी शेर्पांचा वाटा नक्कीच मोठा आहे!

लदाख हा पर्वतीय सौंदर्याचा अफाट खजिना आहे. तुम्हाला तिथं काय दिसलं?

पद्मजा धनवी : निसर्गावरचं प्रेम हेसुद्धा गिर्यारोहण करण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. समुद्रसपाटीपासून उंचीवर जसा हवेच्या दाबात, तापमानात फरक पडतो, तसा तिथल्या ecosystem वरसुद्धा दिसून येतो. या मोहिमेत बरीच दुर्मीळ, फक्त तिथंच येणारी फुलं पाहिली. विशेषत: मार्खाला जाताना वाटेतील हंकर या गावाजवळ दूरवर पसरलेल्या रंगीबेरंगी फुलांच्या माळानं डोळे दिपून गेले. तसेच Tibetan Partridge, snowflinch, snow pigeons यांसारखे बरेच पक्षी पाहायला मिळाले. याव्यतिरिक्त बेसकॅम्पच्या वाटेवर marmots, pika हे प्राणी पाहिले. एका समीट अटेंप्टच्या रात्री सुमारे ५२०० मीटर उंचीवर snow fox पाहायला मिळाला, लालसर फर आणि झुपकेदार शेपूट असलेला हा प्राणी चांगलाच लक्षात राहिला.

या मोहिमेतून तुम्हाला काय फायदा मिळाला? तुमच्यात काय बदल झाला?

पद्मजा धनवी : शिखर सर केल्यावरही जवळपास दोनदा ती उंची गाठण्याचा आनंद माझ्यासाठी मोलाचा होता. The joy I felt was more spiritual than in gesture. मोहिमेदरम्यान सर्व टीमने आणि आमच्या मार्गदर्शकांनी दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचं होतं. ह्या चढाईमुळे माझा वैयक्तिक फायदा झाला. कारण, तणावाच्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे कळलं; पण सामाजिकदृष्ट्यासुद्धा ही महिलांची मोहिम एक मोठं पाऊल आहे, असं वाटतं.

अंजली कात्रे : २०१८ साली माउंट कॅथेड्रल मोहिमेत सहभागी झाले होते. तेव्हा मी शिखर माथा गाठू शकले नव्हते. प्रचंड निराश झाले होते मला वाटत होते की, मी पूर्ण अपयशी ठरले. इथून पुढे मला परत कधी अशी संधी मिळणार नाही. पण ह्या मोहिमेत पहिल्याच प्रयत्नात आम्ही तिघी जणी व आमचे दोन शेर्पा-गाईड असं मिळून शिखर सर केलं. ह्यामुळे माझ्यातल्या सकारत्मकतेला प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालंय. कुठलीही गोष्ट ठरवली की, करण्याचं बळ मिळालं आहे. आज मी ५५ वर्षाची आहे. ह्या वयात कुठलीही व्याधी जडली नाहीये. पुरुषांपेक्षा महिलांना स्वतःचा छंद जोपासताना थोडी तारेवरची कसरत होते, पण जर आंतरिक इच्छा जबरदस्त असेल आणि आपल्यामध्ये सकारात्मक बदल होताना दिसला की परिवारातील सदस्य कधी स्वतः हून तर कधी नाईलाज म्हणून मदत करतात. मुले लहान असताना त्यांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती व माझ्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे मी पार पडली आहे. आता मुलं मोठी आहेत तेही घरातल्या कामात हातभार लावू शकतात. आर्थिकदृष्ट्या सांगायचं झालं तर आमचं कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे. मोहिमेचा खर्च जास्त असतो. अशा वेळी मनात विचार येतो की स्वतः साठी इतका खर्च करणं योग्य आहे का, पण अशा वेळी मी स्वतःची समजूत काढते की आयुष्यात दागिने/ भारीतले कपडे ह्यावर मी कधीही खर्च केलेला नाही. त्यामुळे स्वतः वर खर्च करताना अपराधी वाटण्याचं अजिबात कारण नाही. या वयात आपली आवड ओळखणं, ती जोपासण्यासाठी त्या क्षेत्रातल्या सर्वोत्तम अशा संस्थेची जोडलं जाणं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे व प्रोत्साहनामुळे नवीन मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. आईवडलांची पूर्व पुण्याई माझ्या पाठीशी सदैव असणारच आहे.

ही मोहीम चालू असताना किंवा झाल्यावर माऊंटेनियरींगच्या खेळातला एक खेळाडू म्हणून काय वाटलं?

सायली बुधकर : मी कांगयात्से-१च्या पहिल्या कॅम्पला लोड फेरी केली; पण माऊंटन सिकनेसने मला गाठले. कसाबसा बेस कॅम्प गाठला. डोकेदुखी, मळमळ यामुळे हैराण झाले. औषधं आणि टीम मेंबर्सच्या सहकार्यामुळे दोन दिवसात बरी झाले. आमच्या आचार्‍यांपासून गाईड लोकांपर्यंत सर्वांनी टीम म्हणून एकदिलाने प्रयत्न केले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

पर्वत हे एका विशाल निसर्गाचा भाग आहेत. त्यांच्यापुढे आपण मुंगीसारखे आहोत. तेव्हा त्यांच्याविषयी आदर राखणं आवश्यक आहे. निसर्गाला गृहीत न धरता, जी काही परिस्थिती आहे ती नम्रपणे स्वीकारली तरच ध्येय गाठता येईल. निसर्गाशी समरस होणं खूप महत्त्वाचं. शरीरक्षमतेबरोबरच मानसिक क्षमताही यात महत्त्वपूर्ण ठरते. बर्याचदा असं झालं की, शरीर थकलं होतं; पण मन पुढे जायला सांगत होतं. हेच मला खेळाडू म्हणून सांगायला आवडेल की, टीम effort, शारीरिक क्षमता व नम्रपणा यांच्या आधाराने आपण ध्येयप्राप्ती करू शकतो नक्कीच.

प्रियांका, लीडर म्हणून मोहिमेची सांगता होताना तुला काय वाटलं? तुझ्या भावना काय होत्या?

प्रियांका चिंचोरकर : Altitude वर असताना मन आणि शरीर दोन्ही exhaust होतं. Past-future, करिअर, घरच्या अशा विविध विचारांनी अस्वस्थता येते. अशा अवस्थेत, खराब हवामानाला तोंड देऊन मी दोन्ही शिखरं चढू शकले. मीच नाही, team मधल्या प्रत्येक मेंबरला ही संधी मिळाली. सायली पहिल्या दिवशी आजारी पडूनही कांगयात्से-२ चढू शकली. पद्मजा, अंजलीताई यांचेही अटेंप्ट एकदा फेल गेल्यावर त्यांनी जिद्द दाखवून समीट केलं. ही मला वाटतं खूप समाधानाची गोष्ट आहे. एक team म्हणून आपण स्वप्न बघतो आणि ते साध्य करतो हे प्रचंड आनंददायी आहे.

पर्वत साद घालतो म्हणून म्हणे माऊंटेनियर धावतो त्याच्याकडे. हे खूप खरंय. मी mountains मध्ये हाच आनंद लुटण्यासाठी जाते. तो घेऊन आपण परत आपापल्या शहरातल्या आयुष्यात येऊन शांतचित्ताने काम करू शकतो, असा माझा अनुभव आहे. मला हे बऱ्याचदा जमलं आहे. यापुढेही मला यातून peace आणि happiness एवढंच हवं आहे.

प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय सांगाल शेवटी?

समीरण कोल्हे :सर्व महिला माऊंटेनियर्सचे पालक, नातेवाईक, मित्र यांचे त्यांनी या संपूर्ण प्रवासात दिलेल्या प्रोत्साहन व सहकार्याबद्दल आम्ही विशेष आभारी आहोत, ज्या शिवाय हे काहीही शक्य नव्हतं. इतर पालकांनाही मी त्यांच्या पाल्यांना माऊंटेनियरींगची ओळख करून द्यावी, अशी विनंती करीन. यातून मिळणारी अनुभवांची शिकवण त्यांना आयुष्यभर मार्गदर्शन करणारी ठरेल! पर्वतासमोर कायम नम्र राहून माऊंटेनियरींगची तत्त्वं व नियम पाळून सर्वच माऊंटेनियर भविष्यात आपली दमदार वाटचाल सुरू ठेवतील आणि तंत्रशुद्ध माऊंटेनियरींगचा प्रसार करतील, अशी खात्री बाळगूया!

संकलन : टीम कांगयात्से
smitakariwadekar@gmail.com

संपादन : हृषीकेश पाळंदे
(मिसा Online)