‘किचन कॅबिनेट’, राज्यमंत्री, स्वतंत्र पदभार

०५ नोव्हेंबर २०२५

माध्यमांतर

राम जगताप यांच्या ‘किचन कॅबिनेट, राज्यमंत्री, स्वतंत्र पदभार’ या लेखात एका पुरुषाचा स्वयंपाकघरापर्यंत पोचलेला प्रवास केवळ विनोदी किस्स्यांच्या माध्यमातून नव्हे, तर सामाजिक भिंती हलवणाऱ्या आत्मपरीक्षणाच्या रूपात उलगडतो. प्रेमाच्या नात्याने सुरुवात झालेली ही पाककला पुढे साथीदार, वडील आणि नागरिक म्हणून जबाबदारीची शाळा ठरते. ऑम्लेटपासून अंडा-भात, भेंडीपासून भरलेल्या कांद्यापर्यंतची त्याची रेसिपी फक्त चवीची नाही, तर बदलत्या कुटुंबसंस्कारांचीही आहे. कोरोना काळातल्या घरगुती वास्तवातून नात्यांचे आणि जबाबदाऱ्यांचे नवे अर्थ उमगतात, तर ‘किचन कॅबिनेट’ ही कल्पना लिंगभावाच्या चौकटी मोडणारी ठरते, जिथे प्रेम, शिकणं आणि सहजीवन यांचा परिपक्व संगम सुगंधी पदार्थांइतकाच हळवा आणि विचार करायला लावणारा आहे. (पुरुष उवाच, दिवाळी 2024 मधून साभार.)

एरवी तुम्ही कितीही राकट, आगावू, उद्धट, पुरुषी अहंकार असलेले ‘पुरुष’ असा, प्रेम ही गोष्ट तुम्हाला थोडंफार तरी मायाळू व्हायला लावतेच! त्यामुळे लग्नपूर्व दीड-दोन वर्षांच्या कालखंडात माझ्यावर बुलेट ट्रेनच्या वेगासारखे झपाट्यानं पाक-संस्कार होत गेले, जे आधीच्या पंचवीसेक वर्षांत जवळपास ‘ना के बराबर’ होते. त्यातून चहा, कॉफी, ऑम्लेट, खिचडी, असं अग्निहोत्र सुरू झालं. माझी प्रेयसी तेव्हा फक्त उकडलेलं अंडं खायची, तेही कधीतरी. एकदा मी तिच्यासाठी ऑम्लेट केलं, ते तिला आवडलं. आणि त्या दिवसापासून ‘माझ्या हातचं ऑम्लेट’ ही तिची एक ‘फेवरट डिश’ झाली. ऑम्लेटसोबत मी बनवलेली कॉफीही प्रेयसीला आवडू लागली. मग काय, प्रेयसीची फर्माईश ‘बनाइये खाना, परोसिये प्यार’ या ‘भारत गॅस’च्या टॅगलाईनसारखी साकार होऊ लागली.

सुरुवातीचे दिवस हे सुरुवातीपासून सुरुवात करण्याचे दिवस असतात. त्यामुळे या दिवसात स्वयंपाक करणाऱ्या बायकोला लागेल ती किडूकमिडूक मदत करणं, ऑफिसवरून येताना किराणाचा एखाद-दुसरा जिन्नस किंवा भाजी आणणं आणि मुख्य म्हणजे तिने केलेल्या पदार्थाचं तोंडभरून कौतुक करणं, अशा छोट्या-छोट्या गोष्टीही पुरेशा ठरतात. ऑम्लेट फर्माईशी एका ठरावीक आवर्तनानं घडत होत्या. एक-दोनदा भुर्जी वगैरेही करून पाहिली, पण ती बायकोला आवडली नाही. नॉनव्हेज ती खात नव्हती आणि तिला बनवताही येत नव्हतं. मी मात्र चिकन-प्रेमी गडी. त्यामुळे आमच्या पाक-प्रणयाराधनात मध्ये मध्ये ‘रुकावट के लिए खेद हैं’ असा ‘ब्रेक’ही येत होता. त्यासाठी मला बाहेर जाऊन किंवा बाहेरून आणून खाण्याचे पर्याय मात्र खुले होते. त्यांची चव चाखून पाहण्याचं काम बायको करायची. एकदा मी बाहेरून सुकट आणलं. म्हणजे कोळंबीची चटणी. बायकोनं ती चाखून पाहिली खरी; पण त्या अगदी छोट्या कोळंबीचे डोळे पाहून तिला मळमळायला झालं.

एकदा शेजारच्या मैत्रिणीने आम्हाला फ्रेंच-टोस्ट दिले. हा प्रकार आम्हा दोघांनाही आवडला. म्हणून त्याची रेसिपी तिला विचारून करून पाहिली. तर ती चांगली झाली. मग ऑम्लेटच्या जोडीला हा नवा प्रकार मी बनवू लागलो. थोडक्यात, सांगायचं तर चहा, कॉफी, ऑम्लेट आणि फ्रेंच टोस्ट अशा मर्यादित स्वरूपात असलेला माझा पाक-सहभाग आमच्या तत्कालीन सहजीवनात पुरेसा ठरत होत होता किंवा वेळ निभावून नेत होता. कधीतरी बायकोसोबत किंवा एकट्यानं भाजीमंडईत जाऊन भाजी आणणं, दुकानात जाऊन किराणा आणणं, अशा एखाद-दुसऱ्या कृतीची जोड त्याला मिळत होती. त्यापेक्षा जास्त सहभागाच्या रितीचे संस्कार माझ्यावर झालेले नव्हते, आणि बायको ‘आस्ते कदम’ स्वभावाची व विचाराची असल्यानं तिलाही घाई नसावी.

दरम्यान आम्हाला मुलगी झाली. लेक दीडेक वर्षांची असताना एका रात्री आम्ही तिला आम्हा दोघांचं आवडतं ऑम्लेट भरवलं. लेकीनं ते आवडीनं खाल्लं खरं, पण रात्री दोनच्या सुमारास तिला उलट्या सुरू झाल्या. पुढचा तासभर ती उलट्या करत होती. आम्हा दोघांच्या ऑम्लेट-प्रेमाला लेकीनं पहिल्याच वेळी ‘जोर का धक्का’ दिला. त्यानंतर दीडेक वर्षं तरी आम्ही तिला परत ऑम्लेट भरवण्याच्या फंदात पडलो नाही. मग धीर करून परत एके दिवशी तिच्यावर भरवलं. पुन्हा तिला उलट्या झाल्या. मग मात्र आम्ही दोघंही निराश झालो आणि धास्तावलोही.

त्यात करोना आला आणि घराबाहेर पडण्यावर मर्यादा आल्या. शिवाय प्रत्येक गोष्ट सॅनिटाईज करा, सतत हात धुवा, संपर्क टाळा, अशा नव्या गोष्टी उपटल्या. करोनाकाळ लहान मुलांसाठी जास्तच त्रासदायक ठरला. कारण खेळायला घराबाहेर जायचं नाही, मित्रमैत्रिणींशी खेळायचं नाही, यामुळे ती अगदी वैतागून जात. लेकीला दिवसभर घरात रमवणं आणि तिच्याशी खेळणं, हा एक उद्योग होऊन बसला. आम्हा दोघांना एकमेकांच्या कामाबरोबर लेकीशी खेळण्याचंही वेळापत्रक तयार करावं लागलं. नवनव्या गोष्टी शोधाव्या लागल्या.

शिवाय लॉकडाऊनमुळे आमच्या कामवाल्या ताई येणं बंद झालं होतं. त्यामुळे भाज्या सॅनेटाइज करून धुण्यापासून त्या बनवण्यापर्यंत आणि पोळ्या-आमटी-भात करण्यापासून भांडी धुण्यापर्यंत बऱ्याच कामांचा लोड बायकोवर आला होता. मी लेकीचा ब्रश करण्यापासून तिला आंघोळ घालण्यापर्यंत तिच्या जवळपास सर्व गोष्टी करत होतो. शिवाय गाद्या घालणं-काढणं, कपड्यांच्या घड्या घालणं, लेकीनं केलेला पसारा आवरणं आणि एकंदरीत घर आवरणं, नीटनेटकं ठेवणं, अशी बरीच कामं करत होतो. पण स्वयंपाकाच्या कामात मात्र बायकोला फारशी मदत करत नव्हतो. फक्त तिच्या फर्माईशीनुसार ऑम्लेट-कॉफी बनवत होतो.

एके दिवशी तिने मला भांडी धुवायला सांगितलं. ‘यः क्रियावान् स पण्डितः’ म्हणत मीही धुवायला लागलो. ते पाहून आमची तीन-चार वर्षांची लेक म्हणाली, ‘तू कशाला भांडी धुतोस? तू काय मुलगी आहेस का?’ तिचं हे बोलणं ऐकून आम्हा दोघांनाही आश्चर्य वाटलं. मग आम्ही दोघांनीही तिची ‘शाळा’ घेतली, पण आमच्या घरात जे रोज घडत होतं, तेच ती पाहत होती. त्यात बदल झालेला दिसला आणि तिने तो टिपला. नुकत्याच वाचलेल्या ‘आपली मुलं’ या शोभा भागवतांच्या पुस्तकातलं एक वाक्य माझ्या मनात रुतून बसलं होतं- ‘तुम्ही काय बोलता याच्यापेक्षा तुम्ही कसं वागता याच्याकडे मुलं जास्त लक्ष देतात’. मी जरी ऑम्लेट-कॉफी-शेफ असलो, तरी हे काम आठवड्यात एखाद-दुसऱ्यावेळीच करावं लागे. त्यामुळे माझा स्वयंपाकघरातला वावर तसा नगण्य स्वरूपाचाच होता. तो वाढल्याशिवाय लेकीची धारणा बदलणार नाही, हे दिसत होतं. मग मी त्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं.

सुरुवात आम्हा दोघांच्या आवडत्या आणि लेकीला अ‍ॅलर्जी असलेल्या अंड्यापासून करायचं ठरवलं. यू-ट्युबवर त्यासाठी अंड्यांच्या वेगवेगळ्या पाककृती पाहिल्या. लेकीला अंड्याची अ‍ॅलर्जी असल्यामुळे अंडं असलेली पण त्याची चव कमीत कमी जाणवेल, अशी एक रेसिपी पाहून ती मुळाबरहुकूम केली. जरासं घाबरत घाबरतच लेकीला खिलवली. तिनेही वेगळी चव म्हणून ती एन्जॉय केली. पण आम्हाला धास्तीच होती की, परत तिला उलटी होते की काय! पण तसं काही झालं नाही. मग मला धीर आला आणि मी अंड्याचा समावेश असलेल्या वेगवेगळ्या रेसिपी यु-ट्युबवर पाहून करण्याचा सपाटाच लावला. रोज सकाळचा नाष्टा अंडायुक्त पदार्थांनीच होऊ लागला. फ्रेंच टोस्ट, ब्रेड-चिज-अंडा पिझ्झा, अंडा-भात, हाफ-फ्राय, अंडा भुर्जी, भुर्जी-ऑम्लेट मिक्चर, फ्लपी ऑम्लेट, टॉमटो विथ एग, ब्रेड विथ एग, बटाटा विथ एग, बटर गार्लिक एग... अशा कितीतरी रेसिपी मी यु-ट्युबवर पाहून बनवू लागलो. या काळात ऑम्लेटचे आणि अंड्याचा समावेश असलेले कितीतरी वेगवेगळे प्रकार करून पाहिले. ‘टॉरटेला’ नावाची स्पॅनिश ऑम्लेटची एक रेसिपी आहे. करायला वेळखाऊ पण खूपच मस्त. पण तीही दोन-तीन वेळा केली.

या ‘अंडा-अग्निहोत्रा’चा परिणाम असा झाला की, आमच्या लेकीची अंड्याची अ‍ॅलर्जी तर गेलीच, पण तीही आम्हा दोघांसारखीच अंडाप्रेमी झाली. मग काय, लेक बालवर्गात असताना आठवड्यातले दोन-तीन दिवस तरी तिचा शाळेचा डबा मी बनवत असे. तिच्या फर्माईशनुसार कधी हाफ-फ्राय, कधी सुशी (ऑम्लेट आणि पोळीचा रोल करायचा. त्यांच्या गोल चकत्या कापायच्या आणि त्या टुथपिक लावून जोडून ठेवायच्या.), कधी फ्रेंच टोस्ट, कधी स्टार-हार्ट-त्रिकोण-चौकोन अशा छोट्या छोट्या आकारातली ऑम्लेटस् (त्यासाठीचे साचे अ‍ॅमेझॉनवरून मागवले) असे पदार्थ बनवून देत असे.

याचबरोबर मी वेगवेगळ्या भाज्यांमध्ये अंडं घालायला सुरुवात केली. कांदा-बटाटा रस्सा इथपासून फ्लॉवरपर्यंत आणि भेंडी-बटाटापासून कोबीपर्यंत कितीतरी भाज्या अंडं घालून बनवल्या. अर्थात सगळ्या रेसिपी यु-ट्युबवर पाहून. या काळात ‘संडे हो या मंडे, सब में अंडे’ ही आमच्या घरी रित झाली होती. मी अंड्यांच्या पदार्थांत पारंगत होत गेलो, पण कालांतरानं या पदार्थांचा लेकीला आणि बायकोला कंटाळा येऊ लागला. अंड्याच्या कुठल्याही रेसिपीपेक्षा मी केलेलं साधं ऑम्लेटचं बायकोला सर्वांत जास्त आवडतं होतं, तर लेकीला हाफ-फ्राय व फ्रेंच टोस्ट. परिणामी मला ‘अंडा-प्रयोग’ आवरते घ्यावे लागले. मग मी वेगवेगळ्या भाज्या बनवायला सुरुवात केली. आता मी आठवड्यात किमान दोन-तीन वेळा तरी एखादी भाजी किंवा पदार्थ बनवतोच.

पीठ पेरून भेंडी, भरली भेंडी, भेंडी-कांदा-बटाटा, तळलेली भेंडी, चिकन मसाल्यातली भेंडी असे कितीतरी भेंडीचे प्रकार मी करतो. त्यामुळे भेंडी आणली की, बायको मला हमखास विचारते, ‘तू भेंडी करणार आहेस का?’ वेळ असेल तर मी सहसा नाही म्हणत नाही. कारण भेंडी हा प्रकार आमच्या लेकीला खूप आवडतो. पण माझ्या सगळ्या रेसिपींमध्ये तिची सर्वांत आवडती रेसिपी आहे ‘भरलेला कांदा’. कुठलाही चांगली जमलेली भाजी किंवा पदार्थ खाताना लेकीच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि आनंद पसरतो, तो अवर्णनीय असतो. तो पाहण्यासाठी मी सतत काही ना काही बनवतो.

आता मला पालेभाज्याही जमू लागल्या आहेत. विशेषत: तव्यावरच्या. करडई, पालक, लाल माठ या तव्यावरच्या भाज्या मला चांगल्या करता येतात. माझी मोठ्या जाड मिरचीची भाजी किंवा भरली मिरची, याही रेसिपी आमच्या घरी आवडीने चाखल्या जातात. या शिवाय बायकोला मी केलेलं फोडणीचं वरण आणि फोडणीची आमटी विशेष आवडते. लेकीला मात्र माझे हे दोन्ही प्रकार फारसे आवडत नाहीत. तिला आईचीच आमटी आवडते, शेवग्याच्या शेंगा घालून केलेली. अर्थात मलाही.

स्वयंपाकघरातला माझा सहभाग काही बायकोच्या बरोबरीचा नाही, हे मान्यच करायला हवं. तो तसा असावा असा काही बायकोचा आग्रह नाही, पण झाला तर तिला हवा आहे, याची मला कल्पना आहे. पण भारतीय पुरुषाला घरादारापासून समाजापर्यंत दिवसाचे 48 तास आणि वर्षाचे 365 दिवस असा ताठ कणा आणि फणा काढून जगायला शिकवलं जातं की, त्याच्या सकारात्मक बदलाची गाडी मंदगती पकडायलाही बराच वेळ घेते. मला आठेक वर्षांचा काळ लागला, त्याचं कारण तेच.

पण हल्ली सोशल मीडियामुळे खूप फायदा झाला आहे. किंबहुना त्याच्यामुळे माझ्या पाक-नैपुण्याचा प्रवास वेग धरू लागलाय. खरं तर माझ्या दोन्ही मोठ्या सुगरण मेव्हण्यांनी आम्हाला लग्नानंतर पाककृतीचं एक पुस्तक भेट दिलं होतं. चांगलं जाडजूड, हार्डबाउंड. पण त्यातल्या रेसिपींची गरज नसल्याने बायकोनंही कधी फारशा करून पाहिल्या नाहीत आणि मी गरज असूनही. कधी काळी मी नियमितपणे ‘साप्ताहिक सकाळ’ वाचत असे, त्याचा ‘स्वयंपाक विशेषांक’ही (अर्थात त्यातल्या पाककृती टाळून). आणि ते जपूनही ठेवत असे. त्यात प्रसिद्ध नाट्यकर्मी लालन सारंग यांचं ‘बहारदार किस्से चटकदार पाककृती’ हे सदर प्रसिद्ध होत असे. पण त्यातल्याही पाककृती वगळून किस्से तेवढे वाचत असे. पण रेसिपी बनवायला लागल्यावर एके दिवशी मला त्या सदराची अचानक आठवण झाली. दरम्यानच्या काळात ते पुस्तकरूपानं प्रसिद्धही झालं होतं, पण बाजारात उपलब्ध नव्हतं. त्यामुळे शोध घेऊनही मिळेना. मग मी ते लायब्ररीतून आणून वाचलं. या वेळी मात्र त्यातल्या किश्शांएवढ्या त्यातल्या पाककृतीही आवडीनं वाचल्या.

असो, तर मुद्दा आहे सोशल मीडियाचा. खरं तर यु-ट्युबने इतर अनेक गोष्टींसह पाककृतींच्या पुस्तकांचीही सुट्टी करून टाकली, निदान माझ्यापुरती तरी! कारण यु-ट्युबवर रेसिपी प्रत्यक्ष पाहायला मिळते, ती गंमत पुस्तकातल्या पाककृतींच्या वर्णनात नसते. त्यामुळे चांगला स्वयंपाक करायला शिकायचा असेल, तर पुस्तकांपेक्षा यु-ट्युब हाच जास्त उत्तम पर्याय आहे. यु-ट्युबवर कितीतरी रेसिपींची चॅनेल्स आहेत. अतिशय प्रसिद्ध, नामांकित अशा शेफपासून अनेक सुगरण महिलांचीही चॅनेल्स आहेत. त्याचबरोबर शहरी, मध्यमवर्गीय, सेलिब्रेटी शेफ, कोकणी, ग्रामीण, वैदर्भीय, कोल्हापुरी, स्ट्रीट फूड, काँटिनेन्टल, चायनीज, थाय, अमेरिकन, मेक्सिकन, फ्रेंच. अशी कितीतरी... तशीच फेसबुकवरही अनेक पेजेस आहेत. सोप्या, सहज करता येतील अशा रेसिपी त्यावर आहेत. पण मी त्यातल्या कुणालाही फारसं फॉलो करत नाही. प्रसिद्ध, नामांकित शेफच्या रेसिपींचा फार तामझाम असतो. टॉमेटोची प्युरी तयार करा, मिश्रण दोन तास भिजत ठेवा इत्यादी इत्यादी. शिवाय खूप मसाले आणि करण्याची पद्धतही वेळखाऊ. त्यात पदार्थ दिसायलाही आकर्षक, प्रेक्षणीय व्हावा, यासाठी ते दहा गोष्टी करायला सांगतात. या वेळखाऊ पद्धतीचा मला कंटाळा येतो.

माझा असा दृष्टिकोन असतो की, कुठलाही पदार्थ किंवा भाजी बनवायची असेल, तर घरात उपलब्ध असलेल्या जिन्नसांपासूनच बनवता यायला हवी. त्यासाठी उठून बाहेर जाऊन जिन्नस घेऊन या आणि मग करा, हा प्रकार काही मला मानवत नाही. मध्यमवर्गीय सुगरण महिलांची चॅनेल्सही मला फारशी आवडत नाहीत, त्याचं कारण म्हणजे त्यांचं बोलणं अनावश्यक इतकं ‘शुगर कोटिंग’ असतं आणि अनावश्यक इतकं जास्तही असतं. त्यामुळे मी दोघांच्याही नादाला सहसा लागत नाही. त्यापेक्षा निम-शहरी, ग्रामीण भागातल्या आणि रुढार्थानं फार प्रसिद्ध नसलेल्या व्यक्तींची चॅनेल्स जास्त पाहतो. कोकणातल्या एका माय-लेकाचं चॅनेल मला फार आवडतं. कारण त्यात त्यांच्या मांजरीचाही समावेश असतो.

यु-ट्युबच्या अल्गोरिदममुळे तुम्ही जे जास्त वेळा पाहतो, ते तो तुम्हाला प्राधान्यानं दाखवतो. त्याचा कुठलंही चॅनेल फॉलो न करताही खूप फायदा होतो. आता आमची लेक आठ वर्षांची आहे. पण ती तीन वर्षांची असल्यापासून माझ्या प्रत्येक पाककृतीत तिचा महत्त्वाचा सहभाग असतो. एखादी रेसिपी करायची ठरवली की, मी लेकीसोबत यु-ट्युबवर त्याच्या दोन-चार रेसिपी पाहतो. त्यातून लेक एकीची निवड करते. मग त्यासाठी लागणारे जिन्नस फ्रीजमधून आणि किचन ट्रॉलीजमधून काढून देण्याचे काम लेक करते. लागणारी भांडी मी काढतो. मग आम्ही दोघं मिळून कांदा-टोमॅटो कापणं, कोथिंबीर निवडणं, भाज्या निवडणं-कापणं, अशी कामं सोबत करतो. मग मी रेसिपी करायला सुरुवात करतो, लेक मला हवे ते जिन्नस किंवा भांडं देण्याचं काम करते. मध्ये मध्ये टांचा उंचावून रेसिपी पाहणाऱ्या लेकीला मग मी कडेवर घेऊन दाखवतो. ती पूर्ण झाली की, आधी आईला आणि मग लेकीला टेस्ट करायला देतो.

थोडक्यात, आमच्या ‘किचन कॅबिनेट’चा मी राज्यमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री अर्थातच बायको. पण हे राज्यमंत्रीपद स्वतंत्र पदभार असलेलं आहे. त्यामुळे आमच्यात काही कामांची सरळ विभागणी आहे. अर्थात खातं एकच असल्यानं काही कामं आम्ही दोघं मिळून करतो. कधीकधी एकमेकांची ठरलेली कामंही करतो. अर्थात कॅबिनेट मंत्री जास्त निपुण आणि पारंगत असल्यामुळे त्यांना सहसा सहाय्यकाची गरज नाही, पण स्वतंत्र पदभार असला तरी मला मात्र कायम एक सहायक - लेक - लागतो आणि पसंती-नापसंतीची मोहोर उमटवण्यासाठी केंद्रिय मंत्र्याचीही - बायको - गरज लागते. कधीतरी एखादी रेसिपी बिघडते. ते ती दुरुस्त करण्यासाठी, त्यातल्या त्यात ‘खाणेबल’ करण्यासाठी बायकोची मदत घ्यावी लागते!

रेसिपी ही उर्दू शेरोशायरीसारखी असते. उर्दू शेरातला एखाद-दुसरा शब्द बदलला की, त्या मूळ शेराचा अर्थ पूर्णपणे बदलतो, आणि तो ‘तुमचा’ होता. रेसिपीचंही तसंच असतं. शेराचा कर्ता बऱ्याचदा अज्ञात असतो, तसाच रेसिपीचाही. इतरांच्या चांगल्या रेसिपीतले एखाद-दोन घटक बदलले की, तीही पूर्णपणे बदलते, आणि ‘तुमची’ होते. त्यामुळे मला वेगवेगळ्या रेसिपींमध्ये काही ना काही बदल करून पाहायला आवडतात. कधी कधी ते फसतात, कधी कधी जमतात. अर्थात चांगला शेर लिहायला जसा सातत्यशील रियाज़ गरजेचा असतो, तसंच चांगली रेसिपी जमण्यासाठीही रियाज़ लागतोच. त्यात खंड पडला की, तुम्हाला एखादा तरी चटका बसतोच... आणि असा चटका बसला की, ती रेसिपीही मनात रुतून बसलेल्या चांगल्या शेरासारखी पुढचे चार-पाच दिवस आपली आठवण ताजी ठेवते.

चांगला शेर जसा वाचणाऱ्याचं/ऐकणाऱ्याचं मन प्रसन्न करतो, तसंच चांगली रेसिपीही चाखणाऱ्याचं मन प्रसन्न करते. लेक असो, बायको असो, नातेवाईक असोत की मित्र असोत, इतरांना ‘प्रसन्न’ करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे ‘बनाइये खाना, परोसिये प्यार’ हे आता मला चांगलंच समजलंय आणि उमगलंयही. पहिला टप्पा पूर्णत्वाला गेलाय, दुसऱ्या टप्प्यातला प्रवास चालू आहे.