कोल्हाळ - असह्य कोंडमारा
सामान्य गरीब अशिक्षित माणसे समाजामध्ये सतत शोषली जात असतात. आपण शोषले जात आहोत याची बिचाऱ्यांना कल्पनाच नसते. यांच्या शोषणावर एक माजोर व्यवस्था उभी राहते. ती कसलीच भीडभाड बाळगत नाही. शोषक हेच आपले खरे तारणहार आहेत अशीच या भोळ्याभाबड्या अशिक्षित माणसांची धारणा असते. हे झाले अशिक्षित माणसांच्या बाबतीत. परंतु सुजाण सुशिक्षित माणसांच्या शोषणाचीही एक समांतर व्यवस्था कार्यरत असतेच. आपण शोषले जात आहोत हे माहिती असूनसुद्धा काहीही करू न शकणारी, शोषकाच्या हातचे बाहुले बनणारी, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारी सुशिक्षित माणसे समाजामध्ये अस्तित्वात असतातच. याच सुशिक्षित, प्रवाहपतित, धनदांडग्या मुजोर व्यवस्थेकडून नागवल्या गेलेल्या माणसांची लोकार्तिका उलगडून दाखवणारी एक नवीकोरी कादंबरी लोकवाङमयगृहाने नुकतीच प्रकाशित केली आहे.
कादंबरीचे नाव आहे ‘कोल्हाळ’. कोल्हाळचा अर्थ आहे उद्रेक (तुकारामाच्या अभंगातील कोल्हाळ हा एक शब्द आहे). ही कादंबरी लिहिली आहे श्वेतल परब यांनी. श्वेतल परब या सावंतवाडीच्या राणी पावयतीदेवी उच्च माध्यमिक विद्यालयात प्राध्यापिका आहेत. प्राध्यापिका असल्यामुळेच असेल कदाचित श्वेतल परब यांनी ही व्यवस्था आतून बाहेरून अनुभवली आहे. कोणे एके काळी कदाचित त्या या व्यवस्थेचा भागही असतील. त्याशिवाय का या व्यवस्थेतील माणसांची खरीखुरी सुखदुःखे त्यांच्या कादंबरीत उतरली असतील?
मी जेव्हा ही कादंबरी वाचायला घेतली तेव्हा तिचा परीघ मर्यादित असेल, एका विशिष्ट वर्गापुरती ही कादंबरी मर्यादित असेल, ती एकसुरी असेल अशीच माझी धारणा होती. असा पूर्वग्रह मनात ठेऊनच मी ती वाचायला घेतली. परंतु जसजसा मी पुढे सरकत गेलो तसतशी कादंबरीने मनाची पकड घेतली. कादंबरीतील माणसे खरीखुरी वाटायला लागली. ती माझ्या आजुबाजूला वावरत आहेत असा भास होऊ लागला. त्यांची आणि माझी सुखदुःखे एकच आहेत किंबहुना आपणही त्या माणसांपैकीच एक आहोत असा भास होऊ लागला. असे वैश्विक आवाहन असलेली, व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारी कलाकृती हीच खरी कलाकृती असते हे तर मला माहीत होतेच.
विना-अनुदानित खाजगी शाळांमध्ये अत्यल्प वेतन घेऊन वर्षानुवर्षे वेठबिगारी करणाऱ्या आणि अंततः उध्वस्त होणाऱ्या माणसांचे जग लेखकाने काळ्या पांढऱ्या रांगांत रांगवले आहे (या शिक्षकांना त्या "अनुदानशून्य" शिक्षक असे संबोधतात). उच्चशिक्षित अगदी पीएचडी झालेलीही ही माणसे "आपण कधीतरी कायम अनुदानित होऊ" या आशेवर या धनदांडग्यांच्या विद्यालयांमध्ये शिकवणी पत्करतात आणि आयुष्यभराचे एक लोढणे गळ्यात अडकवून घेतात.
ही व्यवस्था ना त्यांना स्वतःमध्ये सामावून घेत, ना व्यवस्थेच्या बाहेर जाऊ देत. कायम होण्याच्या आशेवर ही माणसे एक एक दिवस ढकलत राहतात. शरीराने आणि मनाने खंगत राहतात. शोषण या माणसांच्या अंगवळणी पडते. शोषणाविरुद्ध ही माणसे आवाज उठवत नाहीत असे नाही. परंतु त्यांचा आवाज क्षीण असतो. तो बर्याचदा धोरणकर्त्यांना ऐकू जात नाही किंवा ऐकू गेला तरी धोरणकर्ते तो ऐकू न गेल्यासारखे करतात. ही माणसे त्यांची आंदोलने गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने करतात. हा मार्ग कालबाह्य झाल्याचे त्यांना लक्षात येत नाही. पैशाचा मार्ग त्यांना पटत नाही. आणि देण्यासाठी त्यांच्या पाशी पैसा असतोच कोठे?
या शोषित, पीडित, प्रवाहपतित माणसांच्या प्रत्येक दुःखाला लेखिका ममत्वाने भिडते. एकदाचित हे दुःख तिचे स्वतःचेही असू शकते. हे दुःख ती सोशिकपणे मांडते. ही माणसे आक्रस्ताळेपणा करीत नाहीत, ऊरबडवेचगरी करीत नाहीत. हलाहल पचविणाऱ्या नीलकंठ शंकराप्रमाणे ती दुःखाचा एक एक घोट मुकाट्याने पचवत राहतात. या माणसांची लग्ने होत नाहीत, घरातील आजारपणासाठी यांच्या पाशी पैसा नसतो. तथाकथित प्रतिष्ठित पदावर काम करीत असल्यामुळे कुणापाशी तो मागताही येत नाही. कंटाळून ही माणसे आत्महत्या करतात. यांची मुले, बायका आत्महत्या करतात. शाळेतील मुलांनी केलेल्या चोरीचे, आत्महत्यांचे, लफड्यांचे आळ यांच्या अंगावर येतात. ही माणसे आपापसामध्ये एकोप्याने राहतात. स्वतःची दुःखे इतरांना सांगून हलकी करतात. एकमेकांना सांभाळून घेतात. असलेल्या पैशांमध्ये काटकसर करून स्वतःचे संसार सजवतात. इतरांचे सावरायला मदत करतात. ही माणसे एकत्र येऊन लढे उभारतात. पाषाणहृदयी व्यवस्थेवर डोके आपटून कपाळमोद करून घेतात.
यांचा आक्रोश हे अरण्यरुदनच ठरते. "समाजाला शिक्षित करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही" असे त्यांना ठणकावले जाते. या माणसांच्या असहाय्यतेचा हरप्रकारे गैरफायदा घेतला जातो. या माणसांना समाजाचीही सहानुभूती मिळत नाही. या माणसांचे बरे चालले आहे अशीच समाजाची धारणा असते. एखाद्या कलाकृतीमधील — मग ते नाटक असो, चित्रपट असो की साहित्यकृती — कथानक तुमच्या लक्षात राहिले तर ती सामान्य कलाकृती आहे असे समजावे. त्या कलाकृतीतील व्यक्तिरेखा तुमच्या लक्षात राहिल्या, तुम्हाला अस्वस्थ करीत राहिल्या, मनात रेंगाळत राहिल्या तर ती असामान्य कलाकृती असे म्हटले जाते. या निकषावर ही कादंबरी बऱ्यापैकी पात्र ठरते. आरोंदेकर सर, पीटर सर, मनवा मॅडम, पेडणकर सर, कानसे सर, राणू, नेमळेकर शिपाई ही माणसे आपल्या मनाच्या तळाशी उतरतात आणि रुंजी घालत राहतात. ही सगळी माणसे आपल्या घरातीलच आहेत, यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असे वाटत राहते. ही माणसे त्यांच्या वाट्याला आलेले भोग "अमुचा प्याला दुःखाचा डोळे मिटून प्यायचा" असे म्हणत भोगत राहतात.
ही माणसे अत्यंत सोशिक आहेत. ती कुठेही त्यांच्या दुःखाचा डांगोरा पिटत नाहीत. छोटीमोठी सुखेसुद्धा ती असोशीने साजरी करतात. त्यामध्ये इतरांना सामावून घेतात. सामान्य माणसांच्या विराट दुःखाचा एक सुंदर पट लेखिकेने आपल्यासमोर मांडला आहे. हा पट जितका सुंदर आहे तितकाच तो दुःखदायी आहे, वास्तववादी आहे. ही कादंबरी जरी वास्तववादी असली तरी ती आजकालच्या कादंबरीप्रमाणे अति-वास्तववादी नाही. त्यामुळे ती अंगावर येत नाही. ‘जोर का झटका धीरेसे लगे’ या उक्तीप्रमाणे ती आपल्याला हळूहळू अस्वस्थ करीत राहते. या कादंबरीला एक सलग कथानक नाही. ती तुकड्यातुकड्यांनी फ्लॅशबॅक पद्धतीने येते. त्यामुळे तोटाही होतो आणि फायदाही. तोटा असा की या कादंबरीचे एक सलग कथासूत्र आपल्यासमोर उभे राहत नाही, पात्रे आणि घटना समजून घेताना त्यांचा अन्वयार्थ लावताना थोडी दमछाक होते. फायदा असा की आपल्याला आपले डोके लावावे लागते, मेंदूला ताण द्यावा लागतो.
या कादंबरीची भाषा सामान्य माणसाची आहे. तळकोकणच्या लाल मातीतील निरागस तरीही बेरकी मालवणी लहेजा तिला आहे. ही भाषा तिरकस, स्वतःवरच विनोद करणारी, स्वतःच्याच दुःखाचे सोहळे साजरे करणारी मालवणी भाषा आहे. या भाषेला आणि या माणसांना एक कोंकणी सुगंध आहे. ही कादंबरी पहिल्या दोन तृतीयांश भागात जेवढी जमली आहे तो प्रवाह पुढे राखण्यात आणि उत्कर्षबिंदू साधण्यात अपयशी ठरते. शेवटच्या एक तृतीयांश भागामध्ये ती थोडीफार भरकटली आहे हे जरी खरे असले तरीही या कादंबरीतील पात्रे आपल्या मनामध्ये "कोल्हाळ" माजवतात हे नक्की. कादंबरी वाचण्याच्या बाबतीत माझी शिफारस विचाराल तर ती ‘नक्कीच वाचा’ अशी आहे.