मागे न हटणाऱ्या इंदुताई

०६ सप्टेंबर २०२०

कॉम्रेड इंदुताईंची आठवण आली की,

चल गं हिरा चल गं मीरा चल गं बायजाबाई मागं काही नाही आता तटून उभी राही

असं ३०-४० बायकांसमोर खड्या आवाजात गाणं म्हणतानाचा त्यांचा दमदार-पुरुषी आवाज आजही माझ्या कानात घुमतो. स्त्रियांच्या चळवळीची गाणी आणि इंदुताईंचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. १९८४ ते ८८ या काळात विटा, खानापूर, तासगाव, वाळवा तालुक्यातील गावात आम्ही फिरत असताना संघटना उभारणीच्या काळात ‘स्त्रीमुक्ती संघर्ष’च्या प्रत्येक बैठकीची सुरुवात इंदुताईच्या गाण्याने होत असे. त्या नुसतं गाणं म्हणायच्या नाहीत तर बैठकीला उपस्थित असलेल्या प्रत्येक बाईकडून त्या म्हणून घ्यायच्या. हाडाच्या शिक्षिका असल्याने गाण्यातले तीन चार शब्द आधी स्वत: सांगायच्या आणि ते बायकांना म्हणायला लावायच्या. समजा आमच्यापैकी गाणं सांगणारी कार्यकर्ती पुढे पुढे धावू लागली की तिला थांबवून म्हणायच्या, “अगं कुंदा, जरा थोडं थोडं सांग. आपल्या या मैत्रिणींना एकदम सगळे शब्द लक्षात राहत नाहीत. त्यांनी शब्द समजून म्हटले तरच अर्थही त्यांच्या लक्षात राहील.”

आणि हे अगदी खरं होतं. शिबिरात किंवा बैठकीला नव्याने आलेली, डोईवर पदर घेतलेली बाई गाणी म्हणायला लाजायची. आपली सासू-नणंद असल्यास हळूच कुणी पाहतंय का ते पाहून घ्यायची आणि त्यांनाही गाणं म्हणताना पाहून मग बिनधास्त स्वत:ही म्हणायची. कधीतरी गाण्यातला आशय ऐकून हळूच तोंडाला पदराचं टोक लावत लावत खुद्कन हसायची.

जर देवच देतो जीवा, पोरं देतो मागशील तवा मग नवरा कशाला हवा गं, शेजारीण सखये बाई

हे ऐकून लाजून चूर व्हायची पण शेजारी बसलेली वयाने जेष्ठ मामी,मावशीसुद्धा गाण्यालं हे वाक्य अगदी बिनधास्त म्हणतेय म्हटल्यावर तिची भीड पार चेपून निर्भय बनायची. गाव-गाड्यातल्या नात्यातली उच्चनीचता लोपून सासवा-सुना, नणंद-भावजया अगदी एका जाजमावर, एका पातळीवर यायच्या आणि खऱ्या अर्थाने बायकांशी संवाद सुरु व्हायचा.

बैठकीला औपचारिक सुरुवात करण्यापूर्वी गाण्याच्याही आधी इंदुताईंचे एक सेशन झालेलं असायचं. ते म्हणजे लवकर आलेल्या प्रत्येक बाईची घरगुती, कौटुंबिक माहिती इंदुताईंनी विचारून घेतलेली असायची. बहुतेक वेळा येणाऱ्या स्त्रिया दलित व बहुजन जातीतल्या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील परित्यक्ता विधवा असायच्या किंवा मुलगा हवा म्हणून ‘दुसरी बायको’ केली त्यामुळे सवती-सवती झालेल्या बायका असायच्या. मीटिंगला सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्या कहाण्या इंदुताईंनी आधीच माहिती करून घेतलेल्या असायच्या. कुठलेही नवं गाव, नव्या ओळखी असोत, तिथली स्त्रियांची बैठक सुरु होण्यापूर्वीच जमलेल्या बायांच्या डोळ्यात इंदुताईंबद्दल वाटणारा अपार जिव्हाळा ओथंबून यायचा. कुठल्याही स्त्रीला आपलंसं करण्याचं विलक्षण कसब इंदुताईंमध्ये होतं. माझ्यासारख्या शहरात ‘हाय-फाय’ ठिकाणी नोकरी करणाऱ्या आणि शनिवार-रविवार संघटना बांधणीसाठी गावात जाणाऱ्या मध्यमवर्गीय कार्यकर्तीचे इंदुताई अशा प्रकारे प्रशिक्षण करत असत. त्यामुळे इंदुताई म्हणजे माझ्यासाठी समाजकार्याचं चालतं-बोलतं विद्यापीठच होतं.

मला सुरुवातीला खूप आश्चर्य वाटायचं की नव्या-नवख्या बायकासुद्धा इंदुताईंसमोर इतक्या कशा मोकळ्या होतात? अशी काय जादू आहे त्यांच्या व्यक्तिमत्वात की ज्यामुळे कोणत्याही बाईला आपलं खाजगी, कौटुंबिक दु:खं त्यांना सांगावंसं वाटावं? त्यांच्या पन्नाशी ओलांडलेल्या वयामुळे असेल का? संघटनाबांधणीच्या त्या काळात (१९८४) मी अगदी बारकाईने त्यांचं निरीक्षण करू लागले. त्यावेळी पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ज्याला आपण ‘डाऊन टू अर्थ’ म्हणतो तशा इंदुताई वास्तवाच्या जमिनीत घट्ट पाय रोवून उभ्या असायच्या. स्त्रीमुक्तीची, शोषणमुक्तीची, गुलामगिरीविरोधी विचारसरणीची संकल्पनात्मक, वैचारिक मांडणी वगैरे या सगळ्या बुद्धीजीवींच्या संस्कृतीतल्या गोष्टी झाल्या. कोणत्याही घरातले पुरुष कसे वागतात, बोलतात, नणंद-भावजया-सासवा-सुना काय विचार करतात याची त्यांना पूर्ण कल्पना असायची. इंदुताईंच्यासमोर दिसणारी समस्या आणि तिच्यामागचं कटू वास्तव आणि त्याची उपलब्ध व्यावहारिक मार्गाने सोडवणूक करण्याची पद्धत त्यांना चांगली अवगत होती. त्यामुळे ज्या बाईला त्या मार्ग दाखवत तिला आडवाटेने का होईना, स्त्रीमुक्तीच्या विचाराशी जोडून घेत असत. त्यांना खात्री असायची की ही पुढे जाऊन आपल्या चळवळीची खंदी कार्यकर्ती होणार आहे. ही प्रगल्भ दृष्टी इंदुताईंमध्ये स्वत:च्या आयुष्यातल्या संघर्षमय अनुभवातून, जगण्यातून आलेली होती.

इंदुताईंच्या डोईवर नेहमी पदर असायचा. भाषा अगदी त्या मातीतलीच. म्हणी, वाक्प्रचार, उखाणे सतत तोंडावर असत. आणि गोष्टीवेल्हाळ स्वभाव! अगदी बहिणाबाईंची आठवण यावी अशी सहज सोपी व्यावहारिक भाषा. एकदा अशाच एका मीटिंगच्या वेळी बराच वेळ होता तेंव्हा इंदुताईंनी सहज बसल्या बसल्या एका वहीच्या पानावर जात्यावरच्या ओव्या मला लिहून दिल्या आणि म्हणाल्या, “कुंदा, हे घे.. तुला जात्यावरच्या ओव्या हव्या होत्या ना. आता चांगलीशी चाल लावून शैलाची (सावंत) मदत घेऊन रेकॉर्डिंग कर!”

इंदुताईंचं हे मातीतलं रुजलेपण दिसल्यामुळेच मीटिंगला आलेल्या बायकांना त्या आपल्यातल्याच वाटायच्या. या संदर्भात मी एकदा इंदुताईंना माझ्या शहरी फेमिनिस्ट मैत्रिणींनी नेहमीच (पडदा, घुंगट, कुंकू, मंगळसूत्र याविषयी) चर्चिलेला एक प्रश्न सरळ बिनधास्तपणे विचारला. म्हटलं, “ताई, तुम्ही डोक्यावर पदर का घेता? हा स्त्रियांना गोषात (पडद्यात) दडपून ठेवण्याचा प्रकार आहे असं नाही का वाटत तुम्हाला?” त्यावर त्या म्हणाल्या,

“नाही वाटत मला तसं. मी इथल्या मातीत जन्मले तिथल्या लोकांसारखीच राहणी ठेवणे हे मला ज्या लोकांशी संवाद साधायचा आहे त्या दृष्टीने महत्वाचं वाटतं. आणि इथल्या बायकाच काय, पुरुषसुद्धा डोईवर टोपी घालतातच ना? एकमेकांचा आदर राखण्यासाठी इथल्या संस्कृतीत ती प्रथा आहे. आणि त्यामुळे जर लोकांमध्ये तुमचे विचार ऐकून घेण्याची इच्छा वाढत असेल तर ते जास्त महत्वाचं नाही का? एखाद्या प्रथेचा मला काही त्रास होत नसेल तर ती पाळण्यात मला काहीही गैर वाटत नाही.”

लेकी-सुनांना इंदुताई आपली आईच वाटायच्या. त्यामुळे त्यांच्याशी पटकन दोस्ती व्हायचीच. इंदुताईंसोबतच्या या दोस्तीसाठी बायकांची कमिटमेंट देण्याचीसुद्धा तयारी असायची. १९८३ साली गिरणी संपात सांगली जिल्ह्यातील बरेचसे कामगार आपल्या गावी येऊन राहिलेले होते. पण सांगली जिल्ह्यातील विटा, खानापूर हे सगळे तालुके दुष्काळग्रस्त असल्याने सगळे गिरणी कामगार रोजगार हमीच्या कामाला जात असत. त्यामुळे सुरुवातीच्या काळात आम्ही रोजगार हमीच्या कामावर जाऊन खूप मोठ्या प्रमाणात बैठका घेत फिरायचो. त्यावेळी पाझर तलाव आणि रस्ता बांधणीच्या मातीच्या पाटी उचलणाऱ्या बायांना बाप्यांच्या कामासारखं समान वेतन मिळत नसे. शिवाय स्तनदा माता, पोरावळ्या बायकांच्या मुलांसाठी पाळणाघर नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. प्लॅस्टिक किंवा कापडाचं छत बांधून बांबूच्या दोन काठ्यांना साडीच्या झोळीत पोरांना आलटून-पालटून झोपवलं जाई. परित्यक्ता, विधवा स्त्रियांना तर जीवन निर्वाहाचा काहीच आधार नसल्याने रोजगार हमीवरच मातीची पाटी उचलण्याशिवाय काही पर्यायच नसायचा. अशा परित्यक्ता, विधवा स्त्रियांना निर्वाह भत्ता मिळणं आवश्यक असं आम्हांला वाटू लागलं. स्त्रियांचे असे अनेक प्रश्न आम्हाला तिथे दिसायला लागल्यामुळे आम्ही स्त्रियांची संघटना बांधायचीच असं ठरवलं. रोजगार हमीच्या कामांवर ‘समग्र सडक नाटक चळवळ’ या मुंबईतल्या आमच्या संचांतर्फे त्या भागात ठिकठिकाणी सडक नाटकं करायचो. ‘खेड्यातील गरिबांची झुंज’ ही भूमिका भारतने लिहिली होती ती सांगत आम्ही स्त्रियांची संघटना बांधायचं ठरवलं. त्यादृष्टीने स्त्री मुक्ती संघर्ष चळवळीचं पहिलं शिबिर आम्ही विट्याला घ्यायचं ठरवलं. त्यावेळी जानेवारी महिन्यात इंदुताई आणि गेल या दोघीच खानापूर तालुक्यातील १५-२० गावात स्त्रियांच्या मीटिंग्ज घ्यायच्या तर शनिवार-रविवार सुटीच्या दिवशी मुंबईतून मी, शैला सावंत, निशा साळगावकर, रंजना कान्हेरे अशा कार्यकर्त्या जायचो. दोन-एक महिन्यानंतर ‘येरळा डेअरी प्रोजेक्ट’ मध्ये सोशल वर्कर म्हणून काम करणारी नागमणी राव या कामात आम्हांला येऊन सामील झाली आणि तिने १९ व २० मार्च १९८४ रोजी स्त्रियांच्या शिबिर आयोजनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. इंदुताईं तयारीच्या बैठका घेत असताना रोजगार हमीवरच्या स्त्रियांकडून शिबिराला येण्याचं वचन घ्यायच्या. पण त्या एवढ्यावरच थांबायच्या नाहीत तर त्या बायकांकडून हेही कबूल करून घ्यायच्या की,

येताना तुम्ही आपल्या घरून दोन वेळची शिदोरी बांधून घेऊन स्वखर्चाने एसटीने विट्याला यायचं. मुंबईहून येणाऱ्या या आपल्या कार्यकर्त्या उरलेले पैसे जमा करून आणतीलच, पण तुम्ही एका दिवसाची स्वत:ची शिधा-भाकरी आणि एसटी भाडं तरी घेऊन या.’

आणि आश्चर्य म्हणजे जमलेल्या बायका इंदुताईंना दिलेलं हे वचन निःशंकपणे पाळायच्या.

आपली निवृत्तीला आलेली शाळेची नोकरी सांभाळून, चार-पाच वर्षांची लहान नात प्राची हिला घेऊन इंदुताई गावा-गावातल्या मीटिंग्ज घ्यायच्या. मीटिंगच्या वेळी एकीकडे त्यांनी प्राचीला अभ्यासाचं काम दिलेलं असायचं. प्राचीने वहीत लिहिलेलं अधूनमधून तपासून पाहत दुसरीकडे जमलेल्या बायकांशी त्या बोलत असत. मार्च ८४ च्या स्त्री मुक्ती संघर्ष चळवळीच्या स्थापना शिबिरानंतर लगेच सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू झाली. इंदुताई आणि त्यांची भावजय उषाताई निकम यांनी त्यांच्या गावात – ‘इंदोली’मध्ये स्त्रियांचं पॅनल उभं करायचं ठरवलं. कॉँग्रेसच्या ‘ग्रामपंचायतीत ३०% महिला आरक्षण’ धोरणाचा बोलबाला होण्याच्याही आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्व जातीधर्माच्या स्त्रियांचं पॅनल उभं करण्याचा ‘इंदोली पॅटर्न १३’ हा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील पहिलाच क्रांतिकारी प्रयोग होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचा तपशीलवार उल्लेख नंदिता शाह आणि गांधी यांच्या पुस्तकात आहे.

२२ मे १९८४ रोजी इंदोली येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बहुजन जाती-धर्माच्या १३ स्त्रियांच्या पॅनलने दिलेल्या क्रांतिकारी लढाईत इंदुताईंची भावजय उषाताई निकम (आमच्या सर्वांच्या मामी) यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. इंदुताई आणि उषाताई निकम या दोघी पुरुषसत्तेने उभ्या केलेल्या संकटांना अंगावर झेलत वाघिणीसारख्या लढल्या नसत्या तर जात-पितृसत्ताक ढाच्याला गदगदा हलवणाऱ्या या निवडणुकीचं आणि त्या अनुषंगाने स्त्रीमुक्ती चळवळीचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं पहिलं क्रांतिकारक पान लिहिलं गेलंच नसतं. त्या काळात दर आठवड्याला इंदुताईंचं प्रचंड उत्साहाने भरलेलं एक तरी पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र असायचंच. किंबहुना पत्रलेखन हा आमच्या त्यावेळच्या चळवळीचा प्राण होता. इंदुताईंचं प्रत्येक पत्र म्हणजे आमच्यासाठी मायेचा दुवा होता. त्यांच्या पत्रात प्रेमाचा हक्क होता, आग्रह होता, नोकरी व्यवसायाच्या व्यापात गुंतलेली आमची मनं दुखावू नयेत म्हणून घेतलेली सावधगिरी होती, स्थानिक राजकारण्यांचं स्वभाव वर्णन होतं. त्या काळात इंदुताईंचा लढाईचा जोश तर इतका होता की त्यांच्या वेगाबरोबर धावता धावता माझ्यासारख्या तरुण मुलींचीदेखील दमछाक होत असे. मुंबईकर कार्यकर्त्यांनी आपलं सडक नाटक घेऊन यावं, पैसे जमा करावे, आधीच कामावर रजा टाकाव्या म्हणून त्या आगाऊ पत्र लिहायच्या. ११ एप्रिल १९८४ च्या पोस्टकार्डावर त्या लिहितात,

प्रिय कुंदा आणि समग्र, झिंदाबाद!

१५ एप्रिल रोजी सकाळी इथे पोचाल या बेताने आपण कासेगावी या. कुठल्याही परिस्थितीत बेत रहित करू नये. मी १२ तारखेला रात्री तिथे पोचत आहे. तिकीट काढण्याकरता हे पत्र. बाकी इथे निवडणुकीचं काम जोरात सुरु आहे.

इंदोली निवडणुकीतल्या स्त्रियांच्या पॅनलच्या प्रचाराची धामधूम आणि नित्यनूतन अडचणींना तोंड देत असतानासुद्धा त्या जयंताकडून (त्यांचा भाचा) पत्र लिहून घेत असत. ६ मे १९८४ च्या पत्रात इंदुताई म्हणतात,

मी आणि कॉम्रेड तुकाराम निकम २ मे ला इंदोलीला जाऊन आलो. तयारी जोरात सुरु आहे. दुसऱ्या पार्टीचे लोक स्त्रियांवर दबाव आणत आहेत. इतर निवडणुकीत चालायच्या त्या सर्व क्लृप्त्या स्त्रियांवर चालू आहेत. शपथा घालणं, दादागिरी करणं इ. निवडणुकीच्या प्रचारासाठी तुमचा सडक नाटक दौरा होणं अत्यंत जरुरीचं आहे. १९-२० मे ला यावे. शनिवार-रविवार आहे, निवडणूक २२ तारखेला आहे.

इंदुताईंच्या या आग्रहामुळे इंदोलीच्या निवडणुकीत दीड महिन्यापासून स्त्रियांच्या पॅनलच्या प्रचारासाठी मुंबईहून आम्ही सडक नाटकाच्या संचातील कार्यकर्ते आलटून पालटून रजा टाकून जायचो. कित्येक वेळा रजा न मिळाल्याने ठराविक स्त्री भूमिका (उदा. आणीबाणीतल्या इंदिरा गांघी) करायला कलाकार नसल्याने रंजना कान्हेरे, मी, शैला सावंत अशा आलटून पालटून त्या भूमिका करत होतो. ‘स्त्री मुक्तीची ललकारी’ आणि ‘बिगी बिगी मार वल्ह’ या सडक नाटकाचे प्रयोग करीत आम्ही सगळी गावं पिंजून काढली. अखेर सत्ताधारी जातीय व पितृसत्ताक व्यवस्थेशी लढण्यात अपुरे पडल्याने आम्ही स्त्रिया इंदोलीची निवडणूक हरलो तरी इंदुताईंचा आशावाद प्रचंड होता. आम्हांला लाजवणारा उत्साह त्यांच्यात होता. त्या गप्प बसल्या नाहीत. मुक्ती संघर्ष चळवळीच्या दुष्काळाविरुद्धच्या लढ्यात पुन्हा नव्या उत्साहाने सामील झाल्या आणि आमच्या येरळा नदी काठच्या विज्ञान यात्रेसाठी आमच्या पुन्हा बैठका सुरु झाल्या.

३ जुलै १९८४ च्या पत्रात इंदुताई लिहितात,

प्रिय कुंदा, निशा, शैला, लक्ष्मी आणि ऑल कॉम्रेड्स, झिंदाबाद!

मी इथे आल्यापासून गैरहजेरीत तुंबलेली घरगुती कामं करत आहे. ती अजून संपलेली नाहीत. मणी, जॉय, संपतराव, रावसो अण्णा, अरुण माने, येऊन गेले. भारत, गेल विट्यास मीटिंगला गेले. त्या अगोदर विट्याला पुढील कामाच्या दृष्टीने मीटिंग झाली. इंदोलीच्या स्त्री पॅनलची कशी दडपणूक झाली, कित्येक स्त्रियांना कोंडून ठेवलं, कित्येकांना परगावी पळवलं ते लिहून काढलं पाहिजे. मी यातून मोकळी झाले की ते काम करणार आहे. ‘श्रमिक विचार’ मधील शनिवार रविवार ३० जूनचा लेख वाचलाच असशील. आवडला का? कारण त्यावेळी लेखाच्या हस्तलिखिताची शेवटची दोन पानं तू वाचली नव्हतीस. बाकीच्यांनी वाचला का? आवडला का?

डिसेंबर ८४-८५ मध्ये खानापुरातील येरळा नदीच्या कडेकडेने झालेल्या विज्ञान जत्रेतून असा निष्कर्ष निघाला की, दुष्काळ निर्मूलनासाठी या नदीवर अनेक छोटे चेक डॅम्स, लहान मध्यम धरणं आणि नदीपात्रातील विहिरी बांधणं जरुरीचं आहे. त्यासाठी शासन धोरण बदलण्याचे प्रयत्न करायला हवेत. येरळा नदीच्या दोन्ही काठच्या १० गावांनी शासनाने खूप आधीच मंजूर केलेलं, पण न झालेलं छोटं धरण नदीपात्रात बांधायचंच असा निर्घार केला. परंतु शासनाने सर्वतोपरी असहकार पुकारल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूकडच्या बेणापूर, रामापूर, कमळापूर, तांदूळवाडी, बलवडीच्या गावकऱ्यांनी मुंबईतील मान्यवर तज्ञ के. आर. दातेंच्या मार्गदर्शनाखाली ‘बळीराजा स्मृतीधरणट उभे करायचे ठरवलं. निधी उभा करायचा ठरवला. त्यासाठी आम्ही सारे तयारीला लागलो. सडक नाटकाचे प्रयोग करू लागलो. प्रदर्शन, स्लाईड शो दाखवू लागलो. त्यावेळी केलेल्या जनजागृतीमुळे दुष्काळ निर्मूलन आंदोलनाने खूपच जोर पकडला. डॉ. भारत पाटणकर, माजी शेकाप आमदार संपतराव पवार, अण्णासाहेब शिंदे आणि इंदुताई अशा अनेक नेत्यांच्या जोशपूर्ण भाषणांनी अख्खा तालुका गजबजला. संपूर्ण खानापूर, आटपाडी, तासगाव तालुक्यातील माणसं रस्त्यावर उतरू लागली होती. इंदुताई, गेल आणि मणी यांनी तर आपल्या जोशपूर्ण भाषणांनी दुष्काळाची सगळ्यात जास्त झळ सोसणाऱ्या हजारो स्त्रियांना रस्त्यावरच्या आंदोलनात उतरवलं. ज्या कुणबी, कष्टकरी, शेतकरी, मराठा स्त्रियांनी कधी घराचा उंबरठादेखील ओलांडला नव्हता त्या स्त्रिया डोईवरचा पदर कमरेला कसून ठामपणे दुष्काळ निर्मूलनासाठी उभ्या राहिल्या. अशा चार पाचशे स्त्रिया तहसीलदाराच्या कचेरीसमोर दोन-तीन दिवस ठिय्या आंदोलनालादेखील बसल्या. आज सांगताना ही गोष्ट वाटते तितकी ८०च्या दशकात सोपी नव्हती. पण ही सारी किमया इंदुताई आणि त्यांची अमेरिकन सून गेल ऑम्वेट आणि आमची मैत्रीण नागमणी राव यांनी घडवून आणली होती. मुंबई-पुण्याहून जाणाऱ्या माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्या अगदी निमित्तमात्र होतो.

आंदोलनातील स्त्रियांचा ‘रणचंडिका अवतार’ पाहून स्थानिक, प्रस्थापित राजकारणी हादरले, साखर कारखाने काढून बसलेले आणि गरिबांच्या उसाला नगण्य उचल देणारे प्रस्थापित भयानक अस्वस्थ झाले. त्यांनी पोलीस यंत्रणेच्या मदतीने आंदोलन फोडायला आणि अनेक क्लृप्त्या वापरायला सुरुवात केली. पण रस्त्यावर उतरलेल्या या स्त्रियांनी ‘अजिबात मागे हटणार नाही’ असा निर्धारच केलेला होता. आडोश्याला चूल पेटवून भाकऱ्या भाजून खाल्ल्या पण तहसीलदाराच्या कचेरीसमोर दोन-तीन दिवस ठिय्या आंदोलनाला बसलेल्या या स्त्रिया जराही हलल्या नाहीत. कधी इंदुताई तर कधी गेल ऑम्वेट माझ्या करी रोडच्या पत्त्यावर मला आणि इतर कार्यकर्त्यांसाठी सविस्तर रिपोर्टिंग करणारे आंतरदेशीय पत्र दर आठवड्याला आलटून पालटून लिहित असत. गेलच्या पत्रातलं मराठी इतकं शुद्ध असायचं की ते एका अमेरिकन स्त्रीने लिहिलं आहे हे सांगितल्याशिवाय कोणाला कळायचं नाही. माझ्या ऑफिसातल्या मैत्रिणीचाही विश्वास बसला नाही.

दुष्काळग्रस्तांचं ‘चारा छावण्यांचं’ आंदोलन चालू झालं होतं. सगळीकडे आंदोलकांची धरपकड सुरु झाली होती. बलवडीचे शेकापचे माजी आमदार संपतराव पवार आणि त्यांचे कार्यकर्ते मुक्ती संघर्ष चळवळीत सामील झाल्याने पोलिसांनी फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब करायला सुरुवात केली. त्यावेळच्या स्थानिक सत्ताधारी शेकापच्या काही लोकांना हाताशी धरून गाई-गुरांना घेऊन रस्ता रोको आंदोलनात सामील झालेल्यांची पोलीस आणि स्थानिक राजकारणी मंडळींनी दिशाभूल करायला सुरुवात केली. डॉ. भारत आणि संपतराव पवारांना अटक केली. अशा वेळी इंदुताई गप्प बसणं अशक्यच होतं. नुकत्याच झालेल्या स्त्रीमुक्ती संघर्ष शिबिरात दुष्काळी चारा छावणी सुरु करावी म्हणून ‘रस्ता रोको आंदोलना’ला येण्याचं इंदुताईनी स्त्रियांना आवाहन केलंच होतं. त्यानुसार ४०० ते ५०० स्त्रिया ठिकठिकाणी गाई-गुरांना घेऊन रस्ता अडवून बसल्या होत्या. मीही २-३ दिवस तिथेच होते पण मला दुसऱ्या दिवशी सोमवारी कामावर जायचं असल्याने मी रात्रीच्या गाडीने मुंबईला परतले होते. चार-पाच दिवसातच इंदुताईंचं मी परतल्यावर काय काय घडलं हे सांगणारं पत्र आलं. ते पत्र इथे जसंच्या तसं देणं आवश्यक आहे कारण त्यातून इंदुताईंच्या व्यक्तिमत्वाची लढाऊ धार अगदी स्पष्टपणे व्यक्त होते. मला लिहिलेल्या ४ जून १९८४ च्या पत्रात इंदुताई लिहितात,

प्रिय कुंदा, झिंदाबाद!

तू गेल्यांनतरच्या सर्व मीटिंग्ज चांगल्या झाल्या. तू गेलीस तेंव्हाच भारतास आणि संपतरावांना पकडलं होतं. पोलिसांनी सगळीकडे फसवाफसवी चालवली होती. रावसो अण्णा (शिंदे) जयंताच्या (भाचा जयंत निकमच्या) शेतात होते. त्यांनी ड्रेस बदलला होता. त्यामुळे ते शेवटपर्यंत सापडू शकले नाहीत. अरुण मानेस ३० तारखेस अगदी रस्त्यावर जाणेचे वेळी सुलतानगादी गावात पकडलं. पण भारत व संपतरावांना लॉकअपमध्ये ठेवलं व त्यांचेवर २३ तारखेपर्यंत १११ कलम लावलं आहे.

रावसोअण्णा व जयंत दोन दिवस रात्री व दिवसभर प्रत्येक गावी फिरत राहिले. अनेक वेळा पोलिसांची गाडी पास करून गेले परंतु पोलिसांनी ओळखलं नाही. ३० तारखेला पकडलेल्या शेकापच्या लोकांना घेऊन पोलीस फिरत होते आणि ‘मिटले आता, रस्ता रोको थांबवा’ असं सांगत होते. परंतु बेणापूर व खानापूरच्या रस्त्यावरच्या लोकांनी सांगितलं की संपतराव व भारत यांना घेऊन आल्याशिवाय आम्ही उठणार नाही. हणमंतवडीयेच्या रस्त्यावर तर स्वत: बाप्पांनी सांगितलं की ‘भारत, संपतरावांना सोडलं आहे. तुम्ही आता जा’ व त्यांना परतवलं. शेवटी आपल्या मागण्या बाजूला सारून बाप्पांनी तडजोड केली. त्यांच्यासोबत आणखी एक शेकापचा माणूस होता.

बेणापूरच्या रस्त्यावर तर अण्णाच्या घरच्या आणि गावातल्या ४०० स्त्रिया मिळून आम्ही रस्त्यावर आठ तास बसलो गाणी म्हणत. मणी, मामी वगैरे सगळ्या. सारखी गाणी म्हणत होतो. शेवटी सहा एसटी बसेस उभ्या राहिल्या आणि दुधाचा टँकर वगैरे. आम्ही सर्वांना निवेदनं वाटली. बैलगाड्या, गायी सर्व घेऊन लोक रस्त्यावर थांबले होते. खानापूर ४००, बेणापूर २००० हणमंतवडीये, तांबखाडी, अशा अनेक ठिकाणी एकूण ५००० लोकांनी रस्ता रोको केला. अण्णांनी तडजोड चुकीची झाली हे स्पष्ट केलं. नंतर शेकापवाल्यांची व आपली मीटिंग झाली त्यात फसवण्याचा धंदा कसा झाला, आपलं नाव वगळून रस्ता रोको शेकापनेच केला असल्याची वृत्तपत्रात बातमी कशी दिली याची सही शिक्क्यानिशी बातमीच मिळाली. ती त्यांचेपुढे टाकल्यावर त्यांनी सर्व चुका मान्य केल्या.

१९८४ ला स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळीची स्थापना झाल्यानंतर जेंव्हा जेंव्हा आम्ही चार पाच गावांचं मिळून एक शिबिर घ्यायचो तेंव्हा असं लक्षात येई की मीटिंगला येणाऱ्या परित्यक्ता आणि विधवा स्त्रियांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. प्रत्येक चर्चेत आमच्या लक्षात येत असे की परित्यक्तेला सासरच्या-माहेरच्या दोन्ही कुटुंबात स्थान मिळत नसे. त्यांची इतकी हलाखीची परिस्थिती असायची की उदरनिर्वाहासाठी शेतमजुरीवर किंवा रोजगार हमी कामावर जावं लागायचं. एकूणच त्यांच्या वाट्याला अपार कष्टच असायचे. यामुळे एका शिबिरात नागमणीने परित्यक्ता मेळावा आपण घेऊया अशी कल्पना मांडली. त्यासोबतच परित्यक्तांचं सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचंही तिने सांगितलं. गेलने सर्वेक्षणासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आणि आम्ही सर्वांनी त्याला मान्यता दिली. विद्यार्थी मदतीला घेऊन एक सर्वेक्षण झालं तेंव्हा असं लक्षात आलं की प्रत्येक गावातील अडीच हजार लोकांमध्ये तीस-चाळीस परित्यक्ता आहेत. आम्ही परित्यक्तांचा मेळावा घेतला. त्यात शाहूमहाराजांच्या परंपरेप्रमाणे १) परित्यक्तांना बेघर समजून त्यांच्या नावावर घर देणं २) त्यांना वेगळी जमीन कसायला देऊन सात-बाराच्या उताऱ्यावर बाईचं नाव लावणं ३) परित्यक्तेला तसेच विधवेला बेरोजगार समजून निर्वाह भत्ता देणं ४) सर्व सरकारी कार्यालयात ‘आई पालक’ म्हणून तिची सही मान्य करणं अशा मागण्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. खरं तर महाराष्ट्रात प्रथमच १९८४-८५ मध्ये परित्यक्ता-विधवांच्या क्रांतिकारक मागण्या स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळीतर्फे मांडल्या गेल्या आणि त्या दृष्टीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांचं निकराचं धरणं आंदोलनही झालं. त्याचा जिल्हाधिकाऱ्यांवर इतका प्रभाव पडला की त्यांनी लगेचच सर्व तहसीलदार कार्यालयांना परित्यक्ता विधवांसाठी २-२ गुंठे शासकीय जमीन द्यावी असा आदेश जारी केला.

परित्यक्ता-विधवांच्या ‘करो या मरो’ स्वरूपाच्या ठिय्या आंदोलनाने प्रत्येकी २-२ गुंठे जमीन जरी पदरात पाडून घेतली होती तरी अंमलबजावणी यंत्रणा ‘पुरुषसत्ताकच’ होतीऍ ती कशी इतक्या सहजासहजी जमिनीची सत्ता स्त्रियांच्या हाती जाऊ देईल? साहजिकच नाना प्रकारच्या युक्त्या लढवून त्यांनी परित्यक्ता-विधवांना जमिनीचा ताबा मिळू नये असं वर्तन केलं. दहशत दादागिरीने राजकीय-सामाजिक दबाव आणला. या आंदोलनात जास्त त्रास झाला तो खानापुरातल्या ‘बहे’ गावच्या स्त्रियांना. बहे गावच्या १० स्त्रियांना सर्वप्रथम घर बांधण्यासाठी प्रत्येकी २ गुंठे जमीन मंजूर झाली खरी, पण प्रत्यक्षात ती मिळवायला अतोनात कष्ट पडले.

केवळ ‘बहे’ गावच नव्हे तर परित्यक्ता-विधवांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या जमिनी मंजूर केलेल्या पत्राची वासलात लावण्याचे काम सर्वच गावच्या तलाठी, सरपंच, आणि राजकारणी या सर्वांनी एकत्र मिळून केले. गावागावात त्याबद्दल काय राजकारण शिजत होतं त्याचे प्रत्येक आठवड्याचं रिपोर्टिंग इंदुताई आणि गेलने मला पत्र पाठवून केलं आहे. त्या पत्रात दोघींचंही मुंबई-पुण्यातल्या स्त्री आंदोलनाकडून सर्व प्रकारची मदत व्हावी म्हणून कळकळीचं आवाहन असायचं.

नेमकं त्याच सुमारास (१९८५-८८ साली) मुंबईतील स्त्रीवादी चळवळीचं ‘गर्भलिंग निवड आणि स्त्रीभ्रूणहत्या विरोधी आंदोलन अगदी टिपेला पोचलं होतं. ‘गर्भलिंग निवड विरोधी मंचा’ची मी संस्थापक सदस्य होते. या आणि नारी अत्याचार विरोधी मंचाच्या दर आठवड्याच्या मीटिंग्ज माझ्या करी रोडच्या घरात चालायच्या. तशाही मुंबई-पुण्यातील सर्व स्त्री कार्यकर्त्या गर्भलिंग निवड तंत्रज्ञान, स्त्रीभ्रूणहत्या आणि पुरुषसत्ताक मानसिकतेविरोधी लढ्यातील कार्यक्रमात खूपच व्यस्त असायच्या त्यामुळे शहरी मैत्रिणींकडून म्हणावं तसं सहकार्य परित्यक्ता-विधवांच्या आंदोलनाला मिळू शकलं नाही. याशिवाय आम्ही सर्वजणी नोकरी, संघटनेचं काम आणि कुटुंब अशी तारेवरची कसरत करत स्त्रीमुक्ती चळवळीची कामं करणाऱ्या होतो. त्यामुळे आम्हा सर्वांना वेळेच्या आणि ताकदीच्या खूप मर्यादा होत्या. त्यात मी स्वत:सुद्धा एका मुलीला जन्म दिला होता. एकीकडे माझी आठ तासांची नोकरी. त्यात बाळाला सांभाळण्याचे अनंत प्रश्न सोडवतानाच माझी दमछाक झालेली. परिणामी १९८७ ते ८८ सालापासून माझं विटा, खानापूर, आटपाडीला जाणं पूर्ण बंद झालं होतं. पण इंदुताईंनी आणि गेलने मात्र गावच्या सर्व घडामोडी सांगणारी अनेक पत्रं मला पाठवली. ती सर्व मी माझ्या फोरमच्या (नारी अत्याचारविरोधी मंच मुंबई) मैत्रीणीना दाखवत असे. इंदुताईं आणि गेलने जरी आमच्या (मुंबईकर मैत्रीणींच्या) वेळेच्या मर्यादा स्वीकारल्या होत्या तरी दोघींच्याही प्रत्येक पत्रातील सतत दिसणारा नाराजीचा सूर काही लपत नव्हता आणि ते अगदी साहजिकच होतं.

परित्यक्ता आंदोलनाच्या नंतरच्या काळात, इंदुताई भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं (सीपीआय) चिन्ह घेऊन निवडणुकीला उभ्या राहिल्या. त्या वेळीदेखील मुंबईतल्या कार्यकर्त्यांना इंदुताईंची प्रचाराला येण्याचा आग्रह करणारी अनेक पत्रं येत असत. परंतु माझी मुलगी लहान, आणि रजेचा प्रश्न म्हणून मी काही त्यांच्या प्रचाराला जाऊ शकले नाही. पुण्याहून निर्मला साठ्ये, शांताबाई रानडे, संध्या फडके अशी अनेक मंडळी तिथे गेली. प्रचार आणि मनुष्यबळ या अभावी त्या निवडणूक जिंकू शकल्या नाहीत. पण असं असलं तरी इंदुताईंची शोषितांच्या मुक्तीची चळवळ काही थांबत नव्हती. त्यांचा आशावाद दुर्दम्य होता. त्यांनी कासेगाव आणि आसपासच्या गावातील दलित, मांग, बौद्ध आणि भटक्या विमुक्त मुलांसाठी बालवाड्यांचं आंदोलन हाती घेतलं होतं. २३ ऑगस्ट १९९० च्या पत्रात इंदुताई लिहितात,

प्रिय कुंदा, अनिल आणि छोटी, यांना प्रेम!

कुंदा, बरेच महिन्यात आपली भेट झाली नाही, पत्रभेटही नाही. आज मुद्दाम तुला पत्र लिहीत आहे. चळवळीचे काही कामांकरता.

कासेगावी दोन बालवाड्या क्रांतिवीर बाबूजी पाटणकर प्रबोधन संस्थेमार्फत ३ वर्षांपासून सुरु आहेत. लोकवर्गणीतून चालणाऱ्या या संस्थेची आर्थिक स्थिती ठीक नसली तरी ही संस्था रजिस्टर्ड आहे. आणि म्हणूनच गेल्या वर्षी समाजकल्याण खाते – जिल्हा सांगलीस, आलेल्या राज्याच्या आदेशांप्रमाणे नेहरू शताब्दीनिमित्त १०० बालवाड्यांची प्रकरणे जिल्ह्यातून पाठवण्याबाबतच्या आदेशानुसार ‘ज्या संस्था रजिस्टर आहेत त्या संस्थांनी चालवलेल्या बालवाड्यांची प्रकरणे’ राज्याच्या पुणे ऑफिसकडे पाठवली आहेत. त्यामध्ये आपल्या संस्थेच्या दोन बालवाड्या आहेत. जिल्हा समाजकल्याण ऑफिसच्या जावक क्रमांकासहित पुढील माहिती मी तुला पाठवत आहे. तुझी ओळख समाजकल्याण ऑफिसमध्ये असल्याचे जयंताने सांगितले म्हणून तू हे काम करावंस म्हणून पुढील माहिती तुला पाठवत आहे.

मला लोकवर्गणीकरता प्रत्येक महिन्याला या दोन बालवाडी शिक्षकांचे पगार भागवण्याकरता प्रत्येकाच्या घरी फिरून देणगी, ५-१० रुपयाप्रमाणे गोळा करावी लागते आहे.. आता लोक पण कंटाळले आहेत. तरी या दोन बालवाड्यांना अनुदान मंजूर होण्याच्या दृष्टीने तू खटपट करावीस. दोन्ही बालवाड्या मागासलेल्या समाजात आहेत. पहिली मातंग समाजात व दुसरी नंदीवाले, गोसावी, अशा भटक्या समाजातील बेघर वसाहतीत आहेत. त्या दोन्ही बालवाड्या चांगल्या चालतात. तरी भटक्या मागासलेल्या समाजात चालणाऱ्या म्हणून ‘स्पेशल केस’ करून लवकरात लवकर अनुदान, दाईचे वेतन, खाऊ आदि गोष्टी मिळण्याचे दृष्टीने मंजुरी करावी. अगदी मन लावून, तुझ्या अनेक व्यापातून!

मी व गेल परित्यक्तांचे शिष्टमंडळ घेवून मुंबईस आलो होतो. श्रमिकवर थांबलो. नंतर महिला फेडरेशनच्या ऑफिसवर जेवणाची व्यवस्था केली. ६ जूनला समाजकल्याण मंत्र्यांना भेटलो. चर्चा झाली, नंतर लगेच परत आलो. तुझ्याकडे येण्यास वेळ नसल्याने भेट झाली नाही. तुझा ऑफिसचा फोन नंबर असता तर फोनवर बोललो असतो. फोन नंबर पाठव. बेबी काय म्हणते? उत्तर पाठव. ठीक.

इंदुताई

या वयातसुध्दा इंदुताईंची दलित-वंचित-बहुजन-भटक्याविमुक्तांच्या मुलांसाठी चालणाऱ्या बालवाड्या नीट चालाव्यात म्हणून किती धडपड चाललीय, बालवाडी शिक्षिकांचे पगार द्यावेत म्हणून त्या घरोघरी जाऊन ५-१० रुपये गोळा करतायत हे वाचून माझे डोळे पाणावले. मी त्वरित ऑफिसमधून वेळ काढून मंत्रालयातील समाजकल्याण खात्यात धाव घेतली. याला नाही त्याला भेटा म्हणत सतत एक आठवडा फेऱ्या मारल्या. शेवटी ‘पाठवतो’ असं म्हटल्यावर इंदुताईंना फोन करून कळवलं.

माझ्या प्रयत्नांचा कितपत उपयोग झाला हे कळलं नाही; पण त्यावेळी माझी आई आणि इंदुताईंच्या स्वभावातलं, वंचितांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेल्या धडपडीतलं हे विलक्षण साम्य पाहून मला अगदी रडूच कोसळलं. कारण मी १३ वर्षांची असताना माझ्या आईचा मृत्यू झाला. तोही तिने आणि तिच्या महिला मंडळाच्या मैत्रिणींनी मिळून स्थापन केलेल्या घाटकोपरमधील प्राथमिक शाळेच्या इमारत निधीसाठी अनुदान आणि देणग्या मिळवायला गेलेली असताना स्कूटरवरून पडून. माझ्या आईनेदेखील विलक्षण प्रेरणेने कोणाचीही पर्वा न करता स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. आईने मुंबईच्या शेरीफ अंजनाबाई मगर आणि महाराष्ट्रातील शिशुविहार चळवळीच्या संस्थापक ताराबाई मोडक यांच्या मदतीने कुर्ला आणि घाटकोपर इथे शाळा स्थापन केल्या होत्या. अगदी इंदुताईंसारखीच माझी आईसुद्धा सामाजिक बांधिलकीवर ठाम होती. ओळखीतल्या तरुणांचे आंतरजातीय विवाह लावून देण्याबाबत अतिशय कणखर स्वभावाची होती. माझ्या आईने आंतरजातीय विवाह लावून दिल्यामुळे आमच्या कुटुंबाला गाववाल्यांनी काही काळ वाळीतदेखील टाकलं पण ती जराही मागे हटली नाही. एका परीने मी जेव्हा जेव्हा इंदुताईंसोबत असायचे तेंव्हा त्यांच्यामध्ये मी माझी आईच शोधायचे. नोकरीत शनिवार-रविवारला लागून सुट्ट्या आल्या की सरळ रात्रीची गाडी पकडून कासेगावी धावत सुटायचे. मधल्या काळात अनेक व्यापात गुंतल्याने हे आकर्षण कमी झालं होतं. पण तरी २०१६ मध्ये जातीमुक्ती आंदोलनाच्या पुणे ते कोल्हापूर संघर्ष यात्रेच्या वेळी अनेक वर्षानंतर वयाच्या ९० व्या वर्षी त्यांना भेटल्यावर पुन्हा माझ्या आईला भेटण्याचा आनंद मला घेता आला.

अशा या आमच्या कॉम्रेड आई. त्यांच्याबद्दल आणखी काय काय सांगावं?

कुंदा प्रमिला नीळकंठ
kundapn@gmail.com