मानीमुनी अन् मी

०७ ऑगस्ट २०२०

भटकंतीची आवड माझ्यामध्ये कुठून आली, देव जाणे. आजी-आजोबांनी झोपताना सांगितलेल्या गोष्टी आणि गायलेली अंगाई गीते यावर बालपण पोसलेलं... त्यातूनच वाचनाची आवड जोपासली गेली. प्रत्येक सफरीत जीवघेण्या संकटातून बचावून आलेला सिंदबाद हिंमत न हारता प्रसंगावधान व संयम राखून प्रत्येक संकटावर मात करतो. ‘गलिवर्स ट्रॅव्हल्स्’मधला डॉ. गलिवर सागरी सफरीवर गेला असता लिलिपुटसारखे अद्भूत अनुभव घेतो. आम्ही राहत असू ते धर्माबाद हे गाव छोटसं. गावाच्या भोवती मोठा डोंगर. पायथ्याला हनुमान मंदिर आणि डोंगराच्या अगदी टोकावर आई भवानीचं मंदिर. दर रविवारी आम्ही या माळावर फिरायला जायचो. आजूबाजूची इतरही अनेक ठिकाणं पप्पांच्या स्कूटीवर आम्ही पालथी घातली... बासर, निजामाबाद, निर्मल, कद्री पापनाशी, इस्लामपूरचा सहस्रकुंड धबधबा... असं खूप फिरलो. कॉलेजला असतानासुद्धा बाबा आमटेंचं श्रमसंस्कार शिबीर, एन.एस.एस. कॅम्पच्या निमित्ताने कोसबाड, जुन्नर, शिवनेरी गड, कर्नाटकातील कुर्वापूर असा खूप प्रवास झाला. यातूनच कदाचित हे भटकंतीचं वेड मला लागलं असावं.

६ मार्च ते १३ जुलै २०१९ या कालावधीत त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँंड, आसाम, अरुणाचल, बिहार, सिक्कीम, कोलकता, उत्तर प्रदेश असा जवळपास सहा हजार किलोमीटरचा सोलो सायकलिंगचा प्रवास केला. पुण्यात परत आले. काही दिवस आराम केला. आणि परत एकदा एका स्वीडिश ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जॉब जॉईन केला. विविध देशांमधील लोकांशी बोलायचं, फ्लाईट्सबाबतच्या त्यांच्या अडचणी सोडवायच्या, तिकीट बुकिंग करण्यात त्यांना मदत करायची, हे असं खरं तर कंटाळवाणं काम असलं तरी रोज नवीन लोकांसोबत बोलणं आणि त्यांच्या अडचणी सोडवणं हे थोडंस इंटरेस्टिंग आहे. वीकएंड्सला कधी मलबारच्या किनाऱ्यावर, कधी कोलकता, कधी आज्जीला भेटायला धर्माबादला तर कधी काही काम काढून हैदराबादला असं माझं फिरणं चालूच असतं.

माझ्या पहिल्या सायकल सफरीबद्दल दिव्य मराठीच्या २०१९ च्या दिवाळी अंकात माझी मुलाखत छापून आली. त्या दिवाळी अंकाचं प्रकाशन कॅप्टन नीलेश गायकवाड यांच्या कार्यालयात झालं. नीलेश सरांनी मला अंदमानमध्ये सायकलिंग करण्याची ऑफर दिली. अंधा क्या मांगे... एक आँख! पण इथे तर मला... दो आँखे मिल गयी! नीलेश सरांनी फक्त माझेच नाही तर माझ्या दोन मैत्रिणींचंसुद्धा प्रायोजकत्व स्वीकारलं. मी नॉर्थ ईस्टमध्ये सायकलिंग करत असतानाच ठरवलं होतं, की पुढचा प्रवास नॉर्थ ईस्टमधील एखाद्या मुलीसोबत करायचा. आसामची ‘मिसिसिपी’ आणि लखनौमधील ‘सुजाता’ तयार झाल्या. मिसीसिपी मला गुवाहटीच्या रस्त्यावर भेटली होती. मी त्या भागात असताना तिने मला खूप मदत केली होती. फोटोग्राफी, ट्रॅव्हलिंग, नेचर ड्रॉईंग या तिच्या आवडीच्या गोष्टी. लखनौची सुजाता-तिचा मोठा मुलगा शिलॉंगला हॉटेल मॅनेजमेंट करतो. अन् दुसरी मुलगी जी तिने दत्तक घेतलेली आहे, ती बारा वर्षांची आहे. सुजाताला मूल दत्तक घेण्याची खूप इच्छा होती. ही मुलगी थोडी सावळी आहे. इतर सगळे कुटुंबीय गोरे-गुलाबी आहेत, म्हणून तिच्या मनात थोडा कॉम्प्लेक्स निर्माण झाला होता. त्यामुळे सुजाताने तिच्या मुलीला भेटण्यासाठी मला घरी नेलं. कदाचित मला पाहून तिचा कॉम्प्लेक्स दूर होईल यासाठी. मला माझ्या रंगाचा कधीच कॉम्प्लेक्स आला नाही आणि माझा सावळा रंग कुणाचा तरी कॉम्प्लेक्स दूर करण्याच्या कामी येऊ शकतो, हे ऐकून खूपच छान वाटलं होतं तेव्हा. एका मुलीला दत्तक घेण्याचं खूपच चांगलं काम सुजातानं केलं होतं.

तसं पाहायला गेलं तर, मला सोलो ट्रॅव्हल जास्त आवडतं. ग्रूप ट्रॅव्हलिंगचा तसा मला अनुभवही नव्हता. प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र विचार असतात आणि एकट्याने प्रवास केल्याने आपण स्वावलंबी बनतो. स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतो. संकटावर एकट्याने मात करायला शिकू शकतो. तरी मिसीसिपी आणि सुजाता या दोघीही माझ्यासारख्याच मनस्वी, थोड्याशा वेगळ्या वाटेने चालणाऱ्या, म्हणून हा प्रयोग करायचा ठरवलं.

१९ फेब्रुवारी २०२० ला अंदमानला पोचण्याचं निश्‍चित झालं. मी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला. सगळं काही निश्‍चित झालं. २८-२८ जानेवारीपर्यंत. एक निश्‍चित होतं की, १८ फेब्रुवारीला अंदमानसाठी फ्लाइट घ्यायची. पण म्हणतात ना - Dance first and think later. It’s the natural order. तसं... ३० जानेवारीला माझ्या मनात विचार आला - पुणे ते चेन्नई हा प्रवास सोलो सायकलिंगने केला तर? मग काय, मागील प्रवासाप्रमाणेच तडकाफडकी निर्णय अमलात आणलाच. नी लेशसरांशी चर्चा केली, आईला सांगितलं आणि रात्री उशीरापर्यंत घरभर आनंदाने उड्या मारत फिरले. प्रवास सुरू करायचा या नुसत्या कल्पनेनेसुद्धा माझ्या अंगात उत्साह संचारतो... मन प्रसन्न होतं...!

मी आणि माझी मानीमुनी प्रवासासाठी अगदी सज्ज होतो. मानीमुनी म्हणजे माझी सायकल. नॉर्थ ईस्टच्या प्रवासात मानीमुनी नावाच्या वनस्पतीचा परिचय झाला. तिथल्या लोकांच्या आहारात या वनस्पतीचा समावेश असतो. ही वनस्पती खूप ऊर्जा देणारी असते. तशीच माझी सायकलही मला खूप ऊर्जा देते. म्हणून मी माझ्या सायकलचं नाव मानीमुनी ठेवलंय.

३१ जानेवारीला थोडी शॉपिंग केली. मानीमुनीचं सर्व्हिसिंग केलं. पंक्चर काढायला शिकले. याआधीच्या प्रवासात पंक्चर काढण्यासाठी इतर सायकलिस्ट्सची मदत घेतली होती. पण आता थोडं ‘आत्मनिर्भर’ व्हायचं ठरवलं. शिवाय हा प्रवास थोडा ‘ऑफ रूट’ करण्याचाही विचार होता. म्हणून मग सरळ पुणे - सातारा - बेळगाव हा हायवे न निवडता पुणे - लोणंद - शिरवळ - फलटण - सांगली - मिरज - चिकोडी - संकेश्‍वर - बेळगाव - धारवाड - बेल्लारी - ताडीपत्री – चेन्नई असा मार्ग आखला होता.

१ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सावरकर स्मारकापासून प्रवास सुरू केला. हा प्रवास मला सोशल मीडियापासून दूर राहून करायचा होता, म्हणून शक्यतो कुठेही बातमी न देण्याची नीलेशसरांना विनंती केली. त्यांनीही ही गोष्ट मान्य केली. संपूर्ण प्रवासादरम्यान दररोज संध्याकाळ झाली की न चुकता त्यांचा कॉल येत असे.

दुपारी १२ ते १ दरम्यान शिरवळच्या अलीकडे एका बंद पडलेल्या हॉटेलच्या बाजूला शेजारी-शेजारी.दोन झाडं दिसली. मग काय, हॅमॉक लावला आणि गाणं लावून मस्त आराम केला. पाखरांचा आवाज, झाडांच्या पानांची सळसळ, झाडांच्या बुंध्यावरून तुरूतुरू फिरणाऱ्या खारूताई, किडे आणि मुंग्या... मस्तच!

पहिल्या दिवशी ६० ते ७० किलोमीटरवर असलेल्या लोणंदला पोचले. अंधार पडलेला होता. रस्ता ओलांडून पलीकडे गेले. मोठ्ठं अंगण आणि पलीकडे एक घर. कुत्री भुंकत होती. मी हाक दिली. एक बाई एका छोट्या मुलीला घेऊन मला पाहात होत्या. कदाचित घाबरत होत्या. मग मी पुढच्या घरी गेले. तिथे ओसरीवर एक काका बसले होते. मी त्यांना सांगितलं - मी सायकलवरून चेन्नईला जातेय आणि मला आजच्या रात्रीला आसरा देण्याची विनंती केली. त्यांनी तोंड भरून स्वागत केलं. ‘या, या. लय मोठ्ठं आहे घर. बसा.’ म्हणाले. तांब्याभर पाणी दिलं. तांब्या ठेवायला आत गेले आणि लगेच चहाची कपबशी घेऊन आले. मी चहा बशीत ओतून प्यायले. मी लहान असताना माझे आजोबा चहा बशीत ओतून, फुंकर घालून थंड करून मला पाजत असत. त्याची आठवण झाली. तितक्यात आजीही बाहेर आल्या आणि गप्पा मारत बसल्या. झाडांच्या पलीकडे नळ होता. चांदण्याच्या प्रकाशात नळाखाली आंघोळ करण्याची मजा काही औरच! मागील प्रवासात मेघालयमध्ये मोरँग कँग येथील बांबू ट्रेक केल्यावर निळ्याशार डबक्यामध्ये दोन-तीन तास डुंबत बसले होते जंगलात... एक अविस्मरणीय अनुभव होता तो. काकांनी व त्यांच्या मुलांनी गायीबैलांना चारा घातला, दूध काढलं, डेअरीच्या गाडीत दूध पाठवलं, हे सगळं पाहताना खूप मजा आली. मग जेवणं झाली. रात्री झोपायला अंगणामध्येच पथारी टाकली. आजींनी खूप आग्रह केला घरात झोपायचा, पण अंगणात उघड्यावर झोपण्यात जी मजा आहे, ती चार भिंतींच्या आत झोपण्यात नाहीच!

सकाळी उठून चहा-नाश्ता उरकून आजीसोबत सेल्फी घेतला आणि त्यांचा निरोप घेतला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सायकलिंग करत होते. शेतामध्ये ज्वारी, गहू डोलत होते. दुसऱ्या दिवशी बिजवडी या गावी मुक्काम झाला. इथेही आजी, आजोबा, त्यांचा मुलगा व सून असं कुटुंब होतं. एक म्हैस, कुत्रा, मांजर, कोंबडी अन् तिची पिल्लं हा परिवारही अंगणात नांदत होता. शेतातल्या ताज्या वालाची भाजी, भाकरी, कुरवड्या असं मस्त जेवण. आजी पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, ‘एक चांगला पोरगा बघून लग्न कर बाळ. कवर फिरशील असं एकट्यानं?’ मी आपली आजीच्या ‘हो ला हो’ करत होते.

सकाळी उठले तर सायकल पंक्चर झालेली. पंक्चर काढलं. नाश्ता केला. आजीने दिलेली शेंगदाणा चटणी अन् भाकरीची शिदोरी घेतली आणि सायकलवर स्वार झाले. दहा-पंधरा किलोमीटरवर पुन्हा सायकल पंक्चर झाली. सांगली दोन-तीन तासांच्या अंतरावर होतं. फेसबुकवर शोध घेतला तर एका रोहित नावाच्या सायकलिस्टचा संपर्क झाला. त्याने सांगलीपर्यंत यायला सांगितलं.

आता लिफ्ट घ्यावी लागणार. एका ट्रकला हात दाखवला. ड्रायव्हर असेल तिशी-पस्तीशीचा. क्लिनर विशीच्या आतला. सायकल चढवली आणि मी ट्रकमध्ये बसले. दोघेही नॉर्थ इंडियन होते. ते पंजाबहून सांगलीला द्राक्षं घेण्यासाठी निघाले होते. ड्रायव्हर सभ्यपणे वागत होता, पण हा किशोरवयीन क्लिनर मात्र थोडा ताल सुटल्यासारखा बोलत होता. मी त्यांना कडक शब्दांत समज दिली. ट्रक थांबवायला लावून सायकल उतरून घेतली. ट्रक ड्रायव्हरचा असा निगेटिव्ह अनुभव पहिल्यांदाच आला. परत एकदा दुसर्‍या ट्रकमध्ये लिफ्ट घेऊन सांगलीला पोचले. सायकलिस्ट रोहितच्या मदतीने ट्यूब बदलून घेतली आणि त्याचा निरोप घेऊन पुढे निघाले. संध्याकाळी सातच्या सुमारास कर्नाटकातील कागवाडला पोहोचले. एका शेतामध्ये भलं मोठ्ठं घर... एक आजी, आजोब आणि त्यांची सून ओसरीवर बसलेले... दोन लहान मुली अंगणात खेळत होत्या. त्यांना मुक्कामाबद्दल विचारलं. त्यांनी हो-नाही करत, थोडी विचारपूस करून परवानगी दिली. जेवण वगैरे करून मी हॉलमध्ये बसले. रात्री साडेदहाच्या सुमारास त्या आजोबांची दोन्ही मुले घरी परतली. ते स्वयंपाक घरात बसून जेवत होते. स्वयंपाकघरातून कुणाला तरी थप्पड मारल्याचा आवाज आला. कदाचित अनोळखी व्यक्तीला घरात घेतल्याची शिक्षा काकूंना मिळाली होती. माझ्यामुळे त्यांना त्रास झाला. मी लगेच त्यांची क्षमा मागून तिथून निघाले. असा अनुभवही पहिलाच. रात्रीचे ११ वाजून गेलेले. पुढे दोन-तीन घरांमधूनही नकार मिळाला. शेवटी रात्री साडेअकरा वाजता एका काका-काकूंनी दार उघडलं. सायकल आत घेतली. त्यांच्या मुलीसोबत ओळख करून दिली. काकू स्वत: खाली अंथरूण टाकून झोपल्या आणि मला पलंगावर झोपवलं. मला तर वाटत होतं, रात्र एखाद्या शेतात किंवा झाडाखाली काढावी लागणार!

सकाळी काका-काकू आणि दीदीचा निरोप घेऊन निघाले. रस्त्यात जाता-जाता एक वीटभट्टी दिसली. तिथे कामगारांनी वीट कशी बनवतात, ते सविस्तर समजावून सांगितलं. दुपारी चिकोडी येथे एका कुटुंबात आराम केला. इंग्रजी आवळे, टहाळं (ओला हरभरा), रामफळ, केळी, काय काय खाल्लं. वर पुन्हा जेवणही केलं. शेतात झाडाखाली निवांत झोप घेतली. काही फोटो घेतले आणि पुढे निघाले. रात्रीचा मुक्काम संकेश्‍वर येथे केला.

संकेश्‍वरहून सकाळी आठ वाजता निघाले. पंधरा-वीस किलोमीटरनंतर हायवेला ओयो हॉटेल आणि काही दुकानं होती. बाजूला एक चपलांचं दुकान होतं. तिथे एक काका बसलेले होते. त्यांना म्हटलं, ‘काका, माझी ही सायकल आणि ही पर्स राहू द्या. मी जरा वॉशरूमला जाऊन येते.’

ते म्हणाले, ‘बेटा, पैसे असतील की त्यात.’

मी म्हटलं, ‘काका, माझा विश्‍वास आहे तुमच्यावर.’

परत आले. काकांशी गप्पा झाल्या. त्यांनी राहण्याचा आग्रह केला. दुपारी जत्रा आहे ती बघून आणि जेवण करूनच जा म्हणाले. या जत्रेत कोंबडी आणि बकऱ्यांचा बळी देण्याचा प्रकार पाहिला. दुपारी पुरणपोळीचं जेवण आणि रात्री चिकन फ्राय, झणझणीत गावरान चिकन रस्सा आणि भात, भाकरी असं मस्त जेवण झालं. संध्याकाळी काकांच्या दुकानात चपलांचं गिऱ्हाईकपण केलं, पण एकही चप्पल विकली गेली नाही.

पुढे आंध्र प्रदेशमध्ये ताडीपत्री नावाच्या गावी रात्री उशीराच पोचले. झालं असं, ऊन प्रचंड पडत होतं अन् थांबण्यासाठी ना एखादं दुकान, ना एखादं झाड. एका ट्रकमध्ये लिफ्ट घेतली. हा ड्रायव्हर मल्लिकार्जुन मात्र खूप सुस्वभावी. बोलता बोलता त्याने म्हटलं, ‘यहां तक आये हो, और ‘बेल्लम केव्ह्ज’ नहीं देखे आपने, तो क्या मतलब?’ मग आम्ही पोचलो बेल्लम केव्हजला. खूप सुंदर ठिकाण. प्रचंड मोठ्या गुंफा... अंधाऱ्या आणि नीरव शांत. दोन-तीन तास या गुफांमध्ये फिरत होतो. पण एका क्षणासाठीही असं वाटलं नाही की, मी कुणा अनोळखी व्यक्तीसोबत आहे. वर्षानुवर्षांची ओळख असलेल्या, अगदी रक्ताची नाती असलेल्या व्यक्तीही कधी कधी खूप अनोळखी वाटतात, तर कधी अनोळखी व्यक्तीही खूप जुनी ओळख असल्यागत विश्‍वासार्ह वाटतात.

बेल्लम केव्हज पाहून आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केलं. मल्लिकार्जुनला तिथेच थांबायचं होतं. एका ट्रकला थांबवून त्याने माझी पुढची सोय लावून दिली. थोडं जंगल पार करायचं होतं. काहीही अडचण आली तर लगेच कॉल करायला सांगितलं. त्या ट्रकवाल्यालाही माझ्याशी नीट वागायला तीन-तीनदा बजावून सांगत होता तो. त्याचं काळजी घेणारं हे सगळं वागणं पाहून मलाही चांगलं वाटलं! जंगल पार करून हायवेवर उतरले. रात्रीचे आठ वाजलेले. तीन-चार लॉजेसमध्ये विचारलं, पण सगळ्यांनी टाळाटाळ केली. शेवटच्या एका लॉजमध्ये गेले तर तिथेही नकारघंटा. पैसे देऊनही राहायला नकार. म्हणे ‘अकेली लडकी को रूम नहीं दे सकते, मॅडम!’ त्याची तेलगू अ‍ॅक्सेंट असलेली हिंदी ऐकायला मजा येत होती. शेवटी मी त्याला म्हटलं, ‘भैया, जरा मेरा नाम गुगलपर सर्च करके देखो । मुझ जैसी सेलिब्रिटी आयी है, और आप हो की एक रूम नहीं दे सकते रहने को?’ त्यानं सर्च केलं आणि जाम खूश झाला. राहायची सोय केली. अगदी किरायासुद्धा माफ! दुसऱ्या दिवशी निघताना ‘चेन्नई तक कुछ भी प्रॉब्लेम आया तो कॉल करना, मॅडम.’ असे म्हणून निरोप दिला.

मध्ये एकदा कर्नाटकमध्येही असाच उशीर झालेला. तिथे सगळे कन्नड बोलणारे. हिंदी कुणालाच येत नव्हते. एक १३-१४ वर्षांचा मुलगा थोडं बहुत इंग्लिश बोलत होता. त्या घरातील छोटी मुलगी मला तिच्या मैत्रिणीकडे घेऊन गेली. छोटी-छोटी घरं, मातीच्या चुली, सगळं कसं खूपच सुंदर! मी आपली हिंदी मराठीतून बोलायची आणि ते सगळे कन्नडमधून. मग काय हास्याचे लोट उठायचे. खूपच मजा.

आंध्र प्रदेशमध्ये अशाच एक घरी थांबले होते. तिथल्या आजींनी सकाळी सकाळी केसांना भरपूर तेलानी मॉलिश करून वेणीच घातली माझी. मन खूप भरून आलं होतं तेव्हा. शब्दांविना प्रेम व्यक्त करण्याची किती छान पद्धत!

पुढे लुकंडी, हम्पी, बल्लारी, तुंगभद्रा डॅम हे पाहत पाहत चेन्नईला पोहोचले. हम्पीला गिरमिट नावाचा पदार्थ चाखला. बेळगावला कुंदा, तर धारवाडला धारवाडी पेढे. हे पंधरा दिवस कसे गेले, ते कळलंच नाही. चेन्नईला दोन दिवस मुक्काम केला. एका स्थानिक मित्रासोबत चेन्नईत भटकून घेतलं मनसोक्त! या मित्राने सायकल बॉक्समध्ये छान पॅक करून दिली. तो डेकॅथलॉनमध्ये सायकलिंगचा स्पोर्ट्स लीडर आहे. अंदमानची फ्लाइट १९ फेब्रुवारीच्या सकाळी होती. बाकी काही असो वा नसो, विंडो सीट मिळवणं जास्त महत्त्वाचं. मग ती ट्रेन असो वा फ्लाइट! चेन्नई एअरपोर्टवर पोचले. सायकल चेक-इन केली. आणि मी चेकिंगच्या लाईनमध्ये आले. पण चुकून सायकलचा पाना माझ्या बॅगेमध्येच राहिला. परत जावं लागलं. ती बॅगसुद्धा चेक-इन बॅगेजमध्ये टाकली. पण या धांदलीत विंडो सीट मागायची विसरले. बाजूला एक नवविवाहित जोडपं होतं अन् ती नवरी विंडोसीटला बसली होती. ती मुलगी विंडोतून बाहेर बघायचं सोडून आपल्या नवऱ्याच्या डोळ्यांतच बघत बसली होती. मी तिला विचारलं, ‘कॅन आय बॉरो युवर विंडो सीट?’ ती लगेच राजी झाली आणि मी एकदम खूश!

सकाळची फ्लाइट होती. सूर्योदय झालेला होता. वातावरण खूपच ढगाळ होतं. मग बघता बघता आम्ही अंदमानच्या जवळ पोहोचलो. निळाशार समुद्र आणि मधे काही छोटी मोठी बेटं. अप्रतिम नजारा होता. मन भरून पाहून घेतलं सगळं. एअरपोर्टवर उतरले, नीलेश सरांचा स्टाफ तयारच होता रीसिव्ह करायला. उदयकुमार दास नावाचा टूर मॅनेजर आला होता. त्याचं नाव ऐकल्यावर मी त्याला विचारलं, ‘तुम्ही बंगाली आहात का? इथे बंगाली लोक भेटतील असं वाटलंच नव्हतं.’ तर तो म्हणाला, ‘इथे तुम्हाला भारतातल्या सगळ्या ठिकाणचे लोक भेटतील. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आणि ईस्ट पाकिस्तान स्वतंत्र होण्याच्या वेळी अनेक लोक भारतात आले होते. ते लोक इथेच वसले. त्याच वेळी खूप लोक अंदमान, म्यानमार इत्यादी ठिकाणी पण गेले होते.’

मग आम्ही हॉटेलवर पोहोचलो. राहायची खूप छान व्यवस्था केली होती नीलेशसरांनी. फ्रेश होऊन मी परत एअरपोर्टला गेले. मिसिसिपीला आणायला. एक वाजण्याच्या सुमारास सुजाताही आली. आम्ही परत हॉटेलवर आलो. तिथे मस्त चहा, स्नॅक्स, गप्पा. मी जसं आधी म्हटलं होतं, तसा प्रत्येक प्रवास वेगळा असतो. जशी झाडाला हॅमॉक बांधून झोपण्यात अन् झोपडीत जेवण करण्यात एक मजा आहे तशीच लक्झरियस हॉटेल्समध्ये पांढऱ्या शुभ्र बेडशीट्स टाकलेल्या पलंगावर लोळण्यात अन् टेस्टी फूड अन् चहा कॉफीवर ताव मारण्यात पण एक वेगळीच नशा आहे. अन् त्यात हे सगळं फ्री असतं तेव्हा तर एकदम स्वर्गसुखच!

मग संध्याकाळी आम्ही सायकल्सवर जवळच्या बीचवर जाऊन आलो. उदय सगळीकडे सोबत असायचा आमची काळजी घ्यायला. हॉटेलचा बाकी स्टाफपण खूपच छान होता. हॉटेल पाम ग्रोव्ह खूप छान मेन्टेन केलेलं आहे. ही एका मल्याळी फॅमिलीची प्रॉपर्टी आहे. खूप सारी झाडी. त्यात छोट्या छोट्या हट्स. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथले म्युझियम्स आणि इतर बीचेसला भेट दिली. गावात फेरफटका मारला.

२१ फेब्रुवारीला आम्ही तिघी आमच्या सायकल्स सपोर्ट व्हॅनमध्ये टाकून नॉर्थ अंदमानला जाण्यास निघालो. आमच्या सोबत संदिल, ईश्‍वर आणि सुनील असे तिघेजण होते. आमचे व्हिडिओज घेणं, आमच्या खाण्यापिण्याचं पाहणं, आमच्या राहण्याची काळजी घेणं आणि सर्व प्रवासात सोबत करणं हे त्यांचं काम होतं. संदिल तमिळ होता. सुनील झारखंडचा तर ईश्‍वर तेलुगू भाषिक होता. २१ च्या संध्याकाळी दिगलीपूरला पोहोचलो. रस्त्यात जंगलाचा भाग लागतो. तिथे ३-४ जारवा जमातीचे लोक दिसले. या भागातून दिवसातून फक्त चार वेळेसच गाड्यांची ये-जा करण्याची परवानगी आहे. त्यानंतर बोटीतून एक नहर पार केली. खूप मस्त वाटत होतं. दिगलीपूरला हॉटेलमध्ये थांबलो. उदय त्याच्या घरी थांबण्याचा आग्रह करत होता. तो दिगलीपूरचाच आहे, पण त्याचं घर लांब होतं आणि अंधारही झाला होता. म्हणून आम्ही हॉटेलवरच थांबलो. तरी त्याच्या वडिलांनी गावरान चिकन, पोळ्या आणि भात असं जेवण आणून दिलं आम्हां सगळ्यांसाठी. गावाकडचे लोक खूपच साधे असतात, हेच खरं.

आम्ही आमच्या सायकली संध्याकाळी असेंबल करून घेतल्या. पहाटे चारला परतीच्या प्रवासासाठी निघालो. घनदाट जंगल, मोठमोठी झाडं, नीरव शांतता एन्जॉय करत आम्ही निघालो. इथले रस्ते मात्र फारच खराब आणि चढ-उताराचे होते. कधी शांत-शीतल, घनदाट जंगल तर कधी अथांग असा समुद्र किनारा. छोटी छोटी गावं, मधे कधी वॉटर ब्रेक तर कधी फोटोग्राफी असं करत दररोज ६० ते ८५ किलोमीटर अंतर पार केलं. सोबत सपोर्ट व्हॅन असल्याने हा प्रवास भलताच सोपा वाटला मला.

रस्त्यात दुपारी कधी झाडाला हॅमॉक लावून तर कधी समुद्रकिनारी बीअर पीत, तर कधी संदिलच्या घरी आराम केला. एके दिवशी सायकल चालवताना रस्त्याच्या कडेला एक लांबलचक साप मरून पडला होता. मला खूप वाईट वाटलं तो मेलेला साप बघून.

एके ठिकाणी समुद्राची ओहोटी सुरू होती. दुपारच्या वेळी तिथे थांबलो. खूप वेगवेगळे जीव बघायला मिळाले तिथे. कोरल्सवर चालत समुद्रात आत गेले आणि लाट आली की अनेक रंगीत मासे, पाण्यातले वेगवेगळे जीव कोरल्सवर येऊन त्यांच्या छोट्या छोट्या खड्यांमध्ये जमा होत होते. खूपच अप्रतिम होतं हे सगळं. संध्याकाळी जवळच्याच एका हॉटेलमध्ये राहिलो. या हॉटेलच्या मालकीणबाई बर्माच्या होत्या. खूप छान वाटलं, विविधतेतील एकता बघून!

२५ तारखेला सकाळी पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. २६ तारखेला सेल्युलर जेल, लाइट शो आणि रॉस आयलंड इत्यादी बघून मग २७ तारखेला फ्लाइटने चेन्नईला परत आलो. तिथून मी पुण्याला, मिसिसिपी आसामला आणि सुजाता लखनौला परतली. हा अनुभव खूपच अविस्मरणीय होता. आजही अंदमानहून फोन्स येतात सगळ्यांचे.

अंदमानमध्ये जात धर्म जास्त मानले जात नाहीत. लोक आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह सर्रास करतात. बंगाली बोलणारे तमिळ आणि हिंदीही बोलतात. मला तर वाटतं, धरतीवर स्वर्ग आहे, तर तो इथेच...कारण इथे पाहायला मिळते समानता आणि हाव नसलेले लोक.

नवीन लोकांशी स्वत:ला जोडून घेणं, त्यांच्या आयुष्यात आणि संस्कृतीत डोकावणं हा छंद खरंच जोपासण्यासारखा आहे. प्रत्येक प्रवासाची मजा वेगळी असते. प्लॅन्ड व स्पॉन्सर्ड ट्रिपमध्ये सगळं ठरल्याप्रमाणे वेळच्या वेळी मिळत असते, ही मजा असते, तर अन्प्लॅन्ड ट्रिपमध्ये पुढच्या क्षणी काय होईल याची काहीच खात्री नसते. यात एक वेगळंच थ्रिल असतं. प्रवासाचं साधन, कालावधी, कारण काही का असेना, प्रत्येकानं स्वत:ला आणि आयुष्याला समजून घेण्यासाठी प्रवास करायलाच हवा!

शाश्‍वती भोसले

bhosaleshashwati@gmail.com