माणूस असण्याच्या नोंदी : वास्तवावर सखोल भाष्य

०३ मार्च २०२२

नव्या दमानं प्रवासाला निघालेल्या वाटसरूला मध्येच थांबता येत नाही. मजल दरमजल प्रवास करून, आकाशाला मिठी मारण्याचं स्वप्न पाहावं लागतं. हा सोस नक्कीच सोपा नाही. जेव्हा या सोसण्याचा कडेलोट होतो, तेव्हा क्रांतीचा जन्म होतो. मग त्यातून स्फुल्लिंगाप्रमाणे कविता धुमसू लागतात. अशा कविता माणसाला स्फूर्ती देतात, स्वाभिमान जागवतात आणि अन्यायाचा प्रतिकार करतात. माणसाच्या हक्कासाठी लढताना माणसामाणसांतील भेदभाव नष्ट करण्याचा उद्‍घोष करतात. अशा कविता माणसाला केंद्रस्थानी ठेवून अभिव्यक्त होतात. याच जाणिवेतून माणूसपणाचा शोध घेऊन मेघराज मेश्राम यांचा ‘माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवितासंग्रह मराठी साहित्यविश्वात दाखल झाला आहे.

५९ कवितांचा हा संग्रह लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केला असून, प्रफुल्ल शिलेदार यांनी आशयगर्भ शब्दांत त्याची पाठराखण केली आहे. कवितांच्या अंतरंगाचा ठाव घेणारं बोलकं मुखपृष्ठ राजू बाविस्कर यांनी रेखाटलं आहे.

बऱ्याच वेळा जगण्याची नीतीमूल्यं पाळूनही विपरीत घडतंच. सबंध आयुष्य नांगरून काढलं तरी सुखाचं पीक कमी अन् दारिद्र्याचं तणकट धुऱ्याबंधाऱ्यासारखं वाढत जातंच. चिखलानं माखलेली आणि काट्या-कुपाट्यानं रक्ताळलेली पावलं... हा भोग शेतकऱ्यांच्या नशिबी कायमच. बेलगाम अस्मानी-सुलतानी संकटांनी विळखा घातलेलाच. दुःख, दैन्य, दारिद्र्याचा असह्य कोंडमारा पाचवीला पुजलेलाच. अशा वैफल्यग्रस्त स्थितीत कच न खाता अंगावर चालून आलेल्या काळोखाचीच नांगरणी करून ‘उजेडाची पेरणी’ करण्याचा आशावाद मेघराज मेश्राम व्यक्त करतात.

‘‘असा कच खाऊ नकोस भाऊ
ऊठ, काळोख नांगरून काढू
उजेडाची पेरणी करू!’’

इतक्या प्रगल्भ जाणिवेतून पोशिंद्या कष्टकऱ्यांची अनुभूती कवी अधोरेखित करतात. इथल्या व्यवस्थेनं माणसाला प्रश्नांकित केलेलं आहे. संघर्षाची ऊर्मी जागृत केली आहे. सामाजिक विषमतेबद्दल चीड, दीनदलित, शोषित, पीडितांबद्दल सहानुभूती ही आश्वासक वाट तथागत गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारप्रणालीने दाखविलेली आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता ही मूल्यं परागंदा व्हावी आणि गडद अंधारात स्वतःचं अस्तित्व विरघळून श्वास गुदमरून जावेत. दिशादिशांतून ऐकू येणारे हुंदके, आर्त किंकाळ्या, विखारी विचारांचं सर्वदूर पसरलेलं अरण्य मानवतेला ओरबाडून काढण्याची भाषा करते, तरी कुणीही काहीच बोलत नाही. यामुळे कवी व्यथित होतो आणि आपली चीड शब्दातून व्यक्त करतो -

‘‘अंधार एवढा घट्ट की, अस्तित्वच विरघळून जावे
इतक्या भयाणतेत हे जीव कसे जगतात?
कळत नाही, कुणी काहीच कसे बोलत नाही?’’

आजमितीस स्वातंत्र्याची सात दशके पूर्ण झाली आहेत; पण आज आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आहोत का? भरकटलेल्या विचारांनी नाती नासवून टाकणारी प्रवृत्ती सगळीकडेच कोलाहल निर्माण करीत असते. विश्वप्रेमाचा अंतर्ध्वनी लयास जाऊन जातिभेद, रंगभेद, राष्ट्रभेद फोफावला आहे. शहरापासून तर गावापर्यंत केवळ दहशत! मग स्वातंत्र्य कोणते? विज्ञानयुगात चंद्रावर वसाहत करण्याचं, मंगळावर वर्चस्व गाजवण्याचं स्वप्न पाहणारा माणूस भरकटत गेलाय. स्वार्थाने बरबटलेल्या वृत्तीच्या माणसाचं वागणं पाहून कवीला प्रश्न पडतो -

‘‘ती पाखरे
चेहऱ्यावर त्यांच्या
भयाचा लवलेशही नाही
त्यांनाच
स्वातंत्र्याचा अर्थ विचारू या!’’

यातून कवीचा उपहास प्रगट होताना दिसतो. वास्तव दर्शनाकडून चिंतनगर्भतेकडे प्रवास करणारी ही कविता समाजव्यवस्थेबाबतचं सखोल चिंतन मांडते-

‘‘उद्या कदाचित आपण
चंद्रावर वसाहत करू
मंगळावर वर्चस्व गाजवू
आज सुखानं कसं जगता येईल
एखादा इलाज सांग ना!’’

पण माणसांचा परस्परांप्रतीचा द्वेष, मत्सर तनामनाला यातना देणारा आहेच हे नाकारून चालत नाही. अशा अस्वस्थ करणाऱ्या वेदनेवर ‘एखादा इलाज सांग ना!’ ही भावना कवी व्यक्त करतो.

अनेकविध संदर्भ नेमकेपणाने, अर्थवाही शब्दातून मांडणं आणि वाचकांना अंतर्मुख करणं ही कवीची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. म्हणून काही नोंदी घेणं अपरिहार्य ठरते.

‘‘आता सर्वत्र जाहिरात -
त्याच्या आतड्या पुन्हा जिवंत केल्याची
पण
कुठेच कशी नोंद नाही
तो उपाशी मेल्याची?’’

मनुष्य जन्माला आला तेव्हा जाती-धर्माचं लेबल त्याच्या कपाळावर लागल्या गेलं. रंगावरून वर्गवारी करण्यात आली. पुढे नर-मादीचा (स्त्री-पुरुष) भेद अशा नोंदी होत गेल्या. मात्र या प्रवासात माणूस असल्याची नोंद झाली नाही.

‘‘मी माणूस असल्याची नोंद
कुणीच कशी केली नाही.’’

हा भीषण प्रश्न या व्यवस्थेलाच हादरा देतोच.

‘‘फुटपाथवर होती माणसं रोजसारखीच
अस्ताव्यस्त आयुष्य अंथरून झोपलेली’’

कधीकधी स्वतःच शोषितांच्या जीवनामध्ये ठाण मांडून बसलेल्या अंधारात लुकलुकत्या दिव्याची ज्योत होऊन उजळावं आणि सबंध समष्टीच प्रकाशमान करावी असं वाटतं. मात्र अवतीभवतीचे आपल्यातलेच रंगीबेरंगी मुखवटे अस्वस्थ करतात. तेव्हा बोलण्यासारखं काहीच उरत नाही-

‘‘मी माझ्या मुलाचा हात घट्ट पकडून
काही न बोलता चालता झालो’’

भाषाशैलीची सुयोग्य सांगड घालत चपखल प्रतीके आणि प्रतिमांचा अस्सलपणे वापर केलेला दिसतो. उदा. रंगीबेरंगी मुखवटे, अंधाराचा पहाड, बेरहम मोसम, मृत्यूवरचे प्रेम, खालमान्या शेळ्या, खुज्या बाभळी, मायाळू माती, आक्रंदणाऱ्या जखमा... अशा असंख्य प्रतीकांतून आशय व्यक्त केलेला आहे.

मेघराज मेश्राम यांची कविता नुसतेच शब्दांचे फुलोरे फुलवत नाही, तर प्रामाणिकपणे वास्तव जीवनाविषयी सखोल भाष्य करते. जगलेले, भोगलेले अनुभव निरंतरपणे मांडत जाते. कुणाचं अनुकरण वा बनावटगिरी आढळत नाही. शुभ्र खळाळणाऱ्या झऱ्यासारख्या कवितेतून फक्त अर्थगंधच वाहत राहतो. हेच या कवितासंग्रहाचं खरं यश म्हणता येईल.

माणूस असण्याच्या नोंदी - मेघराज मेश्राम
प्रकाशक - लोकवाङ्मय गृह
पृष्ठे - ७२
मूल्य – १५० रु.

सतीश कोंडू खरात, वशिम
संपर्क : ९४०४३ ७५८६९