मारिओ
फिलोमेना गाढ झोपलेली असतानाच मी भल्या पहाटे उठलो. माझी उपकरणांची पिशवी घेतली. आवाज न करता मी घराच्या बाहेर पडलो आणि ग्रामचीहून मॉंटे पॅरिओलीला गेलो. तिथे एका घरात गळक्या बॉयलरची दुरुस्ती करायची होती. दुरुस्तीला किती वेळ लागेल नक्की माहीत नव्हते. कदाचित दोनेक तास सहज लागतीलच. कारण पहिला पाईप काढून तो पुन्हा बसवावा लागणार होता. काम उरकल्यावर मी बस व ट्राम पकडून व्हिआ डे कॉरोनेरीला पोचलो. तिथेच माझं आणि दुकान होतं. मला तो शिशाचा पाईप दुरुस्त करायला तीन तास घालवावे लागले. दुसरा कोणी असता तर त्याने...
कॉरोनेरीला पोचल्यावर मी भरभर चालत असता कोणीतरी मला मागून हाक मारली. मी वळून पाहिलं तर ती फेडे होती. माझ्या घरासमोरच्या जुन्या खाणावळीची ती देखभाल करीत असे. ती वृद्ध होती. गुडघी रोगामुळे तिचे पाय नेहमी सुजत असत. त्यामुळे ते हत्तीच्या पायांसारखे दिसत. ती मला म्हणाली, "आज किती गरम होतं आहे! तू याच रस्त्याने पुढे चाललायस काॽ माझी बाजारसामानाची पिशवी माझ्या घरापर्यंत घेऊन चलशील काॽ"
मी आढेवेढे न घेता लगेच तयार झालो. मी माझी उपकरणांची पिशवी दुसऱ्या खांद्यावर अडकवली आणि तिची पिशवी उचलून चालू लागलो. ती माझ्या बाजूने आपले हत्तीसारखे पाय ओढीत पायघोळ कोट सावरत चालत होती. थोड्या वेळाने तिने विचारलं, "फिलोमेना कुठं आहेॽ"
"घरी. ह्या वेळी कुठं असणारॽ"
आपलं डोकं खाली झुकवून (माझ्या नजरेला नजर न देता) ती म्हणाली, "होय.घरीच असणार. अर्थातच."
मी म्हटलं, "अर्थातच म्हणजे कायॽ" काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणालो.
"अर्थातच...अरे बिचाऱ्या", ती म्हणाली.
आता मला संशय येऊ लागला. क्षणभरानंतर मी ठासून म्हटलं, "मला बिचारा का म्हणालीसॽ"
"कारण मला तुझी दया येते." माझ्याकडे न बघता ती कुरूप स्त्री उद्गारली.
"तुला काय म्हणायचं आहेॽ"
"पूर्वीसारखे दिवस हल्ली राहिले नाहीत. माझ्या काळात जशा स्त्रिया होत्या तशा आता राहिल्या नाहीत. त्या बदलल्या आहेत."
"काॽ"
"आमच्या वेळी पुरूष पत्नीला घरी सोडून निर्धास्तपणे कामाला जात असे.. ताना ती जशी असे तशीच त्याला ती आल्यावर दिसत असे. पण हल्ली मात्र..."
"हल्ली काय..ॽ"
"हल्ली तसं घडत नाही...ठीक आहे..मला माझी पिशवी दे...खूप खूप आभार."
माझ्या एका सुंदर सकाळच्या आनंदात विष कालवलं गेलं. तिची पिशवी घट्ट धरून ठेवून मी म्हणालो, "ह्या बोलण्याचा खुलासा केल्याशिवाय मी पिशवी देणार नाही. या सगळ्याचा फिलोमेनाशी काय संबंधॽ"
"मला त्याबद्दल काही माहीत नाही; पण तुला आधीच सावध केलेलं बरं."
"फिलोमेनानं काय केलंयॽ मला सांग." मी जोरात म्हटलं.
"अडालजिसाला विचार"असं म्हणून तिने माझ्या हातातून चपळाईने पिशवी हिसकावून घेतली आणि आपला ढगळ कोट सावरत ती जवळजवळ धावत सुटली. ती इतकं झपझप चालू शकेल असं मला वाटलं नव्हतं.
इतकं ऐकल्यावर दुकानात जायचा विचार रद्द करून मी अडालजिसाला भेटायचं ठरवलं. सुदैवाने ती व्हिआ डे कॉरोनरीममध्येच राहत होती. फिलोमेनाशी भेट होण्यापूर्वी मी आणि अडालजिसाने लग्न करायचं ठरवलं होतं. ती अविवाहितच राहिली होती. तिनेच अशा प्रकारची वावडी उठवली असेल असा संशय मला आला. मी चार मजले चढून तिच्या दारावर माझ्या मुठीने जोरात आवाज केला. ती लगबगीने दार उघडायला आल्यावर दार तिच्या तोंडावरच आपटलं. तिच्या हातात झाडू होता. तिने आपल्या अंगरख्याच्या बाह्या दुमडून मागे सरकवल्या होत्या. ती अतिशय कडवटपणे म्हणाली, "जिनो, तुला काय हवं आहेॽ"
अडालजिसा लहान चणीची आणि आकर्षक होती. तिचे डोळे किंचित मोठे होते आणि गालही गुबगुबीत होते. तिच्या गालावरून तिला इस्पिकची राणी म्हणत असत. अर्थात तिच्या तोंडावर नाही. मी खूप अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे मी म्हटलं, "अगं इस्पिकची राणी, मी घरात नसताना ज्या गोष्टी करू नयेत त्या गोष्टी फिलोमेना करते असं तू का सांगत सुटली आहेसॽ"
आपले जळजळीत डोळे माझ्यावर रोखून ती म्हणाली, "तुला फिलोमेना हवी होती. ती तुला मिळाली आहे."
मी रागाने तिचा हात धरला; पण तिची नजर पाहून सोडून दिला आणि म्हणालो, "तू हे पसरवलंसॽ"
"नाही. मी जे ऐकलं त्याचा फक्त पुनरुच्चार केला."
"तू कोणाकडून ऐकलंसॽ"
"जिआनिनाकडून."
मी एक अक्षरही न बोलता तडक तिच्या घरातून बाहेर पडलो. मला अडवून ती म्हणाली, "मला इस्पिकची राणी म्हणत जाऊ नकोस. जिना उतरत असताना कठड्यावरून वाकून ती ओरडली, "दोन शिंगं असण्यापेक्षा इस्पिकच्या राणीसारखं गाल असणं बरं."
आता मलाही अस्वस्थ वाटू लागलं होतं. फिलोमेना माझ्याशी प्रतारणा करेल असं मला वाटत नव्हतं. तीन वर्षांच्या वैवाहिक जीवनात तिने माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता; पण असूया ही वेगळीच चीज असते. प्रेमाच्या सर्व खुणा फेडे आणि अडालजिसाच्या उद्गारातून फसवणुकीचा पुरावा असल्याचं मला वाटू लागलं होतं. त्याच रस्त्यावर जवळच्याच बारमध्ये जिआनिना कॅशियर होती. ती रंगाने फिकट पिवळसर होती. तिचे केस सरळ आणि चमकदार होते. डोळे निळे होते. ती शांत आणि विचारी होती.
मी तिच्या टेबलाजवळ जाऊन हळूच म्हणालो, "मला सांग, मी घरात नसताना फिलोमेना परपुरुषांना घरी बोलवते अशी वावडी तू उठवलीसॽ"
ती एका ग्राहकाशी बोलत होती. तिने कळ दाबून कूपन काढलं आणि नेहमीच्या आवाजात ‘दोन कॉफी’ अशी ऑर्डर दिली...नंतर शांतपणे मला म्हणाली, "जिनो, काय म्हणत होतास?"
मी माझ्या प्रश्नाचा पुनरुच्चार केला. तिने गिऱ्हाइकाला मोड दिली आणि म्हणाली, "फिलोमेना माझी जवळची मैत्रीण आहे. तिच्याबद्दल मी अशी कल्पित कहाणी रचून सांगेन असं तुला खरंच वाटतंॽ"
"मग अडालजिसाला ते स्वप्न पडलं असावं."
तिने माझ्या बोलण्यातली चूक सुधारली आणि म्हणाली, "नाही...तिला स्वप्न पडलं नव्हतं. मीही ती गोष्ट रचलेली नाही. मी तिचा पुनरुच्चार केला."
किती चांगली मैत्रीण! असं म्हटल्यावाचून मला रहावलं नाही.
"पण मीही त्यावर विश्वास ठेवला नाही...अडालजिसाने तुला हे सांगितलं नाही काॽ"
"ठीक आहे. तुला कोणी सांगितलंॽ" मी विचारलं.
"व्हिन्सेन्झिनाने. ती लॉंड्रीतून घरी जाता जाता खास मला सांगण्यासाठी मुद्दाम इथे आली होती."
तिचा निरोप न घेताच मी तसाच लॉंड्रीच्या दिशेने निघालो. रस्त्यावरूनच मला व्हिल्सेन्झिना टेबलाशी उभी राहून इस्त्री करताना दिसत होती. व्हिन्सेन्झिनाही लहान चणीची आणि मांजरासारख्या पसरट तोंडाची मुलगी होती. तिचा रंग काळा पण तेजस्वी होता. माझ्याबद्दल तिच्या मनाचा एक कोपरा हळवा होता. मी तिला खूण केल्याबरोबर तिने आपलं काम थांबवलं आणि ती बाहेर आली. म्हणाली, "तुला पाहून खूप बरं वाटलं."
मी म्हणालो, "किती उद्धट आहेस तू! माझ्या पश्चात फिलोमेना परपुरुषांची करमणूक करते असं चारचौघांना सांगत तू फिरत असतेस ते खरं आहे काॽ"
एप्रनच्या खिशात हात घालून शरीर दोन्ही बाजूंनी वेळावत ती निराशेच्या सुरात म्हणाली,"‘ती असं करत असेल तर ते तुला चालेल काॽ"
मी म्हणालो, "मला उत्तर दे. ही घाणेरडी अफवा तू उठवलीस काॽ"
खांदे उडवत ती म्हणाली, "तू किती मत्सरी आहेस. आपल्या मित्राशी गप्पा मारण्याची संधीही स्त्रियांना देता कामा नये असं तुला वाटतं तर."
"म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी तू होतीस तर!"
"खरंच मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं." असं म्हणून ती चेष्टेखोर मुलगी एकदम म्हणाली, "मी तुझ्या बायकोचा विचार करावा असं तुला का वाटतंॽ मी कोणतीही गोष्ट रचलेली नाही...अॅग्नेसनं मला सांगितलं. तिला तर त्या माणसाचं नावही माहीत आहे."
"कोण आहे तोॽ"
"ते तू तिलाच विचारलेलं बरं."
आतापर्यंत फिलोमेना माझ्याशी प्रतारणा करत असल्याबद्दल माझी खात्री पटली होती. आता तर इतरांना त्याचं नावही माहीत झाल्याचं मला समजलं होतं. माझ्या डोक्यात सहज एक विचार चमकून गेला. माझ्या पोतडीत एखादं जड उपकरण नव्हतं. नाहीतर डोक्यात राख घालून कदाचित मी तिचा जीवही घेतला असता. फिलोमेना, माझी बायको दुसऱ्याशी रत होते!
अॅग्नेस आपल्या वडिलांच्या तंबाखूच्या दुकानात सिगरेट विकण्याचं काम करत असे. त्या दुकानाकडे मी मोर्चा वळवला. "दोन नाझिओनेली" असं म्हणून मी पैसे तिच्या काऊंटरवर फेकले. अॅग्नेस सतरा वर्षांची होती. तिच्या डोक्यावर कोरड्या केसांचं जंगल होतं आणि त्यातील काही केस डोक्यावर ताठ उभे रहात असत. तिचा चेहरा गुबगुबीत आणि फिका होता. त्यावर तिने गुलाबी पावडर फासली होती. तिचे डोळे टपोऱ्या काळ्या बेरीसारखे काळे कुळकुळीत आणि चमकदार होते. व्हिआ डे कॉरोनेरीतील प्रत्येकाप्रमाणे मीही तिला ओळखत होतो. पैशाच्या लोभाने आपलं स्वत्त्व विकणारी ती होती हेही इतरांप्रमाणे मला माहीत होतं. तिने मला सिगरेट्स दिल्यावर मी वाकून तिला म्हटलं, "त्याचं नाव काय मला सांग."
"कोणाचं नावॽ" तिने आश्चर्यानं विचारलं.
"माझ्या बायकोच्या याराचं नाव." मी.
तिने भयभीत होऊन माझ्याकडे पाहिलं. माझ्या चेहऱ्यावर विचित्र भाव व्यक्त होत असावा. ती घाईघाईने म्हणाली, "मला यातलं काहीच माहीत नाही."
मी हसण्याचा प्रयत्न केला आणि तिला म्हटलं, "चल, पटकन सांग. मी सोडून सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे."
तिने माझ्याकडे टक लावून पाहिलं आणि मान नकारार्थी हलवली. त्यावर मी "जर तू मला नाव सांगितलंस तर... " असं म्हणून लगेच पाकिटातून सकाळच्या दुरुस्ती कामाबद्दल मिळालेली १००० लिराची नोट बाहेर काढली. नोट पाहताच जणू मी तिच्याशी प्रेमाची गोष्ट बोलत असल्यासारखी ती उत्तेजित झाली. तिचे ओठ जरासे विलग झाले. सभोवार नजर टाकून तिने नोटेवर हात ठेवला आणि हलक्या आवाजात ती म्हणाली, "मारिओ."
'तुला हे कसं कळलं?' असं विचारताच ती म्हणाली, "तू ज्या घरात राहतोस त्या घराच्या सुरक्षा रक्षकाकडून."
म्हणजे हे सगळं खरं होतं तर! 'कोण म्हणतं टक्का दिला?' या खेळासारखं चाललं होतं. हे सगळं प्रकरण आता माझ्या इमारतीपर्यंत पोचलं होतं. मी तंबाखूच्या दुकानातून निघून घाईघाईने घराच्या दिशेने चालू लागलो. माझं घर तिथून अगदी काही पावलांवरच होतं. माझ्या मनात सारखा ‘मारिओ’ जप चालला होता. तसं करताना माझ्या माहितीतले अनेक मारिओ माझ्या डोळ्यांपुढून तरळून गेले. दूधवाला मारिओ, सुतार मारिओ, भाजीवाला मारिओ, सैनिक असलेला पण सध्या बेकार असलेला मारिओ, डुकराचे मांस विकणाऱ्याचा मुलगा मारिओ. मारिओ, मारिओ, मारिओ... रोममध्ये मारिओ नावाच्या लाखो व्यक्ती असतील आणि त्यापैकी शंभर एक व्हिआ डे कॉरोनेरीत असतील. मी इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरून सुरक्षा रक्षकाच्या घराकडे मोर्चा वळवला. फेडेसारखीच वृद्ध स्त्री पाय फाकवून बसली होती. पाय शेकण्यासाठीचा विस्तव आणि तिचे पाय यामध्ये ती साफ करत असलेल्या चिकोरीचा ढीग होता. मी दरवाजा ढकलून आत डोकावून तिला विचारलं, "मी घरात नसताना फिलोमेना मारिओ नावाच्या माणसाबरोबर रत असते अशी कहाणी तूच रचलीस नाॽ"
ती त्रासली आणि म्हणाली, "नाही, कोणीही अशी कहाणी रचलेली नाही. तुझ्या बायकोनेच ती मला सांगितली."
"फिलोमेनानंॽ" मी"‘होय. तिने मला सांगितलं की असा एक तरुण तिला भेटायला येतो. त्याचं नाव मारिओ आहे. जर जिनो घरी असेल तर त्याला वर येऊ देऊ नकोस. जिनो नसेल तर त्याला येऊ दे. आत्ता तो वर आहे."
"कायॽ तो आत्ता माझ्या घरी आहेॽ""नक्कीच. तासाभरापूर्वी तो वर गेला आहे."
मारिओ फक्त अस्तित्वातच नव्हता तर प्रत्यक्ष माझ्या घरात तासभर फिलोमेनाजवळ होता. मी जिन्यावरून वेगाने तिसऱ्या मजल्यावर गेलो आणि दरवाजावर टकटक केलं. फिलोमेना दार उघडायला आली. नेहमी शांत असणाऱ्या फिलोमेनाचा चेहरा घाबरलेला होता. मी म्हटलं, "छान! मी घरात नसताना मारिओ तुला भेटायला येतो."
"त्यामुळं असं काय आभाळ कोसळलंय?" ती म्हणाली.
"मला सगळं कळलं आहे." मी आवाज चढवून म्हणालो आणि आत स्वयंपाकघरात जाऊ लागलो. तिने मला अडवलं आणि म्हणाली, "अशी डोक्यात राख घालून घेऊ नकोस. इतका का राग आलाय तुलाॽ जा. थोड्या वेळाने ये."
मी स्वतःला आवरू शकलो नाही. मी तिच्या गालावर चपराक ठेवून दिली आणि जोराने ओरडलो, "असं आहे तरॽ माझ्या जिवाला का डागण्या देतेसॽ" तिला ढकलून मी स्वयंपाकघराकडे धाव घेतली. तिथे खरोखरचा मारिओ टेबलाजवळ कॉफी पीत बसला होता. पण तो सुतार, भाजीवाला, मांसविक्रेत्याचा मुलगा या मला माहीत असलेल्या मारिओंपैकी नव्हता. तो घरफोडी करून तुरुंगात दोन वर्षांची शिक्षा भोगून आलेला फिलोमेनाचा भाऊ होता. त्याचा तुरुंगातून सुटण्याचा दिवस लक्षात घेऊन मी तिला बजावलं होतं, "इतःपर तो माझ्या घरात आलेला मला चालणार नाही. ह्या घरात त्याच्या नावाचा उल्लेख केलेलाही मला चालणार नाही. बिचाऱ्या फिनोमेनाला भावाची खूप ओढ असल्याने तो चोर असूनही माझ्या अनुपस्थितीत तिने त्याला भेटायचं ठरवलं.
मी रागात असूनही त्याला म्हणालो, "काय मारिओॽ"
"मी चाललो आहे. उगीच चिंता करू नकोस. मी दूर निघून जातोय."
फिलोमेना पॅसेजमध्ये रडत उभी होती. मी जे केलं त्याची मला लाज वाटू लागली. "नाही, नाही. रहा." मी गोंधळून म्हटलं. "आजचा दिवस रहा. रात्रीच्या जेवणासाठी थांब. फिलोमेना, काही हरकत नाही नाॽ’ अशी माझ्या बोलण्याला मी पुस्ती जोडली आणि डोळे पुसत स्फुंदत येणाऱ्या फिलोमेनाकडे पाहिलं. मी माझ्याकडून परिस्थिती ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मी झोपण्याच्या खोलीत जाऊन फिलोमेनाला हाक मारली आणि तिचं चुंबन घेतलं. आमच्यातला दुरावा संपवला. मात्र ह्या सगळ्या गावगप्पा कोणी उठवल्या हा प्रश्न शिल्लक उरलाच होता.
मी थोडंसं अडखळत म्हटलं, "मारिओ, चल माझ्याबरोबर वर्कशॉपमध्ये. वर्कशॉपचा मालक तुला काहीतरी काम देईल." तो माझ्याबरोबर बाहेर पडला. जिना उतरताना मी त्याला म्हटलं, "तुला इथे कुणीही ओळखत नाही. गेली काही वर्षं तू मिलानमध्ये होतास. समजलंॽ"
"ठीक आहे." तो म्हणाला.
जिना उतरून आम्ही खाली आलो. खाणावळीजवळ आल्यावर मी मारिओचा हात हातात घेऊन त्याचा द्वारपाल बाईशी परिचय करून दिला. "हा मारिओ. माझा मेहुणा - फिलोमेनाचा भाऊ - हल्लीच तो मिलानहून आला आहे. तो आता आमच्याकडेच राहणार आहे." "वा! फारच छान!" ती म्हणाली.
आनंद तर मलाच झाला आहे असा विचार करत मी मारिओबरोबर चालू लागलो. या बायकांच्या गावगप्पांमध्ये माझे एक हजार लिरा वाया गेले आणि त्या बदल्यात एक चोर माझ्या घरात राहू लागला.
('रोमन टेल्स' - पेंग्विन बुक्स, १९६१ मधून. इंग्रजी अनुवाद : अँगस डेव्हिडसन.)
मराठी अनुवाद : वासंती फडके
phadkevasanti4236@yahoo.co.in