मिले सुर मेरा तुम्हारा... तो सुर बने हमारा!
संगीत हे एक असे साधन आहे, ज्याने आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात आपल्याला साथ दिली आहे. हजारो वर्षांपासून ते आपल्याला आपण समाजाशी जोडले असल्याचा दिलासा देत आले आहे. अमेरिकन सायकॉलॉजिस्ट या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनामध्ये सामाजिक संबंधांबाबतचे मज्जाशास्त्रीय आकलन मांडले गेले आहे. त्यासाठी संशोधकांनी संगीत चालू असताना मेंदूमध्ये चालू असलेल्या घडामोडी दाखवणाऱ्या मेंदूच्या एका नवीन मॅपचा उपयोग केला आहे.
बार-आयलन युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो इथल्या सामाजिक मज्जाशास्त्रज्ञांच्या (सोशल न्यूरोसायंटिस्ट्स) एका चमूने मेंदूचे एक प्रारूप तयार केले आहे. मानवी संबंधांसाठी उपयोगात येणाऱ्या सांगीतिक अनुकूलनाच्या (म्युझिकल अॅडप्टेशन) मुळाशी असलेल्या सामाजिक कार्यांवर आणि मेंदूच्या यंत्रणांवर प्रकाश टाकते. हे प्रारूप विशेष आहे कारण लोक स्वतंत्रपणे, एकट्याने संगीत ऐकतात यापेक्षा ते जेव्हा एकत्रितपणे संगीताची निर्मिती करतात त्या वेळी मेंदूमध्ये काय घडते त्यावर हे प्रारूप लक्ष केंद्रित करते.
कोव्हिड १९ च्या महासाथीच्या काळात शारीरिक अंतर राखणे गरजेचे झालेले असताना जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी लोक एकत्रितपणे संगीताची निर्मिती करताना दिसले. या सर्जनशील प्रयोगांमधून या संशोधनाला प्रेरणा मिळाली. या प्रयोगांमध्ये आपापल्या बाल्कन्यांमध्ये येऊन एकत्र गाणी म्हणणे, झूमसारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मवर सामूहिक गायन करणे, तसेच यो यो मा, कोल्डप्लेचा ख्रिस मार्टिन आणि नोरा जोन्स यासारख्या संगीतकारांच्या लाईव्ह लिव्हिंग रूम कॉन्सर्ट्स अशा अनेक उपक्रमांचा समावेश होतो.
शास्त्रज्ञांच्या या चमूने सामाजिक मज्जाशास्त्रातील आणि संगीत क्षेत्रातील नवीन शोधांचा मेळ घातला. त्यामध्ये त्यांनी उत्क्रांतीच्या सिद्धांताचाही समावेश केला आहे. त्यांनी या नवीन शोधांच्या एकत्रित अभ्यासातून मेंदूची अशी पाच महत्त्वाची कार्ये अधोरेखित केली, जी संगीतामार्फत तयार होणाऱ्या सामाजिक संबंधांमध्ये योगदान देतात.
ही कार्ये अशी - १) समानुभूती मंडले (एम्पथी सर्किट्स) २) ऑक्सिटोसिन स्त्रवणे, ३) पारितोषक (रीवॉर्ड) आणि प्रेरणा (मोटिव्हेशन), ज्यामध्ये डोपामाइन स्त्रवण्याचाही समावेश होतो, ४) भाषा संरचना (लँग्वेज स्ट्रक्चर्स) आणि ५) कोर्टिसोल. ही पाच कार्ये आणि यंत्रणांमध्ये मेंदूचे किमान १२ महत्त्वाचे भाग आणि २ मार्ग गुंतलेले असतात. त्यांचा नकाशा इथे दिला आहे.
समानुभूती, सहसंवेदनेमुळे आपल्याला इतर लोक काय विचार करत आहेत आणि त्यांना काय वाटते आहे हे समजून घेण्यात मदत होते आणि आंतरवैयक्तिक सांगीतिक समन्वयामार्फत (इंटरपर्सनल म्युझिकल कोऑर्डिनेशन) त्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते. ऑक्सिटोसिनला कधीकधी 'प्रेम संप्रेरक' म्हणतात, कारण सामाजिकरित्या इतरांशी जोडून घेण्याच्या आपल्या जाणिवेमध्ये त्याचे योगदान असते. लोक जेव्हा एकत्र गातात तेव्हा ते स्त्रवते, हे गायन अगदी उत्स्फूर्तपणे चालू झालेले असले तरीही. डोपामाईन हे एक न्यूरोट्रान्समीटर आहे जे आनंदाची भावना निर्माण करते. जेव्हा आता संगीत चालू होईल असा आपला अंदाज आणि अपेक्षा असते त्या वेळी ते मुक्त केले जाते आणि आपल्या पारितोषक आणि प्रेरणेच्या संवेदनेकरता ते महत्त्वाचे असते. मेंदूतील भाषाविषयक संरचना सांगीतिक संवादामध्ये सामील असतात. (या संवादाला कधीकधी साद आणि प्रतिसाद असे म्हटले जाते.)
कोर्टिसोल हे एक संप्रेरक आहे जे तणावाला कारणीभूत असते. पण जेव्हा लोक एकत्र गातात आणि समूहांमध्ये एकत्र येऊन संगीत ऐकतात तेव्हा मेंदूतील त्याचे प्रमाण कमी होते.
हे संशोधन म्हणजे 'संगीताचे सामाजिक मज्जाशास्त्र' (सोशल न्यूरोसायन्स ऑफ म्युझिक) या एका नव्या क्षेत्राची पायाभरणी आहे. हे नवीन क्षेत्र आधीच्या संगीताच्या संज्ञानात्मक मज्जाशास्त्राच्या (कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स ऑफ म्युझिक) आधारावर उभे आहे, जे मुख्यतः संगीत ऐकण्यावर भर देते.
लेखकांचे असे म्हणणे आहे, की संगीताचे सामाजिक मज्जाशास्त्र जितके चांगले समजेल तितकी जगभरातल्या सामाजिक बंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत होईल. विशेषतः एकमेकांशी संघर्ष असलेल्या संस्कृतींमध्ये. संगीत हे एक सशक्त साधन आहे. ते व्यक्तींना एकत्र आणू शकते, सहसंवेदना आणि संवाद वाढवू शकते, आणि सामाजिक दरी कमी करू शकते असा त्यांचा निष्कर्ष आहे. संगीतामुळे मेंदू-मेंदूमधील सामाजिक बंध कसे तयार होतात याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान आणखी वाढले तर संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर मानवी अस्तित्वाच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे आणि त्याचे महत्त्वाचे सामाजिक परिणाम आहेत ही गोष्ट अधोरेखित होईल असे ते म्हणतात.
संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. डेव्हिड ग्रीनबर्ग हे सामाजिक मज्जाशास्त्रज्ञ, व्यावसायिक संगीतकार आणि इस्रायलमधील बार-आयलन युनिव्हर्सिटीमध्ये झकरमन पोस्टडॉक्टरल स्कॉलर आहेत. ते म्हणतात, “संगीत आपल्याला आपल्या मानवतेशी जोडते. सामाजिक मज्जाशास्त्रामार्फत आपल्याला असे आढळते की आपली समाजाशी जोडलेले असल्याची जाणीव केवळ आत्मनिष्ठ (सब्जेक्टिव्ह) नसून तिची मुळे मेंदूतील महत्त्वाच्या यंत्रणांमध्ये आहेत. विशेषतः आत्ता जगभरात सर्वत्र इतके सामाजिक भेदभाव असताना, संघर्षरत संस्कृतींना एकमेकांमधले मतभेद मिटवता यावेत यासाठीचे नवीन मार्ग आपण शोधले पाहिजेत. संगीत हा असा एक मार्ग आहे. आम्हांला आशा आहे, की आमच्या संगीतामुळे वेस्ट-इस्टर्न दीवान ऑर्केस्ट्रा आणि येरुसलेम यूथ कोरससारख्या आणखी तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या कार्यक्रमांची निर्मिती होईल, जे संगीताच्या माध्यमातून एकमेकांशी संघर्ष असलेल्या संस्कृतींमधील लोकांना एकत्र आणतील.
बार-आयलनमधील गोंडा (गोल्डश्मीड) मल्टिडिसिप्लिनरी ब्रेन रीसर्च सेंटरमधील सामाजिक मज्जाशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक आणि मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. इलानिट गॉर्डन म्हणतात, “मानवी सामाजिकतेची मुळे ही आपल्या जैविक बांधणीमध्ये आहेत. संगीताच्या माध्यमातून आपण एकमेकांशी जोडले जातो, एकमेकांना प्रभावित करू शकतो. संगीताच्या मज्जाजीवशास्त्रीय (न्यूरोबायॉलॉजिकल संशोधनामधून आपल्याला सामाजिक मज्जाशास्त्रातील प्रमुख मुद्द्यांबद्दलचे आपले ज्ञान आणखी विकसित करता येईल.
मानसशास्त्र आणि मनोरोग चिकित्सा या विषयातील प्राध्यापक आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील चाइल्ड न्यूरोसूटच्या संचालक जीन डेसेटी म्हणतात, “संगीत हा आपल्या उत्क्रांतीमधला मूलभूत भाग आहे. संगीतामुळे सामाजिक बंधांची अनोखी अभिव्यक्ती शक्य होते. सामायिक मूल्यांचा संकेत देऊन लोकांमधील एकजूट आणि परस्परविश्वास अधिक मजबूत करू शकण्याचं काम संगीत करू शकते. संगीताच्या न्यूरोबायोलॉजिकल प्रक्रिया समजून घेणे फारच रोमांचकारी आहे.”
(EurekAlert या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या मूळ इंग्लिश लेखाचा अनुवाद
अनुवादक : अनघा लेले
anagha.savita@gmail.com