मिळून साऱ्याजणीतलं कथाविश्व
'मिळून साऱ्याजणी'च्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मासिकाच्या संस्थापक-संपादक स्मृतिशेष विद्या बाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या हेतूने या मासिकानं सामाजिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा अभ्यास करणारा 'विद्या बाळ अध्यासन प्रकल्प' सुरु केला गेला. “साऱ्याजणीच्या अक्षरवाटा” यी शिर्षकाने हा अभ्यास प्रकल्प पुर्ण झाला आहे. आपल्या वेगळ्या जाणीवे मधून मिळून साऱ्याजणी ह्या मासिकाची सुरुवात झाली व अजुनही मिळून साऱ्याजणी अखंड कार्यरत आहे. स्वातंत्र्य, समता, माणुसकी आणि सामाजिक न्याय हे विचार कथेच्या मदतीने मिळून साऱ्याजणींच्या कथेतुन मनाला भिडतो. स्त्री प्रश्नांना सर्वसामान्यांपर्यंत वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमधुन आणि वेगवेगळ्या लेखांच्या मदतीने आणण्याचा यशस्वी प्रयत्न साऱ्याजणीने केला. आणि ह्याच प्रयत्नात कथा ह्या वेगवेगळे पदर असणाऱ्या साहित्य प्रकाराच्या मदतीने केवळ स्त्री प्रश्नालाच नाही, तर इतर प्रश्नांना पण साहित्याच्या माध्यमातुन आवाज दिला, आणि ह्या प्रश्नांच्या वेगवेगळ्या बाजू वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
एखादा विषय सोप्प्या पध्दतीने पण त्या विषयाचे गांभिर्य आणि ते विषय हातळण्याची गरज कथा ह्या साहित्य प्रकारच्या मदतीने मासिकाने वाचकांसमोर आणली आहे. मध्यमवर्गीय स्त्री ते ग्रामीण भागातील स्त्री ह्या सर्वांच्या अनुभवांवर आणि प्रश्नांवर भाष्य केले. कोणत्याही ठराविक धाटणीचा आणि विषयाच्या निवडीचे बंधन ह्या मासिकातल्या कथांना नाही. केवळ मोठ्या लेखकांच्याच नाही तर नवोदित लेखकांना पण लिहिण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आपुलकीचे प्रयत्न मिळून साऱ्याजणी करत आले आहे आणि करते आहे. जवळपास ३३ वर्ष अखंड चालत आलेल्या ह्या मासिकात वेगवेगळ्या धाटणीच्या, विषयाच्या, इतर भाषेतील अनुवादित केलेल्या अश्या कथा आपल्याला पहायला मिळतात. आणि यातीलच गेल्या १०-११ वर्षातील कथांचा मागोवा स्वतः मोठ्या लेखिका असणाऱ्या नीलिमा बोरवणकर ह्यांनी त्यांच्या “मिळून साऱ्याजणीतील कथा विश्व” ह्या लेखात घेतला आहे.
तर असा कथेचं वेगळं विश्व आणि वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने काम करणाऱ्या मिळून साऱ्याजणीचे कथेशी असणाऱ्या अतुट बंधनावर भाष्य करणारा हा लेख जरुर वाचा.
**
मिळून साऱ्याजणी मध्ये प्रसिद्ध झालेल्या सुरुवातीच्या दहा अकरा वर्षातल्या कथा वाचताना अनेक गोष्टी लक्षात येत गेल्या. मुख्यत्वे या मासिकाच्या संपादक विद्या बाळ यांचं स्त्री चळवळीतलं स्थान, त्यांचा सर्वदूर पसरलेला जन संपर्क, त्यांनी गावोगावी जोडलेली माणसं, तरुण कार्यकर्ते, या साऱ्याचं प्रतिबिंब यातल्या लेखनावर पडलेलं दिसतं. लहान गावातल्या नवनव्या लेखकांना विद्या ताईंनी लिहितं केलं. त्यांचं प्रसंगी दुय्यम दर्जाचं लेखन आवर्जून प्रसिद्ध केलं.
त्यामुळे गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया, मिलिंद बोकील, प्रिया तेंडुलकर, दीपा गोवारीकर, सुबोध जावडेकर, पंकज कुरूलकर, प्रमोदिनी वडके-कवळे, रेखा बैजल, अशा नामवंत लेखकांबरोबर अमरावती जिल्ह्यातल्या फुलोर, नंदुरबार, सांगली, सातारा, पंकजनगर-बार्शी, ओगलेवाडी, लातूर सारख्या गावातल्या अनोळखी लेखकांना अंकात मानाचं स्थान मिळालेलं दिसतं. एकूणच पुणे, मुंबई सोडून इतर गावात काय लेखक नसतात का? इतरांना संधी मिळत नसल्या चा आक्षेप या मासिका बाबत कुणी घेऊ शकत नाही. नागपूरच्या छाया नाईक, अमरावती च्या प्रतिमा इंगोले, मालवण च्या वैशाली पंडित, सावंतवाडी च्या उषा भागवत, जालन्याच्या रेखा बैजल, कॅनडा च्या विदयूलेखा अकलूजकर, अमेरिकेच्या अजिता काळे, कऱ्हाडचे प्रकाश नारायण संत, इंदूर च्या रोहिणी कुलकर्णी, अशा सर्वदूर पसरलेल्या लेखकांनी इथलं कथेचं दालन समृद्ध केलंय.
वेगवेगळ्या धाटणीच्या आणि विषयांच्या कथा
विषय, लेखक लेखिका, मांडणी अशा निरनिराळ्या बाजूंचा विचार करता काही ठळक जाणवलेल्या गोष्टी सांगते. वेगवेगळ्या गावातल्या लेखकांना स्थान असल्यामुळे त्या भागातल्या विषयांचा स्वाभाविकपणे अंतर्भाव झालेला दिसतो. याची अनेक उदाहरणं देता येतील. सावंतवाडी च्या उषा भागवत यांच्या “गणित” या कथेत कोकणातल्या जवळपास प्रत्येक घरातला प्रश्न मांडला आहे. घरची थोडीफार शेती कसण्यासाठी एखाद्या मुलाचं शिक्षण थांबवलं जातं. इतर भाऊ मुंबईत नोकरीला जातात, त्यांना शिकलेल्या बायका मिळतात, त्यांची राहणी आधुनिक होते. गावातल्या कमी शिकलेल्या शेती करणाऱ्या मुलाला साहजिकच कमी शिकलेली, खेड्यात राहायला तयार असलेली साधी बायको मिळते. भावंडं सुट्टीला येतात, सासू सासऱ्यांची जबाबदारी पार पाडता पाडता शिल्लक पडत नाही. वर्ष अशीच सरतात आणि सासऱ्यांच्या मृत्यू नंतर भाऊ वाटणी मागतात.
मालवण च्या वैशाली पंडित यांच्या “त्या दोघी“ या कथेत भंगार सामान घेणाऱ्या सासू-सुना, त्यांच्यातलं आपुलकी चं नातं असोशीनं बघणारी नायिका दाखवताना ते वातावरण उत्तम उभं राहातं. छोटया आशयाची असली तरी कष्टकरी समाज आणि पांढरपेशा समाजातला आर्थिक आणि स्त्री कडे बघण्याच्या दृष्टीकोनातला फरक उलगडून दाखवलाय.
बार्शीच्या मेघराज पाटील यांच्या “तिच्या उरावरले अंगार” या कथेत खेडेगावातल्या पाटील पणाचा अभिमान असलेले एक शिक्षक बायको मुलांना घेऊन गावाकडे जायला एस. टी. नं निघतात. वाटेतल्या एका गावी बस बदलावी लागते, म्हणून सगळे उतरतात. हे पाटील “जरा जाऊन येतो” म्हणून गायब होतात, इकडे मुलांना भूक लागते तरी मुलं रडत नाहीत कारण पाटलाच्या मुलानं रडायचं नसतं. दर्जेदार कथेच्या निकषात बसत नसली तरी अशी ग्रामीण मानसिकता अशा कथांमुळे आपल्याला कळते.
तळेगाव च्या वसुधा माने यांच्या “टेंगळे आणि नवस” या कथेत वयात येणाऱ्या मुलींच्या मनातल्या शंका, त्यांच्यातली मैत्रीची कोवळीक, निष्पापपणा, निरागसता खास खेड्यातल्या भाषेत मांडली आहे.
वडूज चे शशिकांत तासगांवकर ग्रामीण भागातल्या रूढीप्रिय समाजाचं विषण्ण करणारं चित्रण “भूक” कथेत करतात. उपासमारीनं व्याकूळ झालेला एक लहान मुलगा गावची म्हातारी मेली तर तिच्या तेराव्याला पोटभर जेवण मिळेल या कल्पनेत रमतो, इतका की ती आपोआप मरत नसेल तर तिला कशा पद्धतीनं मारता येईल याचा विचार करत बसतो. एकीकडे घासभर अन्नाला मोताद असणारी ग्रामीण जनता कुणी मेल्यावर गांव जेवण घालण्याच्या तयारीत असते. कथेच्या घाट, वातावरण, व्यक्तिचित्रण असा सर्वांगीण विचार करता ही दुय्यम दर्जाची वाटली तरी ग्रामीण जगण्याचं, दु:खाचं दर्शन शहरी वाचकांना करून देते, म्हणून महत्त्वाची.
वैदर्भीय लेखिका प्रतिमा इंगोले यांच्या अनेक कथा या दहा वर्षात वाचायला मिळाल्या. विदर्भातल्या ग्रामीण स्त्री चे वेगवेगळे भोग त्या मांडतात. “दुपवा” नावाच्या कथेत मांडलेलं दु:ख तसं फक्त विदर्भातलं नाही. मिरवणुकीत नाच्याच्या रूपात नाचणाऱ्या नवऱ्या बद्दलचा तिरस्कार लेखिका दाखवते. प्रतिमा इंगोले या सुप्रसिद्ध लेखिका आहेत, पण मला त्यांच्या कथा वाचताना वैदर्भीय भाषेतले असंख्य शब्द न कळल्यामुळे वाचनाचा संपूर्ण आनंद न मिळण्याचा अनुभव येतो. जर ही कथा सर्व मराठी वाचकांसाठी असेल तर त्याला ती कळण्यापासून वंचित ठेवण्यात काय अर्थ आहे? त्या भाषेची गंमत म्हणून काही संवाद त्या भाषेतले असावेत पण किमान निवेदन तरी पुस्तकी मराठीत असावं, हे माझं स्पष्ट मत. कथेतली भाषा कळलीच नाही तर आस्वाद कसा घेणार?
परदेशस्थ लेखिकांच्या कथातून तिथली जीवनशैली, मानसिकता कळू शकते, विशेषत: इंटरनेट च्या उदयाच्या आधी हे जाणून घेण्याची संधी फक्त वाचनातून मिळत असे. विदयूलेखा अकलूजकर आणि अजिता काळे यांनी या दहा वर्षात विपूल लेखन केलेलं आढळलं. “पाठराखीण” कथेत विदयूलेखा अकलूजकर अमेरिकेतलं सामान्य आर्थिक परिस्थितीतल्या जगण्यातले बारकावे दाखवतात. भारतातून गेलेल्या अर्धशिक्षित लोकांना किती, कसे कष्ट करावे लागतात, इथल्या नातेवाईकांना मात्र परदेशी म्हणजे यांच्याकडे भरपूर पैसे असतील वाटतं आणि त्यांच्या मदतीच्या अपेक्षा पुऱ्या करताना दमछाक होते. त्याच बरोबर तिथल्या वास्तव्यानंतर विचारांची कक्षा रुंदावते. बाहेरच्या जगात वावरताना आपल्या भारतातल्या कुटुंबातले गुंते कसे सुटत जातात ते उलगडून दाखवणारी वाचनीय कथा. अमेरिकेतल्या ऐश्वर्याचं वर्णन अनेकदा वाचायला मिळतं, इथे सामान्यांचं दिसतं हे वेगळेपण.
1990 च्या दिवाळी अंकात अजिता काळे यांची “पिल्स” शीर्षकाची आशय, मांडणी सर्व बाबतीत उत्तम म्हणावी अशी कथा आहे. भारतीय संस्कार घेऊन गेलेल्या पिढीचा आणि मुलांना भारतीय मूल्य मनात ठेवून वाढवणाऱ्या वृत्तीचा संघर्ष नेमका पोचतो. शीर्षकावरून लक्षात येतंच की अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय आईला तरुण मुलीच्या कपाटात गर्भनिरोधक गोळ्या सापडल्यावर होणारी घालमेल, कालवाकालव, त्रागा, आपण योग्य संस्कार केले नाहीत याचा अपराधी गंड अशा सगळ्या भावनांचा गुंता मांडणारी सुंदर कथा. तीस वर्षांपूर्वी परदेशात दिसणारं हे चित्र आज आपल्या समाजात सर्रास दिसतं, त्यामुळे त्या काळातल्या वाचकांना या कथेनं किती अस्वस्थ केलं असेल हे समजू शकतं.
अमेरिकास्थित संध्या कर्णिक यांची “सायरा” ही कथामूल्याचा विचार करता श्रेष्ठ नसली तरी विषयासाठी याचा उल्लेख करावा वाटला. पाकिस्तानातून लग्न करून अमेरिकेत आलेल्या एका श्रीमंत, आधुनिक, पुरोगामी कुटुंबातल्या तरुणीला तिचा नवरा किती बंधनात ठेवतो त्याचं चित्रण.
1995 मध्ये निलू निरंजना गव्हाणकर यांची “आई की आजी” ही अशीच एक सत्यकथा. सत्य घटना असल्यानं अर्थातच अनुभव लिहिल्यासारखं लेखन, पण आज पूर्ण ओळखीचा आणि तेव्हा पूर्ण अनोळखी वाटणारा विषय हाताळल्यामुळे उल्लेख अनिवार्य. वयाच्या 55 व्या वर्षी आपल्या मुलगा-सुनेचं अपत्य सरोगसी पद्धतीनं पोटात वाढवणाऱ्या स्त्री ची ही गोष्ट.
जुन्या पुनर्मुद्रित काही कथा वाचायला मिळाल्या. त्यापैकी दोन कथांचा उल्लेख करावा वाटतो, कारण त्या लेखिका काळाच्या किती पुढे होत्या हे आजच्या वाचकांना कळणं फार महत्त्वाचं वाटतं. 1960 च्या दशकात लिहिलेल्या “शुभ्र गुणांची” या कथेत पारंपरिक विचारांचा एक तरुण लग्नासाठी वधू संशोधन करताना सौंदर्याच्या चौकटीत बसणारी मुलगी पत्नी म्हणून निवडतो भले दुसरी कमी सुंदर मुलगी गुणात्मक दृष्ट्या सरस असली तरी. मग त्या सुंदर मुली सोबत असताना गुणी मुलीची आठवण, दोघीत तुलना, मनातला अपराधी गंड असं मांडणारी. व्यक्ती चित्रण इतकं सरस आहे की कथा डोळ्यासमोर घडते, असं वाटतं. आजही ठरवलेल्या लग्नात सर्वाधिक महत्त्व बाह्य रूपाला दिलं जातं, त्यामुळे ही कथा आजही ताजी वाटते. 1940 मध्ये “स्त्री” मासिकात प्रसिद्ध झालेली आनंदीबाई शिर्के यांची “भावनांचा खेळ” 1992 च्या अंकात पुनर्मुद्रित केली आहे. लग्नाआधीचा मित्र नवऱ्याला भेटल्यावर होणारा मनीचा कल्लोळ दर्शवणारी. कथेत सुरुवातीलाच कूकर ची तयारी करून ठेवली, हे आले की फिरायला जायचं, असे उल्लेख आहेत. 80 वर्षांपूर्वीच्या काळाचा विचार करता कूकर, नवऱ्या सोबत फिरायला जाणं हेच वेगळं वाटतं. पदरव शब्द ऐकून, असे शब्द प्रयोग आज पुस्तकी वाटले तरी विषय आजही शिळा झालेला नाही. 50 वर्षानंतर पुनर्मुद्रित केलेली 30 वर्षानंतर वाचायला मिळणं ही मोठी संधीच वाटली.
अनुवादित कथा
या कालखंडात अनुवादित कथांचा मोठा खजिना हाती लागला. बंगाली, तेलुगू, कन्नड, उरिया, हिन्दी, उर्दू भाषेतल्या भरपूर कथांचे अनुवाद वाचण्याची संधी मिळाली. अमृता प्रीतम, इंदिरा, महादेवी वर्मा, आशापूर्णा देवी या सर्वज्ञात लेखिकांबरोबर काही अनोळखी लेखक माहीत झाले. मंदाकिनी भारद्वाज, विद्युत भागवत, रंजना गिरीधर गोपाल ही सातत्यानं अनुवाद केलेल्या काही लेखिकांची नावं.
माया प्रधान लिखित विमला जोशी अनुवादित “मनोगत” कथा काळजाला भिडली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वत:चं सुधारकपण मिरवण्यासाठी एका गणिकेच्या मुलीशी लग्न करणाऱ्या, तिला नाटकात काम करायला प्रवृत्त करून नंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सोडून दिल्यावर एकाकी पडलेल्या स्त्री ची चित्रदर्शी मांडणी. तो काळ, तेव्हाची मानसिकता नजरेसमोर उभी करणारी सुरेख कथा.
प्रीतिश नंदी (अनु: माधव चिरमुले) यांची जयश्री ही विलक्षण अनुभव देणारी कथा. गैर कृत्यात सामील असू शकणाऱ्या एका मुलाच्या चौकशीसाठी पोलिस घरात आलेत. कुटुंबातलं आजारपण, आर्थिक तंगी त्या मुलाची बहीण या पोलिसांना कशी सामोरी जाते त्याचं प्रत्ययकारी वर्णन करणारी. सिना श्लोपेह (अनु: साधना वि. य.) “माझा संडास” एक निराळा विषय मांडणारी. द. आफ्रिकेत गोऱ्यांच्या बंगल्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या काळ्या स्त्री ची बहीण कामाच्या शोधात त्या गावात येते आणि मालका पासून लपून बहिणी सोबत राहू लागते. कुणाला कळू नये म्हणून भल्या पहाटे घरा बाहेर पडून अंधार पडल्यावरच परतू लागते. मध्ये वेळ काढण्यासाठी एका सार्वजनिक संडासाचा वापर करता करता ती जागा तिचा अवकाश कसा बनत जातो ते सांगणारी विलक्षण प्रत्ययकारी कथा.
सियू वाई अॅंडरसन (अनु: अजिता काळे) शिशिरातील बागकाम या कथेचा उल्लेख न करता या अनुवादित कथांविषयी चं सांगणं पूर्ण होऊ शकत नाही. हिरोशिमाच्या संहारक बॉम्बहल्ल्यातून वाचलेली एक तरुणी काही वर्षांनी अमेरिकेला जाते. बॉम्ब स्फोटाच्या थोड्या शारीरिक आणि जास्त मानसिक जखमा तिला झाल्या आहेत, तो भीषण भूतकाळ गाडून टाकायचा प्रयत्न तिनं चालवला असला तरी तिला ते जमत नाही. त्या पिढीतल्या जिवंत लोकांपैकी कदाचित आपणच शिल्लक असू आणि म्हणून त्या विषयी आपणचं जगाला सांगायला हवं असं तिची एक मैत्रीण तिला सुचवते, त्यामुळे मनात उठलेल्या खळबळीची ही मनस्पर्शी कथा.
यातल्या बहुतेक कथांच्या शेवटी लेखिकेविषयी टिपण जोडलेलं असल्यानं लेखनाचा काळ, पार्श्वभूमी कळते. काळाच्या निकषावर लेखन तपासायची संधी महत्त्वाची.
आशा बगे, (मांडव, शुद्ध) प्रकाश नारायण संत, सुबोध जावडेकर, पंकज कुरूलकर, सानिया (बऱ्याच असल्या तरी उल्लेखनीय “भूमिका, भेट), प्रिया तेंडुलकर, दीपा गोवारीकर, प्रमोदिनी वडके-कवळे या सुप्रसिद्ध लेखकांच्या उत्तमोत्तम कथा इथे वाचता आल्या. दीपा गोवारीकर नर्म विनोदी, मिश्किल लेखन करणाऱ्या पण “लवंडलेले माप” ही त्यांची गंभीर कथा आनंद देऊन गेली. मिलिंद बोकिल यांची अतिशय गाजलेली आणि पुढे त्या नावाच्या कथा संग्रहात समाविष्ट असलेली “झेन गार्डन” कथा इथेच प्रसिद्ध झाली होती. गौरी देशपांडे यांच्या स्त्री केंद्रित, मनोविश्लेषणात्मक कथांपेक्षा जरा हटके अशी हाँगकाँग मधल्या भारतीय लोकांची तिथल्या गुन्हेगारी विश्वातल्या सहभागाची खिळवून ठेवणारी कथा वाचता आली, “दहावा ड्रॅगन” ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे यांच्या काव्यात्म लेखन शैलीतली “उंच वाढलेल्या गवता खाली” या कथेत परदेशात शिकायला गेल्यावर तिथे भेटलेल्या विविध देशातल्या, वंशाच्या माणसांना बघताना आपल्या जवळच्या नात्यातल्या माणसांविषयी भान येणाऱ्या एका तरुणीची अतिशय तरल, भाव विभोर, चित्रदर्शी मांडणी दिसली.
पुढच्या काळात साहित्य अकादमी पुरस्कार विजेती ठरलेली “ब्र” “भिन्न” सारख्या कादंबऱ्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली कवयित्री लेखिका कविता महाजन हिची “एक समजावणी चा सूर” नावाची कथा उत्सुकतेनं वाचायला घेतली. नवऱ्याच्या व्यभिचारामुळे दुरावा निर्माण झालेल्या जोडप्याच्या घुसमटीची आणि अचानक पावित्र्य-अपावित्र्याच्या कल्पनांच्या मुळाशी जाऊन त्या पलीकडे मनानं विचार करायला हवा अशी त्या स्त्री ला समजूत येण्याची कथा. विचार उच्च, सुंदर असला तरी विस्कळीत मांडणी मुळे कथेनं मनाची मुळीच पकड घेतली नाही. उंचीवर जाण्याची क्षमता असून पूर्ण समाधान न दिलेली कथा.
अशा रचनेत फसलेल्या पुष्कळ कथा असल्या तरी प्रसिद्ध लेखकांच्या बाबतीत असं घडलं की अपेक्षा भंग होतो. वृंदा भार्गवे यांच्या “कथा साक्षी ची” हे असं च एक उदा. एक विद्यार्थिनी तिच्या प्राध्यापिकेसाठी वेडी होते, तिला पत्र लिहिते, फुलं पाठवते. कथाबीज भलत्या दिशेनं भरकटत जातं, इतकं की ती मुलगी समलैंगिक आहे की काय वाटावं.
सरिता पदकी यांची “जाळं” हीही यापैकी. अमेरिकास्थित पुरुषाची भारतात असलेली आई आजारी पडल्यावर तो येऊन तिला भेटून जातो आणि लगेच तिचा मृत्यू होतो. नुकती भेट झालेली असल्यानं तो याचा सहज स्वीकार करतो, आणि त्याच्या बायकोला जाणीव होते की आपणही आईवडिलांना भेटून यायला हवं. विषयाची व्याप्ती इतकी मोठी असून, मनोविश्लेषणात्मक मांडणी ची भरपूर शक्यता असताना वरवर विचार मांडलेली आणि त्यामुळे पकड न घेणारी कथा.
रोहिणी कुलकर्णी (आशीर्वाद), सानिया (जाग) माधवी कुंटे (एक क्षण बदलण्याचा) नीता गद्रे (अनुभव) रेखा बैजल( निर्माण) यांच्याही कथा वाचून अशीच भावना निर्माण झाली.
अनुवादित कथांमध्ये वेगळे विषय दिसले तसे काही इथल्या लेखकांनी सुद्धा हातळलेले आढळले. अर्थात हे फक्त विषयांबद्दल, या उल्लेखलेल्या बहुतेक कथा सामान्य दर्जावर राहिल्यात. अनघा सावनूर यांची इच्छा मरणा वरची “रे तुझ्या वाचून” कुत्रं पाळणं, भटक्या कुत्र्या विषयी प्रेम, इ. कारणांमुळे पती-पत्नीतले मतभेद, या वरची “अदृष्ट” लेखक रा. म. बोरगावकर. सुधीर हसमनीस यांच्या “तोच चंद्रमा” कथेत पृथ्वी वास्तव्यास योग्य राहणार नाही म्हणून सर्व पृथ्वीवासी परग्रहांवर निघून चाललेत. पूर्वीचे दोन प्रेमी मात्र इथेच राहायचं ठरवतात अशी ना धड विज्ञान, ना फॅंटसी असलेली मांडणी. “ज्याच्या जीवावर पृथ्वी आपला तोल सांभाळत होती तो चंद्र आपले स्थान सोडून वेगाने पृथ्वीकडे येत होता” असली अशास्त्रीय विधाने बेधडकपणे केलेली दिसली. वेगळं काही तरी लिहायचं म्हणून लेखन कसं करू नये त्याचं उदाहरण म्हणून या कथेकडे बोट दाखवता येईल.
डॉक्टर विद्याधर बोरकर यांची “खविसाचे उच्चाटन” ही कथा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्याच्या एका कामाची. देहू गावाजवळच्या एका निर्जन जागी खवीस आहे ही लोकांमधली गैरसमजूत घालवण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी अमावास्येच्या रात्री त्या जागेवर जाऊन तिथला खवीस असल्याची समज असलेला दगड कसा हलवला त्याची हकीकत. अनुभव कथनासारखी मांडणी असली तरी उत्सुकता वाढवत नेणारी वाचनीय कथा वाचायला मिळाली. इतक्या वर्षात केवळ एक ऐतिहासिक विषयावरची, त्या बाजाची कथा वाचली. वासंती उत्तम यांची “इमान” मुसलमान शत्रूच्या गोटातल्या वाट चुकलेल्या जनानखान्याला मराठी राजा किती सन्मानानं परत पाठवतो, त्यासाठी गुप्तता कशी राखली जाते या उत्तम कथा बीजाची, वाचनीय शैलीची कथा. भाषा सुरेख पण कथा तेवढी फुलवली नसल्यानं पूर्ण समाधान न देणारी. एकमेव ऐतिहासिक कथा असल्यानं उल्लेख अनिवार्य.
“शह आणि मात” अपर्णा आठवले यांची जाहिरात क्षेत्राचं अंतरंग उलगडून दाखवणारी कथा. काही कच्चे दुवे असले तरी तपशील, खाचाखोचा, आव्हानं छान दाखवली आहेत. 30 वर्षांपूर्वी हा विषय अनोळखी असू शकतो. लेखनावर जरा मेहनत घेतली असती तर उत्तम कथेची मानकरी ठरली असती. या क्षेत्राची सफर घडवली हे नक्की.
स्त्री केंद्री कथा
हे मासिक स्त्री चळवळीच्या खंदया कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं असल्यानं असेल पण स्त्री केंद्री, स्त्री वरचे अन्याय-अत्याचार, तिच्या वेदना मांडणाऱ्या अनेक कथा आढळल्या.
गर्भजल परीक्षेसंबंधी “नकोशी” लेखिका डॉ. वृषाली किन्हाळकर, “पुत्रवती मी” लेखिका विनया साठे, लग्न लावून दिल्यावरही नवरा बायकोला नांदवायला नेत नाही या विषयावरची “सरूची पाठवणी” लेखक प्रकाश पाठक, जुन्या प्रियकराच्या पत्रावरून संशय घेऊन नवऱ्यानं घर सोडायला लावलं पण एकटीनं जगणं अवघड आहे हे लक्षात आल्यानं परत आलेल्या स्त्री ची नीता गद्रे लिखित “निर्वाह” ग्रामीण स्त्री च्या वाट्याला येणारे अनेक प्रकारचे भोग दाखवणाऱ्या प्रतिमा इंगोले यांच्या कथा, नाही रे वर्गाचं भयंकर जिणं ज्यात साध्या गरजा सुद्धा पूर्ण होऊ न शकल्याची होरपळ वाट्याला आलेल्या स्त्रीचं जगणं दाखवणारी “चपल्या” ही आनंद यादव यांची सुन्न करणारी कथा, . “उत्तराच्या प्रतीक्षेत लक्ष्मी चा प्रश्न” या प्रतिभा अष्टेकर यांच्या कथेत जाळून घेतलेल्या स्त्री नं मुलांचा विचार करून हा अपघात होता, अशी जबानी देणं.
अनुवादित कथांच्या खजिन्यात सुद्धा जास्तीत जास्त कथा स्त्री वरचा विविध पातळ्यांवरचा, शारीरिक, मानसिक, भावनिक अन्याय दाखवणाऱ्या. एम. के. इंदिरा यांची सरोज पाटकर यांनी मराठीत आणलेली 150 वर्षांपूर्वीच्या काळातली “फणी अम्मा” असो वा सती भावे अनुवादित “रतकोंडा”, वसुंधरा देवी यांची बाळंतपणात सासूनं अत्याचार केल्यामुळे वेड लागलेल्या स्त्री ची “वेड” कथा असो.
सुखवस्तू घरात नवऱ्याचं दुर्लक्ष, तिच्या मताला किंमत नसणं, तिला गृहीत धरल्यामुळे तिला आलेलं वैफल्य, चाळीशी च्या टप्प्यावर मुलं मोठी झाल्यावर आपल्या आयुष्यात आपण काय मिळवलं हा पडलेला प्रश्न असे विषय हाताळलेले दिसले. मध्यम वयीन, मध्यम वर्गीय स्त्री च्या घुसमटीच्या कथा जवळपास प्रत्येक वर्षातल्या अंकात आहेत. प्रा. ललिता गादगे यांची “पंख” मुग्धा देशपांडे यांच्या “आंदोलन” ज्योती कानेटकर “सवाष्णी ची गोष्ट” सारख्या बऱ्याच कथांचा उल्लेख करता येईल.
प्रिया तेंडुलकर यांची “स्त्री वगैरे” ही अप्रतिम कथा सुद्धा “कॉर्पोरेट वर्तुळातल्या उच्च पदस्थ स्त्री ला घरच्यांकडून फक्त पैसे कामावणाऱं यंत्र या नजरेतून पाहिलं जातं, याच विषयावरची.
मधुचंद्राच्या मुक्कामात बायकोवर बलात्कार झाल्यावर परतीच्या प्रवासात त्यांच्यातलं बदललेलं नातं, एकांत शोधणारे ते दोघं अचानक माणसांची सोबत शोधू लागतात आणि अखेरीस नात्याची पुन्हा सुरुवात करू बघतात असं सांगणारी “शुद्ध” ही आशा बगे यांची कथा, किती उदाहरणं देणार? अन्याय सहन न करणाऱ्या स्त्रियांच्या कथा अपवाद म्हणून सापडल्या.
नंदिनी उपाध्ये यांच्या “सुटका” या कथेतली तीन मुलींनंतर चौथ्यांदा गरोदर असलेली खेड्यातली अशिक्षित बाई एका घरी कामाला लागते. तिथे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, चांगले विचार कानावर पडतात. टी. व्ही. बघायला मिळतो. टी. व्ही. वर इंग्रजी सिनेमातल्या नायिकेनं हुशारीनं नवऱ्याचा केलेला खून बघून हीही उघडकीस येऊ शकणार नाही अशी युक्ती वापरुन नवऱ्याचा त्रास मिटवते. दारुड्या, मारकुट्या, दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या नवऱ्या पासून मुक्ती मिळवते. सर्व बाबतीत सरस कथा वाचल्याचं समाधान देणारी कथा.
अत्यंत श्रीमंत अरब देशातल्या अमीर खानदानातल्या पडदानशीन स्त्रियांना बुरखा फोडून मुक्त जगण्याची आस कशी असते आणि ते करणाऱ्या स्त्रियांची फॅंटसीच्या अंगानं जाणारी “बेनकाब” ही कथा वेगळंच जग दाखवते. वेगळा विषय, विचार आणि मांडणी.
नंदुरबारच्या विजया जहागीरदार यांच्या “रानफूल” कथेतली शेतात मजूरी करणारी अशिक्षित बाई सततच्या अन्यायाविरुद्ध पेटून उठते, इतर बायांना धीर देऊन एकत्र करते. कुटुंबात, समाजात सतत मिळणारं दुय्यम स्थान भिरकावून द्या, घाबरू नका असा धीट संदेश देणारी ही बाई मनात घर करते. यातलं ग्रामीण वास्तव अंगावर येणारं.
मीनाक्षी सरदेसाई यांच्या “त्या दोघी” कथेतल्या पुरुषानं पहिली बायको, मुलं असताना दुसरं लग्न केलं. या दोन सवती आयुष्याच्या संध्याकाळी भेटून मन मोकळं करतात. असं एखाद्या बाई नं केलेलं नवऱ्याला चाललं असतं का? त्यानं तिला घराबाहेर काढलं असतं, मग आपण का त्याला दोन घरात राहू दिलं? हा चांगला विचार मांडणारी, पण कथा म्हणून सामान्य.
शंकर राव खरात यांच्या “कथा एका नर्तिकेची” मधल्या नाच गाणं करणाऱ्या घराण्यातल्या स्त्रीला शिक्षण सोडून धंद्याला लावलं म्हणून दु:खी असलेली बाई आपल्या मुलीला शिक्षण घ्यायला प्रवृत्त करते. पण तीही फसवली जाते, नर्तकी होण्याचा भोग तिच्याही वाट्याला येतो. तिला दिवस जातात, पण ती ठरवते की मूल जन्माला घालायचं, शिक्षण देऊन ही परंपरा खंडित करायची. गोष्टी सारखी सारळसोट मांडणी असली तरी “मागच्यास ठेच पुढचा शहाणा” हा विचार देणारी म्हणून इथे उल्लेख केला एवढंच!
“पार्वती वाघमारे ला पाहायला येतात” ही रोहिणी भट्ट-साहनी यांची कथा तिच्या पुरता बंडखोर विचार करणा-या नायिकेची. मध्यमवर्गीय घरातल्या पदवीधर, बेतशीर रूपाच्या तरुणीच्या लग्नाचं आईवडील टेंशन घेत असल्यानं सतत दाखवण्याचे कार्यक्रम आणि नकार घंटेचं चक्र सुरू असताना ही तरुणी त्याकडे कसं बघते हे सांगणारी कथा. हा विषय चकोरीतलाच, फक्त मांडणी अशी की सततच्या नकारांनी त्या मुलीला नैराश्य येत नाही, उलट ती “बघू तरी आता हा मुलगा कसा वागतो, आपण याची गंमत केली तर याची प्रतिक्रिया कशी असेल असा काहीसा बंडखोरपणा. कथेच्या रचनेत गोंधळ उडालेला वाटला. ना धड विनोदी.
अन्याय सहन न करणाऱ्या स्त्री ची अतिशय सुरेख कथा म्हणून माधवी कुंटे यांच्या “सूली उपर सेज हमारी” चं उदा. देईन. मुंबईत राहणाऱ्या राजस्तानी सनातन संस्कार जपणाऱ्या कुटुंबातल्या धीट, हुशार, महत्त्वाकांक्षी मुलीची कहाणी. थोरल्या बहिणीला छळून मारणाऱ्या नवऱ्याशी लग्न करून त्याच्या अपराधाचा सूड घेण्याचा निश्चय करणाऱ्या एका विद्यार्थिनीला तिची शिक्षिका कसं बळ देते ते सांगणारी. शीर्षक, वातावरण, व्यक्तीचित्रण, परस्पर नाते संबंधांची उकल.. सर्व पातळ्यांवर समाधानकारक.
या इतक्या प्रचंड कथा वाचताना प्रसिद्ध लेखकांच्या, लहान गावातल्या, पुरुष लेखकांच्या, कथेची मांडणी, विषयातला वेगळेपणा, आशयघनता, शीर्षक अशा विविध अंगांनी त्याकडे बघितलं. प्रकाश नारायण संत यांची “डग” कथा खास त्यांच्या लहान मुलाच्या नजरेतून जगाकडे बघणाऱ्या शैलीतली, आशा बगे यांची “मांडव” नात्यातले गुंते हळूवार मांडणारी, प्रिया तेंडुलकर यांची स्त्री बंडखोर, बिनधास्त वर्तनाची, सुबोध जावडेकरांची “अर्थ शून्य भासे मज हा” अशा काव्यमय शीर्षकाची टेस्ट ट्यूब माध्यमातून जन्म झालेल्या एका तरुणीची विज्ञान कथा. विज्ञान कथेला बीज एखाद्या वैज्ञानिक सिध्द्धांताचं असतं आणि कल्पनेच्या फुलोऱ्यातून मांडणी. लेखक त्या भूलभुलैय्याची सफर घडवतो.
काही कथा कुठल्याच बाबतीत म्हणजे आशय घनता, व्यक्ती चित्रण, वातावरण, भाषा अशा कुठल्याच बाबतीत विशेष नसूनही एखादी काही गोष्ट इतकी छान असल्यानं लक्षात राहिल्या. “तू फक्त हो म्हण प्लीज” ही मालिनी रेडकर यांची कथा याचं नेमकं उदाहरण. आजी आणि तिचा गोड छोटा नातू यांचं खास सख्य. त्या छोट्या च्या काकाला लग्नासाठी मुली बघत असतात आणि योग्य मुलगी मिळत नसते. हा छोटा आजी ला म्हणतो, “आजी तूच का नाही काकाशी लग्न करत? तू इतकी गोड आहेस. चिमखडे बोल वगैरे सदरात खपेल असा विषय असून ही लहानशी कथा वाचताना निरागस आनंद देते.
“शीर्षकांबाबत बोलायचं तर ढोबळ, फारसा विचार न करता शीर्षकं देण्यावर भर दिसला. “बेघर” “आत्मसंघर्ष” “जिद्द” “त्या दोघी” ‘वंश” “वारसा” ‘भेट’ “सुटका” “स्वीकार” “नकोशी” ही सरळसरळ, कथा विषय एका शब्दात सांगून टाकणारी शीर्षकं भरपूर सापडली. नीलिमा शिकारखाने यांच्या “तुमची खूप घृणा येते पप्पा” या शीर्षकाची कथा याचं उत्तम उदा. असं सगळं सांगून टाकलं की कथेचा विषय सुरुवातीला कळतो, उत्सुकता मुळी संपूनच जाते. मग एक उपचार म्हणून कथा वाचली जाते.
सुरेख, मनस्पर्शी तसंच कथा आशय नेमका घरंगळत शीर्षकाशी नेऊन सोडणारी शीर्षकं बघितल्यावर मिळणारा आनंद सुद्धा मिळाला. चांगल्या कथा बीजावरच्या, कथेच्या सर्व निकषांत बसणाऱ्या, वाचनीय, काही दर्जेदार कथांचा उल्लेख केल्या शिवाय हे टिपण पूर्ण होऊ शकत नाही.
ऑगस्ट 1989 मध्ये प्रसिद्ध झालेली बा. ग. केसकर यांच्या “आप्रिशन” कथेत सिजेरियन पद्धतीनं प्रसूती म्हणजे ऑपरेशन करून मूल जन्माला येतं हेच माहिती नसलेली स्त्री ऑपरेशन म्हणजे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असा आरोप करत सुटते. सुनेच्या वडिलांना दूषण देत राहते. त्या मागे मुलाचं दुसरं लग्न लावून देण्याचा डाव असल्याचं त्या वडिलांना समजतं हे कथाबीज. ग्रामीण वातावरण, अज्ञान, पुरुषी वर्चस्व वाद दाखवणारी चांगली कथा, एका निमशहरी भागातल्या पुरुष लेखकानं या विषयाची निवड केली आणि बापाचं काळीज उघडं करून दाखवलं हे ही विशेष वाटलं.
त्याकाळात पाश्चात्य देशातच घडू शकेल आणि आज आपल्याकडे सर्रास दिसते अशा विषयावरची सुंदर कथा “प्रकरण” (दिवाळी 1989) अजिता काळे यांच्या लेखणीतून उतरलेली. मुक्त लैंगिक संबंध ठेवणाऱ्या अमेरिकन समाजातल्या तरुण विद्यार्थिनीच्या आयुष्यात प्रेम प्रकरणं, ती नाती तुटणं, मग मानसिक आंदोलनं, शारीरिक पीडा, शेवटी येणारं एकाकीपण अशा अनुभवांवरची थेट भाषेतून नेमकेपणानं कथेचा आशय पोहचवणारी.
रोकेया सखावत हुसेन यांची “सुलताना चे स्वप्न” (मार्च 1990) नावाची (अनु: विद्युत भागवत) कथा अद्भुत जगाची सफर घडवते. पुरुष पडद्यात आणि स्त्री राज्यकर्त्या आहेत अशा स्वप्नभूमीची सफर करवणारी ही कथा. फॅन्टसी च्या अंगानं जाणारी. लेखिका रोकेयाच्या लिखाणाविषयी टिपण शेवटी जोडलेलं आहे, जे फार महत्त्वाचं.
स्त्रियांनी स्वत्व शोधावे, ध्यास घेऊन ज्ञान मिळवावे. स्त्री निसर्गाशी नातं जोडते, हिंसा, युद्ध या विरुद्ध ती उभी राहू शकते असे अनेक गंभीर मुद्दे या प्रतीकात्मक लेखनात येतात.
कार्यालयीन सहकारी स्त्री चा पुरुषाच्या दृष्टीकोनातून वेध घेताना, व्यक्तीमत्वातलं माणूसपण शोधणारी ओघवत्या शैलीतली, वाचनीय कथा “पद्मा” लेखक पंकज कुरूलकर. (फेब्रुवारी 1991)
30 वर्षानंतर आजही कुठेही घडू शकते अशी कथा, “हत्यार” (दिवाळी 1992) लेखिका अनुराधा वैद्य. सहकार्य केलेला कुठल्याही वयाचा, नात्याचा पुरुष त्याच्या मनाविरुद्ध वागलेल्या स्त्री वर पलटवार करताना तिचं चारित्र्य बदनाम करण्याचं सनातन हत्यार उपसतो हे दाखवणारी सर्व कसोट्यांवर उतरलेली उत्तम कथा.
दिवाळी 1993 अंकातली मंदाकिनी भारद्वाज यांची “मैत्रीण” ही अत्यंत प्रगल्भ, काळाच्या पुढचा विचार मांडणारी कथा. विधूरपणातलं सासऱ्यांचं दु:ख समजून घे, त्यांना एखादी मैत्रीण मिळाली तर रागावू नको, शक्य झाल्यास तूच त्यांची मैत्रीण हो, असा सल्ला मुलीला देणाऱ्या एका विधवा आईची समजूतदार कथा.
केवळ एक कथा संग्रह नावावर असलेल्या विनया खडपेकर यांची “प्रतिसाद” (दिवाळी 1994) ही अत्युत्कृष्ट कथा. एकट्या प्रौढ कुमारिकेच्या कामातलं समर्पण, विविध विषयातला रस-अभ्यास, पुरुष मैत्रीचे अनुभव, त्यातून येणारी आयुष्याची समजूत अशा विविध कोनातून टिपलेल्या तिच्या भाव विश्वाची, घाट, मांडणी, आशयाच्या बाबतीत अप्रतिम कथा.
“चतुर्थाश्रम” चूडामणी राघवन इंग्रजी अनु: सावित्री नटराजन, मराठी अनु: विद्युत भागवत (ऑगस्ट 1995) कथेतली स्त्री जेव्हा मानसिक पातळीवर प्रगल्भ होत जाते तेव्हा दैहिक सुखाचा संसार सोडून वडिलांच्या मित्राशी वैचारिक पातळीवर प्रेमात पडून लग्न करते. त्यांचं नातं फुलत जाऊन एका पातळीवर स्थिर होतं, पण तिची आयुष्याची समजूत वाढत जाऊन तिला अधिकाधिक “स्व” शोध घ्यावं वाटतो. या लग्नातून मोकळं होऊन स्वतंत्र व्हायची इच्छा व्यक्त करते, पण त्या आधीच तिचा मृत्यू होतो. तिच्या मृत्यू पश्चात तिचे दोन पती भेटून या पत्नीला समजून घ्यायचा प्रयत्न करताहेत. परस्पर संवादातून तिची वैचारिक प्रगल्भता मान्य करतात अशी उत्तुंग प्रतिभेची कथा. रूढार्थानं औपचारिक शिक्षण नसलेल्या लेखिकेनं जवळपास 40 वर्षांपूर्वी लिहिलेली असा विचार करता नतमस्तक व्हावं अशी जबरदस्त.
नवऱ्याच्या माघारी अतिशय दारिद्रयात, कष्टानं वाढवलेला मुलगा आपल्या शिष्यवृत्तीच्या पैशातून आईला एक विदेशी सुंदर दुलई भेट देतो. या दुलई ला लगडून मातृत्वाच्या, स्त्रीत्वाच्या असंख्य भावनांच्या छटा समोर येतात. छोट्या कथा बीजावरची ह्या लेखिका प्रतिभा राय ह्यांच्या सशक्त कथेचाअ, इंग्रजी अनुवाद जयंत महापात्र आणि मराठीत अनुवाद रंजना गिरिधर गोपाल ह्यांनी केला आहे. (फेब्रुवारी 1996)
अभ्यास न झाल्यामुळे 12 वी ला परीक्षेला न बसलेल्या मुलावर रागावल्यामुळे मुलानं आत्महत्या केलीय. त्या घटनेचा आईवडिलांवर, त्याच्या जुळ्या हुशार, अभ्यासू भावावर झालेला परिणाम. त्यामुळे पुढे तो मुलगा लग्नाच्या वयाचा झाल्यावर त्याला मुलगीच सांगून न येणं, असा सगळा विस्कोट, कल्लोळ दाखवणारी “प्रेसिपिटेट” (मे 1996) ही छाया नाईक यांची चांगली, परिणामकारक कथा.
प्रतिमा जोशी यांची “कातळमाया” गावाच्या टोकाच्या एका कातळावर मुक्कामाला असणाऱ्या एका फकीर बाबाचं गावातल्या तरुण, सासूरवाशीण स्त्री शी अनाम भावनिक नातं आणि असा कुठलाही पाश नको म्हणून कातळ सोडून निघून गेलेला फकीर, ते मनोमन जाणून स्वीकारणारी ती, असा सुरेख विणलेला गोफ दाखवणारी उत्कृष्ट कथा.(दिवाळी 1997)
शांता गोखले यांच्या “सत्कार” (दिवाळी 1997) या ढोबळ शीर्षकाच्या उत्कृष्ट कथेतल्या ज्ञानी, गंभीर प्राध्यापिकेला निवृत्ती नंतर कथा लेखनासाठी राज्य पुरस्कार मिळतो, महाविद्यालयात त्यांचा सत्कार ठरतो. गर्दी जमवण्यासाठी माजी विद्यार्थी असलेल्या सुप्रसिद्ध नायकाला आमंत्रण दिलं जातं. प्रचंड गर्दीत तो येतो, भाषण करतो, निघून जातो. त्याच्या बरोबर गर्दी पण ओसरते. आता बाई मोकळा श्वास घेऊन शांतपणे म्हणतात, “चला आता गप्पा मारू” सामान्य कथा बीजाची उत्तम फुलवलेली कथा.
1998 मधल्या 3 अतिशय चांगल्या कथा
मे अंकातली प्रकाश पाठक यांची “रुक्मिणी” ही अशिक्षित मजुराची तरूण, देखणी, कष्टाळू दुसरी बायको एका वरिष्ठ अधिकाऱ्याला जगण्याचे वेगळे आयाम दाखवते. बोगदा खणण्याच्या साईट वर घडणारं कथानक तिथलं वातावरण, कामाचं स्वरूप सहजगत्या उत्तम उभं करणारं लेखन. व्यक्तीरेखा नजरेसमोर उभ्या राहतात.
ऑगस्ट अंकातली प्रमोदिनी वडके-कवळे यांची “त्रिपूर”. आई वडिलांच्या पुनर्विवाहामुळे दोघांच्या आधीच्या मुली सावत्र बहिणीच्या नात्यानं एका घरात राहू लागतात. बघता बघता त्यांच्यात सख्खं नातं फुलत जातं. वडिलांच्या मित्राचा मुलगा त्यांच्या घरी राहायला येतो, तिघा मुलांची मैत्री जमते आणि त्यातल्या धाकटी शी प्रेम. लग्न होतं, मुलीचा जन्म होतो, पण नंतर ते वेगळे होतात. पुढे अनेक वर्षांनी एक प्रसंग येतो ज्यांनं त्या दोघींमध्ये दुराव्याचा त्रिपूर पेटतो. हा वणवा त्यांच्यातल्या नात्याला धग पोचवतो. अत्यंत तरल, उत्कट अनुभव देणारी कथा.
डिसेंबर मधली दीनानाथ मनोहर यांची “स्वातंत्र्य वीर” ही ही वेगळ्या विषयावरची दर्जेदार कथा. स्वातंत्र्य पूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत सहभागी एका तरुणीनं नवऱ्याच्या नकळत अनेक कामात भाग घेतला, त्यात तिचा मृत्यू झाला. चौकशी साठी ताब्यात घेऊन तुरुंगात टाकलेल्या नवऱ्याला स्वातंत्र्य सेनानी असा फुकटचा मान मिळाला. अखेरच्या दिवसात हे लपवलेलं सत्य त्याला आतून पोखरत नेतं अशा कथानकाची मनाची पकड घेणारी कथा.
इतक्या सगळ्या वर्षातल्या कथा तीसेक वर्षांनी वाचताना मनात जे काही उमटत गेलं त्यावरची ही माझी मतं. दरम्यान च्या काळात भाषा, मांडणी, शैली, विषयात कितीतरी बदल होत गेले. यातल्या अनेक लेखकांचं साहित्य वाचलं गेलं. जे लेखन त्या काळात अतिशय आवडत होतं ते आता जुनं, शिळं वाटलं. अर्थात असं होणार यांची जाणीव ठेवून, त्या काळाचा चश्मा लावून वाचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी फक्त वाचक होते, आता वाचक-लेखक असल्याचा फरक ठळक झालाय. शिवाय दरम्यानच्या काळात माझ्या वयात, अनुभवात, समजूतीत झालेले बदल मी थोपवू शकत नाही, हेही लक्षात आलं. तरी ते लेखन, लेखक, त्यांची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न प्रामाणिक होता हे निश्चित.
(मुखपृष्ठ चित्र : इंटरनेटवरून. Book Ganga यांचे आभार.)
नीलिमा बोरवणकर
borwankar.neelima@gmail.com