साऱ्याजणींचं 'खबर लहरिया' भाग १

वर्तमानपत्र, मासिकं ह्या ठिकाणी नेहमी एक सदर चालु असत. म्हणजे लेखांची एक मालिकाच चालु असते. अश्या सदरांची गरज काय? असा ही प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल पण ह्या सदरांतुनच एका विषयाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोण आपल्याला समजतात. कोणताही विषय घेतला तर आपल्या लक्षात येतं की ह्या कडे एकाच बाजुने बघणे म्हणजे त्या विषयाला निटसा न्याय न देण्यासारखंच आहे. आणि अश्या विषयांना न्याय देण्याचे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बाजु आपल्या वाचकांसमोर आणण्याचे काम ह्या मिळून साऱ्याजणींतील सदरांनी केले आहे. अश्या ह्या सदरांची अखंड चालणारी मालिका हे अजुन एक मिळुन साऱ्याजणी चे अजुन एक वैशिष्ट्य आहे. तर ग्रहणांकित चांदणं, मध्ये कामना आणि प्रेरणा,संवाद स्पंदन, ह्या सारख्या सदरांतुन कायदा,लैंगिकता, घरकाम, अपगंत्व, कथा ह्या वर असणाऱ्या सदरांचा त्यांच्या विषयांचा आढावा घेणारा “साऱ्याजणींचं 'खबर लहरिया” हा लेख संध्या गवळी ह्यांनी लिहिला आहे.
**
साऱ्याजणींचं 'खबर लहरिया' या सदारांतर्गत एकूण २१ लेख लिहिण्यात आलेले आहेत. त्यामध्ये लेखकांची विभागणी ही पुढील प्रमाणे आहे - १५ स्त्रियांचे, ८ पुरुषांचे तर एक लेख हा दोन लेखकांनी (स्त्री - पुरुष) लिहिलेला आहेत. बहुतांश लेखकांची सामाजिक पार्श्वभूमी ही शहरी, मध्यम वर्गीय आणि उच्च शिक्षित आहे. विशिष्ट समाजासोबत काम करण्याच्या उद्देशाने काही लेखिका / लेखक हे ग्रामीण भागात स्थलांतरित झालेले दिसून येतात. साऱ्याजणींचं 'खबर लहरिया' सदर सप्टेंबर २०१० सालापासून सुरु करण्यात आले असून हे सुरु करण्याची प्रेरणा बुंदेलखंड येथे स्थानिक ग्रामीण स्त्रियांनी सुरू केलेल्या स्थानिक वृत्तपत्रापासून घेण्यात आलेली आहे. या प्रयोगामार्फत ग्रामीण भागात काम करणाऱ्या संस्था / संघटनांबाबतची माहिती, त्यांच्या कामाचे स्वरूप आणि आवाका त्यांच्या स्वतःच्या भाषेत / शैलीत समजून घेण्यास मदत होते. जमिनीवर काम करता असताना स्थानिक आणि स्वतंत्र मजकूर लिहिण्यावर भर देणे आवश्यक आहे जेणे करून स्थानिक पातळीवरचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर पोहचू शकतील आणि साऱ्याजणींनी ह्या सदराच्या माध्यमातून विविध संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधींना स्वतःचा प्रवास मांडण्यासाठी 'कर्तेपण' आणि 'अवकाश' उपलब्ध करून दिलेला दिसून येतो त्याचप्रमाणे विविध उपक्रम अथवा प्रयोगाच्या माध्यमातून मिळून साऱ्याजणी ने मासिकाचे वेगळेपण राखून ठेवल्याचे दिसून येते.
सदारांतर्गत प्रकाशित झालेल्या लेखांविषयी थोडक्यात आढावा –
विजया चौहान यांनी लिहिलेल्या खबर लहरिया या लेखापासून प्रेरणा घेऊन मिळून साऱ्याजणींनी साऱ्याजणींचं 'खबर लहरिया' नावाखाली सदर सुरु केले. उत्तर प्रदेश मध्ये सुरु करण्यात आलेल्या खबर लहरिया वृत्तपत्र भारतीय माध्यमं जी पुरुषकेंद्री, उच्च जात / वर्ग आणि भाषिक वर्चस्व टिकवून ठेवण्याचं काम करतात त्याला छेद देण्याचं काम करतं. स्थानिक भाषेत देखील दर्जेदार पत्रकारिता होऊ शकते आणि त्याची दखल युनिस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेनी घेणं म्हणजे एक मोठं यश आहे. उत्तर प्रदेश सारख्या मानवी निकषांवर मागास आणि स्त्रियांच्या हिंसेच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या राज्यातून स्थानिक भाषेत ते पण दलित व अल्पशिक्षित स्त्रियांनी वर्तमानपत्र सुरु करणे, त्याचे सातत्य व वाचक वर्ग टिकवून ठेवणे ही खूप मोठी यशस्वी बाब मानावी लागेल. खबर लहरिया मध्ये स्त्रियांच बातम्या गोळा करणे, त्यांचं संकलन, छाटणी, संपादन, विक्री ही सर्व कामे स्त्रिया करतात.
निरंतर या संस्थेने पुढाकार घेऊन स्त्रियांना पत्रकारितेचे प्रशिक्षण दिले आणि एकप्रकारे सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यास हातभार लावला. ग्रामीण भागामध्ये महिलांना एक आत्मविशास मिळून त्या एव्हढी मोठी जबाबदारी पार पडू लागल्या. खबर लहरिया हे केवळ स्त्रियांसाठी वृत्तपत्र नाही पण स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिलेले एक वृत्तपत्र असून स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या वृत्तपत्राने केलं.
कुसुम कर्णिक यांचे 'शाश्वत वाटचाल' या शीर्षकाखाली दोन लेख प्रकाशित झाले असून त्यांनी एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी भागात काम करत असतानाचे त्याचे स्वतःचे अनुभव आणि शाश्वत संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमांबद्दल मांडणी केलेली आहे. यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी सैद्धांतिक आणि नैतिक प्रश्नांना हात घातलेला आहे. 'परिस्थितीचा अभ्यास केल्याशिवाय कामाला हात घालू नये, लोकांकडून शिकावे' व 'लोकांची खरी गरज, ताकद, कमजोरी, त्रुटी समजून घेऊन मग काम उभे करावे' असे कर्णिक सुचवतात. त्याचप्रमाणे इतर विविध लेख हे सुरुवातीच्या टप्यावर समाजासोबत काम करत असताना निर्माण झालेली कोंडी आणि समस्यांबाबत नमूद करतात. त्यातील एक लेख म्हणजे डॉ. प्रसाद आणि हर्षदा देवधर यांचा होय. 'समाजासोबत काम की समाजाबरोबर काम' ह्या कोंडी विषयी लिहिताना ते अधोरेखित करतात कि, 'समाजासोबत राहून काम करायचं आणि पुरवठा आधारित काम नाही, तर मागणी आधारित काम करायचं'. बरेचदा वैचारिक दृष्टिकोन / बैठक पक्की नसल्याने काम यशस्वी होत नाही आणि त्याचा समाजालाही फायदा होत नाही. त्यामुळे नियोजनयुक्त काम करणे आवश्यक आहे हे देवधर यांच्या लेखातून ठळकपणे पुढे येते. ही लेखकांची निरीक्षणे आणि अनुभव नवीन कार्यकर्त्यांना अथवा अभ्यासकांना एक मार्गदर्शनपर बाब आहे. संशोधन करताना अथवा परिघाबाहेरील समूहांसोबत काम करताना समूह केंद्रित दृष्टिकोन असणे आवश्यक आहे हे या लेखांमधून अधोरेखित होते.
कर्णिक या ग्रामीण भागांचे होणारे निमशहरीकरण आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या यावर प्रकाश टाकतात. कर्णिक यांच्या लिखाणातून आदिवासींच्या दैंनंदिन संघर्षाच्या केंद्रस्थानी उपजीविका, आरोग्य, शिक्षण, नैसर्गिक संसाधनांचे रक्षण इत्यादी महत्वपूर्ण बाबी दिसून येतात. एकंदरीत शासकीय उदासीनता आणि इतर संरचनात्मक अडथळ्यांमुळे आदिवासी समूहास मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र 'शाश्वत' ने जन वकालतच्या माध्यमातून आदिवासींचे जमीन खाते फोड, मत्स्यपालन, मुलांना वसतिगृह, क्रीडा संकुल इत्यादी अनेक प्रकारे सकारात्मक बदल घडवून आणण्याचे काम केले. तसेच वनकर्मचारी यांच्याकडून वानवळा वसुलीच्या नावावर आदिवासींच्या धान्याची होणारी लूट थांबवण्यात 'शाश्वत' ला यश प्राप्त झाले. यावरून असे दिसून येते कि, लोक सहभागातून लोक केंद्रित विकास साधला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण 'शाश्वत' ही संस्था आहे.
बहुतांश लेखकांनी लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांना आयुष्याच्या विविध टप्प्यावर समाज कार्याचे प्रेरणा मिळाल्यामुळे त्यांनी पुढे काम सुरु ठेवले. तर काहींना कुटुंबातून समाजाविषयी जाणीव आणि समस्यांचे आकलन झाल्याने त्यांनी समाज कार्याचे काम सुरु ठेवल्याचे दिसून येते.
शिवाजी कागणीकर हे बेळगाव येथील ग्रामीण भागामध्ये तेथील स्थानिक लोकांसोबत काम करतात. त्यांनी लिहिलेल्या लेखात ते नमूद करतात कि, ते स्वतः धनगर समुदायातून असल्यामुळे जातीचे चटके काय असतात हे त्यांना माहित आहे. गाव पंचायत कडून वाळीत टाकणे, व्यवहार बंद करणे, दलित समुदायांच्या जमिनीवर उच्च जातीयांनी हक्क सांगणे आणि त्यातून होणारे अत्याचार कागणीकर नमूद करतात. कागणीकर यांच्या लेखातून सामाजिक न्यायासाठी संघर्ष हा अटळ आहे हे दिसून येते. तसेच ते लोकांना सोबत घेऊन संघर्ष करतानाही दिसतात. बऱ्याचदा लोक विकासासंदर्भात मांडणी करताना भौतिक समस्यांवर भर देतात मात्र दैनंदिन आयुष्यात जात, लिंगाधारित प्रश्न याकडे फारसे लक्ष देत नाहीत. कागणीकर यांचा लेख वाचताना ते जात व तिचे भौतिक प्रश्न, अल्पभूधारक शेतकरी, स्त्रिया आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न (अर्थात पाणी प्रश्न केवळ स्त्रियांचा प्रश्न नाही) यावर प्रकाश टाकतात जे कि खूप महत्वाचे आहे. लेखाच्या शेवटी कागणीकर नमूद करतात कि, उच्च जातीयांकडून कार्यकर्त्यांचे विविध मार्गांनी खच्चीकरण केले जाते जे की समाजास अहितकारक आहे. या लेखाच्या मध्यातून अतिशय महत्वाचे प्रश्न कागणीकर उपस्थित करताना दिसतात.
उत्पल चंदावार यांनी गडचिरोलीतील मेंढा (लेखा) गाव, या ठिकाणी भेट दिली असता नोंदवलेल्या निरीक्षणाबाबत ते लेखात मांडणी करतात. मेंढा गावातील गोंड आदिवासींमध्ये समतेची संस्कृती, त्यांचे दैनंदिन व्यवहार समजून घेण्यास सदरचा लेख महत्वपूर्ण आहे. गोंड आदिवासी हे केवळ स्थानिक राजकारणाचा विचार करत नाही तर केंद्रीय / संसदीय राजकारण देखील करणे तितकेच गरजेचे आहे ही जागरूकता त्यांच्यामध्ये आल्याने दिल्ली-मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावी आम्हीच सरकार' ही केवळ घोषणा नसून ब्रीद वाक्य आहे. तसेच लोकांचा राजकीय निर्णय प्राक्रियेमध्ये सहभाग असावा यासाठी सक्रियपणे काम केले जाते.
.png)
गावसभांमध्ये प्रत्येक कुटुंबातील एक स्त्री आणि पुरुष सभेमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक आहे असा निर्णय मेंढा गावकऱ्यांनी केला आहे. यावरून आपण युक्तिवाद करू शकतो कि, सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय सत्ता देखील महत्वाची असते आणि ते गोंड आदिवासींना खूप चांगल्याप्रमाणे समजलं आहे त्यामुळे सत्तेमध्ये वाटा असावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. बहुतांशवेळा कोणताही निर्णय घेताना बहुमत विचारात घेऊन निर्णय घेतला जातो मात्र मेंढा गावातील आदिवासी या बहुमताच्या वलयाला आव्हान देत 'निर्णय बहुमताने नाही तर सर्वसहमतीने घ्यायचे’ हा नियम असल्यामुळे विरोधकांशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. गोंड आदिवासींना बहुमत निर्णय पूर्णपणे दोषरहित नसतंच हे उमगले आहे त्यामुळे गावाचे अभ्यास मंडळ (ज्यांना विषयाचा कीस काढायचा असतो अशा स्त्री पुरुषांचा गट) आणि चर्चा यातून प्रश्न सोडवले जातात. सदरचा लेख मेंढा गावातील गोंड आदिवासी समाजाची समतेची आणि लोकशाहीची परंपरा सकारात्मकरित्या मांडतो आणि वाचकांपर्यंत ही परंपरा पोहचवतो.
वंदना करंबेळकर या 'स्वप्ननगरी' ही संस्था उभारतानाचा प्रवास मांडतात. शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या प्रश्नांना घेऊन स्वप्ननगरी संस्था काम करते. नसीमा हुजारुक यांचा स्वप्ननगरी उभारताना असलेला मोलाचा वाटा आणि केवळ अपंगत्व असलेल्या व्यक्तींना राहण्यासाठी जागा अशा संकुचित दृष्टिकोनातून न बघता आर्थिक स्वातंत्र्य गरजेचे आहे हे ओळखून अपंगांना उद्योगाचे प्रशिक्षण देऊन मुख्यप्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न स्वप्ननगरी कडून करण्यात आला. स्वप्ननगरी च्या प्रवासात संस्था उभे करणे आणि ती टिकवणे कठीण मात्र अशक्य नाही हे हुजारुक यांनी दाखवून दिले आहे.
कांचन परुळेकर यांनी स्वयंसिद्ध संस्थेच्या कामाविषयी लिहिलेला लेख काही अंशी स्त्रियांच्या सामाजिक विकासावर भर देताना दिसतो. स्वयंसिद्ध संस्थेमार्फत स्त्रियांच्या आरोग्य, व्यक्तिमत्व विकास, आर्थिक स्वातंत्र्य यावर भर देण्यात आलेला दिसून येतो. बहुतांश लेखांनी 'विकास' या कोटिक्रमाला चिकित्सकरित्या हाताळले आहे तसेच परिघावरील समूहांसोबत काम करत असताना केवळ समूहांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून चालत नाही तर स्त्रिया ह्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये अग्रभागी असणे देखील आवश्यक आहे. काही लेख हे स्त्रियांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले, त्यांना रोजगार (शिवणकाम, कुकुटपालन, बायोगॅस निर्मिती इत्यादी) उपलब्ध करून दिला याविषयी मांडणी करतात मात्र त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील निर्णयप्रक्रियेतील स्थान सुधारले का? याविषयी अधिक माहिती देत नाहीत.

मात्र परुळेकर यांनी लिहिलेल्या लेखामध्ये काही स्त्रियांचे अनुभव मांडतात ज्यामध्ये स्त्रिया त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला, स्वाभिमानाने जगायला शिकलो, आर्थिक व्यवहार करू लागल्या, विचार करू लागल्या अशा स्वरूपात स्त्रियांनी संस्थेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांच्या प्रवासाबाबत आपले अनुभव मांडतात. सर्वात महत्वाची बाब परुळेकर आपल्या लेखात नमूद करतात ती म्हणजे 'कुटुंबाच्या हितसंबंधांना धक्का न देता स्त्रीला घराबाहेरच आकाश दाखवले पाहिजे'. वरवर बघता वाटेल की, हितसंबंधांना धक्का दिला नाही तर स्त्रियांचा सर्वांगीण विकास कसा होणार? मात्र सुरुवातीच्या टप्प्यावर स्त्रियांसोबत काम करत असताना, नवीन डावपेच आखताना हे हितसंबंध लक्षात घेऊन काम करणे आवश्यक आहे. जहाल भूमिका सुरुवातीच्या टप्प्यावर मांडल्या तर स्त्रियांना घरातील मंडळी घराबाहेरच सोडणार नाही.
कल्याण टांकसाळे यांनी लिहिलेल्या एक लढाई जरुरी है... या लेखात खेडी हा देशाच्या विकास प्रक्रियेचा केंद्रबिंदू असावा असे मत मांडून खबर लहरिया सदर सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या ४ लेखांचा आधार घेऊन महत्वपूर्ण मांडणी करतात. समाज घटकांच्या उन्नतीसाठी काम करत असताना प्रत्येकाने निवडलेला मार्ग वेगळा, पद्धत वेगळी आहे मात्र उद्दिष्ट एक आहे. सुरुवातीपासून काम करणारी पिढी आणि नव्याने काम करू इच्छिणारी पिढी यांमध्ये संवाद साधने गरजेचे आहे असे ते नमूद करतात. सामाजिक प्रश्न सोडवताना विशिष्ट पद्धत अथवा प्रणाली व्यवस्थापन हाताळले पाहिजे आणि हे करत असताना परस्पर सहकार्यातून, सामूहिक प्रयत्नातून प्रश्न सोडवले पाहिजेत यावर ते भर देतात जे की महत्वाचे आहे.
पर्यावरण अथवा निसर्गाचे संवर्धन हा विषय अराजकीय, असामाजिक विषय म्हणून बहुतांशवेळा बघितला जातो. मात्र कल्पवृक्ष या संस्थेच्या कामामुळे आणि हस्तक्षेपामुळे पर्यावरण संवर्धन हा राजकीय तसेच सामाजिक विषय असून संशोधनाच्या माध्यमातून उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून असलेले लोक, प्राणी आणि मोठ्या विकासाच्या प्रकल्पातून उद्भवणारे प्रश्न जसे की, पुर्नवसन, स्थलांतर, उपजीविकेचा प्रश्न इत्यादी महत्वाच्या बाबींना वाचा फोडण्याचं काम कल्पवृक्ष या संस्थेने केले आहे. लता प्र. म. यांनी कल्पवृक्ष संस्थेच्या कामाविषयी लिहिताना अधोरेखित करतात कि, निसर्गप्रेमींनी केवळ निसर्गाचा आनंद सुट्टीच्या दिवशी लुटणे असा मर्यादित दृष्टिकोन न राहता एक जबाबदारी बनते. जमिनीवरील आंदोलन / चळवळीमध्ये उतरून प्रश्न समजून घेण्यास कल्पवृक्ष अवकाश उपलब्ध करून देतो. निसर्गाशी नाते जोडत लोकसहभागातून संशोधन व लोकांच्या प्रश्नांवर स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जन वकालत करण्याचे काम कल्पवृक्ष संस्थेने केले आहे. आणि त्यातून पर्यावरणाचे सामाजिक आणि राजकीय आयाम दाखवू दिले आहेत.

साधना व्हिलेज या संस्थेविषयी अश्विनी कुलकर्णी यांनी लेख लिहिला आहे. संस्थेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींशी मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा प्रवास समजून घेताना कुलकर्णी नमूद करतात की, अपंगत्व व्यक्तींना परिघाबाहेर ढकलते मात्र साधना व्हिलेज प्रौढ मतिमंदांसाठी 'घरटे' उभारून त्यांना विशेष मित्राचा दर्जा देत त्यांच्यातील माणूसपण बघते. प्रौढ मतिमंदांचे घर - पद्धतीनं पुनर्वसन त्यांच्या शारीरिक, मानसिक क्षमतेनुसार त्यांना विविध कामं शिकवून आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि मुख्यप्रवाहत आणण्याचं काम साधना व्हिलेज कडून केलं जात आहे. या लेखातून मतिमंद आणि मनोरुग्णांचे प्रश्न मुख्यप्रवाहात आणून लोकचळवक उभी करण्याची आवश्यकता आहे यावर भर देण्यात आला आहे.

सीफार संस्था ' माध्यमं' वकालतच्या माध्यमातून वंचित समाज विशेषतः महिला, मुले, एच आय व्ही, लैंगिक अल्पसंख्याक, सेक्स वर्कर्स याचे प्रश्न, जीवन, समस्या मुख्यप्रवाहात आणते. जन वकालत जशी महत्वाची आहे तशीच प्रसिद्धी माध्यमातून होणारी वकालत महत्वाची आहे. यातून वंचित समूहांविषयी एक सकारात्मक दृष्टिकोन वापरून समाजात जनजागृती निर्माण केली जाऊ शकते आणि शासनावर दबाव आणून धोरणात्मक उपाय करण्यास भाग पडता येते. संयोगिता ढमढेरे नमूद करतात की, सीफार संस्था वंचित समाज, माध्यमं आणि प्रशासन यातील दुवा म्हणून काम करते. वंचितांना सन्मानाने जगता याव यासाठी माध्यमातून वकालत करून अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता येतात. ' माध्यमं' वकालत पद्धत प्रभावी साधन असून शासनाशी संवाद करून काही धोरणात्मक बदल करण्यास यश आल्याचे लेखिका नमूद करतात. हा लेख वाचून समजते की, सतत नवनवीन प्रयोग / पद्धती वापरून समस्या सोडवता यशस्वरीत्या सोडवता येतात.
ओंकार तुळसुळकर हे चेतना संस्थेच्या योगदानाबद्दल लिहिताना नमूद करतात की, अन्याय - अत्याचाराच्या कोंडीत सापडलेल्या महिलांना आधार आणि आत्मविश्वास देण्याचं काम चेतना महिला विकास करते. कौटुंबिक कलह आणि स्त्रियांची होणारी छळवणूक याविरोधात आवाज आठवून स्त्रियांना समाजामध्ये सन्मानाने जगता यावं यासाठी वकालत करते. तर असुंता पारधे या चेतनाचा प्रवासाबाबत सांगताना अधोरेखित करतात की, बरेचदा स्त्रिया कुटुंबिक हिंसा झाल्यानंतर तक्रार नोंदवतात मात्र कोर्टात केस गेल्यानंतर तारखांना येण्यासाठी स्त्रिया टाळाटाळ करतात. यामागचे कारण सांगताना पारधे ह्या सामाजिक दबाव, आर्थिक भार स्त्रियांवर असल्याने त्या जास्त काळ तग धरू शकत नाही. न्यायालयीन प्रक्रिया ही दीर्घ काळ चालणारी असते आणि स्त्रियांना नेहमीच पाठींबा मिळेल असे नाही तसेच पितृसत्ताक मानसिकता, कुटुंबियांचा दबाव यामुळे स्त्रिया निराश होतात. ह्यावर मार्ग काढण्यासाठी पारधे यांनी चेतना संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांना कायदेविषयक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ज्या स्त्रियांची प्रशिक्षणे झाली त्यांचा गट बनवून कायदे सल्ला व सहाय्य्य केंद्र सुरु केली यातून इतर गरजू स्त्रियांना कायदेविषयक आणि त्यांच्या हक्कांविषयी माहिती दिली जाते. चेतना संस्था केवळ कायदेविषय ज्ञान इथपर्यंतच मर्यादित राहिली नाही तर स्त्रियांचा राजकीय निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढावा, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये स्त्रियांनी यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याचप्रमाणे सामाजिक विषयांना हात घालून सामाजिक, धार्मिक सलोखा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न देखील चेतना संस्थेने केले.

सायली स. प्र. या स्वच्छ या संस्थेविषयी बोलताना नमूद करतात की, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेने कचरा वेचक लोकांना कामगार म्हणून ओळख निर्माण केली. पुनर्निर्मिती योग्य मालावर कचरा वेचकांचा अधिकार असतो आणि त्याच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न त्यांचे असते अशी भूमिका ही संघटना घेते. मात्र यातून कचरा वेचक यांच्या राहणीमानात काय बदल झाला? ते करत असलेल्या कामाला दर्जा मिळाला का? याविषयी फारसं भाष्य करत नाही. केवळ कामगारांची मुलं शिक्षण प्रवाहात आल्याचे लेखिका नमूद करतात. तसेच स्वछ कडून कचरावेचकांना शाश्वत रोजगाच्या नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असते आणि त्यातून विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगतात.
वृद्धांचे प्रश्न आणि आपली सामाजिक जबाबदारी या शीर्षकाखाली लिहिलेल्या दिलीप शिंदे यांच्या लेखात वृद्धांच्या शारीरिक आरोग्यबाबत जशी सजगता दाखविली जाते तशेच मानसिक आरोग्याबाबत दाखवली जावी असे सांगतात. त्याचप्रमाणे वृद्धाश्रम कडे कलंक / वाईट बाब म्हणून न बघता त्याचा संवेदनशीलपणे स्वीकार करावा आणि वृद्धांच्या गरजांकडे लक्ष द्यावे. वृद्धांचा मुद्दा बऱ्याचदा हाताळला जात नाही मात्र शिंदे यांनी तो अगदी संवेदनशील पद्धतीने हाताळलेला दिसून येतो.
अन्नदाता सुरक्षित अन्न चळवळ यार्फत सेंद्रिय शेतीचा प्रचार करण्यात येतो असे गीता देशमुख नोंदवता. एकंदरीत अन्नाचा दर्जा कमी झाला असून विषारी अन्न लोक खात आहेत आणि कीटकनाशकांचा वापर करून शेतकऱ्यांना देखील फायदा होत नाही आणि जमीनाचा पोत बिघडला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती हा आताच्या घडीला उत्तम पर्याय असल्याचे लेखिका म्हणतात. अन्नदाता चळवळीच्या अंतर्गत ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधून सक्षम विक्रीव्यवस्था निर्माण करण्यावर भर देता येतो असे देशमुख नमूद करतात.
.png)
डॉ. सुचेता धामणे या समाजामध्ये मनोरुग्ण महिला आणि त्यांनी जन्म दिलेल्या मुलांसोबत काम करतात. इंद्रधनू प्रकल्पांतर्गत ज्या स्त्रिया संस्थेमध्ये राहत आहेत त्या कोणत्या ना कोणत्या अत्याचाराच्या बळी पडलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे समुपदेशन करून त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली जाते. मनोरुग्ण आणि हिंसा यांचा जवळचा संबंध असल्याचे धामणे यांच्या लेखातून अधोरेखित होते आणि योग्य पाठींबा आणि उपाययोजना अवलंबून पीडित महिलांना आधार देता येतो हे इंद्रधनू प्रकल्पातून समोर येते.
क्षितिजा यांनी पारोमिता गोस्वामी यांच्या प्रवासाविषयी लेखामध्ये लिहिताना नमूद केले आहे की, पीडित व दुर्बल वर्गाला सक्षम करण्यासाठी आपला प्रांत व आपली माणसे सोडून परक्या प्रदेशात कायमचे वास्तव्य करणारे ध्येयवेडे कार्यकर्ते क्वचितच आढळतात. या विरळ कार्यकर्त्यांमध्ये पारोमिता यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. मूळच्या बंगालच्या पारोमिता आदिवासी प्रश्नांशी जोडल्या गेल्या आणि आदिवासींसोबत काम करण्यासाठी चंद्रपूर, महाराष्ट्र याठिकाणी आल्या. त्यांनी श्रमिक एल्गार संघटना स्थापन करून आदिवासी समूहाचे जमीन हक्क, अल्पभूधारक यांचे प्रश्न याला हात घातला. त्याचप्रमाणे दारूबंदी साठी भव्य असा मोर्चा चंद्रपूर ते नागपूर पर्यंत काढला. हे करत असताना शासनाची दारूबंदी बाबतची उदासीनता, पितृसत्ता, हिंसा आणि दारू यांचा जवळचा असलेला संबंध त्यांनी त्यांच्या कामातून दाखवून दिला आहे.
.png)
विविध क्षेत्रात काम करताना संस्थांमध्ये संवादाचा पूल बांधून एकत्रितपणे आपल्या अनुभवांची व साहित्याची मोकळेपणाने देवाणघेवाण करून परस्परांकडून शिकण्याची उत्तम संधी 'विकल्प' ही संस्था उपलब्ध करून देते. अनुराधा अर्जुनवाडकर विकल्प संस्थेच्या कामाविषयी मांडणी करताना सामाजिक जाळ्यांमधून विचारांची, डावपेचांची देव घेण होऊ शकते यावर भर देतात.
अग्निपंख: युवकांचं गाणं गाणारी संस्था ह्या लेखाच्या माध्यमातून विद्या सुप्रिया रावसाहेब यांनी अग्निपंथ या पुणे स्थित विद्यार्थ्यांच्या संस्थेविषयी लिहिले आहे. या संस्थेच्या स्थापने मागचा उद्देश हा तरुण विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांचा उहापोह चर्चा करून त्यावर कृती करणे हा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्ष या चौकटीमध्ये अग्निपंख संस्था काम करते. विविध महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी एकत्र येऊन चालू घडामोडीवर केवळ वैचारिक कार्यक्रम न घेता सांस्कृतिक मनोरंजनक कार्यक्रमही घेते. गटचर्चा, चित्रकला, कविता, पुस्तक प्रकाशन, लेखन, गाणं गाणे, पथनाट्य इत्यादी गोष्टींसाठी अग्निपंख एक अवकाश निर्माण करतो. शोषणाची संरचना मोडीत काढण्यासाठी तरुण पिढी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते हे अग्निपंख यांच्या कामातून दिसून येते.
थोडक्यात, साऱ्याजणींचं 'खबर लहरिया' च्या माध्यमातून विविध संस्था / संघटनांचे काम समोर आले. संस्था उभ्या राहताना विशिष्ट विषयाला हात घालून काम करतात. मात्र खबर लहरिया या सदारांतर्गत अनेक लेख वाचताना लक्षात येते कि, बऱ्याच संस्था ह्या स्वतःचा अवकाश वाढवून इतर स्थानिक मुद्द्यांना हात घालून काम करत आहे आणि स्वतःची कार्यकक्षा रुंदावत आहेत. सदरा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले विविध लेख वाचून आपल्याला समाजामध्ये काम करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणते डावपेच आखावेत याची कल्पना येते. बहुतांश लेखक / लेखिका संस्था किंवा ज्या समूहाबाबत मांडणी केलेली आहे त्याचा भाग असल्यामुळे त्यांची निरीक्षण आणि प्रश्नांची जाण चांगली आहे. यामुळे संस्था म्हणून चा प्रवास, अंतर्गत प्रक्रिया, समूहांचे प्रश्न आणि लोक सहभागातून त्यावर शोधलेले उपाय, डावपेच समोर आणण्यास मदत झाली. यामुळे या सदराच्या माध्यमातून मिळून साऱ्याजणीनी एक अवकाश उपलब्ध करून दिला जिथे तळागाळात काम करणारे लोक आणि वाचक हे एकमेकांशी संवाद साधतील, कामाची आणि विचारांची देवाण घेवाण करतील.
मिळून साऱ्याजणीं या मासिकाने सदर प्रकाशित करताना काही लेखांमध्ये अधिकची माहिती जसे कि, लेखकांनी लिहिलेल्या विषयाशी संबंधित इतर अभ्यास अथवा अहवाल यांचाही संदर्भ दिलेला दिसून येतो. यामुळे इतर जिज्ञासू अभ्यासक / वाचक यांना अधिकची माहिती मिळते. त्याचप्रमाणे लेख प्रकाशित करताना माहिती आणि छायांचित्र पद्धतीचा वापर केल्याने वाचकास संस्थेचे काम वाचत असतानाच छायाचित्रांच्या मदतीने तेथील काम अनुभवण्यास मिळते. बऱ्यापैकी भौगोलिक प्रदेश आणि तेथील संस्था व त्यांच्या कामाचा व्यापकरीत्या समावेश लेखांमध्ये करण्यात आला आहे.