साऱ्याजणींचं 'खबर लहरिया' भाग ३

०१ जुलै २०२२

वर्तमानपत्र, मासिकं ह्या ठिकाणी नेहमी एक सदर चालू असतं. म्हणजे लेखांची एक मालिकाच चालू असते. अश्या सदरांची गरज काय? अस ही प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल पण ह्या सदरांतुनच एका विषयाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला समजतात. कोणताही विषय घेतला तर आपल्या लक्षात येतं की ह्या कडे एकाच बाजुने बघणे म्हणजे त्या विषयाला निटसा न्याय न देण्यासारखंच आहे. आणि अश्या विषयांना न्याय देण्याचे आणि त्यांच्या वेगवेगळ्या बाजु आपल्या वाचकांसमोर आणण्याचे काम ह्या मिळून साऱ्याजणींतील सदरांनी केले आहे. अश्या ह्या सदरांची अखंड चालणारी मालिका हे अजुन एक मिळुन साऱ्याजणी चे अजुन एक वैशिष्ट्य आहे. तर ग्रहणांकित चांदणं, मध्ये कामना आणि प्रेरणा,संवाद स्पंदन, ह्या सारख्या सदरांतुन कायदा,लैंगिकता, घरकाम, अपगंत्व, कथा ह्या वर असणाऱ्या सदरांचा त्यांच्या विषयांचा आढावा घेणारा “साऱ्याजणींचं 'खबर लहरिया” हा लेख संध्या गवळी ह्यांनी लिहिला आहे.

**

घरकामाचा गोष्टी

घरकामाचा गोष्टी हे सदर जानेवारी २०१४ रोजी सुरु करण्यात आले. या सदरामध्ये घरकाम या अतिशय महत्वाच्या मात्र फार चर्चिले न गेलेल्या अथवा स्त्रियांचं काम म्हणून अवमूल्यन केलेल्या विषयास वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. २०१२ मध्ये गृहिणी असणाऱ्या स्त्रियांना पतीच्या उत्पन्नातील वीस टक्के उत्पन्न घरकामाचा मोबदला म्हणून देण्यात यावा असा प्रस्ताव तत्कालीन महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती कृष्णा तीरथ यांनी मांडला. या प्रस्तावानंतर विविध स्थरावर चर्चा झाली. मिळून साऱ्याजणीने ह्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा घडवून आणली त्याचा एक आढावा. या सदरांतर्गत एकूण ११ लेख प्रसिद्ध झालेले असून त्यामध्ये ७ लेख हे उच्च - मध्यम जात, वर्ग आणि उच्च शिक्षित शहरी भागातील स्त्रियांनी लिहिलेल्या लेखांचा / मुलाखतींचा समावेश आहे तर व २ लेख पुरुषांनी व सप्टेंबर २०१४ च्या लेखामध्ये ३ पुरुषांनी आपली घरकामाविषयीची मते मांडलेली आहेत. बहुतांशी पुरुष हे उच्च शिक्षित, उच्च जातीय / वर्गीय सामाजिक स्थानातून येतात. तर डिसेंबर २०१४ चा लेख मिळून साऱ्याजणी च्या प्रतिनिधीने लिहिलेला असून घरकामाविषयी झालेल्या चर्चेचा आढावा त्या लेखामध्ये घेण्यात आलेला आहे.

संहिता जोशी आणि मेघना भुस्कुटे या दोन तरुणी घरकामाविषयी बोलताना महत्वाच्या बाबी नोंदवतात. यामध्ये संहिता ह्या घरकामाकडे अनुत्पादक, ज्यातून कोणतेही मूल्य मिळत नाही, फारसा आनंद होत नाही आणि कामात तोच-तोचपणा असतो त्यातून नवीन काही शिकायला मिळत नाही. त्यामुळे संहिता यांना वाटते की, जर घरकामाला मूल्य म्हणजेच पैसे दिले तर स्त्रियांना याचा फायदा होऊ शकतो आणि जी व्यक्ती घरामध्ये पैसे कमावते त्या व्यक्तीने ते पैसे द्यावे असे त्या नमूद करतात. त्याचबरोबर त्या केवळ आर्थिक मूल्य मिळत नाही म्हणून कोणतेही काम निकृष्ठ दर्जाचे होत नाही असे मांडतात. तर मेघना भुस्कुटे या घरकामाविषयी आपले मत मांडताना नमूद करतात की, घर सुरळीत चालण्यासाठी जे जे करावं लागतं त्या सर्व कामांचा घरकामामध्ये समावेश होतो मात्र त्या स्वतः स्पष्टपणे घरकामाला उत्पादक क अनुत्पादक या काळ्या पांढऱ्या यादीमध्ये टाकत नाही. त्यांच्या मते, घरकामाला जर आर्थिक मूल्य दिले तर सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन आर्थिक पद्धतींनी करण्याचा पायंडा पडेल आणि काम करणाऱ्या माणसाबद्दल ची कृतज्ञता संपेल. त्याचप्रमाणे केवळ आर्थिक मूल्य दिले म्हणून घरकामाच्या जबाबदारीतून अलगद लोक बाहेर पडतील. त्यामुळे आर्थिक निकष हा घरकामासाठी श्रेष्ठ नाही असे त्या नोंदवतात. दोघीजणी कामामध्ये आनंद, शिकवण, व्यापक दृष्टिकोन, दर्जा उंचावणे हे निकष कामाला श्रेष्ठ ठरवताना लावले जावे असे सांगतात. दोघीजणी घरामध्ये जमेल तशी आणि आवडणारी कामे करतात मात्र जी कामे आवडत नाही ती दुय्यम वाटतात पण काही पर्याय नसेल तर कामं निभावून नेण्याकडे जादा कल असतो असे मेघना नोंदवतात. दोघीजणी आर्थिकदृष्टया स्वावलंबी आहेत आणि घरकामात आवडीनुसार काम करतात मात्र ज्या स्त्रियांना काही घरकाम करताना पसंती, नापसंती असे पर्यायच नसतात त्यांचं काय? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. कोणत्याही कामात सन्मान जपता आला पाहिजे. कामाला एक प्रतिष्ठा असणे आवश्यक आहे.

मुळात पितृसत्ताक समाजात घरकाम हे स्त्रियांचे काम समजले जाते त्यामुळे स्त्रियांना गृहीत घरून काम करायला सांगणे हे ओघाने येते. मृणाल जोशी ह्या घरकामाविषयी लिहिताना नमूद करतात की, पुरुषांना घरकामाविषयी आणि स्त्रियांच्या कष्टाची कदर नसते. स्त्रिया जरी नोकरी करणाऱ्या असल्या तरी तिची प्राथमिक जबाबदारी घर म्हणून पाहिजे जाते त्यामुळे स्त्रियांवर दुहेरी कामाचा भर पडतो. त्यामुळे घरातील जबाबदारी वाटून घेण्याची गरज आहे.

भारती मोरे यांने पॉकेटमनी अशी एक छोटीशी कल्पना सुचवून स्त्रियांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावे आणि ते त्यांच्या वैयक्तिक खर्चाचे, कुणीही त्या पैशाच्या विनियोगाबद्दल जाब न विचारता देण्याची गोष्ट अशी मांडणी करतात. भारती आपलं मत मांडण्यासाठी नाटकीय संवादाचा वापर करतात. सासू सुनेच्या संवादातून सुचलेली ही कल्पना मोरे वाचकांसमोर ठेवतात. बहुतांशी स्त्रियांना संसार करत असताना परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं त्यामुळे त्यांच्या अपेक्षा, स्वप्न मागे पडतात हे दाखवण्याचा प्रयत्न मोरे या लेखातून करतात.

किरण मोघे आपल्या लेखात नमूद करतात की, पुण्यात १ जून २०१४ रोजी सीटू ह्या केंद्रीय कामगार संघटनेने घरकामगारांची राज्यव्यापी मागणी परिषद भरवली होती. त्यामध्ये ७५० कामगार स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. घरकामगारांविषयी धोरण राबविताना शासनाची अनास्था दिसून येते. ह्या परिषदेत घरकामगार महिलांना कामगार म्हणून दर्जा न मिळण्यामागे कामगारांची संक्षिप्त आणि तोकडी व्याख्या केल्याने या स्त्रियांचा कामगार या संकल्पनेत समावेश होत नाही असे मत अजित अभयंकर यांनी मांडले. घरकामगारांच्या श्रमाची नोंद झाली पाहिजे तसेच पेन्शनची सोया व्हावी अशी मागणी या परिषदेमध्ये करण्यात आली. किरण मोघे नमूद करतात की, घरकामगार स्त्रियांचा लढा हा आर्थिक शोषणाविरुद्ध तसेच आत्मसन्मानासाठी देखील आहे. त्यामुळे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी सेवाशर्ती निश्चित होणे गरजेचे आहे. सरकाने घरकामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे असे नमूद केले आहे. किमान वेतन आणि इतर सोयी सुविधा (पाळणाघर, अन्न सुरक्षा कायदा, अंत्योदय कार्ड) लागू करण्यात यावे अशी मोघे यांनी या परिषदेमध्ये मागणी केली. अत्यंत महत्वाच्या प्रश्नांना ह्या परिषदेमध्ये हात घालण्यात आला आणि ठोस अशा मागण्या शासनासमोर मांडण्यात आल्या.

आर्थिक संकटामुळे कुटूंबातील दोन्ही दाम्पत्यांना नोकरी करणारे सध्याच्या काळामध्ये गरजेचे बनले आले. अशावेळी लहान मुलाकडे दुर्लक्ष होते आणि त्याच्या भावनिक गरजेकडे लक्ष दिले जात नाही. अशावेळी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना अर्धवेळ नोकरी करण्याचा ऐच्छिक अधिकार दिला तर स्त्रियांना याचा फायदा होईल असे मत रवींद्र गोरे मांडतात. त्याचप्रमाणे पुरुषांना देखील अशी सुविधा देण्यास हरकत नाही. आर्थिक परिणामांचा विचार करून पुरुषही अर्धवेळ नोकरीच्या सवलतीमध्ये सहभागी होऊ शकतात असे गोरे सुचवतात. मात्र ते येथे पुरुषांना आर्थिक गणित बघून ते करू शकतात असे नमूद करून स्त्रियांची प्राथमिक जबाबदारी घर आणि मूल अशीच राहते असा त्याचा अर्थ निघतो तसेच ते घरकाम करताना कोण काय काम करेल? किती जबाबदारी घेईल याविषयीही फारसं बोलत नाहीत. यातून स्त्रियांचे दुय्यमत्व आणखीन मजबूत होण्यास वाव मिळतो. अनुराधा मोहनी घरकामाविषयी मांडणी करताना यांत्रिकीकरणामुळे घरकाम करताना श्रम कमी झाले असले तरी घरकाम ही स्त्रियांची जबाबदारी आहे ही भावना बदलली नाही. मोहनी मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग नेहमी होतोच असे नाही असे नमूद करतात. समतेचे तत्व आपल्या संस्कृतीत नाही त्यामुळे ते अंगीकारावी लागेल. सर्वांना घरकाम शिकवले जाणे महत्वाचे आहे हे मोहनी नमूद करतात.

घरकामाविषयी पुरुषांची मते जाणून घेणे देखील आवश्यक आहे. घरकाम सदरांतर्गत तीन पुरुषांनी आपापली मते व्यक्त केली. तिघेही उच्च जातीय, शहरी भागातून भागातील आहेत. संतोष वझे आपले मत मांडताना नमूद करतात की, वस्तूंचे वा सेवांचे विनामोबदला उत्पादन म्हणजे घरकाम. माणसाने स्वतःच्या सोयीसाठी कामांची उत्पादक आणि अनुत्पादक अशी वर्गवारी केलेली आहे आणि घरकामासाठी आर्थिक निकष लावणे अवघड आल्याचे ते नमूद करतात. मात्र वझे हे घरकामाकडे समाधानाची बाब म्हणून बघतात. ते स्वतः घरकाम करतात आणि त्यातून त्यांना समाधान मिळते. मात्र ज्यांना काम सक्तीने, आवड नसताना करावे लागते त्याचं काय? हा प्रश्न अनुत्तरीकच राहतो. तर अरुण जोशी घरकामाला आर्थिक मूल्य असावे यावर भर देतात आणि घरातील अर्थाजन करणाऱ्या व्यक्तीने ते मूल्य / पैसे द्यावे असे ते नमूद करतात. मात्र जे अर्थाजन करत नाहीत, ज्या स्त्रिया एकल माता आहेत त्यांचं काय? याविषयी ते भाष्य करत नाहीत. पुढे ते नमूद करतात की, केवळ घरकामाचे मूल्य (महत्व) ठरवताना आर्थिक निकष हा एकच नसून भावनिक आणि जैविक देखील आहे असे ते नमूद करतात. ते स्वतः घरकाम करतात. त्यांच्या रुचीनुसार काम करतात, स्वयंपाक करत नाहीत, दुय्यम वाटणाऱ्या कामाला नकार देतात. घरकामात कोणतं काम करायचं? किती करायचं हे स्वतःच्या कालानुसार त्यांनी ठरवलेलं आहे.

ऋषिकेश दाभोळकर हे आपले मत मांडताना नमूद करतात की, घरकाम हे उत्पादक असून त्याला आर्थिक मूल्य हा कामाच्या श्रेष्ठत्वाचा निकष नाही. घरकामाला पैसे दिले तर घरकाम अर्थार्जन करणाऱ्या व्यक्तीने घरकाम करूनच नये हे रूढ होण्याची शक्यता दाभोळकर दर्शवतात. त्याचप्रमाणे लेखाच्या शेवटी ते लहानपणापासून मुलांना घरकाम शिकवले पाहिजे आणि ते स्वतः हा प्रयोग आपल्या लहान मुलावर करत आहेत.

राजेश घासकडवी हे घरकामाबद्दल मांडणी करताना बायको आणि नवरा या दोघांना उत्पादनाचं एकक म्हणून बघतात. त्यांच्या मते, समकालीन परिस्थितीमध्ये (सामाजिक, आर्थिक) बदल झाल्यामुळे स्त्री व पुरुष हे बहुतेक ठिकाणी एकमेकांची कामे करू शकतात. त्यामुळे घरकाम आणि बाहेरचं काम ही विभागणी टाकून देऊन कुठली काम करायची आणि त्यांची विभागणी कशी करायची यावर भर द्यायला हवा. दोघांच्या काम करण्याच्या क्षमता वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घेऊन घरकाम हे आऊटसोर्सिंग केलं जाऊ शकतं. आणि क्षमतेप्रमाणे काम वाटप केल्यामुळे स्त्री - पुरुष भेदभाव कमीतकमी होण्यास हातभार लावला जाऊ शकतो. लेखाच्या शेवटी घासकडवी घरकामामध्ये केलेला बदल हा स्त्रीमुक्ती अथवा पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व कमी करणं ह्या दृष्टीतून ना बघता आपल्या कुटुंबासाठी आणि ते सर्वोत्तम चालण्यासाठी हे बदल करावेत असं सुचवतात. घासकडवी घरकामाचा मुद्दा व्यापक स्वरूप न बघता त्याला कुटुंबापुरता मर्यादित करतात. त्याचप्रमाणे सर्व लोक कामाचे औटसोर्सिंग करू शकत नाही त्याचप्रमाणे इतर पुरुष लेखकांनी त्यांच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे त्यांना ज्या कामात जास्त आनंद मिळतो ती कामे ते करतात. तर ही 'ठरवण्याची / निवड' करण्याची संधी त्यांना पुरुष असल्यामुळे मिळते हे विसरून चालणार नाही.

एकंदरीत वैयक्तिक पातळीवर बदलाच्या भूमिकेत हे पुरुष असलेले दिसून येतात मात्र जो पर्यंत शोषक पितृसत्ताक संस्कृती झुगारून घरकामाची विभागणी, पुरुषांचा सहभाग यावर जो पर्यत ठोस पावलं उचलली जात नाही तो पर्यंत हवा तसा सकारात्मक बदल होणार नाही. त्याचप्रमाणे बेल हुक्स ह्या काळ्या स्त्रीवादी अधोरेखित करतात त्याप्रमाणे जो पर्यंत घरकाम हे रटाळ, कंटाळवाणे आहे ही भावना जो पर्यंत स्त्रिया आणि इतर लोक नाकारत नाही तो पर्यंत बदल घडणार नाही.

अर्चना मोरे या घरकाम करणाऱ्या महिलांच्या सामाजिक परिस्थितीविषयी थोडक्यात मांडणी करतात. त्यांच्या मते, शरीरश्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. अनेक घरामध्ये घरकामगार महिलांमुळे कामाचा भर कमी झाला आहे. मात्र घर मालकीण फारसा घरकामगार स्त्रियांचा विचार करत नाहीत. घरकामगारांना सुट्ट्या नाकारल्या जातात अथवा कधी सुट्टी घेतली तर दुसऱ्या दिवशी जास्तीचे काम करावे लागते. त्याचप्रमाणे कामावर भेदभावाची वागणूक मिळते. मोरे या लेखातून घरकामगार स्त्रियांना हक्काची सुट्टी असावी यावर भर देतात. तसेच शासनाकडून ठोस पाऊले उचलली जावी असे नमूद करतात. पुणे शहरातील घरकामगार महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केलेल्या संघटनेविषयी लिहिताना नमूद करतात कि, मोलकरीण संघटना ही केवळ मोलकणींचे कामाशी संबंधित प्रश्न सोडवत नाहीत तर कौटुंबिक हिंसाचार, स्थानिक पातळीवरच्या प्रश्नांना देखील हात घालतात. घरकामगार स्त्रियांना संघटित करण्याचे काम ही संघटना करते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून मोलकरणी जीवन जगत असतात मात्र कामगारांविषयी शासनाची एकंदरीत उदासीनता दिसून येते आणि घरकामगार स्त्रियांना काहीच सवलती मिळत नाहीत ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे मूळ पितृसत्ताक रचनेला धक्का दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही हे नक्की.

कायदा आणि साहित्य

कायदा आणि साहित्य हे सदर २०१२ रोजी सुषमा देशपांडे यांनी सुरु केलेली आहे. या सदरांतर्गत एकूण - लेख लिहिण्यात आलेले असून सर्व लेख हे सुषमा देशपांडे यांनी लिहिलेले आहेत. बहुतांशवेळा कायदा आणि साहित्याचा एकत्र विचार केला जात नाही. कायद्याची चौकट ही क्लिष्ठ आणि तांत्रिक असते तर साहित्य दैनंदिन जीवनात आपण जोडले जाऊ, सोपी भाषा वापरून केले लिखाण असते. मात्र जेव्हा आपण कायदा आणि साहित्य यांचा एकत्र विचार केला तर काय शक्यता निर्माण होतात ह्याविषयी मांडणी यामध्ये करण्यात आलेली आहे.

देशपांडे अधोरेखित करतात कि, साहित्यातून बरेचदा सामाजिक विषयक कायद्याच्या चौकटीत मांडलेले दिसून येतात. आणि हे दाखवून देण्यासाठी त्या मराठी साहित्यातील काही निवडक नाटकांचे दाखले देतात. मार्च २०१३ साली लिहिलेल्या लेखामध्ये तो मी नव्हेच, शांतता! कोर्ट चालू आहे इत्यादी नाटकांचा दाखल देत नमूद करतात कि, साहित्याच्या माध्यमातून कायदेशीर बाजू मांडल्या जातात आणि यावर प्रेक्षक सहजपणे कायदेशीर बाजूची चर्चा करतात. तेंडुलकर यांचे उदाहरण देऊन देशपांडे नमूद करतात कि, न्यायालयाच्या माध्यमातून तेंडुलकर सामाजिक विचारसरणी, समाजाने स्वीकारलेली खोटी मूल्ये, समाजाचा दुटप्पीपणा यावर टीकात्मक भाष्य करतात व साहित्य ही टीका करायला अवकाश निर्माण करून देते. कायद्याची भाषा नेहमीच किचकट स्वरूपाची समजली जाते मात्र ज्यावेळी कायद्याला साहित्य स्वरूपात (नाटक, पुस्तकं, लेख) मांडला अथवा समजून सांगितला जातो तेव्हा तो सामान्यांपर्यत अगदी सहज पोहचतो. अशाच एका कायदेशीर बाबींविषयी लिहिलेल्या अखेर न्याय मिळाला हे ऍड. नीलिमा कानेटकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाची ओळख करून देताना देशपांडे नमूद करतात की, कौटुंबिक कलहाबाबत कायद्याच्या तरतुदी काय आहेत याविषयी हे पुस्तक भाष्य करत. त्यामध्ये कौटुंबिक हिंसा, अपत्यासंबंधीचे निकाल, पोटगी व मालमत्तेवर हक्क, अन्य धर्मातील घटस्फोट, लैंगिक संबंध, मातृत्व/ गर्भपात, 'पतीला न्याय मिळाला' असे अनेक विषय हाताळले आहेत. कायदा हा स्त्रियांच्या बाजूने असतो या मिथकाला ह्या आव्हान देत सोप्या भाषेत कायद्याची ओळख हे पुस्तक करून देतं.

स्वनिम च्या शोधकथा

स्वनिम च्या शोधकथा हे सदर २०१२ साली डॉ. श्यामला वनारसे यांनी सुरु केले आहे. या सदरांतर्गत एकूण -- कथा प्रकाशित झाल्या असून या कथांवर वाचकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया / प्रतिसाद नोंदवला आहे. स्वनिम च्या शोधकथांमध्ये प्रतिसाद नोंदवलेले आणि प्रसिद्ध झालेले प्रतिसाद हे बहुतांशी शहरी उच्च जातीय व वर्गीय स्त्रियांनी लिहिलेले आहेत. स्वनिम ह्या शब्दाचा या शब्दाचा अर्थ सांगताना वनारसे नमूद करतात कि, स्वतंत्रता, निर्धारक्षमता आणि ममता यांच्या मिश्रणातून तयार झालेला शब्द आहे. जो व्यक्तीला मुक्तीची वाट दाखवताना मार्गदर्शन करतो आणि धोक्यापासून दूर ठेवतो. या सदरामध्ये दर महिन्याला एक अशा दोन प्रसिद्ध केल्यानंतर वाचकांचा कथेबाबतचा प्रतिसाद प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे लेखक आणि वाचक यांच्यामध्ये एक संवादाची प्रक्रिया दिसून येते. वाचकांनी कथेमध्ये काय आवडले? काय खटकले हे नमूद केलेले आहे. त्याचप्रमाणे सुषमा दातार या प्रतिसाद देताना अधोरेखित करतात कि, लिहिलेल्या कथा ह्या समकालीन परिस्थितीशी जोडून भाष्य करतात त्यामुळे समाजातील बदल आणि समाजाची समजुतीची असमर्थता अचूक दिसून येते. या सदरामध्ये लेखक आणि वाचक यांच्यामध्ये वाढावा यावर आलेला आहे आणि त्यामुळे केवळ वाचकांचे प्रतिसाद मागवून हे सदर थांबत नाही तर ते प्रसिद्ध करून इतर वाचकांसमोर ठेवले जाते.

वनारसे ह्या वनशा ह्या व्यक्तीची कथा सांगतात. रानात स्वच्छंदी आयुष्य जगणारा वनशा जेव्हा भौतिक साधने मिळवतो आणि श्रीमंत होतो तेव्हा प्रगतीच्या नादात स्वतःला काय हवं आहे? कशात आनंद मिळतो हेच विसरून जातो. त्यामुळे भौतिक सौंदर्याबरोबरच आत्मिक सौंदर्य असणे आवश्यक आहे. लेखिका इथे सुचवू पाहतात कि, अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी प्राणिमात्रांबद्दल प्रेम आणि ममता लागते त्याशिवाय तुम्ही आनंद उपभोगू शकत नाही. या कथेला प्रतिसाद देताना डॉ. माधवी देसाई नमूद करतात कि, कथेमध्ये वनशा याच्या कुटुंबाचा व स्त्रियांचा उल्लेख रानात कष्ट करताना येतो मात्र भौतिक प्रगती झाल्यावर दिसून येत नाही. प्रगती झाल्यावर घरातच कष्ट उपसतात अथवा नोकरांकडून काम करवून घेतात. येथे वाचक आर्थिक सुबकता आल्यावर स्त्रिया कशा सार्वजनिक अवकाशातून खाजगी अवकाशात ढकलल्या जातात हे नमूद करतात.

आशा साठे या आपल्या प्रतिसादामध्ये नमूद करतात कि, स्वनिम चा उपक्रम नाविन्यपूर्ण विचार करायला लावणारा आणि मजेशीर आहे. साठे यांच्या प्रतिसादातून असे लक्षात येते कि, या सारख्या उपक्रमातून वाचक आणि लेखक यांच्यातील नाते अधिक घट्ट आणि विचारांची घेवाण देवाण करणारे आहे. तर वंदना भागवत या एकंदरीत स्वनिम मध्ये प्रकाशित झालेल्या कथांचा आढावा घेताना अधोरेखित करतात कि, डॉ. वनारसे यांनी लिहिलेल्या कथा ह्या अंतर्मुख व्हायला भाग पडतात. थोडक्यात, रूपके वापरून लिहिलेल्या कथांमध्ये समकालीन समाज जीवनात संभ्रमात असताना काहीसा आधार मिळतो आणि शक्यता मिळतात. स्वतःचे मूल्य दुसऱ्यांच्या अथवा बाजारपेठेच्या निकषांच्या संदर्भात न बघता आपल्याला काय हवं आहे हे महत्वाचे आहे हे स्वनिम च्या शोधकथा सुचवते.

वनारसे यांनी तिन्हीसांजेच्या कन्येची गोष्ट आणि डान्यापान्याची गोष्ट या दोन्ही कथेंमधून मानवी जीवनातील अंतर्विरोध मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एका पोळीची गोष्ट या कथेमध्ये वनारसे यांनी पोळी या रूपकाचा उपयोग करून आपण करत असलेल्या कामावर आपण प्रेम करतो का? हा महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. त्या नमूद करतात कि, बहुतांशवेळा आपण काम करताना मनाने करत नाही. काम जर प्रेमाने केले तर धकाधकीतसुद्धा एकदम टेन्शन फ्री जगता येत. काम त्यामुळे कामात रस घेऊन, त्यावर प्रेम करून काम केल्यास काम चांगलं होतं असे वनारसे सुचवतात. वरवर पाहता लेखिका जे म्हणत आहे ते योग्य वाटते मात्र ज्यांना ते करत असलेल्या कामामध्ये आनंद वाटत नसेल तर काय? प्रत्येक कामात असा आनंद शोधता येतो का? जी कामं परिस्थितीने, इथल्या समाज व्यवस्थेने लादली आहेत त्या कामांचं काय? उदाहरणार्थ वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, सफाई कर्मचारी, कचरा वेचक इत्यादी. हे काम करत असताना समाजाच्या शुद्ध / अशुद्ध यासारख्या कल्पना जोडल्यामुळे हे काम करत असलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कामाला कमी दर्जा मिळतो. त्यामुळे काम, मूल्य, दर्जा, आनंद आणि समाधान या चौकटी मध्ये आपणास कामावरच्या प्रेमाचा विचार करावा लागेल.

संवाद स्पंदन

संवाद स्पंदन हे सदर २०११ साली सुरु करण्यात आले. या सदरचा मूळ उद्देश हा विविध संस्था, संघटना, वाचक यांच्याशी संवाद साधत परिवर्तनाची चळवळ उभारणे आणि ही चळवळ केवळ शब्दांमध्ये अडकून न राहता जमिनीवर जे लोक परिवर्तनशील काम करत आहेत त्यांचे अनुभव, काम या सदरात नोंदवणे अथवा त्याचे दस्तऐवजीकरण करणे हा आहे. विविध स्त्रीवादी संस्थांनी घेतलेल्या कार्क्रमांचा, उपक्रमांचा आढावा संवाद स्पंदन मध्ये घेण्यात आलेला आहे.

महत्वपूर्ण पुस्तक प्रकाशन, लघुपट, चित्रपट, नाटक सादरीकरण या कार्यक्रमांमध्ये करण्यात आले होते. विविध संस्थांचा या कार्यक्रमांमध्ये सहभाग दिसून येतो. त्यामुळे विचारांची, डावपेचांची परस्पर देवाण - घेवाण या सारख्या कार्यक्रमातून होते हे नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे महत्वपूर्ण विषयांना हात घालून त्यावर चर्चा घडवून आणण्याचं काम देखील विविध संस्था संघटना तसेच मिळून साऱ्याजणी ने केलेले दिसून येते. पुरुषकेंदी असलेल्या सत्ताकारणात स्त्रियांचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी प्रगतशील लेखिका संमेलन भरवणे, स्त्री संस्थांनी स्त्रियांच्या संशोधन कार्याचे परीक्षण करून त्यांना पुरस्कार देणे असो किंवा स्त्रियांनी केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीची नोंद घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कन्या महाराष्ट्राची पुरस्कार प्रदान करणे असे नाविन्यपूर्ण उपक्रम संस्थांकडून घेण्यात आले. त्याचप्रमाणे रौप्य महोत्सव, अक्षरस्पर्श चा वर्धापनदिन, डॉ. ललित सामंत स्मृती पुरस्कार, सखी मंडळ मेळावा, महिला दिन विशेषांक, मिळून साऱ्याजणीची पंचविशी कार्यक्रम, महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुण विद्यार्थी - विद्यार्थिनी त्यांचे प्रश्न समजून त्यावर मार्गदर्शन करून त्यांना देखील परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सामावून घेण्याचे काम काही उपक्रम करण्यात आले.

विविध महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा या कार्यक्रमांमधून करण्यात आली जसे की, धर्मांतर, जाती अंत, भटक्या विमुक्तांचे प्रश्न, स्त्री शिक्षण, हिंसा आणि पितृसत्ता इत्यादी. परिवर्तनाच्या चळवळीत एकमेकांच्या सोबत राहून काम करणं महत्वाचं आहे तसेच जमीन आणि अकादमीक यांचा एकत्र विचार करत दोन्ही ठिकाणची लढाई लढत स्त्रीवादी संघटना एकत्र काम करत आहे हे संवाद स्पंदन या सदराने घेतलेल्या त्यांच्या विविध कार्यक्रमातून दिसून येतो. या सदरामुळे वाचकांना देखील संघटनांनी राबविलेले विविध उपक्रम समजले आणि काही उपक्रमांमध्ये वाचक देखील सहभागी झालेले दिसून आले. संवाद स्पंदन या सदरांतर्गत एकूण १५ टिपण लिहिण्यात आले आणि सर्वच टिपण हे शहरी, उच्च माध्यम वर्गीय शिक्षित स्त्रियांनी लिहिलेले आहेत. दस्तऐवजीकरण ज्ञान इतरांपर्यत पोहचवण्यास मदत करते आणि मिळून साऱ्याजणी ने हे ज्ञान संवाद स्पंदन या सदरामार्फत इतरांपर्यंत पोहचवण्याचे काम केलेले आहे.