मिळून साऱ्याजणीची मुखपृष्ठे - मासिकाचा आशयघन, बोलका चेहरा
विद्या बाळ अध्यासन प्रकल्पांतर्गत
'साऱ्याजणीच्या अक्षरवाटा'
ऑगस्ट १९८९ ते जुलै २०१९
'एक प्रवास : आत्मभान, समाजभान आणि माणूसभान जागवण्याचा'
मासिकाच्या संस्थापक-संपादक स्मृतीशेष विद्या बाळ यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मिळून साऱ्याजणी मासिकानं ऑगस्ट १९८९ ते जुलै २०१९ या ३१ वर्षात सामाजिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा अभ्यास विद्या बाळ अभ्यासन प्रकल्पांतर्गत केला आहे. या प्रकल्पाच्या प्रमुख गीताली वि.मं. आणि समन्वयक सुवर्णा मोरे होत्या. 'साऱ्याजणीच्या अक्षरवाटा' या शीर्षकाने हा अभ्यासप्रकल्प ऑनलाईन प्रकाशित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. प्रकल्पाच्या अहवालाची झलक इथे उपलब्ध आहे.सविस्तर अभ्यासातील काही निवडक लेख येथे उपलब्ध करून देत आहोत. हा प्रकल्प परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनच्या आर्थिक सहाय्यामुळे सहज शक्य झाला. त्यांचे मनापासून आभार.
परिवर्तनाचा बहुआयामी, बहुरंगी आविष्कार वाचकांपर्यंत 'मिळून साऱ्याजणी' मासिकाच्या माध्यमातून पोहोचवताना मुखपृष्ठाचं योगदान अनन्यसाधारण आहे. मुखपृष्ठ हे मासिकाचं प्रवेशद्वार आकर्षक, वैविध्यपूर्ण आणि आशयसंपन्न असायला हवं ही मिळून साऱ्याजणीची भूमिका आहे. गेल्या ३१ वर्षांच्या मुखपृष्ठांचा हा धांडोळा साऱ्याजणीचे स्नेही चित्रकार, ग्राफिक डिझायनर आणि कार्यकर्ता असणारे मिलिंद जोशी यांनी रसिल्या पद्धतीनं घेतला आहे. त्याचा जरूर आस्वाद घ्यावा.
========================================================================
‘स्त्री’ हे मासिक किर्लोस्करांनी दुसरीकडे दिल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली होती. तसंही, स्त्रीमुक्तीचा पहिला टप्पा ओलांडून एका मॅच्युअर भूमिकेत स्त्रीमुक्तीची चळवळ जाणं अपेक्षित होतं. अशा परिस्थितीमध्ये एका दमदार स्त्रीवादी मासिकाची नितांत आवश्यकता होती. ‘मिळून साऱ्याजणी’ मासिक काढायची विद्याताईंची- विद्या बाळ यांची- कल्पना ह्याच विचारातून पुढं आली असावी. हे मासिक निघायची पूर्वतयारी सुरू झाली, तेव्हाच मला त्याबद्दल कल्पना होती. १९८८-८९मध्ये ‘नारी समता मंचा’च्या एका परिषदेसाठी हॉलमध्ये डिस्प्ले करण्यासाठी मी काही पोस्टर्स डिझाईन करून दिली होती. मी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा कार्यकर्ता होतो. पोस्टर्सच्या निमित्तानं जे वाचन झालं, त्यामुळे माझा स्त्रीमुक्ती चळवळीशी प्रत्यक्ष संबंध आला. त्यासाठी काही कामही केलं होतं. तर तेव्हापासून आजपर्यंत - एक चित्रकार, ग्राफिक डिझाईनर, कार्यकर्ता, पैसचा सदस्य आणि ‘मिळून साऱ्याजणी’साठी थोडं फार लेखन करणारा - अशा बहुपदरी नात्यांनी मी ‘साऱ्याजणी’ परिवाराशी जोडला गेलेलो आहे. तर, गेल्या तीस वर्षांमध्ये ग्राफिक डिझाइनर आणि ले आऊट आर्टिस्ट म्हणून मी पुस्तकं आणि मासिकांच्या शेकडो मुखपृष्ठांचे डिझाईन केले आहे. त्यामुळे मला जाणवलेली वैशिष्ट्यं आहेत, त्यापैकी मिळून साऱ्याजणी मासिकाच्या काही महत्त्वाच्या मुखपृष्ठांचा ह्या लेखामध्ये मी आढावा घेतलेला आहे. हा आढावा घेताना तीस वर्षांचा कालावधी असल्यामुळे निवडक मुखपृष्ठं घ्यावी लागली आहेत. त्यातही निवड ही त्यातील उपप्रकारांच्या गरजांप्रमाणे आहे. ‘मिळून साऱ्याजणी’चा मला जाणवलेला मुखपृष्ठाबद्दलचा समग्र दृष्टिकोन, साधारणपणे मला दिसलेले त्यातील प्रवाह, त्या अनुषंगाने तीस वर्षांमधली निवडक वैविध्यपूर्ण मुखपृष्ठं आणि त्यावरील थोडक्यात भाष्य ह्याचा समावेश असेल.
‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचा पहिला अंक ४ ऑगस्ट १९८९ ला प्रकाशित झाला, तेव्हा मी तेथे हजर होतो. व्यासपीठावर बॅकड्रॉपला एक सुंदर गोधडी लावण्यात आलेली होती. थोड्याच वेळात ज्येष्ठ पत्रकार मृणाल पांडे ह्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ समाजवादी नेते मा. नानासाहेब गोरे यांच्या हस्ते अंकाचं विमोचन करण्यात आलं आणि दिसलं की तीच गोधडी मिळून साऱ्याजणी मासिकाच्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर विराजमान झालेली आहे.
विविध आकर्षक रंगांचे छोटे छोटे अनेक तुकडे वापरून ती गोधडी बनवलेली होती. त्यात चमचमणारं जरीकामसुद्धा दिसत होतं. हे पहिलं वाहिलं मुखपृष्ठ मला खऱ्या अर्थानं मिळून साऱ्याजणीचं प्रातिनिधिक मुखपृष्ठ वाटतं. विद्याताईंचा एकूण दृष्टिकोन त्यामध्ये प्रतिबिंबित झाला आहे. विद्याताईंकडे सौंदर्यदृष्टी होती. कलात्मकतेची आवड होती. प्रतीकात्मकता त्यांना अतिशय प्रिय होती. स्त्रीमुक्ती किंवा समतेच्या चळवळीच्या अनेक उपक्रमांमध्ये छोट्या छोट्या सकारात्मक प्रतीकांचा वापर त्यांनी अत्यंत सजगपणे आणि कल्पकतेनं नेहमीच केलेला दिसून येईल.
गोधडी ही अनेकरंगी छोट्या तुकड्यांनी बनलेली आहे. गोधडी बनवताना शक्यतो एकटी बाई बनवताना दिसणार नाही, तर बायकांचा छोटासा समूह गोधडी बनवतो. त्या अर्थी ते एक सामूहिक काम आहे आणि विशेषतः ते स्त्रियांचं क्रिएशन आहे. चळवळीसाठी सामूहिकता किती महत्त्वाची असते, हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यातल्या घट्ट विणीमध्ये गुंफलेला आहे सखीभाव. समूहानं बनवलेली ती गोधडी उबदार असतेच; पण नुसतीच उबदार नाही, तर ती आकर्षक आणि सुंदरसुद्धा आहे. कलात्मक आहे. हे स्त्रियांचं खास वैशिष्ट्य आहे. जगात कितीही कलेचे महान अविष्कार आणि महान पुरुष कलावंत होऊन गेले असले तरी संस्कृती म्हणून कलेची परंपरा घराघरांमध्ये जतन करणारी आणि नृत्य, ओव्या आणि गाण्यापासून ते रांगोळी, भरतकाम सारख्या दृश्य कला, आणि महत्त्वाची पाक कला - ‘फूड कल्चर’ ह्या सर्वांची स्थानिक वैशिष्ट्यं टिकवणं, वाढवणं हे महत्त्वाचं काम पुढे घेऊन जाणारी स्त्रीच असते. त्यात ही पुरुषी घराण्याची परंपरा असली भानगड नसून आईकडून मुलीकडे आलेली आणि इतर मैत्रिणींसमवेत समृद्ध होत जाणारी कला परंपरा आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी घराला घरपण येतं त्यामध्ये स्त्रियांच्या कलात्मकतेचा आणि सौंदर्यदृष्टीचा जवळचा संबंध आहे.
सुप्रसिद्ध इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी ह्यांचा ‘फादर’ नावाचा एक सिनेमा आहे. त्यातला एक छोटासा प्रसंग- मेहरुल्ला हा १३-१४ वर्षांचा मुलगा आहे. नुकतेच त्याचे वडील गेलेत. हा मुलगा आणि दोन मुली ह्यांचा सांभाळ कसा करावा, ह्या पेचामध्ये आई आहे. अशावेळी गावातलाच एक पोलीस तिला लग्नाची मागणी घालतो. तिला दुसरा पर्याय नाही. ती ते स्वीकारते. दरम्यान घरातला कर्ता पुरुष म्हणून आपली जबाबदारी मानून मेहरुल्ला शहरात जाऊन मिळेल ती नोकरी करून थोडेफार पैसे जमवून परत येतो, तेव्हा आल्यावर त्याला आपली आईबहिणींसहित नव्या घरी राहायला गेलेली दिसते. कर्ता पुरुष म्हणून त्याला हे अजिबात आवडलेलं नाही. तो त्यांचं जुनं घर स्वच्छ करतो. त्याची रंगरंगोटी करतो. तिथं नवीन गोष्टी आणतो. गोड बोलून छोट्या बहिणींना तिकडं राहायला घेऊन येतो. गरिबाचंच घर, पण खिडक्यांना सुंदर पडदे लावलेले आहेत आणि कोनाड्यामध्ये केलेला रुमाल ठेवून, त्यावर दिवा, तर दुसऱ्या कोनाड्यामध्ये रुमालावर आरसा ठेवलेला आहे. हे जे सजवणं आहे ते घरातली बाई करते, ते केल्याशिवाय त्याला घरपण नाही. बहिणींना किंवा त्याला स्वतःला ते आपलं घर वाटायला हवं असेल, तर हा कलेचा सौंदर्याचा स्पर्श हवाच. त्याच्याकडे हे आईकडून आलेलं आहे. गरिबी असली तरी सौंदर्यदृष्टी जोपासणं, ही संस्कृती आहे आणि ते काम नि:संशयपणे जगभर स्त्रियाच करत आलेल्या आहेत. गोधडीकडं पाहताना लक्षात येईल की, त्यामध्ये हे सारं त्यामध्ये सामावलेलं आहे.
ह्यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, शतकानुशतके घराच्या, समाजाच्या चौकटीत बंदिस्त असूनही बाईनं कलात्मकता टिकवली आहे, जगवली आहे. तिला मुक्त अवकाश मिळालं तर ती काय काय करू शकेल ह्याची कल्पना करा!
स्त्रीमुक्तीच्या पहिल्या टप्प्यामध्ये कदाचित पुरुषांचं अनुकरण, त्याच्याशी स्पर्धा हे दिसलं असेल ते स्वाभाविकपण होतं. पण आता जास्त समजदार होत चाललेल्या स्त्री चळवळीला पुरुषांच्या अनुकरणाची गरज नाही. स्त्रियांच्या स्वतःच्या स्ट्रेंथ्स आहेत. त्यांची मानसिकता, सामूहिकता ही अधिक समजदार आणि घट्ट विणीची आहे. त्यांचं एकत्र येणं सर्जनशील आहे. उपलब्ध असलेल्या कोणत्याही गोष्टींपासून जग सुंदर बनवायची ताकद ह्या एकीमध्ये, चळवळीमध्ये आहे, हे विनयानं तरीही ठामपणे सांगणारी ‘गोधडी’ ही दृश्य कृती आहे. विद्याताईंच्या एकूण स्वभावाशी हे सारं कितीतरी सुसंगत आहे. तीस वर्षांमध्ये मिळून साऱ्याजणी मासिकावर, त्याच्या दिशेवर विद्याताईंच्या व्यक्तिमत्त्वाचा जो अमिट ठसा उमटलेला दिसतो, त्याची सुरुवात म्हणून ह्या मुखपृष्टाकडं नक्कीच पाहता येईल.
आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सामाजिकतेचा. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांच्या बाजूने उभं राहतानादेखील समाजातल्या अंडर प्रिव्हिलेज्ड वर्गाला विद्याताई जास्त महत्व देतात. ‘मिळून साऱ्याजणी’चा राजकीय विचार हा कायम डावीकडे झुकलेला आहे. ‘मिळून साऱ्याजणी’नं नेहमीच शोषितांच्या, पीडितांच्या, अन्यायग्रस्तांच्या बाजूनं निःसंदिग्धपणे भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे ह्या पहिल्या मुखपृष्ठावर अभिजनवादी कलेला स्थान न मिळता, लोककलेला - अर्थात गोधडीला स्थान मिळालेलं दिसतं.
गोधडीवर स्त्रीच्या चेहऱ्याचं आऊटलाईनचं एअरब्रश इलस्ट्रेशन आहे. आज ते कदाचित अनावश्यक वाटतं. ते नसतं तरी मुखपृष्ठ परिपूर्ण असलं असतं. अर्थात, हे आज मासिक ३० वर्षे स्थापित झाल्यावर आपण म्हणतोय. तो पहिलाच अंक असल्यानं विशेषतः स्त्रियांसाठी मासिक म्हणून पटकन कळावं हा हेतू असावा. सुरुवातीपासून काही वर्षे ‘मिळून साऱ्याजणी’ अंकाचं कला निर्देशन श्याम देशपांडे करत होते. ह्या गोधडीच्या मुखपृष्ठाचं श्रेय त्यांनासुद्धा आहे.
मुखपृष्ठावर असणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे टॅगलाईन - ‘स्वतःशी नव्यानं संवाद सुरू करणारं मासिक’ ही टॅगलाईन सुरुवातीला बरीच वर्षे होती. नाव ‘मिळून साऱ्याजणी’ असलं तरी ह्या मासिकाचे वाचक आणि लेखकही स्त्रियांबरोबरच समतावादी पुरुषसुद्धा होते. हे स्त्रीवादी मासिक असलं तरी त्यातील विचार फक्त स्त्रियांसाठी नाही तर सर्वांसाठीच होता. मग, समतावादी पुरुषांना सामावून घेण्यासाठी ‘मिळून साऱ्याजणी’ची टॅगलाईन बदलली.
‘स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वतःशी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी...’ ही टॅगलाईन मुखपृष्ठावर विराजमान झाली. दरम्यानच्या काळामध्ये जेंडर अर्थात लिंगभाव हा विषय, तसेच एलजीबीटीक्यू समूहाचे प्रश्न ऐरणीवर आले त्यावर समाजात चर्चा सुरू झाल्या आणि कोर्टाचेही काही निकाल आले. ‘मिळून साऱ्याजणी’ने या ही बाबतीत समतेची, पुरोगामी भूमिका घेऊन आपली टॅगलाईन पुन्हा बदलली. ती अशी- ‘ती’ आणि ‘तो’ यापलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वतःशी आणि परस्परांशी नव्याने संवाद व्हावा यासाठी...
साहजिकच, वरील सर्व विचारांच्या दिशेने मिळून साऱ्याजणीची नंतरची मुखपृष्ठे अधिक वैविध्यपूर्ण, सुंदर, सर्वसमावेशक आणि प्रयोगशील होत गेलेली दिसतात.
प्रत्यक्ष मुखपृष्ठांचा आढावा घेताना ढोबळपणे त्याचे काही भाग केले आहेत. पहिल्या भागामध्ये पेंटिंग्ज, इलस्ट्रेशन्स, पोर्ट्रेट्स, कोलाज अशा कलामाध्यमांतून चितारलेली मुखपृष्ठे आहेत.
‘मिळून साऱ्याजणी’च्या मुखपृष्ठांमधून माझं सर्वात आवडतं आणि लक्षात राहिलेलं मुखपृष्ठ आहे- एप्रिल १९९९च्या अंकाचं. झोका खेळणाऱ्या दोन मुली. ह्यामध्ये रंग, आकार त्यांची रचना, त्यातला ओघ आणि एकूण चित्राची लय फार सुंदर आहे. ह्यामध्ये तपशिलांना महत्त्व नाही. पण झोक्याच्या दोऱ्या, मुलींची शरीरे आणि हवेत उडणारे कपडे, पार्श्वभूमीवरचे जलरंगांचे वेगवान फटकारे ह्यामध्ये एक कमालीची हार्मनी - एकतानता आढळते. त्यामध्ये मुक्तपणा आहे, आनंद आहे. जोश आहे. हे चित्र सुप्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी काढलेलं आहे. जानेवारी १९९९ ते मे १९९९ असे सलग पाच महिने पाच मुखपृष्ठे चंद्रमोहन कुलकर्णी ह्यांनी काढली होती. हा ‘साऱ्याजणीने’ केलेला एक प्रयोग होता. त्यावर वाचकांच्या प्रतिक्रियाही मागवल्या होत्या. ती पाच ही मुखपृष्ठे सोबत दिली आहेत. त्याबद्दल मूळ विषयातला भाव, आशय अंगभूतपणे, सहजपणे, नैसर्गिकरीत्या पुढे घेऊन जाणारे आकार, रंग, रेषा, रचना यांच्यामधून चंद्रमोहन कुलकर्णी यांनी ही चित्रे साकारली आहेत. हे करताना कोणत्याही फिगरच्या तपशिलांमध्ये न अडकता,
विषयाच्या ओघामधून ही चित्रं त्यांनी साकारली होती.
जानेवारी १९९९ - हातामध्ये हात घेतलेल्या स्त्रियांचा समूह, फेब्रुवारी १९९९ - हातांच्या आकारांमधून साकारलेले पक्षी, मार्च १९९९ - हातांमधून आकाराला आलेलं एक झाड. त्याच्या अंतरंगामध्ये आणखी एक इवलंसं रोप दिसत आहे. एप्रिल १९९९ - त्या झोके घेणाऱ्या मुक्त मुली. आणि मे १९९९ - अवघड चढण ओझ्यासहित चढून जाणाऱ्या दोन आकृत्या. सर्व चित्रं अर्थवाही आहेत. तर याच मालिकेमधलं पुढचं वाटावं असं चित्र मार्च २००१ - महिलादिन विशेषांकावर आहे- मुलीचे केस विंचरणाऱ्या आईचं !
ही मुखपृष्ठे करताना त्याबद्दलची विचारप्रक्रिया काय होती. याबद्दल दस्तुरखुद्द चंद्रमोहन कुलकर्णी ह्यांचा एक लेख ‘मिळून साऱ्याजणी’च्या ऑक्टो-नोव्हे. १९९९ - दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये वाचकांच्या प्रतिक्रियाही बरोबरीने प्रसिद्ध केल्या होत्या. तो लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे आणि ‘मिळून साऱ्याजणी’च्या आर्काइव्हमध्ये उपलब्ध आहे.
अशाच प्रकारे ख्यातनाम चित्रकार बुवा शेटे यांची चित्रमालिका आपण पाहू शकतो. ही मालिका सलग नाही; पण त्यांच्या विशेष शैलीमध्ये चितारलेली आहे . ऑगस्ट २००५ च्या अंकावर एका झाडाच्या बुंध्याच्या दोन बाजूला दोऱ्याच्या फोनवरून संवाद साधणाऱ्या दोन स्त्रिया आहेत. २००५च्या दिवाळी अंकावर वाऱ्याच्या झोतामध्ये वस्त्रं सावरत जाणाऱ्या तीन स्त्रिया दिसतात. फेब्रुवारी २००७ च्या अंकावर संस्कृतीने बंदिस्त केलेल्या तीन स्त्रिया आहेत; तर त्याच्या बाजूला एक बालक मुक्तपणे बासरी वाजवत आहे. तर एप्रिल २००८ च्या अंकावर पाठमोरी स्त्री आणि तिच्या तळपायाला स्पर्श करणारी बालक दिसतं. इथंही सर्व चित्रातले सर्व घटक हार्मनीमध्ये आहेत. ही सर्व मुखपृष्ठं खूपच सुंदर आहेत.
संपूर्ण ऍबस्ट्रॅक्ट चित्रचौकटी वापरून मुखपृष्ठांची मालिका करण्याचा प्रयोगसुद्धा या मासिकानं आवर्जून केलेला दिसतो. सुजाता धारप यांची चार मुखपृष्ठे २००५ मध्ये फेब्रुवारी, मार्च, मे आणि जूनच्या अंकावर दिसतात.
पुण्यातील ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे ह्यांनी त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये काही सुंदर मुखपृष्ठं साऱ्याजणीसाठी केली आहेत. जानेवारी २००२ च्या अंकावर ‘दारामध्ये बसून विणकाम करणारी स्त्री’ आहे. ऑक्टोबर २००२च्या आणि फेब्रुवारी २००३ च्या अंकावर फुले वेचताना संवाद साधणाऱ्या दोन स्त्रिया दिसतात.
आभा भागवतांची तीन संपूर्णपणे वेगवेगळी मुखपृष्ठे समोर ठेवत आहे. पाठमोरी बसून भांडी घासणाऱ्या मुलीचे पोर्ट्रेट जुलै १९९७ च्या अंकावर आहे. पायघोळ कपडे घालून मुक्तपणे समूहाने नृत्य करणाऱ्या कृष्णवर्णीय स्त्रिया जानेवारी २०१८ च्या अंकावर दिसतात. स्त्री, पुरुष आणि इतर हे एकाच असल्याचं सूचित करणारं एक चित्र, त्यामध्ये ह्या आकृत्या झाडाच्या आकारात मिसळल्या आहेत, तर त्या गोधडीसारख्या अनेकरंगी तुकड्यांनी बनल्या आहेत. गोधडीच्या
शिवणीसारख्या तुटक रेषांनी पण त्याला विशेष सौंदर्य लाभलं आहे. ऑगस्ट २०१९ च्या मुखपृष्ठावर हे चित्र तुम्ही पाहू शकता.
क्रिएटिव्ह लँडस्केप्स वाटावीत अशी चित्रं - डिसेंबर २०१९ अंकावर व्हायब्रण्ट रंगसंगतीमध्ये फक्त वेगवान फाटकाऱ्यांमध्ये केलेलं विक्रांत कार्यकर्ते ह्यांचं पेंटिंग आहे. तर जलरंगांमध्ये केलेलं यशोदा वाकणकर ह्यांचं लँडस्केप जून २००४च्या अंकावर दिसतं.
तसंच मार्च २००० च्या अंकावर जोगतिणीचं सुंदर कोलाज यशोदा वाकणकर ह्यांनी केलेलं आहे.
तर बंधनात असलेल्या स्त्रीचं कवी-चित्रकार गणेश विसपुते ह्यांनी मोझॅइक पद्धतीनं केलेलं सुंदर कोलाज मार्च १९९५ च्या मुखपृष्ठावर तुम्ही पाहू शकता. धनगरी वेषातल्या पाठमोऱ्या बाप-लेकाचं रंगीबेरंगी तुकड्यानी केलेलं अरुण शिंदे ह्यांचं कोलाज डिसेंबर १९९९ च्या अंकाची शोभा वाढवत आहे. .
अभिनव कलामहाविद्यालयातील कलाशिक्षक आणि चित्रकार मारुती पाटील ह्यांची दोन सुंदर मुखपृष्ठ सोबत दाखवली आहेत. २००१२च्या दिवाळी अंकावर घोड्यावर घरदार लादून जाणाऱ्या आई आणि मुलीची जोडी दिसते तर रानातून शेळ्या हाकत येणाऱ्या दोन मुली २०१४च्या दिवाळी अंकावर दिसतात. ह्यास दोन्हीही चित्रांच्या रेंडरिंग स्टाईलमध्ये खूप फरक आहे.
चित्रकार रमाकांत धनोकर ह्यांची ‘मोर’ या विषयावरची संपूर्ण वेगवेगळ्या शैलीमध्ये चितारलेली पेंटिग्ज - हाताच्या आकारातून तयार झालेला मोर हा जून २००८ आणि सरस्वतीच्या आकृतीमधून तयार झालेला मोर हा ऑगस्ट २०१५ च्या अंकांवर आहे.
पुष्पा गद्रे हयांनी पेन अँड इंक प्रकारात केलेलं ‘कांडप करणाऱ्या दोन स्त्रिया’ हे चित्र जुलै २००४च्या अंकावर आहे, तर पेन्सिलमध्ये चितारलेलं एका निर्मितीमग्न स्त्रीचं क्रिएटिव्ह पोर्ट्रेट १९९९च्या दिवाळी अंकावर आलेलं आहे.
ख्यातनाम चित्रकार प्रा. संभाजी कदम ह्यांनी केलेलं गर्भवती स्त्रीचं सुप्रसिद्ध पोर्ट्रेट मी २००० च्या अंकावर आहे. तर प्रख्यात मेक्सिकन चित्रकर्ती फ्रिडा काहलो हिनं चितारलेलं सेल्फ पोर्ट्रेट सप्टेंबर ९४च्या अंकावर दिसतं. उषा फेणाणी- पाठक ह्यांनी केलेलं एक सुंदर पोर्ट्रेट ऑगस्ट २००७च्या अंकावर आहे.
क्रॉसस्टिचमध्ये केलेल्या भरतकामाचं रमाबाई जोशी ह्यांचं मुखपृष्ठ फेब्रुवारी ९७ च्या अंकाला लाभलं आहे; तर त्यांचंच फेब्रुवारी ९९ - व्हॅलेंटाईन दे स्पेशल - मुखपृष्ठावर अवधूत परळकर ह्यांचं प्रेमभावनेवरील सुंदर अवतरण आलेलं आहे. ह्या चित्राची स्टाईलसुद्धा ७० च्या दशकातल्या चित्रांसारखी दिसते.
मेहबूब शेख ह्यांचं हातांच्या विविध आकार आणि व्यवहारातून संवाद दर्शवणारं पेंटिंग जुलै १९९९च्या अंकावर आहे. हातामध्ये कंदील घेतलेल्या दोन मुलींचं हे जागतिक ख्यातीचे चित्रकार डायनो लिअर्ड यांचं विलक्षण देखणं पेंटिंग २०१८च्या दिवाळी अंकावर आहे.
गुरं राखताना पुस्तक वाचणारा मुलगा २०१०च्या दिवाळी अंकावर अरुंधती वर्तक ह्यांनी वेधक शैलीमध्ये चितारला आहे. तर मुक्ता अवचटांनी पेंट केलेलं एका मुलीचं सुंदर पेंटिंग फेब्रुवारी २०१४ च्या अंकाची शोभा वाढवताना दिसतं.
जून २००२ च्या अंकावर शैलेश मेश्राम ह्यांचं; तर जून २०११ च्या अंकावर पूजा काळे ह्यांची अशी सुंदर लँडस्केप्स दिसतात.
स्त्रीच्या रूपामध्ये पृथ्वीवरील अमर्याद कचऱ्याचं ओझं वाहणाऱ्या पृथ्वीचं ---- ह्यांनी काढलेलं विलक्षण अर्थवाही चित्र मे २०१९च्या अंकावर दिसतं आहे.
अशाप्रकारे ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाच्या मुखपृष्ठावर अनेक ख्यातनाम चित्रकारांनी हजेरी लावलेली दिसून येते. तेवढं कलाप्रकारांमधलं सौंदर्यपूर्ण वैविध्य ह्या मुखपृष्ठांमध्ये दिसून येतं.
‘मिळून साऱ्याजणी’चा हा आशयपूर्ण चेहरा गेल्या ३० वर्षांमध्ये अनेक कलावंतांनी समृद्ध आणि सुंदर केला आहे.
दुसऱ्या भागामध्ये काही फोटोग्राफिक मुखपृष्ठे पाहूया!
‘मिळून साऱ्याजणी’ची सुरुवातच गोधडीच्या फोटोपासून झाली होती. पुढेही मासिकाने अनेक मुखपृष्ठं छायाचित्रं वापरून केली आहेत. ही छायाचित्रं आपल्याला जी प्रतिमा दाखवतात, त्याच्या दृश्य अर्थाच्या पलीकडे जाणारा आशय त्यामध्ये दडलेला आहे, हे या भागामध्ये निवडलेल्या मुखपृष्ठांचं वैशिष्ट्य. पहिल्या भागाप्रमाणे ह्यामध्येसुद्धा तुम्हाला फोटोग्राफी किंवा फिल्म्सच्या क्षेत्रातली मोठी नावं दिसतील. विद्याताईंनी मिळून ‘साऱ्याजणी’च्या माध्यमातून कितीतरी गुणी लोकांना ह्या समतेच्या चळवळीशी जोडून घेतलेलं आहे, ह्याची निदर्शकच ही मुखपृष्ठं आहेत असं म्हणता येईल. सुरुवात माझ्या आवडत्या मुखपृष्ठापासून करू.
ऑगस्ट २००९चं मुखपृष्ठ - फुगडी खेळणाऱ्या दोन मुली. राजेंद्र कळसकर ह्यांचा हा फोटो आहे. मुक्तपणे फुगडी खेळताना खेळण्याचा वेग, ती चक्राकार लय, त्या लयीबरोबर उडणारे मुलींचे कपडे आणि वेण्या आणि सर्वात महत्वाचे मुलींच्या चेहऱ्यावरील आनंदाचे अकृत्रिम सुंदर भाव. समाज जर निरोगी असेल सगळी दडपणं झुगारून मुक्त श्वास घेणारी स्त्री कदाचित इतकी आनंदी दिसेल. आणि केवळ स्त्रीच कशाला त्यावेळी पुरुष ही पुरुषत्वाच्या जोखडामधून मुक्त झालेला असेल. ह्यानंतरची तीन मुखपृष्ठ माझे आवडते फोटोग्राफर संदेश भंडारे ह्यांची आहेत. ऑक्टोबर २००४ - पायाशी पाय जुळवून पारंपरिक खेळ खेळणाऱ्या स्त्रियांच्या पायांचा क्लोजअप. ‘मिळून साऱ्याजणी’ ह्या शब्दांना जागणारं मुखपृष्ठ. मे २०१४ दगड फोडणारी श्रमिक महिला आणि जानेवारी २०१९ झोपडीच्या अंगणात छोट्याशा नातवाला ‘कुकूचकाई’ करून खेळवणारे आजोबा. ह्या दोन मुखपृष्ठांमध्ये एकामध्ये दगड फोडणारी कणखर स्त्री आहे, तर दुसऱ्यामध्ये एका पुरुषाचं वात्सल्य दिसत आहे. स्त्री ही कोमल तर पुरुष हा कठोर दगड अशा स्टिरिओटाईप्सना तोडणारं, पारंपरिक काल्पनिक प्रतिमांना छेद देणारं हे वास्तव आहे.
ह्यानंतरचं मुखपृष्ठ एप्रिल २०१९चं - गडद पार्श्वभूमीवर उठून दिसणारी कोवळ्या उन्हातली अत्यंत कोवळी तांबूस- हिरवी पिंपळपानं - फोटोग्राफर - मिलिंद जोशी - अर्थात माझंच ! वसंतागमनावर मुखपृष्ठ करशील का? अशी विचारणा मला संपादक गीतालीताईंनी केली होती. त्यामुळे वसंत ऋतूच्या आगमनाची वार्ता देणारी ही पालवी मुखपृष्ठावर आली. पिंपळपान दिसायला नाजूक, कलात्मक आकाराचं आणि सुंदर तर असतंच. पण पिंपळाच रोपटं कुठंही उगवणारं,अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही चिवटपणे टिकून राहणारं आणि योग्य वाव मिळाला तर प्रचंड विस्तारणारं, उंच जाणारं आणि सावली देणारं आहे. मला ते स्त्रीचं प्रतीक वाटतं. हे मुखपृष्ठ केल्यावर मी त्याबद्दल एक पत्र लिहिलं होतं, ते साऱ्याजणीच्या जून १९च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालं होतं. विद्याताईंनी त्याला ईमेलद्वारे छानसं उत्तर पाठवलं होतं. ही माझी आठवणसुद्धा ह्या मुखपृष्ठाशी जोडलेली आहे.
यानंतरची तीन मुखपृष्ठं आहेत ती बंद दरवाज्याच्या संदर्भामध्ये. डिसेम्बर १९९१ - बंद दरवाजा - ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी काढलेला फोटो. एप्रिल २०१७ - बंद दरवाजाबाहेर बसलेली छोटी मुलगी - गणेश सावित्री रघुनाथ काळे यांनी काढलेला फोटो. ३. जून १९९८ - बंद दरवाजा किलकिला करून त्यातून पाहणारी हसरी मुलगी - जगदीश गोडबोले यांनी काढलेला फोटो.
हे तिन्ही फोटो बोलके आहेत. काही सांगणारे आहेत.
पुढची सर्व मुखपृष्ठं पाहत जाल तर त्यातून तुम्हाला असंच बरंच काही गवसत जाईल हे नक्की.
जानेवारी १९९१- आंतरराष्ट्रीय बालिका वर्षानिमित्तानं काढलेल्या विशेषांक- सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुकथनकर ह्यांनी काढलेला फोटो आहे - भांडी घासत असलेली आई आणि अलीकडे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहत असलेली बालिका!
उदय बांदिवडेकर ह्यची दोन मुखपृष्ठे - जानेवारी १९९२ - ज्येष्ठ नागरिक विशेषांक - पारंब्या असलेला वटवृक्ष. फेब्रुवारी १९९८ - लाल ओल्या मातीवर पडलेला हलकासा प्राजक्त सडा.
२००२ च्या दिवाळी अंकावरचं रंगीबेरंगी नऊवारी साड्या वाळत घालणारी स्त्री, फेब्रुवारी १९४४ च्या अंकावरची दाट जंगलातल्या रस्त्यानं एकटीच जाणारी पाठमोरी बाई - फोटो प्रभा नवांगुळ. जून १९९५ च्या अंकावरील इरलं घेऊन बसलेली शेतकरी बाई - फोटो संजीवनी कुलकर्णी ही एकट्या स्त्रियांचे फोटो असलेली मुखपृष्ठं उल्लेखनीय आहेत.
अभिजीत वर्दे यांची १९९३च्या दिवाळी अंकावरची दोन दिव्यांच्या उजेडात अभ्यास करणारी चिमुरडी म्हणजे दिव्यांचा वेगळाच अर्थपूर्ण उत्सव आहे. तर ऑगस्ट १९९३च्या अंकावरची छोट्या भावाला पायऱ्या चढून जायला मदत करणारी छोटी ताई ही संवेदनशील फोटोग्राफर विद्या कुलकर्णी यांनी टिपली आहे.
मे २०१६ - बांधकामावर विटा वाहणाऱ्या स्त्रिया - फोटो संजय मेश्राम, मार्च २०१३ - जलपर्णीतून वाट काढत नाव पुढे नेणाऱ्या स्त्रियांचा ग्रुप - फोटो - सुदिप्तो राणा, सप्टेंबर २००५च्या अंकावरच्या जळाऊ लाकडाच्या मोळ्या वाहणाऱ्या स्त्रिया - फोटो - चित्रलेखा मेढेकर, सप्टेंबर २००७च्या अंकावर कलाश टोळीतील मुलींचा एस. एन. मलिक यांचा सुंदर फोटो आणि मार्च २०१७च्या अंकावरचा हसऱ्या आदिवासी स्त्रियांचा शीतल आमटे यांनी काढलेला फोटो. समूहातल्या स्त्रियांची ही सारीच मुखपृष्ठं विशेष बोलकी आहेत.
जुलै २००६ च्या अंकावरचं चाफ्याची फुलं अंगठीसारखी घातलेले मुलींचे हात - फोटो - श्रीधर जमदग्नी, मे १९९५च्या मुखपृष्ठावरील किशोर कुर्हेकरांचे सूचीपर्णावरचे दवबिंदू ही मुखपृष्ठे सुंदर आहेत. फेब्रुवारी २०१३ - निर्भया प्रकरणातला कँडल मार्च आणि एक नुकतीच विझलेली मेणबत्ती आपल्याला विषण्ण करून जाते.
उत्कृष्ट फोटो वापरलेली, सूचक, व बोलकी मुखपृष्ठं हे ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचं मोठंच वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
तिसऱ्या भागात आता आपण वळू ‘मिळून साऱ्याजणी’च्या थेट भाष्य करणाऱ्या मुखपृष्ठांकडे.
यामधलं मला सर्वात जास्त आवडलेलं पहिलं मुखपृष्ठ आहे- जानेवारी २०१८चं. विराट शेतकरी मोर्चामध्ये लाल झेंडे हातामध्ये घेऊन मार्च करणारी शेतकरी महिला. यामध्ये पार्श्वभूमी क्रांतिकारी लाल रंगामध्ये दिसते. शेतकरी म्हटलं की सहजच पुरुष डोळ्यासमोर येतो. वस्तुतः शेतीमध्ये पुरुष आणि महिला दोघेही राबत असतात; पण महिलेला शेतकरी म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. इथं मोर्चामध्ये महिला शेतकरी मोर्चेकरी दाखवून ‘साऱ्याजणी’नं हे थेट दाखवून दिलं आहे.
अशीच आंदोलनांची आणखीही काही मुखपृष्ठे आहेत.
दगडखाण महिला कामगारांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे ‘संतुलन’ चे फोटो मे २००८च्या मुखपृष्ठावर दिसतात. कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोलकरणींच्या मोर्चाचं दर्शन मे २००६च्या अंकावर घडतं.
शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात मागे राहिलेल्या शेतकरी महिला आणि कुटुंबांच्या हेलावून सोडणाऱ्या फोटोंचं कविता महाजन केलेलं कोलाज मार्च २००८च्या अंकावर घेतलेलं आहे. शेतकऱ्यानं नैराश्यापोटी आत्महत्या केली, तरी पडलेली जबाबदारी स्त्रियांना दुप्पट ओझं घेऊन निभवावी लागते. त्या ते हिमतीनं करतात. शेतकरी महिलेनं आत्महत्या केलेली क्वचितच आढळून येईल.
‘वन बिलियन रायजिंग’ ह्या आंदोलनामध्ये शहरी मुलींचा उत्स्फूर्त सहभाग मुकुंद किर्दत ह्यांनी टिपलाय, तो मार्च २०१५च्या अंकावर आपण पाहू शकता. तसंच तमासगीर महिलांच्या विशेषांक - यमुनाबाई वाईकरांसमवेत इतर तमाशा कलावंतांना मुकुंद किर्दत ह्यांनी एप्रिल २०१२च्या मुखपृष्ठावर आणलेलं आहे.
समाजातल्या विविध थरांमधल्या महिलांच्या समस्या अशाप्रकारे मुखपृष्ठावर मांडून त्यांना थेट आवाज मिळवून देणारी मिळून साऱ्याजणीची आणखी ही बरीच मुखपृष्ठं दिसून येतील.
काही व्यक्तींच्या स्मरणार्थ किंवा काही स्त्रीवादी कलाकृतींसाठी ‘मिळून साऱ्याजणी’नं विशेषांक काढले आहेत. ऑगस्ट २००३ चा गौरी देशपांडे विशेषांक - अविनाश गोवारीकर आणि अपर्णा भाटे ह्यांच्या फोटोंनी मुखपृष्ठावर गौरीची आठवण ताजी केली आहे. एप्रिल २००६ च्या विशेषांकावर अनेक पुरोगामी संस्थांचे आधारस्तंभ असलेले सत्यरंजन साठे ह्यांचं मुखपृष्ठ जयश्री धानोरकर यांनी केलं आहे.
सप्टेंबर २०१३चा अंक हा डॉ. नरेंद्र दाभोलकर विशेषांक होता. २० ऑगस्ट २०१३ ला सनातनी प्रवृत्तीच्या मारेकऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या दाभोलकरांचा गोळ्या झाडून निर्घृण खून केला. त्याचा निषेध म्हणून हे मुखपृष्ठ काळ्या रंगामध्ये आहे.
‘आई रिटायर होतेय’ या बहुचर्चित नाटकावर ‘मिळून साऱ्याजणी’नं विशेषांक काढला होता त्याच्या मुखपृष्ठावर भक्ती बर्वे ह्यांचा नाटकांमधला फोटो दिसतो. हे मुखपृष्ठ चारू वर्तक यांनी केलेलं आहे.
पुस्तक वाचणाऱ्या मुलीचं तिच्या भावासोबतच एक गोड चित्र बिंदिया थापर यांनी काढलेलं आहे. ‘मैं पढना सीख रही हूँ; ताकी ज़िन्दगी पढ सकू’ हे वाक्य त्या चित्राला संपूर्ण अर्थ मिळवून देतं. जानेवारी २००७ च्या मुखपृष्ठावर हे गोड अर्थपूर्ण चित्र तुम्ही पाहू शकता.
ह्या भागामधली शेवटची दोन मुखपृष्ठं विशेष आहेत.
डिसेंबर १९९० च्या अंकावर चारू वर्तक यांनी केलेलं मुखपृष्ठ- बरफवाली ट्रक ड्रायव्हर- सोजरबाई सातपुते ह्यांचा ट्रकच्या स्टिअरिंग व्हीलवरचा फोटो. तर सप्टेंबर १९९५च्या अंकावरचा अभिजित वर्दे यांनी टिपलेला, खांद्यावर घागर घेऊन पाणी भरणारा तरुण मुलगा. ही दोन्ही मुखपृष्ठं स्टिरिओटाईप्स तोडणारी आहेत. ट्रक चालवणारी बाई हे एरवी डोळ्यांना न दिसणारं दृश्य इथं प्रत्यक्ष दिसतं आणि ती कव्हरस्टोरी आहे. तर पाणी भरणं हे स्त्रियांचं काम मानलं गेलेलं आहे. घागरी घेऊन ओळीनं चालत जाणाऱ्या ललना सिनेमामध्ये, सुंदर पेंटिंगमध्ये, मुखपृष्ठावर दिसतात. दुष्काळात पाण्याचे हाल या मथळ्याखाली बव्हंशी पाणी भरणाऱ्या स्त्रियांचेच फोटो दिसतात. पाणी भरणारा पुरुष प्रत्यक्षात दिसतोच नेहमी; पण तो पेंटिंगचा किंवा मुखपृष्ठाचा विषय बनलेला दिसणार नाही.
साऱ्याजणीचं वैशिष्टय आणि वेगळेपण असं ठिकठिकाणी दिसून येईल.
चौथ्या भागामध्ये ‘मिळून साऱ्याजणी’नं मुखपृष्ठांबाबत केलेले काही नाविन्यपूर्ण प्रयोग आपण पाहू. मला आवडलेलं यामधलं पहिलं मुखपृष्ठ सलील वैजापूरकर या आठवीतल्या मुलानं केलेलं आहे. शिक्षणामुळं बाईच्या जीवनामध्ये कसे रंग भरले जातात, हे दर्शवणारी दोन गोड चित्रं ह्या मुखपृष्ठावर दिसतात. परिवर्तनाच्या लढाईत काम करणाऱ्या सर्वांनाच उमेद देईल असं हे मुखपृष्ठ.
ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस ह्यांची चित्रं नेहमी हसरी असतात. एप्रिल २००१चं मुखपृष्ठ वरकरणी विनोदी वाटलं, तरी गंभीर आहे. दारूड्या नवऱ्यामुळे कातावलेली बाई, नवऱ्यावरचा संताप, घुसमट कपडे धुताना कपड्यांवर काढत आहे. तिची देहबोली आणि आपटल्या जाणाऱ्या कपड्याच्या दुसऱ्या टोकाला असलेला नवरा आणि त्याच्या हातातून पडलेले बाटली आणि ग्लास. बाईनं नवऱ्याला धोपटणं हे पुरुषी विनोदांमध्ये दिसेल. ते ‘साऱ्याजणी’च्या मुखपृष्ठावर दिसणं अचंबित करणारं आहे. तरी इथं ते येतं; पण गंभीर आशयासह. जानेवारी २०११च्या अंकावर कुंपणाची तर दातांनी चावणारी बालिका दिसते. मोनोक्रोमॅटिक रंगांमध्ये पोस्टराईझ केलेल्या फोटोमुळे ह्या कुंपणतोडीचा अन्वयार्थ जास्त तीव्रतेनं पोचतो.
जानेवारी १९९४ च्या अंकावर ख्यातनाम छायाचित्रकार देविदास बागुल यांनी काढलेला उत्कृष्ट फोटो आहे; तर फेब्रुवारी २००६च्या मुखपृष्ठावर शंकर ठोसर ह्यांचं एक विलक्षण सुंदर रेंडरिंग आहे. ह्या दोन्ही कलाकृतींना साजेसं व्हावं म्हणून ‘मिळून साऱ्याजणी’नं आपलं मास्टहेड ९० अंशामध्ये वळवून उभं केलं आहे.
पुरोगामी विचारांचे छायाचित्रकार रंजन बेलखोडे ह्यांनी आपल्या क्रिएटिव्ह फोटोग्राफी प्रयोगातून मार्च २००३चं मुखपृष्ठ साकारलंय. यामध्ये गळ्यापर्यंत पाण्यात बुडालेल्या मेधा पाटकर आणि त्यांनी अनंत हस्ते तारलेलं ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ हे वेगळ्याच पद्धतीनं दर्शवलंय. रंजनचंच पिवळ्या पार्श्वभूमीवर तीन पानाचं सुंदर कंपोझिशन जानेवारी २००३ च्या मुखपृष्ठावर आहे.
मार्च २०११च्या अंकावर सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस हे अनेक पाश्चात्त्य धार्मिक इमारतींच्या शिखरांच्या पार्श्वभूमीवर फेमिनिझमचा - फिमेल सिम्बॉल सर्वात उंच असल्याचं दाखवतात. तर एप्रिल २०१०च्या अंकावर चित्रकार गिरीश सहस्रबुद्धे हे जात-धर्माच्या भिंतीला खिंडार पडणारा माणूस दाखवतात. ही दोन्ही चित्रं वेगळेपणानं भाष्य करणारी आहेत.
तसंच ‘बाई’ ह्या शब्दामध्ये बाईला तोंड द्याव्या लागणाऱ्या अनेक घटना, प्रसंग, शेरेबाजी यांचं प्रभावी कोलाजवर्क सीमा पटवर्धन यांनी मार्च १९९७च्या अंकावर केलंय. तर मार्च २०१२च्या अंकावर ग्रामीण, आदिवासी किंवा गरीब जग आणि त्यांना दाखवली जाणारी श्रीमंती प्रलोभनं वेगळ्या प्रकारे चित्रित केली आहेत.
शिल्पकृतींचा परिणामकारक वापर काही मुखपृष्ठांवर केलेला दिसून येतो. ग्रीन ग्राफिक्स यांनी केलेल्या एप्रिल २०११ च्या अंकावर एक पुस्तक वाचणाऱ्या दोन आकृत्या, त्यांचं डोकं एकच असावं अशा पद्धतीनं जोडलं गेलंय. हे जुळलेल्या विचारांशी संबंधित आहे. मंदार मराठेंनी केलेल्या ऑगस्ट २०११च्या मुखपृष्ठावर एक बालक, त्याचे हात धरलेली एक प्रौढ आकृती आणि एका आकृतीची रिकामी जागा असं शिल्प मांडलं आहे. तर जुलै २०१४च्या सुप्रिया शिंदे यांनी केलेल्या मुखपृष्ठावर रोप लावणारी मुलगी आणि त्याला झारीने पाणी घालणारा मुलगा हे वास्तववादी शैलीमधलं शिल्प मांडलं आहे.
जून २०१२ - फळांची साल चक्राकार पद्धतीनं काढत गेल्यावर निघालेली साल सहज खाली टाकल्यावर त्यातून तयार झालेले सेमी अॅब्स्ट्रॅक्ट ह्युमन फॉर्म्स वापरून सुषमा दातार हयांनी इंटरेस्टिंग मुखपृष्ठ बनवलं आहे.
--- च्या अंकावर कव्हर पंच करून त्याला खिडकी बनवली आहे पार्श्वभूमी आहे आकाशाची, दृष्टिकोनाबाबत एक सुंदर संदेश हे मुखपृष्ठ देतं.
मार्च २०१९ चं मुखपृष्ठ हे ‘मिळून साऱ्याजणी’ भविष्याकडे कशा पद्धतीने पाहतं ह्याचं द्योतक आहे. अंधाऱ्या खोल विहीरसदृश्य जगातून प्रकाशमय आधुनिक जगाकडं एका शिडीनं चढून जाणाऱ्या तरुण मानवी आकृत्या दिसतात. ही शिडी ‘#’ हॅशटॅगच्या चिन्हांनी तयार केली आहे.
नव्या परिभाषेबरोबर, बदलांबरोबर सतत जुळवून घेत अद्ययावत राहण्याचा आणि प्रकाशाकडे ... निरामय जगाकडे जाण्याचा मार्ग काढत जायचा निर्धार जणू ह्या मुखपृष्ठांमधून व्यक्त होतो आहे.
शोषणाविरुद्ध उमटणारा सौम्य पण आग्रही आवाज - मिळून साऱ्याजणी
स्त्री ही पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये शोषित आहे. ह्या शोषणाविरुद्ध स्त्रियांची चळवळ आहे. त्याचा आवाज ‘मिळून साऱ्याजणी’ मासिक आहे. अर्थातच, स्त्री जर ह्या शोषणाविरुद्ध असेल तर इतर प्रकारांमधलं शोषण - ते धर्मानं केलेलं असुदे, अंधश्रद्धांच्या नावाखाली असू दे, जातीपातींच्या उतरंडीमधलं भयानक शोषण असू दे अथवा श्रमिकांचं, तळागाळातल्या माणसाचं व्यवस्था चालवत असलेलं शोषण असू दे. त्या शोषणाविरुद्ध चालणाऱ्या आंदोलनांना, चळवळीला स्त्री-पुरुष समतावादी चळवळीचा पर्यायानं त्यांचा आवाज असणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचा सक्रिय पाठिंबा असणं स्वाभाविक आहे.
‘मिळून साऱ्याजणी’ मासिकानं गेल्या तीस वर्षांमध्ये स्त्री-पुरुष समता केंद्रस्थानी ठेवून सोबत अनेक संबंधित विषय वेगवेगळ्या सर्जनात्मक पद्धती वापरून हाताळले. हे करताना पुरोगामी, मानवतावादी, विद्रोही, डाव्या विचारांचा, चळवळींचा आवाज बुलंद करायचं महत्त्वाचं काम आपल्या सौम्य; पण आग्रही पद्धतीनं केलं आहे. हे सगळं आपल्याला ‘मिळून साऱ्याजणी’ची गेल्या तीस वर्षांमधली मुखपृष्ठं पाहून जाणवल्याशिवाय राहत नाही. तीस वर्षांनंतर संस्थापक संपादक विद्या बाळ ह्यांच्या निधनानंतरही त्याच दृढपणानं ‘साऱ्याजणी’नं ही वाटचाल पुढे चालू ठेवली आहे. पुढच्या वाटचालीसाठी ‘मिळून साऱ्याजणी’ला खूप खूप शुभेच्छा!
मिलिंद जोशी
naturemilind@gmail.com