मित्राची गोष्ट

०८ जानेवारी २०२१

बऱ्याच वर्षांनी ‘वर्क फ्रॉम होम’च्या निमित्ताने कोकणातल्या आमच्या घरी आई-बाबांबरोबर राहण्याची संधी मिळाली. तेही बरेच दिवस. मग काय, आम्ही लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दिवसांत जुन्या फोटोंचे अल्बम, आईने माझ्या आणि माझ्या बहिणीच्या शाळेच्या दिवसातल्या कपाटात सांभाळून ठेवलेल्या काही वस्तू, शुभेच्छापत्रांची थैली असं सगळं आठवणींचं गाठोडं उघडून तासनतास गप्पा मारत बसत असू.

असंच एक दिवस माझ्या कप्प्यात एक फोटोची फ्रेम मिळाली. ग्रॅज्युएशनला असताना माझ्या जवळच्या मित्र-मंडळींनी दिलेली. किती छान ग्रुप होता आमचा. अचानक सर्वांची खूप आठवण आली. पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही सगळे वेगवेगळ्या शहरांत नोकरीच्या निमित्ताने गेलो ते पुन्हा कधी भेटण्याचा योगच आला नाही. आमचा एक मित्र आहे. आमच्यात कधी जास्त मिसळला नाही. कधी कुठल्या ट्रिपला आला नाही. मोजकचं बोलणारा आणि ज्याच्या नोट्स वर आम्ही अभ्यास करत असू असा. माझ्या आणि त्याच्या स्वभावात जितकी तफावत होती तितकीच आमची कौटुंबिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि आमच्या जडण-घडणीतसुद्धा होती.

निहाल कमी बोलायचा पण कधी तरी एकत्र डबा खाताना, चहाच्या टपरीजवळ बसल्यावर त्याच्या घरच्या, बालपणीच्या आठवणी सांगायचा. त्याच्या मालवणी टच असलेल्या मराठी शैलीत आणि अगदीच सामान्य भाषेत. या सगळ्याचं मला कौतुक वाटायचं. मला नेहमीच त्याच्या त्या अनुभवांमध्ये, जीवनपटामध्ये एक स्टोरी दिसायची. मी एका सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये लहानाची मोठी झाले. त्यात शिक्षकाची मुलगी. सतत आई बाबांच्या सावलीत राहिल्यानं म्हणावं तितकं स्ट्रगल, खडतर जीवन, व्यथा यांची झळ माझ्यापर्यंत थेट कधी पोहोचलीच नव्हती. मी बऱ्याचदा डायरी लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. निहालचे अनुभव ऐकता ऐकता एक भलतंच डोक्यात आलं. ते म्हणजे डायरी लिहिण्याचा आणखी एक प्रयत्न करायचा

तीच ही मी लिहिलेली माझ्या मित्राची गोष्ट! गोष्टीतला नायक मला सांगू लागला –

माझ्या इवल्याश्या हातांनी मी एक छोटसं रोपटं लावलं होत. कौलारु घर, टिपिकल कोकणातलं असतं ना अगदी तसं. घराच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला ऐसपैस जागा. मागे म्हणजे परसात पप्पांनी नानाविध झाडं लावली होती. कोकणात घरासमोरच्या अंगणाला ‘खळं‘ असं म्हणतात. आधी फार मेहनतीने समोरची जागा सपाट केली जाते. मग माती आणि शेण यांचं मिश्रण करून या मिश्रणाने सपाटीकरण केलेली जमीन दोन ते तीन वेळा लिंपून घेऊन हे खळं बनतं. आमच्या भाऊबंदांची म्हणजे ‘भावकी‘ ची घरं देखील साधारण अशाच घडणीची आणि अगदी थोडं फार अंतर ठेऊनच आहेत.

मी मघाशी बोललो नं ते रोपटं आंब्याचं. साध्या आंब्याचं. खूप लहान होतो तेव्हा. पप्पांच्या पायात पायात करत होतो म्हणून मग बसवलं पप्पांनी त्यांच्या पुढ्यात उचलून मला. माझे इवलेसे हात आता रोपट्याच्या मुळाशी असलेली माती थोडं थोडं पाणी वापरून रोपट्याचा मुळांना जमिनीत हळुवारपणे एकजीव करण्यात मग्न होते. वर पप्पांचे हात मार्गदर्शन करण्यात मग्न होते. आम्ही रोपटं जमिनीत लावलं. एवढंसं कोवळं रोपटं लाल मातीत छान उठून दिसत होतं. पप्पांनी मस्त जागा शोधली होती त्याच्यासाठी. माझी नजर अजूनही त्या रोपट्याकडे कौतुकाने पाहातच होती. तोच पप्पा हातात एक लोखंडाची जाळी घेऊन आले. ” छोट्या, बाजूक हो वायच आता. आये बोलवता बघ जा थय ” असं म्हणत उन्हाच्या तडाख्याने रापलेला त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवत मला त्यांनी मागे ओढलं.

‘हं..‘, म्हणत मी तिथंच दोन- चार पावलं मागे सरकलो आणि पप्पांच्या कृतीला न्याहाळू लागलो. त्यांनी ते लोखंडी जाळं त्या रोपट्याभोवती लावलं. आता माझं रोपटं त्या प्रचंड जाळ्यासमोर एवढंसच दिसू लागलं. मी कुणकुण केली आणि अजूनही नीटसं म्हणजे भाषेतलं आणि शब्दातलं बोबडेपण न गेलेल्या स्वरात म्हणालो, ” ह्या कशाक पप्पा, झाड दिसत पण नाय माझा”. माझा प्रश्न न टाळता पप्पांनी बरोबर ओळखला आणि उत्तरादाखल हातांसारख्याच उन्हात रापलेल्या चेहऱ्यावर – कपाळावरच्या आठ्या दूर केल्या. उन्हाच्या तिरपीने बारीक झालेले डोळे पूर्ववत करीत एक गाल न हलवता फक्त एकाच गालाने स्मित करीत म्हणाले, “लेका, त्येका संरक्षण नको? नायतर जनावरा त्येका खाऊन टाकतीत आणि उद्या विचारशीत पप्पा माझा झाड खय गेला म्हणून”.

“मग म्हणून काय त्येका कुंपण?” मी हळूच पुटपुटलो. आईने माझे हात-पाय-तोंड स्वच्छ धुतले आणि आम्ही घरात गेलो.

आता या गोष्टीतलं एक प्रकरण पूर्ण झाल्यासारखं वाटलं. हे अशा स्वरूपात लिहिताना त्याच्या आयुष्यातले प्रसंग, आजूबाजूचं वातावरण हे सगळं माझ्याभोवती कधी उभं राहिलं कळलंच नाही आणि म्हणूनच मी पुढच्या टप्प्याला लगेचच हात घातला. नायक शांतपणे सांगत होता…

एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातला माझा प्रवास सुरु होता. मी गावातल्याच एका शाळेत जाऊ लागलो. वडिलांची नोकरी एसटी महामंडळात होती. ते मेकॅनिक म्हणून काम करत होते. एक दिवस मी आईला म्हटलं, “आई, मी नाय जातलंय शाळेत, जाऊन येऊन माझे पाय दुखतंत. किती लांब हा शाळा.” “शाळेत नाय जातलंस तर काय बैल म्हशी सांभाळतलंस? “, आईने चिडून एक धपाटा दिला आणि जवळ ओढून पाय दाबू लागली. मी लहान होतो. साधारण तिसरी- चौथीत. तेव्हा दुकानातून काही आणायचं असेल तर खूप दूर जावं लागे. गावचं देऊळ पण खूप लांब होतं. त्यामुळे जत्रा, उरूस असं सगळंच खूप लांब वाटे. शाळेत कधी कुणी मास्तर विचारे – ” तू बौद्धवाडीतल्या तांब्यांचो झील ना रे ?”

बौद्धवाडी. कालपरत्वे कळत गेलं की प्रत्यक्ष गावापासून आमची वस्ती बरीच लांब म्हणजे वेशीवरच होती. जसजसा मोठा होत गेलो, शाळा कॉलेजात गेलो तेव्हा माझ्यासारखे बरेच मित्र-मैत्रिणी भेटले. त्यांच्याकडून पण सर्वसाधारण हेच ऐकायला मिळालं की दलित लोकांची वस्ती ही गावापासून थोडी दूरच असते. ती का असते? तर पूर्वीपासूनच गावाच्या रचना तशा तयार झाल्या. मग तेच पुढेही चालू राहिलं. खेडेगावांची भौगोलिक रचनासुद्धा आपल्या इतिहासावर अवलंबून आहे. तीसुद्धा या जातीयतेच्या शापातून मुक्त होऊ शकली नाहीये. त्या अजाणत्या वयातही मला घराच्या बाहेर पडल्यावर पहिल्यांदा जाणीव झाली की आपण ‘थोडे वेगळे‘ आहोत. गावच्या शाळेत शिकत असताना काही मुलांचा हात माझ्या डब्यातून खाऊ घेताना बिचकायचा. क्षणभर का होईना थबकायचा. त्यांचे डोळे काहीतरी आठवल्यासारखे हावभाव करीत… मी हे पाहिलंय. कदाचित गुरुजींचं ते वस्तीचं किंवा वाडीचं नाव वरवर विचारणं, सर्वांसोबत खेळताना माझ्याच वयाच्या मुलांकडून येणारा अनोळखीपणा मला अस्वस्थ करायला लागला होता. ‘मी महत्त्वाचा नाही किंवा मी वेगळा आहे‘ अशी जाणीव कळत नकळत मनात यायला लागली होती. त्यामुळेच की काय, माझे शाळेत, गावात मित्र कधीच झाले नाहीत. माझ्या तीन बहिणी आणि काका, मामांची पोरं – जवळपास सगळेच वयात एक-दोन वर्षांचं अंतर असलेले होतो.

विहार आमच्या घरापासून अगदी जवळच होतं. मग तिथे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, वंदना या कार्यक्रमांना मी आवर्जून जाऊ लागलो. तिथे सगळं ‘आपलंस वाटायचं‘. वाडीतल्या पोरांशी ओळखी झाल्या. एकूणच या सगळ्यांच्यात वावरताना ‘ऑकवर्ड‘ नाही वाटायचं. गणित शिकवणारे गुरुजी आवडायचे. अभ्यास नकोसा नाही वाटला शाळेत. कारण मी त्यालाच माझा मित्र करून टाकलं. शाळेत कधी इतर मुलांमध्ये मनमोकळेपणाने खेळल्याचं नाही आठवत.

घरी शेतीही होती. शाळेतून घरी जाण्याची कित्ती कित्ती ओढ वाटे म्हणून सांगू! आम्ही पोरं अशीच…आपल्या वस्तीत, आपल्या माणसात कम्फर्ट झोन तयार करीत जातो. कारण तिथे आयडेंटिटी फोबिया कधी जाणवतच नाही.

माझ्या गोष्टीतला नायक किंचित थांबला. कदाचित माझ्या हावभावावरुन असेल. मला ‘शेती’ म्हटल्यावर आठवलं बाबांनी कधी तरी आमच्या गावाकडची शेती ते नोकरीला लागल्यावर सावकाराकडून कशी सोडवून घेतली होती हे सांगत. आम्ही बाबांच्या गावी जास्त कधी गेलो नाही आणि सणासुदीला गेलोच तरी शेताकडे जाण्याचा योग फारसा आला नाही. असो. नायक म्हणतोय म्हणून गोष्टीकडे वळूया.

आमच्या छोट्याशा शेतीमध्ये प्रामुख्याने भुईमूग पिकायचा. भुईमुगाच्या शेंगा धुण्यासाठी पोत्यात भरतात आणि घराच्या जवळूनच वाहणाऱ्या नदी प्रवाहात सोडतात. तिथेच त्या धुऊन निघतात. पोत्यातच थोड्याशा खळबळल्या की. मी उंचीने अगदीच बुटका आणि अंगकाठीने बारीक होतो. एखादं पोतं निवडायचं आणि त्यावर आकाशाकडे तोंड करून झोपायचं. मी त्या पोत्यावर छान अकोमोडेट व्हायचो. पाठीखाली पोतं, नदीचं वाहतं पाणी आणि डोळ्यांपुढे निरभ्र, नितळ आकाश….भुईमूग काढण्याचा हंगाम सुरु झाला की मग काय! मी शाळेत फक्त आई मारते म्हणून जाई, पण माझं मन कधीच नदीवर पोहोचलेलं असे. शेंगांच्या पोत्यावर झोपलं की गंमत वाटायची, पोतं कसं आपल्या वजनासकट त्या पाण्यावर तरंगतं! मनाचंही काहीसं असंच असतं नाही? त्यालाही स्वतःचं मोकळं आकाश बघायचं असतं. सगळं मळभ पाठीखाली घालून स्वतःच्या क्षितिजात छान रमायचं असतं.

आकाश आणि आकाशातल्या चांदण्या मला नेहमीच खास वाटत आल्यात. गावातलं आमचं रुटीन आता पक्कं बसलं होतं. सकाळी शाळा आणि शाळेतून आल्यावर आजोबांना आणि पप्पांना शेतीतल्या कामात होईल ती केलेली मदत, संध्याकाळचा अभ्यास या सगळ्यात माझा दिवस निघून जात होता.

माझ्या आंब्याच्या रोपट्यानंही एव्हाना नवख्या जमिनीत जोम धरला होता. त्याचा बुंधा मजबूत व्हायला सुरूवात झाली होती. लोखंडी जाळीच्या जाड कुंपणामधून आता त्याची हिरवीगार पानं वाऱ्याच्या झोतासोबत हलत असत आणि मनाला एक वेगळाच आनंद होत असे.

पुढे काही दिवसांनी चौथीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर पप्पांना तालुक्याच्या ठिकाणी एसटी क्वार्टर्समध्ये एक खोली राहायला देण्यात आली – एसटी महामंडळाकडून. मी, माझ्या तीन बहिणी, आई, पप्पा असे आम्ही सगळे आता तालुक्याच्या ठिकाणी राहू लागलो. मला चांगल्या हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आलं. मित्रपरिवार तिथे गावीही नव्हताच, त्यामुळे मला नवीन जागी स्वतःला बघताना फारसा त्रास झाला नाही. हां, पण गावचा धो धो पाऊस, नदी, घरासमोरचं अंगण, आमचं प्रशस्त घर आणि माझं झाड …यांची फार आठवण येई.

आम्ही आता राहत असलेलं घर म्हणजे एक जुनी-पुराणी, साधारण तीस एक वर्षांपूर्वी बांधलेली इमारत होती. त्यात पण छोट्या-छोट्या दोन-दोन खोल्यांची घरं. एका मजल्यावर आठ कुटुंबं राहत. सगळ्यांच्या घरासमोरून एकच लांबलचक गॅलरी होती. येण्या-जाण्यासाठी एकच जिना. तोही इमारतीच्या एका बाजूने तयार करण्यात आला होता. म्हणजे एका मजल्यावरच्या अगदी शेवटच्या घरातल्या कुणाला बाहेर जायचं असेल तर त्याला सात घरांच्या समोरून लांब आणि अरुंद जिन्यापर्यंतचं अंतर कॉमन गॅलरीतून पार करून जावं लागे. दोन घरांमध्ये खूपच कमी रुंदीची एक भिंत होती. इमारतीत माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा मोठी-लहान अशी सगळी मुलं होती. एसटी कॉलनीतली सगळीच कुटुंबं थोड्याश्या कमी-जास्त फरकाने साधारण एकाच आर्थिक वर्गातील होती. मला वाटलं की मला खूप मित्र-मैत्रिणी मिळतील, खेळायला मिळेल. पण हा माझा भ्रम दूर व्हायला जास्त दिवस लागले नाहीत.

माझी नवीन शाळा, अभ्यास सगळं सुरळीत सुरु झालं. दरम्यानच्या काळात पप्पांना व्यसन लागलं. दारूचं व्यसन. पप्पा खूप जास्त दारू प्यायला लागले होते. आमची घरची आर्थिक स्थिती कोलमडायला वेळ लागला नाही. मी इमारतीच्या खालच्या छोट्याशा जागेत मुलांसोबत कधी कधी संध्याकाळच्या वेळी क्रिकेट खेळायला जात असे. पाचवी-सहावीत होतो मी. अंगकाठीने अगदी सामान्य, उंचीने बुटका. माझ्या वयाच्या इतर मुलांपेक्षा मी जरा लहानच वाटे. त्यात मी खूप कमी बोलायचो. मी क्रिकेट खेळत असताना इमारतीच्या गेटवर हातात बाजाराने भरलेल्या, झेपत नसलेल्या आणि तरीही त्या हातात घट्ट धरून, स्वतःचा तोल सांभाळत अर्धवट उघड्या लालबुंद डोळ्यांनी येणारा माझा बाप दिसे. तसा मी बॅटिंग करत असलो तरी बॅट मधेच टाकून धावतच त्यांच्याकडे जाई आणि माझ्या तेवढंही ओझं न झेपणाऱ्या हातात त्या पिशव्या काढून घेई आणि पप्पांसोबत सवंगड्यांच्या नजरा चुकवत खाली मान घालून निघून जाई. पप्पांनी आईवर किंवा आमच्यावर हात उगारल्याचं कधी आठवत नाही. पण त्यांची ती न संपणारी आणि खूप मोठ्या आवाजातली निरर्थक बडबड ऐकून जीव घाबरा-घुबरा होत असे. परिस्थितीमुळे अचानक कोणाच्याही नकळत मॅच्युअर झालेली आमची मोठी बहीण रात्रीची जेवणं झाली की आम्हा भावंडांना इमारतीच्या टेरेसवर घेऊन जाई. तिथून आकाश दूर दूर मोकळंच मोकळं दिसे. मोकळं आकाश आणि चमकणारे तारे मी तासनतास न्याहाळत बसे. मग पप्पा झोपल्यानंतर आम्ही दबक्या पावलांनी घरात जाऊन झोपी जात असू. हळूहळू हे रोजचंच झालं. इमारतीतले लोक, लहान मोठे सगळेच, माझ्या बापाविषयी फावल्या वेळेत चर्चा करीत. आर्थिक समतोल राहावा म्हणून माझ्या मोठ्या बहिणीच्या सांगण्यावरून आई लिज्जत पापडचं काम घ्यायला लागली. आई एकावेळी दहा-दहा किलोचं पीठ कंपनीतून घेऊन येई आणि त्या छोट्याशा खोलीत आम्ही चौघं आईसोबत पापड लाटत बसत असू. दीदीच्या शिस्तबद्ध असण्यामुळे आणि एकूणच संस्कारांमुळे शाळेचं दप्तर पाठीवरून काढलं की हात-पाय धुऊन थेट पापड लाटण्याची मोहीम मी हाती घेई.

हं….आज माझी मैत्रीण विचारते, ” निहाल, एवढ्या गोल आणि इतक्या लुसलुशीत चपात्या कशा बरं करतोस तू?” आणि या प्रश्नासरशी, एसटी कॉलनीतली ती छोटीशी खोली, पापड लाटणारे आम्ही, पापड लाटताना कोणीही कंटाळा करू नये म्हणून दीदीने उगीचच केलेले विनोद आणि या सगळ्यामुळे पाचवी-सहावीतच अचानक आलेली समज, हे सगळं लख्खपणे माझ्यासमोर उभं राहतं आणि मी हसत हसत तिला उत्तरादाखल म्हणतो, ” उसके लिये बचपन में पापड बेलने पडते है “

नायक कसा मिश्कीलपणे हसतोय. मी असा प्रश्न निहालला विचारणं खूपच स्वाभाविक आहे. कारण असं की एमबीएसाठी मी पहिल्यांदा घरातनं बाहेर पुण्यात राहायला गेल्यावर आणि मेस च्या जेवणाला कंटाळून मी स्वतःचं जेवण स्वतः करायला लागले तेंव्हा पहिल्यांदाच जाणीव झाली कि आईने डब्यात दिलेल्या चपात्या संध्याकाळपर्यंतसुद्धा मऊच राहायच्या, अगदी जश्याच्या तश्या. घरी असताना आई बाबांकडे खूप हट्ट केला आवडत्या भाजीसाठी – बाहेरचं, बेकरीतलं खाण्यासाठी. लहान असतानासुद्धा आणि अगदी आत्ताही. पण आपला नायक म्हणतो –

इथे आपण वेगळे आहोत. घरची परिस्थिती खूप नाजूक झालेली होती. ज्या वयात इतर मुलं मला ह्या रंगाचा ड्रेस पाहिजे, तो व्हिडीओ गेम पाहिजे, यासाठी आई-वडिलांकडे हट्ट करून रडतात, त्या वयात असा कोणताही बालहट्ट न करण्याइतकी आमची कोवळी मनं पोक्त झाली होती. कॉलनीतली इतर मुलं मला त्यांच्यात फारसं इन्व्हॉल्व्ह नाही करून घ्यायची. मला आठवतं, मला शेजारच्या घरातल्या मुलाचा विडिओ गेम तो खेळत असताना पाहायला आवडायचा – मारीओ. मी दुरूनच कॉमन गॅलरीत उभा राहून त्यांच्या घराच्या खिडकीतून तो पाहायचो. पण मला काका-काकूंनी कधी आत बोलावलं नाही. एकदा दोनदा दीदीने ओरडल्यानंतर मी गेम पाहणं बंद केलं.

आता अभ्यासाचा व्यापही वाढत होता. इमारतीतले काही ठराविक लोक आम्हाला सणासुदीला, वाढदिवसाला बोलवत नसत. मला वाटायचं हे सगळं पप्पांमुळेच होतंय. मी माझ्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक वाईट घटनेला आता आमच्या परिस्थितीशी नेऊन जोडू लागलो. पण तोही भ्रम लवकरच दूर झाला. जवळजवळ पाच वर्षानंतर पप्पांनी दारू पूर्णपणे सोडली. परिस्थितीही हळूहळू बदलत गेली. माझ्या मनातली ती अनामिक भीती दूर झाली. संकोचलेलं माझं मनं आता चारचौघात मोकळं झालं. पण तरीही आजूबाजूला काही लोक पूर्वी होते तसेच राहिले. हे सर्व लोक ‘सवर्ण‘ अर्थात ‘अप्पर कास्ट‘ कुटुंबातले होते आणि अशा प्रकारे जरा उशीरानेच का होईना पण मला ‘मी लोअर कास्ट‘ कुटुंबातील घटक आहे याची ओळख पहिल्यांदाच समाजाकरवी झाली. पुन्हा एकदा ‘मी वेगळा आहे‘ ही भावना मनात त्याच पूर्वीच्या तीव्रतेने शिरली.

त्या संध्याकाळी घराच्या दारातून कोकणातला धो-धो कोसळणारा तो पाऊस बघताना माझ्या मनात अनेक प्रश्नांचं काहूर माजलं. कोसळणाऱ्या पावसाचा पत्र्यांवर जोरात येणारा आवाज आणि माझ्या मनातले असंख्य प्रसंग आणि प्रश्न एकाच वेळी माझ्या कानांवर आदळत होते. पावसाची सर ओसरल्यानंतरही आकाशात आता काळेकुट्ट ढग दाटले होते आणि माझ्या मनातलं वातावरणही तितकंच गढूळ झालं होतं.

यानंतर नायकाला एक मोठा श्वास घ्यावासा वाटला आणि मग कथा पुढे चालू राहिली. –

‘हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे, तुमच्यामुळेच बाबा मी, श्वास घेत आहे.‘ ही आणि अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आणि गौतम बुद्धांची बरीच गौरवगीतं लहान असल्यापासून कानी पडत. त्यांच्या चाली ठरलेल्याच असायच्या. पण काही काही गाण्यांचे बोल खूप अर्थपूर्ण वाटायचे.

डॉ. आंबेडकरांनी आपल्या समाजातल्या सामाजिकदृष्ट्या मागास आणि वंचित अर्थात तथाकथित लोअर कास्ट लोकांना बुद्ध धर्माचा मार्ग दाखवला. त्यांना महार, मांग, चांभार अशा शब्दांनी हिणवले जाऊ नये आणि त्यांना स्वतःचा एक असा धर्म असावा हा त्यामागचा मुख्य हेतू. अर्थात त्याचे इतर अनेक पैलू आणि उद्दिष्टे आहेतच.

या बुद्ध धर्माची व्याख्या जी घरात शिकवली गेली ती फार उदारमतवादी होती. आई-पप्पा, मोठी बहीण यांच्या वागण्यातून चर्चांमधून मला समजलेला धर्म साध्या आणि सोप्या भाषेत काहीसा असा होता –

  • बुद्धधर्मात घेतल्या जाणाऱ्या २२ प्रतिज्ञा जशाच्या तशा मनाला पटत नसतानाही त्यांचं पालन करणं बंधनकारक असू नये. म्हणजेच धर्माच्या उपदेशांचं स्वतःच्या सद्सदविवेकबुद्धीला काय योग्य आणि काय अयोग्य वाटतं त्यानुसारच पालन करावं.
  • धर्म नेहमी ‘ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह‘ने म्हणजेच व्यापक दृष्टिकोनातून पडताळावा. उदाहरणार्थ, देवदेवतांचं पूजन करावंसं वाटलं, तसं करून जर आत्मिक समाधान मिळत असेल तर खुशाल करावं. माझे पप्पा स्वतः निर्व्यसनी झाल्यापासून आजतागायत सोमवारी उपवास करतात. ही त्यांची वैयक्तिक समाधानाची प्रक्रिया आहे. म्हणजेच आपल्याला ज्या कृतींमधून, ज्या प्रार्थनांमधून मानसिक स्वास्थ्य लाभते ते करण्याची मोकळीक आणि तसा हक्क आपल्या देशाचे संविधानच आपल्याला देऊ करते.
  • माणुसकीला धोका असणारी, माणसामाणसांत भेद निर्माण करणारी आणि उच्च-नीचवाद, तुच्छतावाद या भावना समाजमाणसांत रुजवणारी कोणतीही गोष्ट ही धर्माच्या नावाने कलंकच असते, यात शंका नाही.

परंतु समाजाने, आजूबाजूच्या लोकांनी जो धर्म ‘तुझा आहे‘ म्हणून सांगितलं त्यामध्ये आणि यामध्ये फार तफावत होती. यातूनच मनावर कधीही न भरून निघणारा एक ओरखडा बसला. तो प्रसंग आजतागायत मनाला प्रचंड वेदना देणारा आहे. मी दहावीत होतो. माझ्या बहिणीही आता मोठ्या झाल्या होत्या. एसटी कॉलनीतली ती छोटीशी खोली आता अपुरी पडत होती. त्यात लहान मुलांच्या रडण्याचा, खेळण्याचा आणि एकूणच चाळसदृश्य वातारवणाचा परिणाम आमच्या अभ्यासावर होत होता. आम्ही बाहेर म्हणजे शाळा-कॉलेज, बाजारपेठ यांच्या जवळपास कुठेतरी राहायला जाण्याचा निर्णय घेतला. माझी शाळा तेव्हा सकाळच्या वर्गात होत असे. पप्पा दिवसभर कामावर जात. त्यामुळे नवीन खोली भाड्याने शोधण्याचं काम साहजिकच माझ्यावर येऊन पडलं. मीपण मग जिथून माहिती मिळेल, तिथे पायी पायी जाऊन चौकशी सुरु केली. एकदा एका घरासमोर थांबलो. तिथे गेटवर एक बोर्ड लावला होता. ‘येथे सुशिक्षित कुटुंबासाठी १ बीएचके जागा भाड्याने देणे आहे‘. मी गेटवरूनच मालकांना आवाज दिला, “कोणी आहे का घरात?” त्याबरोबर एक मध्यमवयीन बाई डोळ्यावरचा चष्मा हाताच्या बोटाने नाकावर स्थिर करत बाहेर गेटवर पाहू लागली. गेटपर्यंतचे काही अंतर तिने चालून पार केलं. मी काही बोलणार याआधीच बहुधा तिला अंदाज आला होता की मी खोलीविषयी चौकशी करायला थांबलो आहे. तिने मला थेट प्रश्न केला, “आडनाव काय तुमचं?” मी म्हणालो “तांबे”. स्वतःलाच काहीतरी कळल्याच्या सुरात पण न लाजता ती म्हणाली, “म्हणजे एससी ना? नाही हो आमच्याकडे खोली शिल्लक.”

मी काही समजणार, बोलणार, उत्तरणार याआधीच ती बाई घरात गेली आणि तिने दरवाजा बंद केला. मी काही क्षण अचानक स्तब्ध झालो. बंद दरवाजाकडे मोठ्या आश्चर्याने पाहू लागलो. रणरणत्या उन्हात मी काहीही समजेपर्यंत तसाच थोडं अंतर चालत गेलो. मला काही सुचेनासं झालं. नंतर बंद दुकानाच्या दारात बसलो. बॅगमधनं पाण्याची बाटली काढली आणि घटाघटा प्यायलो. तसं आडनाव विचारलं जाण्याची मला सवय होतीच. गावाकडेही तशी विचारणा बऱ्याचदा लोक करीत. पण आज मी एका विशिष्ट संदर्भाने त्या बाईसमोर उभा होतो. माझ्या आडनावावरून तिने मला खोली भाड्याने देणं नाकारलं. कंठ दाटून आला होता, पण आजच्या आज खोली शोधणं गरजेचं होत. कारण पप्पांनी एसटी क्वार्टर्समध्ये आधीच कल्पना देऊन ठेवली होती. मी त्या दिवसात चार ते पाच खोल्यांविषयी चौकशी केली. मला सगळीकडे माझं आडनाव विचारलं गेलं आणि ते मी जेव्हा सांगितलं तेव्हा मला खोली देण्यास नकार देण्यात आला. हे सगळं माझ्यासोबत काय घडत होतं? वयाच्या सोळाव्या वर्षी ‘मी वेगळा तर आहेच पण तुच्छही आहे‘ अशी अपमानास्पद वागणूक मिळणं माझ्यासाठी फार नवीन होतं. हताश झालो. घरी गेलो. आई-पप्पांना सगळं सांगितलं. त्यावर पप्पा म्हणाले; “असू दे, मी उद्या बघतंय दुसरीकडे. तू उगीच उन्हा-तान्हाचो फिरा नको. अभ्यासावर लक्ष दी.” त्यांनी हे सगळं इतक्या सहज कसं बरं स्वीकारलं याचा विचार करतच होतो तोवर माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपून समजुतीच्या सुरात आई म्हणाली, “काय करतलंस लेका, असा वाईट वाटून खय जातलंस? असतंत काही लोकांचे विचार तशे. तू लक्ष नको देव. चला जेवणा करून घेवया.”

त्या रात्री मी टेरेसवर एकटाच बसलो. बराच वेळ. शेड्यूल्ड कास्ट असणं ही माझी आयडेंटिटी होती. मला लोकांकडून हे असं नाकारलं जाणं मनात खोल कुठेतरी अस्वस्थ करत होतं. पण आई-पप्पांना या गोष्टीची इतकी सवय कशी झाली होती हे नंतर मला आलेल्या अनेक अनुभवांवरून कळलं. आम्ही पप्पांनी फायनल केलेल्या एका छान खोलीत राहायला गेलो. खोली शोधून मिळेपर्यंत माझी दहावी पूर्ण झाली होती.

मी माझ्या आणखी एका मैत्रिणीकडून अशा प्रकारचा अनुभव ऐकलाय. त्यावर माझ्या बाबांनी मध्यंतरी काही लिहिल्याचंही मला आठवतंय. आजही कित्येक दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात आणि मन सुन्न होतं. कित्येक व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या दलित मुलांना त्यांच्याच वयाच्या इतर मुलांकडून आरक्षणावरून उठता-बसता टोला मारला जातो. माझ्या मित्राच्या गोष्टीतही तसंच घडलयं. तो सांगतो –

मी महाविद्यालयामध्ये दाखल झालो. एव्हाना मला आडनाव विचारलं जाण्याचा आणि “एससी का?” असा त्यामागून लगेचच येणाऱ्या सुराचा चांगलाच सराव झाला होता. वाईट वाटणं, लाज वाटणं हे सगळं थोडं कमी झालं होतं. कधीकधी तर शिक्षकसुद्धा “काय रिझर्व्हेशन का?” असा प्रश्न विचारायचे. माझ्या मनात या सगळ्या प्रसंगांचा परिणाम म्हणून एक भिंत तयार होत होती, जी मला या समाजापासून दूर करत होती. ही अदृश्य भिंत फार भयानक होती. माझ्या स्वभावात होणारे बदल मला स्वतःलाही न पटणारे होते. बऱ्याचदा तर हा प्रश्न पडायचा की मी स्वतः तर कधीच कुणाला माझा जात-धर्म सांगत नाही, मग त्यांना आधीच कसं बरं माहीत?

पदवीचं शिक्षण पूर्ण करताना मला बरीच चांगली माणसंदेखील भेटली. मोजकाच पण चांगला मित्रपरिवार भेटला. त्यांच्यातही मी तितकासा मिसळत नसे. पण आजकाल मला ‘वेगळा’ न समजणारी माणसं फार आपलीशी वाटायची. मी मिळणारा मोकळा वेळ आता जास्तीत जास्त महाविद्यालयाच्या प्रशस्त वाचनालयामध्ये घालवू लागलो. या काळात डॉ.आंबेडकर, महात्मा फुले, डॉ.दाभोलकर यांच्याविषयी बरंच वाचन केलं. या सगळ्या महान व्यक्तींच्या विचारांना प्रगल्भ बनवणारा एक महत्त्वाचा धागा होता – उच्च शिक्षण आणि अभ्यास. मी ठरवलं मला शहरात जायचंय एमबीए करण्यासाठी. आई-पप्पांनाही वाटलं, पोरगं इथं राहून फारचं एकलकोंडं होत चाललंय. थोडंसं व्यवहारज्ञान शिकेल. पदवीचं शिक्षण डिस्टिंक्शनमध्ये, एमबीएची प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो आणि पहिल्यांदाच घरापासून दूर, कोकणापासून दूर शहरात आलो. सुदैवाने मला या व्यावसायिक शिक्षणासाठी लागणारी फी अतिशय नॉमिनल होती कारण मला कॅटेगरीमधून प्रवेश मिळाला. सुरुवातीचे तीन-चार महिने बार्टीच्या मुलांच्या वसतिगृहात राहत होतो. तिथे सर्वच दलित मुलं होती. सगळेचजण वेगवेगळ्या खेडेगावातून खूप काही स्वप्नं,आकांक्षा आणि घरची आतापर्यंतची परिस्थिती बदलण्याची जिद्द यांचं भलंमोठ्ठ गाठोडं पाठीशी बांधून आली होती. त्यांच्याशी बोलताना, त्यांचे अनुभव ऐकताना अंगावर शहारा येई. लोक म्हणतात की अस्पृश्यता आता इतिहासजमा झाली आहे. पण वास्तव तसं नाहीये. ‘अस्पृश्यता‘ हे जातीभेदाचं उघड दिसणारं रूप आहे. बऱ्याच अंशी ते कमी झालंही असेल, पण काही खेडेगावांमध्ये ती अजूनही उघडपणे पाळली जाते. जसजसं आपण खेडेगावातून दूर येतो – शहरांकडे, तसतशी या जातिभेदाची रूपं बदलतात एवढंच. आम्ही अनुभवलंय. खेड्याकडून शहराकडे, इतिहासातून वर्तमानाकडे येताना या जातीभेदाचे फॉर्म्स म्हणजेच रूपं बदलली आहेत, अस्तित्व नाही.

एमबीएचं शिक्षण पूर्ण करताना मी पुढे भाड्याच्या खोलीमध्ये राहिलो. चांगल्या गुणांनी माझं व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलं. दरम्यानच्या काळातही खूप काही शिकलो. चांगल्या पुस्तकांमधून, चांगलं ऐकण्यामधून आणि बरचसं अनुभवांवरून. एका गोष्टीचं सतत वाईट वाटत राहिलं, आरक्षणाचा अर्थ अप्पर कास्ट मुलांना खूप चुकीच्या पद्धतीने कळतो. मग तो समाजमाध्यमांतून असेल, घरातून आणि मित्रपरिवारातून असेल किंवा राजकीय संदर्भातून असेल.

मला पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असताना देखील दुर्दैवानं आरक्षणाच्या बाबतीत वर्गातील मित्रमैत्रिणींकडून फार चुकीचं ऐकायला मिळे. काहीजण जाणूनबुजून मला टोमणेदेखील मारत. या सगळ्या अनुभवातून मी एका वेगळ्याच विचारप्रतलावर पोचलो. ते म्हणजे – शिक्षणाला पर्याय नाही. आजही मला बऱ्याचदा “तुमची काय… होईल रे कोटामधून निवड.” “वाटत नाही तुझ्याकडे बघून तू कॅटेगरीमधला आहेस. दिसण्यावरून, वागण्या-बोलण्यावरून तू मला सवर्णच वाटलास अरे.” असे आणि यासारखे अनेक शब्द कानी पडतात.

आम्ही वेगळे म्हणजे असे काय दिसतो बरं? दिसण्यावरून सवर्ण आणि दलित याचा अंदाज कसा लावता येतो? मी ‘राम-कृष्ण हे देव मानत नाही‘ हे समोरच्या व्यक्तीने कसं ठरवलं? गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भक्तीच्या नावाखाली त्वेषाने आणि कानाला त्रास होईल इतक्या मोट्ठ्या आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा आपल्यालाच धमकावण्यासाठी तर नाहीत ना, या असुरक्षिततेच्या भावनेनं मला आतून भीती का वाटते? आमच्यासाठी पास होणं सोप्पं असतं असं म्हणताना आमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा अंदाज बांधत असतील का?

मी क्षणभर भारावूनच गेले. हे सगळं निहाल मनात किती वर्ष साठवून आहे? हे प्रश्न विचारताना त्याच्या आतल्या उत्कट भावना एवढ्या प्रकर्षाने व्यक्त होत असताना मी पहिल्यांदाच पहाते आहे. तो एकदम सगळं एकाच श्वासात बोलून झाल्यासारखं किंचित थांबला.

मग मीच थोडं बोलती झाले – ” मला असं वाटतं की आजचा दलित युवा वर्ग अधिकाधिक खंबीर होतो आहे. याचं महत्त्वाचं कारणं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांमुळे ते जागरूक आणि निर्भीड होत आहेत. ते आता कोणाच्याही अधीन राहिलेले नाहीत. त्यांना अन्यायाविरुद्ध लढायचे आहे आणि हा जो ठामपणा आहे – न्यायासाठी, सत्वासाठी संघर्ष करण्याचा – तो कुठे ना कुठे तरी त्यांच्या भावनांना आणि स्वाभिमानाला बळकट बनवत आहे."

निहाल पूर्वी सतत म्हणायचा, “डॉ. आंबेडकरांनी सांगितलं – शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या ‘संघर्ष करा’ पर्यंत पोचण्यासाठीचा मार्ग केवळ शिक्षणातूनच जातो. आपल्यासमोर एकच मार्ग आहे – अभ्यास आणि जिद्द. अलीकडेच त्याचा एक इमेल आला. त्याच्या आवडीच्या क्षेत्रात स्पर्धा परीक्षांमधून तो सिलेक्ट झाल्याचा. त्याआधी त्यानं कम्युनिकेशन स्किल्स आणि इंटरव्ह्यूशी संबंधित तयारी करताना मला फोन केला होता. खूप काही प्रश्न एकाच वेळी विचारण्यासाठी म्हणून."

आता असं वाटतंय की या गोष्टीतला शेवटचा अध्याय सुरु झालाय. यावेळी मात्र नायक फार उत्साहाने पण चेहऱ्यावरील तेच सामान्य हावभाव आणि त्याच नेहमीच्या अगदी साध्या शैलीत बोलतोय –

अरे हो, महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलं. मी माझ्या मूळ गावी गेलो होतो काही दिवस. बऱ्याच वर्षांनंतर. सगळं काही तसंच आहे, जसं लहानपणी होतं तसं. अंगणात मी लावलेलं ते आंब्याचं एवढंसं रोपटं केवढं मोठं झालंय. त्याला फुटलेल्या मोहोराचा सुवास रोमारोमांत भरून गेलाय. परिपक्व झालेल्या त्याच्या फांद्या, त्यांच्यावरची हिरवीगार पानं माझं लक्ष वेधून घेतायत. आणि त्याचा बुंधा? आजूबाजूच्या इतर झाडांपेक्षा किंचित जास्तच मजबूत आणि भरभक्कम दिसू लागलाय. त्याच्या भोवताली घातलेलं ते जाड तारांचं लोखंडी कुंपण त्याने केव्हाच भेदून टाकलंय. त्या कुंपणाच्या कडा झाडाच्या मुळाशी अशा काही रुतल्या आहेत की झाडाने त्या कुंपणाला आपलाच एक भाग बनवलंय. लालबुंद मातीमध्ये पाळंमुळं घट्ट रोवून हे झाड आता विशाल आसमंताखाली मोठ्या आत्मविश्वासाने उभं आहे. बहरलेल्या मोहोराला उद्या येऊ घातलेल्या फळांच्या प्रतीक्षेत. अखंड आणि अविरत…

आता माझ्या डायरीतल्या नायकाच्या जागी मला एक बहरलेलं झाड दिसू लागलं. संतुष्ट, तरीही संघर्षरत. अवकाश कवेत घेण्यासाठी.

जाई फराकटे
jaifarakate@gmail.com