निर्व्हाळचा ‘उत्सव’ आणि आजी

१० डिसेंबर २०२२

चिपळूणहून गुहागरच्या दिशेने जाताना वाटेत आमच्या आजीचे माहेर लागतं. आजीच्या लहानपणी ’जाधव’ हे तिथले जमीनदार होते. पाच भाऊ आणि चार बहिणी असा मोठा परिवार. सगळ्यात मोठे भाऊ- कृष्णराव. त्यांना दोन मुली होत्या. कावेरी आणि द्वारकी. थोरली कावेरी हीच माझी आजी. पूर्वी कधीतरी गावातल्या बापट गुरुजींनी जाधव कुटुंबाला एक सल्ला दिला. तुमच्या जमिनीवर एक मारुतीचं देऊळ बांधा आणि जाधवांनी ते देऊळ बांधलं! पुढे पाच भावांची स्वतंत्र घरं आणि एक देऊळ अशी एक वाडीच तयार झाली. मारुतीच्या देवळाच्या निमित्ताने मात्र जाधव कुटुंबीय आणि त्यांचा नात्यांचा पसारा एकत्र बांधला गेला. कुटुंबीयांसाठी देवळाचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘उत्सव’. हाच नाती घट्ट बांधण्याचा उपक्रम म्हणता येईल.

वर्षाकाठी महाशिवरात्री नंतर लगेचच (फेब्रुवरी-मार्चच्या सुमारास) देवळात एक उत्सव केला जातो. आळीपाळीने पाच घरं ह्या उत्सवाची मुख्य जबाबदारी घेत. ज्यांच्याकडे पाळी, त्याचं अंगण वर्दळीचे. ते असे उत्सवाचे घर. उत्सवाच्या निमित्ताने जाधवांची पसरलेली कुटुंबे, सोयरे एकत्र येत. बरेच चाकरमानी, पुण्यामुंबईत स्थायिक झालेले वगैरे असे सर्वच येत.

आलेली मंडळी सकाळी लवकर उठून उत्सवाच्या घरच्या अंगणात जमत, सकाळच्या उबदार उन्हात गरम- गरम खिमट(मऊ भात) आणि लसणाची चटणी न्याहरी म्हणून खात. प्रत्येकाच्या अंगणात अंघोळीसाठी पाण्याच्या चुली पेटत असत आणि सगळ्यांची तयारीची गडबड सुरू होई. नवीन कपडे घालत रडारड करणारी मुले. एकीकडे त्यांना तर दुसरीकडे आपल्या काठ-पदरच्या साड्यांना सावरत छानपैकी दागदागिने, नथी घालून बायका तयार होत असत. पुरुषांची आरडाओरड ठरलेली असे. “माझं पाणी काढलं का?... अगं, माझे कपडे दे... रूमाल कुठेय?.. कंगवा दे...” वगैरे वगैरे... आणि मग नुकतेच सुटकेसमधून काढलेले, कडक इस्त्री केलेले स्वछ सदरे, गांधी टोपी वगैरे घालून पुरुष मंडळी देवळामध्ये दाखल होत. पुढचा अख्खा दिवस हा देवळाभोवती असे. सगळी माणसे देवळाभोवती, बाजूच्या पारावर, मंडपात किंवा जागा मिळेल तिथे. सकाळची आरती झाली की, मग लहान आणि मोठी उत्साही मंडळी मंडपात खेळ रचत. चमचा गोटी, लंगडी, बसफुगडीसारखे मजेशीर खेळ. कोणी जिंकत, कोणी चीटिंग करत, नुसता खेळ, नुसती मज्जा. एकमेकांची थट्टा-मस्करी करत, गप्पा मारत सगळ्यांचा वेळ जाई. आम्ही आजीची नातवंडं मात्र खेळ झाला की, आजीच्या शोधात फिरत असू, "आमची आजी दिसली काय? कुठे आहे ती?" आणि तिचा पत्ता कुठे? तर ह्या घरातून त्या घराकडे. सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करत, हसत, गप्पा मारत ती फिरत असे. तिचा वावर सौम्य असायचा, कुणाची कुठलीतरी आठवण ती पटकन सांगायची. तिच्या स्मरणशक्तीला तोडच नव्हती. दुसर्‍यांचं कौतुकाने, आत्मीयतेने ऐकणं आणि तिचं गोड बोलणं हा तिचा स्थायीभाव. ती वयाने मोठी म्हणून नव्हे तर तिच्या ह्या गुणांमुळे नातेवाइकांना तिच्याबद्दल खूप आदर होता.

निर्व्हाळचे नातेवाईक आजीला ‘आक्का’ म्हणूनच हाक मारत. तिला कुणी ह्या नावाने पुकारल्यावर मनातल्या मनात ही माझी आजी असल्याचा मला फार अभिमान वाटे! तिचं कुणाशी वैर किंवा रुसवे नसत; तर फक्त प्रेम आणि आपुलकी! निर्व्हाळच्या त्या घरांमध्ये आपल्या परडीत जणू निर्मळ आनंद घेऊन त्याचं समान वाटप करत ती घरोघरी जात असे आणि आम्ही तिच्या मागे मागे... तिचं स्वतःचं गावातलं घर मात्र पडीक होतं. त्याबद्दल तिला थोडंसं वाईट वाटत असेल; पण फार नाही. भौतिक गोष्टीत तिचं मन कधीच अडकत नव्हतं. फक्त निसर्गात, लोकांमध्ये आणि नवनवीन अनुभवाच्या विश्वात तिचं मन रमत असे. तिचं घर म्हणजे जाधवांच्या पाच घरांपैकी एक. तिथे कुणी राहत नसे. ती आणि द्वारकी आजी दोघीच असल्यामुळे आणि त्यांनी आपापली घरं लग्नानंतर सासरी मांडल्यामुळे निर्व्हाळचे ते घर रिकामं पडलं. ते दुरुस्त अनेकदा केलं; पण वावर नसल्याने ते पडीक असायचं. त्या पडीक घरात, आवारात सुका पाचोळा आणि किर्र शांतता असे. मला त्या शांततेची पूर्वीपासून फार ओढ होती.
तर उत्सवाच्या दिवशी आजीच्या पडीक घराच्या दिशेने आम्ही पोरं निघालो की, "जनावर असेल तिथे, जाऊ नका" म्हणून नातेवाईक आम्हाला दरडावत. एक तेवढे कांता मामा-आजोबा कौतुकाने आमच्याकडे बघायचे आणि म्हणायचे, "आजीचं घर बघायला चाललीयत पोरं, जाऊ देत." अडचणीत हात घालू नका- एवढाच एक सल्ला. मग, लोकांचा डोळा चुकवत आम्ही तिथे जात असू. मला त्या परिसराविषयी विलक्षण आकर्षण होतं आणि अजूनही आहे. पूर्वी तिथे रेलचेल होती. आजीचे आईवडील तिथं राहिले होते. मी कधीच न पाहिलेली शांतीआते तिथं राहायची आणि त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकत असल्याने, त्यांचं जगणं कसं असेल याबद्दल खूप कुतूहल होतं. त्यांचं ते ओटी-पडवीचं घर, स्वयंपाकघर, बाजूला परिसरात केलेला भाजीपाला, विहिरीतून पाणी काढणे, पावसाळ्यात पोहणे सगळं आजीकडून ऐकलं होतं. आजी पण जेव्हा लहान मुलगी असेल, तेव्हा परकर पोलकं घालून उड्या मारत असेल. इकडेतिकडे फिरत आईला कामात मदत करत, ताक घुसळत, पाऊणकी-दिडकी पाढे पाठ करत बसलेली माझी आजी असं चित्र मनातल्या मनात रेखाटायला मला खूप आवडायचं. तिच्या लहानपणीच्या इतक्या गोष्टी ऐकत आलेय की, माझंही कॅरॅक्टर मी तिच्याभोवती मनोमनी बनवत असे. कधी मी विहिरीत बिनधास्तपणे सूर मारणाऱ्या त्या मुलीकडे आश्चर्याने बघणारी झाडावर बसलेली एक चिमणी असे. तर कधी एका दुपारी सगळे झोपले असताना आपल्या चुलत भाऊ-विनू सोबत देव्हाऱ्यातले देव खेळायला न्यावे म्हणून स्वयंपाकघरातल्या व्हाईनमध्ये (काही कुटण्यासाठी केलेला गोल खड्डा) लपवलेला मी बाळकृष्ण असे. तर त्यावरून मार खालेल्ल्या मुलीकडे केविलवाण्या नजरेने बघणारी मी एक मांजर असे.

आजीच्या पडीक घराभोवती घिरट्या मारत, जुनीपुराणी वस्तू काहीतरी सापडेल आपल्याला, म्हणून पाचोळा उडवत आम्ही मुलं वेळ घालवत असू. दुपार तापायला लागे आणि मग मात्र आम्हाला भुका लागत. “जेवायला या रे, पंगती सुरू झाल्यात”, कुणीतरी आम्हाला हाका मारत असे. मुलांच्या पंगती सर्वात आधी बसत.

उत्सवाच्या दिवशी दुपारच्या जेवणाचा बेत ठरलेला असायचा- काळ्या वाटाण्याची उसळ, कोबीची भाजी, वांगे पावट्याची- डांबे (शेवग्याच्या शेंगा) घालून केलेली उसळ, चपाती/पुरी, वाटपाचे वरण, भात, लोणची- पापड. पत्रावळीत वाढलेल्या जेवणाला काही औरच स्वाद असे. पाव्हणे- पुरुष मंडळी आणि मुलांची जेवण झाली की बायकाची पंगत बसे. जेवून पोट टम्म झालं की, एक डुलकी काढूया म्हणून जिथे मिळेल तिथे जागा शोधत पाठ टेकवायची नातेवाइकांची लगबग सुरू होई. पोरं मात्र अंगणात खेळत, पडत, रडत. माझं तर ढोपर हमखास खरचटलेलं असायचं. वर सांगितलं तसं, मोठ्यांचा अपल्यालाच ओरडा मिळेल म्हणून गपचुप जखमेचं दुखणं गिळून परत खेळ सुरू आणि देवळाच्या दिशेने निघालेल्या आजीकडे नजर जाई.
देवळाजवळ, बाबा आणि अजून काही मुलं क्रिकेट खेळत असायची. तर बाजूला देवळाच्या मंडपात काही भावूक मंडळी ध्यान धरून बसत. आपल्या कुटुंबाला सुखशांती लाभो म्हणून डोळे मिटून कोपऱ्यात जप करणारी मंडळी, डिस्टर्ब झालं की पोरांना ओरडा देत परत ध्यानस्थ मुद्रेत आपल्या कपाळावरच्या आठ्या पुसत पुन्हा जप सुरू करत. देवळातल्या मंडपात एक पुरुष हातात वीणा आणि डोक्यावर गांधी टोपी घालून, टंग टंग आवाज करत फिरत असे. वीणा खाली ठेवायची नसते. एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातात वीणा जाई. वीणा घेताना देणाऱ्याच्या पाया पडायचे असते. एखाद्या तरुण मुलाच्या हातात वीणा गेली की, त्याची सुटका करायचीच नाही म्हणून त्याची मस्करी करत अजून दोन पोरं पारावर किंवा मंडपाच्या कठड्यावर बसत टिंगलटवाळ्या करत असत. अशी त्या उत्सवाची मजा होती.

आजी बहुतेक दोनदा देवळात येई. एकदा सकाळी मोठ्या आरतीला, नंतर एकदा शांततेत दुपारी किंवा संध्याकाळी. चिपळूणहुन आणलेला, परिसरातल्या कण्हेरीच्या फुलांचा हार ती मारुतीला घालत असे. आणि मग शेंदूराने रंगवलेल्या भगव्या मारुतीच्या मूर्ती समोर मनापासून हात जोडले जायचे तिचे. तिथेही तिचा तसाच सौम्य वावर. अतिरेक, वाढीव असं काहीच नाही. समाधानाच्या ज्या कुठल्याही सीमा असतील, त्या तिने कधीच पार केल्या असल्याचे मला भासायचं. काय मागत असावी ती मारुतीरायाकडे? तिला कधीच दुसऱ्याकडे काही मागताना किंवा कुठल्या अपेक्षेने कुणासाठी काही करताना मी बघितले नाही. कुणी तिला भेटलं की, ती व्यक्ती मनाने तृप्त आणि भरलेल्या झोळीनेच जाई. परिसरातले चिकू, पेरू, फणसाआंब्याची साठं किंवा तिने बनवलेलं काहीतरी ती देईच. हात रिकामे कुणाचे नसावे, असं मानणारी ती मारुतीरायाकडे काय मागत असावी? मला वाटतं, आपल्या चिकूला, पेरूला, फणसाला भरपूर फळं येऊ दे! जाई, जास्वंदी, मोगरा बहरू देत, असंच काहीतरी मागत असावी. ती देवळात येताच, आम्ही नातवंडं तिच्या मागे पुढे लुडबुड करत असू. देवासमोर हात जोडून पुढे प्रसाद काय मिळतोय ह्याकडे आमचे लक्ष असायचे. गूळ-खोबरं मला खूप आवडायचं. देवाचा ‘प्रसाद’ हा प्रसाद म्हणून खायचा असा काही संस्कार करण्याच्या फंदात ती पडत नसे. “खा गं... घे अजून” म्हणून ती मजेत द्यायची. सणसुदीला नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचे नाही, असे नियम जरी असले, तरी घारगे किंवा काही गोड बनत असताना मध्येच स्वयंपाकघरात डोकावलं की, आजी मस्त हसत म्हणायची, “पटकन घे, पळ !” मारून मुटकून संस्कार करण्यात तिला रस नव्हता. तिचं जगणं ही सहजसोपं असावं.

तर, निर्व्हाळ गावातला, तिच्या माहेरी घालवायचा हा दिवस म्हणजे 'उत्सव'. उत्सव म्हणजेच निर्व्हाळचा उत्सव असाच अर्थ मला अनेक वर्षे समजत होता. उत्सवाची तारीख निघाली की, आजीच्या आनंदाला आणि तिच्या आठवणींना पाझर फुटे. तोच झरा, त्याच ठिकाणी, तरीही त्यात भिजायला कशी नेहमी वेगळी मजा येते, तसंच तिच्या गोष्टीत रमायला माझं मन आतुर असे. उत्सवाला, कोण, कसं, केव्हा निघायचं ह्याचं प्लॅनिंग असायचं. अगदी लहानपणीच्या आठवणीत आजीसोबत आम्ही तिघेच मला दिसतोय- विकी, मानू आणि मी. दरवर्षीचा आजी सोबतचा तो एस.टीमधला प्रवास मला हवाहवासा वाटायचा. आजीसोबत केलेल्या अनेक प्रवासातलं वैशिष्ट्य म्हणजे, तो असा प्रवास होता जेव्हा मला खिडकीत बसायच्या शर्यतीत रस नसे. फक्त तिला चिकटून, तिच्यावर रेलून, कधी मांडीवर किंवा नुसतं तिला बिलगून केलेला प्रवास.

एस.टीची टिंग टिंग होताच आणि चिपळूण सोडलं रे सोडलं की लगेच जादूगाराचा बंगला दिसायची वाट आम्ही तिघे बघायचो. जादूगरचा बंगला दिसला की, आजीला आणि एकमेकांना दाखवायचो. कोण कुठला जादूगार, काहीच माहीत नाही. पण उगाचच त्याचं आकर्षण. आजी आपली पोरांची मज्जा घेत मिश्किल हसत असायची. लहान मुलांना टेपा मारल्या आणि त्यात सफल झालो की कसा आनंद मिळतो, तोच आनंद तिच्या चेहऱ्यावर असायचा.

तो संपूर्ण प्रवास आजीच्या बालपणीच्या आठवणी ऐकत मजेत जायचा. पाचाड आलं की तुकामामाचं घर, ते बघा.. नंतर बळीमामाचं घर, ते बघा. पाचाडच्या घाटात गरगरलं की, जरा आजीच्या मांडीवर डोकं ठेवावं म्हटलं तर तिचा ओरडा मिळायचा. प्रवासात झोपायचं नाही, बाहेर बघावं. रस्ता पाठ झाला तरीही काहीतरी वेगळं नजरेस पडू शकेल ना.. सतत वेगळा अनुभव घ्यावा, नवीन शिकावं, निसर्गाशी एकरूप असावं हे तात्पर्य. निर्व्हाळच्या स्टॉपवर उतरताच आम्ही उड्या मारत, सामान उचलत, आजीचा हात पकडत गावाच्या दिशेने चालायला लागायचो. तिच्या गोष्टी ऐकत आणि तिच्या हसण्यात आपला सूर मिळवत. निर्व्हाळ गाव आणि तिथली माणसं यांच्या गोष्टी ऐकताना, आपणसुद्धा त्या गावचेच आहोत असं मला वाटायचं. गाव, ठिकाण, माणसं ही कितीही जवळची वाटली, तरी भौतिकदृष्ट्या ती तात्पुरतीच आसतात. आजी जे जगत होती, त्या तिच्या जगण्यात आपणही तितकेच तिच्या सोबत होतो, असा जरी अनुभव आला, तरी तोही तात्पुरता असतो. कितीही कवटाळावासा वाटला, तरी तो निसटतो आणि खरंतर निसटू द्यावा. काय घ्यावं, तर त्यातलं सार, त्यातलं सत्य एवढंच. माझी आजी, तिचं आयुष्य, तिचं व्यक्तिमत्त्व यावर लिहावं असं खूप आहे. न संपणारं आहे. मला वाटतं, आजी म्हणजे एक अनुभव होती. तिचं सार वेचण्याचा प्रयत्न मी मनापासून करत आलेय. ती आता जरी आमच्यात नाही, तरीही तिचं ते सार मी माझ्या आत साठवून ठेवलंय. तिचं जगणं हे आता आपल्या आठवणीतल्या आणि भावविश्वातल्या समग्र आकलनाचा एक महत्त्वाचा धागा बनून राहिलाय, असं मला वाटतं आणि तो मऊमुलायम आल्हाददायक धागा, मला पुरेसा आहे.

शाहीन इंदुलकर

shahin.indulkar@gmail.com